शब्दयुद्धे—घातक का असतात?
शब्दयुद्धे—घातक का असतात?
“तुम्हांमध्ये लढाया व भांडणे कशांतून उत्पन्न होतात?”—याकोब ४:१.
बायबल लेखक याकोब याने हा प्रश्न, त्याकाळच्या अजिंक्य रोमी सैन्यातील सैनिकांना विचारला नव्हता. किंवा सा.यु. पहिल्या शतका—तील यहुदी सिकाराय अर्थात खंजीरधारी गनिमी लढवय्यांच्या लढायांमागचा उद्देश शोधून काढण्याचा प्रयत्न तो करत नव्हता. याकोब अशा भांडणांविषयी बोलत होता की जी सहसा दोन व्यक्तींमध्ये होतात. का? कारण युद्धांसारखेच हे व्यक्तिगत मतभेद देखील नाशकारक असतात. बायबलमधील खालील अहवाल लक्षात घ्या.
प्राचीन काळातील कुटुंबप्रमुख याकोब याचे पुत्र आपला भाऊ योसेफ याचा इतका द्वेष करत होते की शेवटी त्यांनी त्याला गुलाम म्हणून विकले. (उत्पत्ति ३७:४-२८) नंतर, इस्राएलचा राजा शौल याने दाविदाचा घात करण्याचा प्रयत्न केला. का? कारण त्याला दाविदाचा हेवा वाटे. (१ शमुवेल १८:७-११; २३:१४, १५) पहिल्या शतकात, युवदिया व सुंतुखे या दोन ख्रिस्ती स्त्रियांनी आपल्या वादविवादांमुळे सबंध मंडळीची शांती भंग केली.—फिलिप्पैकर ४:२.
अलिकडच्या इतिहासात, लोकांनी आपले मतभेद तरवारी किंवा बंदुकींच्या साहाय्याने द्वंद्वयुद्धे करून सोडवण्यास सुरुवात केली. कित्येकदा या द्वंद्वयुद्धांत भाग घेणाऱ्यांपैकी एकजण एकतर मारला जायचा किंवा त्याला कायमचे अपंगत्व यायचे. आजच्या काळात जे एकमेकांशी लढतात, ते सहसा शस्त्रांऐवजी दुष्टभावाने बोललेल्या, खोचक शब्दांचा वापर करतात. या लढायांत रक्त सांडले जाणार नाही, पण हे शाब्दिक हल्ले लोकांच्या भावनांना दुखावतात व त्यांची प्रतिष्ठा नष्ट करतात. सहसा या “युद्धांत” निर्दोष व्यक्तींचे नुकसान होते.
काही वर्षांपूर्वी, एका अँग्लिकन पाळकाने दुसऱ्या पाळकावर चर्चच्या आर्थिक उत्पन्नाचा गैरवापर करण्याचा आरोप लावला तेव्हा काय घडले हे लक्षात घ्या. त्यांचे भांडण चव्हाट्यावर आले आणि ते ज्या मंडळीची सेवा करत होते तिच्यात फुटी पडल्या. काही सदस्यांनी असे जाहीर केले की ज्याच्या विरोधात ते होते, तो सेवक जर उपदेश देणार असेल तर आपण चर्चला येणारच नाही. एकमेकांविषयी त्यांचा द्वेष इतका वाढला की चर्चमध्ये उपासनेकरता एकत्र आल्यावरही ते एकमेकांकडे पाठ फिरवायचे. काही काळाने, या आरोप लावणाऱ्या पाळकावरच जेव्हा लैंगिक दुराचरणाचा आरोप लावण्यात आला तेव्हा प्रकरण आणखीनच चिघळले.
कॅन्टरबरीच्या आर्चबिशपने या दोन्ही पाळकांना आपले
मतभेद विसरून जाण्याची विनंती केली. त्यांच्या भांडणाला ‘कर्करोगाची’ उपमा देऊन आर्चबिशपने म्हटले की ‘हे निंद्य प्रकरण प्रभूच्या नावावर एक कलंक’ आहे. १९९७ साली दोघांपैकी एक पाळक निवृत्त होण्यास तयार झाला. दुसरा मात्र निवृत्तीचे वय होईपर्यंत आपले पद सोडायला तयार झाला नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याने आपली खुर्ची सोडली नाही. ऑगस्ट ७, २००१ रोजी आपल्या ७० व्या वाढदिवशी शेवटी त्याने निवृत्ती स्वीकारली. या पाळकाच्या निवृत्तीच्या दिवशी “संत” व्हिक्ट्रिशियसचा उत्सवदिन असल्याचा द चर्च ऑफ इंग्लंड न्यूजपेपरने उल्लेख केला. हा “संत” व्हिक्ट्रिशियस कोण होता? तर तो चवथ्या शतकातील एक बिशप होता व त्याने लढाईत भाग घेण्यास नकार दिल्यामुळे त्याला चाबकाने फटके मारण्यात आले असे म्हणतात. वृत्तपत्राने पाळकाच्या व संत व्हिक्ट्रिशियसच्या मनोवृत्तींतला फरक दाखवून म्हटले: “चर्चच्या संघर्षात भाग घेण्यास नकार देण्याची [निवृत्त होत असलेल्या पाळकाची] वृत्ती मुळीच नव्हती.”या पाळकांनी जर रोमकर १२:१७, १८ यातील सल्ल्याचे पालन केले असते, तर स्वतःला व इतरांनाही झालेले बरेच नुकसान ते टाळू शकले असते. या वचनांत असे म्हटले आहे: “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.”
तुम्ही काय केले असते? एखाद्या व्यक्तीने तुमच्या भावना दुखावल्यास तुम्ही राग अनावर होऊन भांडण करण्यास प्रवृत्त होता का? की कठोर शब्द टाळण्याद्वारे, भविष्यात समेट करण्याची तुम्ही तयारी दर्शवता? जेव्हा तुम्ही स्वतः कोणाच्या भावना दुखावता तेव्हा तुम्ही काय करता? काही दिवसांनी आपोआपच विसर पडेल असे समजून तुम्ही त्या व्यक्तीला टाळता का? की तुम्ही लगेच क्षमा मागता? स्वतः क्षमा मागण्याद्वारे असो, किंवा इतरांना क्षमा करण्याद्वारे असो, समेट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे नेहमी तुमचेच भले होईल. बायबलमधील सल्ला आपल्याला अगदी जुने मतभेदही मिटवण्यास मदत करतो. याविषयीच पुढील लेखात चर्चा केली आहे.