व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आईवडिलांनो, देवाने दिलेल्या मोलाच्या संपत्तीचे संरक्षण करा

आईवडिलांनो, देवाने दिलेल्या मोलाच्या संपत्तीचे संरक्षण करा

आईवडिलांनो, देवाने दिलेल्या मोलाच्या संपत्तीचे संरक्षण करा

“ज्ञान आश्रय देणारे आहे . . . ज्याच्यापाशी शहाणपण [“बुद्धी,” Nw] असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करिते.”उपदेशक ७:१२.

१. आईवडिलांनी आपल्या मुलांना देणगी का समजावे?

आईवडील एका नव्या सजीव व्यक्‍तीला या जगात आणतात. या नव्या व्यक्‍तीत त्यांच्यासारखेच मिळतेजुळते गुण असतात. बायबल या लहान मुलांना “परमेश्‍वराने दिलेले धन” म्हणते. (स्तोत्र १२७:३) खरा जीवनदाता यहोवाच आहे; त्याअर्थी तो आईवडिलांवर आपल्या मालकीचे काहीतरी सोपवत असतो. (स्तोत्र ३६:९) आईवडिलांनो, देवाकडून ही मौल्यवान देणगी मिळाल्याबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे?

२. आपण पिता बनणार आहोत हे समजले तेव्हा मानोहाची काय प्रतिक्रिया होती?

निश्‍चितच इतक्या मौल्यवान देणगीचा अत्यंत नम्रतेने व कृतज्ञतेने स्वीकार केला जावा. ३,००० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी मानोहा नावाच्या एका इस्राएली माणसाच्या पत्नीला जेव्हा एका देवदूताने सांगितले की तुला मूल होणार आहे, तेव्हा त्याची हीच प्रतिक्रिया होती. ही चांगली बातमी ऐकल्यावर मानोहाने अशी प्रार्थना केली: “हे प्रभू, जो देवमाणूस तू आमच्याकडे पाठविला होतास त्याने पुन्हा आमच्याकडे यावे आणि जन्मास येणाऱ्‍या मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे हे त्याने आम्हाला शिकवावे असे कर, अशी माझी तुला प्रार्थना आहे.” (शास्ते १३:८) आईवडिलांनो, मानोहाच्या उदाहरणावरून तुम्ही काय शिकू शकता?

देवाच्या मदतीची आज गरज का आहे

३. मुलांचे संगोपन करण्यात देवाच्या मदतीची आज खास गरज का आहे?

आजच्या काळात मुलांचे संगोपन करण्याकरता पालकांना यहोवाच्या मदतीची पूर्वी कधी नव्हती इतकी गरज आहे. का? कारण दियाबल सैतान व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून खाली पृथ्वीवर टाकण्यात आले आहे. बायबल इशारा देते: “पृथ्वी व समुद्र ह्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हांकडे आला आहे.” (प्रकटीकरण १२:७-९, १२) बायबल खुलासा करते की सैतान एका “गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” (१ पेत्र ५:८) सिंह सहसा सर्वात कमजोर, लहान पिलांची शिकार करतात. तेव्हा सुज्ञ ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांचे संरक्षण करण्याकरता यहोवाचे मार्गदर्शन स्वीकारावे. तुम्ही असे करण्याचा कितपत प्रयत्न करत आहात?

४. (क) आपल्या परिसरात एक सिंह मोकळा फिरत आहे हे कळल्यावर आईवडिलांची प्रतिक्रिया काय असावी? (ख) संरक्षणाकरता मुलांना कशाची गरज आहे?

तुमच्या परिसरात एक सिंह मोकळा फिरत आहे असे तुम्हाला कळाल्यावर निश्‍चितच तुम्ही आपल्या मुलांचे संरक्षण करण्याचा सर्वप्रथम विचार केला असता. सैतान देखील एक भक्षक प्राणी आहे. तो देवाच्या लोकांना भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांनी देवाच्या नजरेतून पडावे. (ईयोब २:१-७; १ योहान ५:१९) मुले अगदी सहजगत्या त्याला बळी पडू शकतात. दियाबलाचे पाश टाळण्याकरता मुलांनी यहोवाला जाणून घेतले पाहिजे आणि त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. बायबलचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. येशूने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) शिवाय, लहान मुलांना बुद्धीची—अर्थात शिकलेल्या गोष्टी समजून त्यांचे पालन करण्याच्या क्षमतेची गरज आहे. “ज्याच्यापाशी शहाणपण [“बुद्धी,” NW] असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करिते.” तेव्हा पालकांनो, तुम्ही आपल्या मुलांच्या मनावर सत्य ठसवले पाहिजे. (उपदेशक ७:१२) हे तुम्हाला कसे करता येईल?

५. (क) मुलांना बुद्धी संपादन करण्यास साहाय्य कसे केले जाऊ शकते? (ख) नीतिसूत्रे यात बुद्धीच्या महत्त्वाचे कशाप्रकारे वर्णन केले आहे?

तुम्ही आपल्या मुलांना देवाच्या वचनातून वाचून दाखवू शकता. किंबहुना, तुम्ही असे केलेच पाहिजे. पण यहोवावर प्रेम करण्यास व त्याच्या आज्ञा पाळण्यास त्यांना शिकवण्याकरता इतकेच पुरेसे नाही. मुलांना समजावून सांगणेही गरजेचे आहे. उदाहरणार्थ, रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहिल्याशिवाय रस्ता ओलांडायचा नाही असे आपण मुलांना सांगतो. पण काही मुले असे करत नाहीत. का? कारण असे केल्यामुळे काय होऊ शकते, आपण वेगाने येणाऱ्‍या एखाद्या कारच्या खाली येऊ शकतो हे कदाचित त्याला वारंवार समजावून सांगण्यात आलेले नसेल; किंवा असा “मूर्खपणा” करणे किती धोकेदायक आहे, यामुळे दुर्घटना होऊ शकते याची त्याच्या मनावर छाप पडेल अशारितीने त्याला समजावून सांगितले नसेल. एखाद्याला बुद्धी संपादन करण्यास मदत करण्याकरता बराच वेळ खर्च करण्याची व धीर धरण्याची गरज आहे. पण बुद्धी किती मौल्यवान आहे! बायबल म्हणते: ‘तिचे मार्ग आनंदाचे आहेत; तिच्या सर्व वाटा शांतीमय आहेत. जे तिला धरून राहतात त्यांस ती जीवनवृक्षरूप आहे; जो कोणी ती राखून ठेवितो तो धन्य होय.’—नीतिसूत्रे ३:१३-१८; २२:१५.

बुद्धी संपादन करण्यास मदत करणारे शिक्षण

६. (क) मुले सहसा चुका का करतात? (ख) कोणता संघर्ष सुरू आहे?

बरेचदा लहान मुले चुका करतात. त्यांना योग्य काय याविषयी शिकवलेले नसते म्हणून ते या चुका करत नाहीत, तर जे शिकवले ते त्यांच्या मनापर्यंत, अंतःकरणापर्यंत पोचलेले नसते त्यामुळे ते या चुका करतात. दियाबल या लहान मुलांची अंतःकरणे काबीज करण्यासाठी संघर्ष करत आहे. तो त्यांना या जगाच्या अधार्मिक प्रभावांच्या संपर्कात आणतो. तसेच वाईट गोष्टी करण्याच्या त्यांच्या उपजत पापी प्रवृत्तीचा फायदा घेण्याचा तो प्रयत्न करतो. (उत्पत्ति ८:२१; स्तोत्र ५१:५) मुलांच्या हृदयावर नियंत्रण मिळवण्याकरता खरोखर एक संघर्ष चालला आहे हे आईवडिलांनी ओळखले पाहिजे.

७. योग्य काय किंवा अयोग्य काय, केवळ एवढेच मुलांना सांगणे पुरेसे का नाही?

आईवडील सहसा आपल्या मुलांना काय योग्य व काय अयोग्य आहे हे सांगतात. आणि हे सांगितल्यावर त्यांना असे वाटते की आपण मुलांना एक नैतिक तत्त्व शिकवले आहे. उदाहरणार्थ, ते कदाचित मुलांना सांगतील की खोटे बोलणे, चोरी करणे किंवा विवाहित जोडीदाराशिवाय इतर व्यक्‍तीशी लैंगिक संबंध ठेवणे चुकीचे आहे. पण ही आज्ञा पाळण्याकरता, केवळ आपल्या आईवडिलांनी मना केले आहे यापेक्षा जास्त प्रभावी कारण मुलांकडे असण्याची गरज आहे. आणि ते कारण म्हणजे, हे यहोवाचे नियम आहेत. देवाच्या आज्ञा पाळणे हाच सुज्ञतेचा मार्ग आहे हे मुलांना समजले पाहिजे.—नीतिसूत्रे ६:१६-१९; इब्री लोकांस १३:४.

८. कशाप्रकारे शिकवल्यामुळे मुलांना सुबुद्धीने वागण्यास मदत मिळेल?

विश्‍वाची जटिलता, सजीव सृष्टीत आढळणारी विविधता, बदलणारे ऋतू या सर्व गोष्टी लहान मुलाला एका बुद्धिमान निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाविषयी समजून घेण्यास मदत करू शकतात. (रोमकर १:२०; इब्री लोकांस ३:४) शिवाय मुलाला हेही शिकवले पाहिजे, की देवाचे त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून देवाने आपल्या पुत्राचे बलिदान दिले आहे, तेव्हा देवाच्या आज्ञांचे पालन करण्याद्वारे तो देवाला आनंदित करू शकतो. असे केल्यास, दियाबलाने त्याला अडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा तो देवाचीच सेवा करण्याचा निर्णय घेईल.—नीतिसूत्रे २२:६; २७:११; योहान ३:१६.

९. (क) मुलांच्या जिवाचे संरक्षण होईल अशाप्रकारचे शिक्षण देण्याकरता कशाची आवश्‍यकता आहे? (ख) आईवडिलांना काय करण्यास सांगण्यात आले आहे आणि यात कशाचा समावेश आहे?

मुलांचे ज्यामुळे संरक्षण होईल व त्यांना योग्य ते करण्याची प्रेरणा मिळेल अशाप्रकारचे शिक्षण देण्याकरता पुरेसा वेळ देण्याची, लक्ष पुरवण्याची व सुनियोजनाची गरज आहे. याकरता आईवडिलांनी देवाचे मार्गदर्शन स्वीकारले पाहिजे. बायबल म्हणते: ‘बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना . . . प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.’ (इफिसकर ६:४) याचा काय अर्थ होतो? “शिक्षण” असे भाषांतरीत केलेल्या मूळ ग्रीक भाषेतील शब्दाचा अर्थ “विचार बिंबवणे” असा होतो. त्याअर्थी मुलांना शिक्षण देताना पालकांना असे आर्जवण्यात आले आहे की त्यांनी आपल्या मुलांच्या मनावर यहोवाचे विचार बिंबवले पाहिजे. लहान मुलांना यामुळे किती उत्तम संरक्षण मिळेल! जर मुलांच्या मनात देवाचे विचार असतील तर ते आपोआपच चुका करण्यापासून सुरक्षित राहतील.

प्रेमाने प्रेरित झालेली इच्छा

१०. आपल्या मुलाला परिणामकारकरित्या शिक्षण देण्याकरता तुम्ही काय जाणून घेणे महत्त्वाचे आहे?

१० पण मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करण्याची तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता, तुमचे प्रयत्न प्रेमाने प्रेरित होण्यास हवेत. याकरता सुसंवाद महत्त्वाचा आहे. तुमच्या लहान मुलाच्या जीवनात काय चालले आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. एखाद्या निवांत प्रसंगी आपल्या मुलाच्या मनातील भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कधीकधी त्यांचे विचार जाणून कदाचित तुम्हाला धक्का बसेल. पण यावर भावनाप्रधान होऊन प्रतिक्रिया व्यक्‍त न करण्याची काळजी घ्या. त्याऐवजी सहानुभूतीपूर्वक मुलांचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करा.

११. पालक आपल्या मुलांमध्ये यहोवाचे विचार कशाप्रकारे बिंबवू शकतात?

११ कदाचित तुम्ही आपल्या मुलांना लैंगिक अनैतिकतेविषयीचे देवाचे नियम बायबलमधून एकदोनदा नव्हे तर बरेचदा वाचून दाखवले असतील. (१ करिंथकर ६:१८; इफिसकर ५:५) यावरून, यहोवाला काय आवडते व काय आवडत नाही हे तुमच्या मुलांच्या मनावर ठसवले गेले असेल. पण यहोवाचे विचार त्यांच्या मनावर बिंबवण्याकरता केवळ इतकेच पुरेसे नाही. मुलांना यहोवाच्या नियमांच्या महत्त्वाविषयी तर्कशुद्ध विचार करण्यास मदत करण्याची गरज आहे. देवाचे नियम योग्य आहेत, आपल्या हिताचे आहेत आणि त्यांचे पालन करणे केवळ योग्यच नाही तर त्याद्वारे आपण यहोवावर आपली प्रीती व्यक्‍त करू शकतो याची त्यांना खात्री पटण्याची गरज आहे. तुम्ही आपल्या मुलांसोबत शास्त्रवचनांतून युक्‍तिवाद केल्यावर त्यांनी देवाचा दृष्टिकोन स्वीकारला तरच असे म्हणता येईल की तुम्ही त्यांच्यामध्ये यहोवाचे विचार बिंबवले आहेत.

१२. पालक आपल्या मुलांना लैंगिक संबंधांविषयी योग्यप्रकारे विचार करण्यास कशी मदत करू शकतात?

१२ लैंगिक संबंधांविषयी त्यांच्याशी बोलताना तुम्ही त्यांना विचारू शकता, “लग्नाआधी लैंगिक संबंध न ठेवण्याबद्दलचा यहोवाचा नियम पाळल्यामुळे एका व्यक्‍तीच्या जीवनातील आनंद हिरावून घेतला जातो असं तुला वाटतं का?” आपल्या मुलाला याचे उत्तर समजावून सांगण्याचे प्रोत्साहन द्या. मुलांना जन्म घडवून आणण्याकरता देवाने केलेल्या अद्‌भूत तरतुदीविषयी समजावून सांगितल्यानंतर तुम्ही असे विचारू शकता: “आपल्याला ज्यांमुळे जीवनाचा आनंद लुटता येणार नाही अशाप्रकारचे नियम आपला प्रेमळ पिता मुद्दामहून बनवेल असं तुला वाटतं का? की त्याचे नियम आपल्या आनंदाकरता व आपल्या संरक्षणाकरता आहेत, तुला काय वाटतं?” (स्तोत्र ११९:१, २; यशया ४८:१७) या विषयावर आपले मूल काय विचार करते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. लैंगिक अनैतिकतेमुळे झालेल्या दुःखद परिणामांच्या उदाहरणांकडेही तुम्ही त्यांचे लक्ष वेधू शकता. (२ शमुवेल १३:१-३३) आपल्या मुलांसोबत युक्‍तिवाद करून त्यांना देवाचा दृष्टिकोन स्वीकारण्यास मदत करण्याद्वारे तुम्ही देवाचे विचार त्यांच्या मनावर बिंबवत असता. पण यासोबतच तुम्ही आणखीही काही करू शकता.

१३. काय समजल्यामुळे मूल यहोवाच्या आज्ञा पाळण्यास प्रवृत्त होते?

१३ यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन केल्यामुळे होणाऱ्‍या वाईट परिणामांविषयी मुलांना शिकवण्यासोबतच, आपण जीवनात जे निर्णय घेतो त्यामुळे यहोवावर कसा परिणाम होतो हेही त्यांना समजावून सांगणे सुज्ञपणाचे आहे. आपण यहोवाच्या इच्छेच्या विरोधात वागतो तेव्हा त्याला किती दुःख होते हे तुमच्या मुलांना बायबलमधून दाखवा. (स्तोत्र ७८:४१) तुम्ही विचारू शकता, “आपण यहोवाचं मन दुखवू नये असं तुला का वाटतं?” मग तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता, “देवाचा शत्रू सैतान असा दावा करतो की आपण केवळ आपल्या स्वार्थाकरता यहोवाची सेवा करतो, आपलं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून नव्हे.” यानंतर तुम्ही ईयोबाने कशाप्रकारे यहोवाला विश्‍वासू राहण्याद्वारे त्याचे मन आनंदित केले आणि यामुळे सैतानाच्या खोट्या आरोपाला कशाप्रकारे यहोवाला प्रत्युत्तर देता आले हे समजावून सांगू शकता. (ईयोब १:९-११; २७:५) आपण ज्याप्रकारे वागतो त्याद्वारे आपण एकतर यहोवाला निराश करू शकतो किंवा आनंदित करू शकतो हे तुमच्या मुलांना समजणे आवश्‍यक आहे. (नीतिसूत्रे २७:११) महान शिक्षकाकडून शिका * (इंग्रजी) या पुस्तकातून तुम्ही हे व असे इतर अनेक महत्त्वाचे धडे आपल्या मुलांना देऊ शकता.

समाधानदायक परिणाम

१४, १५. (क) शिक्षक या पुस्तकातील कोणकोणत्या अध्यायांनी मुलांना प्रेरित केले आहे? (ख) या पुस्तकाचा उपयोग करताना तुम्हाला कोणते चांगले परिणाम दिसून आले आहेत? (पृष्ठ ३०-३१ वरील रकाना पाहा.)

१४ क्रोएशिया येथे राहणारे एक आजोबा आपल्या सात वर्षांच्या नातवाला शिक्षक हे पुस्तक वाचून दाखवतात. या लहानशा मुलाने आपल्याला काय सांगितले याविषयी त्यांनी असे लिहिले: “आईनी मला काहीतरी करायला सांगितलं होतं, पण मला ते करायचं नव्हतं. तेवढ्यात मला ‘आज्ञा पाळल्यामुळे तुमचे संरक्षण होते’ हा अध्याय आठवला. मग मी परत जाऊन आईला सांगितलं की मी तिनं सांगितलेलं काम करेन. “आपण खोटे का बोलू नये” असे शीर्षक असलेल्या अध्यायाविषयी संयुक्‍त संस्थानांतील फ्लोरिडा, येथे राहणाऱ्‍या एका दांपत्याने असे म्हटले: “या अध्यायातील प्रश्‍न मुलांना आपल्या मनातल्या भावना मोकळेपणाने व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन देतात. एरवी त्यांनी कबूल केल्या नसत्या अशा चुकाही कबूल करण्यास ती प्रवृत्त होतात.”

१५ शिक्षक या पुस्तकात २३० पेक्षा जास्त चित्रे असून प्रत्येक चित्रासोबत किंवा चित्रसमूहासोबत मथळा, किंवा त्याविषयी थोडे वर्णन दिलेले आहे. या पुस्तकाची प्रशंसा करणाऱ्‍या एका आईने सांगितले: “कित्येकदा माझा मुलगा एखाद्या चित्राकडे एकटक पाहात राहतो आणि ते पान उलटूच देत नाही. या पुस्तकातील चित्रे आकर्षक तर आहेतच पण ती उद्‌बोधकही आहेत. निदान ती मुलांना प्रश्‍न विचारण्यास प्रवृत्त करतात. एका चित्रात एक लहान मुलगा अंधाऱ्‍या खोलीत टीव्ही पाहतोय असं दाखवलंय. हे चित्र पाहून माझ्या मुलानं विचारलं, ‘आई, हा मुलगा काय करतोय गं?’ त्यानं ज्याप्रकारे तो प्रश्‍न विचारला त्यावरून तो मुलगा नक्कीच काहीतरी चुकीचं करतोय हे त्याच्या लक्षात आलं आहे हे मला जाणवलं.” या चित्राखालच्या मथळ्यात असा प्रश्‍न विचारला आहे: “आपण जे काही करतो ते कोण पाहू शकतो?”

आजच्या काळाकरता महत्त्वाचे शिक्षण

१६. आजच्या काळात मुलांना कशाविषयी माहिती देण्याची गरज आहे आणि का?

१६ मुलांना त्यांच्या गुप्तांगांच्या योग्य व अयोग्य वापरासंबंधी माहीत असण्याची गरज आहे. अर्थात याविषयी त्यांच्याशी चर्चा करणे सोपे नाही. एका वृत्तपत्रातील स्तंभलेखिकेने म्हटले की तिच्या लहानपणी जननेंद्रियांचा उल्लेख करणे असभ्यतेचे लक्षण समजले जात होते. पण आपल्या मुलांना शिकवण्याच्या संदर्भात ती म्हणते: “मला माझ्या संकोचावर मात करावी लागेल.” खरे पाहता, आईवडिलांनी संकोचामुळे हा विषय टाळल्यास मुलांचे संरक्षण होणार नाही. कारण मुलांशी लैंगिक दुर्व्यवहार करणारे सहसा त्यांच्या अज्ञानाचाच फायदा उचलतात. महान शिक्षकाकडून शिका या पुस्तकात या विषयावर अतिशय आदरयुक्‍त पद्धतीने चर्चा केली आहे. मुलांना लैंगिक संबंधांविषयी माहिती दिल्याने त्यांची निरागसता नाहीशी होत नाही; उलट, त्यांना ही माहिती न दिल्यास त्यांची निरागसता हिरावून घेतली जाण्याची भीती आहे.

१७. मुलांना लैंगिक संबंधांविषयीची माहिती देण्याकरता शिक्षक हे पुस्तक आईवडिलांना कशाप्रकारे मदत करते?

१७ दहाव्या अध्यायात, पृथ्वीवर येऊन मुलांना जन्म देणाऱ्‍या दुष्ट देवदुतांबद्दल चर्चा करताना मुलांना उद्देशून असा प्रश्‍न विचारला आहे, “लैंगिक संबंध म्हणजे काय?” या पुस्तकात अतिशय आदरयुक्‍त पद्धतीने या प्रश्‍नाचे साधेसोपे उत्तर दिले आहे. यानंतर ३२ व्या अध्यायात मुलांना लैंगिक शोषण करणाऱ्‍यांपासून कसे सुरक्षित ठेवता येईल याविषयी सांगितले आहे. याप्रकारचे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे असे अनेकांनी पत्राद्वारे कळवले आहे. एकाने म्हटले: “मागच्या आठवडी मी माझा मुलगा जेवान याला त्याच्या बालरोग तज्ज्ञाकडे नेले होते. तेव्हा त्यांनी मला विचारले की आम्ही गुप्तांगांच्या योग्य वापराबद्दल त्याच्याशी चर्चा केली आहे की नाही. या नव्या पुस्तकाच्या साहाय्याने आम्ही त्याच्याशी चर्चा केली आहे हे ऐकून त्या फार प्रभावित झाल्या.”

१८. शिक्षक पुस्तकात राष्ट्रीय चिन्हांना नमन करण्याविषयी कशाप्रकारे चर्चा केली आहे?

१८ दुसऱ्‍या एका अध्यायात शद्रख, मेशक व अबेदनेगो या तीन इब्री तरुणांविषयीच्या बायबलमधील अहवालाची चर्चा केली आहे. (दानीएल ३:१-३०) शिक्षक पुस्तकात सांगितल्याप्रमाणे ध्वजवंदन करणे हे एखाद्या प्रतिमेला दंडवत करण्यासारखेच आहे याच्याशी बरेचजण कदाचित सहमत होणार नाहीत. पण यु.एस. कॅथलिक या नियतकालिकाने घेतलेल्या मुलाखतीत लेखक एडवर्ड गॅफ्नी यांनी काय सांगितले याकडे लक्ष द्या. शाळेच्या पहिल्या दिवशी घरी परतल्यानंतर त्यांच्या मुलीने आपण “शाळेत एक नवीन प्रार्थना” शिकलो असे सांगितले. तेव्हा त्यांनी तिला ती म्हणून दाखवण्यास सांगितले. गॅफ्नी सांगतात, “तिने छातीवर हात ठेवून मोठ्या अभिमानाने राष्ट्रनिष्ठेची प्रतिज्ञा म्हणण्यास सुरवात केली.” ते म्हणतात: “अचानक, मला झटका बसल्यासारखे झाले. याचा अर्थ यहोवाचे साक्षीदार जे म्हणतात ते बरोबर आहे तर. आपल्या शाळांमधून अगदी लहान वयापासूनच मुलांच्या मनात राष्ट्रधर्माचा एक महत्त्वाचा धडा—सर्व मर्यादांपलीकडे जाणारी निर्विवाद एकनिष्ठा त्यांच्या मनात बिंबवली जात आहे.”

तुमचे प्रयत्न व्यर्थ नाहीत

१९. मुलांना शिकवल्यामुळे आईवडिलांना कोणते प्रतिफळ मिळते?

१९ तुमच्या मुलांना शिकवण्याचे तुमचे सर्व प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत. आपल्या मुलाकडून आलेले पत्र वाचल्यावर संयुक्‍त संस्थानांतील कॅन्सस येथे राहणाऱ्‍या एका आईला अश्रू आवरले नाहीत. त्याने असे लिहिले होते: “माझ्यावर तुम्ही केलेल्या संस्कारांमुळे माझा भावनिकरित्या उत्तम विकास होऊ शकला याचा मला अभिमान वाटतो. तू व डॅडींनी माझ्यासाठी जे काही केले ते प्रशंसास्पद आहे.” (नीतिसूत्रे ३१:२८) मुलांच्या रूपातील मौल्यवान धनाचे संरक्षण करण्यासाठी त्यांना योग्य शिक्षण देण्याकरता महान शिक्षकाकडून शिका हे पुस्तक आणखी कितीतरी आईवडिलांना साहाय्यक ठरू शकते.

२०. आईवडिलांनी काय आठवणीत ठेवावे आणि याचा त्यांच्यावर कसा परिणाम होण्यास हवा?

२० आपल्या मुलांना भरपूर वेळ देण्याची, त्यांच्याकडे भरपूर लक्ष पुरवण्याची, व त्यांच्या संगोपनाकरता बरेच श्रम घेण्याची गरज आहे; हा त्यांचा हक्क आहे. आपली मुले कायमची लहान राहणार नाहीत, पाहता पाहता ती मोठी होतील. तेव्हा त्यांच्या सहवासात राहण्याच्या आणि त्यांना मदत करण्याच्या संधींचा आताच फायदा घ्या. याचा तुम्हाला कधीही पस्तावा होणार नाही. ते तुमच्यावर प्रेम करतील. तुमची मुले देवाने तुम्हाला दिलेली देणगी आहे हे कधीही विसरू नका. देवाकडून मिळालेला मौल्यवान वारसा! (स्तोत्र १२७:३-५) तेव्हा हे लक्षात ठेवूनच त्यांच्याशी वागा. देवापुढे आपल्याला जाब द्यायचा आहे असे समजून त्यांचे संगोपन करा कारण खरोखरच तुम्हाला जाब द्यायचा आहे. (w०५ ४/१)

[तळटीप]

^ परि. 13 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित. कृपया अध्याय ४०, “आपण देवाला आनंदित कसे करू शकतो” पाहा.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• विशेषतः या काळात आईवडिलांनी आपल्या मुलांचे संरक्षण करण्याची गरज का आहे?

• कशाप्रकारच्या शिक्षणातून आपण मुलांना बुद्धी संपादन करण्यास मदत करू शकतो?

• आजच्या काळात मुलांसोबत कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची गरज आहे?

शिक्षक हे पुस्तक आईवडिलांना आपल्या मुलांना शिकवण्यास कशाप्रकारे साहाय्यक ठरले आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[३०, ३१ पानांवरील चौकट/चित्रे]

सर्वांकरता असलेले एक पुस्तक

महान शिक्षकाकडून शिका हे पुस्तक आईवडिलांना किंवा इतर मोठ्या माणसांना लहान मुलांसोबत येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकींविषयी वाचन व चर्चा करण्यास मदत करण्याकरता तयार करण्यात आले होते. पण मुलांनीच नव्हे, तर ज्या मोठ्यांनी हे पुस्तक वाचून काढले आहे त्यांनी यातून शिकायला मिळालेल्या गोष्टींबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्‍त केली आहे.

संयुक्‍त संस्थानांतील टेक्सस येथे राहणाऱ्‍या एकाने असे म्हटले: “महान शिक्षकाकडून शिका हे पुस्तक अगदी साध्या भाषेत लिहिलेले असूनही अतिशय मनोवेधक आहे. कोणत्याही वयाच्या व्यक्‍तीला, अगदी माझ्यासारख्या ७६ वर्षांच्या माणसालाही प्रेरित करण्याची ताकद यात आहे. तरुणपणापासून यहोवाची सेवा केलेल्या या वाचकाचे आभार स्वीकारावेत.”

इंग्लंडमधील लंडन शहरातील एका वाचिकेने असे म्हटले: “यातील सुरेख चित्रे मुलांच्याच नव्हे तर पालकांच्याही मनाचा ठाव घेतील. यातील प्रश्‍न आणि माहितीची रचना उत्कृष्ट आहे. शिवाय, अगदी नाजूक विषयही, उदाहरणार्थ ३२ व्या अध्यायात ‘येशूला कशाप्रकारे सुरक्षित ठेवण्यात आले?’ या प्रकारचे विषयही उत्तमरित्या हाताळले आहेत.” शेवटी तिने म्हटले: “हे पुस्तक मुळात यहोवाच्या साक्षीदारांच्या मुलांसाठी तयार करण्यात आलेले असले तरीसुद्धा मला वाटतं, शिक्षकांना आणि इतरांनाही हे पुस्तक फार आवडेल. मी येणाऱ्‍या दिवसांत याचा उपयोग करण्याचं ठरवलंय.”

संयुक्‍त संस्थानांतील मॅसच्युसेट्‌सच्या एका स्त्रीने या पुस्तकातील ‘विचारपूर्वक निवडलेल्या चित्रांची’ प्रशंसा केली. ती म्हणते: “हे पुस्तक खरे पाहता मुलांसाठी असले तरीसुद्धा, यातील विषय आम्हा मोठ्यांनाही यहोवासोबतच्या आपल्या वैयक्‍तिक नातेसंबंधाविषयी विचार करण्यास मदत करू शकतात.”

संयुक्‍त संस्थानांतील मेइन येथे राहणाऱ्‍या एका स्त्रीने म्हटले: “अभिनंदन! एक उत्कृष्ट पुस्तक तयार करण्याबद्दल. हे फक्‍त लहान मुलांसाठी नव्हे, तर देवाची मुले असलेल्या आपल्या सर्वांसाठी आहे. या पुस्तकाने माझ्या मनातल्या अगदी अंतरस्थ भावनांना स्पर्श केला. मनाचे सांत्वन केले. हे पुस्तक वाचून मला शांती मिळाली. माझा पिता यहोवा अगदी माझ्या जवळ आहे असे मला वाटले. इतक्या वर्षांत जे काही घडलेय त्या सर्व वेदना देवाने दूर केल्या आहेत आणि त्याचा उद्देश अगदी स्पष्ट झाला आहे.” शेवटी तिने म्हटले: “मी सर्वांना सांगतेय, ‘हे पुस्तक जरूर वाचा’”

जपानच्या कियोटो शहरात राहणाऱ्‍या एक स्त्रीने सांगितले, की ती हे पुस्तक आपल्या नातवंडांना वाचून दाखवत असताना तिचे नातवंड सारखे प्रश्‍न विचारत होते, “‘हा मुलगा काय करतोय? या लहानशा मुलीला का रागवतायत? ही आई काय करतेय? हा सिंह काय करतोय?’ अगदी आपल्या आवडत्या विषयावर या पुस्तकात माहिती दिलीय, त्यामुळे लायब्ररीतल्या इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा हेच मला सर्वात जास्त आवडते.”

कॅनडाच्या कॅलगरी शहरातल्या एका वडिलांनी सांगितले की हे पुस्तक मिळताच त्यांनी आपल्या सहा वर्षांच्या मुलीला आणि नऊ वर्षांच्या मुलाला यातून वाचून दाखवण्यास सुरुवात केली. ते सांगतात, “अगदी सुरुवातीपासूनच त्यांची प्रतिक्रिया अतिशय उत्साही होती. माझी मुले लक्ष देऊन ऐकत होती आणि अगदी मनापासून प्रश्‍नांची उत्तरे देत होती. हा अभ्यास त्यांना अगदी आपलासा वाटला आणि आपल्या भावना व्यक्‍त करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांच्यात एक नवीनच उत्साह दिसतोय, माझी मुलगी तर म्हणते की तिला दररोज रात्री या नव्या पुस्तकातून अभ्यास करायचाय.”

एका अभ्यासानंतर, हे वडील सांगतात: “माझा मुलगा व मी कितीतरी तास यहोवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल बोलत राहिलो. या पुस्तकामुळे त्याच्या मनात अनेक प्रश्‍न आले होते. झोपायला जाताना, तो मला म्हणाला, ‘डॅडी आपण पुन्हा असंच बसूया का? माझ्या मनात आणखी कितीतरी प्रश्‍न आहेत. मला यहोवाबद्दल सर्वकाही जाणून घ्यायचंय.’ त्याचे हे शब्द ऐकून मला अगदी गहिवरून आलं.”

[२९ पानांवरील चित्रे]

“शिक्षक” पुस्तकातील चित्रे व मथळे मुलांना शिकवण्याकरता अतिशय परिणामकारक साधने आहेत

हनन्या पेत्राशी कशाविषयी खोटे बोलला?

आपण जे काही पाहतो ते कोण पाहू शकतो?