बदलत्या परिस्थितीचा फायदा घेऊन आम्ही सर्वदूर प्रचार केला
जीवन कथा
बदलत्या परिस्थितीचा फायदा घेऊन आम्ही सर्वदूर प्रचार केला
रीकार्डो मालिक्सी यांच्याद्वारे कथित
ख्रिस्ती तटस्थतेच्या भूमिकेमुळे माझी नोकरी माझ्या हातून गेली, तेव्हा मी व माझ्या कुटुंबाने भविष्याकरता आम्हाला योग्य दिशा दाखवण्याची यहोवाला विनंती केली. प्रार्थनेत, आम्ही अधिक प्रमाणात सेवाकार्य करण्याची आमची इच्छा व्यक्त केली. यानंतर लवकरच आम्ही जणू फिरत्या जमातींसारखे भ्रमंती करू लागलो. एका देशातून दुसऱ्या देशात, असे करत आम्ही दोन खंडांतील एकूण आठ देश फिरलो. यामुळे आम्हाला अगदी दूरदूरच्या ठिकाणी सेवाकार्य करण्याची संधी मिळाली.
माझा जन्म १९३३ साली, फिलिपाईन्स येथे झाला. माझे कुटुंब फिलिपाईन्स इंडिपेंडंट चर्च नावाच्या एका प्रोटेस्टंट संघटनेशी संलग्न होते. आमच्या कुटुंबातले सर्वच्या सर्व, म्हणजे एकूण १४ जण याच चर्चचे सदस्य होते. १२ वर्षांचा असताना मी देवाला प्रार्थना केली होती, की त्याने मला खऱ्या धर्मापर्यंत पोचवावे. माझ्या एका शिक्षकाने धर्माचे शिक्षण देणाऱ्या वर्गाकरता माझे नाव नोंदवले आणि अशारितीने मी एक श्रद्धाळू कॅथलिक बनलो. शनिवारचे कन्फेशन (कबूली) किंवा रविवारचा मास मी कधीही चुकवत नव्हतो. पण काही काळानंतर माझ्या मनात संशय उत्पन्न झाले आणि मी निराश झालो. मृत्यूनंतर माणसाचे काय होते, नरक आणि त्रैक्य यांसारख्या विषयांवरील प्रश्न राहून राहून मला अस्वस्थ करायचे. धार्मिक नेत्यांनी दिलेली उत्तरे फारशी अर्थपूर्ण नव्हती आणि त्यांनी काही माझे समाधान झाले नाही.
समाधानकारक उत्तरे सापडली
महाविद्यालयात शिकताना, मी एका टोळीत सामील झालो. या टोळीच्या माध्यमाने मी हाणामारी, जुगार, धूम्रपान आणि इतर अनैतिक कार्यांत गुंतलो. एके दिवशी माझी ओळख माझ्या वर्गसोबत्यांपैकी एकाच्या आईशी झाली. ती यहोवाची साक्षीदार होती. मी धार्मिक विषय शिकवणाऱ्या
माझ्या शिक्षकांना विचारले होते तेच प्रश्न तिलाही विचारले. तिने बायबलमधून माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि तिने जे सांगितले तेच सत्य आहे याची मला खात्री पटली.मी एक बायबल विकत घेतले आणि साक्षीदारांबरोबर त्याचा अभ्यास करू लागलो. लवकरच मी यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्व सभांना उपस्थित राहू लागलो. “कुसंगतीने नीति बिघडते” या बायबलमधील सुज्ञ सल्ल्याचे पालन करून मी माझ्या अनैतिक मित्रांशी सर्व संबंध तोडून टाकले. (१ करिंथकर १५:३३) यामुळे मला माझ्या बायबल अभ्यासात प्रगती करण्यास आणि शेवटी माझे जीवन यहोवाला समर्पित करण्यास मदत मिळाली. १९५१ साली माझा बाप्तिस्मा झाल्यानंतर मी काही काळ पूर्ण वेळेचा सेवक (पायनियर) म्हणून सेवा केली. १९५३ साली ऑरिया मेन्डोसा क्रूस हिच्याशी माझा विवाह झाला. ऑरिया माझी जीवनसंगिनी आणि सेवाकार्यात माझी विश्वासू साथीदार बनली.
आमच्या प्रार्थनांचे उत्तर
पायनियर या नात्याने सेवा करण्याची आमची मनापासून इच्छा होती. पण यहोवाची अधिक सेवा करण्याची आमची ही इच्छा लगेच पूर्ण होऊ शकली नाही. तरीसुद्धा आम्ही यहोवाला प्रार्थना करत राहिलो, की त्याने आम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याची सेवा करण्याची संधी द्यावी. आमचे जीवन खडतर होते. पण आम्ही आपली आध्यात्मिक ध्येये सदैव डोळ्यासमोर ठेवली आणि त्यामुळे २५ वर्षांच्या वयातच मला यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीतील काँग्रीगेशन सर्व्हंट अर्थात अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले.
माझे बायबलचे ज्ञान जसजसे वाढत गेले, तसतशी मला यहोवाची तत्त्वे अधिक स्पष्टपणे समजू लागली आणि मला जाणीव झाली की मी जी नोकरी करत होतो तिच्यामुळे मला शुद्ध विवेकाने ख्रिस्ती तटस्थता पाळणे शक्य नव्हते. (यशया २:२-४) मी नोकरी सोडून देण्याचे ठरवले. ही आमच्या विश्वासाची परीक्षा ठरली. कारण नोकरी सोडल्यावर, मी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवणार? पुन्हा एकदा आम्ही यहोवा देवाला प्रार्थना केली. (स्तोत्र ६५:२) आम्हाला कशाविषयी काळजी व भीती वाटते हे आम्ही त्याच्याजवळ व्यक्त केले. पण त्यासोबतच राज्य प्रचारकांची ज्या ठिकाणी जास्त गरज आहे अशा ठिकाणी सेवा करण्याची आमची इच्छाही आम्ही त्याच्याजवळ व्यक्त केली. (फिलिप्पैकर ४:६, ७) आमच्यासमोर निरनिराळ्या संधींची जी दालने खुली होणार होती त्यांची त्यावेळी आम्हाला जराही कल्पना नव्हती!
आमच्या प्रवासाची सुरुवात
१९६५ साली मी लाओसमधील व्हिएनशान आंतरराष्ट्रीय विमानतळावर अग्नीशामक दल व साहाय्य कार्याच्या सुपरव्हायजरची नोकरी स्वीकारली आणि त्यामुळे आम्ही तेथे राहायला गेलो. व्हिएनशान शहरात २४ साक्षीदार होते; तेथील मिशनरी व काही स्थानिक बांधवांसोबत आम्ही प्रचार कार्यात मोठ्या आनंदाने सहभागी व्हायचो. नंतर थायलंड येथील उडोन थानी विमानतळावर माझी बदली झाली. उडोन थानी येथे एकही साक्षीदार नव्हता. आमच्या कुटुंबातच आम्ही सप्हातांतील सर्व सभा चालवायचो. आम्ही घरोघरचे प्रचार कार्य व पुनर्भेटी करायचो, ज्यामुळे आम्हाला अनेक बायबल अभ्यास सुरू करता आले.
येशूने आपल्या शिष्यांना ‘विपुल फळ देण्याविषयी’ जी आज्ञा दिली होती ती आम्ही आठवणीत ठेवली. (योहान १५:८) त्यामुळे आम्ही त्यांच्या उदाहरणाचे पालन करण्याचे ठरवले आणि सुवार्तेची घोषणा करत राहिलो. लवकरच आम्हाला आमच्या या कार्याची फळे दिसू लागली. एका थाई मुलीने सत्य स्वीकारले आणि ती आमची आध्यात्मिक बहीण बनली. उत्तर अमेरिकेच्या दोन व्यक्तींनीही सत्य स्वीकारले आणि कालांतराने ते दोघेही ख्रिस्ती वडील बनले. आम्ही उत्तर थायलंडमध्ये दहा वर्षांपेक्षाही जास्त काळ सुवार्तेचा प्रचार करत राहिलो. आता उडोन थानी येथे एक मंडळी आहे याचा आम्हाला किती आनंद वाटतो! आम्ही पेरलेल्या सत्याच्या काही बियांतून आजही फळ उत्पन्न होत आहे.
पण दुःखाची गोष्ट म्हणजे आम्हाला पुन्हा एकदा नव्या ठिकाणी जावे लागले. यावेळीही आम्ही प्रार्थना केली की ‘पिकाच्या धन्याने’ आम्हाला प्रचार कार्यात सहभाग घेत राहण्यास मदत करावी. (मत्तय ९:३८) आमची बदली, इराणची राजधानी, तेहरान येथे करण्यात आली. त्यावेळी तेथे शाहचे शासन सुरू होते.
कठीण क्षेत्रांत प्रचार कार्य
तेहरान येथे आल्यावर लगेच आम्ही आपल्या आध्यात्मिक बांधवांचा पत्ता शोधून काढला. साक्षीदारांच्या एका लहानशा गटासोबत आम्ही सभांना उपस्थित राहू लागलो. या गटात १३ वेगवेगळ्या देशांतील लोक होते. इराणमध्ये सुवार्तेचा प्रचार करण्याकरता आम्हाला अनेक तडजोडी कराव्या लागल्या. थेटपणे तर कधी आम्हाला विरोधाला तोंड द्यावे लागले नाही, पण तरीसुद्धा आम्हाला सांभाळूनच राहावे लागे.
संदेशात आस्था दाखवणाऱ्यांच्या सोयीच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे कधीकधी आम्हाला मध्यरात्री किंवा त्याहूनही उशिरा—कधीकधी अगदी पहाटेपर्यंत बायबल अभ्यास चालवावे लागत. तरीपण या सर्व कठीण परिश्रमाची मिळालेली फळे पाहून आम्हाला खूप आनंद वाटायचा. बऱ्याच फिलिपिनो व कोरियन कुटुंबांनी ख्रिस्ती सत्याचा स्वीकार करून यहोवाला आपले जीवन समर्पित केले.
यानंतर माझी पुढची नेमणूक ढाका, बांग्लादेश येथे झाली. १९७७ सालच्या डिसेंबर महिन्यात आम्ही येथे आलो. याही देशात प्रचार कार्य करणे तितके सोपे नव्हते. पण, सक्रिय राहणे किती गरजेचे आहे याचा आम्ही कधीही स्वतःला विसर पडू दिला नाही. यहोवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने आम्हाला अनेक तथाकथित ख्रिस्ती कुटुंबांशी संपर्क साधता आला. यांपैकी काहीजण पवित्र शास्त्रवचनांतील सत्याच्या तजेलादायक पाण्यासाठी जणू आसूसलेले होते. (यशया ५५:१) परिणामस्वरूप, आम्हाला अनेक बायबल अभ्यास सुरू करण्यात यश आले.
“सर्व माणसांचे तारण व्हावे” अशी देवाची इच्छा आहे हे आम्ही सदोदीत मनात बाळगले. (१ तीमथ्य २:४) आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या मार्गात अडथळा आणण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. लोकांना असलेले पूर्वग्रह दूर करण्यासाठी आम्ही सहसा अतिशय मैत्रिपूर्ण पद्धतीने व्यक्तीशी ओळख करून घ्यायचो. प्रेषित पौलाप्रमाणे, आम्ही “सर्वांना सर्व काही” होण्याचा प्रयत्न केला. (१ करिंथकर ९:२२) आमचे येण्याचे कारण विचारल्यावर आम्ही नम्रपणे त्यांना सांगायचो आणि बहुतेक लोक अतिशय मैत्रिपूर्ण पद्धतीने आम्हाला प्रतिसाद द्यायचे.
ढाका येथे एका स्थानिक साक्षीदार बहिणीशी आमची भेट झाली. आम्ही तिला प्रथम आमच्या ख्रिस्ती सभांना व नंतर प्रचार कार्यात येण्याचे प्रोत्साहन दिले. यानंतर माझ्या पत्नीने एका कुटुंबासोबत बायबलचा अभ्यास केला आणि त्यांना सभांना येण्याचे निमंत्रण दिले. यहोवाच्या आशीर्वादामुळे हे सबंध कुटुंब सत्यात आले. नंतर त्यांच्या दोन मुलींनी बायबलचे साहित्य बंगाली भाषेत अनुवाद करण्याच्या कार्यातही सहभाग घेतला आणि त्यांच्या अनेक नातेवाईकांनाही त्यांच्याद्वारे यहोवाची ओळख घडली. इतर अनेक बायबल विद्यार्थ्यांनीही सत्याचा स्वीकार केला. आज त्यांच्यापैकी अनेकजण वडील अथवा पायनियर म्हणून सेवा करत आहेत.
ढाका हे दाट वस्तीचे शहर असल्यामुळे, प्रचार कार्यात आम्हाला मदत करण्यासाठी आम्ही आमच्या कुटुंबातील काही सदस्यांना येथे येण्याविषयी सुचवले. बऱ्याच कुटुंबियांनी आमच्या या निमंत्रणाला प्रतिसाद दिला आणि ते बांग्लादेशात आमच्यासोबत राहण्यास आले. या देशात सुवार्तेचा प्रचारात सहभाग घेण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही यहोवाचे अत्यंत आभारी आहोत! केवळ एका व्यक्तीपासून सुरुवात होऊन आज बांग्लादेशात दोन मंडळ्या स्थापन झाल्या आहेत.
१९८२ साली जुलै महिन्यात आम्हाला बांग्लादेश सोडावा लागला. बांधवांना सोडून जाताना आम्हाला अश्रू आवरले नाहीत. यानंतर काही काळानंतर मला युगांडातील एन्टेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरी मिळाली. पुढची चार वर्षे व सात महिने आम्ही येथेच राहिलो. यहोवाच्या महान नामाच्या गौरवाकरता आम्ही या देशातही काही करू शकलो का?
पूर्व आफ्रिकेत यहोवाची सेवा
एन्टेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर आम्ही आलो तेव्हा एक ड्रायव्हर मला व माझ्या पत्नीला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोचवण्याकरता आला. विमानतळातून बाहेर पडताच, मी या ड्रायव्हरला देवाच्या राज्याविषयी सांगू लागलो. त्याने मला विचारले: “तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात का?” मी होकार दिला तेव्हा तो ड्रायव्हर म्हणाला: “तुमचा एक बंधू कंट्रोल टाव्हरवर काम करतो.” मी त्याला लगेच आम्हाला तेथे नेण्यास सांगितले. आम्ही त्या बांधवाला भेटलो; आम्हाला भेटून त्यांना खूप आनंद झाला. आम्ही सभा व क्षेत्र सेवाकार्याकरता व्यवस्था केल्या.
त्यावेळी युगांडात केवळ २२८ राज्य प्रचारक होते. एन्टेब येथे आल्यावर पहिले वर्ष, आम्ही येथे राहणाऱ्या दोन बांधवांसोबत मिळून सत्याचे बीज पेरण्यात खर्च केले. येथील लोकांना वाचनाची आवड असल्यामुळे आम्ही बऱ्याच साहित्याचे व शेकडो नियतकालिकांचे वाटप करू शकलो. शनिवार-रविवारच्या सुटीत आम्ही राजधानी, कम्पाला येथून बांधवांना एन्टेब येथे येऊन आम्हाला प्रचार कार्यात मदत करण्याचे निमंत्रण द्यायचो. माझ्या पहिल्या जाहीर भाषणाला माझ्यासहित पाच जण उपस्थित होते.
पुढच्या तीन वर्षांदरम्यान आम्हाला आमच्या जीवनातले सर्वात आनंददायक क्षण उपभोगायला मिळाले. आम्ही ज्यांना शिकवत होतो त्यांनी जलद आध्यात्मिक प्रगती करण्यास सुरुवात केली. (३ योहान ४) एका विभागीय संमेलनात आमच्या बायबल विद्यार्थ्यांपैकी सहा जणांचा बाप्तिस्मा झाला. यांच्यापैकी कित्येक जणांनी सांगितले की त्यांना पूर्णवेळेची सेवा करण्याची आमच्याकडून प्रेरणा मिळाली कारण पूर्ण वेळेची नोकरी असूनही आम्ही पायनियर म्हणून सेवा करत होतो.
कामाचे ठिकाणही अतिशय फलदायी क्षेत्र ठरू शकते असे आमच्या लक्षात आले. एकदा मी विमानतळावर एका अग्नीशामक विभागाच्या अधिकाऱ्याला परादीस पृथ्वीवरील जीवनाच्या बायबल आधारित आशेविषयी सांगितले. त्याच्याच बायबलमधून मी त्याला दाखवले की कशाप्रकारे आज्ञाधारक मानवजात शांती व सलोख्याने राहील, गरिबीचा अंत झालेला असेल, लोकांना राहायला घरे असतील, तसेच युद्धे, आजारपण व मृत्यू देखील राहणार नाही. (स्तोत्र ४६:९; यशया ३३:२४; ६५:२१, २२; प्रकटीकरण २१:३, ४) स्वतःच्या बायबलमधून हे वाचल्यावर त्याला खूपच कुतूहल वाटले. लगेच आम्ही बायबल अभ्यासास सुरुवात केली. तो सर्व सभांना येऊ लागला. लवकरच त्याने यहोवाला आपले जीवन समर्पित केले आणि बाप्तिस्मा घेतला. नंतर तोसुद्धा आमच्यासोबत पूर्ण वेळेच्या सेवेत सहभागी झाला.
आम्ही युगांडात असताना दोनदा तेथे आंतरिक हिंसाचाराच्या घटना घडल्या. पण यामुळे आमच्या आध्यात्मिक कार्यांत खंड पडला नाही. आंतरराष्ट्रीय संस्थांतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नैरोबी, केनिया येथे सहा महिन्यांकरता पाठवण्यात आले. बाकीचे जे आम्ही युगांडातच राहिलो त्यांनी ख्रिस्ती सभा आणि प्रचार कार्य सुरू ठेवले. अर्थात आम्हाला सावधपणेच कार्य करावे लागायचे.
१९८८ सालच्या एप्रिल महिन्यात माझे काम संपले आणि पुन्हा एकदा आम्ही दुसरीकडे जाण्यास निघालो. एन्टेब मंडळी सोडताना येथे घडलेल्या आध्यात्मिक प्रगतीविषयी आमच्या मनात खूप समाधान होते. १९९७ साली जुलै महिन्यात, आम्हाला पुन्हा एकदा एन्टेबला जाण्याचा योग आला. आम्ही पूर्वी ज्यांच्यासोबत अभ्यास केला होता त्यांपैकी काहीजण आता वडील या नात्याने सेवा करत होते. जाहीर भाषणाच्या सभेला १०६ जण उपस्थित राहिलेले पाहून आम्हाला खूप आनंद झाला.
कार्य करण्यात आलेले नाही अशा क्षेत्रात जाणे
यानंतरही आम्हाला काही नव्या सुसंधी मिळणार होत्या का? होय, माझी पुढची नेमणूक सोमालियातील मोगादिशू आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होती. पूर्वी कधीही कार्य करण्यात आले नव्हते अशा या क्षेत्रात सेवा करण्याच्या संधीचा पुरेपूर फायदा उचलण्याचे आम्ही ठरवले.
आम्हाला केवळ एम्बसीच्या कर्मचाऱ्यांना, फिलिपिनो कामगारांना आणि इतर परदेशी रहिवाशांनाच प्रचार करणे शक्य होते. बहुतेकदा आमची बाजारात त्यांच्याशी गाठ पडायची. अधूनमधून आम्ही सहज त्यांना भेटायला म्हणून त्यांच्या घरीही जायचो. कल्पकता, व्यवहारचातुर्य, सावधपणा यांसारख्या गुणांमुळे आणि यहोवावर पूर्णपणे विसंबून राहण्याद्वारे आम्ही इतरांना बायबलमधील सत्ये सांगू शकलो आणि वेगवेगळ्या देशांच्या व्यक्तींनी सत्य स्वीकारले. दोन वर्षांनंतर, येथे युद्ध सुरू होण्याच्या काही काळाआधीच आम्ही मोगादिशू सोडले.
दि इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनने यानंतर मला रंगून, म्यानमार येथे नेमले. पुन्हा एकदा, प्रांजळ हृदयाच्या लोकांना देवाच्या उद्देशांबद्दल शिकण्यास मदत करण्याच्या उत्तम सुसंधी आम्हाला मिळाल्या. म्यानमारनंतर आम्हाला दार ए सलाम, टांझानिया येथे पाठवण्यात आले. दार ए सलाम येथे इंग्रजी बोलणारे बरेच लोक असल्यामुळे घरोघरचे प्रचार कार्य करणे सोपे होते.
आम्ही ज्या ज्या देशांत कार्य केले त्या त्या देशांत सेवाकार्य करण्यास आम्हाला सहसा काही अडचणींना तोंड द्यावे लागले नाही. खरे म्हणजे, यांपैकी बऱ्याच देशांत यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर प्रतिबंध होते. पण माझ्या कामाच्या स्वरूपामुळे, सहसा माझा संबंध सरकारी अथवा आंतरराष्ट्रीय संस्थांशी यायचा आणि त्यामुळे लोक सहसा आमच्या हालचालींविषयी काही शंका घेत नव्हते.
माझ्या नोकरीमुळे मला व माझ्या पत्नीला भटक्या जमातींसारखे जवळजवळ ३० वर्षे भटकत राहावे लागले. पण नोकरी ही केवळ पोटापाण्याच्या सोयीकरता आहे असाच दृष्टिकोन आम्ही नेहमी बाळगला. आमचे प्रथम ध्येय हे नेहमीच देवाच्या राज्याच्या कार्याला बढावा देण्याचेच होते. आम्ही यहोवाचे आभार मानतो की त्याने आम्हाला आमच्या बदलत्या परिस्थितीचा चांगला उपयोग करण्यास मदत केली आणि दूर दूरच्या ठिकाणी सुवार्तेचा प्रसार करण्याची अद्भूत सुसंधी दिली.
जेथून सुरुवात केली तेथे परतणे
वयाच्या ५८ व्या वर्षी मी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेऊन फिलिपाईन्सला परतण्याचे ठरवले. येथे परतल्यावर आम्ही यहोवाला पुढचा मार्ग दाखवण्याची विनंती केली. कव्हीटी प्रांतातील ट्रेसे मार्टीरेस सिटी येथील एका मंडळीत सेवा करण्यास आम्ही सुरुवात केली. आम्ही प्रथम येथे आलो तेव्हा येथे देवाच्या राज्याचे केवळ १९ प्रचारक होते. यानंतर दररोज प्रचाराकरता व्यवस्था करण्यात आली आणि अशारितीने अनेक बायबल अभ्यास सुरू करण्यात आले. मंडळीत हळूहळू वाढ होऊ लागली. एकावेळी तर माझ्या पत्नीला १९ आणि मला १४ बायबल अभ्यास होते.
काही काळातच आमचे राज्य सभागृह लहान पडू लागले. आम्ही यहोवाला याविषयी प्रार्थना केली. एका आध्यात्मिक बंधूने व त्याच्या पत्नीने आपल्या मालकीची काही जमीन देणगी म्हणून देण्याचे ठरवले आणि शाखा दफ्तरानेही या जमिनीवर एक नवे राज्य सभागृह बांधण्याकरता कर्ज देण्याचे संमत केले. नव्या सभागृहाचा प्रचार कार्यावर फार चांगला परिणाम झाला आहे. दर आठवडी सभांची उपस्थिती वाढत गेली आहे. सध्या आम्ही जवळजवळ एक दीड तासाचा प्रवास करून १७ प्रचारक असलेल्या आणखी एका मंडळीला मदत करण्यासाठी जातो.
निरनिराळ्या देशांत सेवा करण्याची संधी मिळाल्याचा मला व माझ्या पत्नीला फार आनंद वाटतो. आमच्या भ्रमंतीचा विचार करताना आम्हाला याचे मनापासून समाधान वाटते की आम्ही आमच्या परिस्थितीचा उपयोग सर्वात उत्तम मार्गाने, म्हणजे लोकांना यहोवाबद्दल शिकण्यास मदत करण्यासाठी केला!
[२४, २५ पानांवरील नकाशा]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
टांझानिया
युगांडा
सोमालिया
इराण
बांग्लादेश
म्यानमार
लाओस
थायलंड
फिलिपाईन्स
[२३ पानांवरील चित्र]
माझी अर्धांगिनी ऑरिया हिच्यासोबत