रूथच्या पुस्तकातील ठळक मुद्दे
यहोवाचे वचन सजीव आहे
रूथच्या पुस्तकातील ठळक मुद्दे
ही दोन स्त्रियांतील एकनिष्ठेची हृदयस्पर्शी सत्यकथा आहे. यहोवा देवाबद्दल गुणग्राहकतेचा आणि त्याच्या व्यवस्थेवरील भरवशाचा हा एक अहवाल आहे. मशिहाच्या वंशावळीत यहोवाने आस्था घेतली, यावर जोर देणारी ही एक कहाणी आहे. एका कुटुंबाच्या आनंदाच्या व दुःखाच्या क्षणांचे वर्णन करणारा वृत्तान्त आहे. बायबलमधील रूथ नावाच्या पुस्तकात ही आणि अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत.
रूथ पुस्तकात, इस्राएलमधील “शास्त्यांच्या अमदानीत” सुमारे ११ वर्षांच्या कालावधीत घडलेल्या घटनांचा अहवाल आहे. (रूथ १:१) यांत लिहिलेल्या घटना, शास्त्यांच्या अमदानीच्या सुरुवातीच्या काळात घडल्या असाव्यात. कारण सत्यजीवनावर आधारित या नाटकातील बवाज नामक प्रमुख पात्र यहोशवाच्या दिवसांतील राहाबाचा मुलगा होता. (यहोशवा २:१, २; रूथ २:१; मत्तय १:५) हा अहवाल कदाचित संदेष्टा शमुवेलाने सा.यु.पू. १०९० मध्ये लिहिला असावा. बायबलमधील केवळ या एकाच पुस्तकाचे नाव, एका गैर-इस्राएली स्त्रीच्या नावावरून आहे. यातील संदेश “सजीव, सक्रिय” आहे.—इब्री लोकांस ४:१२.
“तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन”
नामी आणि रूथ बेथलेहेमात येतात तेव्हा सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे जाते. यांच्यापैकी वयस्क स्त्रीकडे बोट दाखवत गावातील बायका म्हणतात: “ही नामीच काय?” यावर नामी म्हणते: “मला नामी (मनोरमा) म्हणू नका, तर मारा (क्लेशमया) म्हणा; कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणिले.”—रूथ १:१९-२१.
इस्राएलात पडलेल्या दुष्काळामुळे नामी आणि तिचा परिवार बेथलेहेमातून मवाब देशात राहायला येतो तेव्हा नामी “भरलेली” होती अर्थात तेव्हा तिचा पती व तिचे दोन पुत्र जिवंत होते. पण मवाबात काही वर्षे राहिल्यानंतर तिचा पती अलीमलेख मरण पावतो. नंतर, तिचे दोन्ही पुत्र अर्पा व रूथ या मवाबी स्त्रियांशी लग्न करतात. सुमारे दहा वर्षांनंतर, तिचे दोन्ही मुले निपुत्र मरण पावतात; तिन्ही बायका विधवा होतात. नामी जेव्हा यहुदाला परत जाण्याचे ठरवते तेव्हा तिच्या दोन्ही विधवा सुना तिच्याबरोबर निघतात. मार्गात नामी त्यांना, आपापल्या घरी मवाब देशी परत जाण्याची गळ घालते; आपल्या लोकांमध्ये जाऊन पुन्हा लग्न करा, असे ती त्यांना सांगते. अर्पा तिचे म्हणणे ऐकते. पण रूथ नामीला चिकटून राहते व म्हणते: “तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव.”—रूथ १:१६.
नामी आणि रूथ या दोन्ही विधवा, बेथलेहेमेत पोहंचतात; तेव्हा सातूची कापणी सुरू झालेली असते. देवाच्या नियमशास्त्रानुसार असलेल्या एका व्यवस्थेचा लाभ घेऊन रूथ एका शेतात सरवा वेचायला जाते; आणि होते असे, की ते शेत तिचा सासरा अलीमलेख याच्याच एका नातलगाचे असते; तो एक वृद्ध यहुदी पुरूष असतो ज्याचे नाव असते बवाज. रूथ बवाजाची मर्जी संपादते आणि “सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत” ती त्याच्या शेतात सरवा वेचत राहते.—रूथ २:२३.
शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
१:८, NW—नामी आपल्या सुनांना, तुम्ही आपल्या बापाच्या घरी जा असे म्हणण्याऐवजी तुम्ही दोघी आपापल्या “आईच्या घरी” जा असे का म्हणते? त्यावेळी अर्पाचे वडील हयात होते की नव्हते हे सांगण्यात आलेले नाही. रूथचे वडील मात्र होते. (रूथ २:११) तरीपण नामी आईच्या घराचा उल्लेख करते कदाचित असा विचार करून, की आई म्हटले की त्यांना आपल्या आईच्या कनवाळूपणात मिळणाऱ्या सांत्वनेची आठवण होईल. आपल्या प्रिय सासूपासून विलग होण्याच्या दुःखात त्यांना खासकरून अशा सांत्वनाची गरज भासली असती. नामीच्या बोलण्यावरून कदाचित हेही सूचित होत असावे की रूथ आणि अर्पाच्या आयांचे स्थायी घरदार होते; तसे नामीचे नव्हते.
१:१३, २१—यहोवाने नामीचे जीवन क्लेशदायक करून तिला दुःख दिले होते का? नाही आणि नामीनेसुद्धा देवावर कोणत्याही प्रकारचा दोष लावला नाही. पण तिच्याबाबतीत जे काही घडले होते त्यावरून तिच्या मनात असा विचार आला की यहोवा तिच्या विरुद्ध होता. ती नाराज झाली होती, तिचा भ्रमनिरास झाला होता. शिवाय, त्या काळी पोटचे फळ देवाकडून आशीर्वाद आणि वांझोटेपणा एक शाप समजला जात होता. नातवंडे नाहीत, दोन्ही पुत्र मरण पावल्यामुळे नामीला असा विचार करणे उचित वाटले असावे की यहोवाने तिला पीडिले आहे.
२:१२—रूथला यहोवाकडून कसले “पुरे पारितोषिक” मिळाले? रूथला एक मुलगा झाला आणि इतिहासातल्या सर्वात महत्त्वपूर्ण वंशावळीत अर्थात येशू ख्रिस्ताच्या वंशावळीत एक दुवा होण्याचा सुहक्क मिळाला होता.—रूथ ४:१३-१७; मत्तय १:५, १६.
आपल्याकरता धडे:
१:८; २:२०. नामीवर अनेक संकटे कोसळली तरीपण तिने यहोवाच्या प्रेमळ-दयेवरील आपला भरवसा कायम ठेवला. आपणही असेच केले पाहिजे; खासकरून जेव्हा आपल्यावर मोठमोठ्या परीक्षा येतात तेव्हा.
१:९. घर केवळ कौटुंबिक सदस्यांचे खाण्याचे व झोपण्याचे ठिकाण नसावे. ते आराम आणि सांत्वन देणारे शांतीमय ठिकाण असले पाहिजे.
१:१४-१६. अर्पा “आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली.” रूथ गेली नाही. रूथने आपल्या मूळ देशातील आरामदायक व सुरक्षित जीवनाकडे पाठ फिरवली आणि ती यहोवाशी एकनिष्ठ राहिली. देवाबद्दल एकनिष्ठ प्रेम विकसित केल्यामुळे व निःस्वार्थ मनोवृत्ती दाखवल्यामुळे, आपण स्वार्थी इच्छांच्या आहारी पडून ‘नाश होणार’ नाही.—इब्री लोकांस १०:३९.
२:२. विदेश्यांच्या व पीडितांच्या लाभासाठी केलेल्या सरवा वेचण्याच्या तरतुदीचा रूथला फायदा घ्यायचा होता. ती नम्र होती. गरज असलेल्या ख्रिस्ती व्यक्तीने गर्विष्ठ न होता सहविश्वासू बंधूभगिनींची किंवा त्याला किंवा तिला मिळू शकणारी सरकारी मदत स्वीकारली पाहिजे.
२:७. सरवा वेचण्याचा हक्क असतानाही रूथने सरवा वेचण्यासाठी परवानगी मागितली. (लेवीय १९:९, १०) हे तिच्या नम्रतेचे एक चिन्ह होते. आपण ‘नम्रतेचा शोध’ करण्यात सुज्ञता दाखवतो कारण केवळ नम्र अर्थात “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—सफन्या २:३, NW; स्तोत्र ३७:११.
२:११. रूथ केवळ नामीची नातेवाईकच नव्हती. तर ती तिची सख्खी मैत्रिण होती. (नीतिसूत्रे १७:१७) त्यांची मैत्री पक्की होती कारण ती प्रेम, एकनिष्ठा, सहानुभूती, दया आणि निःस्वार्थ मनोवृत्ती यासारख्या गुणांवर आधारित होती. या सर्वाहून महत्त्वाचे म्हणजे, त्या दोघींना यहोवाची सेवा करण्याची आणि त्याच्या उपासकांमध्ये असण्याची इच्छा होती. आपल्यासमोरही खऱ्या उपासकांमध्ये खरी मैत्री विकसित करण्याच्या उत्तम संधी आहेत.
२:१५-१७. बवाजाने रूथचे काम हलके केले असतानाही ती ‘संध्याकाळपर्यंत सरवा वेचत राहिली.’ रूथ कष्टाळू होती. ख्रिस्ती व्यक्तीने देखील कष्टाळू असल्याबद्दल नाव मिळवले पाहिजे.
२:१९-२२. नामी आणि रूथमध्ये संध्याकाळच्या वेळी आनंददायक संभाषण होत असे. वृद्ध नामीने तरुण रूथच्या कार्यात आवड दाखवली; त्यामुळे दोघी जणी आपले विचार, आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करू शकल्या. एका ख्रिस्ती कुटुंबात असाच मनमोकळेपणा असला पाहिजे, नाही का?
२:२२, २३. रूथ याकोबाची मुलगी दीना हिच्यासारखी नव्हती. रूथने यहोवाच्या उपासकांबरोबर संगती केली. आपल्यासाठी किती हे उत्तम उदाहरण!—उत्पत्ति ३४:१, २; १ करिंथकर १५:३३.
नामी “भरलेली” होते
नामीने मुले प्रसवण्याचे वय ओलांडले आहे. त्यामुळे ती रूथला, वतन सोडवण्यासाठी लग्न करण्याद्वारे अर्थात दीराबरोबर लग्न करण्याद्वारे आपल्यासाठी संतान उत्पन्न करण्याची सूचना देते. नामीच्या सूचनेनुसार, रूथ बवाजाला वतन सोडवणारा म्हणून कार्य करण्यास सांगते. बवाज तिची विनंती ऐकतो. परंतु, आणखी एक जवळचा नातेवाईक असतो ज्याला पहिली संधी दिली पाहिजे.
बवाज मुळीच वेळ दवडत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो, त्या जवळच्या आप्तासमक्ष बेथलेहेमेच्या दहा वडील पुरूषांना गोळा करतो आणि त्याला विचारतो, की तो वतन सोडवू इच्छितो का. हा आप्त वतन सोडवू इच्छित नाही. त्यामुळे मग बवाज वतन सोडवणारा म्हणून कार्य करतो आणि रूथशी लग्न करतो. लग्नानंतर त्यांना ओबेद नावाचा मुलगा होतो जो राजा दावीदाचा आजा होतो. बेथलेहेमेच्या स्त्रिया आता नामीस म्हणतात: “परमेश्वर धन्य आहे, . . . हा तुझे पुनरुज्जीवन करणारा व वृद्धापकाळी तुझा प्रतिपाळ करणारा होवो; कारण तुझी सून जी तुजवर प्रीति करते व जी तुला सात पुत्रांहून अधिक आहे तिला हा पुत्र झाला आहे.” (रूथ ४:१४, १५) बेथलेहेमात रिकाम्या हाती परतलेली स्त्री पुन्हा एकदा “भरलेली” होते!—रूथ १:२१.
शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
३:११—रूथला “सद्गुणी स्त्री” हे नाव कसे मिळते? “केसांचे गुंफणे” किंवा “सोन्याचे दागिने” घातल्यामुळे किंवा “उंची पोषाक” केल्यामुळे लोक रूथची प्रशंसा करत नव्हते. तर, तिच्या “गुप्त मनुष्यपणाची” अर्थात तिची एकनिष्ठता व तिचे प्रेम यांमुळे आणि तिच्या कामासू व निःस्वार्थ वृत्तीमुळे तिने हे नाव कमवले. रूथसारखे नाव कमवू इच्छिणाऱ्या कोणत्याही देव-भिरू स्त्रीने हे गुण आपल्या अंगी विकसित करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.—१ पेत्र ३:३, ४; नीतिसूत्रे ३१:२८-३१.
३:१४—रूथ आणि बवाज तांबडे फुटण्यापूर्वी का उठतात? रात्रीच्या अंधारात काही तरी अनैतिक घडले होते व त्यांना ते गुपीत ठेवायचे होते म्हणून नव्हे. रूथने रात्री जी कार्ये केली ती सहसा, दीराबरोबर लग्न करण्याचा हक्क मिळवू पाहणारी स्त्री करत असे. तिने नामीच्या सूचनांनुसार कार्य केले होते. शिवाय, बवाजाने दिलेल्या प्रतिसादावरून हे सूचित होते, की रूथने जे काही केले त्यात त्याला गैर असे काही वाटले नाही. (रूथ ३:२-१३) रूथ आणि बवाज सूर्योदयापूर्वीच उठले जेणेकरून कोणालाही बिनबुडाच्या अफवा पसरवायला कारण मिळणार नाही.
३:१५—बवाजाने रूथला सहा मापे सातू देण्याचा काय अर्थ होता? कामाच्या सहा दिवसांनंतर जसा विश्रामाचा दिवस येतो तसेच रूथचा विश्राम दिन जवळ आला होता. रूथला तिच्या पतीच्या घरी “विसावा” मिळेल याची बवाजाने खात्री केली. (रूथ १:९; ३:१) त्याचा असाही अर्थ असावा, की रूथ सातूचे केवळ सहा मापांचे ओझेच आपल्या डोक्यावर वाहून नेऊ शकत होती.
३:१६, पं.र.भा. तळटीप—“तू कोण? माझी मुलगी काय?” असे नामीने रूथला का विचारले? तिने आपल्या सुनेला ओळखले नाही काय? कदाचित असेच असावे; कारण, रूथ घरी नामीकडे आली तेव्हा अद्याप अंधारच होता. पण कदाचित असेही असू शकते, की वतन सोडवल्यानंतर रूथला जी नवी ओळख मिळाली होती त्याविषयी नामी विचारपूस करत होती.
४:६—वतन सोडवण्याद्वारे वतन सोडवणारा आपल्या वतनाचा “बिघाड” कसा करू शकत होता? दारिद्र्य आलेल्या मनुष्याने वतनादाखल मिळालेली जमीन विकली तर, वतन सोडवणाऱ्या व्यक्तीला, पुढील योबेल येईपर्यंत किती वर्षे उरली आहेत या आधारावर ठरवलेली किंमत देऊन ती जमीन विकत घ्यावी लागायची. (लेवीय २५:२५-२७) असे केल्याने त्याच्या जमिनीचे भाव कमी होतील. शिवाय, रूथला मुलगा झाला तर, वतन सोडवणाऱ्याच्या जवळच्या नातेवाईकाला नव्हे तर रूथच्या मुलाला ती विकत घेतलेली जमीन वतनादाखल मिळेल.
आपल्याकरता धडे:
३:१२; ४:१-६. बवाजने यहोवाच्या व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन केले. ईश्वरशासित पद्धतींचे आपण इमानदारीने पालन करतो का?—१ करिंथकर १४:४०.
३:१८. नामीला बवाजावर भरवसा होता. आपणही आपल्या विश्वासू बंधूभगिनींवर असाच भरवसा ठेवू नये का? रूथ एका अशा व्यक्तीबरोबर अर्थात तिच्या दीराबरोबर लग्न करायला तयार होती ज्याला ती मुळीच ओळखत नव्हती. बायबलमध्ये त्याचे नावही देण्यात आलेले नाही. (रूथ ४:१) तिने असे का केले? कारण देवाच्या व्यवस्थेवर तिचा भरवसा होता. आपल्यालाही असाच भरवसा आहे का? जसे की, विवाह सोबती निवडताना आपण “केवळ प्रभूमध्ये” लग्न करा या आज्ञेचे पालन करतो का?—१ करिंथकर ७:३९.
४:१३-१६. रूथ मवाबी होती आणि पूर्वी कमोश दैवताची भक्त होती; तरीपण आता तिला किती मोठा सुहक्क मिळाला होता. या उदाहरणावरून एक तत्त्व शिकायला मिळते; ते हे की, “हे इच्छा बाळगणाऱ्यावर नव्हे किंवा धावपळ करणाऱ्यावर नव्हे, तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे.”—रोमकर ९:१६.
देव ‘योग्य वेळी तुम्हांस उंच करेल’
रूथचे पुस्तक, यहोवाचे चित्र प्रेमळ-दयेचा देव, आपल्या एकनिष्ठ सेवकांच्या वतीने कार्य करणारा देव असे रेखाटते. (२ इतिहास १६:९) रूथला कशाप्रकारे आशीर्वादित करण्यात आले यावर आपण मनन करतो तेव्हा आपल्याला, पूर्ण विश्वासाने यहोवावर भरवसा ठेवण्याचे मूल्य समजते; आणि आपण हा भरवसा बाळगू शकतो की “तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्री लोकांस ११:६.
रूथ, नामी, बवाज यांनी यहोवाच्या व्यवस्थेवर पूर्ण भरवसा ठेवला आणि यामुळे त्यांच्याबाबतीत सर्व काही सुरळीत पार पडले. तसेच, “देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.” (रोमकर ८:२८) तेव्हा प्रेषित पेत्राने दिलेल्या या सल्ल्याचे आपण पालन करू या: “म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हांस उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.”—१ पेत्र ५:६, ७.
[२६ पानांवरील चित्र]
रूथने नामीला का सोडले नाही, हे तुम्हाला माहीत आहे का?
[२७ पानांवरील चित्र]
कोणत्या कारणामुळे रूथने “सद्गुणी स्त्री” हे नाव कमवले?
[२८ पानांवरील चित्र]
रूथला यहोवाकडून कोणते “पुरे पारितोषिक” मिळाले?