व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“परीक्षांना विश्‍वासूपणे तोंड देणे”

“परीक्षांना विश्‍वासूपणे तोंड देणे”

“परीक्षांना विश्‍वासूपणे तोंड देणे”

एकोणीसशे एकावन्‍न सालच्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शक्‍तिशाली सोव्हिएत सरकार, पश्‍चिम सोव्हिएत संघातील एका निरुपद्रवी ख्रिस्ती गटावर, अर्थात यहोवाच्या साक्षीदारांवर अक्षरशः तुटून पडले. लहान मुले, गरोदर स्त्रिया व वयोवृद्ध माणसांचीही पर्वा न करता, हजारो माणसांना मालगाड्यांच्या डब्यांत कोंबण्यात आले. या लोकांना सायबेरियापर्यंतचा २० दिवसांचा भयंकर प्रवास करावा लागला. अतिशय खडतर परिस्थिती असलेल्या निर्मनुष्य प्रदेशांत त्यांना कायमचे हद्दपार करण्यात आले होते.

या ऐतिहासिक घटनेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त एप्रिल २००१ मध्ये मॉस्को शहरात, यहोवाच्या साक्षीदारांवर भूतपूर्व सोव्हिएत संघराज्यात कित्येक दशकांपर्यंत झालेल्या अत्याचाराविषयी माहिती देणारा एक व्हिडिओपट प्रसिद्ध करण्यात आला. कमालीचा जाच सहन करूनही साक्षीदार कशाप्रकारे टिकून राहिले, किंबहुना त्यांची कशाप्रकारे भरभराट झाली याविषयी इतिहासकारांनी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी या माहितीपटात विवेचन केले आहे.

परीक्षांना विश्‍वासूपणे तोंड देणे—सोव्हिएत संघराज्यातील यहोवाचे साक्षीदार हे शीर्षक असलेला हा माहितीपट एव्हाना रशियात व इतरत्रही लाखो लोकांनी पाहिला असून सर्वसामान्य जनतेने व इतिहासकारांनी याची तोंडभरून प्रशंसा केली आहे. बहुतेक साक्षीदार कुटुंबांना ज्या क्षेत्रात हद्दपार करण्यात आले होते तेथे राहणाऱ्‍या दोन रशियन विद्वानांनी या व्हिडिओबद्दल व्यक्‍त केलेले मत खालीलप्रमाणे आहे:

“मला ही फिल्म मनापासून आवडली. तुमच्या धर्माच्या लोकांबद्दल माझे पूर्वीपासूनच चांगले मत होते पण ही फिल्म पाहिल्यानंतर मला तुमच्याविषयी वाटणारा आदर आणखीनच वाढला आहे. फिल्म अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तयार करण्यात आली आहे! खासकरून प्रत्येक व्यक्‍तीला तुम्ही एक पृथ्‌क व्यक्‍तिमत्त्व म्हणून सादर केले हे मला विशेष आवडले. मी स्वतः ऑर्थोडॉक्स धर्माचा असून आपला धर्म बदलण्याच्या मी विचारात नाही, पण तरीही मला साक्षीदार मनापासून आवडतात. आमच्या विभागाने या फिल्मची एक प्रत ठेवून घ्यावी असे मला वाटते. माझ्या सहप्राध्यापकांनी व मी ही फिल्म आपल्या विद्यार्थ्यांना दाखवायचे व अभ्यासक्रमात तिचा समावेश करण्याचे ठरवले आहे.”—इरकुत्स्क, रशिया येथील स्टेट पेडगॉगिकल युनिव्हर्सिटीच्या इतिहास विभागाचे अध्यक्ष, प्राध्यापक सर्ग्ये निकोलेयविच रबस्टॉफ.

“ही फिल्म प्रसिद्ध झाल्याबद्दल मला आनंद वाटतो. अत्याचाराच्या विषयावर फिल्म बनवताना सहसा, विषयाची तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी करणे अतिशय कठीण असते. पण तुम्ही हे करून दाखवले. भविष्यात, तुमच्या इतर फिल्म्सही मला पाहायला आवडतील.”—रशियामधील इरकुत्स्क स्टेट युनिव्हर्सिटीतील इतिहास विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक सर्ग्ये इल्यिच कुझ्नेत्सॉफ.

सायबेरिया येथे राहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांनीही या माहितीपटाची मनापासून प्रशंसा केली. त्यांच्यापैकी काहींनी व्यक्‍त केलेली मते खालीलप्रमाणे आहेत:

“या फिल्ममध्ये दाखवलेल्या घटना घडत असताना रशियातील बऱ्‍याच लोकांना यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यांविषयी खोटी माहिती देण्यात आली होती. पण ही फिल्म पाहिल्यानंतर, पूर्वी ते समजत होते त्याप्रमाणे आपली संस्था ही निव्वळ एक पंथ नाही हे त्यांना कळेल. अलीकडेच साक्षीदार बनलेल्या काहींनी म्हटले: ‘आम्ही ज्यांच्यासोबत राहतो व कार्य करतो त्या आमच्या ख्रिस्ती बांधवांनी इतका अत्याचार सहन केला आहे याची आम्ही कल्पनाही केली नव्हती!’ ही फिल्म पाहिल्यानंतर एका साक्षीदाराने पूर्ण वेळेची सेवा हाती घेण्याची इच्छा व्यक्‍त केली.”—आना वॉवचुक, यांना सायबेरियात हद्दपार करण्यात आले होते.

“फिल्ममध्ये गुप्त पोलीस दल एका साक्षीदाराच्या दारावर टकटक करतात असे दाखवले, तेव्हा माझ्या अंगावर काटा आला. कित्येक वर्षांपूर्वी आमच्या दारावरही तसाच आवाज आला होता, आणि मला आठवते तेव्हा माझी आई म्हणाली होती: ‘कुठेतरी आग लागली वाटतं.’ पण या फिल्मने मला याचीही आठवण करून दिली की अनेक साक्षीदारांना माझ्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास सहन करावा लागला. या सर्व माहितीमुळे आम्हाला यहोवाची सेवा अधिक जोमाने व उत्साहाने करत राहण्याचे प्रोत्साहन मिळाले आहे.”—स्तीपान वॉवचुक, यांना सायबेरियात हद्दपार करण्यात आले होते.

“मी हद्दपार करण्यात आलेल्या साक्षीदारांचा मुलगा आहे. त्यामुळे मला पूर्वी वाटत होते की या विषयाबद्दल मी आधीच बरेच काही ऐकले आहे. पण फिल्म पाहिल्यानंतर मला जाणीव झाली की मला खरे तर काहीही माहीत नव्हते. बांधवाच्या मुलाखती ऐकताना मला अश्रू आवरले नाहीत. आता हे सर्व अनुभव मला केवळ गोष्टींसारखे वाटत नाही तर अगदी वास्तविक वाटतात. या फिल्ममुळे देवासोबतचा माझा नातेसंबंध अधिक दृढ झाला आहे आणि भविष्यात कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देण्याची ताकत मला मिळाली आहे.”—व्लाडिमीर कोवाश, इरकुत्स्क.

“माझ्या मते, ही फिल्म लिखित स्वरूपातील अहवालापेक्षा जास्त प्रभावकारी होती. बांधवांच्या मुलाखती पाहताना व ऐकताना मला वाटले की जणू मी स्वतः त्यांच्यासोबत ते सारे अनुभवतोय. तुरुंगात असताना आपल्या लहान मुलींसाठी पोस्टकार्डवर चित्रे काढून पाठवणाऱ्‍या बांधवाचे उदाहरण पाहिल्यावर, मला माझ्या स्वतःच्या मुलांना बायबलची सत्ये त्यांच्या अंतःकरणाला भिडतील अशाप्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली आहे. तुमचे आम्ही फार आभारी आहोत! या फिल्ममुळे रशियात राहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांना आपण यहोवाच्या जागतिक संघटनेचे भाग आहोत याची आणखी प्रकर्षाने जाणीव झाली आहे.”—तातान्या कलिना, इरकुत्स्क.

“‘शंभरवेळा ऐकण्यापेक्षा एकदा पाहणे उत्तम’ असे जे म्हणतात ते अगदी खरे आहे असे ही फिल्म पाहिल्यावर वाटते. अतिशय सजीव, वास्तविक आणि अगदी आपलीशी वाटावी अशी ही फिल्म आहे! फिल्म पाहून झाल्यावर बराच वेळ मनन करावेसे वाटले. या फिल्मने मला जणू त्या हद्दपार करण्यात आलेल्या साक्षीदारांच्या विश्‍वात नेऊन पोचवले. आता जेव्हा मी आपल्या परिस्थितीची त्यांच्या जीवनाशी तुलना करते तेव्हा मला दैनंदिन समस्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळते.”—लिडिया बीडा, इरकुत्स्क.

परीक्षांमध्ये विश्‍वासू राहणे ही फिल्म आतापर्यंत २५ भाषांत प्रसिद्ध करण्यात आली असून सबंध जगात तिला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. * सेंट पिटर्सबर्ग, ओम्स्क आणि रशियातील इतर शहरांत, तसेच युक्रेनमधील व्हीनेत्स्या, कर्च, मेलिटोपोल आणि लवीफ प्रदेशांतही हा सबंध माहितीपट टीव्ही स्टेशन्सवरून प्रसारित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक मंडळांकडूनही या फिल्मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

या माहितीपटातील संदेशाचे खरे सामर्थ्य म्हणजे त्या हजारो सर्वसाधारण लोकांची उदाहरणे आहेत की ज्यांनी असामान्य धैर्याने व आध्यात्मिक ताकदीने कित्येक वर्षे छळाला तोंड दिले. सोव्हिएत संघराज्यातील यहोवाच्या साक्षीदारांनी खरोखर परीक्षांना विश्‍वासूपणे तोंड दिले. तुम्हाला हा माहितीपट पाहण्याची इच्छा असल्यास, यहोवाचे साक्षीदार तुम्हाला तो मिळवण्यास मदत करतील. तुमच्या क्षेत्रातील एखाद्या यहोवाच्या साक्षीदाराशी कृपया संपर्क साधावा.

[तळटीप]

^ परि. 13 सदर व्हिडिओपट इंग्रजी, इटॅलियन, इंडोनेशियन, कॅन्टनीझ, कोरियन, ग्रीक, जपानी, जर्मन, झेक, डेनिश, डच, नॉर्वेजियन, पोलिश, फिनिश, फ्रेंच, बल्गेरियन, मॅन्डरिन, रोमेनियन, रशियन, लिथुएनियन, स्पॅनिश, स्विडिश, स्लोव्हाक, स्लोव्हेनियन व हंगेरियन भाषांत उपलब्ध आहे.

[८ पानांवरील चित्राचे श्रेय]

स्टॅलिन: U.S. Army photo

[९ पानांवरील चित्राचे श्रेय]

स्टॅलिन: U.S. Army photo