व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्व राष्ट्रांच्या लोकांकरता सुवार्ता

सर्व राष्ट्रांच्या लोकांकरता सुवार्ता

सर्व राष्ट्रांच्या लोकांकरता सुवार्ता

“पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”प्रेषितांची कृत्ये १:८.

१. बायबलचे शिक्षक या नात्याने आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष देतो आणि का?

निपुण शिक्षक, आपल्या विद्यार्थ्यांना आपण काय सांगतो याकडेच नाही, तर ते कशा पद्धतीने सांगतो याकडेही लक्ष देतात. बायबलमधील सत्याचे शिक्षक या नात्याने आपणही असेच करतो. आपण केवळ आपल्या संदेशाकडेच नव्हे तर तो संदेश सादर करण्याच्या पद्धतींकडे लक्ष देतो. आपला संदेश, अर्थात देवाच्या राज्याची सुवार्ता बदलत नाही पण सांगण्याच्या पद्धतीत मात्र आपण गरजेनुसार फेरबदल करतो. का? कारण आपण जास्तीत जास्त लोकांना हा संदेश देऊ इच्छितो.

२. आपण प्रचाराच्या पद्धतीत फेरबदल करतो तेव्हा कोणाचे अनुकरण करतो?

प्रचाराच्या पद्धतींत आवश्‍यक फेरबदल करताना, खरे तर आपण पुरातन काळातल्या देवाच्या सेवकांचे अनुकरण करत असतो. प्रेषित पौलाचे उदाहरण पाहा. त्याने म्हटले: “यहूदी लोक मिळविण्यासाठी मी यहूदी लोकांना यहूद्यांसारखा झालो; . . . जे नियमशास्त्रविरहित आहेत त्यांना मिळविण्यासाठी, म्हणजे नियमशास्त्र नाही अशांना मी नियमशास्त्रविरहित असा झालो. . . . दुर्बळांना मिळविण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे.” (१ करिंथकर ९:१९-२३) पौलाने प्रत्येक व्यक्‍तीच्या परिस्थितीनुसार आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल केल्यामुळे त्याचे शिक्षण परिणामकारक ठरले. आपणही ज्या व्यक्‍तीशी बोलत आहोत तिची परिस्थिती विचारात घेऊन सुवार्ता सादर करण्याच्या आपल्या पद्धतीत फेरबदल केल्यास परिणामकारक ठरू.

‘पृथ्वीच्या सीमेपर्यंत’

३. (क) प्रचार कार्यासंबंधी आपल्यासमोर कोणते आव्हान आहे? (ख) यशया ४५:२२ यातील शब्द आज कशाप्रकारे पूर्ण होत आहेत?

सुवार्तेचा प्रचार करणाऱ्‍यांसमोर असलेले एक मोठे आव्हान म्हणजे त्यांना एका अतिशय विस्तृत क्षेत्रात, अर्थात “सर्व जगात” सुवार्ता गाजवायची आहे. (मत्तय २४:१४) मागच्या शतकात यहोवाच्या अनेक सेवकांनी नवनव्या राष्ट्रांत सुवार्तेचा प्रसार करण्याकरता बरेच परिश्रम घेतले. याचा काय परिणाम झाला? सबंध जगात कार्याचा आश्‍चर्यकारक विस्तार झाला. २० व्या शतकाच्या सुरुवातीला प्रचाराचे कार्य केवळ काही देशांतच केले जात असल्याचा अहवाल होता पण सध्या यहोवाचे साक्षीदार २३५ देशांत कार्य करत आहेत! खरोखर राज्याची सुवार्ता ‘पृथ्वीच्या सीमेपर्यंत’ गाजवली जात आहे.—यशया ४५:२२.

४, ५. (क) सुवार्तेच्या प्रचारात कोणी महत्त्वाचे योगदान केले आहे? (ख) परदेशातून येऊन आपल्या शाखेच्या क्षेत्रात सेवा करणाऱ्‍यांविषयी काही शाखा दफ्तरांनी काय म्हटले?

ही प्रगती कशामुळे घडून आली? यामागे बरीच कारणे आहेत. वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला यात प्रशिक्षण मिळालेले मिशनरी आणि अलीकडच्या काळात सेवा प्रशिक्षण प्रशालेच्या २०,००० पेक्षा अधिक पदवीधरांनी यात बरेच योगदान दिले आहे. तसेच अनेक साक्षीदार स्वखर्चाने राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या देशांत स्थाईक झाले आहेत व त्यांचेही योगदान महत्त्वाचे आहे. अशा आत्मत्यागी वृत्तीचे ख्रिस्ती, ज्यांत स्त्रिया व पुरुष, तरुण व वृद्ध, अविवाहित व विवाहित सर्व सामील आहेत, त्यांनी राज्याचा संदेश सबंध पृथ्वीवर घोषित करण्यात मोलाचा हातभार लावला आहे. (स्तोत्र ११०:३; रोमकर १०:१८) त्यांनी केलेले कार्य खरोखर प्रशंसास्पद आहे. काही शाखा दफ्तरांनी त्यांच्या शाखेच्या क्षेत्रांतील अधिक गरज असलेल्या भागांत सेवा करण्यासाठी परदेशातून येऊन स्थाईक झालेल्या बांधवांबद्दल काय लिहिले हे पाहा.

“हे प्रिय साक्षीदार बांधव दूरदूरच्या एकाकी क्षेत्रांत प्रचार करण्यात पुढाकार घेतात, नव्या मंडळ्या स्थापन करण्यास मदत करतात आणि स्थानिक बंधू भगिनींच्या आध्यात्मिक उन्‍नतीला हातभार लावतात.” (एक्वाडोर) “येथे सेवा करणारे शेकडो परदेशी बांधव कधी आम्हाला सोडून गेले तर आमच्या मंडळ्या अक्षरशः डळमळतील. हे बांधव म्हणजे आम्हाला मिळालेला आशीर्वाद आहेत.” (डॉमिनिकन प्रजासत्ताक) “आमच्या बऱ्‍याच मंडळ्यांत बहिणींची मोठी संख्या आहे; काही मंडळ्यांत ७० टक्के बहिणी आहेत. (स्तोत्र ६८:११) यांपैकी बऱ्‍याच बहिणी सत्यात नवीन आहेत पण इतर देशांहून आलेल्या पायनियर बहिणी या नव्या बहिणींना मोलाची मदत पुरवतात. परदेशाहून आलेल्या या बहिणी आमच्याकरता एक आशीर्वाद आहेत!” (पूर्व युरोपातील एक देश) तुम्ही कधी दुसऱ्‍या देशात जाऊन सेवा करण्याविषयी विचार केला आहे का? *प्रेषितांची कृत्ये १६:९, १०.

“सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांपैकी”

६. जखऱ्‍या ८:२३ यात प्रचाराच्या कार्यातील भाषेसंबंधी आव्हानास कशाप्रकारे सूचित करण्यात आले?

आणखी एक मोठे आव्हान म्हणजे पृथ्वीवर बोलल्या जाणाऱ्‍या निरनिराळ्या भाषा. देवाच्या वचनात असे भाकीत करण्यात आले होते: “त्या दिवसांत सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.” (जखऱ्‍या ८:२३) या भविष्यवाणीच्या आधुनिक काळातील पूर्णतेत दहा जण मोठ्या लोकसमुदायाला सूचित करतात ज्यांच्याविषयी प्रकटीकरण ७:९ यात भाकीत करण्यात आले आहे. पण जखऱ्‍याच्या भविष्यवाणीत हे “दहा जण” केवळ सर्व राष्ट्रांतूनच नव्हे तर “सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांपैकी” येतील असे म्हटले आहे. या भविष्यवाणीच्या या विशिष्ट पैलूची पूर्णता आपल्याला पाहायला मिळाली आहे का? निश्‍चितच.

७. “सर्व भाषा बोलणाऱ्‍या राष्ट्रांपैकी” असलेल्या लोकांपर्यंत सुवार्ता पोचवली जात आहे हे कोणत्या आकड्यांवरून दिसून येते?

काही आकड्यांकडे लक्ष द्या. पन्‍नास वर्षांआधी आपले साहित्य ९० भाषांतून निघत होते. आज ही संख्या ४०० पेक्षा जास्त झाली आहे. जी भाषा फार थोडे लोक बोलतात अशाही काही भाषांत साहित्य पुरवण्याकरता ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ कोणती कसूर राहू दिलेली नाही. (मत्तय २४:४५) उदाहरणार्थ बायबलचे साहित्य आता ग्रीनलँडिक (४७,००० लोकसंख्येच्या), पलाऊअन (१५,००० लोकसंख्येच्या), व यापीझ (७,००० पेक्षा कमी लोकसंख्येच्या) भाषेतही उपलब्ध आहे.

नव्या संधी मिळवून देणारे ‘मोठे द्वार’

८, ९. कोणत्या परिस्थितीमुळे आपल्याकरता एक ‘मोठे द्वार’ उघडले आहे आणि हजारो साक्षीदारांनी या परिस्थितीला कशाप्रकारे प्रतिसाद दिला आहे?

पण आजकाल सर्व भाषा बोलणाऱ्‍या लोकांना सुवार्ता सांगण्याकरता आपल्याला परदेशी जाण्याची गरज नाही. अलीकडील वर्षांत, आर्थिकदृष्ट्या विकसित देशांत कोट्यवधी स्थलांतरित लोक व निर्वासित आले आहेत आणि यामुळे अनेक भाषा बोलणाऱ्‍या कित्येक स्थलांतरित लोकांच्या वसत्या तयार झाल्या आहेत. उदाहरणार्थ, फ्रांसमधील पॅरिस शहरात जवळजवळ १०० वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. कॅनडातील टोरोन्टो शहरात ही संख्या १२५, तर इंग्लंडच्या लंडन शहरात ३०० पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात! बऱ्‍याच मंडळ्यांच्या क्षेत्रांत इतर देशांतून आलेल्या लोकांमुळे सर्व राष्ट्रांच्या लोकांना सुवार्ता सांगण्याच्या नवीन संधी उपलब्ध करू देणारे जणू एक ‘मोठे द्वार’ उघडले आहे.—१ करिंथकर १६:९.

हे आव्हान पेलण्याकरता हजारो साक्षीदार नवी भाषा शिकून घेत आहेत. त्यांच्यापैकी बऱ्‍याच जणांना हे तितके सोपे जात नाही; पण स्थलांतरित व निर्वासित लोकांना देवाच्या वचनातील सत्य समजून घेण्यास मदत करताना जो आनंद मिळतो त्यामुळे त्यांचा हा संघर्ष सार्थक ठरतो. अलीकडेच, एका वर्षी पश्‍चिम युरोपातील एका देशात प्रांतीय अधिवेशनांत बाप्तिस्मा घेतलेल्या एकूण व्यक्‍तींपैकी ४० टक्के दुसऱ्‍या देशाच्या होत्या.

१०. सर्व राष्ट्रांतील लोकांसाठी सुवार्ता या पुस्तिकेचा तुम्ही वापर कसा केला? (“सर्व राष्ट्रांतील लोकांसाठी सुवार्ता या पुस्तिकेची वैशिष्ट्ये” हा पृष्ठ २७ वरील चौकोन पाहा.)

१० अर्थात आपल्यापैकी बहुतेकजण कदाचित नवी भाषा शिकू शकणार नाही. पण तरीसुद्धा, अलीकडेच प्रकाशित झालेली पुस्तिका, सर्व राष्ट्रांतील लोकांसाठी सुवार्ता * हिचा उपयोग करून आपणही स्थलांतरित लोकांना मदत करू शकतो. या पुस्तिकेत, अनेक वेगवेगळ्या भाषांत बायबलचा संदेश अतिशय सुरेख पद्धतीने मांडला आहे. (योहान ४:३७) तुम्ही या पुस्तिकेचा साक्षकार्यात वापर करत आहात का?

लोक प्रतिसाद देत नाहीत तेव्हा

११. काही क्षेत्रांत आणखी कोणत्या आव्हानाला तोंड द्यावे लागते?

११ सैतानाचा या पृथ्वीवरील प्रभाव वाढत चालल्यामुळे आणखी एका आव्हानाला आता पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात तोंड द्यावे लागते. हे आव्हान म्हणजे काही क्षेत्रांत फार कमी प्रतिसाद मिळतो. अर्थात ही परिस्थिती पाहून आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही कारण येशूने याविषयी पूर्वीच भाकीत केले होते. आपल्या काळाविषयी त्याने असे सांगितले: “पुष्कळांची प्रीति थंडावेल.” (मत्तय २४:१२) खरोखर, बहुतेक लोकांना आज देवावर विश्‍वास नाही व बायबलविषयी त्यांना आदर वाटत नाही. (२ पेत्र ३:३, ४) त्यामुळे जगाच्या काही भागांत फार कमी लोक ख्रिस्ताचे नवे शिष्य बनत आहेत. पण अशा क्षेत्रांत विश्‍वासूपणे प्रचार करणाऱ्‍या आपल्या प्रिय ख्रिस्ती बंधूभगिनींचे परिश्रम व्यर्थ आहेत असा याचा अर्थ होत नाही. (इब्री लोकांस ६:१०) का नाही? पुढील माहिती विचारात घ्या.

१२. आपल्या प्रचार कार्याचे कोणते दोन उद्देश आहेत?

१२ मत्तयाच्या शुभवर्तमानात आपल्या प्रचार कार्याच्या दोन मुख्य उद्देशांचा उल्लेख करण्यात आला आहे. एक तर आपण ‘सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य बनवतो.’ (मत्तय २८:१९) दुसरे कारण म्हणजे राज्याचा संदेश सांगितल्यामुळे लोकांना ‘साक्ष’ दिली जाते. (मत्तय २४:१४) हे दोन्ही उद्देश महत्त्वाचे आहेत पण दुसरा उद्देश अतिशय अर्थपूर्ण आहे. का?

१३, १४. (क) ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या चिन्हापैकी एक महत्त्वाचे चिन्ह कोणते? (ख) जेथे फारसा प्रतिसाद मिळत नाही अशा क्षेत्रात कार्य करताना आपण कोणती गोष्ट आठवणीत ठेवावी?

१३ बायबल लेखक मत्तय याने प्रेषितांनी येशूला विचारलेला प्रश्‍न आपल्या शुभवर्तमानात लिहून ठेवला: “आपल्या येण्याचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” (मत्तय २४:३) या प्रश्‍नाचे उत्तर देताना येशूने म्हटले की या चिन्हापैकी एक उल्लेखनीय चिन्ह, जगव्याप्त प्रचार कार्य हे असेल. तो शिष्य बनवण्याविषयी बोलत होता का? नाही. त्याने म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) तर येशूने हे स्पष्ट केले की राज्याच्या प्रचाराचे कार्य हेच त्या चिन्हापैकी एक महत्त्वाचे चिन्ह असेल.

१४ त्यामुळे, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत असताना, आपण हे आठवणीत ठेवावे की शिष्य बनवण्यात आपल्याला नेहमीच यश आले नाही तरीसुद्धा आपण ‘साक्ष’ देण्यात सफल होतोच. लोकांनी कसाही प्रतिसाद दिला तरीसुद्धा, त्यांना आपण काय करत आहोत हे निदान कळते, आणि अशारितीने येशूच्या भविष्यवाणीची पूर्णता करण्यात आपण सहभाग घेतो. (यशया ५२:७; प्रकटीकरण १४:६, ७) पश्‍चिम युरोपातील एक तरुण साक्षीदार जॉर्डी याने म्हटले: “मत्तय २४:१४ च्या पूर्णतेत सहभाग घेण्याकरता यहोवा माझा उपयोग करत आहे हे जाणून मला फार आनंद होतो.” (२ करिंथकर २:१५-१७) तुम्हालाही असेच वाटत असेल यात शंका नाही.

आपल्या संदेशाला विरोध झाल्यास

१५. (क) येशूने आपल्या अनुयायांना कशाविषयी आधीच खबरदार केले? (ख) विरोध होत असूनही प्रचार करत राहण्यास कोणती गोष्ट आपले साहाय्य करते?

१५ प्रतिकूल परिस्थितीमुळे राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याच्या मार्गात आणखी एक आव्हान उभे राहते. येशूने आपल्या अनुयायांना आधीच याविषयी खबरदार केले होते: “माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील.” (मत्तय २४:९) आरंभीच्या ख्रिश्‍चनांप्रमाणेच आजच्या काळातही येशूच्या अनुयायांचा द्वेष, विरोध व छळ करण्यात आला आहे. (प्रेषितांची कृत्ये ५:१७, १८, ४०; २ तीमथ्य ३:१२; प्रकटीकरण १२:१२, १७) काही देशांत सध्या त्यांच्यावर सरकारी प्रतिबंध लादले जात आहेत. तरीपण देवाच्या आज्ञेचे पालन करून या देशांतील खरे ख्रिस्ती राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत राहतात. (आमोस ३:८; प्रेषितांची कृत्ये ५:२९; १ पेत्र २:२१) त्यांना व जगभरातील इतर साक्षीदारांनाही असे करत राहण्यास कशामुळे साहाय्य मिळते? यहोवा त्यांना आपल्या पवित्र आत्म्याकरवी सामर्थ्य देतो.—जखऱ्‍या ४:६; इफिसकर ३:१६; २ तीमथ्य ४:१७.

१६. येशूने प्रचार कार्य व देवाचा आत्मा यांत संबंध असल्याचे कसे दाखवले?

१६ येशूने, देवाचा आत्मा आणि प्रचार कार्य यांतला जवळचा संबंध स्पष्ट केला. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले: “तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि . . . पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” (प्रेषितांची कृत्ये १:८; प्रकटीकरण २२:१७) या वचनातील घटनांचा क्रम लक्ष देण्याजोगा आहे. सर्वप्रथम शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला आणि मग त्यांनी जगव्याप्त साक्षकार्य हाती घेतले. केवळ देवाच्या आत्म्याच्या साहाय्यानेच ते ‘सर्व राष्ट्रांस साक्ष’ देण्याचे कार्य सातत्याने करू शकले. (मत्तय २४:१३, १४; यशया ६१:१, २) तेव्हा, येशने पवित्र आत्म्याला “कैवारी” म्हणजेच साहाय्यक म्हटले ते योग्यच होते. (योहान १५:२६) त्याने म्हटले की देवाचा आत्मा त्याच्या शिष्यांना शिकवेल व त्यांचे मार्गदर्शन करेल.—योहान १४:१६, २६; १६:१३.

१७. आपल्याला कडा विरोध सहन करावा लागतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला कशाप्रकारे साहाय्य करतो?

१७ सध्याच्या काळात सुवार्तेच्या प्रचाराला कडा विरोध केला जातो तेव्हा देवाचा आत्मा आपल्याला कोणकोणत्या मार्गांनी साहाय्य करतो? देवाचा आत्मा आपल्याला शक्‍ती देतो आणि जे आपला छळ करतात त्यांचा तो विरोध करतो. हे स्पष्ट करण्याकरता राजा शौलाच्या जीवनातील एका घटनेचा विचार करा.

देवाच्या आत्म्याशी सामना

१८. (क) शौलात कोणता आमुलाग्र बदल घडून आला? (ख) शौलाने दाविदाचा छळ करण्याकरता कोणकोणत्या मार्गांनी प्रयत्न केला?

१८ इस्राएलचा पहिला राजा या नात्याने शौलाने सुरुवात चांगली केली पण नंतर मात्र त्याने यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन केले. (१ शमुवेल १०:१, २४; ११:१४, १५; १५:१७-२३) परिणामस्वरूप, देवाच्या आत्म्याने शौल राजाला पाठिंबा देण्याचा थांबवले. शौल दाविदाचा द्वेष करू लागला आणि अगदी हिंसकपणे तो व्यक्‍तही करू लागला कारण दाविदाला पुढचा राजा म्हणून अभिषिक्‍त करण्यात आले होते आणि देवाचा आत्मा आता त्याच्या पाठीशी होता. (१ शमुवेल १६:१, १३, १४) दाविदाला आपण सहज नष्ट करू असे शौलाला वाटत होते. दाविदाजवळ फक्‍त एक वीणा होती, पण शौलाकडे मात्र भाला होता. त्यामुळे एके दिवशी दावीद वीणा वाजवत असताना, “शौलाने त्याला मारावयास भाला उगारिला; तो म्हणाला की भाला मारून दाविदाला भिंतीशी खिळावे; पण दावीद दोनदा त्याच्यासमोरून एकीकडे सरून बचावला.” (१ शमुवेल १८:१०, ११) नंतर मात्र शौलाने आपला पुत्र व दाविदाचा मित्र योनाथान याचे ऐकून अशी शपथ वाहिली: “परमेश्‍वराच्या जीविताची शपथ, [दाविदाला] जिवे मारावयाचे नाही.” पण पुन्हा “दाविदास भाल्याने भोसकून त्याला भिंतीला खिळावे असा शौलाने प्रयत्न केला पण तो शौलापुढून निसटून गेला व भाला भिंतीत घुसून राहिला.” दावीद तर निसटून गेला, पण शौलाने त्याचा पाठलाग केला. त्या निर्णायक घडीला देवाचा आत्मा शौलाचा विरोध करू लागला. तो कसा?—१ शमुवेल १९:६, १०.

१९. देवाच्या आत्म्याने कशाप्रकारे दाविदाचा बचाव केला?

१९ दावीद शमुवेल संदेष्ट्याकडे पळून गेला पण शौलाने दाविदाला धरून आणण्यासाठी आपल्या माणसांना पाठवले. ही माणसे दावीदाच्या लपण्याच्या ठिकाणी आली तेव्हा “देवाचा आत्मा त्यांच्या ठायी संचरला व तेहि [“संदेष्ट्यांसारखे,” NW] भाषण करू लागले.” देवाच्या आत्म्याने त्यांच्यावर इतका विलक्षण प्रभाव टाकला की आपण कशासाठी आलो होतो हेच ते विसरून गेले. आणखी दोन वेळा शौलाने दावीदाला आणण्यास आपल्या माणसांना पाठवले पण प्रत्येक वेळी तसेच घडले. शेवटी शौल राजा स्वतः दाविदाकडे गेला पण देवाच्या आत्म्यापुढे शौलाचेही काही चालले नाही. किंबहुना, पवित्र आत्म्याने शौलाला “अहोरात्र” अक्रियाशील केले आणि यामुळे दाविदाला पळून जाण्याकरता पुरेसा वेळ मिळाला.—१ शमुवेल १९:२०-२४.

२०. शौलाने दाविदाचा कशाप्रकारे छळ केला याविषयीच्या अहवालावरून आपल्याला काय शिकायला मिळते?

२० शौल व दावीद यांच्या या अहवालावरून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते आणि यामुळे आपल्याला बळ मिळते. ते म्हणजे: देवाचा आत्मा जेव्हा त्याच्या सेवकांचा छळ करणाऱ्‍यांचा विरोध करतो तेव्हा ते यशस्वी होऊ शकत नाहीत. (स्तोत्र ४६:११; १२५:२) दावीदाने इस्राएलवर राजा बनावे असा देवाचा उद्देश होता. कोणीही हा उद्देश बदलू शकत नव्हता. आपल्या काळात यहोवाने ठरवले आहे की ‘राज्याची सुवार्ता गाजवली जाईल.’ कोणीही हे घडण्यापासून रोकू शकत नाही.—प्रेषितांची कृत्ये ५:४०, ४२.

२१. (क) आजच्या काळातही काही विरोधक कशाप्रकारे वागतात? (ख) आपण कोणता विश्‍वास बाळगतो?

२१ काही धार्मिक व राजकीय अधिकारी आपल्या मार्गात अडथळा आणण्याकरता खोट्या माहितीचा किंवा हिंसाचाराचाही वापर करतात. पण ज्याप्रमाणे यहोवाने दाविदाचे आध्यात्मिकरित्या संरक्षण केले त्याचप्रमाणे तो आजही आपल्या लोकांचे संरक्षण करील. (मलाखी ३:६) त्यामुळे दाविदासारखे आपणही पूर्ण विश्‍वासाने म्हणू शकतो: “देवावर मी भरवसा ठेविला आहे. मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?” (स्तोत्र ५६:११; स्तोत्र १२१:१-८; रोमकर ८:३१) होय, सर्व राष्ट्रांच्या लोकांना राज्याची सुवार्ता सांगण्याच्या देवाने दिलेल्या आज्ञेचे पालन करत राहण्याचा आपला निर्धार आहे. असे करत असताना मार्गात येणाऱ्‍या सर्व आव्हानांना आपण यहोवाच्या मदतीनेच तोंड देत राहू. (w०५ ७/१)

[तळटीपा]

^ परि. 5 पृष्ठ २६ वरील “मनस्वी समाधान” असे शीर्षक असलेला चौकोन पाहा.

^ परि. 10 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

तुम्हाला आठवते का?

• आपल्या प्रचार करण्याच्या पद्धतीत आपण फेरबदल का करतो?

• नव्या संधी उपलब्ध करून देणारे कोणते ‘मोठे द्वार’ उघडले आहे?

• ज्या क्षेत्रात लोक जास्त प्रतिसाद देत नाहीत, तेथेही आपल्या प्रचार कार्याद्वारे काय साध्य केले जाते?

• विरोध करणारी कोणतीही व्यक्‍ती राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराचे कार्य का थांबवू शकत नाही?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२६ पानांवरील चौकट]

“मनस्वी समाधान”

“समाधानी व यहोवाची एकजूटपणे सेवा करताना अतिशय आनंदी.” हे वर्णन आहे स्पेनहून बोलिव्हियाला राहायला गेलेल्या एका कुटुंबाचे. या कुटुंबातला एक मुलगा बोलिव्हियात एका एकाकी गटाला साहाय्य करण्यास गेला होता. त्याला या सेवेत मिळणारा आनंद पाहून त्याचे आईवडील इतके प्रभावित झाले की शेवटी हे सबंध कुटुंब, ज्यात १४-२५ या वयोगटातील चार मुले आहेत, ते सर्वजण बोलिव्हियात सेवा करू लागले. यांपैकी आता तीन मुले पायनियर सेवा करत आहेत आणि ज्या मुलाने सर्वांना प्रेरित केले तो अलीकडेच सेवा प्रशिक्षण प्रशालेला उपस्थित राहिला.

पूर्व युरोपात सेवा करणारी कॅनडाची ३० वर्षीय ॲन्जेलिका म्हणते, “बऱ्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागते. पण स्थानिक साक्षीदार त्यांना येऊन मदत केल्याबद्दल वारंवार आभार मानतात तेव्हा मला खूप आनंद वाटतो.

तिशीच्या जवळपास असलेल्या संयुक्‍त संस्थानांतून डोमिनिकन प्रजासत्ताक येथे सेवा करण्यास आलेल्या दोन सख्ख्या बहिणी म्हणतात: इथले अनेक रितीरिवाज आमच्याकरता नवे होते. पण आम्ही आपल्या नेमलेल्या क्षेत्रात टिकून राहिलो आणि आता आमचे सात बायबल विद्यार्थी सभांना येऊ लागले आहेत.” या दोन बहिणींच्या प्रयत्नांमुळे, जेथे मंडळी नव्हती अशा एका गावात राज्य प्रचारकांचा गट स्थापन करण्यात आला आहे.

तिशीच्या आसपास असणारी लॉरा चार वर्षांपासून परदेशी सेवा करत आहे. ती म्हणते: “मी मुद्दामहूनच माझी जीवनशैली अगदी साधी ठेवलीय. यामुळे प्रचारकांना दिसून येते की साधी राहणी नेहमीच गरिबीमुळे नसते तर विचारशील व्यक्‍ती अशी निवड स्वतःहून करू शकतात. इतरांना, विशेषतः तरुणांना मदत केल्याने मला इतका आनंद मिळतो, की त्यामुळे परदेशातील क्षेत्रात सेवा करताना येणाऱ्‍या अडचणींकडे दुर्लक्ष करण्यास मला मदत मिळाली आहे. मी इतर कोणत्याही ध्येयासाठी माझी ही सेवा थांबवणार नाही आणि यहोवा मला इथं राहू देईल तोपर्यंत मी इथंच राहीन.”

[२७ पानांवरील चौकट/चित्र]

सर्व राष्ट्रांतील लोकांसाठी सुवार्ता या पुस्तिकेची वैशिष्ट्ये

सर्व राष्ट्रांतील लोकांसाठी सुवार्ता या पुस्तिकेच्या काही देशांत प्रकाशित केलेल्या आवृत्तींत एकूण ९२ वेगवेगळ्या भाषांत एक पानाचा संदेश आहे. हा संदेश वाचणाऱ्‍या व्यक्‍तीला उद्देशून लिहिलेला आहे. त्यामुळे घरमालक तो संदेश वाचतो तेव्हा जणू तुम्ही त्याच्याशी बोलत असता.

आपल्याला एखाद्या व्यक्‍तीची भाषा समजत नाही तेव्हा त्या व्यक्‍तीला आपण कशाप्रकारे परिणामकारकरित्या मदत करू शकतो याविषयी या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत बऱ्‍याच सूचना दिल्या आहेत. कृपया या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचे काळजीपूर्वक पालन करा.

अनुक्रमणिकेत केवळ भाषांची यादीच नव्हे तर त्या त्या भाषेच्या चिन्हांचीही यादी दिली आहे. यामुळे तुम्हाला आपल्या पत्रिकांवर व इतर प्रकाशनांत वेगवेगळ्या भाषेची चिन्हे अचूकपणे ओळखण्यास साहाय्य मिळेल.

[चित्र]

तुम्ही या पुस्तिकेचा सेवाकार्यात उपयोग करत आहात का?