व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लवकरच जगातून गरिबी नाहीशी होईल

लवकरच जगातून गरिबी नाहीशी होईल

लवकरच जगातून गरिबी नाहीशी होईल

या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर आहे त्यासारख्या परादीसची चित्रे, गरिबीत राहणाऱ्‍यांना साहजिकच अतिशय आकर्षक वाटतात. पहिले मानवी जोडपे, आदाम व हवा अशाच एका परादिसात राहात होते. एदेन बाग हे त्यांचे राहण्याचे स्थान होते. (उत्पत्ति २:७-२३) त्यांनी ते परादीस गमावले. पण तरीसुद्धा, भविष्यात असे परादीस पुन्हा येईल—गरिबी नसलेले नवे जग वास्तवात उतरेल हा विश्‍वास केवळ एक स्वप्न नाही. तर तो बायबलमध्ये भाकीत केलेल्या प्रतिज्ञांवर आधारित आहे.

येशू ख्रिस्ताने पृथ्वीवरील त्याच्या जीवनाच्या शेवटल्या दिवशी एक प्रतिज्ञा केली होती. येशूच्या बाजूला ज्या चोरांना खिळण्यात आले होते त्यांपैकी एकाने, देव मानवाच्या समस्या सोडवू शकतो यावर विश्‍वास दाखवला. त्याने म्हटले: “येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” त्याच्या शब्दांवरून कळते, की येशू राजा म्हणून राज्य करेल आणि मृतांना पुन्हा जिवंत केले जाईल यावर त्याला विश्‍वास होता. येशूने त्याला उत्तर दिले: “आज मी तुला खचित सांगतो, तू माझ्याबरोबर परादिसात असशील.”—लूक २३:४२, ४३, NW.

भविष्यात येणार असलेल्या त्या परादिसात जे लोक राहतील त्यांच्या संदर्भात बायबल सांगते: “ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील.” (यशया ६५:२१) होय, “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही; कारण सेनाधीश परमेश्‍वराच्या तोंडची ही वाणी आहे.”—मीखा ४:४.

पण मग, आज गरिबी का अस्तित्वात आहे? गरिबांना देव कोणत्या मार्गाने मदत करतो? गरिबी शेवटी केव्हा नाहीशी होईल?

गरिबी का अस्तित्वात आहे?

आदाम व हवा यांना ज्या परादीसात ठेवण्यात आले होते, ते त्यांनी दियाबल सैतानाने सुरू केलेल्या विद्रोहामुळे गमावले. सर्पाच्या माध्यमाने हव्वेशी बोलून, सैतानाने तिला एका विशिष्ट झाडाचे फळ न खाण्याची जी आज्ञा देवाने दिली होती त्या आज्ञेचा भंग करण्यास प्रवृत्त केले. त्याने तिला फसवून असा विचार करायला लावला की देवापासून स्वतंत्र झाल्यास तिचे जीवन आणखी आनंददायक होईल. मना केलेले फळ हव्वेने आदामाला दिले तेव्हा त्यानेही ते खालले आणि अशारितीने आपल्या पत्नीला साथ देऊन त्याने देवाकडे पाठ फिरवली.—उत्पत्ति ३:१-६; १ तीमथ्य २:१४.

या विद्रोही जोडप्याला योग्य शिक्षा देण्यात आली. त्यांना परादीसमधून काढून टाकण्यात आले आणि तेव्हापासून त्यांना अस्तित्वात राहण्याकरता संघर्ष करावा लागला. आजपर्यंत यहोवाने सैतानाला पापी मानवजातीवर राज्य करण्याची मुभा दिली आहे आणि यामुळे देवाच्या आज्ञांचे पालन न केल्यामुळे होणारे दुष्परिणाम सर्वांसमोर अगदी स्पष्ट झाले आहेत. मानवी इतिहास दाखवतो की मानव या पृथ्वीवर एक परादीस निर्माण करण्यास असमर्थ आहेत. (यिर्मया १०:२३) उलट देवापासून स्वतंत्र झाल्यामुळे मानवाने स्वतःवर अनेक संकटे ओढवली आहेत, ज्यांपैकी एक आहे गरिबी.—उपदेशक ८:९.

पण या त्रस्त जगातही गरिबांना अगदीच असहाय्य सोडण्यात आलेले नाही. देवाचे प्रेरित वचन बायबल यात त्यांच्याकरता उपयुक्‍त मार्गदर्शन आहे.

“चिंता करीत बसू नका”

येशू एकदा एका मोठ्या जमावाशी बोलत होता; या जमावात अनेक गरीब लोकही होते. येशूने त्यांना म्हटले: “आकाशातील पांखरांकडे निरखून पाहा; ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत की कोठारात साठवीत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो; तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहा की नाही? . . . ह्‍यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्‍या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्तय ६:२६-३३.

एक व्यक्‍ती गरीब आहे म्हणजे तिला चोरी करण्याशिवाय गत्यंतर नाही असे नाही. (नीतिसूत्रे ६:३०, ३१) जर त्या व्यक्‍तीने देवाला आपल्या जीवनात प्राधान्य दिले तर तिच्या गरजा भागवल्या जातील. दक्षिण आफ्रिकेत लेसोथो येथे राहणाऱ्‍या टुकीसो याचे उदाहरण पाहा. १९९८ साली सरकाराविरुद्ध पुकारण्यात आलेले बंड संपुष्टात आणण्याकरता परदेशी सैन्याने लेसोथो शहरात प्रवेश केला. त्या लढाईमुळे दुकाने लुटण्यात आली, लोकांच्या नोकऱ्‍या गेल्या आणि भयंकर अन्‍न टंचाई भासू लागली.

टुकीसो हा शहरातल्या सर्वात गरीब वस्तीत राहात होता. त्याच्या शेजाऱ्‍यांपैकी कित्येकजणांनी पोट भरण्यासाठी दुकानांतील माल चोरून आणला होता. एके दिवशी टुकीसो आपल्या खोलीत परत आला तेव्हा त्याने पाहिले, की तो मासीसो नावाच्या ज्या स्त्रीसोबत राहात होता तिने बरेच सामान दुकानांतून चोरून आणले होते. चोरी करणे हे देवाच्या नियमांविरुद्ध आहे असे समजावून टुकीसोने तिला म्हटले, “हे सामान बाहेर ने.” मासीसोने त्याचे ऐकले. शेजारपाजारचे लोक त्यांची थट्टा करू लागले आणि त्यांनी टाकलेले सामान स्वतःच्या घरी घेऊन गेले.

टुकीसोने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करताना जे शिकले होते त्याच्या आधारावर त्याने असा निर्णय घेतला. देवाच्या नियमांचे पालन केल्यामुळे त्यांची उपासमार झाली का? नाही. काहीवेळानंतर, टुकीसो यहोवाच्या साक्षीदारांच्या ज्या मंडळीत सभांना जायचा तेथील वडिलांनी त्याच्याशी संपर्क साधून त्याला थोडे अन्‍नधान्य आणून दिले. खरे तर, शेजाऱ्‍याच्या दक्षिण आफ्रिकेतील यहोवाच्या साक्षीदारांनी लेसोथो येथे राहणाऱ्‍या आपल्या ख्रिस्ती भाऊ बहिणींकरता दोन टन साहाय्य सामुग्री पाठवली होती. टुकीसोला देवाच्या आज्ञांचे पालन करताना व मंडळीतल्या बांधवांनी प्रेमळपणे त्याला साहाय्य केलेले पाहून मासीसो हिच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला. तिने देखील बायबलचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. कालांतराने ते दोघे कायदेशीररित्या विवाहबद्ध झाले आणि अशारितीने यहोवाचे साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेण्यास योग्य ठरले. आजही ते देवाची विश्‍वासूपणे सेवा करत आहेत.

यहोवाला गरिबांची काळजी वाटते. (“देवाचा गरिबांबद्दल कसा दृष्टिकोन आहे?” असे शीर्षक असलेला चौकोन पाहा.) त्याने टुकीसो व मासीसो यांच्यासारख्या इतरांनाही त्याच्याविषयी जाणून घेण्यास मदत करण्यासाठी प्रेमळपणे तरतूद केली आहे. आणि त्याच्या वचनात त्याने दैनंदिन जीवनाकरता व्यवहारोपयोगी सल्ला पुरवला आहे.

एक उत्तम तरतूद

यहोवाच्या साक्षीदारांनी नेहमीच गरिबांबद्दल यहोवाला जशी काळजी वाटते तशीच काळजी व्यक्‍त केली आहे. (गलतीकर २:१०) एखाद्या देशात विपत्ती येते व यहोवाच्या साक्षीदारांवर तिचा परिणाम होतो तेव्हा त्यांना साहाय्य करण्याकरता व्यवस्था केली जाते. याहूनही महत्त्वाचे म्हणजे साक्षीदार सर्वांच्या, गरिबांच्याही आध्यात्मिक गरजा भागवण्याचा प्रयत्न करतात. (मत्तय ९:३६-३८) मागील ६० वर्षांत, हजारो प्रशिक्षित स्वयंसेवक परदेशांत मिशनरी कार्य करण्यास स्वेच्छेने पुढे आले आहेत. उदाहरणार्थ, फिनलंडहून आलेल्या एका मिशनरी जोडप्याने सेसोथो भाषा शिकून घेतली व त्यामुळे ते तुकीसो व मासीसो यांना येशूचे शिष्य बनण्यास मदत करू शकले. (मत्तय २८:१९, २०) अशाप्रकारचे मिशनरी कार्य करण्याकरता बरेचदा या स्वयंसेवकांना श्रीमंत देशातील आरामदायी जीवन त्यागून गरीब देशात जाऊन राहावे लागते.

पोट भरण्यासाठी खरे ख्रिस्ती चोरीचा मार्ग अवलंबत नाहीत. त्याऐवजी, यहोवा देव आपल्या गरजा भागवण्यास समर्थ आहे असा त्यांना विश्‍वास आहे. (इब्री लोकांस १३:५, ६) यहोवा आपल्या लोकांच्या गरजा ज्या मार्गांनी भागवतो त्यांपैकी एक मार्ग म्हणजे त्याच्या उपासकांची जगव्याप्त संघटना. या संघटनेतील सदस्य एकमेकांची काळजी घेतात.

यहोवा गरिबांना आणखी एका मार्गाने मदत पुरवतो. तो त्यांना दैनंदिन जीवनासंबंधी व्यवहारोपयोगी मार्गदर्शन पुरवतो. उदाहरणार्थ बायबलमध्ये अशी आज्ञा देण्यात आली आहे: “चोरी करणाऱ्‍याने पुन्हा चोरी करु नये, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करुन उद्योग करीत राहावे.” (इफिसकर ४:२८) बेकार असलेल्या अनेकांनी, मेहनत करून स्वतःकरता काम निर्माण केले आहे. उदाहरणार्थ, भाजीपाला उगवणे. तसेच बायबल गरीब लोकांना दारू व त्यासारखी इतर व्यसने टाळून पैसा वाचवण्याची शिकवण देते.—इफिसकर ५:१८.

गरिबी नसलेले जग—केव्हा?

बायबल असे सूचित करते की आपण सैतानाच्या राज्याच्या ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत. (२ तीमथ्य ३:१) लवकरच यहोवा मानवजातीचा न्याय करण्याकरता येशू ख्रिस्ताला पाठवेल. तेव्हा काय घडेल? येशूने याचे उत्तर आपल्या एका दृष्टान्तात दिले. त्याने म्हटले: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल; त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करितो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील.”—मत्तय २५:३१-३३.

या दृष्टान्तात मेंढरे म्हटलेले असे लोक आहेत की जे येशूच्या शासनाच्या अधीन होतात. येशूने त्यांची तुलना मेंढरांशी केली कारण ते त्याला आपला मेंढपाळ मानून त्याच्या मागे चालतात. (योहान १०:१६) या मेंढरांसारख्या लोकांना येशूच्या परिपूर्ण शासनाखाली जीवन मिळेल. गरीबी नसलेल्या एका नव्या जगात ते आनंदाने जगतील. जे येशूच्या शासनाचा धिक्कार करतात त्यांची तुलना बकऱ्‍यांशी केलेली आहे व त्यांचा कायमचा नाश केला जाईल.—मत्तय २५:४६.

देवाचे राज्य दुष्टाईचा अंत करेल. तेव्हा गरिबी इतिहासजमा होईल. त्याऐवजी, सबंध पृथ्वीवर असे लोक राहतील की जे एकमेकांवर प्रेम करतात व एकमेकांबद्दल काळजी करतात. अशाप्रकारचे नवे जग अशक्य नाही याविषयी यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय बंधुसमाजाकडे पाहिल्यावर खात्री पटते. कारण येशूने म्हटले होते: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३५. (w०५ ५/१५)

[६, ७ पानांवरील चौकट/चित्रे]

देवाचा गरिबांबद्दल कसा दृष्टिकोन आहे?

बायबल मानवाच्या सृष्टिकर्त्याबद्दल असे सांगते, की तो “भुकेल्यांना अन्‍न देतो.” (स्तोत्र १४६:७) देवाला गरिबांबद्दल वाटणाऱ्‍या काळजीचे वर्णन करणारी शंभरपेक्षा अधिक वचने बायबलमध्ये आढळतात.

उदाहरणार्थ, यहोवाने प्राचीन इस्राएल राष्ट्राला नियमशास्त्र दिले तेव्हा त्याने इस्राएली शेतकऱ्‍यांना अशी आज्ञा दिली होती की त्यांनी आपापल्या शेतांची कापणी करताना कानाकोपऱ्‍यांतील पीक कापू नये. तसेच जैतुन वृक्षावरील व द्राक्षमळ्यांतील फळे काढल्यावर राहिलेली फळे पुन्हा जाऊन काढू नये असेही त्यांना सांगण्यात आले होते. हे कायदे उपरी, अनाथ, विधवा व इतर गोरगरिबांच्या हिताकरता प्रेमळपणे स्थापित करण्यात आले होते.—लेवीय १९:९, १०; अनुवाद २४:१९-२१.

शिवाय देवाने इस्राएल लोकांना अशी आज्ञा दिली होती: “कोणा विधवेला किंवा पोरक्याला गांजू नका. तुम्ही त्यांना कोणत्याहि प्रकारे गांजिले आणि त्यांनी माझ्याकडे गाऱ्‍हाणे केले तर मी त्यांचे गाऱ्‍हाणे अवश्‍य ऐकेन; आणि माझा राग भडकून मी तरवारीने तुमचा वध करीन, आणि तुमच्या स्त्रिया विधवा होतील व तुमची बालके पोरकी होतील.” (निर्गम २२:२२-२४) दुःखाची गोष्ट म्हणजे, अनेक धनाढ्य इस्राएलांनी या शब्दांकडे दुर्लक्ष केले. या व इतर अयोग्य वर्तनाबद्दल देवाने इस्राएल लोकांना आपल्या संदेष्ट्यांच्या माध्यमाने वारंवार ताकीद दिली. (यशया १०:१, २; यिर्मया ५:२८; आमोस ४:१-३) शेवटी देवाने अश्‍शूरी लोकांना व नंतर बॅबिलोनी लोकांना येऊन इस्राएलवर विजय मिळवू दिला. बऱ्‍याच इस्राएल लोकांनी आपला जीव गमावला आणि जे जिवंत बचावले त्यांना बंदिवान करून इतर देशांत नेण्यात आले.

देवाचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त यानेही देवाला गोरगरिबांविषयी असलेली प्रेमळ काळजी आपल्या वागणुकीत व्यक्‍त केली. आपल्या सेवाकार्याचा उद्देश सांगताना, येशूने म्हटले: “परमेश्‍वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला.” (लूक ४:१८) याचा अर्थ येशूचे सेवाकार्य केवळ गरिबांपुरतेच मर्यादित होते असे नाही. त्याने धनाढ्य लोकांनाही प्रेमळपणे मदत केली. पण असे करतानाही त्याने अनेकदा गरिबांविषयी आपली काळजी व्यक्‍त केली. उदाहरणार्थ, एका श्रीमंत अधिकाऱ्‍याला त्याने असा सल्ला दिला: “तुझे असेलनसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गांत संपत्ति मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.”—लूक १४:१, १२-१४; १८:१८, २२; १९:१-१०.

यहोवा देव व त्याच्या पुत्राला गोरगरिबांविषयी मनापासून काळजी वाटते. (मार्क १२:४१-४४; याकोब २:१-६) म्हणूनच, यहोवाने ज्यांचा मृत्यू झाला आहे अशा कोट्यवधी गरीब लोकांना आपल्या स्मरणात ठेवले आहे. या सर्व लोकांना गरिबी नसलेल्या एका नव्या जगात पुनरुत्थित केले जाईल.—प्रेषितांची कृत्ये २४:१५.

[चित्रे]

यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय बंधुसमाजाकडे पाहिल्यावर, नवे जग शक्य आहे याची खात्री पटते

[५ पानांवरील चित्र]

टुकीसो याच्यासोबत ज्यांनी बायबलचा अभ्यास केला त्या मिशनरी बांधवासोबत टुकीसो व मासीसो

[५ पानांवरील चित्र]

मासीसो आपल्या घराच्या दाराजवळ, तिच्यासोबत अभ्यास करणाऱ्‍या मिशनरी बहिणीबरोबर