व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

समेट करणे हितावह का आहे

समेट करणे हितावह का आहे

समेट करणे हितावह का आहे

एड्‌ आपल्या जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत होता. पण बिलला त्याचे तोंडही पाहायचे नव्हते. वीस वर्षांआधी एड्‌ने घेतलेल्या एका निर्णयामुळे बिलला आपली नोकरी गमवावी लागली होती आणि तेव्हापासून एकेकाळी जिवाभावाचे मित्र असलेले हे दोघे कायमचे दुरावले होते. एड्‌ आता क्षमा मागू इच्छित होता. बिलने क्षमा केल्यास आपण सुखाने मरू असे त्याला वाटत होते. पण बिल मात्र काहीएक ऐकण्यास तयार नव्हता.

या घटनेला ३० वर्षे उलटल्यानंतर जेव्हा बिलचा मृत्यू जवळ आला होता, तेव्हा त्याने सांगितले की आपण एड्‌ला का क्षमा केली नाही. “एड्‌ने मला, आपल्या सर्वात चांगल्या दोस्ताला जी वागणूक दिली ती त्याला शोभली नाही. शिवाय, त्या घटनेला वीस वर्षे होऊन गेल्यानंतर समेट करून काय उपयोग होता? . . . कदाचित माझं चुकलंही असेल, पण काय करायचं, मला तेच योग्य वाटलं.” *

दोन व्यक्‍तींमधील मतभेदांचे नेहमीच अशा शोकांतिकेत रूपांतर होत नाही; पण सहसा यांमुळे लोकांची मने दुखावली जातात आणि आयुष्यभर ते एकमेकांबद्दल कलुषित भावना बाळगतात. एड्‌ याच्यासारखा विचार करणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीचे उदाहरण घ्या. आपल्या निर्णयामुळे झालेल्या नुकसानीच्या जाणिवेने ही व्यक्‍ती आयुष्यभर याविषयीची दोषभावना व खंत मनात बाळगू शकते. आणि त्याचवेळेस, आपल्या वागण्यामुळे दुखावलेल्या मित्राने आपली मैत्री किती क्षुल्लक लेखली, किती सहजपणे ती तोडून टाकली ही भावनाही त्या व्यक्‍तीच्या मनात खुपत राहते.

पण बिलसारखा विचार करणारी व्यक्‍ती स्वतःला निर्दोष सावज समजत असते. आपल्यावर झालेल्या अन्यायामुळे तिच्या मनात कटुपणा आणि संताप धगधगत असतो. आपल्या मित्राने जाणूनबुजून आपले नुकसान केले आहे असे तिला वाटत असते. सहसा दोन व्यक्‍तींमध्ये मतभेद असतो तेव्हा दोन्ही व्यक्‍तींना आपण निर्दोष आहोत आणि दुसऱ्‍याचाच सगळा दोष आहे असे वाटत असते. त्यामुळे एकेकाळी मित्र असलेल्या दोन व्यक्‍ती अक्षरशः एकमेकांच्या वैरी बनतात.

आणि मग त्यांच्यात सुरू होते एक युद्ध. या युद्धात, मौनपणा हेच त्यांचे शस्त्र असते. एकजण समोरून येताना दिसला की दुसरा लगेच आपली मान वळवतो; एखाद्या सामाजिक प्रसंगी गाठ पडलीच तर ते एकमेकांकडे सपशेल दुर्लक्ष करतात. अधूनमधून ते एकतर चोरून एकमेकांकडे पाहतात, किंवा नजरानजर झालीच तर द्वेषपूर्ण भावाने एकमेकांकडे एकटक पाहात राहतात. कधी एकमेकांशी बोललेच तरी अगदी तुटकपणे किंवा तिरस्काराने बोलून ते एकमेकांवर वार करतात.

वरवर पाहिल्यास, या दोन व्यक्‍तींचे एकमेकांशी जराही पटत नसले तरीही, काही गोष्टी कदाचित ते दोघेही मान्य करत असतील. आपल्यामध्ये गंभीर समस्या आहेत आणि इतक्या जवळच्या मित्राशी नाते तुटल्यावर खूप वाईट वाटते हे कदाचित ते दोघेही कबूल करत असतील. झालेल्या जखमेच्या वेदना दोघांनाही जाणवतात आणि ही जखम भरून निघावी म्हणून काहीतरी केले पाहिजे हे दोघांनाही कळते. पण बिघडलेला नातेसंबंध पुन्हा जोडून समेट करण्यासाठी पहिले पाऊल कोण उचलणार? दोघेही हे करायला तयार नसतात.

दोन हजार वर्षांपूर्वी, येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांमध्ये कधीकधी जोरदार वादविवाद व्हायचे. (मार्क १०:३५-४१; लूक ९:४६; २२:२४) एकदा त्यांच्यात असेच भांडण झाल्यानंतर येशूने त्यांना विचारले: “तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता?” शरमेने ते सगळे शांत राहिले, एकानेही उत्तर दिले नाही. (मार्क ९:३३, ३४) पण येशूच्या शिकवणुकींनी त्यांना एकमेकांशी समेट करण्यास साहाय्य केले. येशूचे व त्याच्या काही शिष्यांचे मार्गदर्शन आजही बऱ्‍याच लोकांना आपसांतील मतभेद मिटवण्यास व तुटलेली नाती पुन्हा जोडण्यास मदत करतात. कसे, ते आता आपण पाहुया.

समेट करण्याकरता यत्न करा

“मला तिच्याशी बोलायचेच नाही. मी पुन्हा कधी तिचं तोंडही पाहणार नाही.” जर तुम्ही कोणाबद्दल असे उद्‌गार काढले असतील तर खाली दिलेल्या बायबलमधील उताऱ्‍यांनुसार, तुम्ही लवकर काहीतरी केले पाहिजे.

येशूने शिकवले: “तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर.” (मत्तय ५:२३, २४) त्याने असेही म्हटले: “तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखीव.” (मत्तय १८:१५) तुम्ही स्वतः कोणाच्या भावना दुखावल्या असोत, किंवा दुसऱ्‍या व्यक्‍तीने तुमच्या भावना दुखावल्या असोत, येशू स्पष्टपणे सांगतो की या दोन्ही परिस्थितीत तुम्ही त्या व्यक्‍तीसोबत या विषयावर लवकरात लवकर बोलणे महत्त्वाचे आहे. आणि हे संभाषण तुम्ही “सौम्य वृत्तीने” केले पाहिजे. (गलतीकर ६:१) या संभाषणाचा उद्देश, काहीतरी निमित्त सांगून किंवा आपल्या विरुद्ध असणाऱ्‍या व्यक्‍तीला कसेही करून माफी मागायला लावून लोकांपुढे आपली चांगली प्रतिमा कायम ठेवण्याचा नसून, समेट करण्याचा आहे. बायबलमध्ये दिलेले हे मार्गदर्शन प्रत्यक्षात लागू केल्यास ते परिणामकारक ठरते का?

अर्नेस्ट हे एका मोठ्या कार्यालयात वरिष्ठ अधिकारी आहेत. * कित्येक वर्षापासून त्यांना आपल्या कामांतर्गत सर्व प्रकारच्या व्यक्‍तींशी संबंधित असलेली बरीच नाजूक प्रकरणे हाताळावी लागली आहेत; त्यांना सर्वांसोबत खेळीमेळीचे संबंध कायम ठेवावे लागतात. दोन व्यक्‍तींमध्ये किती सहज मतभेद निर्माण होऊ शकतात हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे. ते म्हणतात: “कधीकधी माझे इतरांसोबत वाद होतात. पण मी त्या व्यक्‍तीसोबत बसून समस्येविषयी चर्चा करतो. सरळ त्या व्यक्‍तीकडेच जातो आणि समेट करण्याच्या उद्देशाने समोरासमोर त्यांच्याशी बोलतो. ही पद्धत कधीही निकामी ठरत नाही.”

अलीस्या हिचे अनेक वेगवेगळ्या संस्कृतींतील मित्रमैत्रिणी आहेत. ती म्हणते: “कधीकधी नकळत काहीतरी बोलून गेल्यावर मला जाणीव होते की कदाचित माझ्या बोलण्याने एखाद्या व्यक्‍तीच्या भावना दुखावल्या असतील. मग मी लगेच जाऊन त्या व्यक्‍तीला माफी मागते. कदाचित मी जरा जास्तच वेळा लोकांना क्षमा मागत असेन. पण जरी एखाद्या व्यक्‍तीला वाईट वाटले नसेल तरीसुद्धा मला माफी मागितल्याने बरे वाटते. आमच्यामध्ये काहीही गैरसमज नाहीत याची निदान यामुळे खात्री पटते.”

मार्गातील काही अडथळे दूर करणे

पण दोन व्यक्‍तींमधील मतभेद मिटवून समेट करण्याच्या मार्गात अनेक अडथळे असू शकतात. “मी समेट करण्यासाठी पुढाकार का घ्यावा? दोष तर त्याचा होता,” असा कधी तुम्ही विचार केला आहे का? किंवा तुम्ही मतभेद मिटवायला त्या व्यक्‍तीकडे जाता पण ती व्यक्‍ती म्हणते: “मला याविषयावर बोलायचेच नाही?” काहीजण अशाप्रकारे उत्तर देतात कारण त्यांच्या भावना दुखावलेल्या असतात. नीतिसूत्रे १८:१९ म्हणते: “दुखविलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे; कलह म्हटले म्हणजे ते दुर्गाच्या अडसरांसारखे होत.” तेव्हा दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या भावनांचा विचार करा. जर त्या व्यक्‍तीने तुमच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही तर, काही काळ थांबून पुन्हा प्रयत्न करा. तेव्हा कदाचित या ‘मजबूत शहराची’ दारे उघडी असतील आणि समेट करण्याच्या मार्गातील ‘अडसर’ दूर करता येण्यासारखा असेल.

समेट करण्याच्या मार्गात आणखी एक अडथळा म्हणजे व्यक्‍तीचा स्वाभिमान. काही लोकांना ज्याच्याशी आपले मतभेद आहेत त्याला क्षमा मागणे, किंबहुना त्याच्याशी बोलणे देखील कमीपणाचे वाटते. स्वाभिमानाची जाणीव असणे वाईट नाही, पण समेट करण्यास नकार दिल्यामुळे तुम्हाला काय वाटते, एका व्यक्‍तीचा स्वाभिमान वाढेल की आणखी कमी होईल? स्वाभिमान जपणारी ही व्यक्‍ती कदाचित आपल्या अहंकाराला तर गोंजारत नसेल?

बायबल लेखक याकोब स्पष्ट करतो की भांडखोर प्रवृत्तीचा अहंकाराशी संबंध आहे. काही ख्रिस्ती आपसांत करत असलेल्या “लढाया” व “भांडणे” यांविषयी पर्दाफाश केल्यावर तो पुढे म्हणतो: “देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.” (याकोब ४:१-३,) गर्विष्ठपणा, किंवा अहंकार समेट करण्याच्या मार्गात अडसर कशाप्रकारे बनतो?

गर्विष्ठपणा एका व्यक्‍तीची फसवणूक करतो, तिला असे वाटायला लावतो की आपण इतरांपेक्षा चांगले आहोत. अहंकारी व्यक्‍तीला वाटते की इतरजण चांगले आहेत की वाईट हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार आहे. तो कसा? तर मतभेद होतात, तेव्हा अहंकारी व्यक्‍ती आपल्या प्रतिपक्षी व्यक्‍तीबद्दल असा निष्कर्ष काढते की ही व्यक्‍ती कधीच कोणत्याही प्रकारे सुधारणा करू शकत नाही. अहंकारामुळे काहीजण आपल्यापेक्षा वेगळे मत असलेल्या व्यक्‍तीला मनापासून क्षमा मागणे तर दूरच पण त्यांच्याकडे लक्ष देण्यासही तयार नसतात. अशारितीने, अहंकाराने पछाडलेली व्यक्‍ती समस्येचे योग्य पद्धतीने निवारण करण्याऐवजी सहसा आपसातले मतभेद तसेच राहू देते.

रस्त्यावर लावलेल्या प्रतिबंधामुळे ज्याप्रकारे वाहतूक रोखली जाते, त्याचप्रकारे गर्विष्ठपणा समेट करण्याच्या दिशेने पावले उचलण्याकरता एक मोठा अडथळा बनतो. तेव्हा, जर एखाद्या व्यक्‍तीशी समेट करण्यास तुम्ही नकार देत असाल तर कदाचित तुमच्याही मार्गात अहंकार एक अडथळा बनत असल्याची शक्यता आहे. या अहंकारावर तुम्ही कशी मात करू शकता? त्याच्या विरोधात असलेला गुण—अर्थात नम्रता स्वतःच्या व्यक्‍तिमत्त्वात उत्पन्‍न करून.

अगदी उलट करा

बायबलमध्ये नम्रता या गुणाची शिफारस केली आहे. “नम्रता व परमेश्‍वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय.” (नीतिसूत्रे २२:४) स्तोत्र १३८:६ येथे नम्र व्यक्‍तींबद्दल आणि त्याउलट गर्विष्ठ व्यक्‍तींबद्दल देवाचा कसा दृष्टिकोन आहे याविषयी आपण वाचतो: “परमेश्‍वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो; पण गर्विष्ठाला दुरून ओळखितो.”

अनेकजण असे समजतात की नम्रता म्हणजे नमवले जाणे, किंवा आपली मानखंडना होणे. जगातल्या शासकांची तर हीच वृत्ती दिसून येते. सबंध राष्ट्रे त्यांच्या इशाऱ्‍यांप्रमाणे वागतात, तरीसुद्धा राजकीय पुढारी नम्रपणे स्वतःच्या चुका कबूल करण्याचे धैर्य करत नाहीत. एखाद्या शासकाने “माझ्याकडून चूक झाली” असे म्हणताच ही एक सनसनाटी बातमी बनते. अलीकडेच एका भूतपूर्व सरकारी अधिकाऱ्‍याने एका घातक विपत्तीसंबंधी आपल्याकडून झालेल्या चुकीविषयी क्षमा मागितली तेव्हा त्याचे शब्द वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरांत छापून आले.

एका शब्दकोशात नम्रतेची व्याख्या, “नम्र असण्याचा गुण किंवा स्वतःविषयी निरभिमानी दृष्टिकोन असणे . . . गर्विष्ठपणा किंवा अहंकार याच्या उलट असलेला गुण” या शब्दांत केली आहे. त्याअर्थी, एका व्यक्‍तीबद्दल लोकांचा नव्हे, तर तिचा स्वतःचा कसा दृष्टिकोन आहे यावरून तिची नम्रता दिसून येते. नम्रपणे आपल्या चुका कबूल केल्याने आणि त्यांबद्दल क्षमा मागितल्याने माणसाची मानखंडना होत नाही; उलट यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढते. बायबल म्हणते: “नाशापूर्वी मनुष्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते; आधी नम्रता मग मान्यता.”—नीतिसूत्रे १८:१२.

आपल्या चुकांची कबूली न देणाऱ्‍या राजकीय पुढाऱ्‍यांच्या संदर्भात एकाने असे निरीक्षण केले: “दुर्दैवाने, त्यांना असे वाटते, की कबूली देणे हे दुर्बलतेचे चिन्ह आहे. पण खरे पाहता, दुर्बल व कमजोर व्यक्‍तिमत्त्वाचे लोक क्वचितच ‘मला माफ करा,’ असे म्हणतात. ‘माझ्याकडून चूक झाली’ असे म्हणायला ज्यांना कमीपणा वाटत नाही ते मोठ्या मनाचे व धैर्यवान असतात.” हे केवळ राजकीय सत्ता असलेल्यांच्याच बाबतीत खरे नाही. जर तुम्ही अहंकाराऐवजी आपल्या व्यक्‍तिमत्त्वात नम्रता उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न केला तर मतभेद झाल्यावर समेट करणे तुम्हाला सोपे जाईल. एका कुटुंबाला कशाप्रकारे याची प्रचिती झाली ते पाहा.

जूली व तिचा भाऊ विल्यम यांच्यात काहीतरी गैरसमज झाल्यामुळे त्यांच्यात वितुष्ट आले. विल्यमला जूली व तिचा पती जोसफ यांचा इतका राग आला की त्याने त्यांच्यासोबत संबंधच तोडून टाकले. जूली व जोसफ यांनी आतापर्यंत विल्यमला ज्या काही भेटवस्तू दिल्या होत्या त्या देखील विल्यमने परत केल्या. अशारितीने, हे बहीण भाऊ ज्यांच्यात पूर्वी अगदी घनिष्ठ संबंध होते, ते आता एकमेकांचा द्वेष करू लागले.

पण जोसफने मत्तय ५:२३, २४ या वचनांचे पालन करायचे ठरवले. त्याने सौम्य वृत्तीने आपल्या मेव्हण्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; तसेच त्याच्या भावना दुखावल्याबद्दल क्षमा मागण्याकरता त्याने स्वतः त्याला अनेकदा पत्र लिहिले. जोसफने आपल्या पत्नीलाही तिच्या भावाला क्षमा करण्याचे प्रोत्साहन दिले. काही काळाने, विल्यमला जाणवले की जूली व जोसफ यांना खरोखरच समेट करण्याची इच्छा आहे आणि हळूहळू त्याचा राग मंदावला. विल्यम व त्याची पत्नी, जूली व जोसफ यांना भेटण्यास आले; त्या सर्वांनी एकमेकांची क्षमा मागितली, एकमेकांच्या गळ्यात पडले आणि अशारितीने त्यांचे संबंध पूर्ववत झाले.

तुम्हाला जर कोणासोबत झालेले मतभेद सोडवण्याची इच्छा असेल, तर धीराने बायबलमधील शिकवणुकींचे पालन करा आणि त्या व्यक्‍तीसोबत समेट करण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करा. यहोवा तुम्हाला याकरता साहाय्य करेल. प्राचीन इस्राएलास देवाने जे म्हटले होते ते तुमच्या बाबतीतही खरे ठरेल: ‘तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकल्यास तुझी शांति नदीसारखी झाली असती.’—यशया ४८:१८.

[तळटीपा]

^ परि. 3 स्टॅन्ली क्लाउड व लिन ऑल्सन यांनी लिहिलेल्या द मरो बॉइझ—पायनियर्स ऑन द फ्रंट लाईन्स ऑफ ब्रॉडकास्ट जर्नलिझम या पुस्तकावर आधारित.

^ परि. 12 काही नावे बदलण्यात आली आहेत.

[७ पानांवरील चित्रे]

क्षमा मागितल्याने बिघडलेले संबंध सहसा पूर्ववत होतात