व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पहिले राजे पुस्तकातील ठळक मुद्दे

पहिले राजे पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

पहिले राजे पुस्तकातील ठळक मुद्दे

“धार्मिक बढती पावतात तेव्हा लोक आनंद पावतात, पण दुर्जन प्रभुत्व चालवितो तेव्हा प्रजा हायहाय करिते.” (नीतिसूत्रे २९:२) बायबलमधील पहिले राजे हे पुस्तक या नीतिसूत्राची सत्यता ठळकपणे पटवते. या पुस्तकात शलमोनाचे चरित्र आहे. शलमोनाच्या राजवटीत प्राचीन इस्राएल राष्ट्रात, सुरक्षितता व सुबत्ता होती. पहिले राजे पुस्तकात, शलमोनाच्या मृत्यूनंतर राष्ट्राची विभागणी झाल्याचा आणि त्याच्यानंतर आलेल्या १४ राजांचा अहवाल आहे. हे १४ राजे काही इस्राएलमधून होते तर काही यहुदामधून. यांपैकी केवळ दोन राजे यहोवाशी सातत्याने विश्‍वासू होते. शिवाय, या पुस्तकात सहा संदेष्ट्यांचे ज्यात एलीयाचा देखील समावेश होतो, त्यांच्या कार्यांचे अहवाल दिले आहेत.

संदेष्टा यिर्मयाने, जेरुसलेम व यहुदा येथे लिहिलेल्या या पुस्तकात, १२९ वर्षांचा अर्थात सा.यु.पू. १०४० पासून सा.यु.पू. ९११ पर्यंतच्या कालावधीत घडलेल्या घटनांचा तपशील आहे. हे पुस्तक बनवताना यिर्मयाने ‘शलमोनाची बखर’ यांसारख्या प्राचीन अहवालांचा देखील संदर्भ घेतल्याचे पुराव्यावरून दिसून येते. हे प्राचीन अहवाल आता अस्तित्वात नाहीत.—१ राजे ११:४१; १४:१९; १५:७.

सुज्ञ राजा शांती आणि ऐश्‍वर्य वाढवतो

(१ राजे १:१–११:४३)

पहिले राजे पुस्तकाची सुरुवात, राजा दावीदाचा मुलगा अदोनीया आपल्या वडिलांचे सिंहासन बळकावण्याचा प्रयत्न करत आहे या वर्णनाने होते. संदेष्टा नाथान त्वरित कार्य करतो त्यामुळे अदोनीयाचा कट फसतो आणि दावीदाच्या दुसऱ्‍या मुलाला अर्थात शलमोनाला राजा बनवले जाते. नव्याने सिंहासनाधिष्ठित राजाच्या विनंतीने यहोवा संतुष्ट होतो व तो त्याला “धन व वैभव” यांच्यासह “बुद्धिमान व विवेकी चित” देखील देतो. (१ राजे ३:१२, १३) राजाची बुद्धी अप्रतिम आहे आणि त्याची संपत्ती अतुलनीय आहे. इस्राएल राष्ट्रात शांती व ऐश्‍वर्य आहे.

शलमोनाने आपल्या कारकीर्दीत यहोवाचे मंदिर आणि विविध सरकारी इमारतींचे बांधकाम केले. यहोवा शलमोनाला असे आश्‍वासन देतो: “इस्राएलावरील तुझे राजासन मी कायमचे स्थापीन.” अट इतकीच होती, की त्याने यहोवाच्या आज्ञांचे पालन करायचे होते. (१ राजे ९:४, ५) खरा देव त्याला, आज्ञांचे उल्लंघन केल्यास काय परिणाम होतील तेही सांगतो. तरीसुद्धा शलमोन अनेक विदेशी बायका करतो. या बायकांच्या प्रभावामुळे तो आपल्या वृद्धपणी खोट्या उपासनेकडे वळतो. यहोवा भाकीत करतो की त्याच्या राज्याची विभागणी होईल. सा.यु.पू. ९९७ मध्ये शलमोनाचा मृत्यू होते. त्याची ४० वर्षांची राजवट संपुष्टात येते. त्याचा पुत्र रहबाम राजपदावर येतो.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१:५—दावीद अद्याप जिवंत होता तरीसुद्धा अदोनीयाने सिंहासन बळकावण्याचा प्रयत्न का केला? बायबल याबाबतीत काही सांगत नाही. पण आपण हा निष्कर्ष तर्कशुद्धपणे काढू शकतो, की अदोनीयाचे थोरले बंधू अम्मोन व अबशालोम आणि दावीदाचा पुत्र किलाब हे मरण पावले असल्यामुळे, दावीदाच्या उरलेल्या पुत्रांपैकी आपणच ज्येष्ठ असल्यामुळे राजासन मिळण्याचा हक्क आपल्यालाच आहे, असा त्याने विचार केला असावा. (२ शमुवेल ३:२-४; १३:२८, २९; १८:१४-१७) शक्‍तिशाली सेना प्रमुख यवाब आणि ज्याची वट होती तो महायाजक अब्याथार हे दोघेही अदोनीयाच्या पाठीशी असल्यामुळे त्याला वाटले असावे, की त्याचा प्रयत्न निश्‍चितच सफल होईल. दावीद शलमोनाला सिंहासन देऊ इच्छित आहे, हे त्याला माहीत होते की नव्हते याबाबतीत बायबलमध्ये काही सांगितलेले नाही. परंतु, अदोनीयाने जेव्हा “यज्ञ केला” तेव्हा शलमोनाला आणि दावीदाशी एकनिष्ठ असलेल्या इतरांना आमंत्रण दिले नाही. (१ राजे १:९, १०) यावरून दिसून येते, की तो शलमोनाला प्रतिस्पर्धी समजत होता.

१:४९-५३; २:१३-२५—अदोनीयाला क्षमा केल्यानंतरही शलमोनाने त्याला ठार का मारले? अदोनीयाने बथशेबाला विनंती केली, की तिने आपणास अबीशग बायको करून देण्यास राजाला सांगावे. यामागे अदोनीयाचा खरा हेतू काय होता हे बथशेबाला कळले नव्हते परंतु शलमोनाला कळले होते. दिसायला देखणी असलेली अबीशग दावीदाची उपपत्नी होती. परंतु दावीदाने तिच्याबरोबर समागम केला नव्हता. त्या काळातील रीतीरिवाजांनुसार, कायदेशीररीत्या ती दावीदाच्या वारशाच्या मालकीची होणार होती. अदोनीयाने विचार केला असेल, की अबीशगला पत्नी म्हणून घेतल्यावर तो पुन्हा सिंहासन मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. अदोनीयाच्या मागणीवरून, त्याला राजपद हवे आहे हे दिसून येत असल्यामुळे शलमोनाने त्याची क्षमा रद्द केली.

६:३७–८:२—मंदिराचे उद्‌घाटन केव्हा झाले? मंदिराचे बांधकाम सा.यु.पू. १०२७ सालच्या आठव्या महिन्यात म्हणजे शलमोनाच्या राजवटीच्या ११ व्या वर्षी पूर्ण झाले. असे दिसते, की मंदिरातले सर्व सामानसुमान आणायला आणि इतर तयारी करायला ११ महिने लागले. सा.यु.पू. १०२६ सालच्या सातव्या महिन्यात मंदिराचे उद्‌घाटन झाले असावे. अहवालात, मंदिराच्या बांधकामानंतर केलेल्या व उद्‌घाटनाआधी केलेल्या इतरही बांधकाम प्रकल्पांविषयीचे वर्णन आहे. बांधकामांचे संपूर्ण वर्णन देण्याकरता कदाचित असे करण्यात आले असावे.—२ इतिहास ५:१-३.

९:१०-१३—शलमोनाने सोराचा राजा हीराम यांस गालील प्रांतातील वीस नगरांचा नजराणा दिला तो मोशेच्या नियमशास्त्रानुसार होता का? लेवीय २५:२३, २४ मध्ये म्हटल्याप्रमाणे, नियमशास्त्र, इस्राएली लोकांचे जितके क्षेत्र होते तितक्याच क्षेत्राला लागू होत असावे, असे समजले जात असावे. शलमोनाने हीरामास दिलेली नगरे, वचनयुक्‍त देशाच्या हद्दीत असली तरीसुद्धा त्यांत गैर-इस्राएली लोक राहत असण्याची शक्यता आहे. (निर्गम २३:३१) शलमोनाच्या कृत्यावरून असेही सूचित झाले असावे की त्याने नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन केले नाही; कारण त्याने स्वतःसाठी ‘घोडदळ वाढवली’ आणि अनेक बायका केल्या. (अनुवाद १७:१६, १७) परिस्थिती काहीही असो, हीराम मात्र या नजराण्याने आनंदी नव्हता. कदाचित, या नगरातील मूर्तीपूजक रहिवाश्‍यांनी या नगराची दशा केली असावी किंवा कदाचित ती मोक्याच्या ठिकाणी नसावी.

११:४—म्हातारपणात होणाऱ्‍या विकारामुळे शलमोन वृद्धपणी अविश्‍वासू झाला का? असे भासत नाही. शलमोनाने लहान वयातच राज्य करण्यास सुरुवात केली आणि त्याने ४० वर्षे राज्य केले तरी तो इतका म्हातारा नव्हता. शिवाय, त्याने पूर्णपणे यहोवाला सोडून दिले नाही. असे दिसते, की त्याने मिश्र धार्मिक विश्‍वासांचे पालन करण्याचा प्रयत्न केला.

आपल्याकरता धडे:

२:२६, २७, ३५. यहोवा जे भाकीत करतो ते नेहमी पूर्ण होते. एलीच्या वंशातला अब्याथार याला याजकपदावरून काढून टाकण्यात आले तेव्हा, “एलीच्या वंशाविषयी शिलो येथे परमेश्‍वर जे वचन बोलला होता ते पूर्ण” झाले. अब्याथाराच्या जागी फिनहासाच्या वंशातला सादोक याला नेमण्यात आल्यावर गणना २५:१०-१३ वचनांची पूर्णता झाली.—निर्गम ६:२५; १ शमुवेल २:३१; ३:१२; १ इतिहास २४:३.

२:३७, ४१-४६. देवाच्या नियमांचा भंग करून आपण शिक्षा टाळू शकतो, असा विचार करणे किती घातक आहे! ‘जीवनाकडे जाणाऱ्‍या अरुंद दरवाजातून’ आत जाण्याऐवजी मुद्दामहून दुसऱ्‍या दरवाजातून जाणाऱ्‍यांना त्यांच्या मूर्ख निर्णयाचे परिणाम भोगावे लागतील.—मत्तय ७:१४.

३:९, १२-१४. यहोवाचे सेवक जेव्हा त्याला, त्याची सेवा करण्यासाठी बुद्धी, समज आणि मार्गदर्शनासाठी प्रामाणिकपणे प्रार्थना करतात तेव्हा तो त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर देतो.—याकोब १:५.

८:२२-५३. प्रेमळ-दयेचा, वचनांची पूर्णता करणारा आणि प्रार्थना ऐकणारा देव यहोवा याच्याबद्दल शलमोनाने अगदी मनापासून कृतज्ञता व्यक्‍त केली. मंदिराच्या उद्‌घाटनप्रसंगी शलमोनाने केलेल्या प्रार्थनेवर मनन केल्याने, देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या या आणि इतर पैलूंबद्दल आपल्या मनातही गुणग्राहकता वाढेल.

११:९-१४, २३, २६. शलमोन म्हातारपणी आज्ञाभंजक झाला तेव्हा यहोवाने त्याच्याविरुद्ध शत्रू उठवले. प्रेषित पेत्र म्हणतो: “देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.”—१ पेत्र ५:५.

११:३०-४०. अहीयाने यराबामाविषयी जे भाकीत केले त्यामुळे शलमोनाने यराबामास मारण्याचा प्रयत्न केला. पण याच राजाची प्रतिक्रिया ४० वर्षांपूर्वी किती वेगळी होती; त्याने अदोनीया आणि इतर कट रचणाऱ्‍यांचा बदला घेण्यास नकार दिला होता! (१ राजे १:५०-५३) यहोवापासून दूर गेल्यामुळे त्याच्या मनोवृत्तीत असा बदल झाला होता.

एका संयुक्‍त राज्याचे विभाग होतात

(१ राजे १२:१–२२:५३)

यराबाम आणि इस्राएलची सर्व मंडळी रहबामाकडे येतात आणि म्हणतात, की तुझा बाप शलमोन याने आमच्यावर लादलेले जू कमी करावे. रहबाम त्यांची विनंती मान्य करण्याऐवजी त्यांच्यावर आणखी भारी जू लादण्याची धमकी देतो. यामुळे दहा वंश बंड करतात आणि यराबामास राजा बनवतात. अशाप्रकारे राज्याची विभागणी होते. रहबाम, यहुदा व बन्यामीन गोत्रांनी मिळून बनलेल्या दक्षिणेकडील राज्यावर राज्य करतो आणि यराबाम उत्तरेकडील इस्राएलच्या दहा-गोत्रांवर राज्य करतो.

लोकांनी जेरुसलमेस उपासनेसाठी जाऊ नये म्हणून यराबाम सोन्याची दोन वासरे बनवतो आणि एक वासराची स्थापना दान येथे करतो तर दुसऱ्‍याची बेथेल येथे करतो. यराबामानंतर इस्राएलवर राज्य केलेल्या राजांची नावे पुढील प्रमाणे आहेत: नादाब, बाशा, एला, जिम्री, तिब्नी, अम्री, अहाब आणि अहज्या. यहुदात रहाबामनंतर आलेल्या राजांची नावे अशी आहेत: अबीयाम, आसा, यहोशाफाट आणि यहोराम. या राजांच्या अमदानीत कार्यशील असलेल्या संदेष्ट्यांची नावे अशी आहेत: अहिया, शमाया, देवाचा एक विश्‍वासू मनुष्य ज्याचे नाव ज्ञात नाही; तसेच येहू, एलीया आणि मीखाया.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१८:२१—एलीयाने जेव्हा लोकांना, तुम्ही एकतर यहोवाच्या भजनी लागा नाहीतर बआलच्या भजनी लागा असे सांगितले तेव्हा लोक निःशब्द का झाले? यहोवा ज्या अनन्य भक्‍तीस पात्र आहे ती भक्‍ती आपण त्याला देत नाही याची लोकांना जाणीव झाली आणि त्यांना दोषी वाटू लागल्यामुळे ते कदाचित निःशब्द झाले असावेत. किंवा कदाचित, त्यांचा विवेक इतका बोथट झाला होता, की यहोवाची उपासना करत असतानाच बआलाची उपासना करण्यात काही गैर नाही असे त्यांना वाटत असावे. यहोवाने आपल्या शक्‍तीचे प्रदर्शन केल्यानंतरच ते “यहोवा हाच देव आहे! यहोवा हाच देव आहे!” असे म्हणाले.—१ राजे १८:३९, पं.र.भा.

२०:३४—यहोवाने अहाबास अराम्यांवर विजय मिळवून दिल्यावर अहाबाने त्यांचा राजा बेनहदाद यास का वाचवले? बेनहदादला ठार मारण्याऐवजी अहाबाने त्याच्याबरोबर एक करार केला. या करारानुसार, अरामाची राजधानी दिमिष्क येथील रस्ते अहाबास दिले जातात जेणेकरून तो तेथे पेठा किंवा बाजार वसवेल. पूर्वी, बेनहदादच्या बापाने अशाचप्रकारे शोमरोनात व्यापारासाठी पेठा वसवल्या होत्या. यास्तव, बेनहदादला सोडून दिले जाते जेणेकरून अहाब दिमिष्कात आपला व्यापार वाढवू शकेल.

आपल्याकरता धडे:

१२:१३, १४. जीवनात महत्त्वपूर्ण निर्णय घेताना आपण शास्त्रवचनांत पारंगत असलेल्या आणि देवाच्या तत्त्वांबद्दल गहिरा आदर असलेल्या सुज्ञ व प्रौढ बांधवांशी सल्लामसलत केली पाहिजे.

१३:११-२४. आक्षेपार्ह वाटणारा सल्ला किंवा सूचना, मग तो एखाद्या सद्‌हेतू बाळगणाऱ्‍या सहविश्‍वासूकडे आलेला असला तरी देवाच्या वचनातील मार्गदर्शनाशी तोलून-मापून पाहिला पाहिजे.—१ योहान ४:१.

१४:१३. आपल्यातील चांगले गुण पाहण्यासाठी यहोवा आपले परीक्षण करतो. तो चांगला गुण कितीही क्षुल्लक असला तरी, आपण जसजसे त्याची सेवा करण्याचा आपल्यापरीने होता होईल तितका प्रयत्न करू तसतसे यहोवा तो गुण वाढवू शकतो.

१५:१०-१३. आपण धर्मत्यागाचा निडरतेने प्रतिकार केला पाहिजे व त्याऐवजी खऱ्‍या उपासनेचा प्रसार केला पाहिजे.

१७:१०-१६. एलीया संदेष्टा आहे हे सारफथच्या विधवेने ओळखून तिने त्याला आदरातिथ्य दाखवले व यहोवाने तिच्या विश्‍वासाच्या कार्यांबद्दल तिला आशीर्वादित केले. आज देखील यहोवा, आपली विश्‍वासाची कार्ये पाहतो आणि विविध मार्गांनी जे राज्य कार्याला पाठिंबा देतात त्यांना तो प्रतिफळ देतो.—मत्तय ६:३३; १०:४१, ४२; इब्री लोकांस ६:१०.

१९:१-८. तीव्र विरोधाचा सामना करताना यहोवा आपल्या पाठीशी असेल, हा भरवसा आपण बाळगू शकतो.—२ करिंथकर ४:७-९.

१९:१०, १४, १८. खरे उपासक केव्हाही एकटे नसतात. यहोवा आणि संपूर्ण जगभरातील बंधूसमाज त्यांच्याबरोबर आहे.

१९:११-१३. यहोवा निसर्ग देव किंवा कोणत्याही नैसर्गिक शक्‍तीचे व्यक्‍तीरूप नाही.

२०:११. बेनहदादने शोमरोनचा नाश करण्याची बढाई मारली तेव्हा इस्राएलच्या राजाने त्याला उत्तर दिले: “युद्धासाठी कंबर बांधणाऱ्‍याने युद्ध करून कंबर सोडणाऱ्‍याप्रमाणे फुशारकी मारू नये.” आपल्याला देखील एखादे काम मिळते तेव्हा आपण घमेंड मारणाऱ्‍यांसारखा फाजील आत्मविश्‍वास दाखवण्याचे टाळू.—नीतिसूत्रे २७:१; याकोब ४:१३-१६.

आपल्यासाठी मौल्यवान

सीनाय पर्वतावर नियमशास्त्र कशाप्रकारे देण्यात आले होते ते सांगताना मोशेने इस्राएल पुत्रांना असे म्हटले: “पाहा, आज तुमच्यापुढे आशीर्वाद व शाप हे दोन्ही मी ठेवीत आहे, म्हणजे तुमचा देव परमेश्‍वर ह्‍याचा ज्या आज्ञा मी आज तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही पाळिल्या तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल; पण तुम्ही आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्या आज्ञा पाळिल्या नाहीत आणि ज्या मार्गाने जाण्याची मी आज तुम्हाला आज्ञा करीत आहे तो सोडून . . . तुम्ही गेला तर तुम्हाला शाप मिळेल.”—अनुवाद ११:२६-२८.

पहिले राजे पुस्तकात हे महत्त्वपूर्ण सत्य किती स्पष्ट शब्दांत आपल्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. आपण पाहिले, की या पुस्तकातून आपण इतरही अनेक मौल्यवान धडे शिकलो. या पुस्तकातील संदेश खरोखरच सजीव व सक्रिय आहे.—इब्री लोकांस ४:१२. (w०५ ७/१)

[२९ पानांवरील चित्र]

शलमोनाने बांधलेले मंदिर आणि इतर इमारती

[३०, ३१ पानांवरील चित्र]

यहोवाने आपल्या शक्‍तीचे प्रदर्शन केल्यावर लोकांनी हे उद्‌गार काढले: “यहोवा हाच देव आहे!”