व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पहिले शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे

पहिले शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

पहिले शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोशवाने प्रतिज्ञात देश काबीज केल्यावर, एव्हाना ३०० वर्षे उलटली आहेत. हे वर्ष आहे सा.यु.पू. १११७. इस्राएलचे वडीलधारी पुरुष यहोवाच्या संदेष्ट्याकडे एक आगळीवेगळी विनंती घेऊन येतात. संदेष्ट्याने प्रार्थनेत ती बाब यहोवासमोर मांडल्यावर यहोवा त्यांची विनंती स्वीकारतो. अशारितीने, शास्त्यांचा काळ संपुष्टात येतो व मानवी राजांच्या काळाला सुरुवात होते. पहिले शमुवेल हे बायबलमधील पुस्तक, इस्राएल राष्ट्राच्या इतिहासातील या महत्त्वाच्या परिवर्तनाशी संबंधित घटनांचे वर्णन करते.

पहिले शमुवेल हे पुस्तक शमुवेल, नाथान व गाद यांनी लिहिले असून ते सा.यु.पू. ११८० ते १०७८ पर्यंत, अर्थात एकूण १०२ वर्षांच्या कालावधीत लिहिण्यात आले. (१ इतिहास २९:२९) यात इस्राएलचे नेतृत्व करणाऱ्‍या चौघांचे वर्णन केले आहे. यांपैकी दोघे शास्ते होते तर दोघे राजे होते. दोघांनी यहोवाच्या आज्ञा पाळल्या तर दोघांनी त्या पाळल्या नाहीत. याच पुस्तकात आपल्याला अनुकरणीय गुण बाळगणाऱ्‍या दोन स्त्रियांची व एका शूर परंतु मनाचा सौम्य असलेल्या योद्ध्‌याची ओळख घडते. ही उदाहरणे, आपण कोणत्या मनोवृत्तींचे व कृत्यांचे अनुकरण करावे व कोणत्या टाळाव्यात यासंबंधी अत्यंत महत्त्वाचे धडे शिकवतात. अशारितीने पहिले शमुवेल यातील माहिती आपल्या विचारांवर व कृत्यांवर जबरदस्त प्रभाव पाडू शकते.—इब्री लोकांस ४:१२.

एलीच्या ठिकाणी शमुवेल शास्ता बनतो

(१ शमुवेल १:१–७:१७)

कापणीचा सण आला आहे. रामा येथे राहणारी हन्‍ना हिला आभाळ ठेंगणे झाले आहे. * यहोवाने तिच्या प्रार्थनांचे उत्तर दिले आहे आणि तिने एका पुत्राला जन्म दिला आहे. यहोवाला केलेला नवस फेडण्याकरता हन्‍ना आपला पुत्र शमुवेल याला “परमेश्‍वराच्या मंदिरी” सेवा करण्याकरता त्याच्या स्वाधीन करते. तेथे तो मुलगा “एली याजकाच्या नजरेखाली परमेश्‍वराची सेवा” करू लागतो. (१ शमुवेल १:२४; २:११) शमुवेल अद्यापही लहानच असतो, तेव्हा यहोवा त्याच्याशी बोलतो व एलीच्या घराण्याविरुद्ध न्यायाचे भविष्य वर्तवतो. शमुवेल मोठा होतो तेव्हा इस्राएलातील सर्व लोक त्याला यहोवाचा संदेष्टा म्हणून ओळखू लागतात.

कालांतराने, पलिष्टी लोक इस्राएलवर स्वारी करतात. ते कराराचा कोश हस्तगत करतात आणि एलीच्या दोन मुलांना ठार करतात. ही बातमी ऐकल्यावर, एलीचाही मृत्यू होतो. तो “चाळीस वर्षे इस्राएलाचा शास्ता होता.” (१ शमुवेल ४:१८) परमेश्‍वराचा कोश आपल्याजवळ ठेवल्यामुळे पलिष्ट्यांवर अनेक संकटे येतात, तेव्हा ते त्यास इस्राएली लोकांकडे परत नेतात. आता शमुवेल इस्राएलचा शास्ता बनतो आणि देशात शांती नांदते.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:१०—यहोवा आपल्या “राजास बल देईल” अशी हन्‍नाने प्रार्थना का केली, कारण तेव्हा तर इस्राएल राष्ट्रात कोणीही मानवी राजा नव्हता? इस्राएलांवर मानवी राजा राज्य करील हे मोशेच्या नियमशास्त्रात भाकीत करण्यात आले होते. (अनुवाद १७:१४-१८) याकोबाने मरणासन्‍न अवस्थेत केलेल्या भविष्यवाणीत असे म्हटले: “यहूदाकडचे राजवेत्र [राज्याधिकाराचे प्रतीक] . . . त्याजकडून जाणार नाही.” (उत्पत्ति ४९:१०) शिवाय इस्राएलांची पूर्वज सारा हिच्याविषयी यहोवाने असे म्हटले: “तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील.” (उत्पत्ति १७:१६) तेव्हा, हन्‍ना ही एका भावी राजाविषयी प्रार्थना करत होती.

३:३—शमुवेल अतिपवित्र स्थानात झोपला होता का? नाही. शमुवेल हा याजक नसलेल्या कहाथी वंशाचा होता. (१ इतिहास ६:३३-३८) त्याअर्थी, त्याला ‘पवित्र वस्तू पाहण्यासाठी क्षणभरहि आत जाण्याची’ परवानगी नव्हती. (गणना ४:१७-२०) शमुवेल केवळ मंदिरातील निवासमंडपाच्या अंगणातच जाऊ शकत होता. तेथेच तो झोपला असावा. एलीसुद्धा अंगणातच कोठेतरी झोपत असावा. “जेथे देवाचा कोश होता तेथे” ही संज्ञा निवासमंडपाच्या परिसराच्या संदर्भात वापरली आहे.

७:७-९, १७—बलिदाने यहोवाने निवडलेल्या ठिकाणी नियमितरित्या चढवली जावीत असे सांगण्यात आले होते, मग शमुवेलाने मिस्पा येथे होमार्पण का केले व रामा येथे त्याने वेदी का बांधली? (अनुवाद १२:४-७, १३, १४; यहोशवा २२:१९) शिलो येथील निवासमंडपातून पवित्र कोश काढल्यानंतर यहोवाची उपस्थिती त्या ठिकाणी नव्हती. त्यामुळे देवाचा प्रतिनिधी या नात्याने शमुवेलाने मिस्पा येथे होमार्पण केले व रामा येथे एक वेदी बांधली. यहोवाने त्याच्या या कृत्यांना संमती दिली असे दिसते.

आपल्याकरता धडे:

१:११, १२, २१-२३; २:१९. हन्‍नाची प्रार्थनाशील मनोवृत्ती, तिचा नम्रपणा, यहोवाच्या दयेबद्दल तिला वाटणारी कृतज्ञता आणि शेवटपर्यंत तिला आपल्या मुलाबद्दल वाटणारी ममता हे गुण सर्व देवभीरू स्त्रियांकरता अनुकरणीय आहेत.

१:८. इतरांना आपण आपल्या शब्दांतून कसे सांत्वन देऊ शकतो याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे एलकाना! (ईयोब १६:५) सर्वप्रथम त्याने हन्‍नाला “तुझे हृदय खिन्‍न का?” असा प्रश्‍न विचारला; या प्रश्‍नातून त्याने तिच्यावर कोणताही दोष लावण्याचा प्रयत्न केला नाही. उलट या प्रश्‍नाने तिला आपल्या भावना व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन दिले. मग एलकानाने तिला आपल्या प्रेमाचे आश्‍वासन देऊन म्हटले: “मी तुला दहा पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?”

२:२६; ३:५-८, १५, १९देवाने दिलेले काम प्रामाणिकपणे करत राहिल्याने, आध्यात्मिक प्रशिक्षणाचा फायदा घेतल्याने व विनयशील व आदरशील मनोवृत्ती बाळगल्याने देव व इतर मानवही आपल्यावर “प्रसन्‍न” होतील.

४:३, ४, १०कराराचा पवित्र कोश जवळ बाळगल्याने इस्राएलांना जादुई संरक्षण मिळाले नाही. आपण ‘स्वतःस मूर्तींपासून दूर राखले पाहिजे.’—१ योहान ५:२१.

इस्राएलचा पहिला राजा—यशस्वी झाला की अयशस्वी?

(१ शमुवेल ८:१–१५:३५)

शमुवेल आपल्या जीवनभर यहोवाला विश्‍वासू राहतो पण त्याचे पुत्र त्याच्याप्रमाणे देवाला भीऊन वागत नाहीत. इस्राएलचे वडीलधारी पुरुष मानवी राजाची मागणी करतात तेव्हा यहोवा त्यांची ही विनंती मान्य करतो. शमुवेल यहोवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे बन्यामीन वंशाचा देखणा शौल याचा राजा म्हणून अभिषेक करतो. शौल अम्मोन्यांचा पराभव करून आपले राज्यपद स्थापित करतो.

शौलाचा पराक्रमी पुत्र योनाथान एक पलिष्टी सैन्याच्या तुकडीचा पराभव करतो. पलिष्टी मोठे सैन्य घेऊन इस्राएलवर चढाई करून येतात. शौल भयभीत होतो आणि देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करून स्वतःच होमार्पण करतो. शूर योनाथान केवळ आपल्या एका शस्त्रवाहक तरुण सेवकाला घेऊन पलिष्ट्यांविरुद्ध जातो आणि त्यांच्या एका ठाण्यावर हल्ला करतो. पण शौलाने अविचारीपणे घेतलेल्या शपथेमुळे त्यांना पूर्ण विजय मिळवता येत नाही. शौल आपल्या सर्व शत्रूंविरुद्ध “युद्ध” करतो. (१ शमुवेल १४:४७) अमालेकी लोकांचा पराभव केल्यानंतर मात्र “परमेश्‍वराला समर्पित” असलेल्यांना जिवंत ठेवल्यामुळे तो यहोवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतो. (लेवीय २७:२८, २९) त्यामुळे यहोवा शौलाचा एक राजा या नात्याने त्याग करतो.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

९:९—“हल्ली ज्याला संदेष्टा म्हणतात त्यास पूर्वी द्रष्टा म्हणत” या वाक्यांशाचा काय अर्थ होतो? शमुवेलाच्या काळात आणि इस्राएलात राजे राज्य करू लागले त्या काळादरम्यान संदेष्ट्यांना महत्त्वाचे स्थान लाभले आणि त्यामुळे “द्रष्टा” या शब्दाऐवजी “संदेष्टा” हा शब्द जास्त प्रचलित झाला, हे या वाक्यांशावरून सूचित होत असावे. संदेष्ट्यांच्या मालिकेत शमुवेल पहिला मानला जातो.—प्रेषितांची कृत्ये ३:२४.

१४:२४-३२, ४४, ४५—शौलाच्या शपथेचे उल्लंघन करून मध खालल्यामुळे योनाथानने देवाची मर्जी गमवली का? या कृत्यामुळे योनाथानाने देवाची संमती गमवली असे दिसत नाही. पहिले कारण म्हणजे, योनाथानला आपल्या पित्याच्या शपथेविषयी माहीत नव्हते. शिवाय, एकतर खोट्या आवेशामुळे किंवा राजाच्या अधिकाराविषयी अयोग्य दृष्टिकोनामुळे शौलाने ही शपथ घेतली आणि त्यामुळे लोकांकरता समस्या निर्माण झाली. अशा शपथेला देवाची संमती कशी असू शकत होती? शपथ मोडल्यामुळे योनाथान शिक्षा भोगण्यास तयार होता, पण त्याला मृत्यूदंड देण्यात आला नाही.

१५:६—केनी वंशाच्या लोकांची शौलाने खास दखल का घेतली? केनी वंशाचे लोक मोशेच्या सासऱ्‍याचे वंशज होते. इस्राएल लोक सीनाय पर्वतावरून दुसरीकडे जाण्यास निघाले तेव्हा या केनी लोकांनी त्यांना मदत केली होती. (गणना १०:२९-३२) कनान देशात यहुदाच्या वंशासोबत केनी लोकांनीही काही काळ वस्ती केली. (शास्ते १:१६) कालांतराने ते अमालेकी व इतर लोकांमध्ये जाऊन वसले तरीसुद्धा केनी व इस्राएल लोकांची आपसातील मैत्री कायम राहिली. म्हणूनच शौलाने केनी वंशाचा संहार केला नाही.

आपल्याकरता धडे:

९:२१; १०:२२,२७राजा झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात शौल विनयशीलपणे व नम्रपणे वागला; याच गुणांमुळे, जेव्हा काही ‘अधम लोकांनी’ त्याचे राज्यपद स्वीकारले नाही तेव्हा त्याने त्यांच्याविरुद्ध कोणतेही अविचारी कृत्य केले नाही. अशाप्रकारची मनोवृत्ती असमंजस वागणुकीपासून आपले केवढे संरक्षण करते!

१२:२०,२१मानवांवर भरवसा ठेवणे, राष्ट्रांच्या लष्करी सामर्थ्यावर विश्‍वास ठेवणे, किंवा मूर्तीपूजा यांसारख्या “निरर्थक” गोष्टींमुळे यहोवाची सेवा करण्यापासून कधीही आपले लक्ष विचलित होऊ देऊ नका.

१२:२४. सदोदीत यहोवाचे आदरपूर्वक भय मानण्याचा व पूर्ण मनाने त्याची सेवा करण्याचा मुख्य मार्ग म्हणजे त्याने प्राचीन काळात व आधुनिक काळात आपल्या लोकांकरता जी “महत्कृत्ये केली आहेत” त्यांवर मनन करणे.

१३:१०-१४; १५:२२-२५, ३०अवज्ञाकारी व अहंकारी प्रवृत्तीतून व्यक्‍त होणाऱ्‍या गर्विष्ठपणापासून सावध राहा.—नीतिसूत्रे ११:२.

एका लहान मेंढपाळ मुलाला राजा होण्याकरता निवडले जाते

(१ शमुवेल १६:१–३१:१३)

भावी राजा होण्याकरता शमुवेल यहुदाच्या वंशातील दाविदाचा अभिषेक करतो. यानंतर काही काळाने दावीद पलिष्टी महायोद्धा गल्याथ याचा गोफणीने मारलेल्या एका लहानशा दगडाने वध करतो. दावीद व योनाथान यांच्यात घनिष्ट मैत्री जुळते. शौल दाविदाला आपल्या योद्ध्‌यांचे नेतृत्व करण्यास नेमतो. दाविदाने मिळवलेल्या अनेक विजयांमुळे इस्राएलच्या स्त्रिया जयजयकार करून म्हणतात: “शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले.” (१ शमुवेल १८:७) यावर शौल मत्सराने पेटून उठतो आणि दाविदाला ठार मारण्याची संधी शोधू लागतो. शौलाच्या तीन हल्ल्यांनंतर दावीद पलायन करतो आणि निराश्रिताप्रमाणे राहू लागतो.

या काळादरम्यान, दाविदाला दोनदा शौलाला ठार मारण्याची संधी मिळते, पण तो त्याला इजा करत नाही. तसेच अबीगईल नावाच्या सुंदर स्त्रीशी त्याची ओळख होते आणि कालांतराने तो तिच्याशी लग्न करतो. पलिष्टी इस्राएलवर चढाई करून येतात तेव्हा शौल यहोवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण यहोवाने त्याला सोडलेले आहे. शमुवेलाचाही मृत्यू झाला आहे. शौलाला कोणताही मार्ग सुचत नाही, तेव्हा तो एका भूतविद्याप्रवीण स्त्रीची मदत घेतो, पण ती त्याला हेच सांगते की पलिष्ट्यांविरुद्धच्या युद्धात त्याचा वध केला जाईल. त्या लढाईत शौल गंभीररित्या जखमी होतो आणि त्याच्या पुत्रांचा मृत्यू होतो. एक अयशस्वी राजा म्हणून शौलाचा मृत्यू होतो तेव्हा हा अहवाल संपुष्टात येतो. दावीद अद्यापही अज्ञात स्थळी लपलेला आहे.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१६:१४—शौलास बाधा करणारा दुरात्मा कोण होता? शौलाची मनःशांती भंग करणारा दुरात्मा म्हणजे त्याच्या मनातील व अंतःकरणातील वाईट प्रवृत्ती—दृष्कृत्य करण्याची त्याची आंतरिक इच्छा. यहोवाने शौलाकडून आपला पवित्र आत्मा काढून घेतला तेव्हा पवित्र आत्म्याचे संरक्षण शौल गमावून बसला आणि त्याची स्वतःची वाईट प्रवृत्ती त्याच्यावर वर्चस्व करू लागली. पवित्र आत्म्याऐवजी हा वाईट आत्मा, अर्थात प्रवृत्ती शौलाठायी निर्माण होऊ देण्यास यहोवाने अनुमती दिल्यामुळे हा दुरात्मा “परमेश्‍वराकडून” होता असे म्हणण्यात आले आहे.

१७:५५१ शमुवेल १६:१७-२३ येथे दिलेली माहिती लक्षात घेता, दावीद कोणाचा पुत्र आहे असे शौलाने का विचारले? शौल केवळ दाविदाचे नाव विचारत नव्हता. तर एका महाकाय योद्ध्‌याचा वध करण्याचा आश्‍चर्यकारक पराक्रम ज्या मुलाने केला होता त्याचा पिता कोण व कसा असावा हे त्याला जाणून घ्यायचे होते, असे दिसते.

आपल्याकरता धडे:

१६:६, ७इतरांच्या केवळ बाह्‍य स्वरूपाने प्रभावित होण्याऐवजी अथवा केवळ त्या आधारावर अविचारीपणे त्यांच्याविषयी कोणतेही मत बनवण्याऐवजी आपण यहोवा त्यांना ज्या दृष्टिकोनाने पाहतो त्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

१७:४७-५०गल्याथासारख्या शत्रूंकडून होणाऱ्‍या विरोधाला किंवा छळाला आपण तोंड देऊ शकतो कारण “हे युद्ध परमेश्‍वराचे आहे.”

१८:१, ३; २०:४१, ४२यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांमध्ये आपल्याला खरे मित्र मिळू शकतात.

२१:१२, १३जीवनात उद्‌भवणाऱ्‍या कठीण प्रसंगांना तोंड देताना आपण आपल्या बौद्धिक क्षमता व कौशल्यांचा उपयोग करावा अशी यहोवा अपेक्षा करतो. त्याने आपल्याला त्याचे प्रेरित वचन दिले आहे ज्यातून आपल्याला चातुर्य, ज्ञान व चाणाक्षपण मिळू शकते. (नीतिसूत्रे १:४) तसेच आपल्याला ख्रिस्ती वडिलांचीही मदत उपलब्ध आहे.

२४:६; २६:११. यहोवाने नेमलेल्यांबद्दल मनःपूर्वक आदर बाळगण्याचे केवढे उत्कृष्ट उदाहरण दाविदाने पुरवले!

२५:२३-३३अबीगईलचे शहाणपण अनुकरणीय आहे.

२८:८-१९लोकांची दिशाभूल करण्याकरता किंवा त्यांना त्रास देण्याकरता दुरात्मे मृत व्यक्‍ती असल्याचे भासवू शकतात. आपण सर्व प्रकारच्या भूतविद्येपासून दूर राहिले पाहिजे.—अनुवाद १८:१०-१२.

३०:२३, २४हा निर्णय गणना ३१:२७ या वचनावर आधारित असून, मंडळीत जे साहाय्यक कार्ये करतात त्यांची यहोवा किती कदर करतो हे यावरून दिसून येते. तर मग आपण जे काही करतो ते ‘माणसांसाठी म्हणून नाही, तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे’ करावे.—कलस्सैकर ३:२३.

‘यज्ञांपेक्षा बरे’ काय आहे?

एली, शमुवेल, शौल व दावीद यांच्या अनुभवांवरून कोणते मूलभूत सत्य उजेडात येते? ते असे: “यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. अवज्ञा जादुगिरीच्या पातकासमान आहे, आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवतार्चन यासारखा आहे.”—१ शमुवेल १५:२२, २३.

जागतिक राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात सहभागी होण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे! यहोवाला आपल्या ‘वाणीचे फळ अर्पिताना’ त्याने आपल्या लिखित वचनाद्वारे व त्याच्या पृथ्वीवरील संघटनेद्वारे दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू या.—होशेय १४:२; इब्री लोकांस १३:१५. (w०५ ३/१५)

[तळटीप]

^ परि. 7 पहिले शमुवेल या पुस्तकात उल्लेख केलेली निरनिराळी ठिकाणे कोठे आहेत हे पाहण्याकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले “उत्तम देश पाहा” हे इंग्रजी माहितीपत्रक पाहावे.

[२० पानांवरील चित्र]

इस्राएलचा पहिला राजा नम्र व विनयशील शासक होता पण तो नंतर एक अहंकारी व गर्विष्ठ सम्राट बनला

[२१ पानांवरील चित्र]

गल्याथासारख्या शत्रूंकडून विरोधाला तोंड देताना आपण कशाविषयी खात्री बाळगू शकतो?