व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आईवडिलांनो, आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवा

आईवडिलांनो, आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवा

आईवडिलांनो, आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवा

“जर कोणी स्वकीयांची . . . तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे.”१ तीमथ्य ५:८.

१, २. (क) कुटुंबांना एकत्र मिळून ख्रिस्ती सभांना हजर असलेले पाहून प्रोत्साहन का मिळते? (ख) सभेला वेळेवर येण्याकरता कुटुंबांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते?

यहोवाच्या साक्षीदारांची एखादी सभा सुरू होण्याआधी जर तुम्ही मंडळीत नजर फिरवून पाहिली तर तुम्हाला, स्वच्छ व नीटनेटके कपडे घालून आपापल्या आईवडिलांशेजारी बसलेली अनेक मुले दिसतील. या कुटुंबांतील सदस्यांना यहोवाबद्दल आणि एकमेकांबद्दल असणारे प्रेम पाहून आपल्याला आनंद वाटत नाही का? पण सर्व कुटुंब मिळून सभेला वेळेवर येण्याकरता त्यांना किती प्रयत्न करावे लागतात याचा सहसा आपण विचार करत नाही.

बरेच आईवडील दिवसभर कामात व्यग्र असतात आणि ज्या दिवशी संध्याकाळी सभा असते त्यादिवशी तर आणखीनच धावपळ होते. स्वयंपाक व इतर कामे उरकायची असतात, मुलांना गृहपाठ संपवायचा असतो. सगळ्यांच्या आंघोळी, जेवण व इतर तयारी आटोपली की नाही याची खात्री करता करता आईवडिलांचीच सर्वात जास्त दमछाक होते. त्यातल्या त्यात, मुले म्हटल्यावर कोणत्या क्षणी कोणती नवी आफत येईल हे सांगता येत नाही. ऐन वेळी थोरल्याची पँट फाटते, तर धाकट्याच्या कपड्यांवर अन्‍न सांडते. मध्येच मुले आपसात भांडू लागतात. (नीतिसूत्रे २२:१५) या सगळ्याचा काय परिणाम होतो? आईवडिलांनी कितीही चांगले नियोजन केलेले असले तरीसुद्धा प्रत्यक्षात मात्र भलतेच घडते. आणि इतके असूनही हे कुटुंब जवळजवळ प्रत्येक सभेला, वेळेआधीच राज्य सभागृहात हजर असते. दर आठवडी त्यांना पाहून, आणि जसजशी वर्षे सरतात तसतसे त्यांच्या मुलांना मोठे होताना पाहून आपल्याला किती प्रोत्साहन मिळते!

३. यहोवा कुटुंबांना महत्त्व देतो हे आपल्याला कसे कळून येते?

आई किंवा वडील म्हणून आपली जबाबदारी पूर्ण करणे कठीण आहे, थकवणारे आहे असे तुम्हाला कधीकधी वाटत असेल. पण यहोवा मात्र तुमच्या सगळ्या परिश्रमाची किंमत करतो हे नेहमी आठवणीत असू द्या. यहोवा कुटुंबव्यवस्थेचा जनक आहे. त्याचे वचन आपल्याला सांगते की प्रत्येक कुटुंबाला त्याच्यावरून “नाव देण्यात येते,” म्हणजेच यहोवामुळेच प्रत्येक कुटुंब अस्तित्वात आहे. (इफिसकर ३:१४, १५) त्याअर्थी, आईवडील या नात्याने जेव्हा तुम्ही आपापल्या जबाबदाऱ्‍या उत्तमरितीने पार पाडण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही खरे तर या विश्‍वाचा सार्वभौम प्रभू यहोवा याचे गौरव करत असता. (१ करिंथकर १०:३१) हा एक बहुमानच नव्हे का? म्हणूनच, यहोवाने आईवडिलांवर सोपवलेल्या जबाबदारीत काय काय समाविष्ट आहे यावर विचार करणे उचित ठरेल. या लेखात, आपण कुटुंबाची तरतूद करण्याचा काय अर्थ होतो हे विचारात घेऊ. आईवडिलांनी कोणत्या तीन मार्गांनी आपल्या कुटुंबाची तरतूद करावी अशी देव त्यांच्याकडून अपेक्षा करतो याविषयी आपण पाहू या.

भौतिकदृष्ट्या तरतूद करणे

४. कुटुंबात, मुलांच्या गरजा भागवण्याकरता यहोवाने कोणत्या व्यवस्था केल्या आहेत?

प्रेषित पौलाने म्हटले: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे; तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीमथ्य ५:८) पौलाने “कोणी” असे येथे म्हटले तेव्हा तो कोणाविषयी बोलत होता? कुटुंबप्रमुख, जो सहसा पिता असतो त्याच्याविषयी. देवाने स्त्रीलाही आपल्या पतीची साहाय्यक या नात्याने एक आदरणीय भूमिका दिली आहे. (उत्पत्ति २:१८) बायबल लिहिण्यात आले त्या काळात, स्त्रिया सहसा आपल्या पतीला कुटुंबाची तरतूद करण्यात मदत करत असत. (नीतिसूत्रे ३१:१३, १४, १६) आजकाल, एकच पालक असलेली कुटुंबे पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात दिसू लागली आहेत. * एकट्याने कुटुंब चालवणारे अनेक ख्रिस्ती पालक आपल्या कुटुंबाचे अतिशय उत्तमरित्या पालनपोषण करत आहेत. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. अर्थात, आदर्श कुटुंबात दोघेही आईवडील असतात व कुटुंब चालवण्यात पिता पुढाकार घेतो.

५, ६. (क) आपल्या घरच्यांची तरतूद करणाऱ्‍यांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते? (ख) नोकरीधंद्याविषयी कशाप्रकारची मनोवृत्ती बाळगल्यामुळे ख्रिस्ती कर्त्या पुरुषांना आर्थिक समस्यांना यशस्वीरित्या तोंड देता येईल?

पहिले तीमथ्य ५:८ यात पौल कुटुंबाची तरतूद करण्याविषयी कोणत्या अर्थाने सांगत होता? संदर्भावरून असे दिसून येते की तो कुटुंबाच्या भौतिक गरजांबाबत बोलत होता. आजच्या जगात, कुटुंबाच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी कुटुंबप्रमुखाला कित्येक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक समस्या सबंध जगात सर्वसामान्य आहेत. कर्मचारीवर्गात कपात, बेकारीचे वाढते प्रमाण आणि महागाई या गोष्टींची सगळ्यांनाच झळ पोचते. मग कुटुंबातल्या मिळवत्या माणसाला या समस्यांना यशस्वीरित्या कसे तोंड देता येईल?

त्याने आठवणीत ठेवावे की कुटुंबाच्या गरजा पुरवताना आपण यहोवाने सोपवलेली एक जबाबदारी पार पाडत आहोत. पौलाच्या प्रेरित शब्दांवरून दिसून येते की जो या आज्ञेचे पालन करण्यास समर्थ असूनही तसे करत नाही, तो ‘विश्‍वास नाकारणाऱ्‍यासारखा’ आहे. देवासमोर आपली कधीही अशी स्थिती होऊ नये म्हणून ख्रिस्ती व्यक्‍तीने कसोशीने प्रयत्न करावा. पण आजच्या जगात बरेचजण “ममताहीन” आहेत; म्हणजेच त्यांना नैसर्गिक प्रेमही जाणवत नाही. (२ तीमथ्य ३:१, ३) असंख्य पिता आपल्या कुटुंबाची जबाबदारी उचलण्याचे टाळतात व यामुळे त्यांच्या कुटुंबाची दयनीय स्थिती होते. स्वतःच्याच कुटुंबाची काळजी घेण्याबाबतीत अशा हलगर्जी व बेपर्वा वृत्तीचे ख्रिस्ती पती अनुकरण करत नाहीत. बरेच लोक कमी दर्जाच्या कामाकडे तुच्छतेने पाहतात. पण ख्रिस्ती कर्ते पुरूष मात्र आपल्या घरातल्यांचे पालनपोषण करण्यासाठी सर्वात कमी दर्जाचे काम करावे लागले तरी ते आदरणीय व महत्त्वाचे आहे असे समजतात. त्यांना माहीत आहे की यामुळे यहोवा देव संतुष्ट होतो.

७. पालकांनी येशूच्या उदाहरणावर मनन करणे योग्य का आहे?

येशूच्या परिपूर्ण उदाहरणाबद्दल विचार केल्यानेही कुटुंबप्रमुखांना बरीच मदत मिळू शकते. तुम्हाला आठवत असेल, बायबलमधल्या एका भविष्यवाणीत, येशूला आपला “सनातन पिता” म्हटले आहे. (यशया ९:६, ७) येशू “शेवटला आदाम” आहे आणि त्याअर्थी त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्व मानवांचा पिता यानात्याने तो “पहिला मनुष्य आदाम” याची जागा घेतो. (१ करिंथकर १५:४५) आदाम हा स्वार्थी, आपमतलबी पिता होता पण येशू हा एक आदर्श पिता आहे. बायबल त्याच्याबद्दल असे म्हणते: “ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला ह्‍यावरून आपल्याला प्रीतीची जाणीव झाली आहे.” (१ योहान ३:१६) होय, येशूने स्वेच्छेने इतरांकरता आपले जीवन अर्पण केले. पण इतर लहानसहान गोष्टींतही, त्याने दैनंदिन जीवनात आपल्या इच्छेपेक्षा इतरांच्या गरजांना प्राधान्य दिले. पालकांनो तुम्ही येशूच्या या आत्मत्यागी वृत्तीचे अनुकरण केल्यास किती बरे होईल!

८, ९. (क) निःस्वार्थपणे आपल्या पिलांच्या गरजा भागवणाऱ्‍या पक्षांकडून आईवडील काय शिकू शकतात? (ख) अनेक ख्रिस्ती पालक कशाप्रकारे आत्मत्यागी वृत्ती दाखवत आहेत?

देवाच्या भरकटलेल्या लोकांना येशूने जे म्हटले त्यावरून निःस्वार्थ प्रेमाविषयी आईवडील बरेच काही शिकू शकतात. त्याने म्हटले: “जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितीदा तरी माझी इच्छा होती.” (मत्तय २३:३७) कोंबडी आपल्या चिमुकल्या पिलांना कशाप्रकारे आपल्या पंखांखाली सुरक्षित ठेवते याचे सचित्र वर्णन येशूने केले. खरोखर, आपल्या पिलांना सुरक्षित ठेवण्याची नैसर्गिक जाणीव असणाऱ्‍या पक्षिणीच्या उदाहरणावरून आईवडील बरेच काही शिकू शकतात. आपल्या पिलांना कोणताही धोका संभवू नये म्हणून ती स्वतःचा जीवही धोक्यात घालण्यास तयार असते. पण दैनंदिन जीवनातही पक्षी आपल्या पिलांसाठी काय काय करतात हे पाहणे अतिशय विलक्षण आहे. अन्‍नाच्या शोधात ते दिवसभर सतत उडत असतात; आणि अन्‍न मिळताच ते पिलांना आणून देण्याकरता त्यांच्या घिरट्या सुरू होतात. पिले आपली तोंडे उघडून तयारच असतात. पक्षी अगदी थकून गेलेले असतात तरीसुद्धा ते आपल्या पिलांना अन्‍न आणून देतात. पिले मात्र आणून दिलेले अन्‍न क्षणात फस्त करतात आणि अजून हवे म्हणून कलकलाट सुरू करतात. यहोवाने निर्माण केलेले बहुतेक प्राणी आपल्या पिलांची काळजी घेण्याच्या बाबतीत स्वभावतःच “अत्यंत शहाणे” आहेत.—नीतिसूत्रे ३०:२४.

त्याचप्रकारे, सबंध जगातील ख्रिस्ती पालक ज्या आत्मत्यागी वृत्तीने आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात ते कौतुकास्पद आहे. तुमच्या मुलांना कोणता धोका संभवू नये म्हणून तुम्ही स्वतः कोणताही त्रास सहन करण्यास तयार असता. शिवाय, आपल्या मुलाबाळांच्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही दररोज कितीतरी त्याग करण्यास तयार असता. तुमच्यापैकी बरेचजण अगदी पहाटे उठून कामाला जातात, व दिवसभर कष्टाचे काम करतात. मुलांना सकस आहार पुरवण्याकरता तुम्ही बरेच परिश्रम घेता. तसेच स्वच्छ कपडे, राहायला चांगले घर आणि पुरेसे शिक्षण आपल्या मुलांना पुरवण्याकरताही तुम्ही मेहनत करता. आणि हे सारे कधीकधी नव्हे, तर दररोज, वर्षानुवर्षे करत असता. नक्कीच तुमची ही आत्मत्यागी वृत्ती आणि सहनशीलता यहोवाला संतोषदायक वाटते! (इब्री लोकांस १३:१६) पण त्याच वेळी, तुम्ही हेही आठवणीत ठेवता की आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्याचे याहीपेक्षा महत्त्वाचे मार्ग आहेत.

आध्यात्मिक गरजा भागवणे

१०, ११. मानवी गरजांपैकी सर्वात महत्त्वाची गरज कोणती आणि आपल्या मुलांची ही गरज भागवण्याकरता ख्रिस्ती पालकांनी काय केले पाहिजे?

१० भौतिक गरजा पुरवण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे, आध्यात्मिक गरजा पुरवणे. “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल,” असे येशूने म्हटले होते. (मत्तय ४:४; ५:३) मग आध्यात्मिक गरजा पुरवण्याकरता पालक या नात्याने तुम्ही काय करू शकता?

११ या विषयाच्या संदर्भात अनुवाद ६:५-७ मधील उतारा सर्वात जास्त वेळा वापरला जातो. कृपया आपले बायबल उघडून ही वचने वाचा. आईवडिलांना प्रथम स्वतःची आध्यात्मिकता वाढवण्याचे, यहोवाबद्दलचे प्रेम अधिक बळकट करण्याचे व त्याची वचने आपल्या अंतःकरणात ग्रहण करण्याचे प्रोत्साहन दिले आहे याकडे लक्ष द्या. होय, तुम्ही स्वतः देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास केला पाहिजे. बायबलचे नियमित वाचन केले पाहिजे आणि त्यावर मनन केले पाहिजे जेणेकरून यहोवाचे मार्ग, त्याची तत्त्वे व नियम तुम्हाला चांगल्याप्रकारे समजतील आणि प्रिय वाटू लागतील. परिणामस्वरूप, तुमचे अंतकरण बायबल सत्यांनी काठोकाठ भरलेले असेल आणि आपोआपच यहोवाबद्दलचे प्रेम, आनंद आणि विस्मयाच्या भावना तुमच्या मनातून ओसंडून वाहतील. आपल्या मुलांना देण्यासारख्या असंख्य चांगल्या गोष्टी तुमच्याजवळ असतील.—लूक ६:४५.

१२. आपल्या मुलांच्या मनावर बायबलमधील सत्ये बिंबवताना आईवडील येशूच्या उदाहरणाचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतात?

१२ आध्यात्मिकरित्या सुदृढ असणारे आईवडील, अनुवाद ६:७ येथे जो सल्ला दिला आहे त्याचे पालन करण्यास अर्थात प्रत्येक संधीला आपल्या मुलांच्या मनात यहोवाची वचने ‘बिंबवण्यास’ सुसज्ज असतात. ‘बिंबवणे’ याचा अर्थ शिकवणे व वारंवार सांगून मनात पक्के बसवणे. कोणतीही गोष्ट शिकण्याकरता आपल्या सर्वांनाच, आणि विशेषतः मुलांना ती वारंवार ऐकणे महत्त्वाचे असते. म्हणूनच, येशूनेही आपल्या सेवाकार्यात कित्येक महत्त्वाच्या गोष्टी वारंवार सांगितल्या. उदाहरणार्थ, गर्विष्ठ व स्पर्धात्मक वृत्ती बाळगण्याऐवजी नम्र असावे हे आपल्या शिष्यांना शिकवताना, येशूने हे एकच तत्त्व कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे वारंवार सांगितले. कधी त्याने युक्‍तिवाद केला, कधी दृष्टान्त दिले तर कधी स्वतःच्या उदाहरणावरून शिकवले. (मत्तय १८:१-४; २०:२५-२७; योहान १३:१२-१५) पण लक्ष देण्याजोगी एक खास गोष्ट म्हणजे, येशू कधीही उतावीळ होऊन आपल्या शिष्यांवर चिडला नाही. त्याचप्रकारे, आईवडिलांनी बायबलमधील मूलभूत सत्ये आपल्या मुलांना शिकवण्याचे निरनिराळे मार्ग शोधून काढले पाहिजेत; आणि मुलांनी ते नीट समजून घेऊन, त्यांनुसार वागेपर्यंत आईवडिलांनी उतावीळ न होता, यहोवाची तत्त्वे त्यांना वारंवार सांगत राहिली पाहिजेत.

१३, १४. आईवडील कोणकोणत्या प्रसंगी आपल्या मुलांच्या मनात बायबलची सत्ये बिंबवू शकतात आणि यासाठी ते कोणत्या साधनांचा उपयोग करू शकतात?

१३ यासाठी कौटुंबिक अभ्यासाची सत्रे सर्वात उत्तम संधी देतात. नियमित, उभारणीकारक व आनंददायक कौटुंबिक बायबल अभ्यास कुटुंबाच्या आध्यात्मिकतेकरता अतिशय मोलवान ठरतो. सबंध जगातील ख्रिस्ती कुटुंबे मोठ्या आनंदाने कौटुंबिक अभ्यास करतात. यासाठी ते यहोवाच्या संस्थेने पुरवलेले साहित्य वापरतात आणि मुलांच्या गरजांनुसार अभ्यासाच्या विषयांत फेरबदल करतात. थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी) तसेच तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे यांसारखी प्रकाशने कौटुंबिक अभ्यासाकरता एक आशीर्वादच ठरली आहेत. * पण फक्‍त कौटुंबिक अभ्यासाच्या वेळीच तुम्ही मुलांना शिकवू शकता असे नाही.

१४ अनुवाद ६:७ नुसार, मुलांसोबत आध्यात्मिक विषयांवर चर्चा करण्याचे अनेक प्रसंग असू शकतात. सोबत प्रवास करताना, घरातली कामे करताना, किंवा विरंगुळा करताना तुम्ही आपल्या मुलांच्या आध्यात्मिक गरजा पुरवण्याच्या संधी शोधू शकता. अर्थात, यासाठी बायबलमधील सत्यांविषयी रात्रंदिवस त्यांना “भाषण” देत राहण्याची गरज नाही. त्याऐवजी, कौटुंबिक संभाषणे नेहमी उभारणीकारक व आध्यात्मिक स्वरूपाची असू द्या. उदाहरणार्थ, सावध राहा! नियतकालिकात निरनिराळ्या विषयांवर अनेक लेख येतात. या लेखांच्या मदतीने तुम्ही यहोवाने निर्माण केलेले प्राणी, निसर्गरम्य ठिकाणे तसेच मानवी संस्कृतींतील व जीवनशैलींतील अद्‌भूत विविधता यांसारख्या विषयांवर संभाषण करू शकता. अशाप्रकारच्या संभाषणांमुळे तरुणांना विश्‍वासू व बुद्धिमान दासाने प्रकाशित केलेले साहित्य वाचण्याची प्रेरणा मिळू शकते.—मत्तय २४:४५-४७.

१५. आईवडील आपल्या मुलांना ख्रिस्ती सेवाकार्याकडे, ते मनोरंजक व आनंददायक आहे या दृष्टीने पाहण्यास कशी मदत करू शकतात?

१५ तुमच्या मुलांसोबत उभारणीकारक संभाषण केल्यामुळे तुम्हाला त्यांची आणखी एक आध्यात्मिक गरज पुरवता येईल. ख्रिस्ती मुलांना आपला विश्‍वास परिणामकारकरित्या इतरांना सांगता आला पाहिजे. टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! यातून एखाद्या लक्षवेधक मुद्द्‌याविषयी चर्चा करताना तुम्ही या साहित्याचा सेवाकार्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही असे विचारू शकता: “यहोवाबद्दल ही माहिती सर्व लोकांना समजावी, असे तुम्हाला वाटत नाही का? या विषयावर एखाद्या व्यक्‍तीची उत्सुकता कशी वाढवता येईल?” अशाप्रकारच्या चर्चा केल्यामुळे, आपण जे शिकत आहोत त्याविषयी इतरांनाही सांगण्यास लहान मुले प्रवृत्त होऊ शकतात. मग जेव्हा ती तुमच्यासोबत सेवाकार्यात येऊ लागतील तेव्हा या संभाषणाच्या आधारावर लोकांशी कशाप्रकारे चर्चा करता येते याचे जिवंत उदाहरण पाहायला मिळेल. तसेच त्यांना जाणीव होईल की सेवाकार्य हे मनोरंजक व आनंददायक कार्य आहे आणि यामुळे अतिशय समाधान व संतुष्टी मिळते.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

१६. आईवडिलांच्या प्रार्थना ऐकल्यामुळे मुलांना काय शिकायला मिळू शकते?

१६ प्रार्थना करतानाही आईवडील आपल्या मुलांचे आध्यात्मिक पोषण करू शकतात. येशूने आपल्या शिष्यांना प्रार्थना कशी करायची ते शिकवले आणि त्याने अनेकदा त्यांच्यासोबत प्रार्थना केली. (लूक ११:१-१३) खुद्द यहोवाच्या पुत्रासोबत प्रार्थना करताना त्यांना किती काही शिकायला मिळाले असेल याची कल्पना करा! त्याचप्रकारे तुमची मुले देखील तुमच्या प्रार्थनांमधून बरेच काही शिकू शकतात. उदाहरणार्थ, त्यांना समजेल की यहोवाशी बोलताना आपण मनापासून, अगदी मनमोकळेपणाने बोलावे आणि आपल्यासमोर असलेली कोणतीही समस्या त्याच्यापुढे मांडावी अशी त्याची इच्छा आहे. होय तुमच्या प्रार्थना तुमच्या मुलांना एक महत्त्वाचे सत्य शिकण्यास मदत करू शकतात. ते म्हणजे आपल्या स्वर्गीय पित्यासोबत आपण एक नातेसंबंध जोडू शकतो.—१ पेत्र ५:७.

भावनिक गरजा तृप्त करणे

१७, १८. (क) बायबल मुलांबद्दल प्रेम दाखवण्याचे महत्त्व कशाप्रकारे स्पष्ट करते? (ख) आपल्या मुलांबद्दल प्रेम व्यक्‍त करण्यात पित्याने कशाप्रकारे यहोवाचे अनुकरण केले पाहिजे?

१७ अर्थात मुलांना देखील काही अतिशय महत्त्वाच्या भावनिक गरजा असू शकतात. देवाचे वचन सांगते की आईवडिलांनी या गरजाही तृप्त करणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, तरुण स्त्रियांनी आपल्या “मुलाबाळांवर प्रेम करावे” असे त्यांना सांगण्यात आले आहे. आणि याचा संबंध तरुण मातांना शिक्षण देण्याशी जोडण्यात आला आहे. (तीत २:४) खरोखर मुलांना प्रेम दाखवणे सुज्ञपणाचे आहे. यामुळे मुले इतरांवर प्रेम करण्यास शिकतात आणि त्यांच्या सबंध जीवनात त्यांना इतरही अनेक आशीर्वाद लाभतात. दुसरीकडे पाहता, मुलांना प्रेम न दाखवणे मूर्खपणा आहे. यामुळे त्यांना मानसिक वेदना होतात आणि यावरून असे दिसून येते की आपण यहोवाचे, ज्याने आपल्यात अनेक अपरिपूर्णता असूनही आपल्यावर फार प्रेम केले आहे, त्याचे अनुकरण करत नाही.—स्तोत्र १०३:८-१४.

१८ यहोवा आपल्या पृथ्वीवरील मुलांबद्दल प्रेम व्यक्‍त करण्यात पुढाकार देखील घेतो. २ योहान ४:१९ म्हणते: “पहिल्याने त्याने आपणावर प्रीति केली.” याबाबतीत पित्याने खासकरून यहोवाच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे. आपल्या मुलांसोबत प्रेमळ नाते जोडण्याकरता त्याने पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या मुलांना चिरडीस आणण्याचे टाळा, नाहीतर “ती खिन्‍न होतील” असे बायबल पित्यांना सांगते. (कलस्सैकर ३:२१) मुलांना चिरडीस आणणाऱ्‍या गोष्टींपैकी, आपले आईवडील आपल्यावर प्रेम करत नाहीत किंवा त्यांना आपली किंमत नाही ही भावना असू शकते. ज्या पित्यांना आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्‍त करण्यास संकोच वाटतो त्यांनी यहोवाचे उदाहरण आठवणीत ठेवावे. आपल्या पुत्राबद्दल समाधान व प्रेम व्यक्‍त करण्यासाठी यहोवा स्वर्गातून देखील बोलला. (मत्तय ३:१७; १७:५) येशूला त्याच्या पित्याचे शब्द ऐकून किती धैर्य मिळाले असेल! त्याचप्रकारे आईवडील आपल्या मुलांबद्दल प्रेम व समाधान व्यक्‍त करतात तेव्हा मुलांना बरेच धैर्य व मनोबल मिळते.

१९. शिस्त लावणे महत्त्वाचे का आहे आणि ख्रिस्ती पालकांनी कशाच्या बाबतीत समतोल साधण्याची गरज आहे?

१९ अर्थात, आईवडिलांचे प्रेम फक्‍त शब्दांतून व्यक्‍त होत नाही. प्रेम हे मुख्यतः कृतींतून व्यक्‍त होते. भौतिकरित्या व आध्यात्मिकरित्या मुलांचे पोषण करणे हे मुलांबद्दल प्रेम व्यक्‍त करण्याचे मार्ग आहेत. पण प्रेमाने प्रवृत्त होऊनच तुम्ही हे करत आहात हे मुलांना जाणवले पाहिजे. याशिवाय, मुलांना शिस्त लावणे हा देखील मुलांबद्दल प्रेम व्यक्‍त करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. किंबहुना, “ज्यावर परमेश्‍वर प्रीति करितो, त्याला तो शिक्षा करतो.” (इब्री लोकांस १२:६) दुसरीकडे पाहता, आईवडिलांनी मुलांना शिक्षा केली नाही तर खरे तर ते आपल्या मुलांचा द्वेष करतात असे त्यावरून दिसून येते! (नीतिसूत्रे १३:२४) यहोवा नेहमी अगदी समतोल, अर्थात “योग्य” प्रमाणात शिक्षा करतो. (यिर्मया ४६:२८) असा समतोल साधणे अपरिपूर्ण आईवडिलांना नेहमी शक्य होईलच असे नाही. तरीसुद्धा, याकरता लागेल तो प्रयत्न करणे हितावह ठरेल. दृढतेने व प्रेमाने वळण लावल्यामुळे मुले मोठी होऊन आनंदी व सफल जीवन जगू शकतील. (नीतिसूत्रे २२:६) प्रत्येक ख्रिस्ती पालकाला आपल्या मुलांबद्दल हीच इच्छा नसते का?

२०. आईवडील आपल्या मुलांना ‘जीवन निवडून घेण्याची’ सर्वात उत्तम संधी कशी देऊ शकतात?

२० आईवडील या नात्याने यहोवाने तुमच्यावर सोपवलेले महत्त्वाचे काम तुम्ही केल्यास, म्हणजेच, आपल्या मुलांच्या शारीरिक, आध्यात्मिक व भावनिक गरजा पुरवल्यास तुम्हाला याचे उत्तम प्रतिफळ मिळेल. असे केल्यामुळे तुम्ही आपल्या मुलांना ‘जीवन निवडून घेण्याची’ व सर्वकाळ ‘जिवंत राहण्याची’ सर्वात उत्तम संधी देता. (अनुवाद ३०:१९) जी मुले प्रौढावस्थेतही यहोवाची सेवा करण्याची निवड करतात आणि जीवनाच्या मार्गावर टिकून राहतात ती आपल्या आईवडिलांना अतिशय आनंदित करतात. (स्तोत्र १२७:३-५) हा आनंद सर्वकाळ टिकेल! पण लहान मुले आपल्या बालपणीदेखील यहोवाची स्तुती कशी करू शकतात? पुढील लेखातल्या चर्चेचा हाच विषय आहे. (w०५ ६/१५)

[तळटीपा]

^ परि. 4 या चर्चेत, कुटुंबाची तरतूद करणारा किंवा मिळवता माणूस असा पुल्लिंगी उल्लेख केला जाईल. पण येथे दिलेली तत्त्वे, अशा ख्रिस्ती स्त्रियांकरताही उपयोगी आहेत की ज्या आपल्या कुटुंबाचे पोषण करण्याची जबाबदारी एकट्याच पार पाडत आहेत.

^ परि. 13 ही प्रकाशने यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केली आहेत.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

आईवडील आपल्या मुलांच्या गरजा कशा पुरवू शकतात

• भौतिकदृष्ट्या?

• आध्यात्मिकदृष्ट्या?

• भावनिकदृष्ट्या?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

कित्येक पक्षी जिवाचे रान करून आपल्या पिलांचे पोषण करतात