खऱ्या शिकवणी तुम्हाला कोठे मिळू शकतील?
खऱ्या शिकवणी तुम्हाला कोठे मिळू शकतील?
तिबेटमधील एक मनुष्य, प्रार्थना चक्र फिरवतो. हे चक्र एका लहान ढोलाच्या आकाराचे असते ज्यात, प्रार्थनांचे चिटोरे असतात. या मनुष्याचा असा विश्वास आहे, की जितक्या वेळा हे चक्र फिरते तितक्या वेळा त्याच्या प्रार्थनांची पुनरुक्ती होते. भारतातील एका ऐसपैस घरात, एक लहानशी खोली खास पूजेसाठी आहे. विविध देवीदेवतांच्या मूर्तींसमोर धूप, फुले आणि इतर वस्तू चढवून त्यांची पूजा केली जाते. हजारो किलोमीटर दूर, इटलीतील एक स्त्री हातात एक जपमाळ घेऊन एका अलंकारयुक्त चर्चमध्ये, येशूची आई मारीया हिच्या मूर्तीसमोर गुडघे टेकून प्रार्थना करते.
तुम्ही स्वतः कदाचित, लोकांच्या जीवनावर धर्माचा किती पगडा आहे हे पाहिले असेल. ‘संपूर्ण जगभरातील मानव समाजात धर्माला अतिशय महत्त्वाचे स्थान होते आणि आजही आहे,’ असे जगाचे धर्म—जिवंत श्रद्धांचे आकलन (इंग्रजी) नामक पुस्तकात म्हटले आहे. लेखक जॉन बोकर, देव—एक संक्षिप्त इतिहास (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात असे म्हणतात: “देवावर विश्वास नसलेला अर्थात तो सर्वकाही सांभाळतो आणि निर्माण करतो असा विश्वास नसलेला कोणताही मानव समाज नाही. आपणहून धर्मनिरपेक्ष बनलेल्या समाजांच्या बाबतीतही हे खरे आहे.”
होय, कोट्यवधी लोकांच्या जीवनावर धर्माचा प्रभाव आहे. हा या गोष्टीचा ठोस पुरावा नाही का, की माणसाला आध्यात्मिक गोष्टींची भूक व आध्यात्मिक गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे? नामवंत मानसशास्त्रज्ञ डॉ. कार्ल जी. युंग, अप्रकट आत्म या आपल्या पुस्तकात, मनुष्याला एका उच्च शक्तीची उपासना करण्याची गरज आहे असा उल्लेख करून म्हणतात, की ‘याचा पुरावा आपल्याला संपूर्ण इतिहासात पाहायला मिळू शकतो.’
पण, पुष्कळ लोकांचा देवावर विश्वास नाही किंवा धर्मातही त्यांना रस नाही. काही लोक जे देव अस्तित्वात आहे यावर शंका घेतात किंवा अमान्य करतात ते प्रामुख्याने असे
यासाठी करतात कारण त्यांना माहीत असलेल्या धर्मांनी त्यांची आध्यात्मिक भूक भागवलेली नसते. धर्माची व्याख्या, “एखाद्या तत्त्वाबद्दल श्रद्धा; पूर्ण निष्ठा किंवा विश्वासूपणा; जाणीवपूर्वकता; धार्मिक प्रेम किंवा ओढ” अशाप्रकारे करण्यात आली आहे. या व्याख्येनुसार, जवळजवळ प्रत्येक माणूस आपल्या जीवनात कोणत्या न कोणत्या प्रकारची धार्मिक भक्ती आचरतो. यामध्ये, नास्तिक लोकांचाही समावेश होतो.मानव इतिहासाच्या हजारो वर्षांच्या दरम्यान माणसाने निरनिराळ्या उपासना मार्गांनी आपली आध्यात्मिक भूक शमविण्याचा प्रयत्न केला आहे. याचा परिणाम असा झाला, की संपूर्ण जगभरात असंख्य धार्मिक विश्वासांमध्ये विभिन्नता दिसून येते. जसे की, जवळजवळ सर्वच धर्म एका उच्च शक्तीवर विश्वास ठेवण्याची शिकवण देत असले तरी, ती शक्ती कोण व काय आहे यावर त्यांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत. बहुतेक धर्मांत, तारणाच्या किंवा मुक्तीच्या महत्त्वावरही जोर दिलेला आहे. पण तारण काय आहे आणि ते कसे प्राप्त करता येईल याबाबतच्या त्यांच्या शिकवणुकीत तफावत आहे. इतके असंख्य विश्वास असताना, देवाला संतुष्ट करणाऱ्या खऱ्या शिकवणुकी आपल्याला कशा ओळखता येतील? (w०५ ७/१५)