व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशू ख्रिस्ताचा तुमच्या जीवनावर कितपत प्रभाव आहे?

येशू ख्रिस्ताचा तुमच्या जीवनावर कितपत प्रभाव आहे?

येशू ख्रिस्ताचा तुमच्या जीवनावर कितपत प्रभाव आहे?

याआधीच्या लेखातील माहितीवरून अगदी स्पष्ट आहे की येशूच्या शिकवणुकींचा सबंध जगातील लोकांवर प्रभाव पडला आहे. पण, “येशूच्या शिकवणुकींचा माझ्या जीवनावर कितपत प्रभाव आहे?” हा प्रश्‍न विचारणे महत्त्वाचे आहे.

येशूच्या शिकवणुकींत अनेक विषयांचा समावेश होता. त्याने दिलेले मौल्यवान धडे तुमच्या जीवनातल्या प्रत्येक पैलूवर परिणाम करू शकतात. जीवनात कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावे, देवाशी मैत्रिपूर्ण संबंध कसा जोडावा, इतरांशी चांगले संबंध कसे ठेवावेत, समस्या कशा सोडवाव्यात व हिंसक कृत्यांपासून स्वतःला कसे आवरावे या विषयांवर येशूने काय शिकवले याकडे आता आपण लक्ष देऊ या.

जीवनात कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावे

आजच्या या वेगाने पुढे चाललेल्या जगात आपल्याला इतका वेळ व शक्‍ती खर्च करावी लागते की आध्यात्मिक कार्यांकडे आपोआपच दुर्लक्ष होते. आपण एका माणसाचे उदाहरण विचारात घेऊ या. विशीतच असलेल्या या माणसाला आपण जेरी म्हणू. जेरीला आध्यात्मिक विषयांवर चर्चा करायला आवडते आणि या चर्चांमधून जे शिकायला मिळते, त्याचे महत्त्वही त्याला पटते. पण तो खेदाने म्हणतो: “नियमितरित्या अशाप्रकारच्या चर्चा करणे मला शक्यच नाही. आठवड्यातील सहा दिवस मी काम करतो. रविवारचा एकच सुटीचा दिवस. त्या दिवशीही आवश्‍यक कामे करता करता मी पार थकून जातो.” तुमचीही परिस्थिती काहीशी अशीच असेल तर डोंगरावरील प्रवचनात येशूने जे शिकवले ते तुमच्याकरता उपयुक्‍त ठरू शकेल.

येशूने आपले बोलणे ऐकण्याकरता एकत्रित झालेल्या जमावाला म्हटले: “आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्‍याची चिंता करीत बसू नका. अन्‍नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? आकाशातील पाखरांकडे निरखून पाहा; ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत की कोठारात साठवीत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो; तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहा की नाही? . . . ह्‍यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्‍या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:२५-३३) यातून आपण काय शिकतो?

आपल्या स्वतःच्या अथवा आपल्या कुटुंबियांच्या शारीरिक गरजांविषयी आपण काळजी करू नये असे येशू येथे सुचवीत नव्हता. बायबल म्हणते: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे; तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीमथ्य ५:८) पण, येशूने आश्‍वासन दिले की जर आपण आध्यात्मिक गोष्टींचे महत्त्व ओळखून त्यांना जीवनात प्राधान्य दिले तर आपल्या इतर गरजा देव अवश्‍य पूर्ण करील. येशूच्या शब्दांवरून आपण हे शिकू शकतो की जीवनात कोणत्या गोष्टींना महत्त्व देणे आवश्‍यक आहे. त्याच्या या सल्ल्याचे पालन केल्यास आपण आनंदी होऊ शकतो, कारण “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव असणारे आनंदित” असतात.—मत्तय ५:३, NW.

देवासोबत नाते जोडा

जे आपल्या आध्यात्मिक गरजांविषयी जागरूक आहेत ते देवासोबत जवळचे नाते जोडण्याचे महत्त्व ओळखतात. कोणाही व्यक्‍तीशी आपले जवळचे नाते केव्हा जुळते? यासाठी आपण त्या व्यक्‍तीची चांगल्याप्रकारे ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत नाही का? त्या व्यक्‍तीचे दृष्टिकोन, तिचा स्वभाव, क्षमता, साध्यता, आवडी-निवडी समजून घेण्याकरता पुरेसा वेळ जाऊ द्यावा लागतो. देवासोबत मैत्रिपूर्ण संबंध जोडण्याच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. त्याच्याविषयी अचूक ज्ञान घेणे गरजेचे आहे. आपल्या शिष्यांच्या संदर्भात देवाला प्रार्थना करताना येशूने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) होय, देवासोबत घनिष्ट नाते जोडण्याकरता त्याला ओळखणे महत्त्वाचे आहे. त्याला ओळखण्याचा एकच मार्ग म्हणजे देवाचे प्रेरित वचन, अर्थात बायबल. (२ तीमथ्य ३:१६) शास्त्रवचनांचा अभ्यास करण्याकरता आपण वेळ काढला पाहिजे.

पण केवळ ज्ञान घेणे पुरेसे नाही. त्याच प्रार्थनेत येशूने म्हटले: “त्यांनी तुझे वचन पाळले आहे.” (योहान १७:६) आपण देवाचे केवळ ज्ञान घेऊ नये, तर त्या ज्ञानानुसार आचरण देखील करावे. त्याशिवाय आपण देवाचे मित्र कसे बनू शकतो? जर आपण मुद्दामहून एखाद्या व्यक्‍तीच्या विचारांच्या किंवा तत्त्वांच्या विरोधात वागत असू तर आपण त्या व्यक्‍तीशी आपली मैत्री वाढण्याची अपेक्षा करू शकतो का? देवाचे दृष्टिकोन व तत्त्वे आपल्या जीवनात पदोपदी आपले मार्गदर्शक ठरले पाहिजेत. त्याची दोन तत्त्वे इतर मानवांशी आपल्या नातेसंबंधांच्या संदर्भात कशाप्रकारे समर्पक ठरू शकतात हे विचारात घ्या.

इतरांशी चांगले संबंध ठेवा

एकदा येशूने मानवी नातेसंबंधांच्या संदर्भात एक महत्त्वाचा धडा शिकवण्याच्या उद्देशाने एक लहानशी गोष्ट सांगितली. त्याने एका राजाविषयी सांगितले ज्याला आपल्या दासांचा हिशेब घ्यायचा होता. पण एका दासावर इतके मोठे कर्ज होते की ते फेडणे त्याला शक्यच नव्हते. राजाने हुकूम केला की या दासाच्या बायकोमुलांना विकून परतफेड केली जावी. पण देणेकरी दासाने राजाच्या पाया पडून त्याला विनंती केली: “मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन.” राजाला दया आली व त्याने त्या दासाचे कर्ज माफ केले. पण हा दास तेथून गेला तेव्हा त्याला दुसरा एक दास भेटला ज्याच्यावर या दासाचे लहानशा रक्कमेचे कर्ज होते. तेव्हा तो त्याच्याकडून परतफेड करण्याची मागणी करू लागला. दुसऱ्‍या दासाने गयावया केली तरीही पहिल्या दासाने तो सगळे पैसे परत करत नाही तोपर्यंत त्याला तुरुंगात टाकले. राजाने हे ऐकले तेव्हा तो क्रोधित झाला. त्याने त्या दासाला म्हटले: “मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूहि आपल्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हतीस काय?” तेव्हा त्याने क्षमा करायला तयार नसलेल्या या दासाला त्याच्यावरचे सर्व कर्ज तो फेडत नाही तोपर्यंत तुरुंगात टाकले. या गोष्टीवरून शिकावयाचा धडा कोणता? येशूने म्हटले: “जर तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताहि त्याप्रमाणेच तुमचे करील.”—मत्तय १८:२३-३५.

अपरिपूर्ण मानव या नात्याने आपण अनेक बाबतीत दोषी आहोत. देवाविरुद्ध चुका केल्यामुळे जे मोठे कर्ज आपल्यावर जमा झाले आहे ते आपण कधीही फेडू शकत नाही. आपण केवळ त्याची क्षमा मागू शकतो. आणि यहोवा आपल्या सर्व चुका पदरात घेण्यास तयार आहे. पण आधी, आपल्याविरुद्ध ज्यांनी पापे केली आहेत त्या आपल्या बांधवांना क्षमा करण्यास आपण तयार असले पाहिजे. किती जबरदस्त शिकवणूक आहे ही, नाही का? येशूने आपल्या अनुयायांना अशाप्रकारे प्रार्थना करण्यास शिकवले: “जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड.”—मत्तय ६:१२.

समस्येच्या मुळाशी जा

मानवी स्वभाव समजून घेण्याच्या बाबतीत येशू जणू एक तज्ज्ञ होता. त्याने दिलेल्या मार्गदर्शनाच्या साहाय्याने समस्यांना अगदी मुळासकट उपटून काढणे शक्य होते. पुढील दोन उदाहरणे लक्षात घ्या.

येशूने म्हटले: “‘खून करू नको, आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल.” (मत्तय ५:२१, २२) येशूने येथे स्पष्ट केले की खुनाचे कृत्य घडते तेव्हा, या समस्येचे मूळ कारण खरे तर त्या हिंसक कृत्याच्या बऱ्‍याच खोलवर दडलेले असते. ते खून करणाऱ्‍या व्यक्‍तीच्या मनात बळावत गेलेल्या मनोवृत्तीत दडलेले असते. लोकांनी आपल्या मनात इतरांविरुद्ध शत्रुत्व व संताप बाळगण्याचे सोडून दिले तर अशाप्रकारची पूर्वकल्पित हिंसेची कृत्ये होणारच नाहीत. या शिकवणुकीचे पालन केल्यास किती मोठ्या प्रमाणात रक्‍तपात टाळता येईल!

येशू कशाप्रकारे आणखी एका क्लेशदायक समस्येच्या मुळाशी जातो याकडे लक्ष द्या. त्याने जमावाला म्हटले: “‘व्यभिचार करू नको’ म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाकून दे.” (मत्तय ५:२७-२९) ही समस्या देखील केवळ त्या अनैतिक वर्तनापुरती मर्यादित नाही हे येशूने शिकवले. या समस्येच्या मुळाशी, अनैतिक कृत्य घडण्याआधी मनात उत्पन्‍न होणाऱ्‍या अनैतिक वासना आहेत. जर एका व्यक्‍तीने या अयोग्य वासनांना मनात थारा दिला नाही, आणि त्यांना मनातून ‘उपटून टाकले’ तर अनैतिक वर्तन घडण्याची संभावनाच उरणार नाही.

“तुझी तरवार परत जागच्या जागी घाल”

येशूला धरून देण्यात आले व त्याला अटक करण्यात आली त्या रात्री त्याच्या एका शिष्याने त्याच्या बचावाकरता आपली तरवार काढली. येशूने त्याला असा आदेश दिला: “तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.” (मत्तय २६:५२) दुसऱ्‍या दिवशी सकाळी येशूने पंतय पिलाताला संगितले: “माझे राज्य ह्‍या जगाचे नाही, माझे राज्य ह्‍या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही.” (योहान १८:३६) ही शिकवणूक अव्यवहारिक आहे का?

हिंसेचा मार्ग न अवलंबण्याविषयी येशूने जे शिकवले त्यासंबंधी सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांची कशी मनोवृत्ती होती? युद्धांप्रती सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांची मनोवृत्ती (इंग्रजी) या पुस्तकात असे म्हटले आहे: “ज्याअर्थी [येशूच्या शिकवणुकींनी] इतरांविरुद्ध सर्व प्रकारची हिंसा व इजा करण्यास मनाई केली होती त्याअर्थी युद्धात सहभागी होणेही अयोग्य आहे हे अभिप्रेत होते. . . . खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी येशूच्या शिकवणुकींचे तंतोतंत पालन केले आणि नम्रता व अहिंसेच्या त्याच्या शिकवणुकींचा त्यांनी शब्दशः अर्थ घेतला. शांतिप्रियतेला त्यांनी आपल्या धर्माचे ओळखचिन्ह बनवले; युद्धात होणाऱ्‍या रक्‍तपातामुळे त्यांनी युद्धांचा जोरदार धिक्कार केला.” स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍यांनी खरोखर या शिकवणुकीचे पालन केले असते, तर इतिहासाचे चित्र किती वेगळे असते!

येशूच्या सर्व शिकवणुकी तुमच्या हिताच्या आहेत

आतापर्यंत आपण विचारात घेतलेल्या येशूच्या शिकवणुकी सुंदर, साध्या परंतु अतिशय प्रभावशाली आहेत. त्याच्या शिकवणुकींशी परिचित होऊन त्यांचे पालन करणे सबंध मानवजातीकरता हिताचे आहे. *

आजपर्यंत शिकवण्यात आलेल्या सर्वात उत्तम शिकवणुकींपासून तुम्हाला कसा फायदा करून घेता येईल हे समजून घेण्याकरता तुमच्या परिसरात राहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला साहाय्य करण्यास आनंद वाटेल. आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधण्यास अथवा या नियतकालिकाच्या पृष्ठ २ वरील एखाद्या पत्त्यावर लिहिण्यास हार्दिक निवेदन करत आहोत. (w०५ ३/१५)

[तळटीप]

^ परि. 22 येशूच्या सर्व शिकवणुकींच्या क्रमवार अभ्यासाकरता, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक कृपया पाहावे.

[५ पानांवरील चित्र]

“तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो”

[७ पानांवरील चित्र]

येशूच्या शिकवणुकींचा तुमच्या जीवनावर उत्तम प्रभाव पडू शकतो