व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विवाहित जोडप्यांकरता सुज्ञ मार्गदर्शन

विवाहित जोडप्यांकरता सुज्ञ मार्गदर्शन

विवाहित जोडप्यांकरता सुज्ञ मार्गदर्शन

“स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, . . . आपआपल्या पत्नीवर प्रीति करा.”इफिसकर ५:२२, २५.

१. विवाहासंबंधी योग्य दृष्टिकोन काय आहे?

येशूने म्हटल्याप्रमाणे, विवाह हे देवाने जोडलेले बंधन आहे, ज्याकरवी एक स्त्री व एक पुरुष “एकदेह” होतात. (मत्तय १९:५, ६) वेगवेगळी व्यक्‍तिमत्त्वे असलेल्या या दोन व्यक्‍ती, समान कार्यांत रस घ्यायला आणि समान ध्येये साध्य करण्याकरता सहकार्य करायला शिकतात. विवाह हा केव्हाही सहज रद्द करता येईल असा करार नसून, जीवनभर साथ देण्याची वचनबद्धता आहे. कित्येक देशांत घटस्फोट मिळवणे तसे कठीण नाही, पण एक ख्रिस्ती व्यक्‍ती वैवाहिक नातेसंबंधाला पवित्र मानते. हे बंधन केवळ एका अत्यंत महत्वाच्या कारणामुळेच संपुष्टात आणले जाते.—मत्तय १९:९.

२. (क) विवाहित जोडप्यांकरता कशाप्रकारची मदत उपलब्ध आहे? (ख) वैवाहिक जीवन यशस्वी होण्याकरता झटणे का महत्त्वाचे आहे?

वैवाहिक सल्लागार असलेल्या एका स्त्रीने म्हटले: “यशस्वी वैवाहिक जीवन म्हणजे एक सतत बदलत जाणारी प्रक्रिया आहे कारण यात जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग करून नव्या प्रश्‍नांना, नव्या समस्यांना तोंड दिले जाते.” ख्रिस्ती जोडप्यांच्या बाबतीत पाहू जाता, बायबलमधील सुज्ञ मार्गदर्शन, ख्रिस्ती बांधवांचा आधार व प्रार्थनेद्वारे यहोवासोबत एक जवळचा नातेसंबंध ही त्यांना उपलब्ध असलेली साधने आहेत. यशस्वी वैवाहिक नाते सर्व समस्यांना तोंड देऊनही टिकून राहते आणि हे नाते पती व पत्नी या दोघांकरता आनंददायक व समाधानदायक ठरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे विवाहाची व्यवस्था अस्तित्वात आणणाऱ्‍या यहोवा देवाचे गौरव होते.—उत्पत्ति २:१८, २१-२४; १ करिंथकर १०:३१; इफिसकर ३:१५; १ थेस्सलनीकाकर ५:१७.

येशू व त्याच्या मंडळीचे अनुकरण करा

३. (क) पौलाने विवाहित जोडप्यांना दिलेल्या सल्ल्याचा सारांश सांगा. (ख) येशूने कोणता अनुकरणीय आदर्श मांडला?

दोन हजार वर्षांपूर्वी प्रेषित पौलाने ख्रिस्ती जोडप्यांना हा सुज्ञ सल्ला दिला: “मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीहि सर्व गोष्टींत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वत:स तिच्यासाठी समर्पण केले.” (इफिसकर ५:२४, २५) येथे किती सुरेख तुलना केली आहे! आपापल्या पतीच्या नम्रपणे अधीन राहणाऱ्‍या ख्रिस्ती पत्नी, मस्तकपदाच्या तत्त्वाचा आदर करणाऱ्‍या व त्याचे पालन करणाऱ्‍या ख्रिस्ती मंडळीचे अनुकरण करत असतात. दुसरीकडे पाहता, जे पती सर्वकाही सुरळीत चालले असतानाच नव्हे तर कठीण परिस्थितीतही आपल्या पत्नीवर प्रीती करतात ते मंडळीवर प्रीती करणाऱ्‍या व तिची काळजी वाहणाऱ्‍या ख्रिस्ताचे आपण जवळून अनुकरण करत आहोत हे दाखवतात.

४. पती येशूच्या उदाहरणाचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतात?

ख्रिस्ती पती आपापल्या कुटुंबाचे मस्तक आहेत, पण त्यांच्यावरही एक मस्तक आहे, अर्थात येशू. (१ करिंथकर ११:३) त्यामुळे, येशूने ज्याप्रकारे आपल्या मंडळीची काळजी घेतली त्याचप्रकारे पती देखील आपापल्या कुटुंबांची आध्यात्मिक व शारीरिक दृष्टीने प्रेमळपणे काळजी वाहतात; आणि यासाठी ते आत्मत्याग करण्यासही तयार असतात. स्वतःच्या इच्छा व आवडी यांपेक्षा ते आपल्या कुटुंबाच्या हिताचा आधी विचार करतात. येशूने म्हटले: “ह्‍याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) हे तत्त्व वैवाहिक जीवनाकरता खासकरून समर्पक आहे. पौलाने हे स्पष्ट केले, त्याने म्हटले: “त्याचप्रमाणे पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी. . . . कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करितो.” (इफिसकर ५:२८, २९) तेव्हा, ज्याप्रमाणे एक पुरुष स्वतःच्या शरीराचे पालनपोषण व संभाळ करतो त्याचप्रमाणे व तितक्याच उत्सुकतेने त्याने आपल्या पत्नीचेही पालनपोषण व संभाळ केला पाहिजे.

५. पत्नी ख्रिस्ती मंडळीचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतात?

देवाची उपासना करणाऱ्‍या पत्नी ख्रिस्ती मंडळीचे अनुकरण करतात. येशू या पृथ्वीवर असताना त्याच्या अनुयायांनी आपापल्या पूर्वीच्या उद्योगधंद्यांचा स्वेच्छेने त्याग करून त्याचे अनुकरण केले. येशूच्या मृत्यूनंतरही हे अनुयायी त्याच्या आज्ञेत राहिले आणि मागच्या जवळजवळ २,००० वर्षांपासून ते सर्व गोष्टींत येशूच्या अधीन राहून त्याच्या मार्गदर्शनाचे पालन करत आले आहेत. त्याचप्रकारे ख्रिस्ती पत्नी देखील आपल्या पतीला कधीही तुच्छ लेखत नाही किंवा वैवाहिक जीवनात कधीही मस्तकपदाच्या शास्त्रवचनीय व्यवस्थेकडे दुर्लक्ष करत नाहीत. याउलट, त्या आपल्या पतीला आधार देऊन त्याच्या अधीन राहतात, त्याला सहयोग देतात आणि अशाप्रकारे त्याला प्रोत्साहन देतात. पती व पत्नी दोघेही अशा प्रेमळ पद्धतीने वागल्यास, त्यांचे वैवाहिक जीवन अवश्‍य यशस्वी होईल आणि दोघांकरता त्यांचा नातेसंबंध आनंददायक ठरेल.

आपल्या स्त्रियांबरोबर सुज्ञतेने सहवास ठेवा

६. पेत्राने पतींना कोणता सल्ला दिला आणि तो महत्त्वाचा का आहे?

प्रेषित पेत्रानेही विवाहित जोडप्यांना मार्गदर्शन दिले; खासकरून पतींना त्याने अतिशय सुस्पष्ट शब्दांत सल्ला दिला. त्याने म्हटले: “पतींनो, तसेच तुम्हीहि आपल्या स्त्रियांबरोबर, त्या अधिक नाजूक व्यक्‍ति आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहा, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.” (१ पेत्र ३:७) पेत्राचा हा सल्ला किती गंभीर आहे हे या वचनाच्या शेवटल्या शब्दांवरून दिसून येते. पतीने आपल्या पत्नीस मान न दिल्यास, यहोवाबरोबरच्या त्याच्या नातेसंबंधावर याचा अनिष्ट परिणाम होईल. त्याच्या प्रार्थनांत व्यत्यय येईल.

७. पतीने पत्नीला मान कसा द्यावा?

पती आपल्या पत्नींना मान कसा देऊ शकतात? पत्नीला मान देण्याचा अर्थ तिच्याशी प्रेमळपणे व आदरपूर्वक वागणे. पत्नीशी अशाप्रकारे वागण्याची कल्पना काहींना त्याकाळी विचित्र वाटली असावी. एक ग्रीक विद्वान म्हणतो: “रोमी कायद्यानुसार स्त्रीला कोणतेही अधिकार नव्हते. कायद्याच्या नजरेत शेवटपर्यंत तिचा दर्जा लहान मुलांइतकाच राहायचा. . . . ती पूर्णपणे आपल्या पतीच्या अधीन आणि पूर्णपणे त्याच्या इच्छेची गुलाम असे.” ख्रिस्ती शिकवणूक यापेक्षा किती वेगळी होती! ख्रिस्ती पती आपल्या पत्नीचा आदर करायचा. तिच्याशी वागताना तो स्वतःच्या इच्छेनुसार नव्हे, तर ख्रिस्ती तत्त्वांनुसार वागायचा. शिवाय तो “सुज्ञतेने” तिच्या इच्छांची दखल घ्यायचा आणि ती एक नाजूक पात्र आहे हे आठवणीत ठेवून तिच्याशी वागायचा.

“नाजूक पात्र” कोणत्या अर्थाने?

८, ९. स्त्रिया कोणत्या अर्थाने पुरुषांच्याच दर्जाच्या आहेत?

स्त्री एक “नाजूक पात्र” आहे असे म्हणताना, पुरुषांपेक्षा स्त्रिया बौद्धिक किंवा आध्यात्मिक दृष्टीने दुर्बल आहेत असे पेत्राचे तात्पर्य नव्हते. अर्थात, ख्रिस्ती पुरुषांजवळ मंडळीत अनेक विशेषाधिकार असतात. यांपैकी बरेच विशेषाधिकार आपल्याला मिळण्याची स्त्रिया अपेक्षा करू शकत नाहीत. तसेच कुटुंबांत स्त्रिया आपल्या पतींच्या अधीन असतात. (१ करिंथकर १४:३५; १ तीमथ्य २:१२) पण तरीसुद्धा, स्त्रिया असोत वा पुरुष, सर्वांकडून त्याच विश्‍वासाची, धीराची आणि उच्च नैतिक दर्जाची अपेक्षा केली जाते. पेत्राने म्हटल्याप्रमाणे, पती व पत्नी दोघेही “जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार” आहेत. तारणाच्या बाबतीत, यहोवा देवाच्या नजरेत ते दोघे सारख्याच स्थितीत आहेत. (गलतीकर ३:२८) पेत्र पहिल्या शतकातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लिहित होता. त्याअर्थी, त्याचे शब्द ख्रिस्ती पतींकरता आठवणीदाखल होते, की “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस” या नात्याने त्यांना व त्यांच्या पत्नींनाही एकच स्वर्गीय आशा होती. (रोमकर ८:१७) पुढे चालून ते दोघेही देवाच्या स्वर्गीय राज्यात राजे व याजक या नात्याने सेवा करणार होते!—प्रकटीकरण ५:१०.

आपल्या अभिषिक्‍त ख्रिस्ती पतींच्या तुलनेत अभिषिक्‍त ख्रिस्ती पत्नींचा दर्जा दुय्यम नव्हता. आणि हेच तत्त्व पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्यांच्या बाबतीतही खरे आहे. ‘मोठ्या लोकसमुदायातील’ पुरुषच नव्हे तर स्त्रिया देखील आपले झगे धुऊन कोकऱ्‍याच्या रक्‍तात शुभ्र करतात. स्त्रीपुरुष दोघेही जागतिक स्तरावर यहोवाची स्तुती करण्यात “अहोरात्र” सहभाग घेतात. (प्रकटीकरण ७:९, १०, १४, १५) पुरुष व स्त्रिया दोघेही “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” मिळण्याची व ‘खऱ्‍या जीवनाचा’ उपभोग घेण्याची आस धरतात. (रोमकर ८:२१; १ तीमथ्य ६:१९) अभिषिक्‍त असोत किंवा दुसऱ्‍या मेंढरांपैकी असोत, सर्व ख्रिस्ती ‘एका मेंढपाळाच्या’ नेतृत्त्वाखाली “एक कळप” या नात्याने यहोवाची सेवा करतात. (योहान १०:१६) ख्रिस्ती पतीने व पत्नीने एकमेकांना मान देण्याचे किती जोरदार कारण आहे!

१०. कोणत्या अर्थाने स्त्रिया ‘नाजूक पात्र’ आहेत?

१० तर मग, स्त्रियांना “नाजूक व्यक्‍ती” का म्हणण्यात आले आहे? कदाचित पेत्राने असे याकरता म्हटले असावे, कारण सर्वसामान्यपणे पाहता स्त्रिया पुरुषांपेक्षा आकाराने लहान असतात आणि त्यांच्याइतकी शक्‍तीही स्त्रियांजवळ नसते. शिवाय, सध्याच्या आपल्या अपरिपूर्ण स्थितीत मातृत्त्वाचा अद्‌भुत अनुभव देखील स्त्रियांना क्लेशदायक ठरतो. मुलांना जन्म देण्याच्या वयात असलेल्या बऱ्‍याच स्त्रियांना नियमितरित्या शारीरिक दुखणी सहन करावी लागतात. ही दुखणी सहन करताना किंवा गर्भारपणाच्या व प्रसूतीच्या शिणवणाऱ्‍या अनुभवातून जाताना निश्‍चितच स्त्रियांची विशेष काळजी घेतली जाण्याची आणि त्यांच्याशी विचारशीलपणे वागण्याची गरज आहे. आपल्या पत्नीला मान देणारा पती तिला लागणाऱ्‍या आधाराची जाणीव ठेवून वागतो आणि अशाप्रकारे यशस्वी वैवाहिक जीवनाला मोलाचा हातभार लावतो.

धार्मिकरित्या विभाजित कुटुंबात

११. पती व पत्नीची धार्मिक मते वेगवेगळी असली तरीसुद्धा वैवाहिक जीवन कोणत्या अर्थाने यशस्वी होऊ शकते?

११ पण समजा विवाहानंतर काही काळाने पती व पत्नी यांपैकी एकाने ख्रिस्ती सत्याचा स्वीकार केला व दुसऱ्‍याने केला नाही तर? पती व पत्नी यांची धार्मिक मते वेगवेगळी असताना त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी होऊ शकते का? होय, बऱ्‍याच जणांच्या अनुभवावरून असे म्हणता येते, की पती-पत्नींची धार्मिक मते वेगवेगळी असूनही त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी होऊ शकते; ते या अर्थाने की विवाहाचे बंधन टिकून राहू शकते आणि दोघांकरता आनंददायक ठरू शकते. शिवाय, धार्मिक मते वेगळी असली तरीही यहोवाच्या नजरेत ते दोघे विवाहित आहेत; अजूनही तो त्यांना “एकदेह” असेच लेखतो. म्हणूनच, विश्‍वासात नसलेला जोडीदार तयार असल्यास ख्रिस्ती जोडीदाराने त्याच्या किंवा तिच्यासोबतच राहावे असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. मुले असल्यास, ख्रिस्ती आई किंवा वडिलांचा विश्‍वासूपणा त्यांच्याकरता हिताचा ठरतो.—१ करिंथकर ७:१२-१४.

१२, १३. पेत्राच्या सल्ल्याचे पालन करून ख्रिस्ती पत्नी विश्‍वासात नसलेल्या आपल्या पतीला कशी मदत करू शकते?

१२ धार्मिकरित्या विभाजित कुटुंबांत राहणाऱ्‍या ख्रिस्ती स्त्रियांना पेत्र प्रेमळपणे सल्ला देतो. त्याच्या शब्दांतून व्यक्‍त होणारे तत्त्व याच परिस्थितीत असणाऱ्‍या ख्रिस्ती पतींनाही लागू होते. पेत्राने लिहिले: “स्त्रियांनो, तुम्हीहि आपआपल्या पतीच्या अधीन असा; ह्‍यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे.”—१ पेत्र ३:१, २.

१३ पतीच्या भावना न दुखावता जर पत्नी त्याला आपल्या विश्‍वासांबद्दल सांगू शकत असेल तर काही हरकत नाही. पण समजा त्याला ऐकण्याची इच्छा नसेल तर? तो त्याचा निर्णय आहे. तरीसुद्धा, आशा सोडून देण्याचे कारण नाही. ख्रिस्ती वर्तनातूनही अतिशय परिणामकारक साक्ष दिली जाऊ शकते. बऱ्‍याच पतींना पूर्वी सत्यात रस नव्हता; बरेचजण तर विरोधही करत होते. पण आपल्या पत्नींचे उत्तम वर्तन पाहिल्यानंतर त्यांनी “सार्वकालिक जीवनाकरता योग्य मनोवृत्ती” दाखवली. (प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW) पतीने ख्रिस्ती सत्याचा स्वीकार केला नाही तरीसुद्धा त्याच्या पत्नीच्या वागणुकीचा त्याच्या मनोवृत्तीवर चांगला परिणाम होऊ शकतो आणि यामुळे त्यांचे वैवाहिक बंधन दृढ होऊ शकते. एक पती ज्याची पत्नी यहोवाच्या साक्षीदारांपैकी आहे, तो कबूल करतो, की मी यहोवाच्या साक्षीदारांच्या उच्च आदर्शांचे कधीही पालन करू शकणार नाही. पण तरीसुद्धा या पतीने एका वृत्तपत्राला लिहिलेल्या पत्रात, आपल्या पत्नीची व तिच्या साक्षीदार बांधवांची प्रामाणिकपणे प्रशंसा केली व म्हटले की “माझ्या सुशील पत्नीसोबत मी पूर्णपणे आनंदी आहे.”

१४. पती, विश्‍वासात नसलेल्या आपल्या पत्नीला कशाप्रकारे मदत करू शकतात?

१४ पेत्राच्या सल्ल्याचे पालन करणाऱ्‍या ख्रिस्ती पतींनीही आपल्या वर्तनाने पत्नीचे मन जिंकल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या पतीला पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारीची जाणीव आली आहे, धूम्रपान, मद्यपान आणि जुगार यांसारख्या गोष्टींसाठी आता तो पैशांचा अपव्यय करत नाही, तसेच आता तो शिविगाळ करत नाही हे पत्नींच्या लक्षात आल्याशिवाय राहात नाही. कधीकधी, विश्‍वासात नसलेल्या पत्नी ख्रिस्ती मंडळीतल्या इतर सदस्यांना भेटतात. ख्रिस्ती बंधूसमाजात, बांधवांचे आपसांतील प्रेमळ संबंध पाहून त्या प्रभावित झाल्या आणि यामुळे यहोवाच्या उपासनेकडे आकर्षित झाल्या.—योहान १३:३४, ३५.

‘अंतःकरणांतील गुप्त मनुष्यपण’

१५, १६. ख्रिस्ती पत्नीच्या कशाप्रकारच्या वर्तनाने तिला विश्‍वासात नसलेल्या आपल्या पतीचे मन जिंकून घेता येईल?

१५ कशाप्रकारच्या वर्तनाने पतीचे मन जिंकून घेता येईल? खरे पाहता हे अशाप्रकारचे वर्तन आहे की जे ख्रिस्ती स्त्रिया स्वाभाविकरित्या विकसित करतात. पेत्र म्हणतो: “तुमची शोभा केसाचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे, किंवा उंची पोषाख करणे ह्‍यात बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतःकरणांतील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी. कारण ह्‍याप्रमाणे पूर्वी, देवावर आशा ठेवणाऱ्‍या पवित्र स्त्रियाहि आपआपल्या पतीच्या अधीन राहून आपणांस शोभवीत असत; जशी सारा अब्राहामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली. तुम्ही चांगले करीत राहिल्यास व कोणत्याहि भयप्रद गोष्टीला न घाबरल्यास, तुम्ही तिची मुले झाला आहा.”—१ पेत्र ३:३-६.

१६ पेत्र असा सल्ला देतो, की ख्रिस्ती स्त्रीने बाह्‍य स्वरूपावर विसंबून राहू नये. उलट, तिच्या आंतरिक व्यक्‍तिमत्त्वावर बायबलच्या शिकवणुकींचा झालेला परिणाम तिच्या पतीला दिसून आला पाहिजे. या नव्या व्यक्‍तिमत्त्वाचे परिणाम त्याला आपल्या पत्नीच्या वागणुकीतून दिसून आले पाहिजेत. कदाचित तो तिच्या वागणुकीची तुलना तिच्या जुन्या व्यक्‍तिमत्त्वाशी करेल. (इफिसकर ४:२२-२४) तिचा “सौम्य व शांत आत्मा” नक्कीच त्याला आनंददायक व आकर्षक वाटेल. तिचा हा स्वभाव तिच्या पतीला तर मोहित करेलच, पण खासकरून तो “देवाच्या दृष्टीने बहुमूल्य” आहे.—कलस्सैकर ३:१२.

१७. सारा हिचे उदाहरण ख्रिस्ती स्त्रियांकरता अनुकरण करण्याजोगे का आहे?

१७ पेत्र साराचे उदाहरण देतो. तिचे उदाहरण सर्व ख्रिस्ती विवाहित स्त्रियांनी अनुकरण करण्याजोगे आहे, मग त्यांचे पती विश्‍वासात असोत वा नसोत. सारा अब्राहामला आपले मस्तक मानत होती हे तर निर्विवाद आहे. मनातल्या मनातही तिने त्याला ‘धनी’ म्हटले. (उत्पत्ति १८:१२) पण यामुळे तिचा दर्जा कमी झाला नाही. तिला स्वतःलाही यहोवावर पूर्ण विश्‍वास होता, त्याअर्थी ती निश्‍चितच आध्यात्मिकरित्या बळकट अशी स्त्री होती. म्हणूनच तर, ज्यांच्या विश्‍वासाने ‘आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावण्यास’ आपली मदत करण्यास हवी, अशा ‘साक्षीरूपी मेघात’ तिचाही समावेश आहे. (इब्री ११:११; १२:१) साराचे अनुकरण केल्यामुळे कोणत्याही ख्रिस्ती पत्नीचा मान कमी होत नाही.

१८. धार्मिकरित्या विभाजित कुटुंबात कोणत्या तत्त्वांचे पालन केले जावे?

१८ धार्मिकरित्या विभाजित कुटुंबातही पती हाच मस्तकपदी असतो. जर तो स्वतः विश्‍वासात असेल तर त्याने आपल्या विश्‍वासांविषयी हातमिळवणी न करता आपल्या पत्नीच्या विश्‍वासांबद्दल समजूतदार मनोवृत्ती बाळगावी. जर पत्नी विश्‍वासात असेल तर तिनेही आपल्या विश्‍वासाविषयी तडजोड करू नये. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) पण तरीसुद्धा तिने आपल्या पतीच्या मस्तकपदाला आव्हान देऊ नये. तिने त्याच्या अधिकाराला मान द्यावा आणि आपल्या ‘नवऱ्‍याच्या नियमाच्या’ अधीन राहावे.—रोमकर ७:२, पं.र.भा.

बायबलमधील सुज्ञ मार्गदर्शन

१९. कोणत्या काही गोष्टींमुळे वैवाहिक संबंधांत ताणतणाव उत्पन्‍न होऊ शकतात पण या दबावांना कशाप्रकारे तोंड देता येईल?

१९ आज अनेक गोष्टींमुळे वैवाहिक जीवनात तणाव उत्पन्‍न होऊ शकतो. काही पुरुष आपल्या जबाबदाऱ्‍या गांभीर्याने घेत नाहीत. तर काही स्त्रिया आपल्या पतीच्या मस्तकपदाचा स्वीकार करायला तयार नसतात. काही विवाहांत एक जोडीदार दुसऱ्‍याशी दुर्व्यवहार करतो. शिवाय, आर्थिक ताणतणाव, मानवी अपरिपूर्णता, आणि चांगल्यावाईटासंबंधी विकृत दृष्टिकोन असलेल्या या अनैतिक जगाचा आत्मा ख्रिस्ती व्यक्‍तीच्या एकनिष्ठतेची परीक्षा पाहतो. तरीपण बायबलच्या तत्त्वांचे पालन करणारे ख्रिस्ती स्त्रीपुरुष, मग ते कोणत्याही परिस्थितीत असले तरीसुद्धा, त्यांना यहोवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. पती व पत्नी यांपैकी केवळ एकानेच बायबल तत्त्वांचे पालन केले तरीपण, दोघांनीही ते न करण्यापेक्षा हे चांगले आहे. शिवाय, विवाहाच्या वेळी घेतलेली शपथ कठीण परिस्थितीतही जे विश्‍वासूपणे पूर्ण करतात ते यहोवाचे सेवक त्याला प्रिय आहेत व तो त्यांना आधार देतो. त्यांची एकनिष्ठता तो कधीही विसरत नाही.—स्तोत्र १८:२५; इब्री लोकांस ६:१०; १ पेत्र ३:१२.

२०. पेत्र सर्व ख्रिश्‍चनांना कोणता सल्ला देतो?

२० विवाहित स्त्रीपुरुषांना सल्ला दिल्यानंतर पेत्राने शेवटी प्रेमळ प्रोत्साहनाचे दोन शब्द लिहिले. तो म्हणाला: “शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा; वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका; तर उलट आशीर्वाद द्या; कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे.” (१ पेत्र ३:८, ९) हा तर सर्वांसाठीच अतिशय सुज्ञ सल्ला आहे, विशेषतः विवाहित जोडप्यांसाठी!

तुम्हाला आठवते का?

• ख्रिस्ती पती येशूचे अनुकरण कशाप्रकारे करतात?

• ख्रिस्ती पत्नी मंडळीचे अनुकरण कसे करतात?

• पती आपल्या पत्नींना मान कसा देऊ शकतात?

• ज्या ख्रिस्ती पत्नीचा पती विश्‍वासात नाही तिच्याकरता सर्वात उत्तम मार्ग कोणता?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती पती आपल्या पत्नीवर प्रेम करतो व तिचा संभाळ करतो

ख्रिस्ती पत्नी आपल्या पतीचा आदर करते व त्याला मान देते

[१७ पानांवरील चित्र]

रोमी कायद्याच्या विपरीत, ख्रिस्ती शिकवणुकीनुसार पतीने आपल्या पत्नीला मान द्यावा असे सांगण्यात आले होते

[१८ पानांवरील चित्र]

‘मोठ्या लोकसमुदायाचे’ स्त्री व पुरुष दोघेही परादीस पृथ्वीवर जीवनाचा आनंद लुटण्याची आस धरतात

[२० पानांवरील चित्र]

साराने अब्राहामला धनी म्हणून मानले