मानव दारिद्र्य काढून टाकू शकतो का?
मानव दारिद्र्य काढून टाकू शकतो का?
कोट्यवधी लोकांनी दारिद्र्य कधीच अनुभवलेले नाही. उपाशीपोटी झोपी जाण्याची किंवा बोचऱ्या थंडीत कुडकुडत पोटाशी पाय घेऊन झोपण्याची पाळी त्यांच्यावर कधीच आली नाही. तरीपण, यांपैकी बऱ्याचजणांना गरिबांची दया येते. त्यांना मदत करण्यासाठी ते बरेच काही करतात.
इतके असूनही, आंतरिक युद्धे, पूर, दुष्काळ व इतर समस्यांनी पीडित असलेल्यांना गरिबीचे कटू वास्तव टाळता येत नाही. शेती करून पोट भरणाऱ्या आफ्रिकन शेतकऱ्यांना या समस्यांनी बेजार करून सोडले आहे. काहींना आपली गावे सोडून मोठ्या शहरांत जावे लागले आहे. तर काहीजण एखाद्या अनोळखी देशात जाऊन निराश्रित म्हणून राहात आहेत. खेडोपाड्यांतील लोक आपले राहणीमान सुधारण्याच्या आशेने मोठ्या शहरांकडे आकृष्ट होतात.
शहरातली लोकसंख्या वाढल्यामुळे गरिबीला खतपाणी मिळते. पीक उगवण्याकरता पुरेशी जागा उरत नाही. लोकांना सहजासहजी नोकऱ्या मिळत नाहीत. नाईलाजास्तव बरेचजण गुन्हेगारीच्या मार्गाला लागतात. शहरवासी या समस्यांबद्दल बरीच ओरड करतात पण मानवी सरकारे गरिबीच्या वाढत्या समस्येला आटोक्यात आणण्यास असमर्थ आहेत. नोव्हेंबर २००३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका वृत्ताच्या संदर्भात लंडनच्या दी इंडिपेंडंट या बातमीपत्राने म्हटले: “जगात, उपाशी असलेल्यांची संख्या वाढत चालली आहे.” पुढे त्यात असे म्हटले आहे: “सबंध जगात आज अंदाजे ८४.२ कोटी लोक कुपोषित आहेत आणि या संख्येत दर वर्षी आणखी ५० लाख उपाशी व्यक्तींची भर पडत आहे.”
दक्षिण आफ्रिकेतील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला बरेचदा गरिबीने बेजार झालेल्यांची पत्रे येतात. उदाहरणार्थ, ब्लूमफनटेन शहरात राहणाऱ्या एका माणसाने असे लिहिले: “मी बेकार आहे. संधी मिळते तेव्हा मी शहरात चोरी करतो. नाहीतर लागोपाठ कितीतरी दिवस आम्हाला उपाशी राहावे लागते—शिवाय, कडाक्याची थंडी असते. कोणतेच काम मिळत नाही. माझ्यासारखे कितीतरी जण काम मिळेल, काही खायला मिळेल म्हणून रस्त्यांवर वणवण फिरताहेत. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांत अन्न शोधणाऱ्यांना मी स्वतः ओळखतो. काहीजण आत्महत्या करतात. माझ्यासारखे कितीतरी लोक अगदी हताश व निराश आहेत. आमच्या भविष्यात नुसता अंधारच दिसतो. देवानं पोट दिलंय, शरीर दिलंय, मग आम्हाला भूक लागते, थंडी वाजते हे त्याला दिसत नाही का?”
या मनुष्याच्या प्रश्नांची समाधानदायक उत्तरे आहेत. पुढील लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे ही उत्तरे देवाचे वचन बायबल यात सापडतात. (w०५ ५/१५)