व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे मार्ग जाणून घेणे

यहोवाचे मार्ग जाणून घेणे

यहोवाचे मार्ग जाणून घेणे

“तुझे मार्ग मला दाखीव . . . म्हणजे मला तुझी ओळख घडेल.”निर्गम ३३:१३.

१, २. (क) ईजिप्शियन माणसाने इब्री माणसाशी दुर्व्यव्हार केला तेव्हा मोशेची जी प्रतिक्रिया होती त्यावरून काय दिसून येते? (ख) यहोवाच्या सेवेकरता योग्य बनण्याकरता मोशेला काय शिकून घेण्याची गरज होती?

मोशे फारोच्या घराण्यात लहानाचा मोठा झाला आणि ईजिप्तच्या महाकुलीन वर्गालाही ज्याचा हेवा वाटेल असे उच्च प्रतीचे शिक्षण त्याला लाभले. पण हे सर्व असूनही आपण मुळात ईजिप्तवासी नाही याची मोशेला जाणीव होती. तो इब्री मातापित्याच्या पोटी जन्माला आला होता. वयाच्या चाळीसाव्या वर्षी तो आपल्या भाऊबंदांकडे अर्थात इस्राएलपुत्रांकडे त्यांची विचारपूस करण्यास गेला. एक ईजिप्शियन माणूस एका इब्री माणसाशी दुर्व्यव्हार करत आहे हे त्याने पाहिले तेव्हा मोशेने याकडे दुर्लक्ष केले नाही. त्याने त्या ईजिप्शियन माणसाला ठार मारले. मोशेने यहोवाच्या लोकांचा पक्ष घेण्याचे निवडले. आपल्या बांधवांना सोडवण्याकरता देव आपला उपयोग करत आहे असे तो मानत होता. (प्रेषितांची कृत्ये ७:२१-२५; इब्री लोकांस ११:२४, २५) ही घटना उघडकीस आली तेव्हा ईजिप्तच्या राजघराण्याने मोशेला अपराधी ठरवले आणि त्यामुळे त्याला आपला जीव घेऊन तेथून पलायन करावे लागले. (निर्गम २:११-१५) देवाने मोशेचा आपल्या कार्याकरता उपयोग करण्याआधी, मोशेला यहोवाचे मार्ग आणखी चांगल्याप्रकारे जाणून घेण्याची गरज होती. मोशे ते शिकून घेण्यास उत्सुक होता का?—स्तोत्र २५:९.

पुढची ४० वर्षे मोशे हद्दपारीत एक मेंढपाळ म्हणून राहिला. आपल्या इब्री बांधवांनी आपली कदर केली नाही हे त्याने फार मनाला लावून घेतले नाही. त्याऐवजी देवाने ज्या घटना घडू दिल्या त्यांच्याशी त्याने स्वतःस नम्रपणे जुळवून घेतले. बरीच वर्षे होऊनही कोणी मोशेची विशेष दखल घेतली नाही. पण यहोवा मोशेच्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार देत होता आणि मोशेने हे स्वीकारले. कालांतराने मोशेने लिहिले: “मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता.” अर्थात असे लिहिताना तो स्वतःविषयीचे मत व्यक्‍त करत नव्हता, तर देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्याने असे लिहिले. (गणना १२:३) यहोवाने मोशेचा अतिशय उल्लेखनीय प्रकारे उपयोग केला. आपणही नम्र होण्याचा प्रयत्न केल्यास यहोवा आपल्याला अनेक आशीर्वाद देईल.—सफन्या २:३.

कामगिरी सोपवण्यात येते

३, ४. (क) यहोवाने मोशेवर कोणती कामगिरी सोपवली? (ख) मोशेकरता यहोवाने कोणते साहाय्य पुरवले?

एके दिवशी यहोवाने पाठवलेला एक देवदूत सीनाय द्वीपकल्पावरील होरेब पर्वताजवळ मोशेशी बोलला. त्याने मोशेला सांगितले: “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ति मी खरोखर पाहिली आहे; त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे; त्यांस मिसरांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात . . . त्यांस घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.” (निर्गम ३:२, ७, ८) आपल्या या संकल्पानुसार देव मोशेवर काही कामगिरी सोपवू इच्छित होता, पण हे कार्य यहोवाच्या पद्धतीने करावयाचे होते.

यहोवाने पाठवलेल्या देवदूताने पुढे म्हटले: “आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्राएलवंशज यांस बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो.” पण मोशे थोडा कचरला. या कार्याकरता आपण योग्य आहोत असा मोशेला आत्मविश्‍वास नव्हता. आणि खरे पाहता केवळ त्याच्या स्वतःच्या सामर्थ्याने हे कार्य करण्यास तो योग्य नव्हताच. पण यहोवाने त्याला आश्‍वासन दिले, “खचित मी तुझ्याबरोबर असेन.” (निर्गम ३:१०-१२) यहोवाने मोशेला अद्‌भूत चमत्कार करण्याचे सामर्थ्य दिले. देवानेच त्याला पाठवले आहे याचा पुरावा या अद्‌भूत चमत्कारांवरून मिळणार होता. मोशेचा भाऊ अहरोन याला त्याच्यासोबत, त्याच्या वतीने बोलण्याकरता पाठवण्यात आले. यहोवा स्वतः त्यांना काय बोलावे व काय करावे हे शिकवणार होता. (निर्गम ४:१-१७) मोशे आपल्यावर सोपवलेले कार्य विश्‍वासूपणे पूर्ण करू शकला का?

५. इस्राएल लोकांची मनोवृत्ती मोशेकरता कशाप्रकारे एक समस्या ठरली?

इस्राएलच्या वडील माणसांनी सुरुवातीला मोशे व अहरोन यांच्यावर विश्‍वास ठेवला. (निर्गम ४:२९-३१) पण लवकरच, ‘इस्राएलांच्या नायकांनी,’ मोशेवर व त्याच्या भावावर असा आरोप लावला, की तुम्ही आम्हाला फारोच्या दृष्टीत “वाईट” केले. (निर्गम ५:१९-२१; ६:९) इस्राएल लोक ईजिप्त सोडून जात असताना, फारोचे रथ आपल्यामागून येत असल्याचे त्यांनी पाहिले तेव्हा ते खूप घाबरले. समोर तांबडा समुद्र आणि मागे फारोची सेना; हे पाहून इस्राएल लोकांना वाटले आता आपले काही खरे दिसत नाही. त्यांनी मोशेची निंदा करण्यास सुरुवात केली. तुम्ही त्या ठिकाणी असता तर तुम्ही काय केले असते? इस्राएल लोकांजवळ बोटी नव्हत्या, पण यहोवाच्या मार्गदर्शनानुसार मोशेने लोकांना सामान बांधून तयार राहण्यास सांगितले. मग देवाने तांबड्या समुद्राचे पाणी मागे नेले. समुद्रात कोरडी जमीन तयार झाली आणि इस्राएल लोक त्यावरून चालत गेले.—निर्गम १४:१-२२.

सुटकेपेक्षा महत्त्वाचा प्रश्‍न

६. मोशेला आपले कार्य करण्यास नेमताना यहोवाने कोणत्या गोष्टीचे महत्त्व स्पष्ट केले?

मोशेला आपले कार्य करण्यास नेमताना यहोवाने आपल्या नावाचे महत्त्व त्याला सांगितले. त्या नावाबद्दल आणि ते नाव बाळगणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल आदर असणे महत्त्वाचे होते. यहोवाला मोशेने त्याच्या नावाबद्दल विचारले तेव्हा त्याने असे म्हटले: “मला जे व्हायचे असेल ते मी होईन.” (NW) मोशेला इस्राएल पुत्रांना असेही सांगण्याची आज्ञा देण्यात आली: “यहोवा, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव याने मला तुम्हाकडे पाठवले आहे.” पुढे यहोवा म्हणाला: “हे सर्वकाळ माझे नाम आहे, आणि हेच माझे स्मारक सर्व पिढ्यांना होईल.” (निर्गम ३:१३-१५, पं.र.भा.) आजही सबंध पृथ्वीवरील देवाचे सेवक त्याला यहोवा याच नावाने ओळखतात.—यशया १२:४, ५; ४३:१०-१२.

७. फारो मगरूरपणे वागत होता तरीसुद्धा देवाने मोशेला काय करण्यास सांगितले?

मोशे व अहरोन यांनी फारोसमोर जाऊन यहोवाच्या नावाने आपला संदेश दिला. पण फारोने मगरूरपणे म्हटले: “यहोवा कोण आहे की मी इस्राएलास जाऊ देण्यासंबंधी त्याचा शब्द ऐकावा? मी यहोवाला जाणत नाही, आणि मी इस्राएलास जाऊ देणार नाही.” (निर्गम ५:१, २) फारो अतिशय कठोर मनाचाच नव्हे तर कपटी निघाला; तरीसुद्धा यहोवाने मोशेला वारंवार त्याच्याकडे जाऊन संदेश घोषित करण्यास पाठवले. (निर्गम ७:१४-१६, २०-२३; ८:१, २, २०) फारो चिडला आहे हे मोशेला दिसत होते. पुन्हापुन्हा जाऊन त्याचा सामना करण्याचा काही उपयोग होता का? इस्राएल सुटका मिळवण्यास उत्सुक होते. फारो मुद्दामहून अडून राहिला होता. तुम्ही मोशेच्या जागी असता तर तुम्ही काय केले असते?

८. फारोशी यहोवाने ज्याप्रकारे व्यवहार केला त्यामुळे कोणाला फायदा झाला आणि या घटनांचा आपल्यावर कसा परिणाम व्हावा?

मोशेने आणखी एक संदेश घोषित केला व म्हटले: “यहोवा इबऱ्‍यांचा देव असे म्हणतो, ‘माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ दे.’” देवाने पुढे असेही म्हटले: “मी आपला हात पुढे करून तुला व तुझ्या लोकांना मरीकडून मारले असते, आणि पृथ्वीतून तुला नष्ट करण्यात आले असते. तरी मी आपले सामर्थ्य तुला दाखवावे आणि माझे नाव पृथ्वीमध्ये प्रसिद्ध व्हावे म्हणून मी तुला राखले आहे.” (निर्गम ९:१३-१६, पं.र.भा.) कठोर मनाच्या फारोविरुद्ध न्यायदंड आणण्याद्वारे यहोवाने आपला विरोध करणाऱ्‍या सर्वांना धडा शिकवण्याकरता आपले सामर्थ्य दाखवण्याचे ठरवले होते. यांत, ज्याला येशू ख्रिस्ताने “जगाचा अधिपती” म्हटले तो दियाबल सैतान देखील आहे. (योहान १४:३०; रोमकर ९:१७-२४) भाकीत केल्यानुसार यहोवाचे नाव सबंध पृथ्वीवर घोषित करण्यात आले. त्याच्या सहनशीलतेमुळे इस्राएल लोकांचा बचाव झाला आणि त्यांच्यासोबत मोठा मिश्र समुदाय देखील त्याची उपासना करू लागला. (निर्गम ९:२०, २१; १२:३७, ३८) तेव्हापासून, यहोवाच्या नावाची घोषणा झाल्यामुळे आणखी लाखो लोकांचा फायदा झाला व त्यांनी देखील खऱ्‍या उपासनेचा स्वीकार केला आहे.

त्रासदायक लोकांशी व्यवहार

९. मोशेच्या आपल्या लोकांनीच यहोवाबद्दल अनादर कशाप्रकारे दाखवला?

इब्री लोकांना देवाचे नाव माहीत होते. त्यांच्याशी बोलताना मोशे देवाच्या नावाचा उपयोगही करत असे. पण त्यांनी हे नाव बाळगणाऱ्‍या देवाबद्दल नेहमीच योग्य आदर दाखवला नाही. यहोवाने इस्राएल लोकांना ईजिप्तमधून चमत्कारिकरित्या सोडवल्यानंतर, त्यांना लगेच पिण्याचे पाणी मिळाले नाही तेव्हा काय झाले? ते मोशेविरुद्ध कुरकूर करू लागले. यानंतर ते अन्‍नाबद्दल तक्रार करू लागले. मोशेने त्यांना इशारा दिला की त्यांचे हे कुरकूरणे केवळ अहरोन व आपल्याविरुद्धच नव्हे तर यहोवाविरुद्ध होते. (निर्गम १५:२२-२४; १६:२-१२) सीनाय पर्वतावर यहोवाने इस्राएलांना नियमशास्त्र दिले आणि यासोबत अनेक अद्‌भुते त्यांना दाखवली. पण लोकांनी थोड्या काळानंतरच देवाची आज्ञा मोडून सोन्याचे वासरू तयार केले व त्याची उपासना केली. आणि वरून त्यांनी म्हटले की आम्ही “यहोवाचा सण” साजरा करत आहोत.—निर्गम ३२:१-९, पं.र.भा.

१०. निर्गम ३३:१३ येथे आपण मोशेची जी विनंती ऐकतो ती आज ख्रिस्ती पर्यवेक्षकांकरता महत्त्वाची का आहे?

१० ज्या लोकांचे स्वतः यहोवानेच ताठ मानेचे लोक असे वर्णन केले त्यांच्याबरोबर मोशेने कशाप्रकारे व्यवहार केला? मोशेने यहोवाला विनंती केली: “माझ्यावर तुझी कृपादृष्टि असल्यास, तुझे मार्ग मला दाखीव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टि माझ्यावर होईल.” (निर्गम ३३:१३) आज ख्रिस्ती पर्यवेक्षक यहोवाच्या ज्या आधुनिक काळातील साक्षीदारांची देखभाल करतात, ते त्यामानाने अतिशय नम्र लोक आहेत. तरीसुद्धा, हे ख्रिस्ती पर्यवेक्षक यहोवाला अशी प्रार्थना करतात: “हे परमेश्‍वरा, तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रगट कर.” (स्तोत्र २५:४) यहोवाच्या मार्गांचे ज्ञान मिळाल्यामुळे या पर्यवेक्षकांना निरनिराळ्या प्रसंगांना तोंड देताना देवाच्या वचनातील तत्त्वांचे पालन करण्यास व यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाशी सुसंगत व्यवहार करण्यास मदत मिळते.

यहोवा आपल्या लोकांकडून काय अपेक्षितो

११. यहोवाने मोशेकरता कोणत्या सूचना पुरवल्या आणि आपल्याकरता त्या महत्त्वाच्या का आहेत?

११ यहोवाला आपल्या लोकांकडून काय अपेक्षा आहेत हे त्याने सीनाय पर्वतावर तोंडी सांगितले होते. नंतर मोशेला दहा आज्ञा दगडी पाट्यांवर लिखित रूपात देण्यात आल्या. पर्वतावरून खाली आल्यावर त्याने इस्राएलांना वासराच्या ओतीव मूर्तीची पूजा करताना पाहिले. तेव्हा त्याने क्रोधित होऊन त्या दगडी पाट्या फेकून फोडून टाकल्या. यहोवाने पुन्हा, मोशेने कोरलेल्या दगडी पाट्यांवर दहा आज्ञा लिहिल्या. (निर्गम ३२:१९; ३४:१) या आज्ञा पहिल्यांदा ज्या दिल्या होत्या त्यांसारख्याच होत्या, त्यांत बदल करण्यात आला नव्हता. मोशेला या आज्ञांनुसार कार्य करायचे होते. देवाने मोशेला हेही दाखवले की तो कशाप्रकारची व्यक्‍ती आहे; यामुळे मोशेला कळले की यहोवाचा प्रतिनिधी या नात्याने त्याने कसे वागले पाहिजे. ख्रिस्ती आज मोशेच्या नियमाखाली नाहीत पण यहोवाने मोशेला जे सांगितले होते त्यात अनेक मूलभूत तत्त्व आहेत जे आजही बदललेले नाहीत आणि यहोवाची उपासना करणाऱ्‍या सर्वांकरता ते आजही बंधनकारक आहेत. (रोमकर ६:१४; १३:८-१०) यांपैकी काही तत्त्वांचा आता विचार करू या.

१२. यहोवा अनन्य भक्‍तीची अपेक्षा करतो हे समजल्यामुळे इस्राएल राष्ट्रावर कसा परिणाम होण्यास हवा होता?

१२ यहोवाला अनन्य भक्‍ती द्या. मी केवळ अनन्य भक्‍ती स्वीकारतो असे जेव्हा यहोवाने घोषित केले तेव्हा इस्राएल राष्ट्र तेथे उपस्थित होते. (निर्गम २०:२-५) यहोवा खरा देव आहे याचा भरपूर पुरावा इस्राएल लोकांनी पाहिला होता. (अनुवाद ४:३३-३५) यहोवाने हे स्पष्ट केले होते की इतर राष्ट्रे काहीही करोत, पण तो आपल्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची मूर्तिपूजा किंवा भूतविद्येचे प्रकार खपवून घेणार नाही. त्यांची उपासना ही केवळ औपचारिक असता कामा नये. यहोवावर आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्‍तीने प्रीती करा असे त्यांना सांगण्यात आले होते. (अनुवाद ६:५, ६) यात त्यांचे वागणेबोलणे—अर्थात त्यांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू समाविष्ट होता. (लेवीय २०:२७; २४:१५, १६; २६:१) येशू ख्रिस्ताने देखील हे स्पष्ट केले की यहोवा अनन्य भक्‍तीची अपेक्षा करतो.—मार्क १२:२८-३०; लूक ४:८.

१३. इस्राएलांनी देवाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे का आवश्‍यक होते आणि यहोवाच्या आज्ञांचे पालन करण्यास कोणत्या गोष्टीने आपल्याला प्रवृत्त केले पाहिजे? (उपदेशक १२:१३)

१३ यहोवाच्या आज्ञांचे काटेकोरपणे पालन करा. इस्राएल लोकांना आठवण करून दिली जाण्याची गरज होती, की जेव्हा यहोवाने त्यांच्यासोबत करार बांधला होता तेव्हा त्यांनी त्याच्या सर्व आज्ञांचे तंतोतंत पालन करण्याचे वचन दिले होते. त्यांना बऱ्‍याच वैयक्‍तिक बाबी ठरवण्याचे स्वातंत्र्य होते, पण ज्या बाबतींत यहोवाने त्यांना आज्ञा दिल्या होत्या त्यांचे मात्र काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक होते. असे केल्यामुळे ते देवाबद्दल प्रेम तर व्यक्‍त करूच शकत होते पण यामुळे त्यांना व त्यांच्या मुलाबाळांना फायदाच होणार होता कारण यहोवाचे सर्व नियम त्यांच्या हिताचे होते.—निर्गम १९:५-८; अनुवाद ५:२७-३३; ११:२२, २३.

१४. आध्यात्मिक कार्यांना प्राधान्य देण्याचे महत्त्व देवाने इस्राएलांच्या मनांवर कशाप्रकारे ठसवले?

१४ आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य द्या. शारीरिक गरजा पुरवण्यात व्यग्र होऊन आध्यात्मिक कार्यांकडे दुर्लक्ष करू नये असे इस्राएल राष्ट्राला सांगण्यात आले होते. त्यांचे जीवन केवळ दैनंदिन कार्यांनाच वाहिलेले असावयाचे नव्हते. यहोवाने दर आठवड्याचा काही भाग पवित्र ठरवला होता; हा वेळ केवळ खऱ्‍या देवाच्या उपासनेशी संबंधित कार्यांकरताच उपयोगात आणावयाचा होता. (निर्गम ३५:१-३; गणना १५:३२-३६) या व्यतिरिक्‍त, दर वर्षी आणखी काही वेळ विशिष्ट पवित्र मेळाव्यांकरता राखून ठेवायचा होता. (लेवीय २३:४-४४) हे मेळावे यहोवाच्या सामर्थ्यशाली कृत्यांचे वर्णन करण्याकरता, त्याच्या मार्गांची आठवण करून दिली जाण्याकरता व त्याच्या सर्व चांगुलपणाबद्दल त्याचे आभार मानण्याकरता होते. यहोवाला आपला भक्‍तिभाव व्यक्‍त केल्यामुळे, हळूहळू लोकांच्या मनात देवाचे भय व त्याच्याबद्दल प्रीती वाढत जाऊन, त्यांना त्याच्या मार्गात चालण्यास मदत मिळणार होती. (अनुवाद १०:१२, १३) त्या नियमांत दडलेली हितकारक तत्त्वे आज यहोवाच्या सेवकांच्याही उपयोगाची आहेत.—इब्री १०:२४, २५.

यहोवाच्या गुणांची जाण राखणे

१५. (क) यहोवाच्या गुणांची जाण राखणे मोशेच्या हिताचे का होते? (ख) यहोवाच्या प्रत्येक गुणाबद्दल सखोल विचार करण्यास कोणते प्रश्‍न साहाय्यक ठरतील?

१५ यहोवाच्या गुणांची जाण राखणे मोशेकरता हिताचे होते कारण यामुळे त्याला इस्राएल लोकांशी योग्य व्यवहार करण्यास मदत मिळाली. निर्गम ३४:५-७ यात आपण वाचतो की देवाने मोशेच्या पुढून जाता जाता अशी घोषणा केली: “परमेश्‍वर, परमेश्‍वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्‍यांची क्षमा करणारा, (पण अपराधी जनांची) मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसऱ्‍या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.” या शब्दांवर थोडे थांबून मनन करा. स्वतःशीच विचार करा: ‘यांपैकी प्रत्येक गुणाचा काय अर्थ आहे? यहोवाने हा विशिष्ट गुण कशाप्रकारे प्रकट केला आहे? ख्रिस्ती पर्यवेक्षक हा गुण कसा दाखवू शकतात? आपल्यापैकी प्रत्येकाच्या वागणुकीवर या विशिष्ट गुणाचा प्रभाव कसा पडला पाहिजे?’ काही उदाहरणांचा विचार करा.

१६. देवाची दया अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्याकरता आपण काय करू शकतो आणि असे करणे महत्त्वाचे का आहे?

१६ यहोवा “दयाळू व कृपाळू देव” आहे. तुमच्याजवळ शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) हा संदर्भ ग्रंथ असल्यास त्यात “दया” या गुणाबद्दल काय माहिती आहे ती पडताळून पाहा. किंवा टेहळणी बुरूज प्रकाशन विषयसूची (इंग्रजी) अथवा वॉचटावर लायब्ररी (सीडी-रॉम) यांचा उपयोग करून या विषयावर अधिक संशोधन करा. * काँकर्डन्समधून दया या गुणाशी संबंधित शास्त्रवचने पाहा. हे साहित्य वाचल्यास तुम्हाला असे दिसून येईल की यहोवाची दया काही प्रसंगी त्याला ठरवलेली शिक्षा कमी करण्यास प्रवृत्त करते, पण यासोबतच त्यात कोमल करूणेचाही समावेश आहे. म्हणूनच देव आपल्या लोकांचे संकट दूर करण्याकरता कार्यवाही करतो. याचा एक पुरावा म्हणजे, इस्राएल लोक प्रतिज्ञात देशात जात असताना देवाने त्यांच्या आध्यात्मिक गरजांसोबतच त्यांच्या शारीरिक गरजाही भागवल्या. (अनुवाद १:३०-३३; ८:४) त्याच्या लोकांनी चुका केल्या तेव्हा यहोवाने दयाळूपणे त्यांना क्षमा केली. त्याने प्राचीन काळच्या आपल्या लोकांना दया दाखवली. मग आजच्या काळातल्या त्याच्या सेवकांनी एकमेकांशी किती दयाळूपणे वागले पाहिजे!—मत्तय ९:१३; १८:२१-३५.

१७. यहोवाच्या कृपाळूपणाविषयी समजून घेतल्याने आपण कशाप्रकारे खऱ्‍या उपासनेचा प्रसार करू शकतो?

१७ दयाळू असण्यासोबतच यहोवा कृपाळू देखील आहे. तुमच्याजवळ शब्दकोश असल्यास, “कृपाळू” या शब्दाचा काय अर्थ आहे हे वाचून पाहा. यानंतर यहोवाचे कृपाळू असे वर्णन करणाऱ्‍या शास्त्रवचनांशी या माहितीची तुलना करा. बायबल सांगते की यहोवा कृपाळू असल्यामुळे तो आपल्या लोकांपैकी जे प्रतिकूल परिस्थितीत आहेत त्यांची प्रेमळपणे काळजी वाहतो. (निर्गम २२:२६, २७) कोणत्याही देशात, परदेशी व्यक्‍ती या न्‌ त्या प्रकारे प्रतिकूल परिस्थितीत असतात. अशा व्यक्‍तींशी निष्पक्ष मनोवृत्तीने व दयाळूपणे वागण्यास आपल्या लोकांना शिकवताना यहोवाने त्यांना आठवण करून दिली की ते स्वतः देखील एकेकाळी ईजिप्तमध्ये परदेशी होते. (अनुवाद २४:१७-२२) आज देवाच्या लोकांबद्दल, अर्थात आपल्याबद्दल काय म्हणता येईल? कृपाळूपणे वागल्यास आपण बांधवांतील एकता वाढवू जेणेकरून इतरजण यहोवाच्या उपासनेकडे आकृष्ट होतील.—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; प्रकटीकरण ७:९, १०.

१८. इतर देशांतील लोकांच्या रितीभातींच्या संदर्भात यहोवाने इस्राएल लोकांना ज्या मर्यादा पाळण्यास सांगितले होते, त्यावरून आपण काय शिकू शकतो?

१८ पण इतर देशांच्या लोकांशी कृपाळूपणे वागणे हे यहोवावर व त्याच्या नैतिक आदर्शांवर प्रेम करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे नव्हते. म्हणूनच, इस्राएलांना आसपासच्या देशांतील रितीरिवाज, त्यांच्या धार्मिक प्रथा व अनैतिक रितीभाती आत्मसात करू नका असे शिकवण्यात आले होते. (निर्गम ३४:११-१६; अनुवाद ७:१-४) हे आज आपल्याकरताही समर्पक आहे. आपला देव यहोवा हा पवित्र असल्यामुळे आपणही पवित्र असणे महत्त्वाचे आहे.—१ पेत्र १:१५, १६.

१९. पापाविषयी यहोवाचा दृष्टिकोन समजून घेतल्याने त्याच्या लोकांचा कशाप्रकारे बचाव होऊ शकतो?

१९ मोशेला आपले मार्ग समजून यावेत म्हणून यहोवाने हे स्पष्ट केले की जरी तो पापी वर्तनाला संमती देत नसला तरीसुद्धा तो मुळात मंदक्रोध आहे. तो लोकांना त्याचे नियम शिकून घेण्याकरता व त्या नियमांनुसार वागण्याची संधी देतो. एखादी व्यक्‍ती पश्‍चात्ताप व्यक्‍त करते तेव्हा यहोवा तिला क्षमा करतो पण गंभीर चुकांकरता जे शिक्षेस पात्र आहेत अशांची तो गय करत नाही. त्याने मोशेला बजावून सांगितले की इस्राएल लोक जे काही करतील त्याचा त्यांच्या पुढील पिढ्यांवर एकतर चांगला किंवा वाईट परिणाम होईल. यहोवाच्या मार्गांची कदर बाळगल्यामुळे, जेव्हा स्वतःच्या चुकीमुळे आपल्यावर वाईट प्रसंग ओढावतात तेव्हा देवाला दोष देण्याच्या व तो विलंब लावत आहे असा निष्कर्ष काढण्याच्या प्रवृत्तीपासून त्याच्या लोकांचा बचाव होऊ शकतो.

२०. कोणती गोष्ट आपल्याला सह विश्‍वासू बांधवांसोबत व सेवाकार्यात आपल्याला भेटणाऱ्‍यांसोबत योग्यप्रकारे व्यवहार करण्यास मदत करू शकते? (स्तोत्र ८६:११)

२० यहोवा व त्याच्या मार्गांविषयी जर तुमचे वैयक्‍तिक ज्ञान तुम्ही वाढवू इच्छिता, तर मग सतत संशोधन करत राहा आणि बायबलचे वाचन करताना मनन करा. यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या निरनिराळ्या विलोभनीय पैलूंचे जवळून परीक्षण करा. आपल्याला देवाचे अनुकरण कसे करता येईल आणि आपले जीवन त्याच्या उद्देशाशी कसे जुळवून घेता येईल याचा प्रार्थनापूर्वक विचार करा. असे केल्याने तुम्ही अनेक पाशांत पडण्याचे टाळू शकाल, आपल्या सह विश्‍वासू बांधवांसोबत योग्य रितीने व्यवहार करू शकाल आणि इतरांनाही आपल्या महान देवाची ओळख करून घेण्यास व त्याच्यावर प्रेम करण्यास मदत करू शकाल. (w०५ ५/१५)

[तळटीप]

^ परि. 16 हे सर्व यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले साहित्य आहे.

तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• नम्र असणे हे मोशेकरता महत्त्वाचे का होते आणि ते आपल्याकरता आवश्‍यक का आहे?

• वारंवार फारोसमोर जाऊन त्याला यहोवाचे संदेश सांगितल्यामुळे कोणती चांगली गोष्ट साध्य झाली?

• मोशेला शिकवण्यात आलेली काही उल्लेखनीय तत्त्वे कोणती आहेत आणि ती आज आपल्याकरताही समर्पक का आहेत?

• यहोवाचे गुण आपण अधिक चांगल्याप्रकारे कसे समजू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

मोशेने यहोवाची वचने विश्‍वासूपणे फारोला कळवली

[१६ पानांवरील चित्र]

यहोवाच्या गुणांविषयी मनन करा