व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूचा जगव्याप्त प्रभाव

येशूचा जगव्याप्त प्रभाव

येशूचा जगव्याप्त प्रभाव

“येशू शुभवर्तमान वृत्तात एकांतात व जाहीररित्या जे जे काही बोलला ते सगळे अवघ्या दोन तासांच्या अवधीत भरेल. पण मोजकेच असूनही त्याचे हे बोल इतके हृदयस्पर्शी, इतके प्रेरणादायक व इतके मर्मभेदक होते, की या जगावर त्याच्याइतका इतर कोणीही प्रभाव पाडला नाही असे म्हटल्यास ती अतिशयोक्‍ती ठरणार नाही,” असे बायबल भाषांतरकार एड्‌गर गुडस्पीड यांनी लिहिले.

सा.यु. ३३ साली जेव्हा येशू ख्रिस्ताचे पृथ्वीवरील सेवाकार्य संपुष्टात आले, तेव्हा केवळ १२० स्त्रीपुरुष त्याचे अनुयायी होते. (प्रेषितांची कृत्ये १:१५) आज दोनशे कोटी लोक स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात. याव्यतिरिक्‍त कोट्यवधी लोक त्याला देवाचा संदेष्टा मानतात. खरोखर, येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकींचा मानवजातीवर विलक्षण प्रभाव पडला आहे.

स्वतः जे ख्रिस्ती नाहीत अशाही अनेक पुढाऱ्‍यांनी येशूचा सबंध जगातील लोकांवर पगडा असल्याचे कबूल केले आहे. उदाहरणार्थ, हायमन एनेलो या यहुदी धर्मोपदेशकाने लिहिले: “मानवजातीच्या धार्मिक इतिहासात येशू हा सर्वात लोकप्रिय, सर्वात अभ्यस्त व सर्वात प्रभावशाली असे व्यक्‍तिमत्त्व ठरला आहे.” एनेलो यांनी पुढे असेही म्हटले: “येशूने मानवजातीकरता जे योगदान केले आहे त्याचा कोण हिशेब लावू शकतो? त्याने प्रेरित केलेली प्रीती, त्याने दिलेले सांत्वन, त्याने घडवून आणलेले जनहित, त्याच्यामुळे स्फुरलेली आशा व आनंद हे सर्व काही मानव इतिहासात अभूतपूर्व ठरले आहे. आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्व महान व भल्या माणसांपैकी, जगव्याप्त लोकप्रियता व प्रभाव यांबाबतीत पाहू जाता, कोणत्याही व्यक्‍तीची येशूशी तुलनाही केली जाऊ शकत नाही. तो इतिहासातला सर्वात चित्तवेधक पुरुष ठरला आहे.” हिंदू नेता मोहनदास क. गांधी यांनी म्हटले: “येशू ख्रिस्ताशिवाय, मला तरी अशी दुसरी कोणतीही व्यक्‍ती माहीत नाही की जिचे मानवजातीवर इतके उपकार आहेत. खरे पाहता ख्रिस्ती धर्मात काहीच दोष नाही. दोष आहे तर तो तुम्हा ख्रिश्‍चनांचा. आपल्या धर्माच्या शिकवणुकींचे पालन करण्याची तुम्ही अद्याप सुरुवातही केलेली नाही.”

ख्रिस्ती धर्मजगताने शतकानुशतके येशूच्या शिकवणुकींचे उल्लंघन करण्याची ख्याती मिळवली आहे. ख्रिस्ती धर्माचे इतिहासकार सेसिल जॉन कादू म्हणतात, की ‘सबंध ख्रिस्ती मंडळीत पसरत असलेल्या नैतिक बेपर्वाईच्या वृत्तीची ख्रिस्ती धर्मपुढाऱ्‍यांना अगदी सा.यु. १४० पासूनच जाणीव होती.’ ते म्हणतात: “सुरुवातीच्या काटेकोर नैतिक नियमांना धाब्यावर बसवण्याच्या या वृत्तीमुळे साहजिकच जगिक चालीरितींशी समरूपता घडून आली.”

चवथ्या शतकात रोमी सम्राट कॉनस्टंटाईन याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हा हे अधिकच वेगाने घडू लागले. कादू लिहितात, “कॉनस्टान्टिनस याच्याशी केलेल्या सलगीमुळे चर्चने अनेकप्रकारे जी हातमिळवणी केली त्याची बऱ्‍याच इतिहासकारांनी दखल घेतली, आणि याविषयी खेदही व्यक्‍त केला.” त्यानंतरच्या शतकांत, स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍यांनी अशी अनेक कृत्ये केली की ज्यांकरवी त्यांनी ख्रिस्ताच्या नावाला काळिमा फासला.

तेव्हा प्रश्‍न असा उद्‌भवतो की, येशूने मुळात काय शिकवले? आणि त्याच्या शिकवणुकींचा आपल्यावर कोणता परिणाम होण्यास हवा? (w०५ ३/१५)

[३ पानांवरील चित्र]

“येशू ख्रिस्ताशिवाय, मला तरी अशी दुसरी कोणतीही व्यक्‍ती माहीत नाही की जिचे मानवजातीवर इतके उपकार आहेत.”—मोहनदास क. गांधी

[३ पानांवरील चित्र]

“या जगावर त्याच्याइतका इतर कोणीही प्रभाव पाडला नाही.”—एड्‌गर गुडस्पीड

[चित्राचे श्रेय]

Culver Pictures