व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आजच्या जगातही यशस्वी वैवाहिक जीवन शक्य आहे

आजच्या जगातही यशस्वी वैवाहिक जीवन शक्य आहे

आजच्या जगातही यशस्वी वैवाहिक जीवन शक्य आहे

“पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.”कलस्सैकर ३:१४.

१, २. (क) ख्रिस्ती मंडळीत आढळणारी कोणती गोष्ट पाहून आनंद वाटतो? (ख) यशस्वी वैवाहिक जीवन म्हणजे काय?

आपापल्या साथीदाराला १०, २०, ३० किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्षांपासून विश्‍वासूपणे जडून राहिलेल्या अनेक वैवाहिक दांपत्यांना ख्रिस्ती मंडळीत पाहून आपल्याला आनंद होत नाही का? या जोडप्यांनी एकमेकांना सुखदुःखात प्रामाणिकपणे साथ दिली आहे.—उत्पत्ति २:२४.

पण यांपैकी बहुतेकजण कबूल करतील की वैवाहिक जीवनात त्यांना अनेक चढउतारांना तोंड द्यावे लागले. एका स्त्रीने म्हटले, “सुखी वैवाहिक जीवनातही चार दिवस सारखे नसतात. कधी सुखाचे दिवस येतात, तर कधी दुःखाचे. . . . पण आधुनिक जीवनाच्या सर्व तणावांना तोंड देऊन ही जोडपी एकमेकांना विश्‍वासू राहिली आहेत.” खासकरून, ज्यांनी मुलांचे संगोपन केले आहे अशी अनेक यशस्वी दांपत्ये, जीवनातल्या ताणतणावांमुळे उद्‌भवणाऱ्‍या वादळांना तोंड द्यायला शिकली आहेत. जीवनातल्या अनुभवांनी त्यांना शिकवले आहे की खरे प्रेम “कधी अंतर देत नाही.”—१ करिंथकर १३:८.

३. विवाह व घटस्फोट यांविषयी आकडेवारी काय दाखवते आणि यामुळे कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

याच्या विपरीत, कोट्यवधी विवाह तुटले आहेत. एका वृत्तानुसार, “आज अमेरिकेत होणाऱ्‍या एकूण विवाहांपैकी निम्म्यांचा घटस्फोटात अंत होईल असा अंदाज केला जातो. आणि यांपैकी निम्मे घटस्फोट विवाहाच्या पहिल्या ७.८ वर्षांदरम्यान होतील . . . घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करणाऱ्‍या ७५ टक्के लोकांपैकी, ६० टक्के पुन्हा घटस्फोट घेतील.” पूर्वी जेथे घटस्फोटांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत कमी होते, तेथेही परिस्थिती आता बदलू लागली आहे. उदाहरणार्थ, जपानमध्ये अलीकडील वर्षांत घटस्फोटांचे प्रमाण जवळजवळ दुप्पट वाढले आहे. ज्या समस्यांमुळे ही परिस्थिती उद्‌भवली आहे त्या कधीकधी ख्रिस्ती मंडळीतील विवाहांतही पाहायला मिळतात. या समस्या कोणत्या आहेत? आणि विवाह संस्थेची पायमल्ली करण्याच्या सैतानाच्या सर्व प्रयत्नांना लढा देऊन वैवाहिक जीवनात यशस्वी कसे होता येईल?

वैवाहिक संबंधाला घातक ठरू शकणाऱ्‍या गोष्टी

४. वैवाहिक संबंधाला घातक ठरू शकतील अशा काही गोष्टी कोणत्या आहेत?

कोणत्या गोष्टी वैवाहिक संबंधाला घातक ठरू शकतात हे समजून घेण्याकरता देवाचे वचन आपल्याला मदत करते. उदाहरणार्थ, या शेवटल्या काळांत कशाप्रकारची परिस्थिती असेल याविषयी प्रेषित पौलाने जे म्हटले त्याकडे लक्ष द्या: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्यांच्यापासूनहि दूर राहा.”—२ तीमथ्य ३:१-५.

५. “स्वार्थी” वृत्तीची व्यक्‍ती आपल्या वैवाहिक जीवनाला कशाप्रकारे धोक्यात घालते आणि यासंबंधी बायबल कोणता सल्ला देते?

पौलाच्या शब्दांकडे बारकाईने लक्ष दिल्यास, अशा अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतील की ज्या वैवाहिक संबंधाला घातक ठरू शकतात. उदाहरणार्थ, “स्वार्थी” मनोवृत्ती. स्वार्थी व्यक्‍ती केवळ आपल्यापुरता विचार करतात, इतरांची त्यांना पर्वा नसते. जे पती किंवा पत्नी स्वार्थी असतात ते प्रत्येक गोष्ट आपल्याच मनाप्रमाणे झाली पाहिजे असा अट्टहास करतात. जराही तडजोड करण्यास ते तयार नसतात. अशी वृत्ती सुखी वैवाहिक जीवनाला हातभार लावेल का? मुळीच नाही. म्हणूनच प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना आणि वैवाहिक जोडप्यांना हा सुज्ञ सल्ला दिला: “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने काहीहि करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना; तुम्ही कोणीहि आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्‍याचेहि पाहा.”—फिलिप्पैकर २:३, ४.

६. धनाचा लोभ वैवाहिक संबंधात कशाप्रकारे वितुष्ट आणू शकतो?

धनाचा लोभही पतीपत्नींमध्ये वितुष्ट आणू शकतो. पौलाने यासंबंधी इशारा दिला: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मुर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्‍वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” (१ तीमथ्य ६:९, १०) दुःखाची गोष्ट म्हणजे पौलाने ज्याविषयी बजावून सांगितले होते तेच आज बऱ्‍याच घरांत घडत आहे. संपत्ती मिळवण्याच्या मागे लागून कित्येक पती व पत्नी आपल्या सोबत्याच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात; भावनिक आधार आणि सातत्याचा प्रेमळ सहवास या मूलभूत गोष्टींपासून ते आपल्या साथीदाराला वंचित ठेवतात.

७. कधीकधी कशाप्रकारच्या वागणुकीमुळे विवाह सोबती अविश्‍वासू होतात?

पौलाने असेही म्हटले, की या शेवटल्या दिवसांत काहीजण ‘विश्‍वासघातकी, ममताहीन, शांतताद्वेषी’ असतील. विवाहाची शपथ ही एक पवित्र प्रतिज्ञा असून ती विश्‍वासघातात नव्हे, तर कायमस्वरूपी बंधनात परिणत झाली पाहिजे. (मलाखी २:१४-१६) पण काहीजण आपल्या जोडीदाराऐवजी इतर व्यक्‍तींकडे प्रणयदृष्टीने पाहू लागतात. तिशीत असलेल्या एका स्त्रीचा पती तिला सोडून गेल्यावर, तिने सांगितले की तो कसा आधीपासूनच इतर स्त्रियांशी जास्तच मोकळेपणाने, जास्तच प्रेमळपणे वागायचा. एका विवाहित पुरुषाकरता ही वागणूक अयोग्य आहे हे तो ओळखू शकला नाही. तिला आपल्या पतीचे असे वागणे पाहून खूप वाईट वाटायचे. त्याचे असे वागणे किती धोकेदायक आहे, हे तिने त्याला सांगण्याचा प्रयत्नही केला. पण शेवटी, तो व्यभिचार करून बसला. प्रेमळपणे सावध करण्यात आले तरीसुद्धा त्या अविश्‍वासू जोडीदाराने लक्ष दिले नाही. हा आततायीपणा शेवटी पाशात पडण्यास कारणीभूत ठरला.—नीतिसूत्रे ६:२७-२९.

८. व्यभिचाराची सुरुवात कशाप्रकारे होऊ शकते?

व्यभिचाराविरुद्ध बायबलमधील ताकीद किती स्पष्ट आहे! “स्त्रीशी जारकर्म करणारा अक्कलशून्य आहे. जो आपल्या जिवाचा नाश करून घेऊ पाहतो तो असे करितो.” (नीतिसूत्रे ६:३२) सहसा व्यभिचार अचानक घडत नाही. बायबल लेखक याकोब याने सांगितल्याप्रमाणे व्यभिचारासारखे पाप घडण्याअगोदर त्याविषयीचे विचार मनात उत्पन्‍न होतात आणि व्यक्‍ती त्या विचारांना मनात घर करू देते. (याकोब १:१४, १५) जिच्याशी आयुष्यभर विश्‍वासू राहण्याची शपथ घेतली होती त्या आपल्या जोडीदाराशी व्यभिचारी सोबती, हळूहळू विश्‍वासघात करू लागते. येशूने म्हटले: “‘व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते,’ हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.”—मत्तय ५:२७, २८.

९. नीतिसूत्रे ५:१८-२० यात कोणता सुज्ञ सल्ला आढळतो?

म्हणूनच, सुज्ञतेचा आणि एकनिष्ठ राहण्याचा मार्ग नीतिसूत्रांच्या पुस्तकात सांगण्यात आला आहे: “तुझ्या झऱ्‍याला आशीर्वाद प्राप्त होवो; तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट ऐस. रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी यांप्रमाणे तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो. माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावे? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे?”—नीतिसूत्रे ५:१८-२०.

विवाह करण्याची घाई करू नका

१०. जिच्याशी आपण विवाह करू इच्छितो त्या व्यक्‍तीला जाणून घेण्याकरता पुरेसा वेळ जाऊ देणे का सुज्ञतेचे आहे?

१० एखादे जोडपे जेव्हा पुरेसा विचार न करता विवाह करते तेव्हा त्यांच्यामध्ये समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. कदाचित ते अजूनही वयाने लहान असतील आणि त्यामुळे त्यांच्याजवळ पुरेसा अनुभव नसेल. किंवा एकमेकांना जाणून घेण्यासाठी—एकमेकांच्या आवडीनिवडी, जीवनातील ध्येये आणि कौटुंबिक पार्श्‍वभूमी जाणून घेण्यासाठी त्यांनी पुरेसा वेळ जाऊ दिलेला नसतो. जिच्याशी आपण विवाह करू इच्छितो, त्या व्यक्‍तीला जाणून घेईपर्यंत आत्मसंयम बाळगणे सुज्ञतेचे आहे. इसहाकचा पुत्र याकोब याचा विचार करा. राहेलशी लग्न करण्यासाठी अगोदर त्याला आपल्या होणाऱ्‍या सासऱ्‍याकडे सात वर्षे काम करावे लागले. तो हे करण्यास तयार होता कारण त्याच्या भावना खऱ्‍या प्रेमातून उत्पन्‍न झालेल्या होत्या, निव्वळ शारीरिक आकर्षणातून नव्हे.—उत्पत्ति २९:२०-३०.

११. (क) वैवाहिक बंधनात कोणकोणत्या गोष्टींचे मीलन घडून येते? (ख) बोलण्याच्या बाबतीत सुज्ञता बाळगणे वैवाहिक जीवनात महत्त्वाचे का आहे?

११ वैवाहिक जीवन म्हणजे निव्वळ एक प्रणयकथा नाही. विवाहाच्या बंधनात दोन वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्‍वभूमींच्या, वेगवेगळ्या व्यक्‍तिमत्त्वाच्या, मानसिकतेच्या आणि अनेकदा वेगवेगळ्या शैक्षणिक पार्श्‍वभूमींच्या व्यक्‍ती जवळ येतात. कधीकधी तर दोन वेगवेगळ्या संस्कृती व भाषा देखील एकमेकांशी जोडल्या जातात. काही नाही तरी, वेगवेगळी मते व्यक्‍त करण्याची क्षमता असलेल्या दोन व्यक्‍तींचे हे मीलन असते. या दोन व्यक्‍तींची मते वैवाहिक बंधनात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. एकतर या दोन व्यक्‍ती सतत टीका व तक्रार करू शकतात किंवा त्या एकमेकांना प्रोत्साहन देऊ शकतात व एकमेकांच्या प्रगतीला हातभार लावू शकतात. होय, आपल्या शब्दांनी आपण एकतर आपल्या जोडीदाराच्या भावना दुखावतो नाहीतर त्याला सांत्वन देऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण न ठेवल्यास, वैवाहिक जीवनात बराच तणाव निर्माण होऊ शकतो.—नीतिसूत्रे १२:१८; १५:१, २; १६:२४; २१:९; ३१:२६.

१२, १३. विवाहासंबंधी कोणता वास्तववादी दृष्टिकोन बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे?

१२ तेव्हा, आपण जिच्याशी विवाह करू इच्छितो त्या व्यक्‍तीला चांगल्याप्रकारे जाणून घेईपर्यंत थांबणे सुज्ञतेचे आहे. एका अनुभवी ख्रिस्ती बहिणीने एकदा म्हटले: “एखाद्या व्यक्‍तीशी विवाह करण्याविषयी विचार करताना, कमीतकमी १० असे गुण मनात धरून चाला की जे आपल्या जोडीदारात असावेत असे तुम्हाला वाटते. जर एखाद्या व्यक्‍तीत त्यांपैकी सातच गुण असतील तर स्वतःला हा प्रश्‍न विचारा, ‘उरलेले जे तीन गुण या व्यक्‍तीत नाहीत त्यांकडे मी दुर्लक्ष करण्यास तयार आहे का? दैनंदिन जीवनात त्या गुणांची उणीव मी सहन करू शकेन का?’ जर तुम्हाला शंका वाटत असेल, तर पाऊल मागे घ्या आणि पुन्हा विचार करा.” अर्थात, वास्तववादी असणेही महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला लग्न करण्याची इच्छा आहेच, तर परिपूर्ण असा जोडीदार तुम्हाला कधीही मिळणार नाही हे आठवणीत ठेवा. अर्थात, ज्याच्याशी तुम्ही लग्न कराल त्यालाही परिपूर्ण साथीदार मिळालेला नसणार!—लूक ६:४१.

१३ वैवाहिक जीवनात अनेक त्याग करावे लागतात. पौलाने हे स्पष्टपणे सांगितले. तो म्हणाला: “तुम्ही निश्‍चिंत असावे अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरूष, प्रभूला कसे संतोषवावे अशी प्रभूच्या गोष्टींविषयी चिंता करितो; परंतु विवाहित पुरूष आपल्या पत्नीला कसे संतोषवावे, अशी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करितो. येणेकरून त्याचे मन द्विधा झालेले असते. जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेहि पवित्र व्हावे, अशी प्रभूच्या गोष्टींविषयीची चिंता करिते; परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करिते.”—१ करिंथकर ७:३२-३४.

काही विवाह अयशस्वी का होतात

१४, १५. वैवाहिक बंधन कमजोर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात?

१४ अलीकडे एका ख्रिस्ती स्त्रीला घटस्फोटाच्या दुःखदायक अनुभवातून जावे लागले. तिच्या पतीने १२ वर्षे संसार केल्यावर तिला सोडून दिले आणि दुसऱ्‍या एका स्त्रीसोबत संबंध जोडला. पती तिला सोडून गेला त्याआधी तिला त्याच्या वागण्यात काही लक्षणे दिसली होती का? ती सांगते: “एक वेळ अशी आली की त्याने प्रार्थनाही करण्याचे सोडून दिले होते. ख्रिस्ती सभा आणि प्रचार कार्याला न येण्यासाठी तो नेहमी काही न काही निमित्त शोधून काढायचा. माझ्यासाठी तर त्याच्याजवळ वेळच नव्हता; कधी कामाचा बहाणा सांगायचा तर कधी म्हणायचा की मी खूप थकलोय. माझ्याशी तो बोलायचाही नाही. कोणत्याच प्रकारचे आध्यात्मिक संभाषण आमच्यात होत नसे. खरच, किती बदलून गेला होता तो. मी ज्याच्याशी लग्न केले होते तो, तो मुळी नव्हताच.”

१५ दुसऱ्‍यांनीही अशाचप्रकारच्या लक्षणांचा उल्लेख केला आहे, उदाहरणार्थ बायबल अभ्यास, प्रार्थना किंवा ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याकडे दुर्लक्ष. दुसऱ्‍या शब्दांत, आपल्या जोडीदारांना सोडून जाणाऱ्‍या बहुतेक व्यक्‍तींनी यहोवासोबतचा आपला नातेसंबंध कमकुवत होऊ दिला होता. यामुळे त्यांचे लक्ष आध्यात्मिक गोष्टींवर नव्हते. यहोवा त्यांच्या दृष्टीने आता एक जिवंत देव नव्हता. प्रतिज्ञात नवे जग देखील त्यांच्या दृष्टीने वास्तविक राहिले नव्हते. काहीजणांच्या बाबतीत, आपल्या जोडीदाराला सोडून दुसऱ्‍या व्यक्‍तीशी संबंध जोडण्याआधीच ही आध्यात्मिकरित्या कमजोर होण्याची प्रक्रिया घडली होती.—इब्री लोकांस १०:३८, ३९; ११:६; २ पेत्र ३:१३, १४.

१६. कशामुळे वैवाहिक बंधन मजबूत होते?

१६ या उलट, अतिशय आनंदी असलेल्या एका जोडप्याने आपल्या यशस्वी वैवाहिक जीवनाचे श्रेय आपसांतील अतूट आध्यात्मिक बंधनाला दिले. ते दोघे मिळून प्रार्थना व अभ्यास करतात. पती सांगतो: “आम्ही सोबत बसून बायबल वाचतो. सेवाकार्यालाही सोबत जातो. एकमेकांच्या सहवासात कोणतेही काम आम्हाला आनंददायक वाटते.” तात्पर्य अगदी स्पष्ट आहे: यहोवासोबत उत्तम नातेसंबंध राखल्यास वैवाहिक बंधन मजबूत राहण्यास मोठा हातभार लागेल.

वास्तववादी असा व मोकळेपणाने विचारांची देवाणघेवाण करा

१७. (क) कोणत्या दोन गोष्टी यशस्वी वैवाहिक जीवनाला पोषक ठरतात? (ख) ख्रिस्ती प्रेमाचे पौलाने कशाप्रकारे वर्णन केले?

१७ आणखी दोन गोष्टी यशस्वी वैवाहिक जीवनाला पोषक ठरतात: ख्रिस्ती प्रेम आणि मोकळेपणाने विचारांची देवाणघेवाण करणे. दोन व्यक्‍ती प्रेमात पडतात तेव्हा साहजिकच, एकमेकांच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती असते. कादंबऱ्‍यांत व चित्रपटांत जे वाचले, पाहिले त्याआधारावर काहीजणांनी वैवाहिक जीवनाविषयी अनेक स्वप्न रंगवलेली असतात. पण आज न उद्या, विवाहित जोडप्याला वास्तविक जीवनाला तोंड द्यावे लागते. मग एकमेकांचे लहानसहान दोष किंवा थोड्याफार चिडवणाऱ्‍या सवयी मोठ्या समस्यांचे रूप घेऊ लागतात. असे घडल्यास ख्रिस्ती जोडप्यांनी आत्म्याच्या फळात समाविष्ट असलेले गुण प्रदर्शित केले पाहिजे; यांपैकी एक आहे प्रेम. (गलतीकर ५:२२, २३) प्रेम खरोखर अतिशय शक्‍तिशाली आहे—अर्थात हे प्रेमिकांमधील कल्पनारम्य प्रेम नव्हे तर ख्रिस्ती प्रेम. पौलाने या ख्रिस्ती प्रेमाचे अशाप्रकारे वर्णन केले आहे: ते “सहनशील आहे, परोपकारी आहे; . . . स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; . . . [ते] सर्व काही सहन करिते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबधाने धीर धरते.” (१ करिंथकर १३:४-७) खरे प्रेम स्वाभाविक गुणदोषांकडे दुर्लक्ष करण्यास तयार असते. ते वास्तववादी असते व परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही.—नीतिसूत्रे १०:१२.

१८. विचारांची देवाणघेवाण केल्यामुळे वैवाहिक बंधन कशाप्रकारे मजबूत होते?

१८ विचारांची देवाणघेवाणही अत्यंत महत्त्वाची आहे. विवाहाला कितीही वर्षे होऊन गेलेली असोत, पण पती पत्नीने विचारांची देवाणघेवाण करणे व एकमेकांचे बोलणे लक्ष देऊन ऐकून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. एक पती सांगतो: “आम्ही आपल्या भावना अगदी मोकळेपणाने, पण मैत्रिपूर्ण पद्धतीने व्यक्‍त करतो.” कालांतराने, पती व पत्नी एकमेकांच्या केवळ व्यक्‍त केलेल्या नव्हे तर अव्यक्‍त भावना देखील जाणून घ्यायला शिकतात. दुसऱ्‍या शब्दांत, जसजशी वर्षे जातात तसतसे एक आनंदी जोडपे एकमेकांचे बोलून न दाखवलेले विचार व व्यक्‍त न केलेल्या भावना ओळखायला शिकतात. काही पत्नी म्हणतात की माझा पती माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकतच नाही. तर काही पती अशी तक्रार करतात की माझी पत्नी अयोग्य वेळी आपले विचार व्यक्‍त करते. विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सहानुभूती व समजूतदारपणा असण्याची गरज आहे. परिणामकारक पद्धतीने विचारांची देवाणघेवाण करणे पती व पत्नी या दोघांच्या हिताचे आहे.—याकोब १:१९.

१९. (क) क्षमा मागणे कधीकधी जड का जाते? (ख) कोणती गोष्ट आपल्याला क्षमा मागण्यास प्रवृत्त करू शकते?

१९ विचारांची देवाणघेवाण करताना कधीकधी असे प्रसंगही येऊ शकतात, की जेव्हा पती किंवा पत्नीला क्षमा मागावी लागते. हे नेहमीच सोपे नसते. स्वतःची चूक कबूल करण्यासाठी नम्रतेची गरज आहे. पण असे केल्यास वैवाहिक जीवन किती सुखी होऊ शकते! प्रामाणिकपणे क्षमा मागितल्याने भविष्यात वारंवार वादविवाद होण्याचे कारण उरत नाही आणि मनापासून क्षमा करणे व समस्येवर कायमचा तोडगा काढणे शक्य होते. पौलाने म्हटले: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरूद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा; पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.”—कलस्सैकर ३:१३, १४.

२०. एकांतात आणि इतरांसोबत असताना एका ख्रिस्ती व्यक्‍तीने आपल्या विवाह जोडीदाराशी कशाप्रकारे वागावे?

२० यशस्वी वैवाहिक जीवनाकरता आवश्‍यक असणारी आणखी एक गोष्ट म्हणजे एकमेकांना सांभाळून घेणे. ख्रिस्ती पती-पत्नींना एकमेकांवर भरवसा ठेवता आला पाहिजे, एकमेकांवर विसंबून राहता आले पाहिजे. त्या दोघांनी कधीही एकमेकांची अवहेलना करण्याचा किंवा कोणत्याही प्रकारे एकमेकांचा आत्मविश्‍वास खचवण्याचा प्रयत्न करू नये. विवाहित ख्रिस्ती या नात्याने, आपण आपल्या पतीची अथवा पत्नीची कठोर शब्दांत टीका करण्याऐवजी त्यांची प्रेमळपणे प्रशंसा करतो. (नीतिसूत्रे ३१:२८ब) आणि निश्‍चितच, आपल्या जोडीदाराविषयी अविचारीपणे विनोद करून किंवा खुळचट मस्करी करून आपण त्याचा किंवा तिचा अपमान करत नाही. (कलस्सैकर ४:६) अशाप्रकारे एकमेकांना आधार देणारे पती व पत्नी वेळोवेळी आपले प्रेम व्यक्‍त करण्याद्वारे आपले बंधन अधिक मजबूत करतात. कधी प्रेमाने स्पर्श करून तर कधी मृदु शब्दांतून ते जणू एकमेकांना वारंवार सांगतात, “माझे अजूनही तुझ्यावर प्रेम आहे. तुझा सहवास मला हवाहवासा वाटतो.” तर या काही गोष्टी आहेत, ज्यांचा वैवाहिक नातेसंबंधावर प्रभाव पडतो आणि ज्या आजच्या जगातही वैवाहिक जीवनात यशस्वी होण्यास मदत करू शकतात. याव्यतिरिक्‍त पुढच्या लेखात, शास्त्रवचनांच्या आधारावर आणखी काही सूचनांवर चर्चा केली जाईल. *

[तळटीप]

^ परि. 20 आणखी माहितीकरता, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक पाहावे.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• वैवाहिक संबंधाला घातक ठरू शकतील अशा काही गोष्टी कोणत्या आहेत?

• लग्नाची घाई करणे सुज्ञपणाचे का नाही?

• एका व्यक्‍तीच्या आध्यात्मिक स्थितीचा वैवाहिक जीवनावर कशाप्रकारे प्रभाव पडतो?

• कोणत्या गोष्टी वैवाहिक जीवनात स्थैर्य आणू शकतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१२ पानांवरील चित्र]

वैवाहिक जीवन म्हणजे निव्वळ एक प्रणयकथा नाही

[१४ पानांवरील चित्रे]

यहोवासोबत असलेला दृढ नातेसंबंध, वैवाहिक जीवन यशस्वी होण्यास साहाय्य करतो