व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही पाहिलेले चमत्कार!

तुम्ही पाहिलेले चमत्कार!

तुम्ही पाहिलेले चमत्कार!

“चमत्कार” या शब्दाचा दुसराही अर्थ आहे; “अतिशय उल्लेखनीय किंवा अद्‌भुत घटना, वस्तू किंवा करामत.” आणि अशाप्रकारचे चमत्कार आपण सर्वांनी पाहिलेले आहेत; हे चमत्कार देवाच्या हस्तक्षेपाविना आहेत.

निसर्ग नियमांबद्दल अधिक ज्ञान घेतल्यामुळे मानव, एकेकाळी अशक्य वाटणाऱ्‍या गोष्टी साध्य करू शकला आहे. उदाहरणार्थ, शंभर वर्षांपूर्वी पुष्कळ लोकांना कदाचित, संगणक, दूरदर्शन, अंतरिक्ष तंत्रज्ञान आणि आधुनिक दिवसांतील विकासांमुळे आज जे काही साध्य करण्यात आले ते अशक्य वाटले असेल.

देवाच्या सृष्टीत दिसणाऱ्‍या चक्रावून टाकणाऱ्‍या अद्‌भुत गोष्टींविषयी आपल्याला केवळ अर्धवट ज्ञान आहे, ही जाणीव बाळगणारे काही शास्त्रज्ञ असे कबूल करतात, की एखादी गोष्ट अशक्य आहे असे आता आम्ही ठामपणे म्हणत नाही. फार तर फार ते असे म्हणतात, की ती गोष्ट असंभवनीय आहे. अशाप्रकारे ते भविष्यात एखादा “चमत्कार” होण्याची शक्यता आहे, असा विश्‍वास बाळगतात.

“अलौकिक स्रोताकडून” होणाऱ्‍या गोष्टींना सूचित करणाऱ्‍या “चमत्कार” या शब्दाच्या पहिल्या अर्थाचा आपण उल्लेख करीत असलो तरी, आपल्यातील प्रत्येकाने चमत्कार पाहिले आहेत, असे आपण म्हणू शकतो. जसे की, आपण सूर्य, चंद्र आणि तारे पाहतो—हे सर्व एका ‘अलौकिक स्रोताच्या’ अर्थात स्वतः निर्माणकर्त्याच्या हस्तकृती आहेत. शिवाय, मानव शरीर कशाप्रकारे कार्य करते? मेंदू कसा कार्य करतो? किंवा मानव भ्रूण कसे वाढते? या सर्व प्रश्‍नांची संपूर्ण माहिती कोण देऊ शकेल? शरीर यंत्र (इंग्रजी) नावाच्या पुस्तकात म्हटले आहे: “केंद्रिय तंत्रिका तंत्राद्वारा नियंत्रित होणारे मानव शरीर हे, एक क्लिष्ट संवेदनक्षम उपकरण, एक स्वयंचलित मोबाईल इंजिन, एक स्वयंउत्पादक संगणक—अपूर्व आणि अनेक बाबतीत गूढ सृष्टी आहे.” “मानव शरीर” निर्माण करणाऱ्‍या देवाने खरोखरच एक चमत्कार केला आहे; आणि हा चमत्कार पाहून आपण नेहमी चकित होतो. असे अनेक इतर चमत्कारही आहेत जे तुम्ही पाहिले आहेत. फक्‍त कदाचित तुम्हाला ते चमत्कार आहेत हे माहीत नसावे.

एक पुस्तक एक चमत्कार असू शकते का?

बायबलसारखे इतर कोणतेही पुस्तक सर्वाधिक वितरित पुस्तक नाही. हा एक चमत्कार आहे असे तुम्हाला वाटते का? ते टिकून राहिल्याचे श्रेय आपण एका ‘अलौकिक स्रोताला’ देऊ शकतो का? बायबल मानवांनी लिहिलेले पुस्तक असले तरी, आपण यात आपले विचार नव्हे तर देवाचे विचार व्यक्‍त केले आहेत असा बायबलच्या लेखकांनी दावा केला आहे. (२ शमुवेल २३:१, २; २ पेत्र १:२०, २१) जरा विचार करा. ते ४० लोक होते आणि १,६०० वर्षांच्या कालावधीत हयात होते. ते विविध पार्श्‍वभूमीतून आलेले लोक होते; जसे की त्यांच्यापैकी काही मेंढपाळ, लष्करी सैनिक, कोळी, सरकारी सेवक, वैद्य, याजक आणि राजे होते. तरीपण ते सर्व आशेचा एक संयुक्‍त संदेश सांगू शकले जो सत्य आहे आणि अचूक देखील.

यहोवाच्या साक्षीदारांनी बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतरच त्याला प्रेषित पौलाने म्हटले त्याप्रमाणे “ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले.” (१ थेस्सलनीकाकर २:१३) अनेक वर्षांपासून त्यांच्या प्रकाशनांतून हे स्पष्ट करण्यात आले आहे, की बायबलमध्ये तथाकथित परस्परविरोधी वाटणाऱ्‍या गोष्टींचा बायबलच्या एकंदरित संदेशाबरोबर कशाप्रकारे मेळ बसवता येतो. ही आंतरिक सुसंगतताच, बायबलचा लेखक देव असल्याचा मोठा पुरावा आहे. *

बायबलचा नाश करण्यासाठी जितके जोरदार प्रयत्न करण्यात आले तितके प्रयत्न इतर कोणत्याही पुस्तकासाठी करण्यात आले नाहीत. इतके असूनही आज ते संपूर्ण किंवा अंशतः २,००० पेक्षा अधिक भाषांत उपलब्ध आहे. एक पुस्तक म्हणून त्याचे झालेले संरक्षण आणि त्या पुस्तकातील मजकूराच्या संरक्षणामागे ईश्‍वराचाच हात असल्याचे दिसून येते. बायबल खरोखरच एक चमत्कार आहे!

“सजीव, सक्रिय” चमत्कार

प्राचीन काळी होणारे चमत्कार जसे की चमत्काराने आजार बरे करणे व मृतांना उठवणे हे आजच्या दिवसात होत नाहीत. पण आपण हा विश्‍वास बाळगू शकतो, की देवाच्या येणाऱ्‍या नव्या जगात अशाप्रकारचे चमत्कार पुन्हा होतील; आणि तेही जगव्याप्त प्रमाणावर! या चमत्कारांमुळे कायमची सुटका मिळेल आणि आज आपण कल्पनाही करू शकत नाही, इतके ते अद्‌भुत असतील.

आपल्यापर्यंत अद्‌भुतपणे आलेले बायबल, आजही, लोकांच्या फायद्यास्तव त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वात बदल करण्यास त्यांना प्रवृत्त करण्याद्वारे जणू काय चमत्कारच घडवून आणत आहे. (पृष्ठ ८ वरील “देवाच्या वचनातील शक्‍ती” हा चौकोन पाहा.) इब्री लोकांस ४:१२ म्हणते: “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्‍यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” होय, बायबलमध्ये इतकी शक्‍ती आहे, की संपूर्ण जगभरातील ६० लाखांपेक्षा अधिक लोकांच्या जीवनात त्याने परिवर्तन घडवून आणले आहे; यामुळे त्यांच्या जीवनाला उद्देश आणि भवितव्यासाठी एक अद्‌भुत आशा मिळाली आहे.

बायबलला तुमच्याही जीवनात चमत्कार करू देऊन तर पाहा!

[तळटीप]

^ परि. 8 या तथाकथित परस्परविरोधात्मक गोष्टींचा मेळ कसा बसतो याचे परीक्षण करण्याची तुमची इच्छा असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल—देवाचे वचन की मानवाचे (इंग्रजी) या पुस्तकाच्या ७ व्या अध्यायात तुम्हाला अनेक उदाहरणे मिळतील.

[७ पानांवरील चौकट/चित्र]

आधीच मरण पावला होता की अद्याप जिवंत होता?

योहान १९:३३, ३४ नुसार, “शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि लागलेच रक्‍त व पाणी बाहेर निघाले” तेव्हा येशू आधीच मरण पावला होता. पण, काही भाषांतरांमध्ये मत्तय २७:४९, ५० वरून असे सूचित होते, की येशू अद्याप जिवंत होता. हा फरक का?

एखाद्या गुन्हेगाराला मृत्यूदंडाची शिक्षा म्हणून खांबावर टांगण्यात आल्यास मोशेच्या नियमशास्त्रानुसार त्याचे प्रेत रात्रभर टांगलेल्या अवस्थेत राहू देण्यास मनाई होती. (अनुवाद २१:२२, २३) यास्तव, येशूच्या दिवसांत, एखादा गुन्हेगार अंधार होईस्तोवर जिवंत असेल तर त्याचे पाय तोडण्याची रीत होती; जेणेकरून तो लवकर मरेल. पाय तोडल्यामुळे, व्यवस्थीतरीत्या श्‍वास घेता यावा म्हणून तो पायांचा आधार घेऊन स्वतःला सरळ उभा करू शकणार नाही. शिपायांनी येशूच्या बाजूला टांगलेल्या दोन्ही चोरांचे पाय तोडले परंतु येशूचे तोडले नाहीत; कारण त्यांना वाटले की तो मरण पावला आहे. तो जर मेलेला नसेल तर काही वेळाने शुद्धीवर आल्यावर त्याचे पुनरुत्थान झाले, अशी खोटी अफवा पसरू नये म्हणून त्यांनी कदाचित त्याच्या कुशीत भाला भोसकून तो मेल्याची खात्री केली.

काही भाषांतरात, मत्तय २७:४९, ५० मध्ये आपल्याला वेगळ्या घटनांचा क्रम दाखवण्यात आला आहे. त्या वचनात असे म्हटले आहे: “दुसऱ्‍या एकाने एक भाला घेतला आणि त्याच्या कुशीत खुपसला तेव्हा त्यातून रक्‍त आणि पाणी बाहेर आले. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला.” तिरप्या वळणातील वाक्य खरे तर सर्वच बायबल हस्तलिपींमध्ये नाही. पुष्कळ विद्वानांचे असे मत आहे, ते योहानाच्या शुभवर्तमानात घालण्यात आले परंतु ते चुकीच्या ठिकाणी घालण्यात आले. त्यामुळे पुष्कळ भाषांतरांमध्ये हे वाक्य कंसात आहे ज्यामुळे ते एक वेगळे वाक्य वाटते. किंवा, काही भाषांतरांत तळटीपेत त्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आणि काही भाषांतरे तर ते वाक्यच पूर्णपणे वगळतात.

नवीन जग भाषांतर यासाठी आधार म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आलेल्या वेस्टकॉट आणि हॉर्ट यांच्या आवृत्तीत ते वाक्य दुहेरी कंसात आहे. याचे कारण देताना ती आवृत्ती म्हणते, की हे वाक्य “शास्त्र्यांनी जोडले असावे, अशी दाट शक्यता आहे.”

यास्तव, योहान १९:३३, ३४ वास्तविक आहे आणि रोमी शिपायांनी त्याच्या कुशीत भाला खुपसला तेव्हा तोपर्यंत तो मरण पावलेला होता.

[८ पानांवरील चौकट/चित्र]

देवाच्या वचनातील शक्‍ती

ताटातूट झालेल्या परिवारातला किशोरवयीन डेटलेफ, * हळूहळू मादक पदार्थांचे सेवन व मद्यपान करू लागला आणि हेव्ही मेटल संगीत ऐकू लागला. तो स्कीनहेड नावाच्या टोळीचा एक सदस्य बनला व त्याच्या हिंसक वागणुकीमुळे बऱ्‍याचदा पोलिसांनी त्याला पकडले.

१९९२ साली, उत्तरपूर्व जर्मनीतील एका रेस्टॉरंट व बारमध्ये ६० स्कीनहेड्‌सची ३५ पंकर्स (पंक टोळीचे सदस्य) बरोबर मोठी मारामारी झाली. यांत, थॉमस नावाच्या एका पंकरला इतक्या जबरदस्तपणे मारहाण करण्यात आली की तो मरण पावला. अनेक टोळीप्रमुखांना आणि डेटलेफला एका न्यायचौकशीनंतर तुरुंगाची शिक्षा सुनावण्यात आली; ही बातमी प्रसारमाध्यमात मोठ्या प्रमाणावर गाजली.

डेटलेफ तुरुंगातून सुटून आल्यानंतर काही काळातच त्याला यहोवाच्या साक्षीदारांनी एक पत्रिका दिली. “जीवन इतक्या समस्यांनी का भरलेले आहे?” असे त्या पत्रिकेचे शीर्षक होते. डेटलेफने ती पत्रिका वाचताच त्याला त्यातील गोष्टींची सत्यता पटली आणि तो साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करू लागला. यामुळे त्याचे जीवन पार बदलले. १९९६ सालापासून तो यहोवाचा एक आवेशी साक्षीदार बनला आहे.

पूर्वी पंकर असलेला झेकफ्रीट, मारामारीत मरण पावलेला तरुण थॉमस याचा खास मित्र होता; तोही नंतर साक्षीदार बनला आणि आता तो मंडळीत वडील या नात्याने सेवा करत आहे. झेकफ्रीट जेव्हा डेटलेफच्या मंडळीत (थॉमसची आई देखील कधीकधी त्या सभांना उपस्थित राहते) बायबल आधारित जाहीर भाषण द्यायला गेला तेव्हा डेटलेफने त्याला आपल्या घरी जेवायला बोलवले. दहा वर्षांपूर्वी हेच दोघे एकमेकांचे जहाल शत्रू होते. एकमेकांना पाहिल्यावर त्यांना कदाचित स्वतःवर नियंत्रण ठेवायला जड गेले असते. पण आज त्यांच्यातले बंधूप्रेम स्पष्ट दिसते.

डेटलेफ आणि झेकफ्रीट हे दोघेही, पृथ्वीवरील परादीसमधील जीवनासाठी थॉमसचे स्वागत करण्याची आतुरतेने वाटत पाहत आहेत. डेटलेफ म्हणतो: “या केवळ विचारानंच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. मी जे केलं त्याचं मला खूप वाईट वाटतं.” डेटलेफ आणि झेकफ्रीट या दोघांची, आज ते इतर लोकांना जसे यहोवाला ओळखण्यास व बायबलमधील आशेत आनंद करण्यास मदत करत आहेत तशीच थॉमसला मदत करण्याची इच्छा आहे.

अशी आहे देवाच्या वचनातील शक्‍ती!

[तळटीप]

^ परि. 25 नावे बदलण्यात आली आहेत.

[६ पानांवरील चित्र]

मानव शरीर एक अद्‌भुत सृष्टी आहे

[चित्राचे श्रेय]

Anatomy Improved and Illustrated, London, १७२३, Bernardino Genga