व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

साबा द्वीपावरील द बॉटम

साबा द्वीपावरील द बॉटम

साबा द्वीपावरील द बॉटम

डच लोकांच्या अंमलाखाली असलेले साबा द्वीप एकेकाळी, कॅरिबियन समुद्रातील जहाजे लुटणाऱ्‍या चाच्यांचा बालेकिल्ला होता. आज मात्र, प्वेर्त रिकोच्या पूर्वेकडे २४० किलोमीटर अंतरावरील या लहानशा द्वीपावर १,६०० रहिवाशी राहात असून त्यांपैकी ५ जण यहोवाचे साक्षीदार आहेत. हे निर्भय सेवक देखील मौल्यवान असे काहीतरी शोधत आहेत, पण लुटण्याकरता नव्हे. ते अशा लोकांना शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, की ज्यांची “सार्वकालिक जीवनासाठी योग्य मनोवृत्ती आहे.”—प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW.

जून २२, १९५२ रोजी यहोवाच्या साक्षीदारांचे सिबिया नावाचे १८ मीटर लांबीचे जहाज साबाच्या समुद्रकिनाऱ्‍यापाशी नांगरण्यात आले. अशारितीने देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा सर्वप्रथम येथे प्रवेश झाला. (मत्तय २४:१४) गस्ट माकी आणि स्टॅन्ली कार्टर हे दोन मिशनरी द लॅडर अर्थात ५०० दगडी पायऱ्‍यांचा मार्ग चढून साबा द्वीपाची राजधानी असलेल्या द बॉटम येथे आले. * कित्येक शतके, हा अरुंद रस्ता, द्वीपावरील रहिवाशांपर्यंत पोचण्याचा एकमेव मार्ग होता.

साबा येथील ख्रिस्ती प्रचार कार्याचा पहिला अहवाल यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक १९६६ यात प्रकाशित करण्यात आला होता. या अहवालानुसार या द्वीपावर केवळ एकच सक्रिय साक्षीदार होता. नंतर, कॅनडाच्या एका कुटुंबाने येऊन कित्येक वर्षे येथे सुवार्तेचा प्रचार केला. अलीकडेच, संयुक्‍त संस्थानांतील एक सेवानिवृत्त जोडपे, रस्सल व कॅथी साबा येथे गेले व तेथे त्यांनी प्रचार कार्यात सहभाग घेतला. त्यांचा हा अनुभव त्यांच्याच शब्दांत:

साबाची यात्रा

माझी पत्नी व मी रॉनल्ड यांच्या निमंत्रणावरून विमानाने येथे आलो. रॉनल्ड हे १९९० दशकाच्या बराचशा काळादरम्यान या द्वीपावर राहणारे एकटे साक्षीदार होते. आम्ही आलो तेव्हा आमचे यजमान विमानतळावर आमची वाट पाहतच होते. त्यांच्यासाठी आम्ही एका लहानशा खोक्यात भाज्या आणल्या होत्या. ही भेट पाहून त्यांना फार आनंद झाला कारण या द्वीपावर व्यावसायिक शेती केली जात नाही. एका लहानशा ट्रकमध्ये बसून आम्ही माऊंट सीनरी नावाच्या वळणदार डोंगरवाटेने हळू हळू या मृत ज्वालामुखीच्या शिखराच्या दिशेने जाऊ लागलो.

वाटेत आम्ही हेल्स गेट नावाच्या खेडेगावात थांबलो. रॉनल्ड यांनी सार्वजनिक सूचना फलकावर रविवारच्या जाहीर भाषणाचे जे निमंत्रण पत्रक लावले होते ते अजूनही फलकावर आहे की नाही हे पाहायला ते गाडीतून उतरले. निमंत्रण अजूनही फलकावर आहे हे पाहून आम्हाला आनंद वाटला. ते पुन्हा ट्रकमध्ये येऊन बसले आणि आम्ही पुन्हा द्वीपावरील सर्वात मोठे खेडे विंडवर्डसाईड याकडे नेणारे चढण चढू लागलो. या खेड्याच्या इंग्रजी नावावरून सुचवण्यात आल्याप्रमाणे हे रम्य खेडेगाव द्वीपावर वाऱ्‍याच्या बाजूला जवळजवळ १,३०० फूट उंचावर वसलेले आहे. रॉन यांच्या घराच्या फाटकातून आमची गाडी आत येताच आम्हाला यहोवाच्या साक्षीदारांचे राज्य सभागृह असे लिहिलेला रंगीबेरंगी फलक दिसला.

दुपारच्या जेवणाच्या वेळी मी रॉनला एक प्रश्‍न विचारला. खरे तर याच प्रश्‍नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना भेट द्यायचे ठरवले होते. मी विचारले, “साबा बेटावर राज्य उद्‌घोषक म्हणून येणे कसे काय घडून आले?”

रॉन यांनी सांगितले, “१९९३ साली प्वेर्त रिको येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर माझ्या पत्नीला व मला परदेशी नेमणुकीतच राहण्याची इच्छा होती. याआधी आम्ही एका पायनियर जोडप्यासोबत साबा द्वीपावर आलो होतो आणि येथे १,४०० रहिवाशी असून एकही साक्षीदार नाही असे ऐकले होते. त्यामुळे आम्ही प्वेर्त रिको शाखा समितीशी येथे येऊन राहण्याविषयी विचारविनिमय केला.

“एकेक घटना घडत गेली आणि शेवटी आम्हाला येथे येऊन राहण्याची परवानगी मिळाली. पण दुःखाची गोष्ट म्हणजे येथे येऊन दोन वर्षे झाल्यावर माझी पत्नी गंभीररित्या आजारी पडली आणि आम्हाला कॅलिफोर्नियाला परतणे भाग पडले. तिचा मृत्यू झाल्यानंतर मी साबाला परत आलो. त्याचे काय आहे, की एखादे काम सुरू केल्यावर ते अर्धवट टाकायला मला आवडत नाही.”

साबा द्वीपावर घरोघरचे प्रचार कार्य

रॉन यांच्या शंभर वर्षांच्या जुन्या घरातली बैठक खोली ते राज्य सभागृह म्हणून वापरतात. * सेवेला जाण्याच्या तयारीत आम्ही बाहेर बसून न्याहारी करत असतानाच अचानक भुरभूर पाऊस पडला आणि आमचे खुल्या हवेतले स्वयंपाकघर त्यात भिजले. न्याहारी झाल्यावर, ढगाळ वातावरणातच आम्ही द बॉटम येथे घरोघरचे प्रचार कार्य करायला निघालो. प्रत्येक घरी रॉन घरमालकाला नावाने हाक मारत होते. बहुतेकजण त्यांना ओळखतात तसेच त्यांच्या कार्याशीही ते परिचित आहे. आम्ही अलीकडेच घडलेल्या एका स्थानिक घटनेच्या आधारावर चर्चा केली. बऱ्‍याचजणांनी आनंदाने बायबल साहित्य स्वीकारले.

गावातल्या लोकांना तुम्ही ओळखत नसल्यास, राज्य संदेशाबद्दल कोणी आवड दाखवली याचा रेकॉर्ड ठेवणे कठीण आहे. का? कारण रॉन यांनी सांगितल्याप्रमाणे, “येथे सर्व घरांना एकच रंग लावण्याचा कायदा आहे.” आणि खरच गावातील घरे पाहिली तर सगळी घरे पांढरी असून त्यांचे छप्पर लाल रंगाचे आहे असे आम्हाला दिसले.

बायबल चर्चा संपवल्यावर आम्ही एका घरमालकाला रविवारी राज्य सभागृहात होणार असलेल्या जाहीर भाषणाचे निमंत्रण दिले. द्वीपावर राहत असताना रॉन दर आठवडी जाहीर भाषण देतात. सध्या साबा द्वीपावर १७ बायबल अभ्यास चालवले जात आहेत. २००४ सालच्या ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला २० लोक उपस्थित होते. ही संख्या लहानशीच वाटत असली तरीसुद्धा साबाच्या एकूण लोकसंख्येपैकी हा एक टक्का आहे!

खरोखर, देवाचा तारणाचा संदेश शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवण्यात यहोवाच्या साक्षीदारांनी कोणतीच कसर बाकी ठेवलेली नाही. साबासारखे इवलेसे द्वीप असो, नाहीतर एक मोठा खंड असो, यहोवाचे साक्षीदार “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा” या आज्ञेचे विश्‍वासूपणे पालन करत आहेत.—मत्तय २८:१९.

दिवस कसे निघून गेले कळलेच नाही आणि आमची जायची वेळ आली. विमानात बसताना आम्ही रॉन यांचा निरोप घेतला. साबाची यात्रा आणि द बॉटम येथे आम्ही केलेली मौज आम्ही कधीही विसरणार नाही!

[तळटीपा]

^ परि. 3 समुद्री चाच्यांनी या ठिकाणाचे नाव द बॉटम (बूड) असे ठेवले असावे कारण त्यांच्या मते हे ठिकाण एका ज्वालामुखीच्या मुखाच्या बुडाशी वसलेले होते.

^ परि. 12 सप्टेंबर २८, २००३ रोजी संयुक्‍त संस्थानांतील, फ्लोरिडा येथून काही स्वयंसेवकांनी साबाला जाऊन जवळच्याच एका इमारतीचे दुरुस्तीकाम केले आणि आता ही इमारत राज्य सभागृह म्हणून उपयोगात आणली जात आहे.

[१० पानांवरील नकाशे]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

प्वेर्त रिको

[१० पानांवरील चित्राचे श्रेय]

पार्श्‍वभूमी: www.sabatourism.com