व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पुनरुत्थानाची आशा तुम्हाला मोलाची वाटते का?

पुनरुत्थानाची आशा तुम्हाला मोलाची वाटते का?

पुनरुत्थानाची आशा तुम्हाला मोलाची वाटते का?

“तू आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करितोस.”स्तोत्र १४५:१६.

१-३. काहीजणांना भविष्याबाबत कोणती आशा आहे? उदाहरण देऊन सांगा.

एके दिवशी सकाळी नऊ वर्षांचा क्रिस्टफर व त्याचा मोठा भाऊ, या दोघांनी आपली मावशी, काका आणि दोन मावसभावांसोबत इंग्लंडमधील मँचेस्टर शहराजवळच्या एका परिसरात घरोघरचे ख्रिस्ती सेवाकार्य केले. यानंतर काय घडले याविषयी या नियतकालिकासोबतचे सावध राहा! यात पुढील अहवाल देण्यात आला. “दुपारी ते सर्व मिळून जवळच्याच ब्लॅकपूल नावाच्या ठिकाणी, समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्टवर जायला निघाले. वाटेत झालेल्या मोटारींच्या दुर्घटनेत ते सहाही जण जागीच ठार झाले. एकूण १२ जणांचा बळी घेणारी ‘ही दुर्घटना अतिशय भयानक’ होती असे पोलिसांनी सांगितले.

दुर्घटनेच्या आदल्या रात्री हे कुटुंब मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला गेले होते. त्या दिवशी मृत्यूच्या विषयावर चर्चा करण्यात आली. क्रिस्टफरच्या वडिलांनी सांगितले: “क्रिस्टफर अगदी लहानपणापासूनच फार विचारी मुलगा होता. त्या रात्री तो नव्या जगाबद्दल आणि भविष्याबाबत आपल्या आशेबद्दल स्पष्टपणे बोलला. नंतर आमची चर्चा चालली असताना क्रिस्टफर अचानक म्हणाला: ‘यहोवाचे साक्षीदार असण्याचा हा एक फायदा आहे. आपल्यापैकी कोणाचा मृत्यू झाला तर अर्थात दुःख तर होतं, पण आपल्याला पक्के माहीत आहे की एक न एक दिवशी आपली या पृथ्वीवर पुन्हा भेट होणार.’ त्याचे हे शब्द आमच्याकरता अविस्मरणीय ठरतील हे त्या क्षणाला आमच्यापैकी कोणालाही वाटलं नव्हतं.” *

कित्येक वर्षांआधी, १९४० साली फ्रान्झ नावाच्या एका ऑस्ट्रियन साक्षीदाराने यहोवाच्या नियमांविरुद्ध कार्य करण्यास नकार दिल्यामुळे त्याला मृत्यूदंड सुनावण्यात आला. बर्लिनच्या कारागृहातून फ्रान्झने आपल्या आईला हे पत्र लिहिले: “माझ्या मते, ती [लष्करात सामील होण्याची] शपथ घेणे हे पाप होते, ज्याची शिक्षा मृत्यू आहे. मी ते घोर पाप कदापि करू शकत नव्हतो. जर मी ते केले असते तर मला पुनरुत्थानाची आशा नसती. . . . प्रिय आई, आणि माझ्या सर्व बांधवांनो, आज मला शिक्षा सुनावण्यात आली. तुम्ही घाबरू नका, पण ती मृत्यूची शिक्षा आहे. उद्या माझा शिरच्छेद केला जाईल. गतकाळातल्या सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांना ज्याप्रमाणे देवाने बळ दिले तसेच मलाही तोच बळ देतोय. . . . तुम्ही मृत्यूपर्यंत खंबीर राहिलात, तर पुनरुत्थानात आपण पुन्हा भेटू. . . . तेव्हा, पुन्हा आपली भेट होईपर्यंत, निरोप घेतो.” *

४. येथे दिलेले अनुभव वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटले आणि आता आपण कशाविषयी पाहणार आहोत?

क्रिस्टफर व फ्रान्झ या दोघांना पुनरुत्थानाच्या आशेचे मोल होते. ही आशा त्यांच्याकरता वास्तविक होती. त्यांचे अनुभव नक्कीच हृदयस्पर्शी आहेत. पुनरुत्थानाच्या आशेच्या संदर्भात, यहोवाबद्दल आपली कृतज्ञता वाढवण्याकरता आणि आपली ही आशा दृढ करण्याकरता, मुळात पुनरुत्थान का होईल आणि यामुळे व्यक्‍तिशः आपल्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे हे आता विचारात घेऊ या.

पृथ्वीवरील पुनरुत्थानाचा दृष्टान्त

५, ६. प्रेषित योहानाने प्रकटीकरण २०:१२, १३ येथे ज्या दृष्टान्ताविषयी लिहिले त्यातून काय प्रकट होते?

ख्रिस्त येशूच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान घडणाऱ्‍या घटनांच्या दृष्टान्तात प्रेषित योहानाला पृथ्वीवरील पुनरुत्थान घडताना दिसले. याविषयी त्याने असे लिहिले: “मग मृत झालेल्या लहानथोरांना मी . . . पाहिले. . . . समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक ह्‍यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले.” (प्रकटीकरण २०:१२, १३) हेडीस (शेओल) अर्थात मनुष्याच्या सर्वसामान्य कबरेत बंदिस्त असलेल्या सर्व “लहानथोरांना,” मग त्यांचा दर्जा किंवा स्थान काहीही असो, त्यांना उठवले जाईल. ज्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला ते देखील त्यावेळी पुन्हा जिवंत होतील. ही अद्‌भूत घटना यहोवाच्या उद्देशात समाविष्ट आहे.

सैतानाला बंदिवान करून अथांग डोहात टाकले जाईल तेव्हा ख्रिस्ताचे हजार वर्षांचे राज्य सुरू होईल. त्या राज्यादरम्यान, पुनरुत्थान झालेल्या अथवा मोठ्या संकटातून बचावून आलेल्या कोणालाही सैतान बहकवू शकणार नाही कारण तो अक्रियाशील असेल. (प्रकटीकरण २०:१-३) हजार वर्षे कदाचित तुम्हाला फार मोठा अवधी वाटत असेल, पण यहोवाच्या दृष्टीने हजार वर्षे केवळ “एका दिवसासारखी आहेत.”—२ पेत्र ३:८.

७. ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान कशाच्या आधारावर लोकांचा न्याय केला जाईल?

या दृष्टान्तानुसार, ख्रिस्ताचे हजार वर्षांचे राज्य हा न्यायाचा काळ असेल. प्रेषित योहानाने लिहिले: “मग मृत झालेल्या लहानथोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी पुस्तके उघडली गेली; तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले ते जीवनाचे होते; आणि त्या पुस्तकांमध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला. . . . आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला.” (प्रकटीकरण २०:१२, १३) हा न्याय एखाद्या व्यक्‍तीने मृत्यूआधी काय केले व काय केले नाही या आधारावर केला जाणार नाही. (रोमकर ६:७) तर, जी “पुस्तके” उघडली जातील त्यांच्याशी याचा संबंध आहे. या पुस्तकांतील माहिती समजल्यानंतर एखाद्या व्यक्‍तीने जी कृत्ये केली त्या कृत्यांच्या आधारावर हे ठरवले जाईल की त्या व्यक्‍तीचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकात’ लिहिले जावे किंवा नाही.

‘जीवनाचे पुनरुत्थान’ की ‘न्यायाचे पुनरुत्थान’

८. पुनरुत्थान झालेल्यांकरता कोणते दोन पर्याय असतील?

याआधी योहानाच्या दृष्टान्तात, येशूजवळ “मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या” आहेत असे सांगण्यात आले आहे. (प्रकटीकरण १:१८) तो यहोवाने नियुक्‍त केलेला ‘जीवनाचा अधिपती’ असून त्याला “जिवंताचा व मृतांचा” न्याय करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. (प्रेषितांची कृत्ये ३:१५; २ तीमथ्य ४:१) तो हे कसे करील? तर मृतांना पुन्हा जिवंत करण्याद्वारे. येशूने लोकांना सांगितले: “ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८-३०) मग, प्राचीन काळच्या विश्‍वासू स्त्रीपुरुषांचे भविष्य काय असेल?

९. (क) पुनरुत्थान झाल्यावर अनेकांना काय शिकण्यास मिळेल? (ख) कोणते प्रचंड शैक्षणिक कार्य तेव्हा हाती घेतले जाईल?

प्राचीन विश्‍वासू व्यक्‍ती पुनरुत्थान होऊन परत येतील तेव्हा त्यांना लवकरच कळेल की ज्या प्रतिज्ञांवर त्यांनी विश्‍वास ठेवला होता, त्या आता वास्तवात उतरल्या आहेत. उत्पत्ति ३:१५ या बायबलच्या पहिल्या भविष्यवाणीत उल्लेख असलेली, देवाच्या स्त्रीची संतती कोण आहे हे जाणून घ्यायला ते किती उत्सुक असतील! प्रतिज्ञा करण्यात आलेला हा मशीहा, अर्थात येशू मृत्यूपर्यंत कसा विश्‍वासू राहिला आणि अशारितीने त्याने कसे आपले जीवन खंडणी बलिदान म्हणून अर्पण केले हे समजल्यावर त्यांना किती आनंद होईल! (मत्तय २०:२८) शिवाय जे त्यांचे स्वागत करतील त्यांनाही, हे खंडणी बलिदान कशाप्रकारे यहोवाच्या अपात्री कृपेचा व दयेचा पुरावा आहे हे समजून घेण्यास या पुनरुत्थित व्यक्‍तींना मदत करताना किती आनंद वाटेल. पृथ्वीकरता यहोवाचा उद्देश देवाच्या राज्याच्या माध्यमाने कशाप्रकारे पूर्ण केला जात आहे याची जाणीव झाल्यावर पुनरुत्थान झालेल्या व्यक्‍ती नक्कीच यहोवाची भरभरून स्तुती करतील. आपला प्रेमळ पिता व त्याचा पुत्र यांच्याप्रती आपली एकनिष्ठता आपल्या कार्यांतून दाखवण्याच्या अनेक संधी त्यांच्याजवळ असतील. कबरेतून परत येणाऱ्‍या अब्जावधी लोकांनाही देवाच्या खंडणीच्या तरतुदीचा स्वीकार करावा लागेल. तेव्हा या सर्वांना शिकवण्याकरता आवश्‍यक असलेल्या प्रचंड शैक्षणिक कार्याला हातभार लावण्यास तेव्हा जिवंत असलेल्या सर्वांनाच आनंद वाटेल.

१०, ११. (क) हजार वर्षांच्या राज्यामुळे पृथ्वीवर राहणाऱ्‍या सर्वांना कोणती संधी मिळेल? (ख) याचा आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे?

१० पुनरुत्थान झालेल्या अब्राहामला ज्या “नगराची” तो वाट पाहात होता, त्यात वास्तवात राहण्याचा अनुभव घेताना किती सांत्वन मिळेल. (इब्री लोकांस ११:१०) प्राचीन काळच्या विश्‍वासू ईयोबालाही जेव्हा कळेल, की त्याच्या जीवनाच्या उदाहरणाकडे पाहून यहोवाच्या इतर सेवकांनाही आपल्या विश्‍वासाची परीक्षा घेतली जात असताना धैर्य मिळाले तेव्हा त्याला किती समाधान वाटेल! आणि दानीएलाला ज्या भविष्यवाण्या लिहून ठेवण्यास प्रेरित करण्यात आले होते, त्या भविष्यवाण्यांची कशाप्रकारे पूर्णता झाली हे जाणून घ्यायला तो किती उत्सुक असेल!

११ खरोखर, ज्यांना देवाच्या नीतिमान नव्या जगात जगण्याची संधी मिळेल, मग ती पुनरुत्थानाद्वारे असो अथवा मोठ्या संकटातून बचावण्याद्वारे असो; त्या सर्वांना पृथ्वीकरता व तिच्या रहिवाशांकरता असलेल्या यहोवाच्या उद्देशाविषयी बरेच काही जाणून घ्यावे लागेल. सर्वकाळ जगण्याची आणि सर्वकाळ यहोवाची स्तुती करत राहण्याची आशा असल्यामुळे, हजार वर्षांच्या राज्यादरम्यानचे शैक्षणिक कार्य खरोखरच अतिशय आनंददायक असेल. पण तेव्हा जी नवी पुस्तके उघडली जातील त्यातील माहिती जाणून घेतल्यावर आपण व्यक्‍तिशः काय करू यावर सर्वकाही अवलंबून असेल. मिळालेल्या माहितीचा आपण अवलंब करू का? सत्यापासून आपल्याला परावृत्त करण्याच्या सैतानाच्या शेवटल्या प्रयत्नाला तोंड देण्याकरता असलेली जी काही महत्त्वाची माहिती असेल, त्यावर आपण मनन करू का व त्याप्रमाणे वागू का?

१२. शैक्षणिक कार्यात आणि पृथ्वीचे परादिसात रूपांतर करण्याच्या कार्यात प्रत्येक जण पुरेपूर सहभाग का घेऊ शकेल?

१२ याशिवाय, ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानामुळे होणाऱ्‍या फायद्यांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्यांना पुनरुत्थानाद्वारे पुन्हा जीवन मिळेल त्यांना सध्या मानवांना ज्या दुर्बलता किंवा दुखण्यांना तोंड द्यावे लागते त्यांचा अनुभव घ्यावा लागणार नाही. (यशया ३३:२४) निरोगी शरीर आणि परिपूर्ण आरोग्याची आशा असल्यामुळे, नव्या जगाच्या सर्व रहिवाशांना अब्जावधी पुनरुत्थित व्यक्‍तींना जीवनाच्या मार्गाचे शिक्षण देण्याच्या महान शैक्षणिक कार्यात पुरेपूर सहभाग घेता येईल. तसेच, या पृथ्वीवर हाती घेण्यात आलेल्या सर्वात मोठ्या कार्यात सहभागी होण्याची, अर्थात, सबंध पृथ्वीचे एका रम्य बागेत रूपांतर करून याद्वारे यहोवाची स्तुती करण्यात सहभागी होण्याची त्यांना संधी मिळेल.

१३, १४. शेवटल्या परीक्षेत सैतानाला बंधमुक्‍त का केले जाईल आणि व्यक्‍तिशः आपल्यासमोर कोणता पर्याय आहे?

१३ शेवटल्या परीक्षेकरता सैतानाला अथांग डोहातून बंधमुक्‍त केले जाईल तेव्हा तो पुन्हा एकदा मानवांना बहकवण्याचा प्रयत्न करेल. प्रकटीकरण २०:७-९ अनुसार, सैतानाच्या दुष्ट प्रभावाला बळी पडणारी ‘राष्ट्रे’ अर्थात लोकांचे समूह नाशास पात्र ठरतील: ‘स्वर्गातून अग्नि उतरून त्यांस खाऊन टाकील.’ त्यांच्यापैकी ज्यांचे हजार वर्षांच्या काळादरम्यान पुनरुत्थान झाले होते, त्यांचा असा नाश झाल्यामुळे त्यांचे पुनरुत्थान हे प्रतिकूल न्यायाचे पुनरुत्थान ठरेल. त्याउलट जे पुनरुत्थान झाल्यावर विश्‍वासू राहतील, त्यांना सार्वकालिक जीवनाचे दान मिळेल. त्यांचे पुनरुत्थान हे खऱ्‍या अर्थाने ‘जीवनाचे पुनरुत्थान’ ठरेल.—योहान ५:२८.

१४ पुनरुत्थानाची आशा आजही आपले सांत्वन कसे करू शकते? त्याहून महत्त्वाचे म्हणजे, भविष्यात पुनरुत्थानामुळे मिळणारे आशीर्वाद आपल्याला मिळावेत म्हणून आपण काय केले पाहिजे?

आता शिकण्यासारखे धडे

१५. पुनरुत्थानावरील विश्‍वास कशाप्रकारे आपली मदत करू शकतो?

१५ अलीकडेच तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्‍तीचा कदाचित मृत्यू झाला असेल. या मोठ्या धक्क्यातून सावरण्याचा कदाचित तुम्ही प्रयत्न करत असाल. पुनरुत्थानाची आशा तुम्हाला आंतरिक शांती आणि धैर्य मिळवण्यास मदत करते. ज्यांना सत्याचे ज्ञान नाही त्यांना ही शांती व धैर्य मिळू शकत नाही. पौलाने थेस्सलनीकाकरांचे या शब्दांत सांत्वन केले: “झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्‍यासाठी की, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये.” (१ थेस्सलनीकाकर ४:१३) तुम्ही स्वतःला नव्या जगात असलेले, पुनरुत्थान होताना तेथे उपस्थित असलेले पाहू शकता का? आपल्या प्रिय व्यक्‍तींना पुन्हा भेटण्याच्या आशेविषयी मनन करण्याद्वारे सांत्वन मिळवा.

१६. पुनरुत्थानाच्या वेळी कदाचित तुमच्या भावना काय असतील?

१६ आदामाच्या विद्रोहाचे शारीरिक दुष्परिणाम कदाचित तुम्ही आजारपणाच्या रूपात सध्या सहन करत असाल. साहजिकच, यामुळे तुम्ही दुःखी असाल, पण या दुःखामुळे नव्या जगात स्वतः पुनरुत्थान अनुभवून, नव्या आरोग्यासहित व उत्साहासहित पुन्हा जिवंत होण्याच्या आनंददायक आशेचा स्वतःला विसर पडू देऊ नका. ज्या दिवशी तुमचे डोळे पुन्हा उघडतील आणि तुम्ही तुमचे स्वागत करण्यास व तुमच्या आनंदात सहभागी होण्यास आलेल्यांचे आनंदी चेहरे पाहाल तेव्हा निश्‍चितच तुम्ही यहोवाला त्याच्या प्रेमळ दयेबद्दल आभार मानाल.

१७, १८. कोणते दोन मुद्दे आपण आठवणीत ठेवले पाहिजेत?

१७ तोपर्यंत, आठवणीत ठेवण्याजोग्या दोन महत्त्वाच्या मुद्द्‌यांकडे लक्ष द्या. एक तर, आज यहोवाची पूर्ण मनाने सेवा करण्याचे महत्त्व. प्रभू ख्रिस्त येशू याचे अनुकरण करून आपल्या जीवनात आत्मत्याग करण्याद्वारे आपण यहोवाबद्दल व आपल्या सहमानवांबद्दल प्रेम व्यक्‍त करतो. जर विरोध किंवा छळ होत असल्यामुळे आपल्याला आपले उपजिविकेचे साधन किंवा स्वातंत्र्य गमावावे लागले तरीसुद्धा सर्व परीक्षांना तोंड देऊन विश्‍वासात मजबूत राहण्याचा आपला निर्धार आहे. आपल्या विरोधकांनी जर आपल्याला मारून टाकण्याची धमकी दिली तरीसुद्धा पुनरुत्थानाची आशा आपल्याला सांत्वन व धैर्य देते जेणेकरून आपण यहोवाला व त्याच्या राज्याला एकनिष्ठ राहू शकू. होय, राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात आपण आवेशी राहिलो तर यहोवाने नीतिमान जनांसाठी राखून ठेवलेले सार्वकालिक आशीर्वाद मिळण्याची आपणही आशा बाळगू शकतो.

१८ दुसरा आठवणीत ठेवण्याचा मुद्दा, आपल्या अपरिपूर्ण शरीरामुळे येणाऱ्‍या मोहांना तोंड देण्याच्या संदर्भात आहे. पुनरुत्थानाच्या आशेविषयी आपल्याला असलेले ज्ञान आणि यहोवाच्या अपात्री कृपेबद्दल आपल्याला वाटणारी कृतज्ञता यांमुळे विश्‍वासात मजबूत राहण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होतो. प्रेषित योहानाने इशारा दिला: “जगावर व जगांतल्या गोष्टींवर प्रीति करु नका. जर कोणी जगावर प्रीति करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीति नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत; आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१५-१७) या जगातील भौतिक गोष्टींची आपण ‘खऱ्‍या जीवनाशी’ तुलना केल्यास, या गोष्टी आपल्याला मुळीच आकर्षक वाटणार नाहीत. (१ तीमथ्य ६:१७-१९) जर आपल्याला अनैतिक वर्तन करण्याचा मोह झाला, तर आपण त्याचा खंबीरपणे प्रतिकार करू. आपल्याला याची जाणीव आहे, की यहोवाला न आवडणारे वर्तन आपण करत राहिलो आणि यदा कदाचित हर्मगिदोनाआधी आपला मृत्यू झाला तर आपली स्थिती त्या व्यक्‍तींसारखीच असेल की ज्यांना पुनरुत्थानाची आशा नाही.

१९. कोणत्या अमूल्य बहुमानाचा आपण कधीही स्वतःला विसर पडू देऊ नये?

१९ सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आता व सर्वकाळ यहोवाचे मन आनंदित करण्याचा जो अमूल्य बहुमान आपल्याला लाभला आहे त्याचा आपण कधीही स्वतःला विसर पडू देऊ नये. (नीतिसूत्रे २७:११) मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहण्याद्वारे, अथवा या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत होईपर्यंत सात्विकतेने चालत राहण्याद्वारे आपण यहोवाला दाखवतो की विश्‍वाच्या सार्वभौमत्वाच्या वादात आपण कोणाचा पक्ष घेतला आहे. आपण असे केल्यास, मोठ्या संकटातून जिवंत बचावून असो किंवा चमत्कारिक पुनरुत्थानाचा अनुभव घेऊन असो; या पृथ्वीवर परादिसात जगणे खरोखर किती आनंददायक असेल!

आपल्या इच्छा तृप्त केल्या जातील

२०, २१. पुनरुत्थानाविषयी काही प्रश्‍न अनुत्तरित असले तरीसुद्धा विश्‍वासू राहण्यास कोणती गोष्ट आपले साहाय्य करेल? स्पष्ट करा.

२० पुनरुत्थानाच्या आपल्या या चर्चेत काही प्रश्‍न अनुत्तरित राहतात. विवाहित व्यक्‍तींचा मृत्यू झाल्यास त्यांच्याकरता यहोवाची काय व्यवस्था असेल? (लूक २०:३४, ३५) एखाद्याचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला होता, तेथेच त्याचे पुनरुत्थानही होईल का? त्याच्या कुटुंबीयांच्या जवळपास असलेल्या ठिकाणी त्याचे पुनरुत्थान होईल का? पुनरुत्थानासंबंधी असेच अनेक प्रश्‍न अनुत्तरितच राहतात. पण यिर्मयाचे हे शब्द आठवणीत ठेवण्याजोगे आहेत: “जे त्याची वाट पाहतात त्यांना, जो जीव त्याला शोधतो त्याला, यहोवा चांगला आहे. मनुष्याने धीर धरावा आणि यहोवाच्या तारणाची आशा धरावी हे चांगले आहे.” (विलापगीत ३:२५, २६, पं.र.भा.) यहोवाच्या नियुक्‍त वेळी आपल्या सर्व प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे आपल्याला मिळतील. याविषयी आपण खात्री का बाळगू शकतो?

२१ स्तोत्रकर्त्याच्या भजनातील यहोवाला उद्देशून बोललेल्या पुढील शब्दांवर मनन करा: “तू आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करितोस.” (स्तोत्र १४५:१६) आपले वय वाढते तसतशा आपल्या इच्छा बदलतात. लहान असताना आपल्याला ज्या गोष्टी हव्याहव्याशा वाटत होत्या त्यांची आता आपल्याला उत्कंठा वाटत नाही. आपले अनुभव आणि आपल्या आशा यांचा जीवनाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर प्रभाव पडतो. तरीसुद्धा, नव्या जगात आपल्या ज्या काही योग्य इच्छा असतील त्या यहोवा जरूर तृप्त करेल.

२२. यहोवाची स्तुती करण्याचे कोणते चांगले कारण आपल्याजवळ आहे?

२२ सध्या आपल्यापैकी प्रत्येकाकरता, विश्‍वासू राहणे हीच महत्त्वाची गोष्ट आहे. “कारभारी म्हटला की, तो विश्‍वासू असला पाहिजे.” (१ करिंथकर ४:२) आपण देवाच्या राज्याच्या वैभवी सुवार्तेचे कारभारी आहोत. ही सुवार्ता सर्वांना सांगण्याकरता आपण झटतो आणि यामुळे आपण स्वतः जीवनाच्या मार्गावर कायम राहू शकतो. “समय व प्रसंग” सर्वांना घडतात या वस्तूस्थितीकडे कधीही दुर्लक्ष करू नका. (उपदेशक ९:११, पं.र.भा.) जीवनाच्या अनिश्‍चिततेमुळे आपल्याला वाटणारी अनावश्‍यक काळजी कमी करण्यासाठी, पुनरुत्थानाच्या अद्‌भूत आशेला धरून ठेवा. ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्याची सुरुवात होण्याआधी आपला मृत्यू होणार असे भासल्यास, भविष्यात आपली सुटका निश्‍चित आहे हे जाणून तुम्हाला सांत्वन मिळो. यहोवाच्या नियुक्‍त वेळी तुम्हीही ईयोबाने निर्माणकर्त्याला उद्देशून बोललेल्या या शब्दांची पुनरुक्‍ती करू शकाल: “तू मला हाक मारिशील व मी तुला उत्तर देईन.” आपल्या स्मृतीत असलेल्या सर्वांना पुन्हा जिवंत करण्याची उत्कंठा बाळगणाऱ्‍या यहोवाची स्तुती असो!—ईयोब १४:१५. (w०५ ५/१)

[तळटीपा]

^ परि. 2 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले सावध राहा! जुलै ८, १९८८ (इंग्रजी) अंकातील पृष्ठ १० पाहा.

^ परि. 3 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित, यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्‌घोषक, (इंग्रजी) पृष्ठ ६६२.

तुम्हाला आठवते का?

• हजार वर्षांच्या राज्यादरम्यान लोकांचा न्याय कशाच्या आधारावर केला जाईल?

• काहींचे ‘जीवनाचे पुनरुत्थान’ तर काहींचे ‘न्यायाचे पुनरुत्थान’ का असेल?

• पुनरुत्थानाची आशा आज कशाप्रकारे आपले सांत्वन करते?

स्तोत्र १४५:१६ यातील शब्द आपल्याला पुनरुत्थानासंबंधी अनुत्तरित राहिलेल्या प्रश्‍नांसंबंधी योग्य मनोवृत्ती राखण्यास कशाप्रकारे मदत करतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]