व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“शुभवृत्त विदित करणे”

“शुभवृत्त विदित करणे”

“शुभवृत्त विदित करणे”

‘जो शुभवृत्त विदित करितो, त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात.’—यशया ५२:७.

१, २. (क) दररोज कोणत्या भयानक गोष्टी घडत आहेत? (ख) सतत वाईट बातम्या ऐकून बरेच जण कशी प्रतिक्रिया व्यक्‍त करतात?

वाईट बातम्यांना उधाण आले आहे. सबंध जगातल्या लोकांना हे जाणवत आहे. रेडिओ लावला की जगातल्या निरनिराळ्या भागांत हैदोस घालणाऱ्‍या प्राणघातक रोगांविषयी वृत्त ऐकायला मिळते. टीव्हीवर बघावे तर भुकेने व्याकूळ मुलांची दयनीय चित्रे पाहायला मिळतात. वृत्तपत्र उचलले की बॉम्बस्फोट होऊन शेकडो निष्पाप व्यक्‍तींच्या चिंधड्या उडाल्याची बातमी वाचायला मिळते.

होय, दररोज भयानक घटना घडत आहेत. या जगाचे स्वरूप नक्कीच बदलत चालले आहे—बिघडत चालले आहे. (१ करिंथकर ७:३१) पश्‍चिम युरोपातील एका वृत्तपत्रकात असे म्हटले होते की कधीकधी असे वाटते, जणू कोणत्याही क्षणी संपूर्ण जग “जळून भस्म होईल.” साहजिकच जगातले अनेक लोक दुःखी आहेत! संयुक्‍त संस्थानांतील टीव्हीवरील बातम्यांसंबंधी घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात एका व्यक्‍तीने जे मत व्यक्‍त केले त्यातून कोट्यवधी लोकांच्या भावना व्यक्‍त होतात. त्याने म्हटले: ‘बातम्या पाहिल्यावर मला अगदी उदास वाटतं. सगळ्या वाईटच बातम्या असतात. फार बेचैन करणारी परिस्थिती आहे.’

सर्वांनी ऐकावी अशी सुवार्ता

३. (क) बायबलमध्ये कोणती चांगली बातमी आहे? (ख) तुम्हाला राज्याची सुवार्ता महत्त्वाची का वाटते?

अशा या निराशाजनक परिस्थितीत, सुवार्ता किंवा चांगली बातमी खरच ऐकायला मिळू शकते का? अवश्‍य मिळू शकते! बायबलमध्ये अशी एक चांगली बातमी आहे हे जाणून सांत्वन मिळते. ही बातमी अशी आहे की आजार, उपासमार, गुन्हेगारी, युद्धे आणि सर्व प्रकारचे अत्याचार यांचा देवाच्या राज्याकरवी अंत केला जाणार आहे. (स्तोत्र ४६:९; ७२:१२) ही खरोखरच सर्वांनी ऐकावी अशी चांगली बातमी नाही का? यहोवाच्या साक्षीदारांना वाटते की ही बातमी सर्वांना कळावी. म्हणूनच ते सर्व राष्ट्रांच्या लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याचा सातत्याने प्रयत्न करतात व या कार्यामुळे त्यांना सर्वदूर ओळखले जाते.—मत्तय २४:१४.

४. या व पुढील लेखात आपण आपल्या सेवाकार्याच्या कोणत्या पैलूंचा विचार करणार आहोत?

पण ही सुवार्ता घोषित करण्याच्या कार्यात समाधानदायक व अर्थपूर्ण सहभाग घेत राहण्याकरता—विशेषतः आपल्या कार्याला जेथे फारसा प्रतिसाद मिळत नाही अशा क्षेत्रांतही हे कार्य चालू ठेवण्याकरता आपण काय करू शकतो? (लूक ८:१५) आपल्या प्रचार कार्याच्या तीन महत्त्वाच्या पैलूंचा विचार करणे आपल्याला या बाबतीत सहाय्यक ठरू शकते. (१) आपले हेतू, अर्थात आपण प्रचार का करतो; (२) आपला संदेश, अर्थात आपण कशाविषयी प्रचार करतो आणि (३) आपल्या पद्धती अर्थात, आपण कशाप्रकारे प्रचार करतो यांचे परीक्षण आपण केले पाहिजे. आपले हेतू शुद्ध असतील, संदेश स्पष्ट असेल आणि कार्यपद्धत परिणामकारक असेल तर आपण निरनिराळ्या प्रकारच्या लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता, म्हणजे सर्वात चागंली सुवार्ता ऐकण्याची संधी देऊ. *

आपण सुवार्तेच्या प्रचारात का सहभागी होतो?

५. (क) प्रचार कार्य करण्याची आपल्याला प्रेरणा देणारी सर्वात मुख्य गोष्ट कोणती आहे? (ख) प्रचार करण्याच्या बायबलमधील आज्ञेचे पालन करण्याद्वारे आपण देवाबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम व्यक्‍त करतो हे कशावरून दिसून येते?

आपण पहिला पैलू अर्थात आपले हेतू यांबद्दल प्रथम विचार करू या. आपण सुवार्तेचा प्रचार का करतो? येशूने ज्या कारणासाठी प्रचार केला त्याच कारणासाठी आपणही करतो. येशूने म्हटले: “मी पित्यावर प्रीति करितो.” (योहान १४:३१; स्तोत्र ४०:८) इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा, आपल्याला या कार्यासाठी प्रेरणा देणारी सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे देवाबद्दलचे आपले प्रेम. (मत्तय २२:३७, ३८) देवाबद्दलचे प्रेम व सेवाकार्य यांतला संबंध बायबलमध्ये स्पष्ट करण्यात आला आहे. कारण त्यात म्हटले आहे: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय.” (१ योहान ५:३; योहान १४:२१) ‘जाऊन शिष्य करा’ ही आज्ञा देखील यांत समाविष्ट आहे का? (मत्तय २८:१९) होय. हे शब्द जरी येशू बोलला असला तरीसुद्धा ते मुळात यहोवाचे शब्द आहेत. असे आपण का म्हणू शकतो? येशूने हे स्पष्ट केले: “मी आपण होऊन काही करीत नाही तर मला पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्‍या गोष्टी बोलतो.” (योहान ८:२८; मत्तय १७:५) त्याअर्थी, प्रचार करण्याच्या आज्ञेचे पालन करण्याद्वारे आपण यहोवाला दाखवतो की आपले त्याच्यावर प्रेम आहे.

६. देवाबद्दलचे प्रेम आपल्याला कशाप्रकारे प्रचार करण्याची प्रेरणा देते?

शिवाय, यहोवाबद्दलचे प्रेम आपल्याला प्रचार करण्याची प्रेरणा देते कारण सैतान त्याच्याविषयी जी खोटी माहिती पसरवतो त्याचा आपण विरोध करू इच्छितो. (२ करिंथकर ४:४) देवाचे शासन नीतिमान आहे किंवा नाही अशी शंका सैतानाने व्यक्‍त केली आहे. (उत्पत्ति ३:१-५) यहोवाचे साक्षीदार या नात्याने सैतानाच्या आरोपांचा खोटेपणा सिद्ध करण्यात व सर्व मानवांसमोर देवाचे नाव पवित्र करण्यात सहभागी होण्यास आपण उत्सुक आहोत. (यशया ४३:१०-१२) शिवाय, आपण सेवाकार्यात सहभाग घेतो याचे आणखी एक कारण म्हणजे आपल्याला यहोवाच्या गुणांची व मार्गांची ओळख घडली आहे. आपले त्याच्यासोबत घनिष्ठ नाते आहे आणि आपल्या देवाबद्दल इतर लोकांना सांगण्याची उत्कट इच्छा आपल्या मनात आहे. किंबहुना, यहोवाच्या चांगुलपणाचा व त्याच्या नीतिमान मार्गांचा विचार केल्यावर आपल्याला इतका आनंद होतो की त्याच्याविषयी बोलल्याशिवाय आपल्याला राहवतच नाही. (स्तोत्र १४५:७-१२) त्याची स्तुती करण्यास व जे कोणी ऐकण्यास तयार आहेत त्यांना त्याचे उत्कृष्ट “गुण” सांगण्यास आपण प्रवृत्त होतो.—१ पेत्र २:९; यशया ४३:२१.

७. देवाबद्दल प्रेम असण्यासोबतच आणखी कोणत्या महत्त्वाच्या कारणामुळे आपण प्रचार कार्यात सहभागी होतो?

सेवाकार्यात सातत्याने सहभाग घेण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे: वाईट बातम्यांचा सतत भडिमार होत असल्यामुळे खिन्‍न झालेल्या आणि निरनिराळ्या कारणांमुळे दुःखी असलेल्या लोकांना सांत्वन देण्याची आपण प्रामाणिकपणे इच्छा बाळगतो. या बाबतीत आपण येशूचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, मार्क अध्याय ६ यातील वर्णन पाहा.

८. मार्क यातील ६ व्या अध्यायातील अहवालावरून येशूच्या लोकांबद्दलच्या भावनांबद्दल आपल्याला काय कळते?

एकदा येशूचे प्रेषित प्रचार मोहिमेवरून परत आल्यावर आपण काय काय केले व शिकवले त्याविषयी येशूला सांगतात. प्रेषित थकले आहेत हे येशूच्या लक्षात येते आणि तो त्यांना आपल्यासोबत येऊन “थोडा विसावा घ्या” असे म्हणतो. मग ते सर्वजण एक नावेत बसून एक शांत स्थळी जातात. पण लोक त्यांचा पाठलाग करतात, समुद्रकिनाऱ्‍याने त्यांच्या मागोमाग जाऊन काहीवेळातच ते त्यांना गाठतात. येशू आता काय करतो? “त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांना बऱ्‍याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.” (मार्क ६:३१-३४) लोकांची दया आल्यामुळे येशू आपला थकवा विसरून सुवार्ता सांगत राहण्यास प्रवृत्त झाला. स्पष्टपणे, येशूला या लोकांबद्दल मनापासून कळकळ वाटत होती.

९. मार्क अध्याय ६ यातील अहवालातून प्रचार करण्याच्या आपल्या उचित हेतूविषयी आपण काय शिकतो?

या घटनेवरून आपण काय शिकतो? ख्रिस्ती या नात्याने प्रचार करणे व शिष्य बनवणे हे आपले कर्तव्य आहे याची आपल्याला जाणीव आहे. “सर्व माणसांचे तारण व्हावे” अशी देवाची इच्छा असल्यामुळे आपल्यावर सुवार्ता सांगण्याची जबाबदारी आहे हे आपण ओळखतो. (१ तीमथ्य २:४) पण आपण केवळ कर्तव्याच्या भावनेने किंवा जबाबदारीच्या जाणिवेतून सेवाकार्य करत नाही तर लोकांबद्दल सहानुभूती असल्यामुळे करतो. येशूला लोकांबद्दल कळकळ होती तशीच जर आपल्यालाही असेल तर आपले अंतःकरण आपोआपच त्यांना सुवार्ता सांगत राहण्यास कसोशीने प्रयत्न करण्यास आपल्याला प्रवृत्त करेल. (मत्तय २२:३९) सेवाकार्यात सहभागी होण्याकरता असे उत्तम हेतू असल्यामुळे आपण सातत्याने सुवार्ता सांगत राहण्यास प्रवृत्त होऊ.

आपला संदेश—देवाच्या राज्याची सुवार्ता

१०, ११. (क) आपण जो संदेश घोषित करतो त्याविषयी संदेष्टा यशयाने कशाप्रकारे वर्णन केले? (ख) येशूने कशाविषयीचे शुभवृत्त घोषित केले आणि आधुनिक काळात देवाच्या सेवकांनी येशूच्या आदर्शाचे कशाप्रकारे पालन केले?

१० आपल्या सेवाकार्याच्या दुसऱ्‍या पैलूविषयी, अर्थात आपल्या संदेशाविषयी काय? आपण कशाविषयी प्रचार करतो? आपण जो संदेश घोषित करतो त्याविषयी संदेष्टा यशयाने हे सुरेख वर्णन केले: “जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करितो, शुभवृत्त विदित करितो, तारण जाहीर करितो, ‘तुझा देव राज्य करीत आहे,’ असे सीयोनास म्हणतो, त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात.”—यशया ५२:७.

११ या वचनात, “तुझा देव राज्य करीत आहे,” हा मुख्य वाक्यांश आपल्याला आठवण करून देतो की आपण खासकरून देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित केली पाहिजे. (मार्क १३:१०) तसेच, या वचनात आपला संदेश मुळात सकारात्मक आहे हे देखील प्रकट होते. यशया “तारण,” “सुवार्ता,” ‘शांती’ व “शुभवृत्त” यांसारखे शब्द वापरतो. यशयाच्या कित्येक शतकांनंतर सा.यु. पहिल्या शतकात येशू ख्रिस्ताने अतिशय उल्लेखनीय रितीने ही भविष्यवाणी पूर्ण केली. त्याने देवाच्या येणाऱ्‍या राज्याचे शुभवृत्त आवेशाने घोषित करून आपल्याकरता आदर्श पुरवला. (लूक ४:४३) आधुनिक काळात, विशेषतः १९१९ पासून यहोवाच्या साक्षीदारांनी देवाच्या स्थापित राज्याची व त्याकरवी येणाऱ्‍या आशीर्वादांची सुवार्ता आवेशाने घोषित करण्याद्वारे येशूच्या आदर्शाचे पालन केले आहे.

१२. राज्याची सुवार्ता स्वीकारणाऱ्‍यांवर त्याचा काय परिणाम होतो?

१२ राज्याच्या सुवार्तेबद्दल आस्था दाखवणाऱ्‍यांवर त्याचा काय परिणाम होतो? येशूच्या काळाप्रमाणेच आजही सुवार्तेमुळे लोकांना आशा व सांत्वन मिळते. (रोमकर १२:१२; १५:४) प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना या सुवार्तेमुळे आशा मिळते कारण भविष्यात चांगली परिस्थिती येईल असा विश्‍वास बाळगण्याकरता त्यांना ठोस कारणे मिळतात. (मत्तय ६:९, १०; २ पेत्र ३:१३) या आशेमुळे देवाचे भय मानणाऱ्‍यांना सकारात्मक मनोवृत्ती बाळगण्यास मदत मिळते. स्तोत्रकर्ता म्हणतो त्यानुसार, ते ‘वाईट बातमीला भिणार नाहीत.’—स्तोत्र ११२:१,.

“भग्न हृदयी जनास पट्टी” बांधणारा संदेश

१३. सुवार्तेचा स्वीकार करणाऱ्‍यांना लगेच मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दल संदेष्टा यशया कशाप्रकारे वर्णन करतो?

१३ शिवाय, आपण जी सुवार्ता घोषित करतो ती ऐकणाऱ्‍यांना लगेच सांत्वन व आशीर्वाद मिळतात. कशाप्रकारे? काही आशीर्वादांबद्दल संदेष्टा यशया याने सांगितले: “प्रभु परमेश्‍वराचा आत्मा मजवर आला आहे; कारण दीनांस शुभवृत्त सांगण्यास परमेश्‍वराने मला अभिषेक केला आहे; भग्न हृदयी जनांस पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांस मुक्‍तता, व बंदिवानांस बंधमोचन विदित करावे; परमेश्‍वराच्या प्रसादाचे वर्ष, व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा; सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे . . . म्हणून त्याने मला पाठविले आहे.”—यशया ६१:१-३; लूक ४:१६-२१.

१४. (क) ‘भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी’ या वाक्यांशावरून राज्याच्या संदेशाविषयी काय सूचित होते? (ख) भग्नहृदयी व्यक्‍तींबद्दल यहोवाला वाटणारी काळजी आपण कशी व्यक्‍त करतो?

१४ या भविष्यवाणीनुसार, सुवार्तेची घोषणा करण्याद्वारे येशू जणू ‘भग्न हृदयी जनांस पट्टी बांधणार’ होता. यशयाने किती बोलके शब्दचित्र उभे केले! या वर्णनावरून, एखाद्या जखमी व्यक्‍तीला प्रेमळपणे पट्टी बांधणाऱ्‍या किंवा दुखापत झालेल्या भागाला आधार देण्याकरता तो भाग घट्ट बांधणाऱ्‍या परिचारिकेचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्याचप्रकारे, राज्याचा संदेश घोषित करताना प्रेमळ प्रचारक आस्था दाखवणाऱ्‍या सर्व व्यक्‍तींना जणू आधार देतात कारण कोणत्या न कोणत्या प्रकारे ते सर्व दुःखी असतात. आणि अशा गरजू लोकांना आधार देण्याद्वारे ते यहोवाला वाटणारी काळजी व्यक्‍त करतात. (यहेज्केल ३४:१५, १६) स्तोत्रकर्त्याने देवाविषयी म्हटले: “भग्नहृदयी जनांना तो बरे करितो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधितो.”—स्तोत्र १४७:३.

राज्याचा संदेश कशाप्रकारे सांत्वन देतो?

१५, १६. राज्याचा संदेश ज्यांना गरज आहे त्यांना आधार व सांत्वन देते हे कोणत्या खऱ्‍या उदाहरणांवरून दिसून येते?

१५ राज्याचा संदेश भग्नहृदयी व्यक्‍तींना खरोखरच आधार व सांत्वन देतो हे कित्येक उदाहरणांवरून दिसून येते. ओरियाना नावाच्या एका वृद्ध स्त्रीचे उदाहरण पाहा. दक्षिण अमेरिकेत राहणाऱ्‍या या स्त्रीच्या मनात जगण्याची इच्छाच उरली नव्हती. एक साक्षीदार बहीण ओरियानाला नियमित भेटायला जाऊ लागली. ती तिला बायबल आणि बायबल कथांचं माझं पुस्तक यातून वाचून दाखवी. * सुरुवातीला ही खिन्‍न स्त्री पलंगावर झोपूनच, डोळे बंद करून ऐकायची व अधून मधून सुस्कारे टाकायची. पण काही दिवसांतच, ती उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली. आणखी काही काळानंतर, ती बैठक खोलीत, खुर्चीवर बसून आपल्या बायबल शिक्षिकेची वाटत पाहू लागली. यानंतर ही स्त्री राज्य सभागृहात ख्रिस्ती सभांना येऊ लागली. या सभांमध्ये शिकलेल्या गोष्टींमुळे तिला इतके प्रोत्साहन मिळाले की ती आपल्या घरासमोरून येणाऱ्‍या जाणाऱ्‍यांना बायबलचे साहित्य देऊ लागली. मग ९३ वर्षांच्या वयात, ओरियानाचा बाप्तिस्मा झाला व ती एक यहोवाची साक्षीदार बनली. राज्याच्या संदेशाने तिला जगण्याची नवी उमेद दिली आहे.—नीतिसूत्रे १५:३०; १६:२४.

१६ राज्याचा संदेश अशा व्यक्‍तींनाही आधार देतो की ज्यांना आजारपणामुळे लवकरच आपल्याला मृत्यू येणार आहे हे माहीत असते. पश्‍चिम युरोपातील मारियाचे उदाहरण घ्या. तिला एक मुदतीचा आजार झाला होता आणि तिच्याजवळ कोणतीही आशा नव्हती. यहोवाचे साक्षीदार तिला भेटायला आले तेव्हा ती अतिशय खिन्‍न होती. पण जेव्हा तिला देवाच्या उद्देशांबद्दल समजले तेव्हा तिचे जीवन पुन्हा एकदा अर्थपूर्ण बनले. तिचा बाप्तिस्मा झाला आणि ती अतिशय आवेशाने प्रचार कार्यात सामील होऊ लागली. तिच्या जीवनाच्या शेवटल्या दोन वर्षांत तिच्या डोळ्यांत उमेद व आनंद झळकत होता. पुनरुत्थानाची दृढ आशा बाळगून मारिया मृत्यूला सामोरी गेली.—रोमकर ८:३८, ३९.

१७. (क) राज्याच्या संदेशाचा स्वीकार करणाऱ्‍यांच्या जीवनावर त्याचा कसा प्रभाव पडतो? (ख) यहोवा “वाकलेल्या सर्वांना उभे करितो” हे तुम्ही वैयक्‍तिकरित्या कशाप्रकारे अनुभवले आहे?

१७ अशाप्रकारची वृत्ते दाखवतात की बायबल सत्य जाणून घेण्यास आसूसलेल्या लोकांच्या जीवनावर राज्याच्या संदेशाचा किती गहिरा प्रभाव पडतो. आपल्या प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूमुळे शोकाकूल झालेल्यांना पुनरुत्थानाच्या आशेबद्दल समजल्यावर त्यांना एक नवी ताकद मिळते. (१ थेस्सलनीकाकर ४:१३) गरिबीत राहणाऱ्‍यांना आणि आपल्या कुटुंबाला दोन वेळचे जेवण पुरवण्याकरता झटणाऱ्‍यांना जेव्हा कळते की ते यहोवाला निष्ठावान राहिल्यास तो त्यांना कधीही सोडणार नाही, तेव्हा त्यांना सन्मानाने जीवन जगण्याचे धैर्य मिळते. (स्तोत्र ३७:२८) यहोवाच्या मदतीने, खिन्‍न झालेल्या अनेकांना आपल्या या समस्येला तोंड देण्याची आणि कधीकधी तर या विकारातून पूर्णपणे बरे होण्याची ताकद मिळते. (स्तोत्र ४०:१, २) खरोखर, आपल्या वचनाद्वारे सामर्थ पुरवून यहोवा आजही “वाकलेल्या सर्वांना उभे करितो.” (स्तोत्र १४५:१४) आपल्या क्षेत्रातल्या व ख्रिस्ती मंडळीतल्या भग्नहृदयी व्यक्‍तींना राज्याची सुवार्ता कशाप्रकारे सांत्वन देते हे पाहिल्यावर आपल्याला वारंवार जाणीव होते की आपल्याजवळ आजच्या काळात उपलब्ध असलेली सर्वात उत्तम सुवार्ता आहे!—स्तोत्र ५१:१७.

“त्यांच्याविषयी माझी . . . देवाजवळ विनंती अशी आहे”

१८. यहुद्यांनी सुवार्तेचा स्वीकार केला नाही तेव्हा पौलावर याचा कसा परिणाम झाला व का?

१८ आपला संदेश हा सगळ्यात उत्तम सुवार्ता असूनही बरेचजण तो स्वीकारत नाहीत. याचा आपल्यावर कसा परिणाम होऊ शकतो? प्रेषित पौलावर झाला तसाच परिणाम आपल्यावरही होऊ शकतो. त्याने अनेकदा यहुद्यांना प्रचार केला पण त्यांच्यापैकी बहुतेकांनी तारणाचा संदेश नाकारला. याचा पौलाच्या मनावर खूप परिणाम झाला. त्याने कबूल केले: “मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना आहेत.” (रोमकर ९:२) पौलाला त्या यहुद्यांबद्दल कळकळ होती. त्यांनी सुवार्ता नाकारली तेव्हा त्याला दुःख झाले.

१९. (क) कधीकधी आपण निराश होतो हे समजण्याजोगे का आहे? (ख) पौलाला प्रचार कार्य अखंड करत राहण्यास कशामुळे मदत मिळाली?

१९ आपणही लोकांबद्दल कळकळ वाटत असल्यामुळेच प्रचार करतो. तेव्हा, बरेच लोक राज्याचा संदेश नाकारतात तेव्हा आपण निराश होतो, व हे समजण्याजोगे आहे. आपल्याला वाईट वाटते यावरूनच दिसून येते की आपण ज्यांना प्रचार करतो त्या लोकांच्या आध्यात्मिक हिताची आपल्याला मनस्वी काळजी वाटते. पण आपण प्रेषित पौलाचे उदाहरण लक्षात ठेवले पाहिजे. त्याला आपले प्रचार कार्य अखंड करत राहण्यास कशामुळे मदत मिळाली? यहुद्यांनी सुवार्तेचा अव्हेर केल्यामुळे पौलाला वाईट वाटले, दुःख झाले तरीसुद्धा त्याने सगळ्याच यहुद्यांबद्दल आशा सोडून दिली नाही; त्यांना मदत करणे शक्यच नाही असा विचार त्याने केला नाही. तर त्याने आशा बाळगली की काहीजण भविष्यात ख्रिस्ताचा स्वीकार करतील. अशा यहुदी व्यक्‍तींबद्दल आपल्या भावना व्यक्‍त करताना पौलाने म्हटले: “त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की, त्यांचे तारण व्हावे.”—रोमकर १०:१.

२०, २१. (क) आपल्या सेवाकार्यासंबंधाने आपण पौलाच्या उदाहरणाचे कसे अनुकरण करू शकतो? (ख) आपल्या सेवाकार्याच्या कोणत्या पैलूविषयी पुढील लेखात आपण चर्चा करू?

२० पौलाने उल्लेख केलेल्या दोन गोष्टींकडे लक्ष द्या. काही व्यक्‍तींना तारण मिळावे अशी त्याला मनापासून इच्छा होती आणि त्याने याविषयी देवाला प्रार्थनाही केली. आज आपण पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण करतो. अजूनही, सुवार्तेबद्दल योग्य मनोवृत्ती बाळगणाऱ्‍या व्यक्‍तींना शोधण्याची आपण मनापासून इच्छा बाळगतो. आपण यहोवाला प्रार्थना करत राहतो की आपल्याला या व्यक्‍ती सापडाव्यात जेणेकरून आपण त्यांना तारणाकडे नेणाऱ्‍या मार्गाचे अनुसरण करण्यास मदत करू शकू.—नीतिसूत्रे ११:३०; यहेज्केल ३३:११; योहान ६:४४.

२१ पण जास्तीजास्त लोकांपर्यंत राज्य संदेश पोचवण्याकरता आपण का आणि कशाविषयी प्रचार करतो याकडेच नव्हे, तर आपण कशाप्रकारे प्रचार करतो याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. याविषयी पुढील लेखात चर्चा करू. (w०५ ७/१)

[तळटीपा]

^ परि. 4 या लेखात पहिल्या दोन पैलूंचा आपण विचार करू. दुसऱ्‍या लेखात तिसऱ्‍या पैलूचा विचार करू.

^ परि. 15 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

तुम्हाला काय शिकायला मिळाले?

• आपण कोणकोणत्या कारणांमुळे सेवाकार्यात सहभागी होतो?

• आपण मुख्यतः कोणता संदेश घोषित करतो?

• राज्याच्या संदेशाचा स्वीकार करणाऱ्‍यांना कोणते आशीर्वाद मिळतात?

• आपल्याला सेवाकार्य अखंड करत राहण्यास कोणती गोष्ट मदत करेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]