व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा”

“तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा”

“तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा”

‘तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा; म्हणून देवाचे गौरव करा.’—१ करिंथकर ६:२०.

१, २. (क) मोशेच्या नियमशास्त्रानुसार इस्राएली गुलामांशी कशाप्रकारे व्यवहार करावयाचा होता? (ख) आपल्या धन्यावर प्रेम करणाऱ्‍या दासासमोर कोणता पर्याय होता?

होलमन इलस्ट्रेटेड बायबल डिक्शनरी यानुसार “प्राचीन जगात दास्यत्वाची प्रथा अतिशय प्रचलित आणि सर्वमान्य होती.” याच शब्दकोशात पुढे असे म्हटले आहे: “ईजिप्त, ग्रीस व रोम या राष्ट्रांची अर्थव्यवस्था दासांकडून करून घेतलेल्या श्रमांवर आधारित होती. पहिल्या ख्रिस्ती शतकात इटलीमध्ये दर तीन व्यक्‍तींपैकी एक व इतर देशांत दर पाच व्यक्‍तींपैकी एक दास होता.”

प्राचीन इस्राएलातही गुलामगिरी अस्तित्वात होती. पण मोशेच्या नियमशास्त्राने गुलामांच्या संरक्षणाकरता पुरेशी तरतूद केली होती. उदाहरणार्थ, नियमशास्त्रानुसार इस्राएली व्यक्‍ती केवळ सहा वर्षांपर्यंत दास्यत्वात राहू शकत होती. सातव्या वर्षी “काही न घेता त्यास मुक्‍त होऊन” जाऊ द्यायचे होते. दासांशी करावयाच्या व्यवहारासंबंधीचे नियम इतके रास्त व उदात्त होते की मोशेच्या नियमशात्रात पुढील तरतूद करण्यात आली होती: “जर तो दास साफ म्हणू लागला की, ‘माझ्या धन्यावर व माझ्या बायकोमुलांवर मी प्रेम करितो, मी मुक्‍त होऊन जाणार नाही’, तर त्याच्या धन्याने त्याला देवासमोर आणून दारापाशी किंवा दाराच्या चौकटीपाशी उभे करावे व अरीने त्याचा कान टोचावा म्हणजे तो आयुष्यभर त्याची चाकरी करील.”—निर्गम २१:२-६; लेवीय २५:४२, ४३; अनुवाद १५:१२-१८.

३. (क) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी कोणत्या प्रकारचे दास्यत्व स्वीकारले? (ख) कोणती गोष्ट आपल्याला देवाची सेवा करण्यास प्रवृत्त करते?

ऐच्छिक दास्यत्वाच्या या तरतूदीतून, आज ख्रिस्ती ज्याप्रकारच्या दास्यत्वात आहेत त्याची पूर्वझलक मिळते. उदाहरणार्थ, बायबल लेखक पौल, याकोब, पेत्र व यहुदा यांनी स्वतःला देवाचे व ख्रिस्ताचे दास म्हणवले. (तीत १:१; याकोब १:१; २ पेत्र १:१; यहूदा १) पौलाने थेस्सलनीकाकर मंडळीला आठवण करून दिली की ते ‘जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास मूर्तीपासून देवाकडे वळले’ होते. (१ थेस्सलनीकाकर १:९, १०) स्वेच्छेने देवाचे सेवक बनण्यास कोणत्या गोष्टीने त्या ख्रिश्‍चनांना प्रवृत्त केले? मुक्‍त केल्यावरही आपल्या मालकाचे घर सोडून जाण्यास तयार न होणारा इस्राएली दास कशामुळे असा निर्णय घेण्यास प्रवृत्त होत असे? आपल्या धन्याबद्दल त्याला असलेल्या प्रेमामुळेच नाही का? ख्रिस्ती दास्यत्व देखील देवावरील प्रेमावर आधारित आहे. आपल्याला खऱ्‍या व जिवंत देवाची ओळख घडते व आपण त्याच्यावर प्रेम करू लागतो तेव्हा आपोआपच आपण त्याची “पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने” सेवा करण्यास प्रवृत्त होतो. (अनुवाद १०:१२, १३) पण देवाचा व ख्रिस्ताचा दास बनण्यात कशाचा समावेश आहे? याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो?

“सर्व देवाच्या गौरवासाठी करा”

४. आपण देवाचे व ख्रिस्ताचे दास कशाप्रकारे बनतो?

दास या शब्दाची व्याख्या, “जो कायद्याने मालकाच्या अथवा मालकांच्या संपूर्ण ताब्यात असतो आणि ज्याला मालकाच्या पूर्णपणे आज्ञेत राहावे लागते” अशी करण्यात आली आहे. आपण यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपण कायदेशीररित्या त्याच्या मालकीचे होतो. प्रेषित पौल सांगतो, “तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा.” (१ करिंथकर ६:१९, २०) हे मोल अर्थातच येशू ख्रिस्ताचे खंडणी बलिदान होय. कारण त्याच आधारावर देव आपल्याला त्याचे सेवक या नात्याने स्वीकारतो, मग आपण अभिषिक्‍त ख्रिस्ती असोत अथवा पृथ्वीवरील जीवनाची आशा बाळगणाऱ्‍या त्यांच्या साथीदारांपैकी असोत. (इफिसकर १:७; २:१३; प्रकटीकरण ५:९) अशारितीने आपल्या बाप्तिस्म्याच्या वेळेपासून आपण ‘प्रभूचेच होतो.’ (रोमकर १४:८) आपल्याला येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्‍ताने विकत घेण्यात आले असल्यामुळे आपण त्याचेही दास बनतो आणि त्याच्या आज्ञांचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे.—१ पेत्र १:१८, १९.

५. यहोवाचे सेवक या नात्याने आपले प्रथम कर्तव्य काय आहे आणि आपण ते कशाप्रकारे पूर्ण करू शकतो?

गुलामांनी आपल्या मालकाच्या आज्ञेत राहिले पाहिजे. आपले दास्यत्व हे ऐच्छिक असून आपल्या धन्याबद्दल आपल्याला वाटणाऱ्‍या प्रेमामुळेच आपण ते स्वीकारले आहे. १ योहान ५:३ म्हणते: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” तर मग आपण देवाच्या आज्ञा पाळतो तेव्हा, आपले त्याच्यावर प्रेम आहे आणि आपण त्याच्या अधीन आहोत हे दाखवतो. आपण जे काही करतो त्यातून हे दिसून येते. पौलाने म्हटले: “तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.” (१ करिंथकर १०:३१) दैनंदिन जीवनात, लहानसहान बाबींतही आपण दाखवू इच्छितो की आपण “प्रभुची सेवा” करतो.—रोमकर १२:११.

६. देवाचे दास असण्याचा आपल्या जीवनातील निर्णयांवर कशाप्रकारे परिणाम होतो? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

उदाहरणार्थ कोणतेही निर्णय घेताना, आपण आपला स्वर्गीय मालक यहोवा याची काय इच्छा आहे हे विचारात घेतले पाहिजे. (मलाखी १:६) कठीण निर्णय घेण्याचे प्रसंग येतात तेव्हा देवाच्या आज्ञा आपण कितपत पाळतो याची परीक्षा होऊ शकते. आपल्या “कपटी” व “असाध्य रोगाने ग्रस्त” असलेल्या हृदयाच्या इच्छांनुसार आपण निर्णय घेऊ की त्याऐवजी देवाच्या मार्गदर्शनाचे पालन करू? (यिर्मया १७:९) मेलिसा नावाच्या एका अविवाहित ख्रिस्ती मुलीचा बाप्तिस्मा होऊन केवळ काही काळानंतर एक तरुण तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. तो तसा चांगला माणूस वाटत होता आणि त्याने यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करण्यासही सुरुवात केली होती. पण मंडळीतल्या एका वडिलाने, “केवळ प्रभूमध्ये” विवाह करण्याविषयीच्या यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन करणे किती सूज्ञपणाचे आहे याविषयी तिच्यासोबत चर्चा केली. (१ करिंथकर ७:३९; २ करिंथकर ६:१४) मेलिसा कबूल करते: “या सल्ल्यानुसार वागणे मला सोपे गेले नाही. पण मी निर्णय घेतला की ज्याअर्थी मी देवाला समर्पण करून त्याच्या इच्छेनुसार जगण्याचे कबूल केले आहे त्याअर्थी त्याच्या सुस्पष्ट सूचनांचे मी पालन केलेच पाहिजे.” यानंतर जे घडले त्याकडे मागे वळून पाहताना ती म्हणते: “मी त्या सल्ल्याचे पालन केले हे किती बरे झाले. काही काळातच त्या तरुणाने अभ्यास करण्याचे बंद केले. जर मी त्याच्याशी तेव्हाच संबंध तोडला नसता तर आज मी सत्यात नसलेल्या एका व्यक्‍तीशी विवाहबद्ध असते.”

७, ८. (क) आपण लोकांची मर्जी राखण्याचा अनावश्‍यक प्रयत्न का करू नये? (ख) मनुष्याच्या भीतीवर आपण कशाप्रकारे मात करू शकतो हे उदाहरण देऊन सांगा.

देवाचे सेवक या नात्याने आपण मनुष्यांचे सेवक कधीही बनू नये. (१ करिंथकर ७:२३) लोकांनी आपल्याला नावे ठेवावी असे कोणालाही वाटत नाही, पण आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की ख्रिस्ती या नात्याने आपले आदर्श जगातील लोकांपेक्षा वेगळे आहेत. पौलाने प्रश्‍न केला: “मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करीत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.” (गलतीकर १:१०) साथीदारांच्या दबावाला बळी पडून मनुष्यांची मर्जी राखण्याचा आपण कधीही प्रयत्न करू नये. मग इतरांप्रमाणे वागण्याचा आपल्यावर दबाव येतो तेव्हा आपण काय करावे?

स्पेन येथे राहणाऱ्‍या एलेना नावाच्या एका ख्रिस्ती तरुणीचे उदाहरण पाहा. तिचे अनेक वर्गसोबती रक्‍तदान करायचे. एलेना यहोवाची साक्षीदार असल्यामुळे ती रक्‍तदान करणार नाही व रक्‍त संक्रमणही घेणार नाही हे त्यांना माहीत होते. जेव्हा एलेनाला संपूर्ण वर्गासमोर आपल्या विश्‍वासांविषयी स्पष्टीकरण देण्याची संधी मिळाली तेव्हा तिने या संधीचा फायदा उचलला. एलेना सांगते, “खरे सांगायचे तर मला वर्गासमोर जाऊन बोलायला खूप भीती वाटली. पण मी चांगली तयारी केली आणि याचा उत्तम परिणाम झाला. माझे अनेक वर्गसोबती माझा आदर करू लागले आणि शिक्षकांनीही मला सांगितले की मी जे काम करत होते ते खरोखर प्रशंसास्पद आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी यहोवाच्या नावाचे समर्थन केले आणि बायबलच्या आधारे माझ्या विश्‍वासांमागची कारणे मी स्पष्टपणे समजावून सांगू शकले याचे मला समाधान वाटते.” (उत्पत्ति ९:३, ४; प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) होय, देवाचे व ख्रिस्ताचे सेवक या नात्याने आपण सर्वांपेक्षा वेगळे दिसून येतो. पण जर आपण आदरपूर्वक आपल्या विश्‍वासांचे समर्थन केले तर आपण अवश्‍य लोकांचा आदर मिळवू शकतो.—१ पेत्र ३:१५.

९. प्रेषित योहानाला प्रकट झालेल्या देवदूताकडून आपण काय शिकू शकतो?

आपण देवाचे सेवक आहोत हे आठवणीत ठेवल्यामुळे आपल्याला नम्र राहण्यासही मदत मिळेल. एकेप्रसंगी, प्रेषित योहानाने स्वर्गीय जेरूसलेमचा वैभवी दृष्टान्त पाहिल्यावर तो इतका भारावून गेला की ज्या देवदूताने देवाचा प्रवक्‍ता या नात्याने त्याच्याशी संभाषण केले होते त्याच्या पाया पडून योहानाने त्याला नमन करण्याचा प्रयत्न केला. पण देवदूताने त्याला म्हटले: “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधु संदेष्टे व ह्‍या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्‍यांच्या सोबतीचा दास आहे; नमन देवाला कर.” (प्रकटीकरण २२:८, ९) देवाच्या सर्व दासांकरता त्या देवदूताने किती उत्तम उदाहरण पुरवले! काही ख्रिस्ती, मंडळीत खास जबाबदारीच्या पदांवर असतील. पण येशूने म्हटले: “जो कोणी तुम्हामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल.” (मत्तय २०:२६, २७) येशूचे अनुयायी या नात्याने आपण सर्वजण दासच आहोत.

“आम्ही आमचे कर्तव्य केले आहे”

१०. देवाच्या विश्‍वासू सेवकांना त्याची इच्छा पूर्ण करणे नेहमीच सोपे गेले नाही हे दाखवण्याकरता बायबलमधील काही उदाहरणे सांगा.

१० अपरिपूर्ण मानवांकरता देवाची इच्छा पूर्ण करणे नेहमीच सोपे नसते. संदेष्टा मोशे याला जेव्हा यहोवाने जाऊन इस्राएल पुत्रांना ईजिप्तच्या बंदिवासातून सोडवून आणण्याची आज्ञा दिली तेव्हा तो कचरला. (निर्गम ३:१०, ११; निर्गम ४:१, १०) निनवेच्या लोकांना देवाकडील न्यायाचा संदेश घोषित करण्याची योनाला आज्ञा देण्यात आली तेव्हा “परमेश्‍वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला.” (योना १:२, ३) संदेष्टा यिर्मया याचा चिटणीस म्हणून कार्य करणाऱ्‍या बारूखनेही आपण थकलो आहोत अशी तक्रार केली. (यिर्मया ४५:२, ३) मग आपल्या वैयक्‍तिक इच्छा व पसंती देवाची इच्छा पूर्ण करण्याच्या मार्गात बाधा बनतात तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया दाखवावी? येशूने दिलेल्या एका दृष्टान्तातून याचे उत्तर मिळते.

११, १२. (क) लूक १७:७-१० येथे येशूने दिलेला दृष्टान्त थोडक्यात सांगा. (ख) येशूच्या दृष्टान्तातून आपण कोणता धडा शिकतो?

११ येशूने एका दासाविषयी सांगितले. हा दास संपूर्ण दिवसभर शेतात धन्याच्या गुरांचे राखण करत होता. १२ तास कष्ट केल्यानंतर हा दास थकूनभागून घरी आला तेव्हा धन्याने त्याला आपल्यासोबत बसून जेवायला बोलावले नाही. उलट तो म्हणला: “माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर, आणि मग तू खा व पी.” धन्याची सेवा केल्यानंतरच तो दास स्वतःचा विचार करू शकत होता. तर येशूने यातून असा निष्कर्ष काढला: “त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर ‘आम्ही निरुपयोगी दास आहो, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे,’ असे म्हणा.”—लूक १७:७-१०.

१२ यहोवाच्या सेवेत आपण जे काही करतो त्याची त्याला कदर नाही असे येशू या दृष्टान्तातून सुचवीत नव्हता. बायबल स्पष्टपणे सांगते: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” (इब्री लोकांस ६:१०) तर येशूच्या या दाखल्याचा मुद्दा असा होता, की एक दास आपल्या मनाप्रमाणे करू शकत नाही, किंवा केवळ आपल्या सुविधांचा विचार करू शकत नाही. आपण आपले जीवन देवाला समर्पित केले व त्याचे सेवक होण्यास कबूल झालो तेव्हा आपण आपल्या इच्छांपेक्षा त्याच्या इच्छेला प्राधान्य देण्याचे मान्य केले होते. त्याअर्थी आपण देवाच्या इच्छेला मान देऊन स्वतःच्या इच्छा बाजूला सारल्या पाहिजेत.

१३, १४. (क) कोणत्या प्रकारच्या परिस्थितीत आपल्याला स्वतःच्या इच्छेविरुद्ध वागावे लागू शकते? (ख) आपण देवाच्या इच्छेला प्राधान्य का द्यावे?

१३ देवाच्या वचनाचा व ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या प्रकाशनांचा नियमिरित्या अभ्यास करण्याकरता कदाचित आपल्याला बराच प्रयत्न करावा लागू शकतो. (मत्तय २४:४५) खासकरून, जर वाचन करणे आपल्याला सुरुवातीपासूनच अवघड वाटत असेल किंवा एखाद्या प्रकाशनात ‘देवाच्या गहन गोष्टींची’ चर्चा केलेली असेल तर आपल्याला अधिक प्रयत्न करावा लागू शकतो. (१ करिंथकर २:१०) पण तरीसुद्धा आपण वैयक्‍तिक अभ्यासाकरता वेळ काढायला नको का? एका ठिकाणी बसून अभ्यासाच्या साहित्याचे निवांत वाचन करण्याकरता कदाचित आपल्याला स्वतःस अनुशासित करावे लागेल. पण जर आपण असे केले नाही, तर मग ‘प्रौढांसाठी असलेल्या जड अन्‍नाची’ आपल्याला सवय कशी लागेल?—इब्री लोकांस ५:१४.

१४ कधीकधी आपण दिवसभर काम करून थकून भागून घरी येतो. ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याकरता स्वतःला अक्षरशः बळजबरी करावी लागते. किंवा कदाचित अनोळखी लोकांना प्रचार कार्य करणे हे आपल्या स्वभावामुळे आपल्याला आवडत नसेल. पौलाने स्वतः म्हटले की कधीकधी सुवार्तेचा प्रचार आपण, ‘आपण होऊन करत नाही.’ (१ करिंथकर ९:१७) पण आपण या गोष्टी का करतो, तर आपला स्वर्गीय धनी यहोवा, ज्याच्यावर आपले प्रेम आहे, तो आपल्याला असे करण्यास सांगतो. आणि जेव्हा जेव्हा आपण अभ्यास करण्याकरता, किंवा सभांना उपस्थित राहण्याकरता, किंवा प्रचार करण्याकरता कसोशीने प्रयत्न करतो, तेव्हा तेव्हा आपल्याला समाधान व एक प्रकारचे चैतन्य अनुभवायला मिळत नाही का?—स्तोत्र १:१, २; १२२:१; १४५:१०-१३.

“मागे” पाहू नका

१५. येशूने देवाच्या अधीन असण्याविषयी कशाप्रकारे उत्तम आदर्श पुरवला?

१५ आपण आपल्या स्वर्गीय पित्याच्या अधीन आहोत, हे येशू ख्रिस्ताने जितक्या उत्कृष्ट रितीने दाखवले तितके आणखी कोणीही दाखवले नाही. येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे.” (योहान ६:३८) गेथशेमाने बागेत तो दुःखाने व्याकूळ झाला तेव्हा त्याने अशी प्रार्थना केली: “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरुन टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”—मत्तय २६:३९.

१६, १७. (क) आपण ज्या गोष्टी मागे सोडून दिल्या आहेत त्यांविषयी आपला काय दृष्टिकोन असावा? (ख) जगिक सुसंधींना “केरकचरा” लेखण्यात पौलाने वास्तववादी मनोवृत्ती बाळगली असे का म्हणता येईल?

१६ देवाचे सेवक होण्याचा आपण जो निर्णय घेतला आहे त्यानुसार आपण विश्‍वासूपणे जगावे अशी येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. त्याने म्हटले: “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही.” (लूक ९:६२) देवाची सेवा करत असताना, आपण ज्या गोष्टींचा त्याग केला आहे त्यांवर विचार करत राहणे निश्‍चितच योग्य नाही. त्याऐवजी आपण देवाचे सेवक होण्याचा निर्णय घेतल्यामुळे आपल्याला जे आशीर्वाद लाभले आहेत त्यांची आपण कदर करावी. फिलिप्पैकरांना पौलाने लिहिले: “ख्रिस्त येशू माझा प्रभु, ह्‍याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानि असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्‍यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा.”—फिलिप्पैकर ३:८.

१७ देवाचा सेवक या नात्याने आध्यात्मिक आशीर्वादांचा उपभोग घेण्याकरता पौलाने कोणकोणत्या गोष्टींना केरकचरा लेखून त्या त्यागल्या याविषयी विचार करा. त्याने जगिक सुखसोयीच नव्हे तर यहुदी धर्माचा भावी पुढारी बनण्याची संभाव्य संधी सोडून दिली. जर पौल यहुदी धर्माचे पालन करत राहिला असता तर तो देखील आपला शिक्षक गमलियेल याचा पुत्र शिमोन याच्यासारखे उच्च पद मिळवू शकला असता. (प्रेषितांची कृत्ये २२:३; गलतीकर १:१४) शिमोन हा परुशांचा नेता बनला आणि सा.यु. ६६-७० च्या सुमारास यहुद्यांनी रोमविरुद्ध जे बंड केले त्याविषयी काही शंका त्याला होत्या तरीसुद्धा त्याने हे बंड पुकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यहुदी जहालमतवादी अथवा रोमी सैन्य यांच्या हातून संघर्षात त्याचा मृत्यू झाला.

१८. आध्यात्मिक सफलतेमुळे कशाप्रकारे प्रतिफळ मिळते याचे एक उदाहरण द्या.

१८ यहोवाच्या साक्षीदारांपैकी अनेकांनी पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण केले आहे. जीन सांगतो: “शिक्षण पूर्ण झाल्यावर काही वर्षांतच मला लंडनच्या एका सुप्रसिद्ध वकीलाच्या कार्यालयात मुख्य सचिवाची नोकरी मिळाली. मला ते काम पसंत होते आणि पैसाही चांगला मिळत होता पण मनोमन मला ही जाणीव होती की मी यहोवाच्या सेवेत अधिक करू शकतो. शेवटी मी राजीनामा दिला आणि पायनियरिंगला सुरुवात केली. २० वर्षांआधी मी ते पाऊल उचलले याचे मला आज अतिशय समाधान वाटते! माझ्या पूर्णवेळेच्या सेवेने माझ्या जीवनाला किती अर्थपूर्ण बनवले आहे. कोणत्याही सचिवपदाच्या नोकरीमुळे हे शक्य नव्हते. यहोवाच्या वचनामुळे एका व्यक्‍तीला तिच्या जीवनात बदल करताना आपण पाहतो तेव्हा जो आनंद मिळतो तो इतर कशातूनही मिळू शकत नाही. या प्रक्रियेत एक लहानसा सहभाग असणे अत्यंत समाधानदायक आहे. यहोवाला आपण जे देतो, ते मोबदल्यात आपल्याला जे मिळते त्याच्या तुलनेत अगदी क्षुल्लक आहे.”

१९. आपला निर्धार काय असावा आणि का?

१९ काळाच्या ओघात आपली परिस्थिती बदलू शकते. पण देवाला केलेले आपले समर्पण मात्र बदलत नाही. आपण यहोवाचे सेवकच राहतो. अर्थात, आपल्या वेळेचा, शक्‍तीचा, कौशल्यांचा व आपल्याकडे असलेल्या इतर गोष्टींचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो याचा निर्णय यहोवाने आपल्यावर सोडला आहे. पण आपण या बाबतीत जे निर्णय घेतो, त्यांवरून आपले देवावर किती प्रेम आहे हे दिसून येते. तसेच आपण कितपत वैयक्‍तिक त्याग करण्यास तयार आहोत हे देखील यावरून दिसून येते. (मत्तय ६:३३) आपली परिस्थिती कशीही असो, पण यहोवाला आपल्या परीने सर्वात उत्तम तेच देण्याचा आपण निर्धार करू नये का? पौलाने लिहिले: “उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ असेल तसे ते मान्य होते; नसले तसे नाही.”—२ करिंथकर ८:१२.

‘तुम्हाला फळ मिळत आहे’

२०, २१. (क) देवाचे सेवक कोणते फळ उत्पन्‍न करतात? (ख) यहोवाची सेवा जे उत्तमप्रकारे करतात त्यांना तो कोणते प्रतिफळ देतो?

२० देवाचे सेवक असणे जाचक नाही. उलट, ज्यामुळे आपला आनंद हिरावून घेतला जातो अशा दुसऱ्‍या एका त्रासदायक दास्यत्वातून यामुळे आपली सुटका होते. पौलाने लिहिले: “आता तुम्हाला पापापासून मुक्‍त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे.” (रोमकर ६:२२) देवाचे दास झाल्यामुळे पवित्रीकरण असे फळ आपल्याला मिळते, ते या अर्थाने की आपले आचरण पवित्र किंवा नैतिकरित्या शुद्ध असल्यामुळे आपल्याला याचे चांगले परिणाम अनुभवण्यास मिळतात. शिवाय, भविष्यात यामुळे आपल्याला सार्वकालिक जीवन देखील मिळते.

२१ यहोवा आपल्या सेवकांशी उदारतेने वागतो. आपण त्याची सेवा आपल्या परीने उत्तमप्रकारे केल्यास, तो “आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद [आपल्यावर] वर्षितो.” (मलाखी ३:१०) यहोवाचे दास या नात्याने सर्वकाळ त्याची सेवा करत राहणे किती आनंददायक असेल! (w०५ ३/१५)

तुम्हाला आठवते का?

• आपण देवाचे सेवक का बनतो?

• आपण देवाच्या इच्छेच्या अधीन आहोत हे कशाप्रकारे दाखवतो?

• आपल्या इच्छेपेक्षा यहोवाच्या इच्छेला प्राधान्य देण्यास आपण का तयार असावे?

• आपण का ‘मागे पाहू नये’?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१४ पानांवरील चित्र]

इस्राएलातील ऐच्छिक दास्यत्वाच्या तरतूदीत ख्रिस्ती दास्यत्वाची पूर्वझलक होती

[१५ पानांवरील चित्र]

आपण आपल्या बाप्तिस्म्याच्या वेळी देवाचे दास बनतो

[१५ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती, देवाच्या इच्छेला प्राधान्य देतात