व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

दावीद देवाच्या मनासारखा मनुष्य होता, पण २ शमुवेल १२:३१ व १ इतिहास २०:३ वरून काही लोक निष्कर्ष काढतात त्याप्रमाणे त्याने कैद केलेल्या लोकांना अत्यंत क्रूर वागणूक दिली का?

नाही. दावीदाने कैद केलेल्या अम्मोनी लोकांकडून केवळ सक्‍तीने मजुरी करवून घेण्याचे फर्मावले होते. काही बायबल अनुवादांत या वचनाचे ज्या प्रकारे भाषांतर करण्यात आले आहे, त्यामुळे दाविदाने केलेल्या कारवाईबद्दल काही जणांचा गैरसमज झाला आहे.

अम्मोनी लोकांना दिलेल्या वागणुकीचे वर्णन करत असताना काही बायबल आवृत्तींमध्ये दावीदाला अतिशय क्रूर दर्शविले आहे. उदाहरणार्थ, पंडिता रमाबाई भाषांतरानुसार २ शमुवेल १२:३१ असे म्हणते: “त्याने त्यातल्या लोकांना बाहेर काढून त्यांना करवतीखाली व लोखंडी मळण्याच्या यंत्राखाली व लोखंडी कुऱ्‍हाडींखाली घातले आणि त्यांना वीटांच्या भट्टीतून चालवले. याप्रमाणे त्याने अम्मोनाच्या संतानांच्या सर्व शहरांचे केले.” १ इतिहास २०:३ च्या अहवालाचे भाषांतर अशाच प्रकारे केले आहे.

पण, बायबल विद्वान सॅम्युएल रोल्स ड्रायव्हर यांनी अशी नोंद केली की “दाविदाचे व्यक्‍तिमत्त्व व त्याच्या स्वभावाबद्दल आपल्याला जी काही माहिती आहे तिच्याशी” क्रूरतेचा मेळ बसत नाही. यामुळे दि अँकर बायबल मधील एक टिपणी म्हणते: “दावीद हस्तगत केलेल्या प्रदेशाचा आर्थिक फायदा घेण्याकरता कैद्यांचे गट पाडून त्यांना काम देत होता; त्याकाळी विजयी राजाने असे करणे सर्वसाधारण होते.” ॲडम क्लार्क यांचे मत हेच विचार दर्शवतात. ते म्हणतात: “यास्तव [या वचनांचा] अर्थ हा आहे की त्याने [दावीदाने] त्या लोकांना गुलाम केले व त्यांना करवतीने कापण्याचे, लोखंडी दाताळ्या बनवण्याचे, खाणीत तसेच  . . लाकूड तोडण्याचे व विटा बनवण्याचे काम दिले. करवतीने माणसांना चिरणे, कापणे, त्यांचे तुकडे करणे या गोष्टी या शास्त्रवचनांच्या संदर्भात तितक्याच अर्थहीन आहेत जितक्या अमालेक्यांशी दावीदाने केलेला व्यवहार.”

बरेच आधुनिक अनुवाद या अधिक अचूक समजुतीचे विचार प्रदर्शित करतात व स्पष्ट करतात की दाविदावर असा दयाहीन वागणूक देण्याचा आरोप करू नये. * बायबल सोसायटी ऑफ इंडियाच्या भाषांतरावर लक्ष द्या. “तेथल्या नागरिकांना त्याने करवती, लोखंडी कुळवे व कुऱ्‍हाडी यांचे आणि विटा भाजण्याचे काम करायला लावले. अम्मोन्याच्या इतर सर्व नगरांची त्याने अशीच वासलात लावली.” (२ शमुवेल १२:३१) “लोकांना बाहेर काढून दावीदाने त्यांच्याकडून करवती, कुऱ्‍हाडी, पहारी या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले. अम्मोन्यांच्या सर्व नगरांमध्ये दावीदाने हेच केले.” (१ इतिहास २०:३, ईजी टू रीड व्हर्शन) पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी) आधुनिक विद्वानांच्या मतांशी जुळते: “त्याने त्या लोकांना बाहेर आणले जेणेकरून तो त्यांना दगड फोडण्याचे व तीक्ष्ण लोखंडी उपकरणे व लोखंडी कुऱ्‍हाडीचे काम देऊ शकेल आणि त्याने त्यांना विटा बनवण्याचे काम करावयास लाविले.” (२ शमुवेल १२:३१) “त्याने त्या लोकांना बाहेर आणले व दगड फोडण्याचे व तीक्ष्ण लोखंडी उपकरणे बनवण्याचे व लोखंडी कुऱ्‍हाडीचे काम दिले व या पद्धतीने दावीदाने अम्मोन्यांच्या पुत्रांच्या सर्व शहरास असेच केले.”—१ इतिहास २०:३.

दावीदाने कैद केलेल्या अम्मोन्यांचा क्रूर छळ किंवा त्यांची निर्दयीपणे कत्तल केली नाही. त्याने त्या काळच्या युद्धातील अत्याचारी व निर्दयी चालीरितींचे अनुकरण केले नाही.

[तळटीप]

^ परि. 6 एका अक्षरात बदल झाल्यामुळे, इब्री शास्त्रातील वचन असे होऊ शकते: “त्याने त्यांना करवती खाली दिले” किंवा “त्याने (करवतीने) त्यांचे तुकडे केले.” तसेच “वीट भट्टी” याचा अर्थ “विटांचा साचा” असाही होऊ शकतो. असा साचा खूपच अरूंद असल्याने कोणालाही त्यातून जाणे अशक्य आहे.