व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पुनरुत्थानात कोण उठतील?

पुनरुत्थानात कोण उठतील?

पुनरुत्थानात कोण उठतील?

“ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरेतील [“स्मृती कबरेतील,” Nw] सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.”—योहान ५:२८, २९.

१. जळत्या झुडुपातून मोशेला कोणती अद्‌भूत वाणी ऐकू आली आणि या शब्दांची पुनरुक्‍ती कोणी केली?

आजपासून ३,५०० वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी एक विचित्र घटना घडली होती. मोशे हा कुलपिता इथ्रोच्या मेंढरांची राखण करत होता. तेव्हा होरेब पर्वताजवळ यहोवाचा देवदूत एका झुडपातील अग्नीतून मोशेला प्रकट झाला. निर्गम पुस्तकातील अहवालात असे म्हटले आहे: “त्याने दृष्टि लाविली तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यास दिसले.” मग झुडुपातून त्याला एक वाणी ऐकू आली, जी म्हणाली: “मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे.” (निर्गम ३:१-६) कालांतराने, सा.यु. पहिल्या शतकात खुद्द देवाचा पुत्र येशू याने याच शब्दांची पुनरुक्‍ती केली.

२, ३. (क) अब्राहाम, इसहाक व याकोब यांना कोणती आशा आहे? (ख) यामुळे कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

त्याप्रसंगी येशूची काही सदूकी लोकांशी चर्चा चालली होती. या लोकांचा पुनरुत्थानावर विश्‍वास नव्हता. येशूने म्हटले: “मोशेनेहि . . . परमेश्‍वराला अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव असे म्हणून मेलेले उठविले जातात हे दर्शविले आहे; तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे; कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.” (लूक २०:२७, ३७, ३८) असे म्हणून येशूने या गोष्टीला दुजोरा दिला की देवाच्या दृष्टिकोनातून, फार पूर्वी मरण पावलेले अब्राहाम, इसहाक व याकोब अद्यापही जिवंत आहेत. त्याच्या स्मृतीत ते जिवंत आहेत. ईयोबाप्रमाणे ते आपल्या “कष्टमय सेवेचे” दिवस, अर्थात मृत्यूची निद्रावस्था संपण्याची वाट पाहात आहेत. (ईयोब १४:१४) देवाच्या नव्या जगात त्यांचे पुनरुत्थान केले जाईल.

पण सबंध मानव इतिहासात मेलेल्या अब्जावधी लोकांबद्दल काय? त्यांचेही पुनरुत्थान होईल का? या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर मिळवण्याकरता, प्रथम आपण देवाच्या वचनातून हे जाणून घेऊ या की मृत लोक कोठे जातात?

मृत कोठे आहेत?

४. (क) मृत्यूनंतर एक व्यक्‍ती कोठे जाते? (ख) शेओल म्हणजे काय?

बायबल सांगते की मृतांना “काहीच कळत नाही,” किंवा, त्यांना कसलीही जाणीव नसते. मृत्यू झाल्यावर ते नरकात यातना भोगत नाहीत, किंवा लिम्बोसारख्या कोणत्या ठिकाणी खितपत पडत नाहीत तर केवळ पुन्हा मातीत मिळतात. म्हणूनच देवाचे वचन जिवंतांना असा सल्ला देते: “जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे [“शेओलात,” पं.र.भा., समास] तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्‍ति-प्रयुक्‍ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.” (उपदेशक ९:५, १०; उत्पत्ति ३:१९) बऱ्‍याच लोकांकरता “शेओल” हा शब्द ओळखीचा नाही. हा एक इब्री शब्द असून त्याची व्युत्पत्ती नेमकी कशी झाली हे सांगता येत नाही. बऱ्‍याच धर्मांत असे शिकवले जाते की मृत अद्यापही जिवंत आहेत, पण देवाचे प्रेरित वचन दाखवते की जे शेओलमध्ये आहेत ते मृत आहेत त्यांना कसलीही जाणीव नाही. शेओल म्हणजे माणसांना जेथे पुरले जाते ती सर्वसामान्य कबर.

५, ६. याकोबाचा मृत्यू झाला तेव्हा तो कोठे गेला आणि तेथे तो कोणाला जाऊन मिळाला?

मूळ भाषेत, बायबलमध्ये “शेओल” या शब्दाचा प्रथम उल्लेख उत्पत्ति ३७:३५ येथे आढळतो. आपल्या प्रिय पुत्र योसेफचा मृत्यू झाला आहे असे याकोबाला वाटले तेव्हा त्याला अकथनीय दुःख झाले. तो म्हणाला: “मी शोक करीत करीत अधोलोकी [“शेओलात,” पं.र.भा., समास] आपल्या मुलाकडे जाईन.” आपल्या मुलाचा मृत्यू झाला आहे असे समजून आपलाही मृत्यू व्हावा व आपण शेओलात असावे असे याकोबाला वाटले. नंतर दुष्काळ पडला तेव्हा याकोबाच्या मोठ्या नऊ मुलांनी, अन्‍नधान्य आणण्याकरता ईजिप्तला जाताना बन्यामीन या त्याच्या सर्वात धाकट्या मुलाला सोबत नेण्याचे सुचवले. पण याकोबाने त्यांना असे करू दिले नाही. तो म्हणाला: “माझ्या मुलास मी तुम्हांबरोबर पाठविणार नाही, कारण त्याचा भाऊ मेला आहे आणि तो एकटाच राहिला आहे; ज्या मार्गाने तुम्ही जात आहा त्यात त्याच्यावर काही अरिष्ट आले तर तुम्ही मला दुःखी करुन हे माझे पिकलेले केस अधोलोकी [“शेओलात,” पं.र.भा., समास] उतरावयास कारण व्हाल.” (उत्पत्ति ४२:३६, ३८) या दोन्ही वचनांत, शेओलचा संबंध मृत्योपरांत जीवनाशी नव्हे तर मृत्यूशी लावण्यात आला आहे.

उत्पत्तिच्या अहवालातून कळून येते की योसेफ हा ईजिप्तमध्ये अन्‍नधान्याचा मुख्याधिकारी बनला होता. कालांतराने याकोब ईजिप्तला गेला आणि तेथे योसेफाशी पुन्हा भेट झाली तेव्हा त्या दोघांनाही खूप आनंद झाला. यानंतर याकोब त्या देशात, १४७ व्या वर्षी आपला मृत्यू होईपर्यंत राहिला. त्याच्या अंतिम इच्छेनुसार त्याच्या मुलांनी त्याचा मृतदेह कनान देशातील मकपेला नावाच्या गुहेत नेऊन तेथे त्यास मूठमाती दिली. (उत्पत्ति ४७:२८; ४९:२९-३१; ५०:१२, १३) अशारितीने याकोब आपला पिता इसहाक, व आजोबा अब्राहाम यांस जाऊन मिळाला.

‘पूर्वजांना जाऊन मिळाले’

७, ८. (क) अब्राहामचा मृत्यू झाल्यावर तो कोठे गेला? स्पष्ट करा. (ख) इतरजणही त्यांच्या मृत्यूनंतर शेओलमध्ये गेले हे कशावरून दिसून येते?

याआधी जेव्हा यहोवाने अब्राहामशी केलेल्या कराराला पुष्टी दिली व त्याची संतती खूप वाढेल असे त्याला वचन दिले तेव्हा अब्राहामच्या बाबतीत पुढे काय घडेल हेही त्याने सूचित केले. यहोवाने म्हटले: “तू तर शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील; चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठमाती देतील.” (उत्पत्ति १५:१५) आणि अगदी हेच घडले. उत्पत्ति २५:८ म्हणते: “अब्राहाम पुऱ्‍या वयाचा चांगला म्हातारा होऊन मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला.” हे पूर्वज कोण होते? उत्पत्ति ११:१०-२६ यात नोहाचा पुत्र शेम याच्यापासून अब्राहामच्या सगळ्या पूर्वजांची नावे दिली आहेत. तर अब्राहामचा मृत्यू झाला तेव्हा तो शेओलमध्ये आधीच जाऊन निजलेल्यांकडे गेला.

“आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला,” ही संज्ञा इब्री शास्त्रवचनांत अनेकदा आढळते. तेव्हा असा निष्कर्ष काढणे तर्कशुद्ध ठरेल, की अब्राहामचा पुत्र इश्‍माएल व मोशेचा भाऊ अहरोन हे दोघेही त्यांच्या मृत्यूनंतर शेओलमध्ये गेले आणि तेथे ते पुनरुत्थानाची वाट पाहात आहेत. (उत्पत्ति २५:१७; गणना २०:२३-२९) त्याचप्रकारे, जरी मोशेची कबर कोठे आहे हे कोणालाही माहीत नव्हते तरीसुद्धा तो देखील शेओलमध्ये गेला असे म्हणता येईल. (गणना २७:१३; अनुवाद ३४:५, ६) तसेच इस्राएलचा नेता मोशे याचा उत्तराधिकारी यहोशवा आपल्या मृत्यूनंतर एका सबंध पिढीसोबत शेओलमध्ये गेला.—शास्ते २:८-१०.

९. (क) “शेओल” हा इब्री शब्द व “हेडीस” हा ग्रीक शब्द एकाच ठिकाणास सूचित करतात हे बायबलमध्ये कशाप्रकारे सांगण्यात आले आहे? (ख) शेओल किंवा हेडीस येथे असणाऱ्‍यांना कोणती आशा आहे?

कित्येक शतकांनंतर, दावीद हा इस्राएलच्या १२ गोत्रांचा राजा बनला. त्याचा मृत्यू झाल्यावर तो “आपल्या पितरांजवळ जाऊन निजला.” (१ राजे २:१०) तो पण शेओलमध्येच होता का? सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी प्रेषित पेत्राने दावीदाच्या मृत्यूचा उल्लेख करून स्तोत्र १६:१० यातील शब्द उद्धृत केले: “तू माझा जीव अधोलोकात [“शेओलात,” पं.र.भा. समास] राहू देणार नाहीस.” दावीद अद्यापही आपल्या कबरेतच होता असा उल्लेख करून पेत्राने हे शब्द येशूला लागू केले आणि असे सूचित केले की दाविदाला “ह्‍याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, त्याला अधोलोकात [“हेडीस,” NW] सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. त्या येशूला देवाने उठविले ह्‍याविषयी आम्ही सर्व साक्षी आहो.” (प्रेषितांची कृत्ये २:२९-३२) इब्री शास्त्रवचनांत ज्या ठिकाणी “शेओल” असे आढळते तेथे पेत्राने “हेडीस” हा ग्रीक शब्द वापरला. अशारितीने, जे हेडीसमध्ये आहेत असे म्हटले आहे, त्यांची स्थिती, जे शेओलमध्ये आहेत असे म्हटले आहे त्यांच्यासारखीच आहे. तेसुद्धा निजलेले आहेत, व पुनरुत्थानाची वाट पाहत आहेत.

शेओलमध्ये अधार्मिक जन आहेत का?

१०, ११. काही अधार्मिक जन मृत्यूनंतर शेओल किंवा हेडीसमध्ये जातात असे आपण का म्हणू शकतो?

१० मोशेने इस्राएलांना इजिप्तमधून बाहेर आणल्यानंतर अरण्यात त्यांच्यापैकी काहींनी विद्रोह केला. मोशेने या विद्रोहात पुढाकार घेणाऱ्‍या कोरह, दाथान व अबीराम यांच्यापासून स्वतःला वेगळे करावे असे लोकांना सांगितले. कारण त्यांचा अकस्मात मृत्यू होणार होता. मोशेने स्पष्ट केले: “इतर मनुष्यांच्या मृत्यूप्रमाणे ह्‍यांना मृत्यू आला किंवा इतर सर्व लोकांप्रमाणे ह्‍यांचे पारिपत्य झाले तर परमेश्‍वराने मला पाठविले नाही असे समजा; पण परमेश्‍वराने काही अद्‌भूत गोष्ट घडविली म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून ह्‍यांना व ह्‍यांच्या सर्वस्वाला गिळून टाकिले आणि हे अधोलोकात जिवंत उतरले, तर असे समजा की, ह्‍या लोकांनी परमेश्‍वराला तुच्छ मानिले आहे.” (गणना १६:२९, ३०) हे सर्व विद्रोह करणारे, अर्थात ज्यांना पृथ्वीने तोंड उघडून गिळून टाकले, तसेच ज्यांना कोरह व २५० लेवीयांप्रमाणे अग्नीने भस्म केले ते सर्वजण शेवटी शेओल अथवा हेडीसमध्येच गेले.—गणना २६:१०.

११ राजा दावीद याला शिव्याशाप देणाऱ्‍या शिमीला दावीदाचा उत्तराधिकारी शलमोन याच्या हाती दंड भोगावा लागला. दावीदाने आज्ञा दिली: “तू त्यास निर्दोष समजू नको; तू सुज्ञ पुरुष आहेस; त्याचे काय करावे हे तुला समजेलच; त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्‍यास रक्‍ताचे स्नान घालून अधोलोकी [“शेओलात,” पं.र.भा., समास] पाठीव.” शलमोनाने बनाया यास शिमीला हा दंड देण्याचा हुकूम दिला. (१ राजे २:८, ९, ४४-४६) बनाया याच्या तरवारीने मरण पावलेला आणखी एक मनुष्य इस्राएलचा भूतपूर्व सेनाधीश यवाब हा होता. त्याचे ‘पिकलेले केस अधोलोकी [“शेओलात,” पं.र.भा. समास] शांतीने उतरले नाहीत.’ (१ राजे २:५, ६, २८-३४) या दोन्ही उदाहरणांवरून दावीदाच्या प्रेरित भजनातील शब्दांची सत्यता पटते: “देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात [“शेओलात,” NW] परत जातील.”—स्तोत्र ९:१७.

१२. अहीथोफेल कोण होता आणि त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो कोठे गेला?

१२ अहिथोफेल हा दावीदाचा खासगी सल्लागार होता. त्याचा सल्ला यहोवाचाच सल्ला आहे असे समजले जात होते. (२ शमुवेल १६:२३) दुःखाची गोष्ट म्हणजे हा भरवशाचा सेवक गद्दार बनला आणि त्याने दावीदाचा पुत्र अबशालोम याला दावीदाविरुद्ध बंड करण्यास साथ दिली. कदाचित याच विश्‍वासघाताच्या संदर्भात दाविदाने पुढील शब्द लिहिले होते: “ज्याने माझी निंदा केली तो काही माझा वैरी नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; माझ्यापुढें ज्याने तोरा मिरविला तो काही माझा शत्रु नव्हता; असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो.” दावीद पुढे म्हणतो, “त्यांस अकस्मात्‌ मरण येवो; ते जिवंतच अधोलोकी [“शेओलमध्ये” NW] उतरोत; त्यांच्या घरात व अंतर्यामात दुष्टाई आहे.” (स्तोत्र ५५:१२-१५) अहीथोफेल व त्याच्या साथीदारांचा मृत्यू झाल्यानंतर ते शेओलमध्ये गेले.

गेहेन्‍नात कोण आहेत?

१३. यहुदाला ‘नाशाचा पुत्र’ असे का म्हटले आहे?

१३ दावीदाच्या या परिस्थितीची तुलना थोर दावीद, अर्थात येशू याला आलेल्या अनुभवाशी करून पाहूया. ख्रिस्ताच्या १२ प्रेषितांपैकी एक यहुदा इस्कर्योत हा अहीथोफेलसारखाच विश्‍वासघातकी निघाला. अर्थात, यहुदाचा विश्‍वासघात हा अहीथोफेलने केलेल्या गद्दारीपेक्षा कितीतरी गंभीर स्वरूपाचा होता. कारण यहुदाने तर देवाच्या एकुलत्या एका पुत्राविरुद्ध कार्य केले. पृथ्वीवरील आपल्या सेवाकार्याच्या शेवटी देवाच्या पुत्राने केलेल्या एका प्रार्थनेत त्याने आपल्या अनुयायांविषयी असा उल्लेख केला: “जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखिले; मी त्यांचा सांभाळ केला, आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही; शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले.” (योहान १७:१२) येथे यहुदाचा उल्लेख ‘नाशाचा पुत्र’ असा करण्याद्वारे येशूने हे सूचित केले की यहुदाचा मृत्यू झाला तेव्हा त्याला पुन्हा उठण्याची कोणतीही आशा नव्हती. तो देवाच्या स्मृतीत जिवंत राहिला नाही. तो शेओलमध्ये नव्हे तर गेहेन्‍नात गेला. गेहेन्‍ना म्हणजे काय?

१४. गेहेन्‍ना हे कशाचे प्रतीक आहे?

१४ येशूने त्याच्या काळातल्या धर्मपुढाऱ्‍यांना, आपल्या शिष्यांपैकी प्रत्येकाला “गेहेन्‍नाचा मुलगा” बनवण्याबद्दल दोषी ठरवले. (मत्तय २३:१५, पं.र.भा.) त्या काळी, हिन्‍नोमचे खोरे हे लोकांच्या ओळखीचे होते. हा एक असा परिसर होता, जेथे केरकचरा टाकला जायचा. तसेच, मृत्यूदंड दिल्यावर ज्यांना दफनविधी करून पुरण्यासही योग्य समजले जात नव्हते अशा गुन्हेगारांचे मृतदेह तेथे टाकले जायचे. याआधी, येशूने डोंगरावरील प्रवचनात गेहेन्‍नाचा उल्लेख केला होता. (मत्तय ५:२९, ३०) या शब्दाचा लाक्षणिक अर्थ त्याच्या श्रोत्यांना चांगला ठाऊक होता. गेहेन्‍ना हे पुनरुत्थानाच्या आशेविना संपूर्ण विनाशाचे प्रतिक होते. येशूच्या काळातल्या यहुदा इस्कर्योत याच्याव्यतिरिक्‍त इतरजणही मृत्यूनंतर शेओल, किंवा हेडीसमध्ये न जाता गेहेन्‍नात गेले आहेत का?

१५, १६. मृत्यूनंतर कोण गेहेन्‍नात गेले, आणि ते तेथे का गेले?

१५ पहिले मानव आदाम व हव्वा यांना परिपूर्ण असे निर्माण करण्यात आले होते. त्यांनी जाणूनबुजून पाप केले होते. त्यांच्यापुढे एकतर सार्वकालिक जीवनाचा अथवा मृत्यूचा पर्याय होता. देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करून त्यांनी सैतानाची बाजू घेतली. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांना ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणापासून फायदा मिळवण्याची कोणतीही आशा नव्हती. त्याअर्थी ते गेहेन्‍नात गेले.

१६ आदामाचा ज्येष्ठ पुत्र काईन याने आपला भाऊ हाबेल याची हत्या केली आणि त्यानंतर तो परागंदा होऊन भटकत राहिला. प्रेषित योहानाने काईनाचे वर्णन करताना म्हटले की काईन “त्या दुष्टाचा होता.” (१ योहान ३:१२) तेव्हा काईन देखील आपल्या आईवडिलांप्रमाणे मृत्यूनंतर गेहेन्‍नात गेला असा निष्कर्ष काढणे रास्तच ठरेल. (मत्तय २३:३३, ३५) धार्मिक हाबेलच्या बाबतीत अगदी उलट घडले! “विश्‍वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली; आणि तो मेला असूनहि त्या विश्‍वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे.” (इब्री लोकांस ११:४) होय हाबेल सध्या शेओलमध्ये पुनरुत्थानाची वाट पाहात आहे.

‘पहिले’ व “अधिक चांगले” पुनरुत्थान

१७. (क) या ‘अंतसमयात’ शेओलमध्ये कोण जातात? (ख) जे शेओलमध्ये जातात आणि जे गेहेन्‍नात जातात त्यांचे भविष्य काय?

१७ ही माहिती वाचणाऱ्‍या अनेकांच्या मनात प्रश्‍न येईल, की जे या ‘अंतसमयात’ मरण पावतात अशांच्या बाबतीत काय? (दानीएल ८:१९) प्रकटीकरणाच्या ६ व्या अध्यायात त्या काळातील निरनिराळ्या घोडेस्वारांच्या स्वारीचे वर्णन केले आहे. विशेष म्हणजे, यांपैकी शेवटल्या घोडेस्वाराचे नाव मृत्यू आहे आणि त्याच्या पाठोपाठ हेडीस आहे. त्याअर्थी, याआधीच्या घोडेस्वारांच्या कार्यामुळे जे लोक अकाली मरण पावलेले आहेत ते हेडीसमध्ये जातात आणि देवाच्या नव्या जगात पुनरुत्थान होण्याची वाट बघतात. (प्रकटीकरण ६:८) मग जे शेओलमध्ये (हेडीस) गेले आणि जे गेहेन्‍नात गेले त्यांचे भविष्य काय असेल? सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जे शेओलमध्ये गेले त्यांचे पुनरुत्थान होईल आणि जे गेहेन्‍नात गेले त्यांचे अस्तित्व नाहीसे होईल.

१८. ‘पहिले पुनरुत्थान’ मिळणाऱ्‍यांना कोणती आशा आहे?

१८ प्रेषित योहानाने लिहिले: “पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे; अशा लोकांवर दुसऱ्‍या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करितील.” जे येशूसोबत शासन करतील, ते “पहिल्या पुनरुत्थानात” सामील होतात पण उर्वरीत मानवजातीकरता काय आशा आहे?—प्रकटीकरण २०:६.

१९. काहीजणांना कशाप्रकारे एका ‘अधिक चांगल्या पुनरुत्थानाचा’ अनुभव येतो?

१९ देवाचे सेवक एलीया व अलीशा यांच्या काळापासूनच पुनरुत्थानाच्या चमत्काराद्वारे मृतांना पुन्हा जिवंत करण्यात आले. पौलाने याविषयी सांगितले: “स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हालहाल सोसले.” होय, देवाला विश्‍वासू राहिलेल्या या त्याच्या एकनिष्ठ सेवकांनी पुनरुत्थानाची वाट पाहिली, जेणेकरून त्यांना आणखी काही वर्षांचे जीवन व त्यानंतर मृत्यू नव्हे तर सार्वकालिक जीवनाची आशा प्राप्त व्हावी! निश्‍चितच ते “अधिक चांगले पुनरुत्थान” ठरेल.—इब्री लोकांस ११:३५.

२०. पुढील लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

२० यहोवाने या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करण्याआधी, शेवटपर्यंत विश्‍वासू राहून जर आपला मृत्यू झाला तर आपल्याला एका ‘अधिक चांगल्या’ पुनरुत्थानाची आशा मिळते. अधिक चांगले यासाठी की ते आपल्याला सार्वकालिक जीवनाची आशा मिळवून देते. येशूने वचन दिले: “ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरेतील [“स्मृती कबरेतील,” NW] सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८, २९) आमच्या पुढील लेखात पुनरुत्थानाच्या उद्देशाविषयी आणखी चर्चा केली जाईल. पुनरुत्थानाची आशा कशाप्रकारे आपल्याला देवाला विश्‍वासू राहण्याचे धैर्य देते आणि आत्मत्यागी वृत्ती विकसित करण्यास मदत करते हे यावरून स्पष्ट होईल. (w०५ ५/१)

तुम्हाला आठवते का?

• यहोवाचे वर्णन “जिवंतांचा” देव असे का करण्यात आले आहे?

• जे शेओलमध्ये जातात त्यांची स्थिती काय आहे?

• जे गेहेन्‍नात जातात त्यांचे भविष्य काय?

• काहींचे “अधिक चांगले” पुनरुत्थान कशाप्रकारे होईल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

अब्राहामप्रमाणे जे शेओलमध्ये जातात त्यांचे पुनरुत्थान होईल

[१६ पानांवरील चित्रे]

आदाम, हव्वा, काईन व यहुदा इस्कर्योत हे गेहेन्‍नात का गेले?