नोकरीबद्दलची द्विधा मनःस्थिती
नोकरीबद्दलची द्विधा मनःस्थिती
“परिश्रम करणे—काम करणे! आपल्याकडे अजूनही काम आहे, ही जाणीव किती आनंदविणारी आहे.”—कॅथरीन मॅन्सफिल्ड, लेखिका (१८८८-१९२३)
वरील विधानात व्यक्त करण्यात आलेल्या आदर्शवादी दृष्टिकोनाशी तुम्ही देखील सहमत आहात का? कामाविषयी तुमचा स्वतःचा काय दृष्टिकोन आहे? नोकरीचा तुम्हाला इतका कंटाळा आला आहे का, की कधी एकदाचा शनिवार-रविवार येतो आणि मी आराम करतो, असे तुम्हाला वाटते? किंवा, तुमच्या कामाने तुम्हाला झपाटले आहे का?
बहुतेक लोकांचा दिवस, नोकरीला वाहिलेला असतो. आपल्या नोकरीवरूनच, आपण कोठे राहू आणि कोणत्याप्रकारची जीवनशैली आचरू हे ठरवले जाते. तारुण्यापासून निवृत्त होईपर्यंत पुष्कळ लोकांच्या जीवनाचे मुख्य ध्येय त्यांची नोकरीच असते. नोकरीचा त्यांच्या जीवनावर पगडा असतो. आपल्यातील काहींना कामामुळे खूप समाधान मिळते. इतर जण, कामाचे मूल्य, पगारावरून किंवा प्रतिष्ठेवरून ठरवतात आणि काहींच्या मते, नोकरी म्हणजे वेळेचा निव्वळ अपव्यय.
काही असे लोक असतात जे जगण्याकरता काम करतात तर काही असेही असतात जे काम करण्याकरता जगतात; आणि काही तर असेही असतात जे त्यांच्या कामामुळे मरण पावतात. जसे की, संयुक्त राष्ट्राने अलिकडेच बनवलेल्या एका अहवालानुसार, “युद्धे किंवा अंमली पदार्थांचे सेवन आणि मद्याचा गैरवापर या दोन्हींनी मिळून” जितके दुःख होते व मृत्यू होतात त्याच्यापेक्षा कामामुळे अधिक दुःख आणि मृत्यू होतात. यावर विवेचन करताना, लंडनच्या द गार्डीयन या बातमीपत्रकाने असे वृत्त दिले: “दर वर्षी २० लाखांपेक्षा अधिक लोकांचा काम करत असताना झालेल्या अपघातांमुळे मृत्यू होतो. . . . धूळ, रसायने, ध्वनि आणि किरणोत्सर्ग यांमुळे कर्करोग, हृदयविकार आणि पक्षाघात होत आहे.” बाल मजूर आणि सक्त मजूरी, या सध्याच्या कामाच्या परिस्थितीच्या केवळ आणखी दोन कुरूप वास्तविकता आहेत.
याशिवाय, मानसोपचारतज्ज्ञ स्टीव्हन बर्ग्लस यांच्या मते, काही लोक, खूप काम करून आपल्या ‘हाडांची काडे’ करतात. असे लोक मन लावून काम करून यशाचे शिखर गाठतात पण त्यांच्या मनात ‘तीव्र भयगंड असते; त्यांना मानसिक यातना होत असतात; त्यांना सतत असे वाटत असते की आपण अशा एका नोकरीत किंवा करिअर मार्गात अडकलो जेथून आपण पुन्हा मागे वळू शकत नाही किंवा आपल्याला मानसिक सूख मिळणारच नाही. यामुळे ते निराश किंवा खिन्न होतात.’
परिश्रम विरुद्ध कामाचे व्यसन
उशिरापर्यंत काम करणाऱ्या लोकांच्या या जगात, कष्टाळू कामगार आणि कामाचे व्यसन लागलेले लोक यांच्यामध्ये फरक करणे आवश्यक आहे. कामाचे व्यसन जडलेले अनेक लोक, या घातक, चंचल जगात नोकरीचे ठिकाण म्हणजे सुरक्षा देणारे ठिकाण असे समजतात; पण कष्टाळू कामगार असे समजतात, की आवश्यकता असते किंवा एखादे महत्त्वाचे काम करायचे असते तेव्हा उशिरापर्यंत काम करण्यात काही गैर नाही. कामाचे व्यसन लागलेल्या लोकांच्या जीवनात, जीवनातील इतर पैलूंना
वावच नसतो; पण कष्टाळू कामगारांना, आपले काम केव्हा बंद करायचे आणि कामाऐवजी इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे केव्हा लक्ष द्यायचे हे माहीत असते. जसे की आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख त्यांच्या लक्षात असते आणि ते आपल्या पत्नीबरोबर तो दिवस साजरा करतात. कामाचे व्यसन लागलेल्यांना, अतिपरिश्रमात सुख मिळते, त्यांच्यात एकप्रकारचा आवेश संचारतो; परंतु कष्टाळू कामगाराचे असे नसते.आधुनिक समाजाने अतिपरिश्रमाला आकर्षक बनवल्यामुळे कामाचे व्यसन आणि कष्टाचे काम यांतील रेषा अंधुक झाली आहे. मोडम, सेलफोन, पेजर यांच्यामुळे लोकांना, आपण कामाच्या ठिकाणी आहोत की घरी आहोत हे समजत नाही. काही लोक तर, संधी मिळेल तेव्हा कधीही काम करायला सुरू करतात; त्यांच्या आरोग्यास हानी होईस्तोवर ते काम करत राहतात.
अशा अहितकारक मनोवृत्तीविषयी काही लोकांचा काय दृष्टिकोन आहे? समाजशास्त्रज्ञांनी, अतिश्रमित व पार गळून गेलेल्या लोकांना, कामाच्या ठिकाणी आध्यात्मिक गोष्टींकडे वळवण्याची तसेच धार्मिक व व्यापारिक गोष्टींना एकत्र करण्याची गरज ओळखली आहे. सॅन फ्रॅन्सिस्को एक्झामिनर नावाच्या बातमीपत्रकाने असे वृत्त दिले, की “समाजात, काम आणि आध्यात्मिक गोष्टींना एकत्र करणे सर्वसामान्य बनले आहे.”
संयुक्त संस्थानातील सुधारित तंत्रविज्ञानाचे महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या सिलिकन व्हॅलीविषयी अलिकडेच एका अहवालात असे म्हटले होते: “पुष्कळ लोकांना कामावरून काढून टाकल्यामुळे कामाच्या ठिकाणी अनेक पार्किंग स्लॉट रिकामे झाले आहेत. परंतु जिथे बायबलचा अभ्यास चालवला जातो तिथल्या पार्किंग स्पॉट्समध्ये जागा मिळणे मुश्किल झाले आहे.” याचा परिणाम काहीही असो; जगभरातील अनेकांना याची जाणीव होऊ लागली आहे, की बायबलचा, कामाच्या संबंधाने असलेल्या त्यांच्या दृष्टिकोनावर सकारात्मक प्रभाव पडत आहे; व यामुळे ते जीवनाकडे अधिक संतुलित दृष्टिकोनातून पाहू लागले आहेत.
बायबल आपल्याला कामाविषयीचा संतुलित दृष्टिकोन बाळगण्यास मदत कसे करू शकते? आधुनिक कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांचा सामना यशस्वीरीत्या करण्यास मदत करणारी शास्त्रवचनीय तत्त्वे आहेत का? पुढील लेखांत या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. (w०५ ६/१५)