व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वतःकरता जगण्याचे सोडून देणे

स्वतःकरता जगण्याचे सोडून देणे

स्वतःकरता जगण्याचे सोडून देणे

‘[ख्रिस्त] सर्वांसाठी याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी यापुढे स्वतःकरिता जगू नये.’२ करिंथकर ५:१५.

१, २. शास्त्रवचनांतील कोणत्या आज्ञेने येशूच्या पहिल्या शतकातील अनुयायांना स्वार्थी वृत्तीवर मात करण्यास प्रवृत्त केले?

ती येशूची पृथ्वीवरील शेवटली रात्र होती. केवळ काही तासांनंतर, आपल्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांकरता तो आपल्या जिवाचे बलिदान देणार होता. त्या रात्री येशूने आपल्या विश्‍वासू प्रेषितांना अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्याने त्यांना एका अशा गुणाविषयी आज्ञा दिली की जो त्याच्या अनुयायांचे ओळखचिन्ह बनणार होता. त्याने म्हटले: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३४, ३५.

खऱ्‍या ख्रिश्‍चनांना एकमेकांबद्दल आत्मत्यागी प्रीती दाखवण्याची, स्वतःच्या गरजांपेक्षा आपल्या बांधवांच्या गरजांना महत्त्व देण्याची आज्ञा देण्यात आली आहे. त्यांनी ‘आपल्या मित्रांकरिता आपला प्राण देण्यासही’ मागेपुढे पाहू नये. (योहान १५:१३) या नव्या आज्ञेचे सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी कितपत पालन केले? अपॉलॉजी या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात दुसऱ्‍या शतकातील लेखक टर्टुलियन यांनी काहीजणांचे शब्द उद्धृत केले, जे ख्रिश्‍चनांविषयी असे म्हणत होते: ‘पाहा त्यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे; ते एकमेकांसाठी जीव द्यायलाही तयार आहेत.’

३, ४. (क) आपण स्वार्थी प्रवृत्ती का टाळली पाहिजे? (ख) या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

“एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल,” या आदेशाचे आपणही पालन केले पाहिजे. (गलतीकर ६:२) पण ख्रिस्ताच्या या आज्ञेचे पालन करण्याच्या मार्गातला, तसेच ‘आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति करण्याच्या व आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति करण्याच्या’ मार्गातला सर्वात मोठा अडथळा म्हणजे आपली स्वार्थी वृत्ती. (मत्तय २२:३७-३९) अपरिपूर्ण असल्यामुळे आपण स्वभावतःच आत्मकेंद्रित आहोत. त्यात दैनंदिन जीवनाच्या ताणतणावांची, शाळेत अथवा कार्यस्थळी असलेल्या स्पर्धात्मक वातावरणाची तसेच उदरनिर्वाहाकरता कराव्या लागणाऱ्‍या संघर्षाची भर पडल्यामुळे, ही आपली स्वाभाविक स्वार्थी वृत्ती अधिकच वाढते. आजही स्वार्थी प्रवृत्ती कमी होत असल्याचे चिन्ह दिसत नाही. प्रेषित पौलाने हा इशारा दिला होता: ‘शेवटल्या काळी . . . माणसे अतिशय आत्मकेंद्रित होतील.’२ तीमथ्य ३:१, २, फिलिप्स भाषांतर.

पृथ्वीवरील सेवाकार्याच्या शेवटास, येशूने आपल्या शिष्यांना स्वार्थी प्रवृत्तीवर मात करण्याकरता तीन पावले उचलण्याचा सल्ला दिला. ही तीन पावले कोणती होती आणि त्याच्या सल्ल्याचा आपल्याला कशाप्रकारे फायदा होऊ शकतो?

परिणामकारक उपाय!

५. उत्तर गालीलात प्रचार करत असताना, येशूने आपल्या शिष्यांना काय प्रकट केले आणि ही माहिती मिळाल्यावर त्यांना धक्का का बसला?

येशू उत्तर गालीलात कैसरिया फिलिप्पी येथे प्रचार करत होता. हे शांततापूर्ण, निसर्गरम्य ठिकाण आत्मत्यागाविषयी शिकण्यापेक्षा करमणुकीसाठी सुयोग्य होते. पण तेथे असताना, येशूने आपल्या शिष्यांना “मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्‍यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे व तिसऱ्‍या दिवशी उठविले जावे ह्‍याचे अगत्य आहे,” हे प्रकट करू लागला. (मत्तय १६:२१) ही माहिती येशूच्या शिष्यांकरता अतिशय धक्केदायक असावी कारण तोपर्यंत ते अशी अपेक्षा करत होते, की आपला नेता या पृथ्वीवरच त्याचे राज्य स्थापन करेल.—लूक १९:११; प्रेषितांची कृत्ये १:६.

६. येशूने पेत्राला का खडसावले?

६ पेत्र लगेच “त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, ‘प्रभुजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही.’” यावर येशूची प्रतिक्रिया काय होती? “तो वळून पेत्राला म्हणाला, ‘अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.’” पेत्राच्या व येशूच्या दृष्टिकोनांत खरच किती फरक होता! काही महिन्यांतच येशूचा वधस्तंभावर मृत्यू होणार होता. देवाने आपल्याला नेमून दिलेले हे आत्मत्यागी मार्गाक्रमण येशूने स्वच्छेने स्वीकारले. पेत्राने मात्र अगदी आरामाचा मार्ग निवडण्याचे सुचवले. तो म्हणाला, “आपणावर दया असो.” अर्थात, असे म्हणण्यामागे पेत्राचा हेतू चांगला होता. तरीसुद्धा येशूने त्याला खडसावले कारण त्या प्रसंगी पेत्राने स्वतःवर सैतानाचा प्रभाव पडू दिला होता. पेत्राने ‘देवाच्या गोष्टींकडे नव्हे तर माणसांच्या गोष्टींकडे’ लक्ष लावले होते.—मत्तय १६:२२, २३.

७. मत्तय १६:२४ यात सांगितल्याप्रमाणे येशूने आपल्या अनुयायांना काय करण्यास सांगितले?

पेत्राने येशूला जे म्हटले होते त्याच आशयाचे बोल आजही ऐकायला मिळतात. हे जग सहसा ‘स्वतःची सोय पाहण्याचे’ किंवा ‘कमीतकमी संघर्षाचा मार्ग निवडण्याचे’ प्रोत्साहन देते. येशू मात्र पूर्णपणे वेगळी अशी मनोवृत्ती बाळगण्याची शिफारस करतो. त्याने आपल्या शिष्यांना सांगितले: “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.” (मत्तय १६:२४) द न्यू इंटरप्रिटर्स बायबल यानुसार, “या शब्दांत बाहेरच्या लोकांना शिष्य होण्याचे निवेदन करण्यात आलेले नाही, तर ज्यांनी आधीच येशूच्या हाकेला प्रतिसाद दिला आहे त्यांना, शिष्यत्वाचा काय अर्थ होतो यावर विचार करण्याचे आमंत्रण आहे.” या वचनात सांगितल्याप्रमाणे येशूने जी तीन पावले उचलण्याचा सल्ला दिला ती विश्‍वास ठेवणाऱ्‍या व्यक्‍तींनी उचलायची आहेत. यांपैकी प्रत्येक पावलाची आपण चर्चा करू या.

८. स्वतःचा त्याग करण्याचा काय अर्थ होतो हे स्पष्ट करा.

सर्वप्रथम आपण स्वतःचा त्याग केला पाहिजे. “स्वतःचा त्याग करणे” असे भाषांतर केलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वार्थी इच्छांना झिडकारणे किंवा स्वतःची सोय न पाहणे असा होतो. स्वतःचा त्याग करणे म्हणजे केवळ अधूनमधून काही सुखसोयींचा त्याग करणे नव्हे; दुसरीकडे पाहता वैरागी बनणे किंवा आत्मनाशक प्रवृत्ती बाळगणे असाही त्याचा अर्थ होत नाही. आपण “स्वतःचे मालक नाही” याचा अर्थ आपण आपले संपूर्ण जीवन आणि आपल्या जीवनातल्या सर्व गोष्टी स्वेच्छेने यहोवाच्या स्वाधीन करतो. (१ करिंथकर ६:१९, २०) आत्मकेंद्रित असण्याऐवजी आपण देवाच्या सेवेवर लक्ष केंद्रित करतो. स्वतःचा त्याग करण्याचा अर्थ आपण देवाची इच्छा पूर्ण करण्याचा निश्‍चय करतो; आणि आपल्या अपरिपूर्ण इच्छा आपल्याला दुसरे काही करण्यास उद्युक्‍त करत असतील तरीसुद्धा आपण या निश्‍चयापासून पराङ्‌मुख होत नाही. देवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपण दाखवतो की आपण देवाला पूर्णपणे एकनिष्ठ आहोत. त्यानंतर आपल्या उर्वरित आयुष्यात आपण त्या समर्पणाला आठवणीत ठेवूनच जगण्याचा प्रयत्न करतो.

९. (क) येशू पृथ्वीवर होता तेव्हा, वधस्तंभ कशाचे प्रतिक होता? (ख) आपला वधस्तंभ उचलण्याचा काय अर्थ होतो?

दुसरे पाऊल म्हणजे आपण आपला वधस्तंभ उचलला पाहिजे. पहिल्या शतकात वधस्तंभ हा यातना, निंदा व मृत्यूचे प्रतिक होता. सहसा केवळ गुन्हेगारांनाच वधस्तंभावर मृत्यूदंड दिला जायचा, अथवा त्यांचे मृतदेह एका स्तंभावर लटकवले जायचे. या शब्दाचा वापर करताना येशू हेच सुचवीत होता, की ख्रिस्ती व्यक्‍तीने छळ, निंदा किवा मृत्यू देखील पत्करण्यास तयार असले पाहिजे कारण ख्रिस्ती या नात्याने आपण या जगाचे नाही. (योहान १५:१८-२०) आपल्या ख्रिस्ती आदर्शांमुळे आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि त्यामुळे जगाचे लोक कदाचित आपली ‘निंदा करतील.’ (१ पेत्र ४:४) हे शाळेत, कार्यस्थळी, किंवा कुटुंबातही घडू शकते. (लूक ९:२३) पण आपण जगाचा हा तिरस्कार सहन करण्यास तयार आहोत कारण आपण स्वतःकरता जगत नाही. येशूने म्हटले: “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरूद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गांत तुमचे प्रतिफळ मोठे आहे.” (मत्तय ५:११, १२) खरोखर, देवाची संमती मिळवण्यापेक्षा जास्त महत्त्वाची कोणतीच गोष्ट असू शकत नाही.

१०. येशूला अनुसरणे म्हणजे काय?

१० येशूने सांगितलेली तिसरी गोष्ट म्हणजे आपण त्याला अनुसरावे. डब्ल्यू. ई. व्हाईन यांच्या ॲन एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट वड्‌र्स नावाच्या शब्दकोशात, अनुसरणे या शब्दाचा अर्थ एक साथीदार बनणे—“एकाच वाटेने जाणे” असा होतो. पहिले योहान २:६ म्हणते: “मी त्याच्या [देवाच्या] ठायी राहतो, असे म्हणणाऱ्‍याने तो [ख्रिस्त] जसा चालला तसे स्वतःहि चालले पाहिजे.” येशू कसा चालला? आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल व आपल्या शिष्यांबद्दल असलेल्या प्रेमामुळे येशूच्या वागणुकीत स्वार्थीपणाचा अंशही नव्हता. पौलाने लिहिले: ‘ख्रिस्ताने स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही.’ (रोमकर १५:३) थकलेला अथवा भुकेने व्याकूळ झालेला असतानाही येशूने आपल्या गरजांपेक्षा इतरांच्या गरजांना प्राधान्य दिले. (मार्क ६:३१-३४) राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यातही येशू झटला. ‘सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; व जे काही येशूने आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा’ ही आपल्याला देण्यात आलेली आज्ञा आवेशाने पूर्ण करत असताना आपणही येशूचे अनुकरण करू नये का? (मत्तय २८:१९, २०) येशूने सर्व बाबतीत आपल्याकरता आदर्श ठेवला आणि म्हणूनच आपण “त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे.”—१ पेत्र २:२१.

११. स्वतःचा त्याग करणे, आपला वधस्तंभ उचलणे आणि सातत्याने येशूला अनुसरणे का महत्त्वाचे आहे?

११ स्वतःचा त्याग करणे, आपला वधस्तंभ उचलणे आणि सातत्याने आपला आदर्श येशू ख्रिस्त याचे अनुसरण करणे अत्यंत महत्वाचे आहे. हाच स्वार्थी वृत्तीवर मात करण्याचा उपाय आहे. शिवाय येशूने असेही म्हटले होते: “जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो, तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार?”—मत्तय १६:२५, २६.

आपण दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही

१२, १३. (क) येशूचा सल्ला घेण्यास आलेल्या तरुण अधिकाऱ्‍यासमोर कोणती समस्या होती? (ख) येशूने त्या तरुणाला काय सल्ला दिला आणि का?

१२ येशूने आपल्या शिष्यांना स्वतःचा त्याग करण्याच्या महत्त्वाविषयी सांगितले, त्याच्या काही महिन्यांनंतर एक तरुण अधिकारी त्याच्याकडे आला व त्याला म्हणाला: “गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे?” येशूने त्याला “आज्ञा पाळ” असे सांगितले आणि काही आज्ञांचा उल्लेखही केला. तेव्हा तो तरुण म्हणाला की “मी हे सर्व पाळिले आहे.” साहजिकच हा माणूस निष्कपट मनाचा होता आणि मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञांचे पालन त्याने आपल्या परीने केले होते. म्हणूनच त्याने येशूला विचारले: “माझ्या ठायी अजून काय उणे आहे?” तेव्हा येशूने या तरुण अधिकाऱ्‍याला एक असाधारण निमंत्रण दिले. तो म्हणाला: “पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल-नसेल ते विकून दरिद्र्‌यांस दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.”—मत्तय १९:१६-२१.

१३ संपूर्ण मनाने यहोवाची सेवा करण्याकरता या तरुण मनुष्याने आपले लक्ष विचलित करणाऱ्‍या सर्वात मोठ्या गोष्टीपासून, अर्थात त्याच्या संपत्तीपासून स्वतःला मुक्‍त केले पाहिजे हे येशूने ओळखले होते. ख्रिस्ताचा खरा शिष्य दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तो “देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.” (मत्तय ६:२४) त्याचा “डोळा निर्दोष” असला पाहिजे, म्हणजेच आध्यात्मिक गोष्टींवर त्याचे लक्ष केंद्रित असले पाहिजे. (मत्तय ६:२२) स्वतःची संपत्ती गरिबांना देऊन टाकणे हे आत्मत्यागाचे कृत्य आहे. या भौतिक त्यागाच्या मोबदल्यात, येशूने त्या तरुण अधिकाऱ्‍याला स्वर्गात अमूल्य खजिना साठवण्याची संधी देऊ केली. हा खजिना त्याला सार्वकालिक जीवन आणि ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्याची वैभवी आशा मिळवून देणार होता. पण तो तरुण अधिकारी त्याग करण्यास तयार नव्हता. तो “खिन्‍न होऊन निघून गेला; कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती.” (मत्तय १९:२२) पण येशूच्या इतर अनुयायांची प्रतिक्रिया यापेक्षा वेगळी होती.

१४. येशूने मासे धरणाऱ्‍या चौघांना आपल्या मागे येण्याचे निमंत्रण दिले तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती?

१४ सुमारे दोन वर्षांपूर्वी येशूने पेत्र, अंद्रिया, याकोब व योहान या चार मच्छिमारांनाही अशाचप्रकारचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी यांपैकी दोघे मासे पकडत होते तर दोघे आपली जाळी नीट करण्यात व्यग्र होते. येशू त्यांना म्हणाला: “माझ्यामागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” त्या चौघांनीही आपला मासेमारीचा व्यवसाय सोडला व त्यानंतर ते आयुष्यभर येशूचे अनुसरण करत राहिले.—मत्तय ४:१८-२२.

१५. आधुनिक काळात यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकीने येशूचे अनुसरण करण्याकरता कोणते त्याग केले?

१५ आजही अनेक ख्रिश्‍चनांनी, येशूकडे आलेल्या तरुण अधिकाऱ्‍याऐवजी मासे धरणाऱ्‍या चौघा शिष्यांचे अनुकरण केले आहे. यहोवाची सेवा करण्याकरता त्यांनी या जगातील संपत्ती व सुसंधींचा त्याग केला आहे. डेबोरा सांगते: “मी २२ वर्षांची असताना मला एक मोठा निर्णय घ्यावा लागला.” याविषयी आणखी खुलासा करून ती सांगते: “तेव्हा मी जवळजवळ सहा महिन्यांपासून बायबल अभ्यास करत होते आणि मला आपले जीवन यहोवाला समर्पित करण्याची इच्छा होती. पण माझ्या कुटुंबातील सदस्य खूप विरोध करत होते. ते करोडपती होते आणि मी साक्षीदार झाल्यास त्यांची समाजात नालस्ती होईल असे त्यांना वाटत होते. त्यांनी मला निर्णय घेण्याकरता २४ तासांचा अवधी दिला. ऐषोआरामाचे जीवन किंवा सत्य या दोन गोष्टींपैकी एक मला निवडावे लागणार होते. जर मी साक्षीदारांशी पूर्णपणे संबंध तोडून टाकला नाही तर मला कुटुंबाच्या संपत्तीचा वाटा मिळणार नाही असे सांगण्यात आले. पण यहोवाने मला योग्य निर्णय घेण्याचे आणि त्या निर्णयानुसार वागण्याचे सामर्थ्य दिले. मागची ४२ वर्षे मी पूर्ण वेळेच्या सेवेत खर्च केली आहेत आणि मी घेतलेल्या निर्णयाचा मला कधीही पस्तावा झाला नाही. आत्मकेंद्रित, चंगळवादी जीवनशैली झिडकारल्यामुळे, माझ्या कुटुंबातील सदस्य जे उद्देशहीन, उदासवाणे जीवन जगताना मला दिसतात, ते मला टाळता आले. माझ्या पतीसोबत मिळून, मी शंभरपेक्षा अधिक व्यक्‍तींना सत्य शिकण्यास मदत केली आहे. भौतिक संपत्तीपेक्षा माझी ही आध्यात्मिक मुले मला जास्त प्रिय आहेत.” यहोवाच्या साक्षीदारांपैकी इतर लाखो जणांच्याही तिच्यासारख्याच भावना आहेत. तुमच्या बाबतीत काय?

१६. आपण स्वतःकरता जगत नाही हे आपण कसे दाखवू शकतो?

१६ स्वतःकरता न जगण्याच्या इच्छेने यहोवाच्या साक्षीदारांपैकी हजारो जणांना पायनियर म्हणजेच पूर्णवेळचे प्रचारक या नात्याने सेवा करण्यास प्रेरित केले. ज्यांना आपल्या परिस्थितीमुळे पूर्णवेळेच्या सेवेत सहभाग घेणे शक्य नाही अशांनीही पायनियर आत्मा विकसित करून राज्य प्रचाराच्या कार्याला आपल्या कुवतीप्रमाणे पाठबळ दिले. पालकही अशाचप्रकारची मनोवृत्ती दाखवतात. कशाप्रकारे? आपल्या मुलांना आध्यात्मिक प्रशिक्षण देण्याकरता बराच वेळ खर्च करण्याद्वारे व याकरता आपली वैयक्‍तिक कामे बाजूला ठेवण्याद्वारे. या ना त्या मार्गाने आपल्यापैकी प्रत्येकजण, राज्याच्या कार्याला आपण आपल्या जीवनात प्राधान्य देत आहोत हे दाखवू शकतो.—मत्तय ६:३३.

कोणाचे प्रेम आपल्याला भाग पाडते?

१७. त्याग करण्यास कोणती गोष्ट आपल्याला प्रवृत्त करते?

१७ आत्मत्यागी प्रीती दाखवण्याचा मार्ग हा सहसा सर्वात सोपा मार्ग नसतो. पण असे करण्यास कोणती गोष्ट आपल्याला भाग पाडते याचा विचार करा. पौलाने लिहिले: “ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते, कारण आमची खात्री झाली आहे की, जर एक सर्वांसाठी मेला . . . तो सर्वांसाठी मेला, यासाठी की जे जगतात त्यांनी स्वतःसाठीच जगू नये तर जो त्यांच्यासाठी मेला व पुन्हा उठला त्याच्यासाठी जगावे.” (२ करिंथकर ५:१४, १५, इझी टू रीड व्हर्शन) तर ख्रिस्ताचे प्रेम आपल्याला स्वतःसाठीच न जगण्याची प्रेरणा देते. ही किती जोरदार प्रेरणा आहे! ख्रिस्ताने आपल्याकरता त्याचा जीव दिला, तेव्हा आपण त्याच्याकरता जगावे हे आपले नैतिक कर्तव्य ठरत नाही का? शेवटी, देवाने व ख्रिस्ताने आपल्याबद्दल दाखवलेल्या अगाध प्रीतीविषयी कृतज्ञता वाटत असल्यामुळेच तर आपण आपले जीवन देवाला समर्पित करून ख्रिस्ताचे शिष्य बनण्यास प्रवृत्त झालो होतो.—योहान ३:१६; १ योहान ४:१०, ११.

१८. आत्मत्यागी मार्गाक्रमण आपल्या हिताचे का आहे?

१८ स्वतःसाठीच न जगणे हे आपल्या हिताचे आहे का? येशूकडे आलेला तरुण अधिकारी, त्याचे निमंत्रण नाकारून निघून गेल्यावर पेत्र येशूला म्हणाला: “पाहा, आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहो, तर आम्हाला काय मिळणार?” (मत्तय १९:२७) पेत्र आणि इतर प्रेषितांनी खरोखरच सर्व काही सोडले होते. त्यांचे प्रतिफळ काय असणार होते? सर्वप्रथम येशूने स्वर्गात आपल्यासोबत राज्य करण्याचा जो बहुमान त्यांना मिळणार होता त्याच्याविषयी सांगितले. (मत्तय १९:२८) त्याचप्रसंगी येशूने अशा आशीर्वादांविषयीही सांगितले की जे त्याच्या प्रत्येक अनुयायांना मिळतील. त्याने म्हटले: “ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्‍या युगात सार्वकालिक जीवनही मिळाल्याशिवाय राहणार नाही.” (मार्क १०:२९, ३०) आपण ज्या गोष्टींचा त्याग केला आहे त्यांच्या तुलनेत कितीतरी जास्त पटीने आपल्याला परत मिळते. राज्याकरता आपण जे काही त्यागले आहे त्याच्या तुलनेत आपले आध्यात्मिक आईबाप, बहीणभाऊ व मुलेबाळे जास्त मोलवान नाहीत का? कोणाचे जीवन जास्त समाधानकारक ठरले—पेत्राचे की त्या तरुण अधिकाऱ्‍याचे?

१९. (क) खरा आनंद कशावर अवलंबून आहे? (ख) पुढील लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?

१९ येशूने आपल्या शब्दांतून व कृतींतून दाखवले की खरा आनंद हा इतरांना दिल्यामुळे व त्यांची सेवा केल्यामुळे मिळतो, स्वार्थीपणामुळे नव्हे. (मत्तय २०:२८; प्रेषितांची कृत्ये २०:३५) आपण स्वतःसाठीच जगण्याचे सोडून देतो आणि सातत्याने ख्रिस्ताचे अनुसरण करू लागतो तेव्हा आपल्याला सध्याच्या जीवनात तर मोठे समाधान मिळतेच पण भविष्यात सार्वकालिक जीवनाची आशाही आपल्याला लाभते. अर्थात आपण स्वतःचा त्याग करतो तेव्हा यहोवा आपला मालक बनतो. आणि त्याअर्थी साहजिकच आपण देवाचे दास बनतो. देवाचे दास्यत्व समाधानदायक का आहे? त्याचा आपल्या जीवनातील निर्णयांवर कशाप्रकारे परिणाम होतो? पुढील लेखात या प्रश्‍नांची चर्चा केली आहे. (w०५ ३/१५)

तुम्हाला आठवते का?

• स्वार्थी प्रवृत्तीवर मात करण्याचा आपण का प्रयत्न केला पाहिजे?

• स्वतःचा त्याग करणे, आपला वधस्तंभ उचलणे व सातत्याने येशूचे अनुसरण करणे याचा काय अर्थ होतो?

• कोणती गोष्ट आपल्याला स्वतःसाठी जगण्याचे सोडून देण्यास प्रवृत्त करते?

• आत्मत्यागी जीवन जगणे आपल्या हिताचे का आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

“प्रभुजी, आपणावर दया असो”

[११ पानांवरील चित्र]

तरुण अधिकारी येशूचा अनुयायी का बनू शकला नाही?