फलज्योतिष आणि बायबल
फलज्योतिष आणि बायबल
बायबल अनेकदा फलज्योतिषांच्या कार्यांचा उल्लेख करते. उदाहरणार्थ, सा.यु.पू. आठव्या शतकात संदेष्टा यशयाने ताऱ्यांचे निरीक्षण करणाऱ्या फलज्योतिषांना, ज्या शहराचा नाश ठरलेला होता त्या शहराला वाचवण्याचे आव्हान करत म्हटले: “तू [बॅबिलोन] पुष्कळ मसलती करिताकरिता थकलीस; तर तुजवर काय काय येणार हे तुला दर चंद्रदर्शनाच्या वेळी कळविणारे ज्योतिषी व नक्षत्र पाहणारे पुढे येवोत; त्यांच्याने तुझा बचाव होईल तर ते करोत.”—यशया ४७:१३.
परंतु, इब्री शास्त्रवचनांत ‘फलज्योतिष’ असे भाषांतर केलेला गझेरिन हा शब्द दानीएल पुस्तकाच्या केवळ त्या भागात आढळतो जो भाग अरेमिक भाषेत लिहिण्यात आला होता. (दानीएल २:४ब–७:२८) या शब्दाचा मूळ अर्थ, “कापणे” असा होतो; तो, अवकाशाची विभागणी करणाऱ्यांना दर्शवत असावा, असे वाटते. हा फलज्योतिष वर्ग, “ज्योतिर्गणिताच्या विविध कलांच्या व शकुनानुसार . . . आकाशस्थ नक्षत्रादि स्थिती जन्मकाळी कशी होती यावरून आगामी काळाबद्दलचे भाकीत करायचे.” (जेसिनियसस हिब्रू ॲण्ड खॅल्डी लेक्सिकन, १६६, १६७) फलज्योतिषशास्त्र म्हणजे प्रामुख्याने अनेक देवदेवतांची उपासना होय; याचा उदय खालच्या मेसोपोटामियन खोऱ्यातील अशा लोकांमध्ये कदाचित जलप्रलयानंतर लगेच झाला असावा जे यहोवाच्या शुद्ध उपासनेपासून दूर गेले होते. कालांतराने खाल्डियन हे नाव “फलज्योतिष” याचे समानार्थी नाव म्हणून वापरले जाऊ लागले.
फलज्योतिषाच्या या खोट्या शास्त्रात, एक वेगळा देवता आकाशातील प्रत्येक भागावर राज्य करतो असे मानण्यात येऊ लागले. असे म्हटले जात होते, की प्रत्येक ग्रहा-नक्षत्राची हालचाल आणि आविष्कार, जसे की सूर्याचा उदय आणि अस्त, संपत आणि अयन, चंद्राच्या कला, ग्रहणे आणि उल्कापात, हे सर्व या देवांची करणी होती. त्यामुळे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींची नियमितरीत्या नोंद केली जायची, त्यांच्या उगवण्याच्या संबंधाने मोठमोठ्या कुंडली व घरे तयार केली जायची आणि यांच्याद्वारे मानव व्यवहार व पृथ्वीवरील घटनांचे भाकीत केले जायचे. सर्व गोष्टींवर, मग त्या सार्वजनिक असोत अथवा खासगी असोत, यावर आकाशाच्या या देवांचे नियंत्रण आहे असा विचार केला जायचा. यामुळे, फलज्योतिषांना बोलावून शुभाशुभ काय आहे, त्यांचा काय सल्ला आहे हे ऐकल्यानंतरच राजकीय किंवा लष्करी निर्णय घेतले जायचे. अशाप्रकारे, पुरोहित वर्गाचे लोकांच्या जीवनावर बरेच प्राबल्य होते. आपल्याकडे अलौकिक शक्ती, दूरदृष्टी आणि अमाप बुद्धी आहे, असा या पुरोहितांचा दावा असायचा. बॅबिलोनच्या लोकांमध्ये असे एकही मंदिर नव्हते ज्यात त्यांची स्वतःची ग्रह-नक्षत्रांचे निरीक्षण करणारी वेधशाळा नव्हती.
एकेकाळी, दानीएल आणि त्याचे तीन साथीदार फलज्योतिषांच्या या देशांत बंदिवान म्हणून होते. बॅबिलोनच्या राजाला हे इब्री तरुण, “अवघ्या राज्यात असलेल्या सर्व ज्योतिष्यांपेक्षा व मांत्रिकांपेक्षा दसपट हुशार आहेत असे” दिसून आले. (दानीएल १:२०) तेव्हापासून दानीएलाला ‘ज्योतिषांचा अध्यक्ष’ म्हणून नेमण्यात आले (दानीएल ४:९), पण नक्षत्रांचे निरीक्षण करणारा ‘अवकाशाची विभागणी करणारा’ बनण्यासाठी त्याने यहोवाची उपासना सोडली नाही. ज्योतिष आणि बाकीचे ‘ज्ञानी पुरूष’ नबुखद्नेस्सराच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकले नाहीत तेव्हा दानीएलाला राजापुढे उभे करण्यात आले. दानीएल राजाला म्हणाला: “रहस्ये प्रगट करणारा देव स्वर्गात आहे,” पण “माझी गोष्ट अशी आहे की, हे रहस्य मला प्रगट झाले आहे ते मी काही इतर मानवांपेक्षा अधिक बुद्धिमान आहे म्हणून नव्हे.”—दानीएल २:२८, ३०.
इस्राएलमध्ये मोलेक आणि फलज्योतिषशास्त्र
बैलाचे डोके असलेला, असे कधीकधी चित्रण केल्या जाणाऱ्या देवाच्या अर्थात मोलेकाच्या उपासनेचा फलज्योतिषशास्त्राशी जवळून संबंध होता, हे दाखणारा पुरावा आहे. मार्डुक, मोलेक, बाल वगैरे दैवतांचे प्रतिक म्हणून बॅबिलोनी, कनानी व ईजिप्शियन तसेच इतर लोक बैलाची उपासना करत असत. बैल अर्थात वृषभ राशीचक्रातील एक महत्त्वपूर्ण चिन्ह होता. सूर्यदेवाला सहसा बैलाच्या रूपात दाखवले जायचे; त्याची शिंगे ही सूर्यकिरणांना चित्रित करायची आणि बैलाचे शक्तिशाली प्रजोत्पादक बल म्हणजे सूर्याची शक्ती अर्थात “जीवन देणारी शक्ती” असे समजले जायचे. मादीला अर्थात गाईला इश्तार किंवा ॲस्टार्टेचे प्रतिक म्हणून तितकाच सन्मान दिला जायचा; इश्तार, ॲस्टार्टे अशा अनेक नावांनी ती ओळखली जायची. यास्तव अहरोन व यराबाम यांनी इस्राएलमध्ये बैलाची (वासराची) उपासना सुरू केली तेव्हा यहोवाच्या नजरेत ते एक घोर पाप होते.—निर्गम ३२: ४, ८; अनुवाद ९:१६; १ राजे १२:२८-३०; २ राजे १०:२९.
ज्योतिष आचरणाऱ्या पंथाला जाऊन मिळाल्याबद्दल इस्राएलच्या दहा गोत्रांच्या धर्मत्यागी राज्याला दोषी ठरवण्यात आले आणि दक्षिणेकडील दोन गोत्राच्या राज्यात दुष्ट राजा अहाज आणि त्याचा नातू मनश्शे यांनी नक्षत्र दैवतांची उपासना व आपल्या मुलांचा अग्नीत होम करण्याची हिणकस पद्धत सुरू केली. (२ राजे १६:३, ४; २१:३, ६; २ इतिहास २८:३, ४; ३३:३, ६) परंतु, योशिया राजा जो चांगला होता त्याने ‘विदेशी देवांच्या पुजाऱ्यांना काढून टाकले.’ कारण ते “बआल, सूर्य, चंद्र, राशिचक्र व नक्षत्रगण यास धूप जाळीत होते.”—२ राजे २३:५, १०, २४.
मोलेक उपासना, वासराची उपासना आणि फलज्योतिषशास्त्र या सर्वांचा एकमेकांशी कशाप्रकारे संबंध आहे, ते इस्राएलांनी रानांत केलेल्या बंडाळीचा स्तेफनाने जो अहवाल दिला त्यात दाखवण्यात आले आहे. “आमच्यापुढे चालतील असे देव आम्हाला करून दे,” असे जेव्हा हे लोक अहरोनाला ओरडून म्हणत होते तेव्हा यहोवाने त्यांना ‘आकाशातील सेनागणाची पूजा करावयास सोडून दिले; ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहिले आहे; हे इस्राएलाच्या घराण्या तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केले [नाही तर] . . . मोलखाचा मंडप व रेफान दैवताचा तारा’ यांना पुजण्याकरिता केले.’—प्रेषितांची कृत्ये ७:४०-४३.
बाळ येशूला भेटायला आलेले मागी
ज्योतिषांनी बाळ येशूसाठी भेटवस्तू आणल्या. ग्रीक भाषेत त्यांना मागोई असे म्हणण्यात आले. (मत्तय २:१) हे मागोई कोण होते यावर भाष्य करताना द इंपेरियल बायबल-डिक्शनरी (खंड २, पृ. १३९) म्हणते: “हेरोडोटसच्या मते, हे मागी लोक मेदी लोकांच्या वंशाचे होते. मेदी लोक स्वप्नांचा अर्थ सांगण्याचा दावा करायचे व त्यांना पवित्र विधी करण्याचा अधिकार होता. . . . थोडक्यात, ते शिकलेले पुरोहित वर्गाचे होते ज्यांना ग्रंथांचे वाचन करण्याच्या कलेतून व नक्षत्रांच्या निरीक्षणावरून येणाऱ्या घटनांबद्दल सूक्ष्मदृष्टी होती, असे दिसते. . . . नंतरच्या शोधामुळे, मेद व पारसच्याऐवजी बॅबिलोनला सर्वप्रकारच्या ज्योतिषाचे केंद्र बनवण्यात आले. ‘परंतु, पुरोहित वर्गाचे असल्यामुळे खाल्डी लोकांकडून त्यांना मागी हे नाव पडले आणि अशाप्रकारे आपण हेरोडोटस, मागी लोक एका मेदी वंशाचे होते असे जे म्हणतो त्याचे स्पष्टीकरण देऊ शकतो.’”
तेव्हा, परिस्थितीवरून हा ठोस पुरावा मिळतो, की बाळ येशूला भेटायला आलेले मागोई ज्योतिष होते. म्हणजे, ते खोट्या दैवतांचे भक्त होते आणि त्यांना माहीत असो अथवा नसो, पुढे सरकत चाललेल्या एका ताऱ्याने त्यांना येशूपर्यंत आणले होते. त्यांनी हेरोद राजाला “यहुद्यांचा राजा” जन्मास आल्याचे कळवले होते; आणि हेरोदाने मग येशूला ठार मारण्याचा कट रचला. पण त्याचा कट फसला कारण यहोवा, ज्योतिषांच्या दुरात्मिक दैवतांपेक्षा श्रेष्ठ ठरला; या ज्योतिषांना “स्वप्नात सूचना [चेतावणी] मिळाल्यामुळे” ते हेरोदाकडे पुन्हा जाण्याऐवजी दुसऱ्या एका मार्गाने आपल्या घरी निघून गेले.—मत्तय २:२, १२.
देव फलज्योतिषशास्त्राचा धिक्कार करतो
एक महान सत्य एका साध्याशा वाक्यात सांगण्यात आले आहे: “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.” याचा अर्थ, देवाने आपल्या सौरमालेतील ग्रह निर्माण केले आणि नक्षत्रमंडळात ताऱ्यांची जागा स्थिर केली. (उत्पत्ति १:१, १६; ईयोब ९:७-१०) अशा भव्य सृष्टीत, मानवाने या गोष्टींतून स्वतःसाठी देव बनवावेत अशी यहोवाची इच्छा नव्हती. म्हणूनच त्याने आपल्या लोकांना, “आकाशातील, . . . कशाचीहि प्रतिमा” करून तिची उपासना करू नको, असे कडक शब्दांत बजावले. (निर्गम २०:३, ४) म्हणजेच, सर्वप्रकारच्या फलज्योतिषावर बंदी होती.—अनुवाद १८:१०-१२.