व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“आपली प्रतीति पाहा”

“आपली प्रतीति पाहा”

“आपली प्रतीति पाहा”

“तुम्ही विश्‍वासात आहा किंवा नाही ह्‍याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीति पाहा.”२ करिंथकर १३:५.

१, २. (क) आपल्या विश्‍वासांसंबंधी अनिश्‍चितता निर्माण झाल्यास आपल्यावर कसा प्रभाव पडू शकतो? (ख) कोणत्या परिस्थितीमुळे, पहिल्या शतकातल्या करिंथ शहरात काहीजणांच्या मनात अनिश्‍चितता निर्माण झाली असावी?

शहराबाहेरच्या परिसरात प्रवास करणारा एकजण अशा ठिकाणी येऊन पोचतो, जेथे रस्त्याला दोन फाटे फुटले आहेत. आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे, तेथे जाण्याकरता यांपैकी कोणता रस्ता घ्यावा हे माहीत नसल्यामुळे तो एकादोघांना विचारतो. पण त्यांची उत्तरे ऐकून तो अधिकच बुचकळ्यात पडतो. यामुळे, तो पुढे जाऊच शकत नाही. आपल्या विश्‍वासांबद्दल जर आपल्या मनात शंका असतील तर आपलीही हीच गत होऊ शकते. अशा अनिश्‍चितपणामुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यामुळे कोणत्या मार्गाने जावे हे आपण ठरवू शकत नाही.

पहिल्या शतकात ग्रीसमध्ये करिंथ शहरातल्या ख्रिस्ती मंडळीत काही जणांवर अशाचप्रकारचा प्रभाव पडण्याचा धोका निर्माण झाला होता. काही ‘अतिश्रेष्ठ प्रेषित’ पौलाच्या अधिकाराविषयी शंका घेऊ लागले होते. ते म्हणत होते: “त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत; परंतु त्याची शरीरयष्टी दुर्बळ व त्याचे भाषण टाकाऊ आहे.” (२ करिंथकर १०:७-१२; ११:५, ६) अशा दृष्टिकोनामुळे, करिंथ मंडळीतल्या काहीजणांच्या मनात अनिश्‍चितता निर्माण झाली असावी.

३, ४. करिंथकरांना पौलाने दिलेल्या सल्ल्याविषयी आपण उत्सुकता का बाळगावी?

पौलाने सा.यु. ५० साली करिंथला भेट दिली तेव्हा त्याने तेथील मंडळी सुरू केली. तो करिंथ येथे “देवाचे वचन शिकवीत दीड वर्ष राहिला.” परिणामस्वरूप, “पुष्कळ करिंथकरांनी विश्‍वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला.” (प्रेषितांची कृत्ये १८:५-११) पौलाला करिंथ येथील आपल्या सहविश्‍वासू बांधवांच्या आध्यात्मिक आरोग्याची मनापासून काळजी होती. शिवाय, करिंथकरांनी पौलाला पत्राद्वारे काही विशिष्ट गोष्टींबद्दल सल्ला मागितला होता. (१ करिंथकर ७:१) त्यामुळे, त्याने त्यांना काही उत्तम सूचना दिल्या.

पौलाने लिहिले: “तुम्ही विश्‍वासात आहां किंवा नाही ह्‍याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीति पाहा.” (२ करिंथकर १३:५) या सल्ल्याचे पालन केल्यामुळे करिंथचे बांधव, कोणत्या मार्गाने चालावे यासंबंधीच्या अनिश्‍चिततेपासून स्वतःचा बचाव करू शकत होते. आज पौलाच्या सल्ल्याचे पालन केल्याने आपल्यालाही हाच फायदा होऊ शकतो. पण आपण पौलाच्या सल्ल्याचे पालन कसे करू शकतो? आपण विश्‍वासात आहो किंवा नाही याची परीक्षा आपण कशी करू शकतो? आणि आपली प्रतीती पाहणे म्हणजे काय?

“तुम्ही विश्‍वासात आहा किंवा नाही ह्‍याविषयी आपली परीक्षा करा”

५, ६. आपण विश्‍वासात आहोत किंवा नाही याची परीक्षा करण्याकरता आपल्याजवळ कोणता मापदंड आहे आणि हा आदर्श मापदंड का आहे?

प्रत्येक परीक्षेचा एक विषय असतो; हा विषय म्हणजे एखादी व्यक्‍ती किंवा वस्तू असू शकते. तसेच काही सुनिश्‍चित मापदंड असतात, ज्यांच्या आधारावर त्या विषयाची परीक्षा केली जाते. या संदर्भात, परीक्षेचा विषय हा आपला ख्रिस्ती विश्‍वास, अर्थात आपण स्वीकारलेल्या समग्र शिकवणुकी हा नाही. तर परीक्षेचा विषय व्यक्‍तिशः आपण स्वतः आहोत. आणि ही परीक्षा करण्यासाठी आपल्याजवळ अगदी परिपूर्ण मापदंड आहे. स्तोत्रकर्त्या दाविदाने रचलेल्या एका गीतात तो म्हणतो: “परमेश्‍वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करिते; परमेश्‍वराचा निर्बंध विश्‍वसनीय आहे. तो भोळ्यांस समंजस करितो. परमेश्‍वराचे विधि सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करितात; परमेश्‍वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते.” (स्तोत्र १९:७, ८) यहोवाचे हे परिपूर्ण नियम, सरळ विधी, विश्‍वसनीय निर्बंध आणि चोख आज्ञा आपल्याला बायबलमध्ये सापडतात. बायबलमधील संदेश हा एक आदर्श मापदंड आहे व त्याच्या आधारावर आपण स्वतःची परीक्षा करू शकतो.

देवाने प्रेरित केलेल्या या संदेशासंबंधी प्रेषित पौलाने असे म्हटले: “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्‍यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” (इब्री लोकांस ४:१२) होय, देवाचे वचन आपल्याला, आपण मुळात कसे आहोत हे पारखू शकते. तर मग बायबलच्या तीक्ष्ण व जोरदार संदेशाचा आपण स्वतःची परीक्षा करण्याकरता कसा उपयोग करू शकतो? स्तोत्रकर्ता या प्रश्‍नाचे सुस्पष्ट उत्तर देतो. तो म्हणतो: “[जो] परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य.” (स्तोत्र १:१, २) ‘परमेश्‍वराचे नियमशास्त्र’ हे यहोवाच्या लिखित वचनात अर्थात बायबलमध्ये सापडते. तेव्हा यहोवाचे हे वचन वाचण्यास आपल्याला आनंद वाटला पाहिजे. त्याचे वचन वाचण्याकरता व त्यावर मनन करण्याकरता आपण वेळ काढला पाहिजे. असे करताना आपण स्वतःला—म्हणजेच परीक्षेच्या विषयाला—त्यात लिहिलेल्या माहितीच्या प्रकाशात पडताळून पाहिले पाहिजे.

७. आपण विश्‍वासात आहोत किंवा नाही याची परीक्षा करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग कोणता आहे?

तर मग, आपण विश्‍वासात आहोत किंवा नाही याची परीक्षा करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे: देवाच्या वचनाचे वाचन व त्यावर मनन करणे आणि त्यातून आपण जे शिकतो त्याच्या प्रकाशात स्वतःची वागणूक पडताळून पाहणे. देवाचे वचन नीट समजून घेण्याकरता आपल्याला बरीच मदत उपलब्ध आहे याबद्दल आपण आनंद मानू शकतो.

८. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेली प्रकाशने आपण विश्‍वासात आहोत किंवा नाही याची परीक्षा करण्यास आपल्याला कशी मदत करतात?

‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ प्रकाशित केलेल्या प्रकाशनांत शास्त्रवचनांचा अर्थ स्पष्ट केला जातो आणि या प्रकाशनांच्या माध्यमाने यहोवा आपल्याला त्याच्या शिकवणुकी व मार्गदर्शन पुरवतो. (मत्तय २४:४५) उदाहरणार्थ, यहोवाच्या जवळ या * या पुस्तकाच्या बहुतेक अध्यायांच्या शेवटी “मनन करण्याकरता प्रश्‍न” असे शीर्षक असलेला चौकोन आढळतो. या विशेष सदरामुळे निरनिराळ्या दृष्टिकोनांतून वैयक्‍तिक मनन करण्याकरता किती उत्तम संधी मिळते! टेहळणी बुरूज सावध राहा! या आपल्या नियतकालिकांतही अशा अनेक विषयांवर चर्चा केली जाते जे आपण विश्‍वासात आहोत किंवा नाही याची परीक्षा करण्यास मदत करतात. अलीकडील टेहळणी बुरूज अंकांतील नीतिसूत्रे पुस्तकावर आधारित लेखांविषयी एका ख्रिस्ती स्त्रीने असे म्हटले: “मला हे लेख अतिशय उपयोगी वाटतात. माझे वागणेबोलणे व विचारसरणी खरोखरच यहोवाच्या नीतिमान आदर्शांनुसार आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्यास मला यांमुळे मदत मिळते.”

९, १०. आपण विश्‍वासात आहोत किंवा नाही याची परीक्षा करण्याकरता यहोवाच्या कोणत्या तरतुदी आपली मदत करतात?

मंडळीच्या सभा, संमेलने व अधिवेशने यांतूनही आपल्याला भरपूर मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळते. या आध्यात्मिक तरतुदी देवाने आपल्या लोकांकरता केल्या आहेत, ज्यांच्याविषयी यशयाने असे भाकीत केले होते: “शेवटल्या दिवसात असे होईल की परमेश्‍वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील. देशादेशातील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, ‘चला, आपण परमेश्‍वराच्या पर्वतावर . . . चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.’” (यशया २:२, ३) यहोवाच्या मार्गांविषयी शिक्षण मिळणे हा खरोखरच एक आशीर्वाद आहे.

१० आध्यात्मिक पात्रता असणाऱ्‍यांकडून, उदाहरणार्थ, ख्रिस्ती वडिलांकडून मिळणारा सल्ला हा देखील स्वतःची परीक्षा करण्याचा एक मार्ग आहे. वडिलांबद्दल बायबल म्हणते: “बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहा ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तूहि परिक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे.” (गलतीकर ६:१) आपल्याला ताळ्यावर आणण्याकरता असलेल्या या तरतुदीबद्दल आपण किती कृतज्ञता बाळगली पाहिजे!

११. आपण विश्‍वासात आहोत किंवा नाही याची परीक्षा करण्याकरता कशाची आवश्‍यकता आहे?

११ आपली प्रकाशने, ख्रिस्ती सभा, नियुक्‍त पुरुष—या सर्व यहोवाकडील तरतुदी आहेत. पण आपण विश्‍वासात आहोत किंवा नाही याची परीक्षा करण्याकरता आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. तेव्हा, आपली प्रकाशने वाचताना किंवा शास्त्रवचनांवर आधारित मार्गदर्शन ऐकताना आपण स्वतःला असे विचारले पाहिजे: ‘हे वर्णन माझ्याविषयीच आहे का? मी असे करतो का? समग्र ख्रिस्ती विश्‍वासांना मी जडून आहे का?’ यहोवाच्या तरतुदींद्वारे आपल्याला मिळणारी माहिती आपण कशा मनोवृत्तीने स्वीकारतो, याचा आपल्या आध्यात्मिक स्थितीवर परिणाम होतो. बायबल म्हणते: “स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात; . . . जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो.” (१ करिंथकर २:१४, १५) तेव्हा, आपल्या पुस्तकांमध्ये, नियतकालिकांमध्ये व इतर प्रकाशनांमध्ये आपण जे वाचतो, तसेच आपल्या सभांमध्ये व वडिलांकडून आपण जे ऐकतो त्याबद्दल नेहमी सकारात्मक, आध्यात्मिक दृष्टिकोन बाळगण्याचाच आपण प्रयत्न करू नये का?

“आपली प्रतीति पाहा”

१२. आपली प्रतीती पाहण्याचा काय अर्थ होतो?

१२ आपली प्रतीती पाहण्याकरता आपल्याला आत्मपरीक्षण करावे लागेल. होय आपण कदाचित सत्यात असू, परंतु आपल्या आध्यात्मिकतेची पातळी काय आहे? आपली प्रतीती पाहताना, आपली परिपक्वता व आध्यात्मिक तरतुदींबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता प्रत्ययास आली पाहिजे.

१३. इब्री लोकांस ५:१४ यानुसार आपली परिपक्वता कशावरून प्रत्ययास येईल?

१३ ख्रिस्ती परिपक्वता प्रत्ययास येण्याकरता आपण कशाविषयी स्वतःला तपासून पाहिले पाहिजे? प्रेषित पौलाने लिहिले: “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्‍न आहे.” (इब्री लोकांस ५:१४) आपल्या ज्ञानेंद्रियांना सराव देण्याद्वारे आपली परिपक्वता प्रत्ययास येते. ज्याप्रकारे एखाद्या खेळाडूला विशिष्ट खेळात उत्तम कामगिरी करण्यासाठी वारंवार सराव करून शरीरातल्या विशिष्ट स्नायूंना बळकट करावे लागते त्याचप्रकारचे बायबल तत्त्वांचे पालन करण्याचा आपल्या ज्ञानेंद्रियांचा सराव होणे गरजेचे आहे.

१४, १५. देवाच्या वचनातील सखोल सत्यांचा अभ्यास करण्याकरता आपण परिश्रम का घेतले पाहिजे?

१४ आपल्या ज्ञानेंद्रियांना सराव देण्याआधी आपण ज्ञान मिळवले पाहिजे. याकरता वैयक्‍तिक अभ्यास करणे अत्यावश्‍यक आहे. जेव्हा आपण नियमितरित्या वैयक्‍तिक अभ्यास करतो आणि विशेषतः देवाच्या वचनातील सखोल सत्यांचा अभ्यास करतो तेव्हा आपली ज्ञानेंद्रिये विकसित होतात. गत वर्षांत, टेहळणी बुरूज यात अनेक सखोल विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. सखोल सत्यांविषयी चर्चा करणारे लेख पाहताच आपली काय प्रतिक्रिया असते? या लेखांत “समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत” म्हणून आपण ते वाचण्याचे टाळतो का? (२ पेत्र ३:१६) उलट, त्यांत काय म्हटले आहे हे समजून घेण्याकरता आपण अधिक परिश्रमाने त्यांचा अभ्यास करतो.—इफिसकर ३:१८.

१५ वैयक्‍तिक अभ्यास आपल्याला कठीण वाटत असेल तर काय करावे? तर आपण याची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. * (१ पेत्र २:२) परिपक्व होण्याकरता आपण जड अन्‍न, अर्थात देवाच्या वचनातील सखोल सत्यांतून आध्यात्मिक पोषण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर, आपल्या ज्ञानेंद्रियांचा विकास होऊ शकणार नाही. पण आपली परिपक्वता प्रत्ययास येण्याकरता केवळ ज्ञानेंद्रियांचा विकास होणे पुरेसे नाही. तर परिश्रमाने केलेल्या वैयक्‍तिक अभ्यासातून जे ज्ञान आपल्याला मिळाले, त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करणे आवश्‍यक आहे.

१६, १७. “वचनाप्रमाणे आचरण करणारे” होण्याच्या संदर्भात शिष्य याकोब कोणता सल्ला देतो?

१६ आपली प्रतीती पाहण्याकरता सत्याविषयीची कृतज्ञता आपण ज्यांद्वारे व्यक्‍त करतो ती आपल्या विश्‍वासाची कृत्येही आपण तपासून पाहिली पाहिजेत. आत्मपरीक्षणाच्या या पैलूचे वर्णन करताना शिष्य याकोबाने एक अतिशय परिणामकारक रूपक वापरले. त्याने म्हटले: “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करिता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशांत आपले शारीरिक मुख पाहणाऱ्‍या माणसासारखा आहे; तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो, आणि आपण कसे होतो हे तेव्हांच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करुन ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृति करणारा होतो व त्याला आपल्या कार्यांत धन्यता मिळेल.”—याकोब १:२२-२५.

१७ दुसऱ्‍या शब्दांत याकोब असे म्हणत आहे: ‘देवाच्या वचनाच्या आरशात स्वतःचे निरीक्षण करा आणि त्याच्या आधारावर स्वतःला तोलून पाहा. असे सातत्याने करत राहा आणि देवाच्या वचनातून तुम्हाला जे ज्ञान मिळेल त्याच्या प्रकाशात स्वतःचे परीक्षण करा. मग या परीक्षणातून तुम्हाला जे दिसून आले ते लगेच विसरून जाऊ नका. तर स्वतःत सुधारणा करण्यासाठी आवश्‍यक पावले उचला.’ या सल्ल्याचे पालन करणे कधीकधी एक आव्हान बनू शकते.

१८. याकोबाच्या सल्ल्याचे पालन करणे एक आव्हान का बनू शकते?

१८ राज्य प्रचाराच्या कार्यात सहभाग घेण्याच्या आज्ञेचे उदाहरण घ्या. पौलाने लिहिले: “जो अंतकरणाने विश्‍वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करितो त्याचे तारण होते.” (रोमकर १०:१०) तारणाकरता आपला विश्‍वास मुखाने कबूल करण्याकरता आपल्याला बऱ्‍याच तडजोडी कराव्या लागू शकतात. प्रचार कार्यात सहभाग घेणे बहुतेकांना सोपे जात नाही. शिवाय हे कार्य आवेशाने करण्यासाठी आणि आपल्या जीवनात त्याला जे स्थान दिले पाहिजे ते देण्यासाठी आणखी बऱ्‍याच तडजोडी व त्याग करावे लागतात. (मत्तय ६:३३) पण हे कार्य करण्याच्या देवाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे आचरण करणारे जेव्हा आपण होतो, तेव्हा आपल्याला आनंद मिळतो कारण यामुळे यहोवाची स्तुती केली जाते. मग आपण आवेशी राज्य उद्‌घोषक आहोत का?

१९. विश्‍वासाच्या कृत्यांत कशाचा समावेश असला पाहिजे?

१९ आपल्या विश्‍वासाच्या कृत्यांत कशाचा समावेश असला पाहिजे? पौलाने लिहिले: “माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले, व माझे जे ऐकले, पाहिले ते आचरीत राहा; म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.” (फिलिप्पैकर ४:९) तर ख्रिस्ती समर्पण व शिष्यत्वात जे काही सामील आहे—अर्थात, आपण जे काही शिकलो, जे काही स्वीकारले, जे काही ऐकले व पाहिले ते सर्व आचरीत राहण्याद्वारे आपण स्वतःची प्रतीती पाहू शकतो. यशया संदेष्ट्याद्वारे यहोवा आपल्याला सांगतो: “हाच मार्ग आहे; याने चला.”—यशया ३०:२१.

२०. कोणत्या प्रकारच्या व्यक्‍ती मंडळीकरता एक मोठा आशीर्वाद आहेत?

२० स्त्रिया असोत अथवा पुरुष, जे कोणी देवाच्या वचनाचा परिश्रमपूर्वक अभ्यास करतात, सुवार्तेचा आवेशाने प्रचार करतात, पूर्ण सात्विकतेत चालतात आणि देवाच्या राज्याचे एकनिष्ठतेने समर्थन करतात, ते मंडळीकरता मोठा आशीर्वाद आहेत. त्यांच्या मंडळीत असण्यामुळे त्या मंडळीला स्थैर्य लाभते. त्यांच्यामुळे खूप मदत देखील होते कारण मंडळीत अनेक नवीन व्यक्‍ती आहेत व त्यांना मदत करणे आवश्‍यक आहे. तर “तुम्ही विश्‍वासात आहा किंवा नाही ह्‍याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीति पाहा” या पौलाच्या सल्ल्याचे आपण मनःपूर्वक पालन करतो, तेव्हा आपला देखील इतरांवर चांगला प्रभाव पडतो.

देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात आनंद माना

२१, २२. आपण देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात कशाप्रकारे आनंद मानू शकतो?

२१ प्राचीन इस्राएलच्या राजा दावीदाने एका भजनात म्हटले: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” (स्तोत्र ४०:८) देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात दाविदाला आनंद वाटला. का? कारण यहोवाचे नियमशास्त्र दाविदाच्या अंतःकरणावर कोरलेले होते. कोणत्या मार्गाने चालावे याविषयी दाविदाच्या मनात अनिश्‍चितता नव्हती.

२२ देवाचे नियमशास्त्र आपल्या अंतर्यामी असते तेव्हा आपल्यालाही कोणत्या मार्गाने चालावे यासंबंधी अनिश्‍चितता वाटत नाही. तर आपल्याला देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास आनंद वाटतो. तर मग, पूर्ण अंतःकरणाने यहोवाची सेवा करण्याचा आपण ‘नेटाने यत्न करू’ या.—लूक १३:२४. (w०५ ७/१५)

[तळटीपा]

^ परि. 8 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

^ परि. 15 अभ्यास कसा करावा यासंबंधी उपयुक्‍त सूचना यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या ईश्‍वरशासित सेवा प्रशाला प्रशिक्षणाचा फायदा घेणे (इंग्रजी) या पुस्तकातील पृष्ठे २७-३२ वर सापडतील.

तुम्हाला आठवते का?

• आपण विश्‍वासात आहो किंवा नाही याची आपण परीक्षा कशी करू शकतो?

• आपली प्रतीती पाहण्यात कशाचा समावेश आहे?

• आपली ख्रिस्ती परिपक्वता कशावरून प्रत्ययास येईल?

• आपली विश्‍वासाची कृत्ये आपली प्रतीती पाहण्यास कशी मदत करू शकतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

तुम्ही विश्‍वासात आहा किंवा नाही याची परीक्षा करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग कोणता हे तुम्हाला माहीत आहे का?

[१६ पानांवरील चित्र]

ज्ञानेंद्रियांना सराव देण्याद्वारे आपली ख्रिस्ती परिपक्वता प्रत्ययास येते

[१७ पानांवरील चित्र]

‘वचन ऐकून विसरणारे नव्हे तर त्याप्रमाणे आचरण करणारे’ होण्याद्वारे आपण स्वतःची प्रतीती पाहू शकतो