व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवावर भाव ठेवणाऱ्‍यांचे तो रक्षण करतो

यहोवावर भाव ठेवणाऱ्‍यांचे तो रक्षण करतो

यहोवावर भाव ठेवणाऱ्‍यांचे तो रक्षण करतो

“तुझे वात्सल्य व तुझे सत्य ही माझे नित्य रक्षण करोत.”स्तोत्र ४०:११.

१. राजा दाविदाने यहोवाकडे कोणती विनंती केली आणि सध्या ती विनंती कशाप्रकारे पूर्ण केली जात आहे?

प्राचीन इस्राएलच्या राजा दाविदाने “धीर धरून परमेश्‍वराची वाट पाहिली” आणि म्हणूनच त्याने म्हटले की यहोवाने “माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला.” (स्तोत्र ४०:१) यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांचे तो कशाप्रकारे रक्षण करतो हे त्याच्या वारंवार प्रत्ययास आले. त्यामुळेच, माझे नित्य रक्षण कर अशी दावीद यहोवाला विनंती करू शकला. (स्तोत्र ४०:११) ज्यांना ‘अधिक चांगल्या पुनरुत्थानाचे’ वचन देण्यात आले आहे अशा विश्‍वासू स्त्रीपुरुषांमध्ये दावीदाचाही समावेश आहे. त्याअर्थी आज तो यहोवाच्या स्मृतीत सुरक्षित आहे व त्याला देखील पुनरुत्थानाचे प्रतिफळ प्राप्त होईल. (इब्री ११:३२-३५) त्याला अगदी उत्तम भवितव्याची खात्री मिळाली आहे. त्याचे नाव यहोवाच्या ‘स्मरणवहीत’ नोंदण्यात आले आहे.—मलाखी ३:१६.

२. यहोवाकडून रक्षण केल्या जाण्याचा काय अर्थ होतो हे समजण्याकरता बायबल आपल्याला कशाप्रकारे मदत करते?

इब्री लोकांस अध्याय ११ यात उल्लेख असलेल्या विश्‍वासू व्यक्‍ती, येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील जीवनाच्या आधी होऊन गेल्या. तरीसुद्धा येशूच्या पुढील शिकवणुकीनुसारच या सर्वांनी आपले जीवन व्यतीत केले होते, की “जो आपल्या जिवावर प्रीति करितो तो त्याला मुकेल, आणि जो ह्‍या जगात आपल्या जिवाचा द्वेष करितो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील.” (योहान १२:२५) तेव्हा यहोवाकडून रक्षण केल्या जाण्याचा असा अर्थ होत नाही, की एका व्यक्‍तीला कोणतेही दुःख किंवा छळ सहन करावा लागणार नाही. पण त्याचा असा अर्थ होतो की त्या व्यक्‍तीला आध्यात्मिक रितीने सुरक्षित ठेवले जाईल जेणेकरून तिला देवासमोर संमतीप्राप्त स्थिती कायम राखता येईल.

३. यहोवाने ख्रिस्त येशूचे संरक्षण केले याचा कोणता पुरावा आपल्याजवळ आहे आणि यामुळे काय साध्य झाले?

येशूलाही क्रूर छळ आणि निंदा सहन करावी लागली आणि शेवटी त्याला त्याच्या शत्रूंच्या हाती अतिशय अपमानजनक व यातनामय मृत्यू देखील आला. पण याचा अर्थ देवाने आपल्या मशीहाचे रक्षण करण्याचा शब्द पाळला नव्हता असे नाही. (यशया ४२:१-६) येशूच्या अपमानजनक मृत्यूच्या तिसऱ्‍या दिवशी त्याचे पुनरुत्थान करण्यात आले तेव्हा हेच सिद्ध झाले की, ज्याप्रमाणे यहोवाने दाविदाचा धावा ऐकला होता त्याप्रमाणे त्याने येशूचाही धावा ऐकला. कारण यहोवाने येशूला शेवटपर्यंत विश्‍वासू राहण्याची शक्‍ती दिली. (मत्तय २६:३९) अशारितीने संरक्षण करण्यात आल्यामुळे, येशूला स्वर्गात अमरत्व प्राप्त झाले आहे आणि ज्या लाखो मानवांनी त्याच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवला आहे त्यांना सार्वकालिक जीवनाची आशा लाभली आहे.

४. अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना आणि ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ कोणती खात्री देण्यात आली आहे?

ज्याप्रमाणे दाविदाचे व येशूचे यहोवाने संरक्षण केले त्याचप्रकारे आजही यहोवा त्याच्या सेवकांचे संरक्षण करण्याकरता तितकाच उत्सुक व समर्थ आहे याची आपण खात्री बाळगू शकतो. (याकोब १:१७) येशूच्या अभिषिक्‍त बंधूंपैकी जे थोडके आज या पृथ्वीवर राहिले आहेत, ते यहोवाच्या या प्रतिज्ञेवर पूर्ण भरवसा ठेवू शकतात: “अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, . . . जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्‍तीने विश्‍वासाच्या योगे रक्षिलेले आहां, त्या तुम्हांसाठी ते वतन स्वर्गांत राखून ठेवले आहे.” (१ पेत्र १:३-७) पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेली “दुसरी मेंढरे” देखील देवावर आणि स्तोत्रकर्त्याद्वारे त्याने दिलेल्या या वचनावर भरवसा ठेवू शकतात: “अहो परमेश्‍वराचे सर्व भक्‍तहो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा; परमेश्‍वर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचे रक्षण करितो.”—योहान १०:१६; स्तोत्र ३१:२३.

आध्यात्मिकरित्या सुरक्षित

५, ६. (क) या आधुनिक काळात देवाच्या लोकांचे कोणत्या अर्थाने रक्षण करण्यात आले आहे? (ख) अभिषिक्‍त जनांचा यहोवासोबत कोणत्या प्रकारचा संबंध आहे आणि ज्यांना पृथ्वीवरील जीवनाची आशा आहे त्यांचा यहोवासोबत कोणत्या प्रकारचा संबंध आहे?

आधुनिक काळात, यहोवाने आपल्या लोकांना आध्यात्मिक रितीने सुरक्षित ठेवण्याकरता अनेक व्यवस्था केल्या आहेत. छळापासून किंवा जीवनात उद्‌भवणाऱ्‍या सर्वसामान्य समस्यांपासून व दुःखांपासून तो त्यांचे रक्षण करत नसला तरीसुद्धा, त्याच्यासोबत एक घनिष्ठ नाते टिकवून ठेवण्याकरता लागणारी सर्व मदत व प्रोत्साहन त्याने त्यांना तत्परतेने पुरवले आहे. देवाने प्रेमळपणे पुरवलेल्या खंडणीवरील विश्‍वासाच्या आधारावरच त्यांना हा नातेसंबंध उभारणे शक्य झाले आहे. या विश्‍वासू ख्रिश्‍चनांपैकी काहींना देवाच्या आत्म्याने, ख्रिस्तासोबत स्वर्गात सहशासक या नात्याने राज्य करण्याकरता अभिषिक्‍त केले आहे. त्यांना देवाचे आत्मिक पुत्र म्हणून नीतिमान ठरवण्यात आले आहे आणि हे शब्द त्यांच्या बाबतीत खरे ठरतात: “त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले; त्या पुत्राच्या ठायी, खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्‍ति म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.”—कलस्सैकर १:१३, १४.

इतर लाखो विश्‍वासू ख्रिश्‍चनांनाही आश्‍वासन देण्यात आले आहे की त्यांना देखील देवाने पुरवलेल्या खंडणीच्या तरतुदीमुळे फायदे प्राप्त होतील. बायबल सांगते: “मनुष्याचा पुत्रहि सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्‍तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे.” (मार्क १०:४५) हे ख्रिस्ती कालांतराने, “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” मिळण्याची वाट पाहत आहेत. (रोमकर ८:२१) तोपर्यंत, ते देवासोबत असलेला त्यांचा वैयक्‍तिक मैत्रीचा संबंध मोलवान समजतात आणि या नातेसंबंधाला दिवसेंदिवस दृढ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात.

७. आज यहोवा आपल्या लोकांचे आध्यात्मिक रितीने कशाप्रकारे संरक्षण करतो?

एक मार्ग ज्याद्वारे यहोवा आपल्या लोकांचे आध्यात्मिकरित्या संरक्षण करतो तो म्हणजे, त्यांच्याकरता प्रगतीशील प्रशिक्षणाचा नित्यक्रम पुरवण्याद्वारे. यामुळे त्यांना सत्याच्या अचूक ज्ञानात वाढत जाणे शक्य होते. तसेच यहोवा आपल्या वचनाद्वारे, संघटनेद्वारे व पवित्र आत्म्याच्या द्वारे सातत्याने मार्गदर्शन पुरवतो. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ निर्देशनाखाली संपूर्ण जगातील देवाचे लोक एखाद्या आंतरराष्ट्रीय कुटुंबासारखे आहेत. दास वर्ग, राष्ट्रीय अथवा सामाजिक पार्श्‍वभूमीचा विचार न करता, यहोवाच्या सेवकांच्या जागतिक कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजा आणि वेळ पडल्यास शारीरिक गरजा देखील भागवतो.—मत्तय २४:४५.

८. यहोवा आपल्या एकनिष्ठ सेवकांविषयी कोणता भरवसा व्यक्‍त करतो आणि तो त्यांना कोणते आश्‍वासन देतो?

ज्याप्रकारे यहोवाने येशूचे त्याच्या शत्रूंच्या हल्ल्यापासून शारीरिकरित्या रक्षण केले नाही त्याचप्रकारे आज तो ख्रिश्‍चनांचेही त्याप्रकारे रक्षण करत नाही. पण देवाची कृपा त्यांच्यावर नाही असा निश्‍चितच याचा अर्थ होत नाही. उलट, यावरून दिसून येते की सबंध विश्‍वाच्या सार्वभौमत्वाच्या वादात आपले सेवक आपला पक्ष घेतील असा भरवसा यहोवा त्यांच्याविषयी व्यक्‍त करतो. (ईयोब १:८-१२; नीतिसूत्रे २७:११) यहोवाला एकनिष्ठ राहणाऱ्‍यांना तो कधीही सोडणार नाही कारण, “परमेश्‍वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्‍तांस सोडीत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते.”—स्तोत्र ३७:२८.

वात्सल्य व सत्याने रक्षिलेले

९, १०. (क) यहोवाची सत्यता कशाप्रकारे त्याच्या लोकांचे रक्षण करते? (ख) यहोवा आपल्या वात्सल्याने आपल्या एकनिष्ठ सेवकांचे रक्षण करतो हे बायबलमध्ये कशाप्रकारे दाखवण्यात आले आहे?

स्तोत्र ४० यात आढळणाऱ्‍या प्रार्थनेत, दाविदाने यहोवाला प्रार्थना केली की तुझ्या वात्सल्याने व सत्याने माझे रक्षण कर. यहोवाला सत्यता व नीतिमत्त्व प्रिय असल्यामुळे तो आपले आदर्श अगदी स्पष्टपणे आपल्या सेवकांपुढे मांडतो. देवाच्या आदर्शांकडे दुर्लक्ष करणाऱ्‍यांना जी दुःखे, भय व समस्या यांना तोंड द्यावे लागते त्यांपासून देवाचे सेवक बऱ्‍याच प्रमाणात सुरक्षित राहतात कारण ते देवाच्या आदर्शांचे पालन करतात. उदाहरणार्थ, आपण अंमली पदार्थांचा व मद्याचा दुरूपयोग, लैंगिक अनैतिकता आणि हिंसाचारी जीवनशैलीपासून स्वतःस दूर ठेवले, तर आपण स्वतःला आणि आपल्या प्रिय जनांनाही अनेक दुःखदायक समस्यांपासून सुरक्षित ठेवू शकतो. दावीद कधीकधी यहोवाच्या मार्गांपासून वाहवत गेला होता; पण जे यहोवाच्या सत्य मार्गापासून वाहवत जातात त्यांना देव असे आश्‍वासन देतो की पश्‍चात्तापी व्यक्‍तींकरता तो “आश्रयस्थान” आहे. ते आनंदाने असे म्हणू शकतात: “तू संकटापासून माझे रक्षण करिशील.” (स्तोत्र ३२:७) खरोखर, देव किती अद्‌भूतरितीने आपले वात्सल्य व्यक्‍त करतो!

१० देवाच्या वात्सल्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे हे जग ज्याचा तो लवकरच नाश करणार आहे, त्यापासून त्याने आपल्या सेवकांना अलिप्त राहण्याचा इशारा दिला आहे. बायबल म्हणते: “जगावर व जगांतल्या गोष्टींवर प्रीति करू नका. जर कोणी जगावर प्रीति करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीति नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.” या इशाऱ्‍याकडे लक्ष देऊन त्यानुसार वागल्यास आपण अक्षरशः आपले जीवन सर्वकाळासाठी सुरक्षित ठेवू शकतो कारण हे वचन पुढे म्हणते: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१५-१७.

विवेक, समंजसपणा व सुज्ञता यांमुळे सुरक्षित

११, १२. विवेक, समज व सुज्ञता कशाप्रकारे आपले संरक्षण करतात हे स्पष्ट करा.

११ देवाची संमती मिळवू इच्छिणाऱ्‍यांना उद्देशून दाविदाचा पुत्र शलमोन याने देवाच्या प्रेरणेने असे लिहिले: “विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला संभाळील.” त्याने असाही आग्रह केला: “बुद्धी संपादन कर; . . . ती सोडू नको म्हणजे ती तुझे संरक्षण करील; तिची आवड धर म्हणजे ती तुझा सांभाळ करील.”—नीतिसूत्रे २:११; ४:५, ६, NW.

१२ देवाच्या वचनातून आपण जे शिकतो त्यावर मनन केल्यास आपण विवेकाने कार्य करू शकतो. मनन केल्यामुळे आपल्याला अधिक समज उत्पन्‍न करण्यास मदत होते आणि त्यामुळे आपण जीवनात योग्य गोष्टींना महत्त्व देऊ शकतो. हे महत्त्वाचे आहे कारण आपल्यापैकी बहुतेकांना, कदाचित वैयक्‍तिक अनुभवामुळे हे माहीत आहे की जेव्हा जाणूनबुजून अथवा नकळत योग्य गोष्टींना महत्त्व दिले जात नाही तेव्हा समस्या निर्माण होतात. सैतानाचे जग आपल्यापुढे धनसंपत्ती, प्रतिष्ठा व सत्ता ही ध्येये ठेवते; पण यहोवा मात्र आपल्याला अधिक महत्त्वाच्या आध्यात्मिक मूल्यांकडे लक्ष देण्याचे प्रोत्साहन देतो. आध्यात्मिक मूल्यांपेक्षा जगिक ध्येयांना प्राधान्य दिले जाते तेव्हा कुटुंबे विस्कळित होतात, मैत्रीसंबंध तुटतात आणि आध्यात्मिक ध्येये हळूहळू दृष्टिआड होतात. परिणामस्वरूप, येशूच्या या शब्दांतील दुःखद वास्तविकता अनुभवण्याची पाळी एका व्यक्‍तीवर येऊ शकते: “मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ?” (मार्क ८:३६) त्याऐवजी, “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील,” या येशूच्या सल्ल्यानुसार वागण्यातच सुज्ञपणा आहे.—मत्तय ६:३३.

आत्मकेंद्रित बनण्याचा धोका

१३, १४. आत्मकेंद्रित असण्याचा काय अर्थ होतो आणि अशी वृत्ती बाळगणे सुज्ञपणाचे का नाही?

१३ मानवाला स्वभावतःच स्वतःबद्दल विचार करण्यास आवडते. पण वैयक्‍तिक इच्छा व स्वार्थ जीवनात सर्वात महत्त्वाचे स्थान घेतात तेव्हा मात्र समस्या उद्‌भवतात. तेव्हा यहोवासोबत आपली मैत्री कायम राखण्याकरता तो आपल्याला आत्मकेंद्री वृत्ती टाळण्याचा सल्ला देतो. आत्मकेंद्रित असण्याचा अर्थ, “केवळ स्वतःच्याच इच्छा, गरजा किंवा स्वार्थांची काळजी असणे” असा होतो. आजच्या जगात बरेच लोक अशाच मनोवृत्तीचे नाहीत का? विशेष म्हणजे, बायबल भाकीत करते की सैतानाच्या दुष्ट जगाच्या ‘शेवटल्या काळात,’ “माणसे स्वार्थी,” अर्थात आत्मकेंद्रित बनतील.—२ तीमथ्य ३:१, २.

१४ बायबलमध्ये इतरांबद्दलही काळजी बाळगण्याची, आणि स्वतःप्रमाणे इतरांवर प्रेम करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. ही आज्ञा पाळण्यात किती सुज्ञपणा आहे याची खऱ्‍या ख्रिश्‍चनांना जाणीव आहे. (लूक १०:२७; फिलिप्पैकर २:४) सर्वसामान्य लोक हा सल्ला व्यावहारिक नाही असे कदाचित म्हणतील; पण जर आपण यशस्वी वैवाहिक संबंध, आनंदी कौटुंबिक नातीगोती, आणि समाधानदायक मैत्रीसंबंध अनुभवू इच्छितो तर या सल्ल्याचे पालन करणे अगत्याचे आहे. त्याअर्थी, यहोवाच्या खऱ्‍या सेवकाने कधीही स्वतःबद्दल विचार करण्याच्या स्वाभाविक वृत्तीला इतके बळावू देऊ नये की ज्यामुळे अधिक महत्त्वाच्या कार्यांकडे त्याचे दुर्लक्ष होईल. या कार्यांत सर्वप्रथम तो ज्या देवाची, अर्थात यहोवाची उपासना करतो त्याच्याशी संबंधित कार्यांचा समावेश होतो.

१५, १६. (क) आत्मकेंद्री वृत्तीमुळे काय घडू शकते आणि हे कोणाच्या उदाहरणांवरून दिसून येते? (ख) इतरांच्या चुका लगेच दाखवणारी व्यक्‍ती मुळात काय करते?

१५ आत्मकेंद्री वृत्ती बाळगल्यामुळे एक व्यक्‍ती फाजील धार्मिक बनण्याची शक्यता आहे आणि यामुळे हळूहळू ती व्यक्‍ती संकुचित मनोवृत्तीची व गर्विष्ठ बनू शकते. बायबल अगदी योग्यपणे सांगते: “हे मानवा, दोष लावणारा तू कोणीहि असलास तरी स्वतः तुला सबब नाही; कारण ज्यात तू दुसऱ्‍याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोषी ठरविणारा तूहि त्याच गोष्टी करितोस.” (रोमकर २:१; १४:४, १०) येशूच्या काळातल्या धर्मपुढाऱ्‍यांना स्वतःच्या धार्मिकतेबद्दल इतकी खात्री होती की येशू व त्याच्या अनुयायांना ताडन देण्याचा आपल्याला अधिकार आहे असे ते समजत होते. असे करण्याद्वारे त्यांनी स्वतःला जणू न्यायाधीश ठरवले. पण स्वतःच्या चुकांकडे डोळेझाक केल्यामुळे त्यांनी स्वतःलाच दोषी ठरवले.

१६ येशूचा विश्‍वासघात करणारा त्याचा अनुयायी यहूदा यानेही दुसऱ्‍यांना दोषी ठरवण्याची चूक केली. बेथानी येथे लाजारची बहीण मरीया हिने येशूच्या पायांवर सुंगधी तेल ओतले तेव्हा यहूदाने लगेच आक्षेप घेतला. तो रागाने म्हणाला: “हे सुगंधी तेल तीनशे रूपयांस विकून ते गरिबांस का दिले नाहीत?” पण अहवालात पुढे असे स्पष्ट केले आहे: “त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही; तर तो चोर असून त्याच्याजवळ डबी होती, व तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे म्हणाला.” (योहान १२:१-६) आपण कधीही यहूदा किंवा त्या धर्मपुढाऱ्‍यांसारखे होऊ नये, ज्यांनी दुसऱ्‍यांचे दोष लगेच दाखवले पण शेवटी स्वतःच दोषी ठरले.

१७. फुशारकी मारण्यात किंवा फाजील आत्मविश्‍वास बाळगण्यात कोणता धोका असू शकतो हे उदाहरणासहित सांगा.

१७ दुःखाची गोष्ट म्हणजे आरंभीचे काही ख्रिस्ती देखील, ते यहूदासारखे चोर नव्हते तरीसुद्धा, गर्विष्ठपणाला बळी पडले आणि फुशारकी मारू लागले. त्यांच्याविषयी याकोबाने म्हटले: “तुम्ही गर्विष्ठ आहा म्हणून फुशारकी मारता.” त्याने पुढे म्हटले: “अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे.” (याकोब ४:१६) आपण साध्य केलेल्या गोष्टींबद्दल, किंवा यहोवाच्या सेवेतील आपल्या विशेषाधिकारांबद्दल फुशारकी मारणे हे आपल्या हिताचे नाही. (नीतिसूत्रे १४:१६) प्रेषित पेत्राने अतिशय आत्मविश्‍वासाने अशी फुशारकी मारली होती: “आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीहि अडखळणार नाही. . . . आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही.” पण त्याच्या बाबतीत काय घडले हे आपल्याला माहीत आहे. खरे पाहता, आपल्याजवळ फुशारकी मारण्यासारखे काहीही नाही. आपल्याजवळ जे काही आहे ते केवळ यहोवाच्या प्रेमदयेमुळे आपल्याला मिळाले आहे. हे आठवणीत ठेवल्यास आपण फुशारकी मारणार नाही.—मत्तय २६:३३-३५, ६९-७५.

१८. यहोवाला गर्वाविषयी कसे वाटते?

१८ आपल्याला सांगितलेले आहे: “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अधःपाताचे मूळ होय.” का? यहोवा स्वतः याचे उत्तर देतो: “गर्व, अभिमान . . . यांचा मी द्वेष” करतो. (नीतिसूत्रे ८:१३; १६:१८) म्हणूनच ‘अश्‍शूरचा राजा याच्या मनातील गर्व व त्याची उन्मत्त दृष्टी’ यामुळे त्याच्याविरुद्ध यहोवाचा कोप भडकला! (यशया १०:१२) यहोवाने त्याला शिक्षा दिली. लवकरच, सैतानाचे संपूर्ण जग व त्यातील गर्विष्ठ व उन्मत्त असणारे दृश्‍य व अदृश्‍य नेते यहोवाच्या न्यायाला तोंड देतील. यहोवाच्या शत्रूंच्या आत्माभिमानी वृत्तीचा अंशही आपल्या वागण्यातून दिसून येऊ नये!

१९. देवाचे लोक कोणत्या अर्थाने अभिमानी व नम्र देखील आहेत?

१९ यहोवाचे सेवक असण्याचा मात्र खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी अवश्‍य अभिमान बाळगावा. (यिर्मया ९:२४) त्याच वेळेस त्यांनी नम्रही असणे अत्यावश्‍यक आहे. का? कारण “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३) तेव्हा, यहोवाचे सेवक या नात्याने आपले स्थान सुरक्षित ठेवण्याकरता आपली मनोवृत्ती प्रेषित पौलासारखी असली पाहिजे. त्याने म्हटले: “ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला, हे वचन विश्‍वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे; त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे.”—१ तीमथ्य १:१५.

२०. यहोवा सध्या आपल्या लोकांचे कशाप्रकारे संरक्षण करतो आणि भविष्यात तो त्यांचे कशाप्रकारे संरक्षण करेल?

२० यहोवाचे लोक, देवाच्या कार्यांना प्रामुख्य देण्याकरता स्वतःला स्वेच्छेने दृष्टिआड ठेवतात. त्यामुळे आपण खात्री बाळगू शकतो की यहोवा पुढेही त्यांचे आध्यात्मिक रितीने संरक्षण करत राहील. तसेच मोठ्या संकटाला सुरूवात झाल्यावर यहोवा आपल्या लोकांचे केवळ आध्यात्मिक रितीने नव्हे तर शारीरिक अर्थानेही संरक्षण करेल याची आपण खात्री बाळगू शकतो. देवाच्या नव्या जगात प्रवेश केल्यावर ते आनंदाने जयघोष करतील: “पाहा, हा आमचा देव! याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील. हाच परमेश्‍वर आहे. याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.”—यशया २५:९. (w०५ ६/१)

तुम्हाला आठवते का?

• राजा दावीद व येशू ख्रिस्त यांचे कशाप्रकारे संरक्षण करण्यात आले?

• आज यहोवाच्या लोकांचे कशाप्रकारे संरक्षण केले जाते?

• आत्मकेंद्रित असण्याचे आपण का टाळावे?

• आपण अभिमान का बाळगावा आणि तरीसुद्धा नम्र का असावे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२२ पानांवरील चित्रे]

यहोवाने दावीद व येशू यांचे कशाप्रकारे संरक्षण केले?

[२४ पानांवरील चित्र]

देवाचे लोक आज आध्यात्मिकरित्या कशाप्रकारे सुरक्षित आहेत?