व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दुसरे राजे पुस्तकातील ठळक मुद्दे

दुसरे राजे पुस्तकातील ठळक मुद्दे

यहोवाचे वचन सजीव आहे

दुसरे राजे पुस्तकातील ठळक मुद्दे

दुसरे राजे पुस्तक, पहिले राजे पुस्तकाचा उर्वरीत भाग आहे. यात २९ राजांचा अर्थात उत्तरेकडील इस्राएल राष्ट्रातील १२ राजांचा व दक्षिणेकडील यहुदा राष्ट्रातील १७ राजांचा अहवाल आहे. दुसरे राजे पुस्तकात एलीया, अलीशा आणि यशया या संदेष्ट्यांच्या कार्यांचा देखील अहवाल आहे. यांतील घटना क्रमवार नसल्या तरी, या अहवालातील घटनांमध्ये, शोमरोन व जेरुसलेमच्या नाशाच्यावेळी घडलेल्या घटनांचा समावेश आहे. दुसरे राजे पुस्तकातील एकूण अहवाल ३४० वर्षांचा आहे. सा.यु.पू. ९२० पासून सा.यु.पू. ५८० पर्यंतचा अहवाल. याच काळात यिर्मयाने या पुस्तकाचे लिखाण पूर्ण केले.

दुसरे राजे पुस्तकाचा आपल्याला काही फायदा आहे का? हे पुस्तक, यहोवा आणि लोकांबरोबर त्याने जो व्यवहार केला त्याविषयी आपल्याला काय शिकवते? या पुस्तकात ज्यांचा उल्लेख करण्यात आला आहे त्या राजांच्या, संदेष्ट्यांच्या आणि इतर लोकांच्या कार्यांवरून आपण कोणता धडा शिकू शकतो? दुसरे राजे पुस्तकातून आपण काय शिकू शकतो ते पाहू या.

अलीशा एलीयाची जागा घेतो

(२ राजे १:१–८:२९)

इस्राएलचा राजा अहज्या आपल्या घरात खाली पडल्यामुळे आजारी पडतो. तेव्हा तो मरणार असल्याचे संदेष्टा एलीयाकडून त्याला सांगण्यात येते. अहज्या मरतो आणि त्याचा भाऊ यहोराम सिंहासनावर विराजमान होतो. त्याचवेळी, यहोशाफाट यहुदाचा राजा होतो. एलीयाला एका वावटळीत वर उचलले जाते आणि त्याचा साहाय्यक अलीशा त्याच्यानंतर संदेष्टा बनतो. यानंतर अलीशा आपल्या ६० वर्षांच्या सेवेदरम्यान अनेक चमत्कार करतो.—“अलीशाचे चमत्कार” हा चौकोन पाहा.

एक मवाबी राजा इस्राएलविरुद्ध बंड करतो तेव्हा यहोराम, यहोशाफाट आणि एदोमचा राजा हे तिघे त्याच्या विरुद्ध लढायला जातात. यहोशाफाटाच्या विश्‍वासूपणामुळे त्यांना विजय दिला जातो. नंतर, अरामाचा राजा इस्राएलवर अचानक हल्ला करण्याचा कट रचतो. परंतु अलीशा त्याचा कट उधळून लावतो. यामुळे अरामाचा राजा क्रोधित होतो आणि अलीशाला धरून आणण्यासाठी ‘घोडे व रथ बरोबर देऊन मोठे सैन्य पाठवतो.’ (२ राजे ६:१४) अलीशा दोन चमत्कार करतो आणि अरामी सैन्याशी शांतीने व्यवहार करतो. नंतर, अरामाचा राजा बेनहदाद शोमरोन काबीज करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे मोठा दुष्काळ पडतो पण हा दुष्काळ समाप्त होईल, असे अलीशा भाकीत करतो.

काही काळानंतर, अलीशा दिमिष्कास जातो. राजा बेनहदाद आजारी पडल्यावर, आपण बरे होऊ की नाही अशी अलीशास विचारपूस करण्याकरता तो हजाएलास पाठवतो. अलीशा भाकीत करतो, की राजा मरण पावेल आणि त्याऐवजी हजाएल राजा होईल. अगदी दुसऱ्‍याच दिवशी, हजाएल बेनहदादच्या तोंडावर एक ओली रजई टाकून त्याला गुदमरून मारतो व राजपद घेतो. (२ राजे ८:१५) यहुदात, यहोशाफाटाचा मुलगा यहोराम राजा बनतो. आणि यहोरामानंतर अहज्या राजा होतो.—“यहुदा आणि इस्राएलचे राजे” हा चौकोन पाहा.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:९—अलीशा एलीयाच्या ‘आत्म्याचा दुप्पट वाटा’ का मागतो? इस्राएलमध्ये संदेष्ट्याची जबाबदारी पूर्ण करण्याकरता अलीशाला एलीयासारखाच आत्मा अर्थात त्याच्यासारखेच धैर्य व निडरता दाखवावी लागणार होती. हे अलीशाने ओळखल्यामुळे त्याने एलीयाला त्याच्या आत्म्याचा दुप्पट वाटा आपल्याला द्यावा अशी विनंती केली. एलीयाने आपला वारस म्हणून अलीशाला नियुक्‍त केले होते; आणि सहा वर्षांपासून अलीशा एलीयाचा साहाय्यक होता. त्यामुळे अलीशा एलीयाला एका आध्यात्मिक पित्यासमान लेखत होता आणि अलीशा, एलीयाच्या ज्येष्ठ आध्यात्मिक पुत्रासारखा होता. (१ राजे १९:१९-२१; २ राजे २:१२) म्हणूनच, रक्‍ताचे नाते असलेल्या ज्येष्ठ पुत्राला जसे आपल्या पित्याच्या वारशातून दोन भाग मिळतात तसेच अलीशाने एलीयाच्या आध्यात्मिक वारशातून दोन भाग देण्याची विनंती केली.

२:११—एलीया “वावटळीतून” कोणत्या ‘स्वर्गांत गेला?’ ही, भौतिक विश्‍वातील दूरवर असलेली ठिकाणे नव्हती किंवा देव आणि त्याचे दूत वास करतात ते आत्मिक ठिकाणही नव्हते. (अनुवाद ४:१९; स्तोत्र ११:४; मत्तय ६:९; १८:१०) एलीया ज्या ‘स्वर्गांत’ गेला ते पृथ्वीभोवती असलेले वातावरण होते. (स्तोत्र ७८:२६; मत्तय ६:२६) अग्नीमय रथाने एलीयाला पृथ्वीच्या वातावरणातून उचलून पृथ्वीवरल्याच दुसऱ्‍या एका भागात नेले; तेथे तो काही काळपर्यंत हयात होता. अनेक वर्षांनंतर एलीयाने यहुदाचा राजा यहोराम यास एक पत्र लिहिले.—२ इतिहास २१:१, १२-१५.

५:१५, १६—अलीशाने नामानाच्या नजराण्याचा स्वीकार का केला नाही? अलीशाने नामानाच्या नजराण्याचा स्वीकार केला नाही कारण नामानाला बरे करण्याचा चमत्कार, अलीशाच्या शक्‍तीने नव्हे तर यहोवाच्या शक्‍तीने करण्यात आला होता, हे त्याला माहीत होते. देवाने दिलेल्या अधिकारातून स्वतःचा फायदा करून घेण्याचा विचारही अलीशाच्या मनाला कधी शिवला नाही. आज यहोवाचे खरे उपासक त्याच्या सेवेतून कधीही स्वतःचा फायदा करून घेत नाहीत. ते येशूच्या या सल्ल्याचे पालन करतात: “तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या.”—मत्तय १०:८.

५:१८, १९—एका धार्मिक कृत्यात भाग घ्यावा लागत असल्यामुळे नामान क्षमा मागत होता का? अरामाचा राजा म्हातारा व अशक्‍त होता आणि आधारासाठी त्याला नामानाला टेकून उभे राहावे लागायचे. राजा जेव्हा रिम्मोन दैवताला नमन करायचा तेव्हा नामानही खाली वाकायचा. नामान, राजाला आधार देण्याकरता म्हणून खाली वाकायचा, उपासनेसाठी म्हणून नव्हे. हे कर्तव्य पार पाडावे लागत असल्यामुळे नामान यहोवाकडे क्षमा मागत होता. नामानावर विश्‍वास ठेवून अलीशा त्याला म्हणाला: “आता सुखाने मार्गस्थ हो.”

आपल्याकरता धडे:

१:१३, १४. निरीक्षणातून शिकल्यामुळे व नम्रतेने कार्य केल्यामुळे आपला जीव वाचू शकतो.

२:२, ४, ६. अलीशा कदाचित सहा वर्षांपासून एलीयाचा साहाय्यक होता, तरीपण तो, आपणाला सोडून जाऊ नका अशी गळ घालत होता. एकनिष्ठता व मैत्रीचे किती हे उत्तम उदाहरण!—नीतिसूत्रे १८:२४.

२:२३, २४, (पं.र.भा.). एका टक्कल पडलेल्या मनुष्याने एलीयाचा झगा घातला होता, हे अलीशाची टिंगल करण्यामागचे मुख्य कारण होते, असे दिसते. अलीशाची थट्टा करणाऱ्‍या मुलांनी, तो यहोवाचा प्रतिनिधी आहे हे ओळखले होते व त्याने त्यांच्या आसपास फिरकू नये असे त्यांना वाटत होते. त्यांनी त्याला, बेथेलला जा, किंवा एलीयाला जसे वर उचलण्यात आले तसे त्यालाही उचलण्यात यावे या अर्थाने “वर जा,” असे म्हटले. मुलांच्या या वागणुकीवरून त्यांच्या आईवडिलांची शत्रुत्वाची भावना व्यक्‍त होत होती. पालकांनी आपल्या मुलांना, देवाच्या प्रतिनिधींचा आदर करायला शिकवणे खरोखर किती महत्त्वाचे आहे!

३:१४, १८, २४. यहोवाने दिलेले वचन नेहमी पूर्ण होते.

३:२२. नवीन बनवलेल्या खड्ड्यांतली माती लाल रंगाची असल्यामुळे कदाचित पहाटेच्या किरणांमुळे पाणी रक्‍तासारखे दिसत असावे. आपला उद्देश साध्य करण्यासाठी यहोवा नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करू शकतो.

४:८-११. अलीशा “देवाचा पवित्र माणूस आहे,” हे ओळखल्यामुळे शूनेममधील एका स्त्रीने त्याला आदरातिथ्य दाखवले. आपणही यहोवाच्या विश्‍वासू उपासकांना आदरातिथ्य दाखवू नये का?

५:३. त्या लहान इस्राएली मुलीला, देव चमत्कार करू शकतो यावर विश्‍वास होता. आपल्या धार्मिक विश्‍वासांविषयी बोलण्याचे धैर्यही तिच्याजवळ होते. तरुणांनो, देवाच्या अभिवचनांवरील तुमचा विश्‍वास भक्कम करण्यासाठी तुम्ही झटत आहात का? तुमच्या शिक्षकांना व सहविद्यार्थ्यांना सत्य सांगण्यासाठी तुम्ही धैर्य एकवटत आहात का?

५:९-१९. एक प्रौढ व्यक्‍तीही नम्र होऊ शकते, हेच नामानाच्या उदाहरणावरून दिसून येत नाही का?—१ पेत्र ५:५.

५:२०-२७. फसवणूक केल्याची किती मोठी किंमत गेहजीला द्यावी लागली! दुहेरी जीवनशैली जगल्यामुळे किती मानसिक यातना व क्लेश भोगावे लागतील यावर अंमळ विचार केल्यास, आपण अशाप्रकारची जीवनशैली टाळू.

यहुदा आणि इस्राएल यांना बंदिवान बनवले जाते

(२ राजे ९:१–२५:३०)

येहूला इस्राएलवर राजा नेमले जाते. तो कसलाही वेळ न दवडता अहाबाच्या घराण्याचा उच्छेद करण्याची मोहीम हाती घेतो. येहू अगदी कुशलरीतीने “इस्राएल लोकांतून बआलमूर्ति काढून” टाकतो. (२ राजे १०:२८) आपल्या मुलाला येहूने मारले आहे हे समजल्यावर अहज्याची आई अथल्या यहुदाच्या “सर्व राजवंशाचा संहार” करण्यास उठते व सिंहासन बळकावते. (२ राजे ११:१) फक्‍त अहज्याचा तान्हा मुलगा योवाशला वाचवले जाते आणि सहा वर्षांसाठी गुप्तस्थळी राहिल्यानंतर त्याला यहुदावर राजा नेमले जाते. यहोयादा याजक योवाशला प्रशिक्षण देतो आणि योवाश यहोवाच्या नजरेत जे बरोबर आहे ते करत राहतो.

येहूनंतर इस्राएलवर राज्य करणाऱ्‍या सर्व राजांनी यहोवाच्या नजरेत जे वाईट होते तेच केले. येहूच्या नातवाच्या शासनकाळात, अलीशाचा नैसर्गिक मृत्यू होतो. योवाश नंतर आलेला चवथा यहुदी राजा आहे आहाज. त्याने, “परमेश्‍वर याच्या दृष्टीने जे योग्य . . . होते त्याप्रमाणे त्याने केले नाही.” (२ राजे १६:१, २) परंतु, त्याचा पुत्र हिज्कीया असा राजा होतो जो “परमेश्‍वराला धरून राहिला.” (२ राजे १७:२०; १८:६) सा.यु.पू. ७४० मध्ये, हिज्कीया यहुदाचा राजा होतो आणि होशे इस्राएलवर राज्य करत असताना, अश्‍शुरी राजा शल्मनेसर ‘शोमरोनास सर करतो व इस्राएल लोकांस अश्‍शूर देशी नेतो.’ (२ राजे १७:६) कालांतराने, इस्राएलच्या क्षेत्रात विदेशी लोकांना आणले जाते व त्यामुळे शोमरोनी धर्माचा जन्म होतो.

यहुदात हिज्कीयानंतर आलेल्या सात राजांपैकी फक्‍त योशीयाच देशातून खोट्या उपासनेचे उच्चाटन करण्याकरता पावले उचलतो. सरतेशेवटी, सा.यु.पू. ६०७ मध्ये बॅबिलोनी लोक जेरुसलेमवर कब्जा करतात आणि “यहूदी लोकांस त्यांच्या देशातून कैद करून नेले” जाते.—२ राजे २५:२१.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१३:२०, २१—हा चमत्कार, धार्मिक वस्तूंच्या पूजेचे समर्थन करतो का? नाही. अलीशाच्या अस्थींची पूजा करण्यात आली, असे बायबलमध्ये दाखवण्यात आलेले नाही. अलीशा जिवंत असताना जसे त्याने देवाच्या शक्‍तीने सर्व चमत्कार केले तसेच हा चमत्कारही देवाच्या शक्‍तीमुळे घडला.

१५:१-६—यहोवाने अजऱ्‍याला (उज्जीयाला, १५:१, तळटीप) कोडी का बनवले? ‘[उज्जीया] समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त झाले . . . आणि आपला देव परमेश्‍वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले; धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्‍वराच्या मंदिरात गेला.’ याजकांनी “उज्जीया राजास प्रतिकार” केला व त्याला ‘पवित्रस्थानातून निघून जाण्यास’ सांगितले तेव्हा तो त्यांच्यावर रागवला आणि त्याच्या कपाळावर कोड उठले.—२ इतिहास २६:१६-२०.

१८:१९-२१, २५—हिज्कीयाने ईजिप्तबरोबर संधान बांधले होते का? नाही. रबशाकेचा आरोप आणि मी ‘परमेश्‍वराच्या सांगण्यावरून’ आलो आहे हा त्याचा दावा खोटा होता. विश्‍वासू राजा हिज्कीया पूर्णपणे यहोवावर विसंबून राहिला.

आपल्याकरता धडे:

९:७, २६. अहाबाच्या घराण्यावर आलेल्या मोठ्या न्यायदंडावरून दिसून येते, की खोटी उपासना आणि निष्पाप लोकांचा रक्‍तपात या दोन्ही गोष्टींची यहोवाला किळस वाटते.

९:२०. सुसाट वेगाने रथ चालवणारा म्हणून येहूने कमावलेल्या नावावरून हा पुरावा मिळतो की आपली कामगिरी पार पाडण्यासाठी तो किती आवेशी होता. तुम्हाला स्वतःला, आवेशी राज्य प्रचारक म्हणून ओळखले जाते का?—२ तीमथ्य ४:२.

९:३६, ३७; १०:१७; १३:१८, १९, २५; १४:२५; १९:२०, ३२-३६; २०:१६, १७; २४:१३. आपण हा भरवसा बाळगू शकतो, की यहोवाच्या ‘मुखातून निघणारे वचन . . . विफल होऊन परत येणार नाही.’—यशया ५५:१०, ११.

१०:१५. येहूने यहोनादाबाला आपल्या रथात चढण्याचे आमंत्रण दिले तेव्हा यहोनादाबाने लगेच त्याचे आमंत्रण स्वीकारले. तसेच “मोठा लोकसमुदाय” आधुनिक दिवसातील येहू अर्थात येशू ख्रिस्त आणि त्याचे अभिषिक्‍त अनुयायी यांना आनंदाने साथ देतात.—प्रकटीकरण ७:९.

१०:३०, ३१. येहूने चुका केल्या नाहीत असे नाही; परंतु यहोवाने त्याच्या सत्कृत्यांना महत्त्व दिले. खरेच, ‘आपली कार्ये . . . विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.’—इब्री लोकांस ६:१०.

१३:१४-१९. येहूचा नातू योवाश याने जास्त कष्ट न घेता भूमीवर फक्‍त तीन वेळा धनुष्यबाणाने मारल्यामुळे अरामी सैन्याचा पराभव करण्यात त्याला पूर्ण यश आले नाही. यहोवाने आपल्याला नेमलेले कार्य आपण पूर्ण मनाने व आवेशाने केले पाहिजे, अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो.

२०:२-६. यहोवा ‘प्रार्थना ऐकणारा’ देव आहे.—स्तोत्र ६५:२.

२४:३, ४. मनश्‍शेने करवलेल्या रक्‍तपातामुळे यहोवा यहुदाला “क्षमा करीना.” निष्पाप लोकांच्या रक्‍ताचा देव आदर करतो. आपण हा भरवसा बाळगू शकतो, की निष्पाप लोकांचे रक्‍त वाहणाऱ्‍यांचा यहोवा झाडा घेईल.—स्तोत्र ३७:९-११; १४५:२०.

आपल्यासाठी अमूल्य धडे

दुसरे राजे पुस्तकात, यहोवा अभिवचने पूर्ण करणारा देव आहे, असे त्याचे चित्र रेखाटण्यात आले आहे. आधी इस्राएल आणि मग यहुदा या दोन राज्याच्या रहिवाशांना बंदी करून नेल्याचा वृत्तांत, अनुवाद २८:१५–२९:२८ मध्ये लिखित भविष्यसूचक न्यायदंड कसा खरा ठरला या गोष्टीवर जोर देतो. दुसरे राजे पुस्तकात अलीशाचे वर्णन, यहोवाचे नाव आणि खरी उपासना यांबद्दल आवेश दाखवणारा संदेष्टा म्हणून करण्यात आले आहे. हिज्कीया आणि योशीया देवाच्या नियमांचा आदर करणारे नम्र मनोवृत्तीचे राजे होते, असेही या पुस्तकात सांगितले आहे.

दुसरे राजे पुस्तकात वर्णन केलेल्या राजांच्या, संदेष्ट्यांच्या व इतरांच्या मनोवृत्तीवर व कार्यांवर आपण गांभीर्याने विचार करतो तेव्हा, आपण कोणत्या गोष्टी मिळवण्यास झटले पाहिजे व कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे यासंबंधाने अमूल्य धडे शिकत नाही का? (रोमकर १५:४; १ करिंथकर १०:११) होय, “देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे.—इब्री लोकांस ४:१२. (w०५ ८/१)

[१० पानांवरील चौकट/चित्र]

अलीशाचे चमत्कार

१. यार्देन नदीचे पाणी दुभंगले जाते.—२ राजे २:१४.

२. यरीहोतील दूषित पाणी पुरवठा शुद्ध केला जातो.—२ राजे २:१९-२२.

३. दोन अस्वली अलीशाची थट्टा करणाऱ्‍या दुष्ट मुलांवर हल्ला करतात.—२ राजे २:२३, २४.

४. सैन्यांना पाणी पुरवले जाते.—२ राजे ३:१६-२६

५. एका विधवेला खाण्याचे तेल मिळते.—२ राजे ४:१-७

६. एका वांझ शूनेमकरीणीस बाळ होते.—२ राजे ४:८-१७

७. एका मृत बालकाला जिवंत केले जाते.—२ राजे ४:१८-३७

८. एक विषारी शाकभाजी खाण्यालायक होते.—२ राजे ४:३८-४१

९. शंभर लोकांना २० भाकरी दिल्या जातात.—२ राजे ४:४२-४४

१०. नामानाचे कोड बरे होते.—२ राजे ५:१-१४

११. गेहजीला नामानाचे कोड लागते.—२ राजे ५:२४-२७

१२. कुऱ्‍हाडीचे डोके पाण्यावर तरंगते.—२ राजे ६:५-७

१३. एक सेवक देवदूतांचे रथ पाहतो.—२ राजे ६:१५-१७.

१४. अरामी सैन्याला अंधळे केले जाते.—२ राजे ६:१८.

१५. अरामी सैन्याला पुन्हा दृष्टी लाभते.—२ राजे ६:१९-२३

१६. एक मृत मनुष्य जिवंत होतो.—२ राजे १३:२०, २१

[१२ पानांवरील तक्‍ता/चित्रे]

यहुदा आणि इस्राएलचे राजे

शौल/दावीद/शलमोन: १११७/१०७७/१०३७ सा.यु.पू. *

यहुदाचे राज्य तारीख (सा.यु.पू.) इस्राएलचे राज्य

रहबाम .............९९७............. यराबाम

अबीया/आसा ..........९८०/९७८.........

......९७६/९७५/९५२.... नादाब/बाशा/एला

.........९५१/९५१/९५१....... जिम्री/ओम्री/तिब्नी

......९४०........ अहाब

यहोशाफाट ...........९३७...............

............९२०/९१७.......... अहज्या/यहोराम

यहोराम ...........९१३.............

अहज्या ...........९०६............

(अथल्या) ...........९०५........... येहू

योवाश .........८९८..........

.........८७६/८५९......... यहोआहाज/योवाश

अमस्या .........८५८..........

.........८४४........... यराबाम २

अजऱ्‍या (उज्जीया) .....८२९........

........८०३/७९१/७९१........ जखऱ्‍या/शल्लूम/मनहेम

..........७८०/७७८......... पकह्‍या/पेकह

योथाम/अहाज .........७७७/७६२.........

......७५८.......... होशे

हिज्कीया ........७४६.........

........७४०....... शोमरोनाला ताब्यात घेतले जाते

मनश्‍शे/आमोन/योशीया .....७१६/६६१/६५९......

यहोआहाज/यहोयाकीम .....६२८/६२८.....

यहोयाखीन/सिदकीया .....६१८/६१७......

जेरुसलेमचा नाश होतो ..६०७..

[तळटीप]

^ परि. 66 काही तारखा, संबंधित राजाच्या राजवटीची सुरुवात झाली त्याच्या अंदाजे तारखा आहेत.

[८, ९ पानांवरील चित्र]

नामानाने स्वतःला नम्र केले त्यामुळे यहोवाने त्याला आपल्या शक्‍तीने बरे केले

[८, ९ पानांवरील चित्र]

एलीया ‘वावटळीतून वर गेला’ तेव्हा नेमके काय झाले?