व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाने “तुमच्या डोक्यावरले सर्व केस” मोजले आहेत

यहोवाने “तुमच्या डोक्यावरले सर्व केस” मोजले आहेत

यहोवाने “तुमच्या डोक्यावरले सर्व केस” मोजले आहेत

‘तुमच्या पित्यावाचून एकहि चिमणी भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत.’—मत्तय १०:२९, ३०.

१, २. (क) देवाने आपल्याला सोडून दिले आहे असे ईयोबाला का वाटले? (ख) ईयोबाच्या शब्दांवरून, तो देवाचा विरोधी बनला होता असे सिद्ध होते का? स्पष्ट करा.

“हे देवा, साहाय्यासाठी मी तुला हाक मारतो, पण तू मला उत्तर देत नाहीस; मी तुझ्यासमोर उभा राहतो, पण माझ्याकडे पाहण्याचा त्रासदेखील तू घेत नाहीस. तू माझ्याशी निष्ठूर झाला आहेस, आणि आपल्या बाहुबलाने मला छळीत आहेस.” हे उद्‌गार काढणारा मनुष्य दुःखाने व्याकूळ झाला होता. आणि याला कारणही तसेच होते! त्याच्या उपजिविकेचे साधन नष्ट झाले होते, एका आकस्मिक दृर्घटनेत त्याची मुलेबाळे ठार झाली होती आणि आता त्याला एका भयानक रोगाने ग्रासले होते. या मनुष्याचे नाव होते, ईयोब आणि त्याच्यावर आलेली भयंकर परिस्थिती बायबलमध्ये आपल्या फायद्याकरता लिहून ठेवण्यात आली आहे.—ईयोब ३०:२०, २१, सुबोध भाषांतर.

ईयोबाच्या शब्दांवरून कदाचित असे वाटेल की तो देवाचा विरोधी बनला होता, पण हे खरे नाही. ईयोब केवळ आपल्या मनातले अतीव दुःख व्यक्‍त करत होता. (ईयोब ६:२, ३) त्याच्या परीक्षांना सैतान कारणीभूत होता हे त्याला माहीत नव्हते आणि त्यामुळे देवाने आपल्याला त्यागले आहे असा चुकीचा निष्कर्ष त्याने काढला. एक वेळी तर ईयोबाने यहोवाला असेही म्हटले: “तू आपले तोंड का लपवितोस? मला आपला वैरी का लेखितोस?” *ईयोब १३:२४.

३. संकटे येतात तेव्हा आपल्या मनात कशाप्रकारचे विचार येऊ शकतात?

आजही युद्धे, राजकीय किंवा सामाजिक उलथापालथ, नैसर्गिक विपत्ती, म्हातारपण, आजार, घोर दारिद्र्‌य व सरकारी प्रतिबंध यांमुळे यहोवाच्या लोकांपैकी अनेकांना एका पाठोपाठ अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कदाचित तुम्हीपण कोणत्या न कोणत्या कठीण परिस्थितीतून जात असाल. कधीकधी तुम्हालाही वाटत असेल की यहोवा आपल्यापासून त्याचे तोंड लपवीत आहे. योहान ३:१६ येथे काय म्हटले आहे हे तुम्हाला चांगले ठाऊक असेल: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.” पण तरीसुद्धा, जेव्हा तुमच्या समस्यांतून सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा तुम्हाला कदाचित असे वाटत असेल: ‘देवाचे खरोखरच माझ्यावर प्रेम आहे का? मला काय सोसावं लागतंय हे तो पाहतो का? व्यक्‍तिशः माझ्याबद्दल त्याला काळजी वाटते का?’

४. पौल बऱ्‍याच काळापासून कोणत्या समस्येला तोंड देत होता आणि अशा प्रकारच्या परिस्थितीचा आपल्यावर कसा परिणाम होऊ शकतो?

प्रेषित पौलाच्या बाबतीत काय घडले याचा विचार करा. त्याने लिहिले: “माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे.” पुढे तो म्हणतो: “हा माझ्यापासून दूर व्हावा म्हणून मी प्रभूला तीनदा विनंती केली.” यहोवाने त्याच्या विनंत्या ऐकल्या. पण त्याने पौलाला असे कळवले की तो हस्तक्षेप करून पौलाची समस्या चमत्कारिक रित्या सोडवणार नाही. उलट, पौलाला आपल्या ‘शरीरातल्या काट्याला’ तोंड देण्याकरता देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहावे लागेल. * (२ करिंथकर १२:७-९) पौलाप्रमाणेच, तुम्हीपण कदाचित बऱ्‍याच काळापासून एखाद्या कठीण परिस्थितीला तोंड देत असाल. कदाचित तुम्ही असा विचार करत असाल, ‘माझे संकट दूर करण्यासाठी अद्याप यहोवाने काहीही केलेले नाही; याचा अर्थ असा तर नाही, की त्याला माझ्या परिस्थितीची जाणीवच नाही, किंवा त्याला माझी काळजीच वाटत नाही?’ याचे उत्तर म्हणजे, नाही, असे मुळीच नाही! यहोवाला आपल्या विश्‍वासू सेवकांपैकी प्रत्येकाबद्दल किती कळकळ आहे ही गोष्ट येशूने आपल्या प्रेषितांना निवडल्यानंतर त्यांना जे सांगितले होते त्यावरून स्पष्ट होते. त्याचे शब्द आज आपल्याला कसे प्रोत्साहन देऊ शकतात याविषयी पाहू या.

“भिऊ नका”—का?

५, ६. (क) भविष्यात जे घडणार होते त्याची भीती न बाळगण्यास येशूने प्रेषितांना कशी मदत केली? (ख) यहोवाला आपली काळजी वाटते याबद्दल आत्मविश्‍वास असल्याचे पौलाने कसे दाखवले?

प्रेषितांना येशूकडून असाधारण सामर्थ्य मिळाले होते. उदाहरणार्थ येशूने त्यांना “अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार” दिला होता. पण त्यांच्या मार्गात कोणत्याही परीक्षा किंवा संकटे येणार नाहीत असा याचा अर्थ नव्हता. उलट येशूने त्यांच्यावर कोणकोणती संकटे येतील हे त्यांना सविस्तर सांगितले. पण तरीपण त्याने त्यांना असे प्रोत्साहन दिले: “जे शरीराचा घात करितात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्‍या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या.”—मत्तय १०:१, १६-२२, २८.

शिष्यांनी का भिऊ नये हे समजण्यास त्यांना मदत करण्याकरता येशूने दोन दृष्टान्त दिले. त्याने त्यांना म्हटले: “दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्यावाचून त्यातून एकहि भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.” (मत्तय १०:२९-३१) संकटांना तोंड देताना न भिण्याचा संबंध, येशूने आपल्यापैकी प्रत्येकाबद्दल यहोवाला काळजी आहे असा आत्मविश्‍वास बाळगण्याशी जोडला याकडे लक्ष द्या. प्रेषित पौलाला असा आत्मविश्‍वास होता. त्याने लिहिले: “देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही?” (रोमकर ८:३१, ३२) तुम्हाला कोणत्याही संकटांना तोंड द्यावे लागले तरीही तुम्ही ही खात्री बाळगू शकता की जोपर्यंत तुम्ही यहोवाला विश्‍वासू राहाल तोपर्यंत तो तुमची व्यक्‍तिशः काळजी वाहील. येशूने आपल्या प्रेषितांना दिलेल्या आज्ञेवरून ही गोष्टी आणखी स्पष्ट होईल.

चिमणीचे मोल

७, ८. (क) येशू पृथ्वीवर होता त्या काळात चिमण्यांबद्दल लोकांचा कसा दृष्टिकोन होता? (ख) मत्तय १०:२९ येथे “चिमण्या” असे भाषांतर करताना अगदी लहान चिमण्यांना सूचित करणारा ग्रीक शब्द का वापरला आहे?

येशूने रेखाटलेल्या शब्दचित्रांवरून यहोवाला आपल्या प्रत्येक सेवकाबद्दल वाटणारी कळकळ अतिशय स्पष्टपणे व्यक्‍त होते. त्याने दिलेल्या चिमण्यांच्या उदाहरणाचा आधी विचार करू या. येशू या पृथ्वीवर होता त्या काळात लोक चिमण्यांचा आपल्या आहारात वापर करीत. पण चिमण्या पिकांची नासाडी करत असल्यामुळे शेतकऱ्‍यांना त्या त्रासदायक वाटत. त्या काळात चिमण्या अगदी मुबलकपणे आणि स्वस्त भावात उपलब्ध होत्या. किंबहुना, आजच्या चलनानुसार दोन रुपयांपेक्षा कमी किंमतीत दोन चिमण्या विकत घेता येत होत्या. शिवाय, याच्या दुप्पट किंमत दिल्यास चार नव्हे तर पाच चिमण्या मिळत—पाचवी चिमणी फुकट दिली जात, जणू तिचे काही मोलच नव्हते!—लूक १२:६.

या अगदी सामान्य पक्ष्याच्या आकाराचाही विचार करा. दुसऱ्‍या पक्ष्यांच्या तुलनेत, पूर्ण वाढ झालेली चिमणीसुद्धा अगदी लहान असते. तरीपण मत्तय १०:२९ येथे “चिमण्या” असे भाषांतर केलेला मूळ ग्रीक शब्द सर्वसामान्य चिमण्यांना नव्हे तर लहानशा चिमण्यांना सूचित करतो. यावरून दिसून येते, की येशू त्याच्या प्रेषितांना हे उदाहरण देताना अगदीच क्षुल्लक समजल्या जाणाऱ्‍या पक्ष्यांची कल्पना करण्यास सांगत होता. एका संदर्भ ग्रंथानुसार, “येशूने अगदी लहानशा पक्ष्याचे उदाहरण घेतले आणि शिवाय, ‘अगदी लहान’ असे विशेषण वापरले!”

९. येशूने दिलेल्या चिमण्यांच्या उदाहरणावरून कोणता महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट होतो?

येशूने दिलेले चिमण्यांचे उदाहरण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगून जाते: मनुष्यांच्या नजरेत जे कवडीमोल भासते ते यहोवा देवाला महत्त्वाचे वाटते. या वस्तूस्थितीवर आणखी भर देण्याकरता येशूने असेही सांगितले की यहोवाच्या नकळत या लहानशा चिमण्यांपैकी एकही “भूमीवर पडणार” नाही. * मुद्दा अगदी स्पष्ट आहे. जर यहोवा देव लहानतल्या लहान, व सर्वात क्षुल्लक पक्ष्याची दखल घेतो तर मग त्याची सेवा करण्याचा संकल्प केलेल्या एका मनुष्याच्या सुखदुःखाची त्याला किती जास्त कळकळ असेल!

१०. “तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत” या विधानावरून काय सूचित होते?

१० चिमण्यांच्या या उदाहरणासोबत येशूने असेही म्हटले: “तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत.” (मत्तय १०:३०) या संक्षिप्त पण अर्थभरीत विधानावरून, चिमण्यांच्या उदाहरणातून येशूने सिद्ध केलेला मुद्दा अधिकच स्पष्ट होतो. विचार करा: मनुष्याच्या डोक्यावर सरासरी १,००,००० केस असतात. तसे पाहिल्यास, सगळे केस एकसारखेच दिसतात, कोणत्याही एका केसाकडे आपण विशेष लक्ष देत नाही. तरीपण यहोवा देव मात्र प्रत्येक केस पाहतो व मोजतो. तर मग, आपल्या जीवनातली कोणतीही गोष्ट, मग ती कितीही बारीक असली तरी, ती यहोवाला माहीत नाही असे होऊ शकते का? नक्कीच नाही. यहोवा त्याच्या सेवकांपैकी प्रत्येकाची वैशिष्ट्यपूर्ण जडणघडण जाणतो. तो “हृदय पाहतो.”—१ शमुवेल १६:७.

११. यहोवा आपली व्यक्‍तिशः काळजी घेतो याबद्दल दाविदाने आत्मविश्‍वास कशाप्रकारे व्यक्‍त केला?

११ दावीदाने अनेक खडतर प्रसंग अनुभवले होते, पण त्याला खात्री होती की यहोवा त्याच्याकडे लक्ष देतो. त्याने लिहिले: “हे परमेश्‍वरा, तू मला पारखिले आहे, तू मला ओळखितोस. माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस.” (स्तोत्र १३९:१, २) तुम्हीपण याची खात्री बाळगू शकता की यहोवा तुम्हाला वैयक्‍तिकरित्या ओळखतो. (यिर्मया १७:१०) तेव्हा, आपण फार क्षुल्लक आहोत, आपली तो दखल घेणार नाही असे कधीही समजू नका. कारण यहोवाचे डोळे सर्व काही पाहू शकतात.

माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेविली आहेत”

१२. यहोवाच्या लोकांना जी संकटे सोसावी लागतात त्यांची त्याला पूर्ण कल्पना आहे हे आपण कशावरून म्हणू शकतो?

१२ यहोवा आपल्या प्रत्येक सेवकाला व्यक्‍तिशः ओळखतो, इतकेच नव्हे, तर प्रत्येकाला सोसाव्या लागणाऱ्‍या संकटांचीही त्याला पूर्ण कल्पना आहे. उदाहरणार्थ गुलामगिरीत असलेल्या इस्राएलांवर जुलूम केले जात होते तेव्हा यहोवाने मोशेला म्हटले: “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे; त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे.” (निर्गम ३:७) आपण एखाद्या परीक्षा प्रसंगाला तोंड देत असतो तेव्हा यहोवा ते पाहतो आणि आपला आक्रोशही ऐकतो हे जाणून आपल्याला किती दिलासा मिळतो! तो आपल्या दुःखाबद्दल बेपर्वा मुळीच नाही.

१३. यहोवाला आपल्या सेवकांबद्दल खरोखर कळकळ वाटते हे कशावरून दिसून येते?

१३ यहोवासोबत नातेसंबंध जोडलेल्यांबद्दल त्याला किती कळकळ वाटते हे इस्राएलांबद्दल त्याला ज्या भावना होत्या त्यांवरून दिसून येते. त्यांच्यावर सहसा त्यांच्याच दुराग्रहीपणामुळे संकटे आली तरीसुद्धा यशयाने यहोवाबद्दल असे लिहिले: “त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला.” (यशया ६३:९) तेव्हा, यहोवाचे विश्‍वासू सेवक या नात्याने तुम्ही ही खात्री बाळगू शकता की तुम्हाला यातना होत असतात तेव्हा यहोवालाही यातना होतात. हे जाणून, तुम्हाला सर्व संकटांना निर्भयपणे तोंड देण्याची आणि आपल्या परीने होईल तितक्या चांगल्याप्रकारे यहोवाची सेवा करण्याची प्रेरणा मिळत नाही का?—१ पेत्र ५:६, ७.

१४. स्तोत्र ५६ हे कोणत्या परिस्थितीत रचण्यात आले?

१४ यहोवा आपली काळजी वाहतो, आपल्या दुःखात तोही दुःखी होतो याबद्दल दाविदाला किती खात्री होती हे स्तोत्र ५६ वाचल्यावर स्पष्ट होते. हे स्तोत्र दाविदाने त्याच्या जिवावर उठलेल्या राजा शौलापासून पळ काढताना रचले होते. दावीद गथ येथे पळून गेला पण पलिष्टी लोकांनी त्याला ओळखले आणि आता ते आपल्याला धरतील अशी दाविदाला भीती वाटू लागली. त्याने लिहिले: “दिवसभर माझे शत्रु मला तुडवीत आहेत माझ्याशी मगरुरीने लढणारे बहुत आहेत.” या भयानक परिस्थितीत दावीद यहोवाकडे वळाला. तो म्हणाला, “दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपर्यांस करितात; त्यांचे सर्व विचार माझ्याविरुद्ध माझ्या वाइटासाठी असतात.”—स्तोत्र ५६:२,.

१५. (क) यहोवाने आपली आसवे एका बुधलीत किंवा पुस्तकात नमूद करून ठेवली आहेत असे दाविदाने का म्हटले? (ख) आपल्या विश्‍वासाची परीक्षा घेणाऱ्‍या एखाद्या प्रसंगाला आपण तोंड देत असतो तेव्हा आपण कशाविषयी खात्री बाळगू शकतो?

१५ मग स्तोत्र ५६:८ यात लिहिल्याप्रमाणे, दावीद ही लक्षवेधक विधाने करतो: “माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजिली आहेत; माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेविली आहेत; तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय?” यहोवाला मनापासून वाटणाऱ्‍या काळजीचे किती हे हृदयस्पर्शी वर्णन! आपण तणावाखाली असतो तेव्हा कदाचित आपण अश्रू गाळून यहोवाची प्रार्थना करत असू. परिपूर्ण मनुष्य असणाऱ्‍या येशूनेही अशा प्रार्थना केल्या होत्या. (इब्री लोकांस ५:७) दाविदाला खात्री होती की यहोवा त्याला पाहतो आणि तो त्याच्या वेदना विसरणार नाही. जणू त्याची आसवे तो एका बुधलीत सांभाळून ठेवील किंवा एका पुस्तकात नमूद करून ठेवील. * आपल्या परिस्थितीचा विचार केल्यावर कदाचित तुम्ही म्हणाल, की माझ्या आसवांनी तर देवाची बुधली भरून जाईल किंवा त्याच्या पुस्तकातली अनेक पाने भरून जातील. तुम्हाला असे वाटत असले तरी धीर सोडू नका. बायबल आपल्याला आश्‍वासन देते: “परमेश्‍वर भग्नहृदयी लोकांच्या सन्‍निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.”—स्तोत्र ३४:१८.

देवाशी सख्य करणे

१६, १७. (क) यहोवा त्याच्या लोकांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांबद्दल बेपर्वा नाही हे आपल्याला कशावरून कळते? (ख) लोकांना आपले सख्य अनुभवता यावे म्हणून यहोवाने काय केले आहे?

१६ यहोवाने आपल्या ‘डोक्यावरले सर्व केस मोजले आहेत’ हे समजल्यावर, ज्या देवाची उपासना करण्याचा बहुमान आपल्याला लाभला आहे, तो आपल्याकडे किती लक्ष देतो आणि आपल्याबद्दल त्याला किती काळजी वाटते याची कल्पना आपल्याला येते. सगळी दुःखे नाहीशी होण्याकरता आपल्याला देवाने वचन दिलेल्या नव्या जगाची वाट पाहावी लागेल. पण आजही यहोवा आपल्या लोकांकरता अद्‌भूत असे काहीतरी करत आहे. दाविदाने लिहिले: “परमेश्‍वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्‍याशी असते; तो आपला करार त्यांस कळवील.”—स्तोत्र २५:१४.

१७ “परमेश्‍वराचे सख्य.” अपरिपूर्ण मानवांकरता ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे असे भासते! पण यहोवा त्याचे भय मानणाऱ्‍या सर्वांना आपल्या मंडपात वस्ती करण्याचे निमंत्रण देतो. (स्तोत्र १५:१-५) आणि यहोवा आपल्या मंडपात येणाऱ्‍यांकरता काय करतो? दाविदाप्रमाणे, तो त्यांना आपला करार कळवतो. यहोवा त्यांच्याशी हितगुज करतो, आपले “रहस्य” संदेष्ट्यांना कळवतो जेणेकरून देवाचे उद्देश जाणून ते त्याप्रमाणे जगू शकतील.—आमोस ३:७.

१८. यहोवाशी आपला जवळचा नातेसंबंध असावा असे त्याला वाटते हे कशावरून दिसून येते?

१८ आपण अपरिपूर्ण मानव असूनही सर्वसमर्थ यहोवा देवाशी सख्य करू शकतो ही कल्पनाच भारावून टाकणारी आहे. यहोवा आपल्याला अगदी हेच करण्याचा आग्रह करतो. बायबल सांगते, “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” (याकोब ४:८) यहोवाची इच्छा आहे की आपला त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध असावा. किंबहुना त्याच्याशी असा नातेसंबंध आपल्याला जोडता यावा म्हणून त्याने स्वतःहूनच काही पावले उचलली आहेत. येशूच्या खंडणी बलिदानामुळे आपल्याकरता सर्वसमर्थ देवाशी सख्य करण्याचा मार्ग खुला झाला आहे. बायबल सांगते: “पहिल्याने त्याने आपणावर प्रीति केली, म्हणून आपण प्रीति करितो.”—१ योहान ४:१९.

१९. धीर धरल्यामुळे यहोवासोबतचा आपला नातेसंबंध कशाप्रकारे अधिकच घनिष्ठ बनू शकतो?

१९ आपण कठीण परिस्थितीला तोंड देत असतो तेव्हा हा जवळचा नातेसंबंध अधिकच घनिष्ठ बनतो. शिष्य याकोबाने लिहिले: “धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्‍यासाठी की, तुम्ही कशांतहि उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.” (याकोब १:४) कठीण परिस्थितीत धीर धरताना कोणते “कार्य” पूर्ण होते? पौलाच्या ‘शरीरातला काटा’ तुम्हाला आठवतो का? त्याच्या बाबतीत, धीर धरल्याने काय साध्य झाले? आपल्या परीक्षांविषयी पौलाने असे म्हटले: “ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषकरून आपल्या अशक्‍तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्‍यात मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्‍त तेव्हाच मी सशक्‍त आहे.” (२ करिंथकर १२:९, १०) आपल्याला परीक्षांना तोंड देताना धीर धरता यावा म्हणून यहोवा आवश्‍यक सामर्थ्य—गरज पडल्यास ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देखील पुरवेल हे पौलाने स्वतः अनुभवले होते. यामुळे तो ख्रिस्ताच्या व यहोवा देवाच्या आणखी जवळ आला.—२ करिंथकर ४:७; फिलिप्पैकर ४:११-१३.

२०. संकटांतही यहोवा आपल्याला आधार व दिलासा देईल याची आपण खात्री कशाप्रकारे बाळगू शकतो?

२० कदाचित यहोवाने तुमच्या परीक्षा चमत्कारिकरित्या काढून टाकण्याऐवजी, त्या राहू दिल्या असतील. असे असल्यास, त्याने आपले भय मानणाऱ्‍यांना दिलेली ही प्रतिज्ञा नेहमी आठवणीत असू द्या: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” (इब्री लोकांस १३:५) यहोवाचा हा आधार व दिलासा तुम्ही अनुभवू शकता. यहोवाने तुमच्या “डोक्यावरले सर्व केस मोजले आहेत.” तुम्ही धीर धरता हे तो पाहतो. तुमच्या वेदना त्यालाही जाणवतात. त्याला खरोखर तुमची काळजी आहे. शिवाय, ‘तुमचे कार्य आणि तुम्ही त्याच्यावर दाखविलेली प्रीति’ तो कधीही विसरून जाणार नाही.—इब्री लोकांस ६:१०. (w०५ ८/१)

[तळटीपा]

^ परि. 2 धार्मिक वृत्तीच्या दावीदाने व कोरहच्या विश्‍वासू पुत्रांनीही याच अर्थाची विधाने केली होती.—स्तोत्र १०:१; ४४:२४.

^ परि. 4 पौलाच्या ‘शरीरातला काटा’ नेमका काय होता याविषयी बायबल स्पष्ट सांगत नाही. कदाचित हे त्याला असलेले एखादे शारीरिक दुखणे असावे उदाहरणार्थ, क्षीण दृष्टी. किंवा ‘शरीरातला काटा’ ही संज्ञा खोट्या प्रेषितांना व अशा इतरांना सूचित करत असावी जे पौलाचे प्रेषितपण व सेवाकार्य यांविषयी शंका घेत होते.—२ करिंथकर ११:६, १३-१५; गलतीकर ४:१५; ६:११.

^ परि. 9 काही विद्वानांच्या मते, चिमण्या भूमीवर पडतात म्हणजे त्या मरतात, एवढेच सूचित होत नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की मूळ भाषेत या ठिकाणी वापरलेला शब्दप्रयोग चिमण्यांचे अन्‍न शोधण्यासाठी जमिनीवर बसण्याला सूचित करते. जर खरोखरच असा अर्थ असेल, तर मग यावरून असा निष्कर्ष काढता येईल की हा लहानसा पक्षी मरतो तेव्हाच नाही, तर त्याच्या दैनंदिन कार्यांतही देव त्याची दखल घेतो, त्याची काळजी वाहतो.—मत्तय ६:२६.

^ परि. 15 प्राचीन काळी, बुधल्या सहसा शेरड्या-मेंढरांच्या किंवा गुरांच्या कातडीपासून बनवल्या जात. या बुधल्यांमध्ये दूध, लोणी, पनीर किंवा पाणी ठेवले जात. ज्यांवर जास्त प्रक्रिया केलेली असेल अशा कातडीपासून बनवलेल्या बुधल्यांमध्ये तेल किंवा द्राक्षारस ठेवला जाई.

तुम्हाला आठवते का?

• कोणत्या कारणांमुळे एका व्यक्‍तीला असे वाटू शकते की देवाने तिला त्यागले आहे?

• येशूने दिलेल्या चिमण्यांच्या आणि आपल्या डोक्यावरील केस मोजण्याविषयीच्या उदाहरणांवरून आपण काय शिकतो?

• आपली आसवे यहोवाच्या “बुधलीत” किंवा “पुस्तकात” नमूद असण्याचा काय अर्थ होतो?

• आपण यहोवाशी “सख्य” कसे अनुभवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२४ पानांवरील चित्र]

यहोवाने पौलाच्या ‘शरीरातला काटा’ का काढून टाकला नाही?