व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकनिष्ठेचे फायदे

एकनिष्ठेचे फायदे

एकनिष्ठेचे फायदे

काही देशांत मुलांना, एखाद्या सवंगड्याच्या स्वेटरवर गोखरू फेकून चिडवायला मजा वाटते. हे गोखरू स्वेटरवर एकदा चिकटले, की निघता निघत नाहीत. त्यांचा सवंगडी, चालला काय, पळाला काय, स्वतःला गदागदा हलवले काय किंवा त्याने जोरजोरात उड्या मारल्या तरी हे गोखरू मात्र स्वेटरवर घट्ट चिकटून राहतात. त्यांना काढायचा फक्‍त एकच मार्ग उरतो. एकेक गोखरू अक्षरशः ओढून काढावा लागते. मुलांना यात खूपच मजा येते.

अर्थात, सर्वांनाच आपल्या कपड्यावर गोखरू चिकटलेले आवडणार नाही; पण हे गोखरू कपड्याला कसे घट्ट चिकटून राहतात, याचे सर्वांना आश्‍चर्य वाटते. एकनिष्ठ व्यक्‍तीत असाच गुण असतो. एकनिष्ठ व्यक्‍तीची जेव्हा कोणाबरोबर जोडी जमते तेव्हा ती आमरण राहते. इमानदार व्यक्‍ती या नातेसंबंधातील कतर्व्ये आणि जबाबदाऱ्‍या, कठीण परिस्थितीतही विश्‍वासूपणे पार पाडते. “एकनिष्ठता” हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात लगेच, सच्चेपणा, इमानदारी, श्रद्धा यासारखे सद्‌गुण येतात. लोक तुमच्याशी एकनिष्ठ असतात तेव्हा तुम्हाला कदाचित ते आवडेल परंतु, तुमच्यामध्ये इतरांशी एकनिष्ठ असण्याचे मनोबल आहे का? आहे तर, तुम्ही कोणाशी एकनिष्ठ असावयास हवे?

विवाहातील एकनिष्ठा—मूलभूत गरज

विवाह एक असे क्षेत्र आहे ज्यात एकनिष्ठा दाखवणे आवश्‍यक आहे. परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे बहुतेक विवाहात याच गुणाची कमतरता आहे. आपल्या विवाह शपथा पाळणाऱ्‍या पतीपत्नीने, सुख आणि सुरक्षितता मिळवण्याकरता एक महत्त्वाचे पाऊल उचललेले असते. दुसऱ्‍या शब्दांत ते एकमेकांशी जडून राहतात आणि प्रत्येक जण एकमेकांच्या भल्यासाठी कार्य करतो. असे का? कारण, मानवांना एकनिष्ठ असण्याच्या व एकनिष्ठा मिळवण्याच्या गरजेसह निर्माण करण्यात आले होते. एदेन बागेत, आदाम आणि हव्वेचा विवाह लावल्यानंतर देवाने म्हटले: “पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील.” पत्नीलाही हेच तत्त्व लागू होणार होते; तिने देखील आपल्या पतीशी जडून राहायचे होते. पती-पत्नीने एकमेकांशी विश्‍वासू राहून एकमेकांना सहकार्य द्यायचे होते.—उत्पत्ति २:२४; मत्तय १९:३-९.

पण ही तर हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट होती. याचा अर्थ विवाहात एकनिष्ठा दाखवण्याची रीत आज जुनी झाली आहे का? पुष्कळ जण या प्रश्‍नाचे उत्तर, नाही असे देतील. जर्मनीतील संशोधकांना असे आढळून आले आहे, की ८० टक्के लोक, विवाहात एकनिष्ठा असणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असे मानतात. कोणते गुण पुरुषांत व स्त्रियांत असले पाहिजेत, हे शोधून काढण्यासाठी आणखी एक सर्व्हे घेण्यात आला. पुरुषांच्या एका गटाला, स्त्रियांत कोणते पाच गुण असले पाहिजेत आणि स्त्रियांच्या एका गटाला, पुरुषांत कोणते पाच गुण असले पाहिजेत, असे विचारण्यात आले. तेव्हा, पुरुष व स्त्रिया या दोघांनी, एकनिष्ठा हा गुण सर्वात महत्त्वपूर्ण आहे असे म्हटले.

होय, इमानदारी यशस्वी विवाहाच्या पायाचा एक भाग आहे. पण, आपण मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे एकनिष्ठा किंवा इमानदारी या सद्‌गुणाची आचरणापेक्षा वाहवाहच अधिक होते. उदाहरणार्थ, पुष्कळ देशांतील घटस्फोटाचे वाढलेले प्रमाण, बेईमानी किती सामान्य गोष्ट बनली आहे याचा पुरावा देते. विवाह सोबती या प्रवृत्तीचा प्रतिकार करून एकमेकांशी विश्‍वासू कसे राहू शकतात?

एकनिष्ठेमुळे विवाह टिकाऊ होतो

विवाह सोबती, एकदुसऱ्‍याबद्दल नितांत प्रेम आहे हे व्यक्‍त करण्यासाठी संधी शोधत असतात तेव्हा इमानदारी दाखवतात. जसे की, ते “तुझ-माझं” करण्यापेक्षा, “आपले मित्र,” “आपली मुले,” “आपलं घर,” “आपला अनुभव,” इत्यादी इत्यादी, असे म्हणतात. घर, नोकरी, मुलांचे संगोपन, मनोरंजन, सुट्या किंवा धार्मिक कार्ये यांच्यासंबंधाने योजना बनवताना किंवा निर्णय घेताना पती व पत्नीने एकमेकांच्या भावना व मते विचारात घेतली पाहिजेत.—नीतिसूत्रे ११:१४; १५:२२.

प्रत्येक सोबती एकमेकांना, ते हवेहवेसे आहेत, आपल्याला त्यांची गरज आहे असे जाणवू देऊन इमानदारी दाखवतात. विवाहातील एक साथीदार, विरुद्धलिंगी व्यक्‍तीबरोबर जास्त मनमिळाऊपणे वागतो तेव्हा दुसऱ्‍या साथीदाराला असुरक्षित वाटू लागते. बायबल पुरुषांना असा सल्ला देते, की त्यांनी “तरुणपणी केलेल्या स्त्रीसह” जडून राहावे. पतीने आपल्या पत्नीव्यतिरिक्‍त इतर कोणत्याही स्त्रीचे आपल्याकडे लक्ष आकर्षित करण्याची इच्छा आपल्या मनात उत्पन्‍न होऊ देऊ नये. त्याने निश्‍चित्तच परक्या स्त्रीबरोबर शारीरिक संबंध जोडू नयेत. बायबल अशी ताकीद देते: “स्त्रीशी जारकर्म करणारा अक्कलशून्य आहे. जो आपल्या जिवाचा नाश करून घेऊ पाहतो तो असे करितो.” इमानदारीचा किंवा विश्‍वासूपणाचा हाच उच्च दर्जा पत्नीकडूनही अपेक्षिला जातो.—नीतिसूत्रे ५:१८; ६:३२.

विवाहात विश्‍वासूपणा दाखवणे खरोखरच फायदेकारक आहे का? अर्थात! विश्‍वासूपणामुळे विवाहाला अधिक स्थैर्य लाभते. तो चिरकाल टिकतो आणि विवाहातील प्रत्येक साथीदाराला याचा फायदा होतो. जसे की, पती जेव्हा आपल्या पत्नीच्या कल्याणाची विश्‍वासूपणे काळजी घेतो तेव्हा पत्नीला सुरक्षिततेची एकप्रकारची जाणीव होते व यामुळे ती आपल्या अंगी असलेले उत्तम गुण प्रदर्शित करते. पतीच्या बाबतीतही हे खरे आहे. आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहण्याच्या त्याच्या निश्‍चयामुळे त्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात नीतिमान तत्त्वांशी जडून राहण्याची समर्पण वृत्ती निर्माण करायला मदत होते.

पती-पत्नीच्या जीवनात आणीबाणीचा प्रसंग येतो तेव्हा एकनिष्ठेमुळे दोघांनाही सुरक्षित वाटते. पण तेच जर विवाहात एकनिष्ठा नसेल तर, समस्या येतात तेव्हा त्यावर तोडगा म्हणजे फारकत किंवा घटस्फोट हेच दोन पर्याय त्यांना दिसतात. पती-पत्नी जेव्हा हे पाऊल उचलतात तेव्हा त्यांच्या समस्या सुटण्याऐवजी आणखीनच बिकट होतात. एकोणीसशे ऐंशीच्या दशकात, एका नामवंत फॅशन सल्लागाराने आपली पत्नी व आपल्या परिवारापासून फारकत घेतली. एकटे राहिल्याने त्याला आनंद मिळाला का? वीस वर्षांनंतर तो कबूल करतो, की फारकत घेतल्यामुळे तो “एकटा पडला, तो बेचैन होता. रात्रीचं आपल्या मुलांना गुडनाईट म्हणता येत नाही म्हणून तो रात्र रात्र जागायचा.”

पालक आणि मुले यांच्यातील एकनिष्ठता

पालक जेव्हा एकमेकांशी एकनिष्ठ राहतात तेव्हा, त्यांची मुलेही एकनिष्ठ राहायला शिकतात. एकनिष्ठ, प्रेमळ कौटुंबिक वर्तुळात वाढलेल्या मुलांना नंतर त्यांच्या विवाह साथीदारांशी तसेच आपल्या वयस्कर आईवडिलांशी जबाबदारपणे वागणे सोपे जाते.—१ तीमथ्य ५:४, ८.

पण, नेहमीच पालक आधी कमजोर होतात असे नाही. कधीकधी काही पालकांना आपल्या एखाद्या मुलाची एकनिष्ठपणे काळजी घ्यावी लागते. हर्बट आणि गर्ट्रुट यांच्याबाबतीत असे झाले. चाळीस पेक्षा अधिक वर्षांपासून ते दोघेही यहोवाचे साक्षीदार आहेत. त्यांचा मुलगा, डिटमर याला पेशींचा क्षय होणारा एक आनुवंशिक रोग (मस्क्यूलर डिस्ट्रॉफी) जडल्यामुळे तो कायमसाठीच विकलांग होता. २००२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात त्याचा मृत्यू झाला. पण त्याच्या शेवटल्या सात वर्षांसाठी त्याच्याजवळ रात्रंदिवस कोणी न कोणीतरी असावे लागत होते. त्याच्या पालकांनी अगदी प्रेमळपणे त्याची काळजी घेतली. त्यांनी तर आपल्या घरातच वैद्यकीय उपकरणे बसवून घेतली आणि स्वतः वैद्यकीय प्रशिक्षण घेतले. कौटुंबिक एकनिष्ठेचे किती हे उत्तम उदाहरण!

मैत्री टिकून राहण्याकरता एकनिष्ठेची गरज

बिर्गीट यांचे म्हणणे आहे, “विवाह सोबत्याविना आनंदी राहता येतं पण, मित्राविना आनंदी राहणे कठीण आहे.” बिर्गीट यांच्याशी तुम्ही देखील सहमत असाल. तुम्ही विवाहित असला अथवा अविवाहित असला तरी, एका उत्कृष्ट मित्राच्या एकनिष्ठेमुळे तुमचे हृदय आनंदित होते आणि तुमच्या जीवनाचा दर्जा सुधारतो. अर्थात, तुम्ही जर विवाहित असाल तर तुमचा विवाह सोबती तुमचा सर्वात निकटचा मित्र असला पाहिजे.

मित्र म्हणजे केवळ परिचित व्यक्‍ती नव्हे. शेजारी, आपल्याबरोबर काम करणारे लोक, अधूनमधून भेटणारे लोक अशा पुष्कळ लोकांबरोबर आपली तोंड ओळख असते. पण खरी मैत्री फुलण्याकरता, वेळ द्यावा लागतो, शक्‍ती खर्च करावी लागते; खऱ्‍या मैत्रीत भावनिक वचनबद्धता हवी. एखाद्याचा मित्र होणे हा एक बहुमान आहे. मैत्रीमुळे अनेक फायदे होतात पण यात जबाबदाऱ्‍या देखील आहेत.

मित्रांबरोबर चांगले दळणवळण अत्यंत आवश्‍यक आहे. कधीकधी गरज उद्‌भवल्यामुळे एका मित्रास त्याच्या दुसऱ्‍या मित्राला संवाद करण्यास सुचवावे लागेल. “आमच्या दोघींपैकी एकीला काही प्रॉब्लेम असेल तर मी किंवा माझी मैत्रीण आम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एकमेकींना फोन करतो. माझी एक मैत्रीण आहे आणि ती माझं बोलणं ऐकायला सदैव तयार आहे, ही जाणीवच किती सांत्वनदायक आहे,” असे बिर्गीट म्हणते. अंतरामुळे मैत्रीत बाधा येत नाही. गर्डा आणि हेल्गा एकमेकींपासून हजारो किलोमीटर दूर राहतात. तरीपण ३५ पेक्षा अधिक वर्षांपासून त्या सख्ख्या मैत्रिणी आहेत. गर्डा म्हणते: “आम्ही एकमेकींना नेहमी पत्र पाठवतो. आमची सुख-दुःख सांगतो. हेल्गाकडून पत्र येतं तेव्हा मला खूप आनंद होतो. आमच्या दोघींची विचार करण्याची पद्धत एकच आहे.”

मैत्रीसाठी एकनिष्ठेची गरज आहे. फक्‍त एका बेईमान कृत्यामुळे, दीर्घकाळचा नातेसंबंध तुटू शकतो. मित्रांमध्ये एकमेकांना सल्ला देणे, मग ती खासगी बाब असली तरी चालते. मित्र एकमेकांबरोबर बिनधास्त बोलतात; आपल्याला कमी लेखलं जात आहे किंवा आपला विश्‍वासघात केला जाईल याची त्यांना भीती नसते. बायबल म्हणते: “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.”—नीतिसूत्रे १७:१७.

आपले मित्र जन, आपल्या विचारसरणीवर, भावनांवर, कार्यांवर प्रभाव पाडत असल्यामुळे आपण फक्‍त अशा लोकांबरोबरच मैत्री केली पाहिजे की ज्यांचे आचार-विचार आपल्या आचार-विचारांशी जुळतात. उदाहरणार्थ, एकच विश्‍वास, एकच नैतिक दृष्टिकोन तसेच बरोबर आणि चूक याबाबतीत एकच दर्जा असलेल्यांबरोबर मैत्री करा. अशाप्रकारचे मित्र तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायला मदत करू शकतील. शिवाय, ज्यांचे दर्जे आणि ज्यांची नैतिकता तुमच्याप्रमाणे नाही अशांबरोबर का म्हणून मैत्री करावी? उचित मित्र निवडणे महत्त्वपूर्ण का आहे हे सांगताना बायबल म्हणते: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.”—नीतिसूत्रे १३:२०.

एकनिष्ठ राहण्यास शिकता येते

एक मूल जेव्हा, कोणावर तरी गोखरू फेकायला शिकते तेव्हा त्याला तो खेळ पुन्हा पुन्हा खेळावासा वाटतो. एकनिष्ठ व्यक्‍तीबद्दलही असेच म्हणता येईल. का बरे? कारण, आपण एकनिष्ठ राहण्याचा जितका अधिक प्रयत्न करू तितके ते आपल्याला सोपे वाटेल. कुटुंबात एकनिष्ठ राहण्याचे बाळकडू मिळालेल्या व्यक्‍तीला, एकनिष्ठेच्या आधारावर मैत्री प्रस्थापित करायला सोपे जाईल. कालांतराने अशा मजबूत व टिकाऊ मैत्रीमुळे, ही व्यक्‍ती विवाहात एकनिष्ठ राहील. याशिवाय, सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या मैत्रीतही तिला एकनिष्ठ राहण्यास मदत मिळेल.

येशूने म्हटले, की आपल्या संपूर्ण हृदयाने, जीवाने, मनाने व शक्‍तीने यहोवा देवावर प्रेम करणे ही सर्वात मोठी आज्ञा आहे. (मार्क १२:३०) याचा अर्थ आपण देवाशी पूर्णपणे एकनिष्ठ असलेच पाहिजे. यहोवा देवाशी एकनिष्ठ राहिल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतील. तो आपल्याला कधीही क्षुल्लक लेखणार नाही किंवा आपली निराशा करणार नाही, कारण तो स्वतःविषयी असे म्हणतो: “मी एकनिष्ठ आहे.” (यिर्मया ३:१२, NW) होय, आपण देवाशी एकनिष्ठ राहिलो तर आपल्याला सर्वकाळसाठी प्रतिफळ मिळत राहतील.—१ योहान २:१७. (w०५ ९/१)

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

एकनिष्ठ मित्रामुळे तुमचे हृदय आनंदित होते

[५ पानांवरील चित्र]

एकनिष्ठ कौटुंबिक सदस्य एकमेकांची काळजी घेतात