प्रत्येक दिवसाचा सार्थक्याने उपयोग कसा करावा?
प्रत्येक दिवसाचा सार्थक्याने उपयोग कसा करावा?
“आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की, आम्हाला सुज्ञ अंत:करण प्राप्त होईल.” (स्तोत्र ९०:१२) हे आहेत बायबल लेखक मोशेच्या विनम्र प्रार्थनेतील बोल. तो नेमके काय मागत होता? अशी प्रार्थना आपणही करावी का?
दहाव्या वचनात, मोशे मानवाच्या अल्पायुष्याबद्दल खंत व्यक्त करतो. एकेप्रसंगी त्याने ईयोबाचे हे विधान अभिलिखित केले होते: “स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो.” (ईयोब १४:१) अपरिपूर्ण मानवांचे आयुष्य पाहता पाहता निघून जाते या दुःखद वस्तूस्थितीची मोशेला प्रकर्षाने जाणीव होती हे उघडच आहे. म्हणूनच त्याच्या दृष्टीने जीवनाचा प्रत्येक दिवस मोलाचा होता. देवाजवळ वरीलप्रमाणे विनंती करताना मोशेने, आपल्या आयुष्याच्या उर्वरित दिवसांचा सुज्ञपणे उपयोग करण्याची इच्छा व्यक्त केली; जेणेकरून त्याला आपल्या निर्माणकर्त्याला आनंदित करता येईल. आपणही आपल्या आयुष्याचा सार्थक्याने उपयोग करण्यास उत्सुक असू नये का? देवाची संमती मिळवण्याची इच्छा असल्यास आपण निश्चितच असे करण्याचा मनस्वी प्रयत्न करू.
मोशे आणि ईयोब या दोघांना प्रेरणा देणारी आणखी एक बाब होती. आणि तीच गोष्ट आज आपल्यालाही प्रेरणा देऊ शकते. या दोघाही देवभीरू पुरुषांना भवितव्यात मिळणार असलेल्या प्रतिफळाची आशा होती. हे प्रतिफळ म्हणजे सुखदायक परिस्थितीत पृथ्वीवरील जीवनाची आशा. (ईयोब १४:१४, १५; इब्री लोकांस ११:२६) भविष्यातील या सुखदायक परिस्थितीत, कोणाच्याही भल्या कामांवर मृत्यूची कुऱ्हाड येणार नाही. आपल्या निर्माणकर्त्याचा हाच उद्देश आहे की विश्वासू जनांनी एका रम्य पृथ्वीवर सर्वकाळ जगावे. (यशया ६५:२१-२४; प्रकटीकरण २१:३, ४) हे भवितव्य तुम्हीही मिळवू शकता, पण त्याकरता तुम्हीही अशी प्रार्थना केली पाहिजे, की “आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की, आम्हाला सुज्ञ अंत:करण प्राप्त होईल.” (w०५ ५/१)