व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पुनरुत्थान एक अद्‌भुत आशा

पुनरुत्थान एक अद्‌भुत आशा

पुनरुत्थान एक अद्‌भुत आशा

पुनरुत्थानावरील विश्‍वास बराच प्रचलित आहे. इस्लाम धर्मियांच्या पवित्र पुस्तकात अर्थात कुराणात एक सबंध अध्याय पुनरुत्थानाविषयी आहे. सूरह ७५ मध्ये असे म्हटले आहे: “मी शपथ घेतो पुनरुत्थानाच्या दिवसाची . . . काय माणूस असे समजत आहे की आम्ही त्याच्या हाडांना गोळा करू शकणार नाही? . . . (माणूस) विचारतो, ‘शेवटी केव्हा येणार आहे बरे तो पुनरुत्थानाचा दिवस?’ काय तो यासाठी समर्थ नाही की त्याने मृतांना परत जीवित करावे?”—सूरह ७५:१-६, ४०.

द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका म्हणते, “झोरोॲस्ट्रीयन धर्मात, शेवटी दुष्टाईवर विजय मिळवला जाईल, सर्व मृतांचे पुनरुत्थान केले जाईल आणि शेवटला न्याय करून स्वच्छ केलेल्या पृथ्वीवर धार्मिकांचे पुनर्वसन केले जाईल,” अशी शिकवण दिली जाते.

दी एन्सायक्लोपिडिया जुडायका यात पुनरुत्थानाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे, “मृतांना शेवटी पुन्हा त्याच शरीरात उठवले जाईल आणि ते पुन्हा पृथ्वीवर राहतील असा विश्‍वास.” याच ज्ञानकोषात असेही म्हटले आहे, की यहुदी धर्माने मनुष्यात एक अमर आत्मा असतो ही शिकवणूक आत्मसात केल्यामुळे पेच निर्माण होतो. सदर विश्‍वकोषात कबूल केल्याप्रमाणे, पुनरुत्थान व आत्म्याचे अमरत्व या दोन शिकवणुकी मुळात परस्पर विरोधी आहेत.”

हिंदू धर्मात असे शिकवले जाते, की मनुष्याचे अनेक पुनर्जन्म होतात. पण असे घडण्यासाठी, मनुष्यात असा आत्मा असला पाहिजे, की जो मृत्यूनंतरही जिवंत राहतो. हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवद्‌गीता यात म्हटले आहे: “सबंध शरीर व्यापणारा [आत्मा] अविनाशी आहे. अविनाशी आत्म्याला कोणीही नष्ट करू शकत नाही.”

बौद्ध धर्म हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे कारण बौद्ध धर्मात अमर आत्म्याच्या अस्तित्वाला दुजोरा देण्यात आलेला नाही. पण दूरच्या पौर्वात्य देशातील अनेक बौद्ध धर्मीय आज, अमर आत्मा एका शरीरातून दुसऱ्‍या शरीरात प्रवेश करतो या शिकवणुकीवर विश्‍वास ठेवतात. *

पुनरुत्थानाच्या शिकवणुकीसंबंधी गोंधळ

ख्रिस्ती धर्मजगतात, अंत्यविधीच्या वेळी दिल्या जाणाऱ्‍या उपदेशात बरेचदा, मृत्यूनंतर आत्मा जिवंत राहतो असेही सांगितले जाते आणि त्याचवेळी पुनरुत्थानाबद्दलही सांगितले जाते. उदाहरणार्थ, अँग्लीकन पाळक सहसा हे शब्द उच्चारतात, “आमच्या सर्वसमर्थ परमेश्‍वरा, तुझ्या महान कृपेनुसार तुला आमच्यापासून दूर गेलेल्या या प्रिय बंधूचा आत्मा स्वतःकडे घेणे योग्य वाटले आहे; तेव्हा आम्ही त्याचे शरीर जमिनीत दफन करत आहोत जेणेकरून मातीला माती, राखेला राख मिळावी; आम्हाला ही खात्रीशीर आशा आहे की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे याला सार्वकालिक जीवनाकरता पुनरुत्थान प्राप्त होईल.”—सामान्य प्रार्थनेचे पुस्तक (इंग्रजी).

या विधानामुळे प्रश्‍न पडतो की बायबल नेमके काय शिकवते, पुनरुत्थानाविषयी की अमर आत्म्याविषयी? पण फ्रेंच प्रोटेस्टंट प्राध्यापक ऑस्क कुलमन यांनी केलेले पुढील विधान विचारात घ्या. आत्म्याचे अमरत्व की मृतांचे पुनरुत्थान? (इंग्रजी) या पुस्तकात ते म्हणतात: “मृतांच्या पुनरुत्थानाची ख्रिस्ती आशा आणि आत्म्याच्या अमरत्वाची ग्रीक संकल्पना या दोन गोष्टींत जमीनअस्मानाचा फरक आहे. . . . कालांतराने ख्रिस्ती धर्माने या दोन विश्‍वासांची सांगड घातली असली आणि सध्याच्या सर्वसामान्य ख्रिस्ती व्यक्‍तीला या दोन शिकवणुकींतला फरक किंचितही समजत नसला तरीसुद्धा मी आणि बहुतेक विद्वान ज्यास सत्य मानतो ते लपवून ठेवण्याचे मलातरी कोणतेही कारण दिसत नाही. . . . नव्या कराराचा संपूर्ण आशय हा पुनरुत्थानाच्या विश्‍वासावरच आधारित आहे. . . . खरोखर मरण पावलेली संपूर्ण व्यक्‍ती देवाने तिला पुन्हा निर्माण केल्यामुळे परत जिवंत होते.”

सर्वसामान्य लोकांना मृत्यू व पुनरुत्थानाविषयी अनेक शंकाकुशंका का आहेत हे समजण्याजोगे आहे. हा गोंधळ मिटवण्याकरता आपल्याला बायबलकडे वळावे लागेल कारण यात मनुष्याचा निर्माणकर्ता यहोवा देव याने प्रकट केलेले सत्य आहे. बायबलमध्ये पुनरुत्थानाच्या अनेक घटनांचा अहवाल आढळतो. यांपैकी चार अहवालांचे आपण परीक्षण करू या आणि यातून काय प्रकट होते हे विचारात घेऊ या.

“स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली”

ख्रिस्ती बनलेल्या यहुद्यांना पौलाने जे पत्र लिहिले त्यात त्याने म्हटले की विश्‍वासू स्त्रियांना “त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली.” (इब्री लोकांस ११:३५) यांपैकी एक स्त्री भूमध्य समुद्रतटावरील सीदोनजवळील सारफथ या फिनिशियन नगरात राहात होती. ती एक विधवा होती व तिने देवाचा संदेष्टा एलीया याचे स्वागत करून, भयंकर दुष्काळ असूनही त्याला अन्‍न दिले. पण दुःखाची गोष्ट म्हणजे या स्त्रीचा मुलगा आजारी पडून मरण पावला. एलीयाने लगेच त्याला तो आपण राहत होता त्या माडीवर नेले आणि मुलाला परत जिवंत करण्याची यहोवाला विनंती केली. तेव्हा चमत्कार घडला व मुलगा “पुनरपि जिवंत झाला.” एलीया मुलाच्या आईकडे आला व तिला म्हणाला: “पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे.” तिची काय प्रतिक्रिया होती? आनंदित होऊन ती म्हणाली, “आपण देवाचे माणूस आहा आणि परमेश्‍वराचे सत्यवचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले.”—१ राजे १७:२२-२४.

सारफथच्या दक्षिणेकडे जवळजवळ १०० किलोमीटर अंतरावर आणखी एक उदार दांपत्य राहात होते; या दांपत्याने एलीयाचा उत्तराधिकारी अलीशा याची देखभाल केली होती. त्यांपैकी पत्नी ही शुनेम या आपल्या गावातली एक प्रतिष्ठित स्त्री होती. तिने व तिच्या पतीने आपल्या घरातल्या माडीवरच्या खोलीत अलीशाच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे ठरवले. त्यांना मुले नसल्यामुळे ते दुःखी होते, पण जेव्हा या स्त्रीला मुलगा झाला तेव्हा त्यांच्या दुःखाचे आनंदात रूपांतर झाले. हा मुलगा थोडा मोठा झाला तेव्हा तो कापणी करणाऱ्‍यांसोबत आपल्या पित्याकडे शेतात जात असे. एके दिवशी एक भयंकर घटना घडली. मुलगा डोके दुखते म्हणून ओरडू लागला. एका दासाने लगेच त्याला घरी त्याच्या आईकडे नेले; आई आपल्या मुलाला मांडीवर घेऊन बसली पण काही वेळाने शेवटी ते मूल मेले. तेव्हा शोकाकूल आईने मदत मागण्यास अलीशाकडे जायचे ठरवले. आपल्या नोकरासोबत ती वायव्य दिशेला कर्मेल पर्वतावर गेली. तेथे अलीशा राहात होता.

तिला दुरून पाहून संदेष्ट्याने आपला सेवक गेहजी यास पुढे पाठवले व त्याने खात्री केली की मुलगा खरोखरच मेला आहे. मागोमाग अलीशा व स्त्रीही आली पण शुनेम येथे आल्यावर काय घडले? २ राजे ४:३२-३७ यातील अहवाल असे सांगतो: “अलीशा घरात आला तेव्हा मूल मरून आपल्या खाटेवर पडले आहे असे त्याने पाहिले. मग त्याने एकट्याने आत जाऊन दार लावून घेतले व परमेश्‍वराची प्रार्थना केली. माडीवर जाऊन त्या मुलावर पडून त्याने आपले तोंड त्याच्या तोंडाला, आपले डोळे त्याच्या डोळ्यांना, आपले हात त्याच्या हातांना लाविले; त्याच्यावर त्याने पाखर घातली तेव्हा मुलाच्या देहास ऊब आली. मग त्याला सोडून तो घरात इकडेतिकडे फिरू लागला; व पुनः वर चढून त्या मुलावर त्याने पाखर घातली तेव्हा मुलाने सात वेळा शिंकून डोळे उघडिले. तेव्हा त्याने गेहजीस हाक मारून सांगितले, त्या शूनेमकरिणीस बोलाव. त्याने बोलाविल्यावर ती त्याजकडे आली; तो तिला म्हणाला, आपल्या पुत्राला उचलून घे. ती आत जाऊन त्याच्या पाया पडली, त्याला जमिनीपर्यंत लवून तिने नमन केले, नंतर ती आपल्या मुलास घेऊन बाहेर गेली.”

सारफथच्या विधवेप्रमाणेच शुनेमच्या स्त्रीलाही जाणीव होती की जे काही घडले ते देवाच्या सामर्थ्यानेच घडले. या दोन्ही स्त्रियांच्या प्रिय मुलांना पुन्हा जिवंत करण्यात आले तेव्हा त्यांनी अकथनीय आनंद अनुभवला.

येशूच्या सेवाकार्यादरम्यान घडलेली पुनरुत्थाने

जवळजवळ ९०० वर्षांनंतर शुनेमच्या उत्तरेकडे काही अंतरावरच असलेल्या नाईन नावाच्या खेड्यात एक पुनरुत्थानाची घटना घडली. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत कफर्णहूमपासून नाईन गावाच्या वेशीजवळ आला तेव्हा त्यांना एक अंत्ययात्रा दिसली. ज्या विधवेचा एकुलता एक मुलगा मरण पावला होता, तिच्यावर येशूची नजर पडली. येशूने तिला रडायचे बंद करण्यास सांगितले. यानंतर काय घडले याविषयी लूक, जो एक वैद्य होता, तो असे सांगतो: “मग जवळ जाऊन [येशूने] तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी उभे राहिले; मग तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो, ऊठ. तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले.” (लूक ७:१४, १५) ज्यांनी हा चमत्कार पाहिला त्यांनी देवाचे गौरव केले. या पुनरुत्थानाविषयीची बातमी दक्षिणेकडे यहुदियापर्यंत, तसेच आसपासच्या प्रांतांतही पसरली. विशेष म्हणजे बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाच्या शिष्यांनी याविषयी ऐकून योहानाला या चमत्काराविषयी सांगितले. तेव्हा, यहुदी लोक ज्याची वाट पाहात होते तो मशीहा आपणच आहात का असे विचारण्यास योहानाने येशूकडे आपली माणसे पाठवली. येशूने त्यांना सांगितले: “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा, आंधळे डोळस होतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांस सुवार्ता सांगण्यात येते.”—लूक ७:२२.

येशूने केलेल्या पुनरुत्थानाच्या चमत्कारांपैकी सर्वांच्या ओळखीचा चमत्कार त्याने आपला जिवलग मित्र लाजर याचे पुनरुत्थान केले तेव्हाचा आहे. लाजरचा मृत्यू झाला तेव्हा येशू लगेच त्याच्या घरी जाऊ शकला नाही. येशू जेव्हा बेथानी येथे पोचला तेव्हा लाजरला मरून चार दिवस झालेले होते. थडग्याच्या तोंडाशी असलेला दगड लोटण्यास येशूने सांगितले तेव्हा मार्थेने त्याला अडवून म्हटले, “त्याला दुर्गंधी येत असेल; कारण त्याला मरुन चार दिवस झाले आहेत.” (योहान ११:३९) पण लाजरचे शरीर कुजले तरी पुनरुत्थान अशक्य नव्हते. येशूने आज्ञा देताच, “जो मेलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते.” या घटनेनंतर येशूच्या शत्रूंची जी प्रतिक्रिया होती त्यावरून हेच सिद्ध होते, की लाजर खरोखरच पुन्हा जिवंत झाला होता.—योहान ११:४३, ४४; १२:१, ९-११.

पुनरुत्थानाच्या या चार अहवालांवरून आपल्याला काय समजते? प्रत्येक प्रकरणात पुनरुत्थान झालेली व्यक्‍ती पुन्हा तीच व्यक्‍ती म्हणून जिवंत झाली. त्या सर्वांना त्यांचे जवळचे नातलग ओळखू शकले. पुनरुत्थित झालेल्या एकाही व्यक्‍तीने आपण मेल्यानंतरच्या लहानशा अवधीत काय घडले यासंबंधी काहीही सांगितले नाही. एकानेही परलोकी गेल्याचा उल्लेख केला नाही. ते सर्वजण चांगल्या आरोग्यासहित जिवंत झाले. त्यांच्याकरता तो अनुभव जणू काहीवेळ झोपी गेल्यानंतर पुन्हा उठण्यासारखा होता; किंबहुना हीच वस्तूस्थिती असल्याचे येशूने सूचित केलेच होते. (योहान ११:११) तरीसुद्धा, काही काळानंतर यांपैकी प्रत्येक जणाचा पुन्हा मृत्यू झाला.

प्रिय व्यक्‍तींसोबत पुनर्मीलन—एक अद्‌भूत आशा

याआधीच्या लेखात ज्याचा उल्लेख करण्यात आला होता, त्या ओअनच्या दुःखद मृत्यूनंतर काही काळाने त्याचे वडील आपल्या एका शेजाऱ्‍याकडे गेले. तेथे, एका टेबलवर त्यांना यहोवाच्या साक्षीदारांनी आयोजित केलेल्या एका जाहीर भाषणाची जाहिरात करणारी हस्तपत्रिका दिसली. भाषणाचे शीर्षक होते, “मृत कोठे आहेत?,” हा विषय पाहिल्यावर त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. शेवटी याच प्रश्‍नाचे तर ते उत्तर शोधत होते. ते या भाषणाला हजर राहिले आणि त्यांना बायबलमधून खरोखर सांत्वन प्राप्त झाले. त्यांना कळले की मृतजनांना कोणत्याही यातना जाणवत नाहीत. ते नरकात यातना भोगत नाहीत, किंवा देवदूत बनण्याकरता देव त्यांना स्वर्गात नेत नाही; तर हे मृतजन, ज्यात ओअनचाही समावेश आहे, आपल्या कबरेत पुनरुत्थित होण्याची प्रतीक्षा करत आहेत.—उपदेशक ९:५, १०; यहेज्केल १८:४.

तुमच्या कुटुंबात अशीच एखादी दुर्घटना घडली आहे का? ओअनच्या पित्याप्रमाणे, आपले मृतजन आता कोठे आहेत आणि भविष्यात त्यांना आपण कधी भेटू शकू का असा प्रश्‍न तुमच्याही मनात येतो का? तर मग पुनरुत्थानाविषयी बायबल आणखी काय माहिती देते याविषयी परीक्षण करून पाहण्याचे आम्ही आपणास निमंत्रण देऊ इच्छितो. कदाचित तुम्ही विचार करत असाल, ‘हे पुनरुत्थान केव्हा होईल? यापासून कोणाला फायदा मिळेल?’ या व अशा इतर प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्याकरता कृपया पुढील लेख वाचा. (w०५ ५/१)

[तळटीप]

^ परि. 6 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले पुस्तक, मानवजातीने केलेला देवाचा शोध यातील पृष्ठे १५०-४ पाहावीत.

[५ पानांवरील चित्र]

एका शूनेमकरीणीच्या मुलाचे पुनरुत्थान करण्याकरता यहोवाने अलीशाचा उपयोग केला

[५ पानांवरील चित्र]

एलीयाने यहोवाला, मुलाला पुन्हा जिवंत करण्याची याचना केली

[६ पानांवरील चित्र]

येशूने नाईनच्या एका विधवेच्या मुलाचे पुनरुत्थान केले

[७ पानांवरील चित्र]

पुनरुत्थानामुळे, ताटातूट झालेल्या प्रिय जनांचे पुनर्मीलन होईल