व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बालकांनो, यहोवाची स्तुती करा

बालकांनो, यहोवाची स्तुती करा

बालकांनो, यहोवाची स्तुती करा

“कुमार व कुमारी . . . परमेश्‍वराच्या नावाचे स्तवन करोत.”—स्तोत्र १४८:१२, १३.

१, २. (क) बऱ्‍याच लहान मुलांना कोणत्या बंधनांची जाणीव असते? (ख) आईवडिलांनी विशिष्ट गोष्टींची परवानगी न दिल्यास लहान मुलांनी रागावू का नये?

आपल्याला अद्याप काय काय करण्याची परवानगी नाही याची लहान मुलांना विशेषतः जाणीव असते. त्यांच्यापैकी बरेचजण तुम्हाला सांगतील की किती वर्षांचे झाल्यानंतर त्यांना एकट्याने रस्ता ओलांडण्याची, किंवा रात्री विशिष्ट वेळेपर्यंत जागण्याची किंवा कार अथवा स्कूटर चालवण्याची परवानगी मिळेल. कधीकधी तर मुलांना असे वाटू लागते की आईबाबांना काहीही विचारले तरी त्यांचे आपले एकच उत्तर असते, “आधी मोठा तर हो.”

तुम्हाला काही गोष्टींची मनाई करण्यातच तुमची भलाई आहे, तुमच्या सुरक्षेकरता हे आवश्‍यक आहे असा विचार करूनच आईवडील नियम बनवतात; याची तुम्हालाही जाणीव आहे. शिवाय तुम्ही आपल्या आईवडिलांचे ऐकता तेव्हा यहोवाला आनंद होतो याचीही तुम्हाला जाणीव असेलच. (कलस्सैकर ३:२०) पण कधीकधी तुम्हाला असे वाटते का की ‘हे कसले जगणे? आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्‍या सगळ्या गोष्टी तर आईबाबांच्या म्हणण्यानुसार मोठे झाल्यावरच करता येतील.’ असा कधीही विचार करू नका! कारण आजच्या काळात असे एक काम केले जात आहे की जे तुम्हाला हव्याहव्याशा वाटणाऱ्‍या कोणत्याही सुसंधीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. आणि या कामात सहभागी होण्याची लहान मुलांना परवानगी आहे का? फक्‍त परवानगीच नाही, तर सर्वसमर्थ देव स्वतः तुम्हाला या कामात सहभागी होण्याचे निमंत्रण देतो!

३. यहोवा तुम्हाला कोणती सुसंधी देतो आणि आता आपण कोणत्या प्रश्‍नांचा विचार करणार आहोत?

आपण येथे कोणत्या कामाबद्दल बोलत आहोत? या लेखाच्या मुख्य वचनातील शब्दांकडे लक्ष द्या: “कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण ही सगळी परमेश्‍वराच्या नावाचे स्तवन करोत.” (स्तोत्र १४८:१२, १३) तर हीच ती सुसंधी आहे: तुम्ही यहोवाचे स्तवन म्हणजेच स्तुती करू शकता. या कामात सहभागी होण्याची कल्पना तुम्हाला रोमांचक वाटत नाही का? बऱ्‍याच मुलामुलींना वाटते. असे वाटणे योग्य का आहे हे समजण्यासाठी आपण तीन प्रश्‍नांचा विचार करू या. पहिला, तुम्ही यहोवाची स्तुती का करावी? दुसरा, तुम्ही परिणामकारकरित्या त्याची स्तुती कशी करू शकता? तिसरा, यहोवाची स्तुती करण्यास केव्हा सुरुवात करावी?

यहोवाची स्तुती का करावी?

४, ५. (क) स्तोत्र १४८ यानुसार आपण सर्वजण कोणत्या अद्‌भूत स्थितीत आहोत? (ख) सृष्टीतील ज्या गोष्टी बोलू किंवा विचार करू शकत नाहीत त्या यहोवाची स्तुती कशा काय करू शकतात?

यहोवाची स्तुती करण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तो सृष्टिकर्ता आहे. १४८ वे स्तोत्र आपल्याला या गोष्टीचे महत्त्व पटवून देते. कल्पना करा: तुमच्या समोर एक मोठा समूह एक अतिशय सुरेख, हृदयस्पर्शी गीत एकसुरात गात आहे. तुम्हाला साहजिकच कसे वाटेल? समजा त्या गीताचे बोल अगदी खरे आहेत हे तुम्हाला माहीत आहेत आणि ते महत्त्वाचे, आनंददायक आणि उभारणीकारकही आहेत हे तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला ते बोल शिकून या समूहासोबत आपलाही सुर मिळवण्याची इच्छा होणार नाही का? आपल्यापैकी बहुतेक जणांना निश्‍चितच असे वाटेल. १४८ व्या स्तोत्रानुसार तुम्ही अशाच, किंबहुना याही पेक्षा अद्‌भुत परिस्थितीत आहात. हे स्तोत्र एका मोठ्या समूहाचे वर्णन करते ज्यात सामील असलेले सर्वजण यहोवाची स्तुती करत आहेत. पण हे स्तोत्र वाचत असताना तुम्हाला काहीतरी असामान्य असे आढळले असेल. ते काय आहे?

स्तोत्र १४८ यात यहोवाची स्तुती करत असल्याचे ज्यांच्याविषयी वर्णन केले आहे त्यांपैकी बहुतेक गोष्टी बोलू किंवा विचार करू शकत नाहीत. उदाहरणार्थ, सूर्य, चंद्र, तारे, हिम, वायू, पर्वत व डोंगर यहोवाची स्तुती करतात असे या स्तोत्रात आपण वाचतो. पण या निर्जीव गोष्टी यहोवाची स्तुती कशा करू शकतात? (वचने ३, ८, ९) वृक्ष, समुद्र, व पशूपक्षी करतात त्याच प्रकारे. (वचने ७, ९, १०) तुम्ही कधी नेत्रदीपक सूर्यास्त पाहिला आहे का, किंवा असंख्य ताऱ्‍यांच्या जाळीदार पडद्याआडून डोकावणारा पूर्ण चंद्र पाहिला आहे का? खेळकर प्राण्यांकडे पाहून कधी तुम्ही मनभरून हसला आहात का किंवा एखादा नयनरम्य देखावा पाहून अवाक झाला आहात का? तर मग तुम्ही सृष्टीने गायिलेले स्तुतीगीत ‘ऐकले’ आहे. यहोवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी आपल्याला याची आठवण करून देतात की तो सर्वशक्‍तिमान सृष्टिकर्ता आहे आणि या सबंध विश्‍वात त्याच्याइतका शक्‍तिशाली, बुद्धिमान किंवा प्रेमळ कोणीही नाही.—रोमकर १:२०; प्रकटीकरण ४:११.

६, ७. (क) स्तोत्र १४८ यानुसार कोणते बुद्धिमान प्राणी यहोवाची स्तुती करत आहेत? (ख) आपल्याला यहोवाची स्तुती करण्याची प्रेरणा का होते? उदाहरण द्या.

स्तोत्र १४८ यातील वर्णनात, सृष्टीतील बुद्धिमान प्राणी देखील यहोवाची स्तुती करतात. २ ऱ्‍या वचनात, यहोवाचे स्वर्गीय ‘सैन्य’ अर्थात देवदूत त्याची स्तुती गात आहेत असे आपण वाचतो. ११ व्या वचनात शक्‍तिशाली व प्रभावशाली मनुष्ये, उदाहरणार्थ राजे व न्यायाधीश यांनाही देवाची स्तुती करण्यात सहभागी होण्यास आवाहन केले जाते. जर सामर्थ्यशाली देवदूत आनंदाने यहोवाची स्तुती करतात तर मग कोणता मनुष्य स्वतःला इतका महत्त्वपूर्ण समजू शकतो की ज्यामुळे तो यहोवाची स्तुती करू शकत नाही? मग १२ व्या व १३ व्या वचनात तुम्हाला अर्थात बालकांना इतर सर्वांसोबत यहोवाची स्तुती गाण्यात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले जाते. तुम्हाला या निमंत्रणाला प्रतिसाद देण्याची प्रेरणा होते का?

एका उदाहरणावर विचार करा. तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राकडे, खेळक्रीडा, कला किंवा संगीत यांपैकी कोणत्याही क्षेत्रात काहीतरी विशेष कौशल्य आहे असे समजा. तुम्ही या मित्राबद्दल आपल्या कुटुंबाशी व इतर मित्रमैत्रिणींशी बोलाल का? निश्‍चितच बोलाल. यहोवाने आपल्यासाठी जे सर्व काही केले आहे त्याविषयी शिकल्यानंतरही आपल्यावर असाच परिणाम होऊ शकतो. यहोवाने घडवून आणलेल्या अद्‌भूत गोष्टींविषयी जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा इतरांशी आपल्या देवाबद्दल बोलल्याशिवाय आपल्याला राहवणारच नाही.

८, ९. कोणत्या कारणांमुळे आपण यहोवाची स्तुती करावी असे त्याला वाटते?

यहोवाची स्तुती करण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपण त्याची स्तुती करावी अशी त्याचीच इच्छा आहे. अशी इच्छा तो का बाळगतो? त्याला मानवांच्या प्रशंसेची गरज आहे का? नाही. मानव असल्यामुळे आपण कधीकधी इतरांकडून प्रशंसेची अपेक्षा करतो पण यहोवा आपल्यापेक्षा फार महान आहे. (यशया ५५:८) त्याला त्याच्या स्वतःविषयी किंवा स्वतःच्या गुणांविषयी कोणतीही शंका नाही. (यशया ४५:५) आणि तरीसुद्धा त्याची अशी इच्छा आहे की आपण त्याची स्तुती करावी. तसेच आपण त्याची स्तुती करतो तेव्हा त्याला आनंद वाटतो. असे का? दोन कारणांचा विचार करा. एकतर, त्याची स्तुती करणे ही आपली एक गरज आहे हे त्याला माहीत आहे. त्याने आपल्याला निर्माण केले तेव्हा एका आध्यात्मिक गरजेसह, उपासना करण्याच्या गरजेसह निर्माण केले. (मत्तय ५:३, NW) ती गरज आपण पूर्ण करतो तेव्हा यहोवाला आनंद होतो. याची तुलना आईवडिलांशी करता येईल. तुम्ही पौष्टिक अन्‍न खाता तेव्हा त्यांना आनंद वाटतो कारण हे अन्‍न तुमच्यासाठी चांगले आहे हे त्यांना माहीत असते.—योहान ४:३४.

दुसरे कारण म्हणजे, यहोवाला माहीत आहे की इतर लोकांनाही आपल्या तोंडून त्याची स्तुती ऐकण्याची गरज आहे. प्रेषित पौलाने पुढील शब्द तरुण तीमथ्याला लिहिले होते: “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्‍यांचेहि तारण साधिशील.” (१ तीमथ्य ४:१६) होय, तुम्ही इतरांना यहोवा देवाबद्दल शिकवता, व त्याची स्तुती करता तेव्हा त्यांनाही यहोवाची ओळख घडू शकते. हे ज्ञान त्यांना सार्वकालिक तारण मिळवून देऊ शकते!—योहान १७:३.

१०. आपल्या देवाची स्तुती करण्यास आपण का प्रवृत्त होतो?

१० यहोवाची स्तुती करण्याचे आणखी एक कारण आहे. तुमच्या त्या विशेष कौशल्य असलेल्या मित्राचे उदाहरण पुन्हा आठवा. जर लोक त्याच्याबद्दल खोटी माहिती पसरवत आहेत, त्याचे नाव खराब करत आहे असे तुम्हाला कळले, तर तुम्हाला आपल्या या मित्राची स्तुती करण्याची अधिकच प्रेरणा होणार नाही का? आजच्या या जगात सर्वदूर यहोवाबद्दल खोटी माहिती पसरवली जात आहे. (योहान ८:४४; प्रकटीकरण १२:९) त्यामुळे साहजिकच, ज्यांचे त्याच्यावर प्रेम आहे त्यांना त्याच्याविषयीचे सत्य इतरांना सांगितल्याशिवाय राहवत नाही. तुम्हालाही यहोवाबद्दल आपले प्रेम व कृतज्ञता व्यक्‍त करण्यास आवडेल का? आपल्यावर यहोवाचा सर्वात मोठा शत्रू सैतान याने नव्हे, तर यहोवानेच शासन करावे असे तुम्हाला वाटते हे तुम्हाला दाखवायचे आहे का? हे सर्वकाही तुम्ही यहोवाची स्तुती करण्याद्वारे व्यक्‍त करू शकता. पण पुढचा प्रश्‍न असा उद्‌भवतो, की हे करायचे कसे?

काही मुलांनी यहोवाची स्तुती कशी केली?

११. लहान मुलेही अतिशय परिणामकारकरित्या यहोवाची स्तुती करू शकतात हे बायबलमधील कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?

११ बायबलमधील अनेक उदाहरणांवरून दिसून येते की लहान मुले सहसा अतिशय परिणामकारकरित्या यहोवाची स्तुती करतात. उदाहरणार्थ, एका लहानशा इस्राएली मुलीला अरामी सैन्यांनी बंदी बनवून नेले होते. या मुलीने आपल्या मालकिणीला यहोवाचा संदेष्टा एलीया याच्याविषयी अतिशय निर्भयपणे साक्ष दिली. तिने दिलेल्या माहितीमुळे एक चमत्कार घडून आला आणि अशारितीने अतिशय प्रभावी रितीने साक्ष देण्यात आली. (२ राजे ५:१-१७) येशूनेही आपल्या लहानपणी निर्भयपणे साक्ष दिली. त्याच्या लहानपणी घडलेल्या अनेक घटनांपैकी एक खास घटना शास्त्रवचनांत नोंदण्याकरता यहोवाने निवडली. येशू १२ वर्षांचा असताना त्याने जेरूसलेमच्या मंदिरातील धर्मोपदेशकांना निर्भयपणे निरनिराळे प्रश्‍न विचारले. यहोवाच्या मार्गांबद्दल त्याला किती अचूक ज्ञान आहे हे पाहून ते धर्मोपदेशकही आश्‍चर्यचकित झाले.—लूक २:४६-४९.

१२, १३. (क) आपल्या मृत्यूच्या काही दिवसांआधी येशूने मंदिरात काय केले आणि यामुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांवर काय परिणाम झाला? (ख) लहान मुलांनी यहोवाची स्तुती केली तेव्हा येशूची काय प्रतिक्रिया होती?

१२ नंतर मोठेपणी, येशूने लहान मुलांनाही यहोवाची स्तुती करण्यास प्रेरित केले. उदाहरणार्थ, त्याच्या मृत्यूच्या केवळ काही दिवसांआधी येशू जेरुसलेमच्या मंदिरात होता. तेथे त्याने अनेक “चमत्कार” केले असे बायबल सांगते. त्या पवित्र ठिकाणाला चोरांची गुहा बनवू पाहणाऱ्‍यांना त्याने बाहेर हाकलून लावले. तसेच त्याने अंधळ्या व लंगड्या लोकांना बरे केले. हे सर्व पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी, विशेषतः धर्मपुढाऱ्‍यांनी यहोवाची व त्याचा पुत्र, मशीहा याची स्तुती करायला पाहिजे होती. पण दुःखाची गोष्ट म्हणजे बहुतेकांनी यहोवाची स्तुती केली नाही. त्यांना माहीत होते की येशूला देवानेच पाठवले आहे पण त्यांना धर्मपुढाऱ्‍यांची भीती होती. पण काहीजणांनी मात्र निर्भयपणे आपल्या भावना दर्शवल्या. हे कोण होते तुम्हाला माहीत आहे का? बायबल सांगते: “तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दावीदाच्या पुत्राला ‘होसान्‍ना’ असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले. व [येशूला] म्हणाले, ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय?”—मत्तय २१:१५, १६; योहान १२:४२.

१३ त्या याजकांना वाटले की येशू त्याची स्तुती करणाऱ्‍या मुलांना शांत राहण्यास सांगेल. येशूने असे केले का? नाही त्याने अगदी उलटच केले! येशूने याजकांना उत्तर दिले: “हो; बाळके व तान्ही मुले ह्‍यांच्या मुखातून तू स्तुति पूर्ण करविली आहे, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?” त्या मुलांनी केलेली स्तुती ऐकून येशूला व त्याच्या पित्याला आनंद झाला हे यावरून स्पष्ट होते. ही मुले जे करत होती ते खरे तर सर्व प्रौढांनी देखील करायला हवे होते. त्यांच्या बालमनातल्या भावना अगदी स्पष्ट होत्या. त्यांनी या माणसाला अद्‌भूत चमत्कार करताना, धैर्याने व विश्‍वासाने बोलताना आणि देवाबद्दल व त्याच्या लोकांबद्दल मनस्वी प्रेम व्यक्‍त करताना पाहिले होते. तसेच, तो प्रतिज्ञात, “दाविदाचा पुत्र,” मशीहा असल्याचेही सांगत होता. त्याच्यावर विश्‍वास दाखवल्यामुळे या मुलांना भविष्यवाणी पूर्ण करण्यात सहभागी होण्याचा बहुमान मिळाला.—स्तोत्र ८:२.

१४. लहान मुलांजवळ असलेल्या आशीर्वादांचा ते देवाची स्तुती करण्याकरता कसा उपयोग करू शकतात?

१४ या उदाहरणांवरून आपण काय शिकू शकतो? हेच, की लहान मुलेही यहोवाची स्तुती अतिशय परिणामकारकरित्या करू शकतात. सत्याकडे अगदी साध्या व स्पष्ट दृष्टिकोनातून पाहण्याची व आपला विश्‍वास अतिशय उत्कटतेने व आवेशाने व्यक्‍त करण्याची खास क्षमता त्यांना लाभलेली असते. तसेच, नीतिसूत्रे २०:२९ येथे उल्लेख केलेला आणखी एक खास आशीर्वाद त्यांना मिळालेला असतो. त्या वचनानुसार, “बल हे तरूणांस भूषण आहे.” होय मुलांनो, तुमच्याजवळ असलेली ताकद व उत्साह हे यहोवाची स्तुती करण्यास मदत करू शकतील असे खास आशीर्वाद आहेत. पण या आशीर्वादांचा तुम्ही कसा उपयोग करू शकता?

तुम्ही यहोवाची स्तुती कशी करू शकता?

१५. यहोवाची परिणामकारकरित्या स्तुती करण्यासाठी कशाप्रकारचा हेतू असणे महत्त्वाचे आहे?

१५ परिणामकारकरित्या स्तुती करण्याची सुरुवात हृदयापासून होते. जर केवळ इतरांचे मन राखण्याकरता तुम्ही देवाची स्तुती करत असाल तर ती परिणामकारक ठरणार नाही. सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे हे नेहमी आठवणीत असू द्या: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.” (मत्तय २२:३७) देवाच्या वचनाचा स्वतः अभ्यास केल्यामुळे तुम्हाला वैयक्‍तिकरित्या त्याची ओळख घडली आहे का? अशाप्रकारे अभ्यास केल्यामुळे साहजिकच तुमच्या मनात यहोवाबद्दल प्रेम उत्पन्‍न होईल. हे प्रेम व्यक्‍त करण्याचा सर्वात स्वाभाविक मार्ग म्हणजे त्याची स्तुती करणे. तुमचा मूळ हेतू स्पष्ट व मनःपूर्वक असेल तर तुम्ही उत्साहीपणे यहोवाची स्तुती करण्यास तयार आहात.

१६, १७. यहोवाची स्तुती करण्यात वागणूक किती महत्त्वाची आहे? उदाहरण द्या.

१६ यहोवाची स्तुती करण्याकरता आपण काय म्हणू याचा विचार करण्याआधी आपण कसे वागू याचा विचार करणे जास्त म्हत्त्वाचे आहे. अलीशाच्या काळातली ती इस्राएली मुलगी जर नेहमी रागीट, अनादरपूर्ण किंवा अप्रामाणिकपणे वागणारी असती तर तिला बंदिवान बनवणाऱ्‍या अरामी लोकांना यहोवाच्या संदेष्ट्याबद्दल तिने जे सांगितले ते त्यांनी ऐकले असते का? कदाचित नाही. त्याचप्रकारे, तुम्ही आदरशील, प्रामाणिक व चांगले वागणारे आहात हे लोकांनी पाहिले तर ते तुमचे ऐकून घेण्याची जास्त शक्यता आहे. (रोमकर २:२१) एक उदाहरण पाहा.

१७ पोर्तुगाल येथे राहणाऱ्‍या एका ११ वर्षांच्या मुलीवर विशिष्ट सण साजरे करण्याचा दबाव आणला जात होता. पण बायबलमधील तत्त्वांचे प्रशिक्षण मिळालेल्या तिच्या विवेकाच्या हे विरोधात होते. आपण या सणांत का सहभागी होऊन शकत नाही हे तिने अतिशय आदरपूर्वक आपल्या शिक्षिकेला समजावून सांगितले. पण तिच्या शिक्षिकेने तिची थट्टा केली. यानंतरही बरेचदा तिच्या शिक्षिकेने तिचा अपमान करण्याचा, तिच्या धर्माची थट्टा करण्याचा प्रयत्न केला. पण ही लहान मुलगी मात्र नेहमी आदरपूर्वकच वागायची. काही वर्षांनंतर ही लहान बहीण सामान्य पायनियर अर्थात पूर्ण वेळेची सुवार्तिक बनली. एका अधिवेशनात, लोकांचा बाप्तिस्मा होत असताना ती पाहात होती, तेव्हा तिला एक ओळखीचा चेहरा दिसला. ती व्यक्‍ती, तिची ती जुनी शिक्षिका होती! लगेच त्या दोघीजणी एकमेकांना बिलगल्या, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. शिक्षिकेने तिला सांगितले की तिचा आदरपूर्वक व्यवहार ती कधीही विसरू शकली नाही. यानंतर एक साक्षीदार बहीण या शिक्षिकेच्या घरी आली तेव्हा शिक्षिकेने तिला आपल्या पूर्वीच्या विद्यार्थिनीच्या वागणुकीबद्दल सांगितले. तिच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करण्यात आला आणि या स्त्रीने बायबलचे सत्य स्वीकारले. होय, तुमची वागणूक यहोवाची स्तुती करण्याचा अतिशय प्रभावी मार्ग आहे!

१८. बायबलविषयी किंवा यहोवा देवाविषयी संभाषण सुरू करण्यास लहान मुलांना कठीण वाटल्यास त्यांनी काय करावे?

१८ तुम्हाला कधीकधी शाळेत आपल्या विश्‍वासांबद्दल इतरांना सांगण्याकरता संभाषण सुरू करणे कठीण वाटते का? तुमच्यासारखेच अनेक मुलांना हे कठीण वाटते. पण इतरजण स्वतःहूनच तुम्हाला तुमच्या विश्‍वासांबद्दल विचारतील अशाप्रकारची परिस्थिती तुम्ही निर्माण करू शकता. उदाहरणार्थ, तुमच्या देशात कायद्यानुसार परवानगी असल्यास तुम्ही बायबल आधारित प्रकाशने शाळेत नेऊन जेवणाच्या सुटीत किंवा इतर उचित वेळी ती वाचू शकता का? कदाचित तुमचे वर्गसोबती तुम्हाला विचारतील की तुम्ही काय वाचत आहात. तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकात कोणती रोचक माहिती तुम्हाला मिळाली याविषयी तुम्ही त्यांना सांगू शकता. अशारितीने तुम्हाला काही कळण्याआधीच, संभाषण सुरू झालेले असेल. तुमच्या वर्गसोबत्यांचे काय विश्‍वास आहेत हे जाणून घेण्याकरता प्रश्‍न विचारायला विसरू नका. त्यांची मते आदरपूर्वक ऐकून घ्या आणि तुम्हाला बायबलमधून काय शिकायला मिळाले हे त्यांना सांगा. पृष्ठ २९ वर तुम्हाला अशा अनेक लहान मुलामुलींचे अनुभव वाचायला मिळतील जे शाळेत देवाची स्तुती करत आहेत. यामुळे त्यांना तर अतिशय आनंद होतोच पण अनेकजणांना यहोवाविषयी जाणून घेण्याची संधी मिळते.

१९. लहान मुले घरोघरच्या सेवाकार्यात आणखी परिणामकारक कसे बनू शकतात?

१९ घरोघरचे साक्षकार्य यहोवाची स्तुती करण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग आहे. तुम्ही जर अद्यापही यात भाग घेत नसाल तर तुम्ही हे ध्येय ठेवू शकता का? जर तुम्ही यात भाग घेण्यास सुरुवात केली असेल तर तुम्ही आणखी काही ध्येय ठेवू शकता का? उदाहरणार्थ, प्रत्येक घरमालकाला एकच गोष्ट सांगण्याऐवजी तुम्ही आपल्या बोलण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्याचे मार्ग शोधू शकता; यासाठी तुम्ही आपल्या आईवडिलांचा किंवा इतर अनुभवी प्रचारकांचा सल्ला मागू शकता. बायबलचा वापर कसा करायचा, प्रभावी पुनर्भेटी कशा द्यायच्या, आणि बायबल अभ्यास कसा सुरू करायचा हे शिकण्याचा प्रयत्न करा. (१ तीमथ्य ४:१५) अशा प्रकारे तुम्ही यहोवाची जितकी जास्त स्तुती कराल तितकेच तुम्ही परिणामकारक बनाल आणि यामुळे सेवाकार्यातून तुम्हाला आनंद मिळेल.

यहोवाची स्तुती करण्यास तुम्ही केव्हा सुरुवात करावी?

२०. आपण यहोवाची स्तुती करण्याकरता अजून खूप लहान आहोत असे तरुणांनी का समजू नये?

२० या चर्चेतील तीन प्रश्‍नांपैकी शेवटल्या प्रश्‍नाचे उत्तर सर्वात सोपे आहे. बायबलमध्ये या प्रश्‍नाचे अगदी थेट उत्तर दिले आहे: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.” (उपदेशक १२:१) होय यहोवाची स्तुती करण्याची वेळ आताच आहे. पण कदाचित तुम्ही म्हणाल, की “मी तर अजून खूप लहान आहे. मला अनुभव नाही. थोडे मोठे झाल्यावर मी यहोवाची स्तुती करेन.” असे वाटणारे तुम्ही एकटे नाही. उदाहरणार्थ, यिर्मयाने यहोवाला म्हटले: “प्रभु परमेश्‍वर, पाहा, मला बोलावयाचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.” पण यहोवाने त्याला दिलासा दिला व सांगितले की घाबरण्याचे काही कारण नाही. (यिर्मया १:६, ७) त्याचप्रकारे आपणही यहोवाची स्तुती करतो तेव्हा आपल्याला घाबरण्याचे कसलेही कारण नाही. आपली अशी कोणतीही हानी होऊ शकत नाही की जी यहोवा पूर्णपणे भरून काढू शकत नाही.—स्तोत्र ११८:६.

२१, २२. जी लहान मुले यहोवाची स्तुती करतात त्यांची तुलना दवबिंदूंशी का करण्यात आली आहेत आणि या तुलनेमुळे आपल्याला प्रोत्साहन का मिळते?

२१ तर आम्ही सर्व लहान मुलांना आवर्जून सांगू इच्छितो: यहोवाची स्तुती करण्यास कधीही कचरू नका! तुम्ही तरुण आहात तोपर्यंत, आज पृथ्वीवर केल्या जात असलेल्या सर्वात महत्त्वाच्या कामात सहभागी होण्याची हीच सर्वात उत्तम वेळ आहे. तुम्ही या कामात सहभागी होता तेव्हा तुम्ही यहोवाची स्तुती करणाऱ्‍या त्याच्या विश्‍वव्याप्त कुटुंबाचे भाग बनता. हे खरोखर अद्‌भूत नाही का? तुम्हाला या कुटुंबात पाहून यहोवाला आनंद वाटतो. स्तोत्रकर्त्याने यहोवाला उद्देशून बोललेल्या या शब्दांकडे लक्ष द्या: “तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिंवरासारखे आहेत.”—स्तोत्र ११०:३.

२२ सकाळच्या उन्हात चकाकणारे दवबिन्दू अतिशय सुंदर दिसतात नाही का? टवटवी आणणारे हे तेजस्वी बिंदू मोजता येत नाहीत कारण ते असंख्य असतात. या कठीण दिवसांत यहोवाची विश्‍वासूपणे स्तुती करणारी सर्व लहान मुले यहोवाच्या नजरेत त्या दवबिंदूंसारखी आहेत. यहोवाची स्तुती करण्याच्या तुमच्या निर्णयाने त्याचे मन आनंदित होते यात शंका नाही. (नीतिसूत्रे २७:११) तेव्हा मुलांनो, यहोवाची स्तुती करा! (w०५ ६/१५)

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• यहोवाची स्तुती करण्याची काही महत्त्वपूर्ण कारणे कोणती आहेत?

• लहान मुले अतिशय परिणामकारकरित्या यहोवाची स्तुती करू शकतात हे बायबलमधील कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?

• आज लहान मुले यहोवाची स्तुती कशी करू शकतात?

• लहान मुलांनी यहोवाची स्तुती करण्यास केव्हा सुरुवात करावी व का?

[अभ्यासाचे प्रश्‍न]