व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दुसरे शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे

दुसरे शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

दुसरे शमुवेल पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे सार्वभौमत्त्व मान्य केल्यास आपल्याकडून परिपूर्ण आज्ञापालनाची अपेक्षा केली जाते का? सात्त्विक मनुष्य नेहमीच देवाच्या नजरेत जे योग्य ते करतो का? कशाप्रकारची व्यक्‍ती खऱ्‍या देवाला ‘आपल्या मनासारखी’ वाटते? (१ शमुवेल १३:१४) बायबलमधील दुसरे शमुवेल या पुस्तकात या प्रश्‍नांची समाधानदायक उत्तरे दिली आहेत.

दुसरे शमुवेल हे पुस्तक गाद व नाथान या दोन संदेष्ट्यांनी लिहिले होते. या दोघांचेही, प्राचीन इस्राएलच्या दावीद राजाशी घनिष्ठ संबंध होते. * सा.यु.पू. १०४० च्या सुमारास, दाविदाची ४० वर्षांची राजवट पूर्ण होत आली असताना हे पुस्तक लिहून पूर्ण झाले. या पुस्तकात खासकरून दाविदाविषयी व यहोवासोबतच्या त्याच्या नातेसंबंधाविषयी वाचायला मिळते. युद्धांनी पछाडलेल्या देशाचे रूपांतर, एका शूर राजाचे शासन असलेल्या सुसंघटित, समृद्ध राष्ट्रात कसे काय घडून आले, याचा हा एक रोमांचक अहवाल आहे. या मनोवेधक घटनाक्रमात, अतिशय उत्कटतेने व्यक्‍त केलेल्या मानवी संवेदनांचा पदोपदी प्रत्यय येतो.

दावीदाचा “उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला”

(२ शमुवेल १:१–१०:१९)

शौल व योनाथान यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर दाविदाची प्रतिक्रिया पाहून आपल्याला, शौल व योनाथान यांच्याबद्दल व यहोवाबद्दल दाविदाच्या भावनांचे दर्शन घडते. हेब्रोन येथे दाविदाला यहूदाच्या गोत्रावर राजा नियुक्‍त करण्यात येते. शौलाचा पुत्र ईश-बोशेथ याला उरलेल्या इस्राएल राष्ट्रावर राजा नेमण्यात येते. दावीदाचा “उत्तरोत्तर उत्कर्ष” होतो आणि सुमारे साडेसात वर्षांनंतर तो सबंध इस्राएलचा राजा बनतो.—२ शमुवेल ५:१०.

दावीद यबूसी लोकांच्या हातून जेरूसलेम काबीज करतो आणि या शहराला आपल्या राज्याची राजधानी बनवतो. कराराचा कोश जेरूसलेमला आणण्याचा दाविदाचा पहिला प्रयत्न अनर्थकारी ठरतो. पण दुसऱ्‍यांदा मात्र तो यशस्वी होतो आणि आनंदाच्या भरात दावीद अक्षरशः नाचू लागतो. यहोवा दाविदासोबत राज्याचा करार स्थापन करतो. देव पाठीशी असल्यामुळे दावीद आपल्या शत्रूंवर विजय मिळवतो.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:१८—यवाब व त्याच्या दोन भावांची ओळख त्यांच्या आईच्या नावाने, म्हणजे सरूवेचे तिघे पुत्र अशी का करून देण्यात आली? इब्री शास्त्रवचनांत, वंशावळ सहसा वडिलांच्या नावावरून नोंदली जात असे. सरूवेच्या पतीचा कदाचित अकाली मृत्यू झाला असावा किंवा पवित्र लिखाणात समाविष्ट करण्याकरता त्याला अपात्र ठरवण्यात आले असावे. सरूवा ही दाविदाची बहीण अथवा सावत्र बहीण असल्यामुळेही कदाचित तिच्या नावाचा यादीत समावेश करण्यात आल्याचा संभव आहे. (१ इतिहास २:१५, १६) या तीन भावांच्या वडिलाचा केवळ एकदाच उल्लेख केला आहे, आणि हा उल्लेख बेथलेहेमात त्याला जेथे पुरण्यात आले त्या ठिकाणाच्या संदर्भात होता.—२ शमुवेल २:३२.

५:१, २ईश-बोशेथ याचा वध झाल्यावर किती काळानंतर दाविदाला सर्व इस्राएल राष्ट्रावर राजा नियुक्‍त करण्यात आले? ईश-बोशेथ याचे राज्य दोन वर्षे चालले. शौलाच्या मृत्यूनंतर हेब्रोनात दाविदाने आपले राज्य सुरू केले त्याच सुमारास ईश-बोशेथनेही आपले राज्य सुरू केले असावे असा निष्कर्ष तर्कशुद्ध वाटतो. दाविदाने हेब्रोन येथून सर्व यहुदावर साडेसात वर्षे राज्य केले. संपूर्ण इस्राएल राष्ट्रावर राजा बनवण्यात आल्यानंतर काही काळातच दाविदाने आपली राजधानी जेरूसलेम येथे हलवली. त्यामुळे ईश-बोशेथच्या मृत्यूनंतर जवळजवळ पाच वर्षांच्या काळानंतर दावीद सबंध इस्राएलवर राजा बनला.—२ शमुवेल २:३, ४, ८-११; ५:४, ५.

८:२—इस्राएलांशी लढाई झाल्यावर किती मवाबी लोकांना ठार मारण्यात आले? ही संख्या मोजण्यात नव्हे, तर मापण्यात आली असावी. अहवाल वाचल्यावर असे वाटते की दावीदाने मवाबी लोकांना जमिनीवर आजूबाजूला एका ओळीने झोपायला लावले. मग त्याने दोरीने त्या ओळीचे माप घ्यायला लावले. अशारितीने, मवाबी लोकांच्या दोन दोऱ्‍यांच्या मापाइतक्या म्हणजे दोन तृत्त्यांश लोकांना ठार मारण्यात आले आणि एक दोरीच्या मापाइतक्या म्हणजे एक तृत्त्यांश लोकांना सोडून देण्यात आले.

आपल्याकरता धडे:

२:१; ५:१९, २३हेब्रोन येथे जाऊन राहण्याआधी आणि आपल्या शत्रूंविरुद्ध लढायला जाण्याआधी दाविदाने यहोवाकडे याविषयी विचारपूस केली. आपणही आपल्या आध्यात्मिक जीवनावर प्रभाव पाडू शकतील अशा गोष्टींविषयी निर्णय घेण्याआधी यहोवाचे मार्गदर्शन मागितले पाहिजे.

३:२६-३०सूडबुद्धीने वागल्यास दुःखद परिणाम भोगावे लागतात.—रोमकर १२:१७-१९.

३:३१-३४; ४:९-१२दाविदाचे सूडबुद्धीने व वैरभावाने न वागणे खरोखर अनुकरणीय आहे.

५:१२. आपण हे कधीही विसरू नये, की यहोवाने आपल्याला त्याच्या मार्गांचे शिक्षण आणि त्याच्यासोबत एक चांगला नातेसंबंध जोडण्याची संधी दिली आहे.

६:१-७दाविदाचा हेतू चांगला होता तरीसुद्धा, कराराचा कोश एका गाडीत वाहून नेण्याचा त्याचा प्रयत्न देवाच्या आज्ञेच्या विरोधात होता आणि त्यामुळे तो फसला. (निर्गम २५:१३, १४; गणना ४:१५, १९; ७:७-९) उज्जाने कोशाला हात लांब करून धरले त्या घटनेवरूनही हेच दिसून येते की एखाद्याच्या मनातील हेतू कितीही चांगले असले तरीसुद्धा त्यामुळे देवाचे नियम बदलत नाहीत.

६:८, ९परीक्षाप्रसंगी, प्रथम दावीद क्रोधित झाला, आणि मग भयभीत झाला—कदाचित त्याने घडलेल्या दुर्घटनेबद्दल यहोवाला दोषही दिला असावा. देवाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आलेल्या समस्यांकरता आपण केव्हाही यहोवावर दोष लावता कामा नये.

७:१८, २२, २३, २६दावीदाचा नम्रपणा, यहोवाला त्याची एकनिष्ठ भक्‍ती आणि देवाचे नाव उंचावण्याची त्याच्या ठायी असलेली उत्सुकता हे गुण नक्कीच अनुकरण करण्यासारखे आहेत.

८:२. जवळजवळ ४०० वर्षांपूर्वी वर्तवलेली भविष्यवाणी पूर्ण होते. (गणना २४:१७) यहोवाचे वचन नेहमी खरे ठरते.

९:१, ६, ७दाविदाने दिलेले वचन पाळले. आपणही दिलेले वचन पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

यहोवा आपल्या अभिषिक्‍त जनाविरुद्ध अरिष्ट उभे करतो

(२ शमुवेल ११:१–२०:२६)

यहोवा दाविदाला म्हणतो, “पाहा, मी तुझ्याच घरातून तुजवर अरिष्ट उभे करीन; तुझ्या स्त्रिया तुझ्यादेखत तुझ्या शेजाऱ्‍यास देईन; तो ह्‍या सूर्यादेखत त्यांची अब्रू घेईल.” (२ शमुवेल १२:११) हे शासन का देण्यात आले? दाविदाने बथशेबा हिच्यासोबत केलेल्या पापामुळे. दाविदाने पश्‍चात्ताप केल्यावर त्याला क्षमा करण्यात आली तरीसुद्धा त्याच्या पापाचे दुष्परिणाम त्याला भोगावे लागले.

सर्वप्रथम, बथशेबाने जन्म दिलेले मूल मरण पावते. मग दाविदाची कुमारिका असलेली मुलगी तामार हिच्यावर अम्नोन हा तिचा सावत्र भाऊ बलात्कार करतो. तिचा सख्खा भाऊ अबशालोम अम्नोनाला ठार मारून त्याचा सूड घेतो. अबशालोम स्वतःच्या पित्याविरुद्ध कट रचून हेब्रोन येथे जाऊन स्वतःला राजा घोषित करतो. दाविदाला जेरूसलेमला पळ काढण्याशिवाय पर्याय उरत नाही. मंदिराचे रक्षण करण्यासाठी दावीद ज्यांना ठेवून गेला होता त्या त्याच्या दहा उपपत्नींशी अबशालोम संभोग करतो. अबशालोमचा वध झाल्यावरच दावीद पुन्हा राजा बनतो. बन्यामिनी वंशाच्या शीबाने बंड केल्यामुळे शीबाचा मृत्यू होतो.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांचे उत्तर:

१४:७—“निखारा” कशास सूचित करतो? हळूवार जळणाऱ्‍या कोळशाचा निखारा जिवंत संततीला सूचित करण्यासाठी वापरला जात.

१९:२९—मफीबोशेथाचे स्पष्टीकरण ऐकल्यावर दावीद अशाप्रकारे का वागला? मफीबोशेथाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर दाविदाला जाणीव झाली असावी, की मागचा पुढचा विचार न करता सीबाच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून आपण चूक केली. (२ शमुवेल १६:१-४; १९:२४-२८) कदाचित यामुळे दावीद चिडला असेल. त्याला या विषयावर आणखी काहीही ऐकायचे नव्हते.

आपल्याकरता धडे:

११:२-१५दाविदाच्या चुकांविषयीचा प्रामाणिक अहवाल हेच सिद्ध करतो की बायबल खरोखरच देवाचे प्रेरित वचन आहे.

११:१६-२७आपल्या हातून एखादे गंभीर पाप घडल्यास, त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करू नये. उलट, यहोवाजवळ आपले पाप कबूल करून आपण मंडळीच्या वडिलांची मदत मागितली पाहिजे.—नीतिसूत्रे २८:१३; याकोब ५:१३-१६.

१२:१-१४. मंडळीतल्या नियुक्‍त वडिलांसमोर नाथानचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी पापात पडलेल्या व्यक्‍तींना सरळ मार्गावर येण्यासाठी मदत केली पाहिजे. वडिलांनी मोठ्या शिताफीने ही जबाबदारी पार पाडली पाहिजे.

१२:१५-२३. आपल्यावर आलेल्या संकटाविषयी योग्य मनोवृत्ती बाळगल्यामुळे दावीद त्या संकटांना योग्यरितीने तोंड देऊ शकला.

१५:१२; १६:१५, २१, २३. अबशालोम आता राजा बनणार असे दिसून आले तेव्हा गर्विष्ठपणा व महत्त्वाकांक्षेने झपाटलेला उत्तम सल्लागार अहीथोफेल फितूर झाला. बुद्धी असणे पण त्यासोबत नम्रता व एकनिष्ठता हे गुण नसल्यास ती बुद्धी पाशरूप ठरू शकते.

१९:२४, ३०. दाविदाने आपल्याला दाखवलेल्या दयेची मफीबोशेथ खरोखरच कदर करत होता. सीबाच्या संबंधाने राजाने दिलेला निर्णय त्याने निमूटपणे स्वीकारला. यहोवा व त्याच्या संघटनेप्रती वाटणाऱ्‍या कृतज्ञतेने आपल्याला अधीनता दाखवण्यास प्रेरित केले पाहिजे.

२०:२१, २२. एका व्यक्‍तीच्या बुद्धीमुळे अनेकांचा संकटापासून बचाव होऊ शकतो.—उपदेशक ९:१४, १५.

“परमेश्‍वराच्या हाती” आपण पडू या

(२ शमुवेल २१:१–२४:२५)

शौलाने गिबोन्यांना ठार मारल्यामुळे त्याच्यावर रक्‍तदोष आला. यामुळे देशावर तीन वर्षांचा दुष्काळ पडला. (यहोशवा ९:१५) या रक्‍तदोषाचा सूड उगवण्याकरता गिबोनी शौलाच्या सात पुत्रांना फाशी देण्याकरता आपल्या हाती द्यावे अशी मागणी करतात. दावीद त्यांना गिबोन्यांच्या हाती देतो आणि अशारितीने दुष्काळ संपतो व पाऊस पडतो. चार पलिष्टी राक्षसी पुरुष ‘दाविदाच्या व त्याच्या लोकांच्या हाताने पडतात.’—२ शमुवेल २१:२२.

शिरगणती करण्याची आज्ञा देऊन दावीद घोर पाप करतो. मग तो पश्‍चात्ताप करून ‘परमेश्‍वराच्या हाती पडण्याचे’ निवडतो. (२ शमुवेल २४:१४) परिणामस्वरूप, ७०,००० लोक प्राणघातक मरीने मरतात. दावीद यहोवाच्या आज्ञेनुसार वागतो तेव्हा मरीचे निवारण होते.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२१:८—शौलाची मुलगी मीखल हिला पाच पुत्र होते असे कसे म्हणता येईल कारण २ शमुवेल ६:२३ यात तर असे म्हटले आहे की तिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही? या प्रश्‍नाच्या अनेक स्पष्टीकरणांपैकी सर्वमान्य स्पष्टीकरण असे आहे की ही मुले मीखलची बहीण मीराब, जिने अद्रिएल याच्याशी विवाह केला होता, तिची होती. कदाचित मीराबचा अकाली मृत्यू झाल्यामुळे स्वतःचे अपत्य नसलेल्या मीखलने तिच्या मुलांचा सांभाळ केला असावा.

२१:९, १०—रिस्पा हिने गिबोन्यांनी जिवे मारलेल्या आपल्या दोन पुत्रांच्या व शौलाच्या पाच नातवांच्या शवांचे किती वेळपर्यंत राखण केले? या सात जणांना फाशी देण्यात आली तेव्हा “हंगामाचे पहिले दिवस होते,” म्हणजे मार्च किंवा एप्रिल महिन्यांचा काळ. त्यांचे मृतदेह डोंगरावर उघड्यावर टाकण्यात आले. दुष्काळ संपवून जोपर्यंत यहोवाने आपला क्रोध शमल्याचे दाखवले नाही तोपर्यंत रिस्पेने या शवांचे रात्रंदिवस राखण केले. ऑक्टोबरमध्ये हंगामाचे दिवस संपेपर्यंत मुसळधार पाऊस येणे शक्य नव्हते. त्यामुळे रिस्पेने कदाचित पाच किंवा सहा महिन्यांपर्यंत शवांची राखण केली असावी. त्यानंतर दाविदाने या माणसांच्या अस्थि पुरल्या.

२४:१—दाविदाने शिरगणती केली, हे एक गंभीर पाप का होते? शिरगणती करणे हे मुळात नियमशास्त्रानुसार चुकीचे नव्हते. (गणना १:१-३; २६:१-४) दाविदाने कोणत्या उद्देशाने लोकांची गणना केली याविषयी बायबलमध्ये स्पष्ट केलेले नाही. पण १ इतिहास २१:१ असे सूचित करते की सैतानाने त्याला असे करण्यास प्रवृत्त केले होते. दाविदाचा सेनाधीपती यवाब याला माहीत होते की लोकांची मोजदाद करण्याचा दाविदाचा निर्णय चुकीचा होता आणि त्याने दाविदाला असे करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न देखील केला.

आपल्याकरता धडे:

२२:२-५१. यहोवाच खरा देव आहे व त्यावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो हे दाविदाच्या गीतात किती सुरेख शब्दांत सांगितलेले आहे!

२३:१५-१७. जीवन व रक्‍त यांविषयी देवाच्या नियमांबद्दल दाविदाला इतका मनस्वी आदर होता की या प्रसंगी, या नियमांचे अप्रत्यक्षरित्या उल्लंघन करण्यासही त्याने नकार दिला. देवाच्या सर्व आज्ञांविषयी आपण अशीच मनोवृत्ती बाळगण्याचा प्रयत्न करावा.

२४:१०. दाविदाच्या विवेकाने त्याला पश्‍चात्ताप करण्यास उद्युक्‍त केले. आपलाही विवेक असा संवेदनशील आहे का?

२४:१४. यहोवा मानवांपेक्षा कितीतरी पटीने जास्त दयाळू आहे याची दाविदाला खात्री होती. आपल्याला अशी खात्री वाटते का?

२४:१७. आपल्या पापामुळे सबंध राष्ट्रावर दुःख ओढावले याबद्दल दाविदाला वाईट वाटले. पाप केलेल्या पश्‍चात्तापी व्यक्‍तीनेही, आपल्या कृतीमुळे मंडळीवर जो ठपका आला त्याबद्दल खेद व्यक्‍त केला पाहिजे.

आपणही ‘देवाच्या मनासारखी’ व्यक्‍ती बनू शकतो

इस्राएलचा दुसरा राजा ‘परमेश्‍वराच्या मनासारखा मनुष्य’ होता. (१ शमुवेल १३:१४) दाविदाने यहोवाच्या नीतिमान आदर्शांविषयी कधीही शंका व्यक्‍त केली नाही. आणि त्याने कधीही देवापासून स्वतंत्र होऊन कार्य करण्याचा मार्ग अवलंबला नाही. प्रत्येक वेळी जेव्हा दाविदाच्या हातून चूक झाली तेव्हा त्याने आपले पाप कबूल केले, देवाने दिलेली शिक्षा स्वीकारली आणि तो योग्य मार्गावर आला. दावीद एक सात्विक पुरुष होता. त्याचे अनुकरण, खासकरून आपल्या हातून चूक होते तेव्हा करणे सुज्ञतेचे नाही का?

दाविदाची जीवन कथा स्पष्टपणे हे दाखवते की यहोवाचे सार्वभौमत्त्व स्वीकारणे म्हणजे चांगले व वाईट याविषयी त्याच्या आदर्शांचा स्वीकार करणे आणि सात्विकतेने त्यांना जडून राहणे. आपणही हे करू शकतो. दुसरे शमुवेल या पुस्तकातून जे शिकायला मिळाले, त्याबद्दल आपण किती कृतज्ञ असावे! त्यात सापडणारा देवप्रेरित संदेश खरोखर सजीव व सक्रिय आहे.—इब्री लोकांस ४:१२. (w०५ ५/१५)

[तळटीप]

^ परि. 4 या पुस्तकाच्या लेखनात खुद्द शमुवेलाचा सहभाग नसला तरीही या पुस्तकाला त्याचे नाव देण्यात आले आहे कारण स्वीकृत इब्री प्रेरित पुस्तकांच्या यादीत पूर्वी शमुवेलाची दोन्ही पुस्तके एकाच गुंडाळीत होती. पहिले शमुवेल या पुस्तकाचा बराचसा भाग शमुवेलानेच लिहिला आहे.

[८ पानांवरील चित्र]

दाविदाला आपले राज्य कोणी स्थापन केले हे आठवणीत ठेवल्यामुळे नम्र राहण्यास मदत मिळाली

[१० पानांवरील चित्रे]

“पाहा, मी तुझ्याच घरातून तुजवर अरिष्ट उभे करीन”

बथशेबा

तामार

अम्नोन