व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बेरलेबुर्क बायबल

बेरलेबुर्क बायबल

बेरलेबुर्क बायबल

धर्माचरणवाद एक धार्मिक चळवळ होती जी १७ व्या व १८ व्या शतकांदरम्यान जर्मन लुथरन चर्चमध्ये सुरू झाली होती. या चळवळीच्या काही अनुयायांची त्यांच्या विश्‍वासामुळे टर उडवली जात, त्यांचा छळही केला जात. अनेक धर्माचारी विद्वानांनी, फ्रँकफर्ट एम मेनच्या उत्तरेकडे १५० किलोमीटरवर असलेल्या बेरलेबुर्क येथे आश्रय घेतला. काऊन्ट काझिमीर वोन विटगनश्‍टाईन नावाच्या एका अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या स्थानीय उमरावाने त्यांना आश्रय दिला. बेरलेबुर्कमध्ये आलेल्या या प्रचारकांनी व विद्वानांनी बायबलचे एक नवे भाषांतर तयार केले ज्याला आज बेरलेबुर्क बायबल म्हणून ओळखले जाते. हे भाषांतर कशाप्रकारे तयार करण्यात आले?

आश्रय घेतलेल्यांपैकी एकाचे नाव होते योहान हाऊग; योहानला स्ट्राझबर्गमधील आपले घर सोडावे लागले होते कारण स्थानीय तत्त्ववेत्ते त्याला धार्मिक बाबींवर आपले मत व्यक्‍त करू देत नव्हते. हाऊग ज्ञानी विद्वान व कुशल बहुभाषाभिज्ञ होता. बेरलेबुर्क येथील आपल्या सहविद्वानांना त्याने आपल्या मनातील इच्छा व्यक्‍त केली. “पूर्णपणे शुद्ध बायबल भाषांतर तयार करण्याची, लुथरच्या भाषांतरांत सुधारणा करण्याची, देवाच्या वचनाचा अचूक अर्थ व त्यामागील खऱ्‍या अर्थाचे भाषांतर करण्याची आपली इच्छा आहे,” असे त्याने म्हटले. (डी गेशिकटडिअबरलंगबुर्क बिबल [बेरलेबुर्क बायबलचा इतिहास]). हे बायबल तयार करण्यामागे हेतू हा, की त्यात स्पष्टीकरण देणाऱ्‍या नोंदी व टिपणी असतील आणि ते साधारण मनुष्याला समजेल अशा भाषेत असेल. हाऊग यांनी इतर युरोपियन देशांतील पंडितांचे सहकार्य मागितले आणि २० वर्षे या प्रकल्पावर काम केले. १७२६ साली बेरलेबुर्क बायबलच्या प्रकाशनास सुरुवात झाली. त्यात विस्तृत नोंदी असल्यामुळे या बायबलचे आठ खंड तयार करावे लागले.

बेरलेबुर्क बायबलमध्ये खरच काही सुरेख वैशिष्ट्ये आहेत. जसे की, निर्गम ६:२, ३ मध्ये असे म्हटले आहे: “पुढे देव मोशेशी बोलला आणि त्याला म्हणाला: मी प्रभू आहे! मी अब्राहाम/, इसहाक/ व याकोब यांस सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो: पण मी यहोवा या माझ्या नावाने त्यांस ज्ञात नव्हतो.” या वचनावरील एका नोंदीत असे म्हटले आहे: “यहोवा हे नाव . . . वेगळे केलेले/किंवा/घोषित नाव.” निर्गम ३:१५ आणि निर्गम ३४:६ वरील टिपणीत देखील, यहोवा हे देवाचे व्यक्‍तिगत नाव आहे.

अशाप्रकारे बेरलेबुर्क बायबल जर्मन बायबलच्या मालिकांतील आणखी एक बायबल ठरले ज्यात, मुख्य वचनांत, तळटीपेत किंवा टिपणीत यहोवाच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. देवाच्या व्यक्‍तिगत नावाचा आदर करणारे अलिकडचे भाषांतर म्हणजे यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले पवित्र शास्त्रवचनांचे नवीन जग भाषांतर होय.