व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाला संतुष्ट करणाऱ्‍या खऱ्‍या शिकवणी

देवाला संतुष्ट करणाऱ्‍या खऱ्‍या शिकवणी

देवाला संतुष्ट करणाऱ्‍या खऱ्‍या शिकवणी

कोणत्या शिकवणी खऱ्‍या व आपल्याला संतुष्ट करणाऱ्‍या आहेत हे जर पृथ्वीवरील रहिवाशांना समजण्याची गरज आहे तर मग देवाने आपले विचार मानवांना प्रकट करणे आवश्‍यक आहे. शिवाय, त्याने आपले विचार सर्वांना उपलब्ध करून दिले पाहिजेत. नाहीतर, कोणते सिद्धांत, कोणती उपासना, कोणते वर्तन देवाला स्वीकारयोग्य आहेत हे मानवजातीला कसे समजेल? देवाने अशाप्रकारची माहिती कळवली आहे का? कळवली आहे तर ती कशाप्रकारे?

अल्प जीवनकाळ असलेला कोणीही मनुष्य, सर्व मानवजातीपर्यंत पोहंचून देवाकडील संदेश सांगणारा माध्यम बनू शकेल का? मुळीच नाही. परंतु एक कायमस्वरुपी लेखी अहवालाच्या माध्यमाद्वारे सर्व मानवजातीपर्यंत देवाचा संदेश पोहंचवला जाऊ शकतो. यास्तव, देवाकडून आलेला संदेश एका पुस्तकाच्या रूपात उपलब्ध करून देणे उचित ठरणार नाही का? असेच एक सर्वात प्राचीन पुस्तक आहे जे देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आल्याचा दावा करते. ते पुस्तक आहे, बायबल. बायबलच्या एका लेखकाने असे लिहिले: “संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे, आणि तो शिक्षण, निषेध, सुधारणूक, न्यायीपणाचे शिकवणे, यांकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६, पं.र.भा.) तेव्हा, आपण बायबलचे जवळून परीक्षण करून ते खऱ्‍या शिकवणुकींचे स्रोत आहे की नाही ते पाहू या.

बायबल किती जुने पुस्तक आहे?

सर्व मुख्य धार्मिक पुस्तकांपैकी, बायबल हे सर्वात जुन्या पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे. त्याचे पहिले काही भाग सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी लिहिण्यात आले होते. सा.यु. ९८ मध्ये बायबलचे लेखन पूर्ण झाले. * १,६०० वर्षांच्या कालावधीत ४० वेगवेगळ्या पुरुषांनी या पुस्तकाचे लेखन केले असले तरी, यातील प्रत्येक पुस्तक परपस्पराशी संबंधित आहे. कारण, या पुस्तकाचा खरा लेखक देव आहे.

बायबल हे संपूर्ण इतिहासातले सर्वात अधिक खप असलेले व भाषांतरीत पुस्तक आहे. दर वर्षी, संपूर्ण बायबलच्या अथवा त्याच्या काही भागांच्या सुमारे ६ कोटी प्रतींचे वितरण केले जाते. संपूर्ण बायबल किंवा त्याच्या काही भागांचे २,३०० पेक्षा अधिक भाषांत आणि पोटभाषांत अनुवाद करण्यात आला आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक मानवांकडे, त्यांच्या मातृभाषेत संपूर्ण बायबल किंवा त्याचे काही भाग आहेत. या पुस्तकाने, राष्ट्रीय सीमा, जातीय भेद आणि वांशिक अडखळणांवर मात केली आहे.

या पुस्तकाची रचना कशी आहे?

तुमच्याकडे बायबल असेल तर तुम्ही स्वतःच ते उघडून त्याची रचना कशी करण्यात आली आहे ते पाहू शकता. * सर्वात पहिल्यांदा अनुक्रमणिका पाहा. बहुतेक बायबलमध्ये ही अनुक्रमणिका सुरुवातीलाच आहे. त्यात, प्रत्येक पुस्तकाचे नाव आणि ते पुस्तक कोणत्या पानावर आहे तो पृष्ठ क्रमांक दिलेला आहे. तुम्हाला दिसेल, की बायबल खरे तर अनेक पुस्तकांचा मिळून बनलेला एक मोठा संग्रहच आहे. आणि त्यातील प्रत्येक पुस्तकाचे एक अनोखे नाव आहे. सर्वात पहिल्या पुस्तकाचे नाव आहे उत्पत्ति आणि शेवटल्या पुस्तकाचे नाव आहे प्रकटीकरण. या पुस्तकांची दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या ३९ पुस्तकांना इब्री शास्त्रवचने म्हटले जाते कारण बहुतेक पुस्तके इब्री भाषेत लिहिण्यात आली होती. उरलेली २७ पुस्तके ग्रीक भाषेत लिहिण्यात आली होती त्यामुळे त्यांना ग्रीक शास्त्रवचने म्हणतात. काही जण या दोन विभागांना, जुना करार व नवीन करार असे म्हणतात.

बायबलमधील पुस्तकांत अध्याय व वचने आहेत, यामुळे आपण ते सहज उघडू शकतो. या मासिकात शास्त्रवचनांचा उल्लेख करण्यात आलेला असेल तर, बायबल पुस्तकाच्या नावाच्या नंतरचा आकडा म्हणजे त्या पुस्तकाचा अध्याय आणि त्यानंतरचा आकडा म्हणजे वचन. जसे की, “२ तीमथ्य ३:१६” म्हणजे, दुसरे तीमथ्य या पुस्तकातील ३ रा अध्याय आणि १६ वे वचन. तुम्हाला हे वचन काढता येते का ते पाहा.

बायबलशी परिचित होण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे त्याचे नियमित वाचन करणे, असे तुम्हाला वाटत नाही का? काहींनी, प्रथम ग्रीक शास्त्रवचने वाचण्यास सुरू केले, म्हणजे त्यांनी मत्तयाच्या पुस्तकापासून सुरुवात केली. दिवसाला तीन ते पाच अध्याय वाचण्याद्वारे तुम्ही एका वर्षात संपूर्ण बायबल वाचून काढू शकाल. पण बायबलमधून तुम्ही जे काही वाचता ते देवाने प्रेरित केलेले आहे, ही खात्री तुम्ही कशी बाळगू शकता?

तुम्ही बायबलवर भरवसा ठेवू शकता का?

ईश्‍वरप्रेरणेने लिहिलेल्या व सर्व लोकांसाठी असलेल्या पुस्तकात, जीवन कसे जगायचे याबद्दल कधी न बदलणारा सल्ला असला पाहिजे, नाही का? बायबलच्या सल्ल्यातून मनुष्य स्वभावाविषयी सूक्ष्म जाणिवेचे दर्शन घडते. यातील सल्ला मानवजातीच्या प्रत्येक पिढीला लागू होणारा आहे आणि त्यातील कालनिरपेक्ष तत्त्वे, पहिल्यांदा सांगण्यात आली तेव्हा जशी उपयुक्‍त होती तशीच आजही आहेत. हे, ख्रिस्ती धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त याने दिलेल्या एका जगप्रसिद्ध व्याख्यानातून सहज दिसून येते. हे व्याख्यान मत्तयाच्या ५ ते ७ अध्यायांमध्ये लिखित आहे. या व्याख्यानाला डोंगरावरील प्रवचन म्हणतात. ते आपल्याला फक्‍त, खरे सुख कसे मिळवायचे इतकेच सांगत नाही तर वाद कसे मिटवायचे, प्रार्थना कशी करायची, भौतिक गोष्टींबद्दल कोणता दृष्टिकोन बाळगायचा, इत्यादी विषयांबद्दलही सांगते. या प्रवचनात आणि इतर पुस्तकांद्वारे बायबल आपल्याला स्पष्टपणे, देवाला संतुष्ट करण्याकरता आपण काय केले पाहिजे, काय टाळले पाहिजे आणि आपले जीवन कसे सुधारायचे ते सांगते.

बायबलवर तुम्ही भरवसा का ठेवू शकता त्याचे आणखी एक कारण म्हणजे, ते जेव्हा वैज्ञानिक गोष्टींविषयी सांगते तेव्हा हे प्राचीन पुस्तक अचूक माहिती देते. उदाहरणार्थ एकेकाळी पुष्कळ लोक असे मानत, की पृथ्वी चपटी आहे. पण बायबलमध्ये ‘पृथ्वी गोलाकार’ * असल्याचा उल्लेख होता. (यशया ४०:२२, ईजी टू रीड व्हर्शन) आणि नामांकित वैज्ञानिक सर आयझक न्यूटनने, ग्रह गुरुत्वाकर्षण शक्‍तीमुळे मोकळ्या अवकाशात लोंबकळत आहेत असा खुलासा करण्याच्या ३,००० पेक्षा अधिक वर्षांआधी बायबलमध्ये काव्यात्मकपणे असे सांगण्यात आले, की “पृथ्वी निराधार टांगिली आहे.” (ईयोब २६:७) सुमारे ३,००० वर्षांआधी लिहून ठेवलेल्या पाण्याच्या चक्राच्या या काव्यरूपी वर्णनावर देखील विचार करा: “सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरून जात नाही; ज्या स्थली त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुनः पुनः वाहत राहतात.” (उपदेशक १:७) होय, विश्‍वाचा निर्माणकर्ता बायबलचा लेखक देखील आहे.

बायबल हे ईश्‍वरप्रेरणेने लिहिण्यात आले आहे या वस्तुस्थितीशी, बायबलची ऐतिहासिक अचूकता एकमतात आहे. बायबलमध्ये ज्या घटनांचे वर्णन करण्यात आले आहे त्या घटना निव्वळ मिथ्यकथा नाहीत. विशिष्ट तारखा, लोक आणि ठिकाणांशी त्या संबंधित आहेत. जसे की, लूक ३:१ म्हणते: “तिबिर्य कैसर ह्‍याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी पंतय पिलात यहूदीयाचा अधिकारी होता; हेरोद गालीलाचा मांडलिक” होता; ही वस्तुस्थिती आहे.

प्राचीन इतिहासकार सहसा शासकांच्या विजयकथा किंवा त्यांच्या चांगल्या गुणांविषयीच सांगतात; परंतु बायबलचे लेखक प्रामाणिक होते, त्यांनी आपल्या स्वतःच्या चुका उघडपणे कबूल केल्या. जसे की, इस्राएल राष्ट्राचा राजा दावीद याने असे कबूल केले: “जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे; . . . मी मोठा मूर्खपणा केला आहे.” दावीदाचे हे विधान बायबलमध्ये स्पष्टपणे लिहून ठेवण्यात आले आहे. (२ शमुवेल २४:१०) तसेच, बायबलचा आणखी एक लेखक मोशे याने, एका प्रसंगाचे वर्णन लिहून ठेवले जेव्हा त्याने खऱ्‍या देवावर भरवसा ठेवला नाही.—गणना २०:१२.

बायबल हे ईश्‍वरप्रेरणेने लिहिण्यात आले आहे यासाठी आणखी एक पुरावा आहे. तो पुरावा म्हणजे, पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या—आगाऊ लिहून ठेवलेला इतिहास. यांतील काही भविष्यवाण्या येशू ख्रिस्ताच्या संबंधाने आहेत. उदाहरणार्थ, येशूचा जन्म व्हायच्या ७०० वर्षांआधी, इब्री शास्त्रवचनांत अचूकपणे भाकीत करण्यात आले होते, की या वचनयुक्‍त जणाचा जन्म “यहूदीयातील बेथलेहेमात” होईल.—मत्तय २:१-६; मीखा ५:२.

आणखी एका उदाहरणाचा विचार करा. २ तीमथ्य ३:१-५ मध्ये बायबल म्हणते: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील.” हे सर्वसाधारणपणे आजच्या लोकांच्या मनोवृत्तीचे वर्णन नाही का? हे शब्द सा.यु. ६५ मध्ये म्हणजे १,९०० वर्षांपूर्वी लिहिण्यात आले होते!

बायबल आपल्याला काय शिकवते?

बायबलचा संदेश जसजसा तुमच्या डोळ्यांसमोर उलगडत जाईल तसतसे तुम्हाला दिसून येईल, की बायबल सर्वोच्च बुद्धीचा स्रोत आहे. देव कोण आहे? दियाबल खरा आहे का? येशू ख्रिस्त कोण आहे? आज दुःख का आहे? आपण मेल्यावर आपले काय होते? यासारख्या प्रश्‍नांची बायबलमध्ये समाधानकारक उत्तरे आहेत. लोकांचे जितके विश्‍वास व जितक्या प्रथा आहेत तितकीच, या प्रश्‍नांची भिन्‍नभिन्‍न उत्तरे लोकांकडून तुम्हाला ऐकायला मिळतील. परंतु बायबल यांविषयीची आणि इतरही विषयांवरची सत्य उत्तरे प्रकट करते. शिवाय, आपापसात आणि उच्च अधिकाऱ्‍यांबरोबर आपले वर्तन कसे असले पाहिजे आणि त्यांच्याप्रती आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे याबाबतीतही बायबलमधील सल्ला सर्वोत्तम आहे. *

पृथ्वी आणि मानवजातीबद्दल देवाचा काय उद्देश आहे याबद्दल बायबल काय सांगते? ते असे अभिवचन देते: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:१०, ११) “देव स्वतः [मानवजातीबरोबर] राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:३, ४) “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:२९.

बायबल हेही भाकीत करते, की युद्ध, गुन्हेगारी, हिंसा आणि दुष्टाई यांचा लवकरच अंत होणार आहे. आजारपण, वृद्धपण आणि मृत्यू राहणार नाही. पृथ्वीवरील परादीसातील सार्वकालिक जीवन एक वास्तविकता बनेल. किती ही आनंदविणारी आशा! आणि यावरून देवाला मानवजातीबद्दल किती प्रेम आहे हेही दिसून येते!

तुम्ही काय कराल?

बायबल हे निर्माणकर्त्याकडून आपल्याला मिळालेली एक अद्‌भुत भेटवस्तू आहे. हे पुस्तक वाचल्यावर तुमची प्रतिक्रिया काय असली पाहिजे? एका हिंदू मनुष्याला असे वाटत होते, की मानवजातीच्या फायद्यास्तव असलेले देवाकडून आलेले प्रकटन, मानव संस्कृतीचा उदय झाला तेव्हाचे असावयास हवे. बायबलचे भाग सर्वात प्राचीन हिंदू लिखाणांपेक्षा अर्थात वेदांपेक्षाही जुने आहेत हे जेव्हा त्याला समजले तेव्हा त्याने बायबलचे वाचन करून त्यातील संदेशाचे परीक्षण करण्याचे ठरवले. * संयुक्‍त संस्थानातील एका विद्यापीठातील प्राध्यापकांनासुद्धा, जगातील सर्वाधिक खप असलेले पुस्तक अर्थात बायबलचे, त्याविषयी कोणतेही मत तयार करण्याआधी त्याचे वाचन केले पाहिजे, ही जाणीव झाली.

बायबलचे वाचन व त्यातील शिकवणुकींचे पालन केल्यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतील. बायबल म्हणते: “जो पुरुष . . . परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे; आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” * (स्तोत्र १:१-३) बायबलचा अभ्यास व त्यावर मनन केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल कारण तुमची आध्यात्मिक भूक शमविली जाईल. (मत्तय ५:३, NW) आनंदी जीवन कसे जगायचे आणि समस्यांचा सामना यशस्वीरीत्या कसा करायचा ते बायबलमध्ये दाखवले आहे. होय, बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आलेले देवाचे निमय “पाळिल्याने मोठी फलप्राप्ती होते.” (स्तोत्र १९:११) शिवाय, देवाने दिलेल्या अभिवचनांवर भरवसा ठेवल्यामुळे तुम्हाला आताही आशीर्वाद मिळतील आणि भवितव्यात उज्जवल आशा मिळेल.

बायबल आपल्याला असे आर्जवते: “नूतन जन्मलेल्या बालकांसारखे [वचनाची] निऱ्‍या दुधाची इच्छा धरा.” (१ पेत्र २:३) तान्हे बाळ पोषण मिळण्याकरता दुधावर अवलंबून असते व ही गरज भागवण्यासाठी ते हट्ट करते. तसेच, आपलेही पोषण देवाकडून येणाऱ्‍या ज्ञानावर अवलंबून आहे. यास्तव आपण, त्याच्या वचनाची ‘इच्छा धरली पाहिजे’ किंवा उत्कंठा बाळगली पाहिजे. बायबल हे देवाकडच्या खऱ्‍या शिकवणुकींचे पुस्तक आहे. त्याचा नियमित अभ्यास करण्याचे ध्येय ठेवा. तुमच्या भागातील यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला अभ्यासाचा होता होईल तितका फायदा करून घ्यायला मदत करण्यास आनंद वाटेल. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधावा असे आम्ही आपल्याला प्रेमळ आमंत्रण देतो. किंवा, तुम्ही या मासिकाच्या प्रकाशकांना लिहू शकता. (w०५ ७/१५)

[तळटीपा]

^ परि. 5 सा.यु. म्हणजे “सामान्य युग.” याला सहसा इ.स. अर्थात इसवी सन म्हणजे “प्रभूच्या वर्षात” असे म्हणतात. सा.यु.पू. म्हणजे “सामान्य युग पूर्व.”

^ परि. 8 तुमच्याकडे बायबलची व्यक्‍तिगत प्रत नसेल तर यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला एक प्रत द्यायला आनंद वाटेल.

^ परि. 13 यशया ४०:२२ मध्ये ‘गोलाकार’ असे भाषांतरीत केलेल्या मूळ भाषेतल्या शब्दाचा अनुवाद ‘मंडल’ असाही करता येतो. काही बायबल अनुवादांमध्ये, “पृथ्वीचा गोल” (डुए व्हर्शन) आणि “गोल पृथ्वी” (मोफॅट) असेही म्हटले आहे.

^ परि. 19 या विषयांची चर्चा, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकात करण्यात आली आहे.

^ परि. 23 वेदांतील सर्वात प्राचीन स्तोत्रे, जवळजवळ ३,००० वर्षांआधी रचून मौखिकरीत्या त्यांचा प्रसार करण्यात आला, असे समजले जाते. “इ.स. चवदाव्या शतकात वेदांचे लिखाण झाले,” असे पी. के. सरतकुमार, भारताचा इतिहास (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात म्हणतात.

^ परि. 24 यहोवा हे बायबलमधील देवाचे नाव आहे. अनेक भाषांतरात ते नाव स्तोत्र ८३:१८ या वचनांत आढळते.

[७ पानांवरील चित्र]

देवाच्या वचनाची “इच्छा धरा.” बायबलचा नियमित अभ्यास करा

[५ पानांवरील चित्राचे श्रेय]

NASA photo