व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

काम वरदान की शाप?

काम वरदान की शाप?

काम वरदान की शाप?

“मनुष्याने . . . श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काहीहि इष्ट नाही.”—उपदेशक २:२४.

“दिवसाच्या शेवटी मी पार गळून जातो.” असे अलिकडेच घेतलेल्या एका सर्व्हेत तीन कर्मचाऱ्‍यांपैकी एकाने, त्याला सहसा असेच वाटत असल्याचे म्हटले. यात आश्‍चर्य करण्यासारखे काही नाही; लोक सतत तणावाखाली काम करतात, ते उशिरापर्यंत काम करतात आणि घरीही काम घेऊन जातात; त्यांचा मालक यावर कृतज्ञतेचा एक चकार शब्दही काढत नाही.

यंत्रांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन काढण्यास सुरुवात झाल्यामुळे पुष्कळ कामगारांना, आपण एका मोठ्या, भावनाशून्य यंत्राच्या चाकातील निव्वळ दात बनलो आहोत असे वाटते. प्रेरणा आणि सर्जनशीलतेचा गळा घोटला जातो. साहजिकच याचा कामाकडे पाहण्याच्या लोकांच्या दृष्टिकोनावर परिणाम होतो. कामात आवड घेण्याची प्रेरणा सहजगत्या नाहीशी होते. कलाकौशल्यांत प्रावीण्य मिळवण्याची इच्छा मरून जाऊ शकते. यांमुळे, लोकांना काम आवडेनासे होते; इतकेच नव्हे तर त्यांना त्याचा तिरस्कार वाटू लागतो.

आपल्या मनोवृत्तीचे परीक्षण करणे

आपण नेहमीच आपली परिस्थिती बदलू शकत नाही, हे कबूल आहे. परंतु, आपण आपली मनोवृत्ती बदलू शकतो याजशी तुम्ही सहमत नाही का? कामाबद्दलच्या नकारात्मक दृष्टिकोनाचा तुमच्यावरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे असे जर तुम्हाला आढळून येते तर या विषयावर देवाचा काय दृष्टिकोन आहे आणि कोणती तत्त्वे आहेत त्याचे परीक्षण केल्यास तुम्हाला मदत मिळू शकते. (उपदेशक ५:१८) देवाच्या दृष्टिकोनावर व तत्त्वांवर विचारमंथन केल्यामुळे पुष्कळांना दिसून आले की त्यांना त्यांच्या कामात काही प्रमाणात आनंद व समाधान मिळाले आहे.

देव श्रेष्ठ कामगार आहे. देवही काम करतो. आपण कदाचित त्याच्याविषयी असा विचार करणार नाही, पण बायबलमध्ये त्याने पहिल्यांदा अशीच स्वतःची ओळख करून दिली आहे. उत्पत्तिच्या अहवालाची सुरुवातच, यहोवाने स्वर्ग आणि पृथ्वी उत्पन्‍न करण्याविषयी आहे. (उत्पत्ति १:१) निर्मिती सुरू केली तेव्हा देवाने किती विविध भूमिका घेतल्या त्याचा विचार करा—रचनाकार, संघटक, अभियंता, कलावंत, जिन्‍नस तज्ज्ञ, प्रकल्प विकासक, रसायनशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, प्राणीशास्त्रज्ञ, प्रोग्रॅमर, बहुभाषाभिज्ञ . . . आणखी किती!—नीतिसूत्रे ८:१२, २२-३१.

देवाच्या कामाची गुणवत्ता कशी होती? बायबल अहवाल म्हणतो, की त्याचे काम ‘चांगले’ होते, नव्हे “फार चांगले” होते. (उत्पत्ति १:४, ३१) होय, सृष्टी “देवाचा महिमा वर्णिते” आणि आपणही त्याची स्तुती केली पाहिजे.—स्तोत्र १९:१; १४८:१.

परंतु, स्वर्ग, पृथ्वी व पहिल्या मानवी जोडीची सृष्टी केल्यानंतर यहोवाचे काम तिथेच संपले नाही. त्याचा पुत्र येशू ख्रिस्त म्हणाला: “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे.” (योहान ५:१७) होय, आपल्या सृष्टीला अन्‍न-पाणी देऊन तिला टिकवून ठेवण्याद्वारे व आपल्या विश्‍वासू उपासकांना वाचवण्याद्वारे त्याचे काम अजूनही चालू आहे. (नहेम्या ९:६; स्तोत्र ३६:६; १४५:१५, १६) विशिष्ट कार्ये पार पाडण्यासाठी तो लोकांचाही अर्थात ‘देवाच्या सहकाऱ्‍यांचाही’ उपयोग करून घेतो.—१ करिंथकर ३:९.

काम एक आशीर्वाद असू शकते. काम किंवा परिश्रम एक शाप आहे, असे बायबलच म्हणत नाही का? देवाने आदाम आणि हव्वेला बंडाळी केल्याबद्दल शिक्षा म्हणून त्यांच्यावर कामाचे ओझे लादले असे, उत्पत्ति ३:१७-१९ या वचनांवरून भासू शकते. या पहिल्या मानवांचा निषेध करताना देव आदामाला म्हणाला: “तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुनः मातीला जाऊन मिळशील.” हे एकूण कामाचाच निषेध करणारे होते का?

नाही. कारण, आदाम आणि हव्वेच्या अविश्‍वासूपणामुळे एदेन बागेचा विस्तार त्या वेळेला होणार नव्हता. देवाने जमिनीला शाप दिला होता. जमिनीतून उपज मिळवण्यासाठी मनुष्याला घाम गाळावा लागणार होता, रक्‍ताचे पाणी करावे लागणार होते.—रोमकर ८:२०, २१.

काम एक शाप नव्हे तर एक आशीर्वाद आहे ज्याला आपण प्रिय समजले पाहिजे, असे बायबल सांगते. वर सांगितल्याप्रमाणे देव स्वतः कष्टकरी आहे. यहोवाने मानवाला आपल्या प्रतिरुपात निर्माण केले आहे त्यामुळे मानवामध्येसुद्धा यहोवाच्या पृथ्वीवरील सृष्टीची काळजी घेण्याची क्षमता आहे व त्याच्याकडे तसा अधिकार आहे. (उत्पत्ति १:२६, २८; २:१५) ही कार्यनेमणूक, उत्पत्ति ३:१९ मध्ये लिहून ठेवण्यात आलेले शब्द देवाने उच्चारण्याच्या आधी देण्यात आली होती. काम, शाप असते किंवा वाईट असते तर यहोवाने लोकांना ते करण्यास कधीच प्रोत्साहित केले नसते. नोहा आणि त्याच्या परिवाराला जलप्रलयाआधी आणि नंतर ढोर मेहनत करावी लागली. ख्रिस्ती युगात, येशूच्या शिष्यांना देखील काम करण्यास आर्जवण्यात आले.—१ थेस्सलनीकाकर ४:११.

पण आजकाल, काम शिणवणारे असू शकते, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ताण, अपघात, कंटाळा, निराशा, चुरस, फसवाफसवी, अन्याय या सर्व गोष्टी आज, कामाशी संबंधित असलेले काही “काटे व कुसळे” आहेत. पण, काम किंवा परिश्रम हा मुळातच एक शाप आहे असे म्हणता येणार नाही. बायबलमधील उपदेशक ३:१३ म्हणते, की काम आणि कामामुळे मिळणारे प्रतिफळ देवाकडून एक देणगी आहे.—“कामाशी संबंधित तणावाचा सामना करणे” हा चौकोन पाहा.

तुमच्या कामाद्वारे तुम्ही देवाचे गौरव करू शकता. कामाच्या ठिकाणी, कामाची गुणवत्ता आणि उत्कृष्टपणा याची नेहमी प्रशंसा केली जाते. गुणवत्ता हा कामाविषयी बायबलच्या दृष्टिकोनातील एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. स्वतः देव उत्कृष्टप्रतीचे काम करतो. त्याने मानवाच्या अंगी देखील सर्जनशीलता व कलाकौशल्ये दिली आहेत आणि आपण आपल्या कलांचा उपयोग उत्कृष्ट हेतूसाठी करावा अशी त्याची इच्छा आहे. उदाहरणार्थ, प्राचीन इस्राएलात निवासमंडपाच्या बांधकामाच्यावेळी, यहोवाने बसालेल आणि अहलियाब यांना बुद्धी, समज, ज्ञान दिले तसेच विशिष्ट कलाकुसर व कामे करण्याची कसब दिली. (निर्गम ३१:१-११) यावरून दिसते, की देवाने त्यांच्या कामाच्या पद्धतीत, हस्तकौशल्यात, कलाकुसरीत आणि इतर बारीकसारीक गोष्टींत खास आस्था घेतली.

याचा, व्यक्‍तिगत क्षमता आणि कामाच्या सवयी यांबद्दल आपल्याला असलेल्या समजेवर खोल प्रभाव पडतो. शिवाय, व्यक्‍तिगत क्षमता आणि कामाच्या सवयी या देवाने दिलेल्या देणग्या आहेत आणि त्यांना आपण क्षुल्लक लेखू नये, असा आपण विचार करू लागतो. म्हणूनच, ख्रिश्‍चनांना अशाप्रकारे काम करण्यास आर्जवले जाते की जणू काय देव त्यांचे काम तपासून पाहणार आहे: “जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.” (कलस्सैकर ३:२३) देवाच्या सेवकांना आपले काम उत्कृष्टप्रतीचे करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. यामुळे सहकर्मचारी व इतर ख्रिस्ती संदेशाकडे आकर्षित होतात.—“नोकरीच्या ठिकाणी बायबल तत्त्वांचा अवलंब करणे,” हा चौकोन पाहा.

आपल्या कामाद्वारे आपण देवाचे गौरव करू शकतो हे आताच आपण पाहिल्यानंतर आपण स्वतःला असे विचारू शकतो, की आपले काम कोणत्या गुणवत्तेचे व किती उत्कृष्ट असते? आपले काम पाहून देव संतुष्ट होईल का? आपल्यावर सोपवलेली कामगिरी आपण अशाप्रकारे पूर्ण करतो का, की ज्यामुळे आपल्याला समाधान मिळते? या प्रश्‍नांची उत्तरे नाही असे आहे त्याचा अर्थ आपल्याला सुधारणा करण्यासाठी वाव आहे.—नीतिसूत्रे १०:४; २२:२९.

काम आणि आध्यात्मिकता यांच्यात संतुलन राखणे. काबाड कष्ट करणे हे प्रशंसनीय असले तरी, कामात आणि जीवनात समाधान मिळवण्याची आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे आध्यात्मिकता. ज्याने काबाड कष्ट केले व जीवनातील सर्व प्रकारची श्रीमंती व सुख चाखले तो राजा शलमोन या निष्कर्षास पोहंचला: “देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उपदेशक १२:१३.

होय, आपण जे काही करतो त्याबाबत देवाची काय इच्छा आहे याचा विचार केला पाहिजे. आपण देवाच्या इच्छेच्या अनुषंगात काम करत आहोत का, की आपण त्याच्या विरुद्ध काम करत असू? आपण देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो का, की आपण केवळ स्वतःला संतुष्ट करत आहोत? आपण जर देवाची इच्छा पूर्ण केली नाही तर आपल्याला शेवटी, निराशा, एकटेपणा आणि रिक्‍तपणा यांमुळे होणाऱ्‍या यातना सहन कराव्या लागतील.

स्टीवन बर्गलस यांनी असे सुचवले, की हाडाची काडे करणाऱ्‍या अधिकाऱ्‍यांना ‘त्यांच्या आवडीचे एक सर्वोत्कृष्ट काम मिळते आणि ते त्या कामाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवून टाकतात.’ पण, ज्याने आपल्याला अर्थपूर्ण काम करण्याची कलाकौशल्ये आणि क्षमता दिल्या आहेत त्याची सेवा करण्यापेक्षा इतर कोणतेही काम सर्वोत्कृष्ट असू शकत नाही. आपला निर्माणकर्ता ज्याने संतुष्ट होतो ते काम केल्यामुळे आपल्याला समाधान मिळणार नाही, असे खचित होणार नाही. येशूला आपल्या पित्याने अर्थात यहोवाने दिलेले काम, अन्‍नाप्रमाणे पौष्टिक, समाधानकारक आणि तजेला देणारे होते. (योहान ४:३४; ५:३६) आणि हे आठवा, की देव सर्वश्रेष्ठ कामगार आहे व तो आपल्याला त्याचे “सहकारी” होण्याचे आमंत्रण देतो.—१ करिंथकर ३:९.

देवाची उपासना केल्यामुळे व आध्यात्मिकरीत्या प्रगती केल्यामुळे आपण प्रतिफलदायी कामासाठी व जबाबदारीसाठी तयार होतो. कामाच्या ठिकाणी नेहमी, दबाव, विरोध, मागण्या असल्यामुळे आपला खोलवर रुजलेला विश्‍वास आणि आध्यात्मिकता, उत्तम कामगार किंवा मालक होण्यासाठी आपण प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला लागणारी शक्‍ती देऊ शकतो. दुसरीकडे पाहता, या अभक्‍त जगातील जीवनातील वास्तविकता आपल्याला, आपण विश्‍वासात आणखी कोठे वाढले पाहिजे याबाबतीत सावध करतात.—१ करिंथकर १६:१३, १४.

काम जेव्हा एक वरदान असेल तो काळ

देवाची सेवा करण्यासाठी कष्ट करत असलेले त्या काळाची वाट पाहू शकतात जेव्हा देव पुन्हा एकदा परादीसची स्थापना करेल आणि संपूर्ण पृथ्वीवर अर्थपूर्ण काम असेल. तेव्हाच्या जीवनाविषयी यहोवाच्या यशया नामक एका संदेष्ट्याने असे लिहिले: “ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही; . . . माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील.”—यशया ६५:२१-२३.

तेव्हा काम खरोखरच एक आशीर्वाद असेल. तुमच्याबद्दल देवाची काय इच्छा आहे हे शिकून घेऊन त्या इच्छेप्रमाणे कार्य करण्याद्वारे तुम्ही देखील यहोवाच्या त्या आशीर्वादित लोकांपैकी एक व्हावे आणि “आपले सर्व उद्योग करून सुख मिळवावे” हीच आमची सदिच्छा आहे.—उपदेशक ३:१३. (w०५ ६/१५)

[८ पानांवरील संक्षिप्त आशय]

देव सर्वोत्कृष्ट कामगार आहे: उत्पत्ति १:१, ४, ३१; योहान ५:१७

[८ पानांवरील संक्षिप्त आशय]

काम एक वरदान असू शकते: उत्पत्ति १:२८; २:१५; १ थेस्सलनीकाकर ४:११

[८ पानांवरील संक्षिप्त आशय]

तुमच्या कामाद्वारे तुम्ही देवाचे गौरव करू शकता: निर्गम ३१:१-११; कलस्सैकर ३:२३

[८ पानांवरील संक्षिप्त आशय]

आपले काम आणि आध्यात्मिकता यांत संतुलन राखा: उपदेशक १२:१३; १ करिंथकर ३:९

[६ पानांवरील चौकट/चित्र]

कामाशी संबंधित तणावाचा सामना करणे

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कामामुळे येणाऱ्‍या तणावामुळे अनेक धोके संभावू शकतात. या तणावामुळे अल्सर होऊ शकतात, औदासिन्य येऊ शकते. शिवाय या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्‍ती आत्महत्याही करतात. जपानी लोकांकडे यासाठी एक शब्द आहे—कारोशी. याचा अर्थ “अतिपरिश्रमामुळे आलेला मृत्यू” असा होतो.

कामाच्या संबंधाने असलेल्या अनेक कारणांमुळे तणाव येऊ शकतो. यांमध्ये, कामाच्या वेळांत किंवा कामाच्या परिस्थितीत झालेला बदल, वरिष्ठांबरोबर झालेले मतभेद, कामाच्या स्वरुपात झालेले बदल, सेवानिवृत्ती, कामावरून काढून टाकणे, या सर्वांचा समावेश होतो. अशा तणावांपासून मुक्‍त होण्यासाठी काही जण नोकरी बदलतात किंवा नोकरीच्या ठिकाणची परिस्थिती बदलतात. इतर जण अशा तणावांचा प्रतिकार करतात व याचे पडसाद त्यांच्या जीवनातील इतर क्षेत्रावर सहसा त्यांच्या कुटुंबावर उमटतात. काही लोक भावनिकरीत्या खचून जाऊन, खिन्‍न व निराश होतात.

कामाच्या संबंधाने येणाऱ्‍या तणावांचा सामना करण्यासाठी ख्रिश्‍चन सज्ज आहेत. बायबलमध्ये अनेक मूलभूत तत्त्वे आहेत जी आपल्याला कठीण समयात टिकवून ठेवू शकतात. यामुळे आपल्या आध्यात्मिक व भावनिक स्वास्थ्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, येशूने म्हटले: “उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” येथे, उद्याच्या नव्हे तर आजच्या समस्या कशा सोडवायच्या त्याच्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे आपण आपल्या समस्यांचा पर्वत करण्याचे टाळू. कारण, यामुळे ताण वाढतो.—मत्तय ६:२५-३४.

ख्रिश्‍चनांनी आपल्याच ताकदीवर नव्हे तर देवाच्या शक्‍तीवर विसंबून राहणे आवश्‍यक आहे. आता आपण भावनिकरीत्या कोसळणार असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा देव आपल्याला शांती देऊ शकतो, आपल्या अंतःकरणात आनंद भरू शकतो आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्याची बुद्धी देऊ शकतो. प्रेषित पौलाने लिहिले: “प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा.”—इफिसकर ६:१०; फिलिप्पैकर ४:७.

शिवाय, तणावपूर्ण परिस्थितीमुळे सकारात्मक परिणामही होऊ शकतात. परीक्षांमुळे आपण यहोवाकडे वळू, मदतीसाठी त्याच्याकडे बघू आणि त्याच्यावर भरवसा ठेवू. शिवाय परीक्षांमुळे आपण ख्रिस्ती व्यक्‍तिमत्त्व धारण करण्यास प्रवृत्त होऊ; कोणत्याही दबावात टिकून राहण्याची क्षमता आपल्यात उत्पन्‍न होऊ शकेल. पौल आपल्याला असे उत्तेजन देतो: “संकटांचाहि [आपण] अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते.”—रोमकर ५:३, ४.

अशाप्रकारे तणाव, निराशा दुःखाचा स्रोत नव्हे तर आध्यात्मिक वाढीसाठी उत्प्रेरक ठरू शकतो.

[७ पानांवरील चौकट/चित्र]

नोकरीच्या ठिकाणी बायबल तत्त्वांचा अवलंब करणे

नोकरीच्या ठिकाणी एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीच्या मनोवृत्तीमुळे व वर्तनामुळे, तिच्याबरोबर काम करणारे व इतर बायबल संदेशाकडे आकर्षित होऊ शकतात. प्रेषित पौलाने तीताला लिहिलेल्या पत्रात कामगारांसारख्या परिस्थिती असलेल्यांना सल्ला दिला. त्याने लिहिले: “दासांनी आपल्या धन्यांच्या अधीन राहावे; त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे, उलट बोलू नये, त्यांना लुबाडू नये तर सर्व प्रकारे इमानेइतबारे वागावे, ह्‍यासाठी की, त्यांनी सर्व गोष्टीत आपला तारणारा देव ह्‍याच्या शिक्षणास शोभा आणावी, असा बोध कर.”—तीत २:९, १०.

उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयाला एका व्यावसायिकाने असे लिहिले: “यहोवाचे साक्षीदार असलेल्या लोकांना कामावर ठेवण्याची मला परवानगी द्यावी म्हणून मी हे पत्र लिहित आहे. यहोवाचे साक्षीदार ईमानदार, प्रामाणिक आणि भरवसालायक आहेत व ते तुम्हाला फसवणार नाहीत, हे मला अगदी खात्रीनिशी माहीत असल्यामुळे मी त्यांना कामावर ठेवू इच्छितो. मी फक्‍त यहोवाच्या साक्षीदारांवरच डोळे झाकून भरवसा ठेवू शकतो. कृपया मला मदत करा.”

काईल नामक एक ख्रिस्ती भगिनी एका खासगी शाळेत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. काही गैरसमजुतीमुळे तिच्याबरोबर काम करणारी एक स्त्री, काही विद्यार्थ्यांसमोर तिच्यावर खेकसली. काईल आठवून सांगते: “मी शांत राहिले. मी असे काहीही बोलू इच्छित नव्हते किंवा करू इच्छित नव्हते की ज्यामुळे यहोवाच्या नावावर कलंक येईल.” पुढील पाच दिवसांसाठी तिने, आपण बायबल तत्त्वांचा अवलंब कसा करू शकतो यावर विचार केला. एक बायबल तत्त्व रोमकर १२:१८ मध्ये आहे. तिथे लिहिले आहे: “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.” तिने त्या स्त्रीला ई-मेल पाठवून, त्या दोघींमध्ये झालेल्या बेबनावासाठी तिची क्षमा मागितली. काईलने तिला सांगितले, की कामानंतर थांबून आपण झालेला गैरसमज दूर करू या. असे केल्यामुळे काईलबरोबर काम करणारी स्त्री नरम झाली आणि तिने काईलने असे करण्यासाठी उचललेले पाऊल किती उचित होते, हे कबूल केले. ती काईलला म्हणाली: “तू कदाचित तुझ्या धर्मामुळेच असं केलं असशील.” घरी जाण्याआधी त्या दोघी एकमेकींच्या गळ्यात पडल्या. काईलने यावरून कोणता निष्कर्ष काढला? ती म्हणते: “आपण बायबल तत्त्वांचा अवलंब केला तर आपण नेहमी जे बरोबर आहे तेच करू.”

[४, ५ पानांवरील चित्र]

पुष्कळ कामगारांना, आपण एका भावनाशून्य यंत्राच्या चाकातील निव्वळ दात बनलो आहोत असे वाटते

[चित्राचे श्रेय]

Japan Information Center, Consulate General of Japan in NY

[८ पानांवरील चित्राचे श्रेय]

पृथ्वीचा गोल: NASA photo