व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करतात

ख्रिस्ती यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करतात

ख्रिस्ती यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करतात

“धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत.”मत्तय १३:१६.

१. सिनाय पर्वतावर मोशेला पाहिल्यावर इस्राएली ज्याप्रकारे वागले त्यावरून कोणता प्रश्‍न मनात येतो?

सिनाय पर्वतावर एकत्रित झालेल्या इस्राएलांनी यहोवासोबत घनिष्ट नाते जोडायला हवे होते. कारण यहोवाने त्यांना आपल्या सामर्थ्यशाली बाहूने ईजिप्तमधून सोडवून आणले होते. त्याने त्यांच्या सर्व गरजा भागवल्या होत्या; अरण्यात भटकत असताना त्याने त्यांना अन्‍न व पाणी पुरवले होते. यानंतर, अमालेकी लोकांच्या सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा यहोवाने त्यांना विजय मिळवून दिला. (निर्गम १४:२६-३१; १६:२–१७:१३) अरण्यात, सिनाय पर्वतासमोर त्यांनी तळ दिला असताना, गडगडाट होऊ लागला व विजा चमकू लागल्या तेव्हा लोक इतके घाबरले की ते थरथर कापू लागले. नंतर त्यांनी सिनाय पर्वतावरून मोशेला उतरताना पाहिले. त्याच्या चेहऱ्‍यावरून यहोवाचे वैभव प्रतिबिंबित होत होते. पण हे पाहून आश्‍चर्य व आदर वाटण्याऐवजी ते मागे वळाले. “ते [मोशेजवळ] जावयास भ्याले.” (निर्गम १९:१०-१९; ३४:३०) यहोवाने त्यांच्याकरता इतके काही केले असताना, त्याच्या वैभवाचे प्रतिबिंब पाहण्यास त्यांना भीती का वाटत होती?

२. मोशेच्या चेहऱ्‍यावरून प्रतिबिंबित होणारे देवाचे वैभव पाहण्यास इस्राएलांना भीती का वाटली असावी?

या प्रसंगी इस्राएलांना भीती वाटण्याचे कारण, याआधी जे घडले होते त्याच्याशी संबंधित होते. त्यांनी जाणूनबुजून यहोवाचा आज्ञाभंग करून सोन्याचे वासरू तयार केले तेव्हा त्याने त्यांना शिक्षा दिली. (निर्गम ३२:४, ३५) यहोवाने दिलेल्या शिक्षेतून धडा शिकून त्यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली का? नाही, बहुतेकांनी असे केले नाही. मोशेने आपल्या आयुष्याच्या शेवटल्या काळात, सोन्याचे वासरू तयार करण्याच्या त्या घटनेची व अशा इतर प्रसंगांची आठवण केली जेव्हा इस्राएलांनी यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन केले होते. तो लोकांना म्हणाला: “तुम्ही तुमचा देव परमेश्‍वर ह्‍याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले; तुम्ही त्याच्यावर विश्‍वास ठेविला नाही व त्याचे सांगणे ऐकले नाही. तुमचा माझा परिचय झाला त्या दिवसापासून तुम्ही परमेश्‍वराविरुद्ध बंडच करीत आला आहा.”—अनुवाद ९:१५-२४.

३. आपला चेहरा झाकण्यासाठी मोशे काय करत असे?

इस्राएलांना भीती वाटली तेव्हा मोशेची काय प्रतिक्रिया होती यावर विचार करा. वृत्तान्तात असे म्हटले आहे: “मोशेने त्यांच्याशी बोलणे संपविल्यावर आपल्या तोंडावर आच्छादन घातले; पण मोशे परमेश्‍वराशी संभाषण करावयाला त्याच्यासमोर आत [निवासमंडपात] जाई तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरले आच्छादन काढीत असे; आणि बाहेर येऊन जी काही आज्ञा त्याला होई ती तो इस्राएल लोकांना सांगत असे. इस्राएल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहताना त्याच्या चेहऱ्‍यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत; परमेश्‍वराशी संभाषण करावयास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालीत असे.” (निर्गम ३४:३३-३५) मोशे कधीकधी आपल्या चेहऱ्‍यावर आच्छादन का घालीत असे? यावरून आपण काय शिकू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधाचे परीक्षण करण्यास मदत करतील.

गमावलेल्या संधी

४. प्रेषित पौलाने मोशेच्या चेहऱ्‍यावर आच्छादन घालण्याविषयी काय खुलासा केला?

प्रेषित पेत्राने खुलासा केला की मोशेचे चेहऱ्‍यावर आच्छादन घालणे हे इस्राएली लोकांच्या मनांच्या व अंतःकरणांच्या स्थितीशी संबंधित होते. पौलाने लिहिले: ‘इस्त्राएल लोकांना त्याच्या तोंडाकडे टक लावून पाहवेना. त्यांची मने कठीण झाली.’ (२ करिंथकर ३:७, १४) खरोखर ही किती खेदजनक परिस्थिती होती! इस्राएली लोक यहोवाचे निवडलेले लोक होते आणि त्यांनी आपल्या जवळ यावे अशी यहोवाची इच्छा होती. (निर्गम १९:४-६) पण ते मात्र देवाच्या वैभवाच्या प्रतिबिंबाकडेही पाहू इच्छित नव्हते. आपली मने व अंतःकरणे यहोवाकडे वळवून त्याची प्रेमाने उपासना करण्याऐवजी, एका अर्थाने त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली.

५, ६. (क) पहिल्या शतकात, मोशेच्या काळातील इस्राएलांशी समांतर कोण होते? (ख) ज्यांनी येशूचे ऐकले व ज्यांनी त्याचे ऐकले नाही त्यांच्यात कोणता फरक होता?

सा.यु. पहिल्या शतकातही याच गोष्टीचे समांतर आपल्याला पाहायला मिळते. पौलाचे ख्रिस्ती विश्‍वासात मतपरिवर्तन झाले तोपर्यंत, नियमशास्त्राच्या कराराची जागा नव्या कराराने घेतली होती. या नव्या कराराचा मध्यस्थ, थोर मोशे अर्थात येशू ख्रिस्त हा होता. येशूने आपल्या शब्दांतून व कृतींतून यहोवाचे वैभव अगदी परिपूर्ण रितीने प्रतिबिंबित केले. पुनरुत्थित येशूबद्दल पौलाने असे लिहिले: “हा त्याच्या गौरवाचे तेज, व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप [आहे].” (इब्री लोकांस १:३) त्याअर्थी यहुद्यांकडे किती अद्‌भूत संधी होती! ते खुद्द देवाच्या पुत्राकडून सार्वकालिक जीवनाची वचने ऐकू शकत होते! पण दुःखाची गोष्ट म्हणजे येशूने ज्यांना प्रचार केला त्यांच्यापैकी बहुतेकांनी ऐकले नाही. त्यांच्याविषयी येशूने, यशया संदेष्ट्याद्वारे यहोवाने केलेली भविष्यवाणी उद्धृत केली: “ह्‍या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात, आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत; ह्‍यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.”—मत्तय १३:१५; यशया ६:९, १०.

पण येशूचे शिष्य मात्र या यहूद्यांपेक्षा अगदी वेगळे होते. येशूने त्यांच्याविषयी म्हटले: “धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत.” (मत्तय १३:१६) खरे ख्रिस्ती यहोवाला जाणून घेण्याची व त्याची सेवा करण्याची उत्कंठा बाळगतात. बायबलच्या पानांतून प्रकट होणारी त्याची इच्छा पूर्ण करण्यास त्यांना आनंद वाटतो. म्हणूनच अभिषिक्‍त जन नव्या कराराच्या सेवेत यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करतात आणि दुसऱ्‍या मेंढरांपैकी असलेले सदस्य देखील अशाचप्रकारचे कार्य करतात.—२ करिंथकर ३:६, १८.

सुवार्ता का आच्छादलेली आहे

७. बहुतेकजण सुवार्ता स्वीकारत नाहीत याबद्दल आपल्याला आश्‍चर्य का वाटत नाही?

तर अशारितीने मोशेच्या काळात आणि येशूच्या काळातही बहुतेक इस्राएली लोकांनी त्यांच्याजवळ असलेली अद्वितीय सुसंधी गमावली. आज आपल्या काळातही हीच परिस्थिती आहे. बहुतेक लोक आपण घोषित करत असलेल्या सुवार्तेचा अव्हेर करतात. पण याचे आपल्याला नवल वाटत नाही. पौलाने लिहिले: “आमची सुवार्ता आच्छादिलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादिलेली आहे. त्यांची म्हणजे विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मने ह्‍या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत.” (२ करिंथकर ४:३, ४) सुवार्तेचा प्रसार होऊ नये म्हणून सैतान जे प्रयत्न करतो, त्यांव्यतिरिक्‍त अनेक लोक स्वतःहूनच आपले डोळे झाकून घेतात कारण त्यांना पाहण्याची इच्छाच नाही.

८. बरेचजण कशाप्रकारे अज्ञानामुळे आंधळे झाले आहेत आणि आपण हे कसे टाळू शकतो?

बऱ्‍याच लोकांच्या लाक्षणिक डोळ्यांवर अज्ञानाची पट्टी आहे. बायबलमध्ये राष्ट्रांविषयी असे म्हटले आहे की “त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्‍न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत.” (इफिसकर ४:१८) पौल नियमशास्त्रात अतिशय पारंगत होता, पण ख्रिस्ती बनण्याआधी अज्ञानाने त्याला इतके आंधळे केले होते की त्याने देवाच्या मंडळीचा छळ केला. (१ करिंथकर १५:९) तरीपण यहोवाने त्याला सत्य प्रकट केले. पौल स्पष्ट करतो: “ते युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्‍वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली.” (१ तीमथ्य १:१६) पौलाप्रमाणेच देवाच्या सत्याचा एकेकाळी विरोध करणारे बरेचजण आज त्याची सेवा करत आहेत. हे आपल्या कार्याचा विरोध करणाऱ्‍यांनाही साक्ष देत राहण्याचे एक उत्तम कारण आहे. दुसरीकडे पाहता, देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास करून त्याचा अर्थ समजून घेतल्यास आपण स्वतः आंधळेपणाने वागून यहोवाचा रोष ओढवणार नाही.

९, १०. (क) पहिल्या शतकातील यहुद्यांनी कशाप्रकारे दाखवले की ते शिकून घेण्यास व आपली मते बदलण्यास उत्सुक नव्हते? (ख) आज ख्रिस्ती धर्मजगतात हीच परिस्थिती पाहायला मिळते का? स्पष्ट करा.

अनेकजण आध्यात्मिक गोष्टी समजू शकत नाहीत कारण ते शिकून घेण्यास उस्तुक नाहीत आणि त्यांची अडेल वृत्ती आहे. बऱ्‍याच यहूद्यांनी येशूला व त्याच्या शिकवणुकींना झिडकारले कारण ते मोशेचे नियमशास्त्र सोडण्यास तयार नव्हते. अर्थात यालाही अपवाद आहेत. उदाहरणार्थ, येशूच्या पुनरुत्थानानंतर “याजकवर्गातीलहि पुष्कळ लोकांनी ह्‍या विश्‍वासाला मान्यता दिली.” (प्रेषितांची कृत्ये ६:७) पण बहुतेक यहूद्यांच्या बाबतीत पौलाने लिहिले: “आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखविण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंतःकरणावर आच्छादन राहते.” (२ करिंथकर ३:१५) येशूने यापूर्वीच यहुदी धर्मपुढाऱ्‍यांना जे म्हटले होते, त्याविषयी पौलाला माहीत असावे: “तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता; कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते; आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.” (योहान ५:३९) हे धर्मपुढारी शास्त्रवचनांचे अतिशय बारकाईने परीक्षण करत होते, त्याअर्थी या शास्त्रवचनांनी त्यांना ही खात्री पटवून द्यायला हवी होती, की येशूच मशीहा आहे. पण यहुदी आपल्या मतांवरच अडून राहिले आणि अनेक चमत्कार करणारा देवाचा पुत्रही त्यांचे मन बदलू शकला नाही.

१० आज ख्रिस्ती धर्मजगतातील अनेकांच्या बाबतीत हेच म्हणता येईल. पहिल्या शतकातील यहुद्यांप्रमाणे, “त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.” (रोमकर १०:२) काहीजण बायबलचा अभ्यास तर करतात, पण त्यात जे सांगितले आहे त्यावर ते विश्‍वास ठेवू इच्छित नाहीत. यहोवा आपल्या लोकांना, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी बनलेल्या विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या माध्यमाने जे शिकवत आहे त्याचा ते स्वीकार करू इच्छित नाहीत. (मत्तय २४:४५) पण आपण हे जाणतो की यहोवाच आपल्या लोकांना शिकवत आहे आणि देवाकडील सत्याचे ज्ञान उत्तरोत्तर वाढत गेले आहे. (नीतिसूत्रे ४:१८) आपण यहोवाकडून येणारे ज्ञान स्वीकारतो तेव्हा आपल्याला त्याची इच्छा व उद्देश समजून घेण्याचा आशीर्वाद लाभतो.

११. स्वतःच्या विचारसरणीवर अवलंबून राहणाऱ्‍यांपासून सत्य कशाप्रकारे लपून राहिले आहे?

११ इतरजण स्वतःच्याच विचारसरणीमुळे आंधळे झाले आहेत. देवाच्या लोकांची व येशूच्या उपस्थितीविषयी ते जो संदेश घोषित करतात त्याविषयी काहीजण थट्टा करतील हे आधीपासूनच भाकीत करण्यात आले होते. प्रेषित पेत्राने लिहिले: “ते हे बुद्धिपुरस्सर विसरतात की,” देवाने नोहाच्या काळात या जगावर जलप्रलय आणला होता. (२ पेत्र ३:३-६) त्याचप्रकारे, बरेच नामधारी ख्रिस्ती हे कबूल करतात की यहोवा दयाळू, कृपाळू व क्षमाशील परमेश्‍वर आहे; पण तो शिक्षा दिल्यावाचूनही राहात नाही याकडे मात्र ते एकतर दुर्लक्ष करतात किंवा हे मान्य करत नाहीत. (निर्गम ३४:६, ७) खरे ख्रिस्ती बायबलमध्ये खरोखर काय शिकवले आहे हे समजून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात.

१२. लोक कशाप्रकारे परंपरेमुळे आंधळे झाले आहेत?

१२ चर्चमध्ये जाऊन उपासना करणारे अनेकजण परंपरांमुळे आंधळे झाले आहेत. आपल्या काळातील धर्मपुढाऱ्‍यांना येशूने म्हटले: “तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे.” (मत्तय १५:६) यहूद्यांनी बॅबेलोनच्या बंदिवासातून सुटल्यावर शुद्ध उपासना पुनःस्थापित करण्याचा अतिशय आवेशाने प्रयत्न केला पण कालांतराने याजक गर्विष्ठ व फाजील धार्मिक बनले. धार्मिक सण, देवाबद्दल भक्‍तिभाव व्यक्‍त करण्यासाठी नव्हे, तर निव्वळ औपचारिकता म्हणून पाळले जाऊ लागले. (मलाखी १:६-८) येशूच्या काळापर्यंत शास्त्री व परूशी यांनी मोशेच्या नियमशास्त्रात असंख्य परंपरा जोडल्या होत्या. येशूने या लोकांना ढोंगी म्हटले कारण नियमशास्त्र मुळात ज्या नीतिमान तत्त्वांवर आधारलेले होते त्यांचा या लोकांना विसर पडला होता. (मत्तय २३:२३, २४) खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी कधीही मानवनिर्मित धार्मिक परंपरांमुळे शुद्ध उपासनेपासून विचलित होऊ नये.

‘जो अदृश्‍य आहे त्याला पाहणे’

१३. मोशेला काही प्रमाणात देवाच्या वैभवाचा प्रकाश कोणत्या दोन मार्गांनी पाहायला मिळाला?

१३ मोशेने पर्वतावर देवाचे वैभव पाहण्याची इच्छा व्यक्‍त केली आणि त्याला यहोवाच्या वैभवी साक्षात्काराचा उर्वरीत प्रकाश पाहायला मिळाला. निवासमंडपात जाताना तो आपल्या चेहऱ्‍यावरील आच्छादन काढून टाकत असे. मोशे देवावर विश्‍वास ठेवून चालणारा पुरुष होता व त्याला देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याची उत्कंठा होती. त्याला यहोवाच्या वैभवाचे काही प्रमाणात दर्शन देण्यात आले तरीसुद्धा एका अर्थाने त्याने विश्‍वासाच्या नेत्रांनी आधीच देवाला पाहिले होते. बायबल सांगते की “जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा [मोशेने] धीर धरला.” (इब्री लोकांस ११:२७; निर्गम ३४:५-७) आणि त्याने देवाचे वैभव केवळ त्याच्या चेहऱ्‍यातून निघणाऱ्‍या त्या किरणांनीच नव्हे, तर इस्राएलांना यहोवाला जाणून घेऊन त्याची सेवा करण्यास मदत करण्यासाठी त्याने जे काही प्रयत्न केले त्यांद्वारेही प्रतिबिंबित केले.

१४. येशूने देवाचे वैभव कशाप्रकारे पाहिले व त्याने कशात आनंद मानला?

१४ स्वर्गात, येशूने अगणित काळांपासून, विश्‍वाच्या निर्मितीच्याही पूर्वीपासून देवाचे वैभव प्रत्यक्ष पाहिले होते. (नीतिसूत्रे ८:२२, ३०) यादरम्यान त्यांच्यामध्ये एक अतिशय प्रेमळ व कोमल नाते निर्माण झाले. यहोवा देवाने सर्व सृष्टीत ज्येष्ठ असलेल्या या आपल्या पुत्राबद्दल अतिशय कोमल प्रेम व्यक्‍त केले. येशूनेही आपल्या जीवनदात्या देवाबद्दल आपले मनस्वी प्रेम व्यक्‍त केले. (योहान १४:३१; १७:२४) या पित्यापुत्रामधले प्रेम परिपूर्ण होते. मोशेप्रमाणेच, येशूलाही आपल्या शिकवणुकींतून यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करण्यास आनंद वाटे.

१५. ख्रिस्ती कशाप्रकारे देवाच्या वैभवाचे मनन करतात?

१५ मोशे व येशूप्रमाणे, सध्याच्या काळातील देवाचे पृथ्वीवरील साक्षीदार देखील त्याच्या वैभवाचे सदोदीत मनन करण्याची उत्कंठा बाळगतात. त्यांनी राज्याच्या वैभवी सुवार्तेकडे पाठ फिरवली नाही. प्रेषित पौलाने लिहिले: “त्यांचे अंतःकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते.” (२ करिंथकर ३:१६) आपण शास्त्रवचनांचा अभ्यास करतो कारण आपण देवाची इच्छा पूर्ण करू इच्छितो. यहोवाचा पुत्र व अभिषिक्‍त राजा येशू ख्रिस्त याच्या चेहऱ्‍यावरून प्रतिबिंबित होणारे त्याचे वैभव आपण सानंदाश्‍चर्याने पाहतो आणि त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करतो. मोशे व येशूप्रमाणेच आपल्यालाही एका सेवेचा बहुमान लाभला आहे; अर्थात आपण ज्याची उपासना करतो त्या वैभवी परमेश्‍वराबद्दल इतरांना शिकवण्याचा हा बहुमान आहे.

१६. सत्य माहीत असल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद प्राप्त झाले आहेत?

१६ येशूने प्रार्थना केली: “हे पित्या . . . मी तुझे स्तवन करितो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्‍यांच्यापासून ह्‍या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रगट केल्या.” (मत्तय ११:२५) जे प्रामाणिक वृत्तीचे व लीन अंतःकरणाचे आहेत त्यांना आपले उद्देश व व्यक्‍तिमत्त्व समजून घेण्यास यहोवा मदत करतो. (१ करिंथकर १:२६-२८) आपण त्याच्या छत्रछायेखाली आलो आहोत आणि तो आपल्या हिताकरता, सर्वात उत्तम मार्गाने जीवन जगण्याकरता आपल्याला शिक्षण देतो. तेव्हा, यहोवाच्या जवळ येण्याच्या प्रत्येक संधीचा आपण उपयोग करू या आणि आपल्याला त्याला आणखी जवळून ओळखता यावे म्हणून त्याने ज्या अनेक योजना केल्या आहेत त्यांबद्दल सदैव कृतज्ञता बाळगू या.

१७. यहोवाचे गुण आपण अधिक चांगल्याप्रकारे कसे समजू शकतो?

१७ पौलाने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लिहिले: “आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडीत आहो.” (२ करिंथकर ३:१८) आपली आशा ही स्वर्गीय जीवनाची असो वा पृथ्वीवरील जीवनाची, आपण यहोवाला—अर्थात बायबलमध्ये प्रकट करण्यात आलेले त्याचे गुण व व्यक्‍तिमत्त्व जितक्या चांगल्याप्रकारे ओळखू तितके आपण त्याच्यासारखे होऊ. जर आपण येशूच्या जीवनावर, त्याच्या सेवाकार्यावर व शिकवणुकींवर कृतज्ञतापूर्वक मनन केले तर आपण यहोवाचे गुण अधिकाधिक प्रतिबिंबित करू शकू. आणि आपल्या देवाचे वैभव प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपण त्याची स्तुती करतो ही जाणीव किती आनंददायक आहे! (w०५ ८/१५)

तुम्हाला आठवते का?

• इस्राएलांना मोशेने प्रतिबिंबित केलेले देवाचे वैभव पाहण्यास भीती का वाटत होती?

• पहिल्या शतकात व आपल्या काळात, सुवार्ता कोणत्या अर्थाने “आच्छादिलेली” आहे?

• आपण देवाचे वैभव कशाप्रकारे प्रतिबिंबित करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

यहोवाच्या सेवकांना त्याचे वैभव प्रतिबिंबित करण्यास आनंद वाटतो