व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

या वादळी काळात देवासोबत चाला

या वादळी काळात देवासोबत चाला

या वादळी काळात देवासोबत चाला

“हनोख देवाबरोबर चालला त्यानंतर तो नव्हता; कारण देवाने त्याला नेले.”उत्पत्ति ५:२४.

१. कोणत्या काही गोष्टींमुळे सध्याचा काळ संकटमय बनला आहे?

वादळी काळ! हे शब्द, १९१४ साली मशीही राज्याचा उदय झाल्यानंतरच्या वर्षांत मानवजात ज्या उलथापालथीच्या व हिंसाचाराच्या परिस्थितीत जगत आहे त्यांचे अगदी अचूक वर्णन करतात. तेव्हापासून मानव ‘शेवटल्या काळात’ जगत आहेत. दुष्काळ, रोगराई, भूकंप व युद्धे यांसारख्या समस्यांनी त्यांना अभूतपूर्व प्रमाणावर पीडित केले आहे. (२ तीमथ्य ३:१; प्रकटीकरण ६:१-८) यहोवाची उपासना करणारेही यातून सुटलेले नाहीत. कमी जास्त प्रमाणात आपल्या सर्वांनाच सध्याच्या काळाच्या समस्यांना व अनिश्‍चिततेला तोंड द्यावेच लागते. आर्थिक दबाव, राजकीय उलथापालथ, गुन्हेगारी व रोग या अशा गोष्टी आहेत की ज्यांमुळे जगणे अतिशय कठीण होऊन बसते.

२. यहोवाच्या लोकांनी कोणकोणत्या आव्हानांना तोंड दिले आहे?

शिवाय, “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे” यांच्याशी सैतान सतत लढाई करत असल्यामुळे, यहोवाच्या सेवकांपैकी अनेकांना तीव्र छळाला निरंतर तोंड द्यावे लागते. (प्रकटीकरण १२:१७) सर्वांनाच थेटपणे छळाला तोंड द्यावे लागत नाही तरीसुद्धा सर्वच खऱ्‍या ख्रिश्‍चनांना दियाबल सैतानाविरुद्ध आणि त्याने मानवजातीमध्ये पसरवलेल्या आत्म्याविरुद्ध लढा द्यावाच लागतो. (इफिसकर २:२; ६:१२) या आत्म्याचा आपल्यावर प्रभाव पडू नये म्हणून सतत सतर्क राहणे अगत्याचे आहे कारण त्याचा प्रभाव आपल्याला कामाच्या ठिकाणी, शाळेत आणि अशा प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो की जेथे खऱ्‍या उपासनेबद्दल आस्था नसलेल्या लोकांशी आपल्याला व्यवहार करावा लागतो.

राष्ट्रांसोबत नव्हे तर देवासोबत चाला

३, ४. ख्रिस्ती या जगापासून कशाप्रकारे वेगळे आहेत?

पहिल्या शतकातही ख्रिश्‍चनांनी या जगाच्या आत्म्याचा प्रयासपूर्वक प्रतिकार केला. आणि यामुळे ख्रिस्ती मंडळीच्या बाहेर असलेल्यांपेक्षा ते फारच वेगळे ठरले. पौलाने हा फरक स्पष्ट केला. त्याने लिहिले: “म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्‍चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्‍यापुढे चालू नये, त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्‍न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत, ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्वप्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वत:ला कामातुरपणास वाहून घेतले आहे.”—इफिसकर ४:१७-१९.

हे शब्द, पौलाच्या व आपल्याही काळात या जगात जो आध्यात्मिक व नैतिक काळोख पसरला आहे त्याचे किती स्पष्ट वर्णन करतात! पहिल्या शतकाप्रमाणे आजही ख्रिस्ती ‘परराष्ट्रीयांप्रमाणे चालत नाहीत.’ उलट, त्यांना देवासोबत चालण्याचा अद्‌भूत सुहक्क मिळाला आहे. हीन व अपरिपूर्ण मानव यहोवासोबत चालतात असे म्हणणे खरोखर योग्य आहे का अशी काहीजण शंका व्यक्‍त करू शकतात. पण बायबल सांगते की हे शक्य आहे. शिवाय, यहोवा स्वतः अशी अपेक्षा करतो की मानवांनी त्याच्यासोबत चालावे. सामान्य युगापूर्वी आठव्या शतकात संदेष्टा मीखा याने पुढील प्रेरित शब्द लिहिले: “नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्‍वर तुजजवळ काय मागतो?”—मीखा ६:८.

देवासोबत कसे व का चालावे?

५. अपरिपूर्ण मानव देवासोबत कसे चालू शकतात?

सर्वसमर्थ, अदृश्‍य देवासोबत आपण कसे चालू शकतो? अर्थातच, देवासोबत चालणे हे एखाद्या मनुष्यासोबत चालण्यासारखे नाही. बायबलमध्ये “चालणे” या संज्ञेचा एक अर्थ “विशिष्ट मार्गाचा अवलंब करणे” असा होतो. * तेव्हा, एखादी व्यक्‍ती देवासोबत चालते याचा अर्थ ती देवाने सांगितलेल्या व त्याला संतुष्ट करणाऱ्‍या मार्गाचा अवलंब करते. असे केल्याने आपण आपल्या अवतीभोवती असलेल्या बहुतेक लोकांपेक्षा वेगळे दिसून येतो. होय, कोणत्याही ख्रिस्ती व्यक्‍तीकरता हाच योग्य मार्ग आहे. का? याची अनेक कारणे आहेत.

६, ७. देवासोबत चालणे हाच सर्वोत्तम मार्ग का आहे?

सर्वप्रथम यहोवा आपला निर्माणकर्ता, आपल्या जीवनाचा उगम आणि आपल्या जीवनाकरता आवश्‍यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवणारा आहे. (प्रकटीकरण ४:११) त्याअर्थी, आपण कसे चालावे हे आपल्याला सांगण्याचा केवळ त्यालाच अधिकार आहे. शिवाय, देवासोबत चालणे हा जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जे यहोवासोबत चालतात त्यांच्या पापांची क्षमा करण्याची त्याने तरतूद केली आहे आणि तो त्यांना सार्वकालिक जीवनाची निश्‍चित आशा देतो. आपल्यावर प्रेम करणारा आपला स्वर्गीय पिता, जे त्याच्यासोबत चालतात त्यांना मार्गदर्शन देखील पुरवतो की जेणेकरून ते अपरिपूर्ण असताना व सैतानाच्या वर्चस्वाखाली असलेल्या जगात राहात असतानाही जीवनात यशस्वी होऊ शकतात. (योहान ३:१६; २ तीमथ्य ३:१५, १६; १ योहान १:८; २:२५; ५:१९) देवासोबत चालण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपण स्वेच्छेने देवासोबत चालतो तेव्हा मंडळीत शांती व एकता वाढण्यास हातभार लागतो.—कलस्सैकर ३:१५, १६.

शेवटले व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण देवासोबत चालतो तेव्हा, अगदी सुरुवातीला एदेन बागेत जो सार्वभौमत्वाचा वादविषय उभा करण्यात आला होता, त्यात आपली काय भूमिका आहे हे आपण दाखवतो. (उत्पत्ति ३:१-६) आपल्या जीवनाद्वारे आपण दाखवतो की आपण अगदी पूर्णपणे यहोवाच्या बाजूने उभे आहोत आणि सार्वभौम प्रभू असण्याचा केवळ त्यालाच अधिकार आहे हे आपण निर्भयपणे घोषित करतो. (स्तोत्र ८३:१८) अशारितीने, देवाचे नाव पवित्र व्हावे व त्याची इच्छा पूर्ण व्हावी अशी जी आपण प्रार्थना करतो त्याच्या अनुषंगाने कार्यही करतो हे आपण दाखवतो. (मत्तय ६:९, १०) तेव्हा, जे देवासोबत चालण्याचे निवडतात ते खरोखरच सूज्ञ नाहीत का? ते पूर्ण खात्री बाळगू शकतात की ते अगदी योग्य दिशेने चालत आहेत कारण यहोवा हा “एकच ज्ञानी” देव आहे. तो कधीही चूक करत नाही.—रोमकर १६:२७.

८. हनोख व नोहा यांचे काळ कोणत्या बाबतीत आपल्या काळासारखेच होते?

पण सध्याच्या या वादळी काळात आणि बहुतेक लोकांना यहोवाची सेवा करण्याची तीळमात्र इच्छा नसताना ख्रिस्ती लोकांनी जसे जगले पाहिजे तसे जगणे कसे शक्य आहे? पुरातन काळात ज्यांनी अतिशय कठीण काळातही आपली सात्विकता कायम ठेवली अशा विश्‍वासू पुरुषांच्या उदाहरणांवर विचार केल्याने आपल्याला या प्रश्‍नाचे उत्तर मिळू शकते. यांपैकी दोघे हनोख व नोहा हे होते. ते दोघेही आपल्यासारख्याच काळात राहात होते. त्याकाळी दुष्टाईला उधाण आले होते. नोहाच्या काळात तर ही पृथ्वी अत्याचार व अनैतिकता यांनी भरून गेली होती. तरीपण हनोख व नोहा यांनी त्यांच्या काळातल्या त्या जगाच्या आत्म्याचा प्रतिकार केला आणि ते यहोवासोबत चालत राहिले. ते असे का करू शकले? या प्रश्‍नाचे उत्तर मिळवण्याकरता आपण या लेखात हनोखच्या उदाहरणावर विचार करू या. पुढील लेखात आपण नोहाच्या उदाहरणावर विचार करू.

हनोख वादळी काळात देवासोबत चालला

९. हनोखविषयी आपल्याजवळ कोणती माहिती आहे?

हनोख पहिला होता की ज्याच्याविषयी शास्त्रवचनांत असे म्हणण्यात आले की तो देवासोबत चालला. बायबलमधील अहवालात असे म्हटले आहे: “मथुशलह झाल्यावर हनोख . . . देवाबरोबर चालला.” (उत्पत्ति ५:२२) मग, आपल्या सर्वसाधारण आयुर्मानापेक्षा बरीच जास्त असलेल्या हनोखच्या आयुष्याची एकूण वर्षे सांगितल्यावर अहवाल पुढे म्हणतो की “हनोख देवाबरोबर चालला. त्यानंतर तो नव्हता; कारण देवाने त्याला नेले.” (उत्पत्ति ५:२४) यावरून असे दिसून येते की हनोखचा विरोध करणाऱ्‍यांनी त्याचा घात करण्याआधीच यहोवाने हनोखला जिवितांच्या जगातून मृतावस्थेत नेले. (इब्री लोकांस ११:५, १३) या दोनचार संक्षिप्त वचनांखेरीज हनोखचा बायबलमध्ये इतरत्र उल्लेख करण्यात आलेला नाही. तरीपण जी काही माहिती आपल्याजवळ आहे व इतर संकेतांवरून आपण खात्रीने म्हणू शकतो की हनोख ज्या काळात राहात होता तो अतिशय वादळी काळ होता.

१०, ११. (क) आदाम व हव्वा यांच्या बंडाळीनंतर नीतिभ्रष्टता कशी पसरली? (ख) हनोखने कोणता भविष्यसूचक संदेश घोषित केला आणि नक्कीच त्याला कशाप्रकारचा प्रतिसाद मिळाला असावा?

१० उदाहरणार्थ, आदामाने पाप केल्यानंतर मानव वंश किती झपाट्याने भ्रष्ट झाला याचा विचार करा. बायबल आपल्याला सांगते की आदामाचा ज्येष्ठ पुत्र काईन हा मनुष्याचा घात करणारा पहिला होता. त्याने आपला भाऊ हाबेल याला ठार मारले. (उत्पत्ति ४:८-१०) हाबेलचा खून झाल्यानंतर आदाम व हव्वा यांना आणखी एक मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी शेथ ठेवले. त्याच्याविषयी आपण असे वाचतो: “शेथ याला मुलगा झाला त्याचे नाव त्याने अनोश असे ठेविले; त्या काळापासून लोक परमेश्‍वराच्या नावाने प्रार्थना करु लागले.” (उत्पत्ति ४:२५, २६) दुःखाची गोष्ट म्हणजे हे “परमेश्‍वराच्या नावाने प्रार्थना” करणे खोट्या उपासनेच्या पद्धतीने करण्यात आले. * अनोशच्या जन्माच्या कित्येक वर्षांनंतर काईनच्या लामेख नावाच्या एका वंशजाने आपल्या दोन पत्नींकरता एक गीत रचले ज्यात त्याने, आपल्याला जखमी करणाऱ्‍या एका तरुणाला आपण जिवे मारल्याचे सांगितले. शिवाय त्याने असा इशारा दिला: “काइनाबद्दल सातपट सूड घ्यावयाचा तर लामेखाबद्दल सत्याहत्तरपट घेण्यात येईल.”—उत्पत्ति ४:१०, १९, २३, २४.

११ या त्रोटक माहितीवरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की एदेन बागेत सैतानाने ज्या नीतीभ्रष्टतेला जन्म दिला होता ती लवकरच आदामाच्या संततीमध्ये दुष्टाईच्या रूपात पसरली. अशा एका जगात हनोखने यहोवाचा संदेष्टा म्हणून कार्य केले; त्याचा सामर्थ्यशाली देवप्रेरित संदेश आजही तितकाच परिणामकारक आहे. हनोखने केलेल्या एका भविष्यवाणीबद्दल यहुदा सांगतो: “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करावयास, आणि भक्‍तिहीन लोकांनी अभक्‍तीने केलेल्या आपल्या सर्व भक्‍तिहीन कृत्यांवरुन आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्‍तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यावरून, त्या सर्वास दोषी ठरवावयास प्रभु आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.” (यहूदा १४, १५) अर्थात, या शब्दांची अंतिम पूर्णता हर्मगिदोनाच्या वेळी होईल. (प्रकटीकरण १६:१४, १६) पण आपण खात्रीने म्हणू शकतो की हनोखच्या काळातही असे अनेक ‘भक्‍तिहीन पापी जन’ होते की ज्यांना हनोखचा संदेश राग आला असेल. अशा लोकांच्या हातून यहोवाने अतिशय प्रेमळपणे हनोखला वाचवले.

हनोखला देवासोबत चालण्याचे धैर्य कोठून मिळाले?

१२. हनोख कशामुळे आपल्या काळातल्या लोकांपेक्षा वेगळा ठरला?

१२ एदेन बागेत आदाम व हव्वा यांनी सैतानाचे ऐकले व आदामाने यहोवाविरुद्ध बंडाळी केली. (उत्पत्ति ३:१-६) त्यांचा पुत्र हाबेल याने मात्र वेगळा मार्ग निवडला आणि यहोवाने त्याच्यावर कृपा दाखवली. (उत्पत्ति ४:३, ४) दुःखाची गोष्ट म्हणजे, आदामाच्या संततीपैकी बहुतेकजण हाबेलसारखे नव्हते. पण शेकडो वर्षांनंतर ज्याचा जन्म झाला तो हनोख मात्र हाबेलसारखाच होता. हनोख आणि आदामाच्या इतर बहुतेक वंशजांमध्ये कोणता फरक होता? प्रेषित पौलाने या प्रश्‍नाचे उत्तर दिले. त्याने लिहिले: “हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्‍वासाने लोकांतरी नेण्यात आले, आणि तो सापडला नाही; कारण त्याला देवाने लोकांतरी नेले; लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे.” (इब्री लोकांस ११:५) हनोख विश्‍वासाचे उत्तम उदाहरण असलेल्या ‘मोठ्या साक्षीरूपी मेघात’ सामील होता. (इब्री लोकांस १२:१) विश्‍वासामुळेच हनोखला आपल्या ३०० पेक्षा जास्त वर्षांच्या आयुष्यात—जे आपल्यापैकी बहुतेकांकरता तीन आयुष्यांइतके ठरेल—शेवटपर्यंत योग्य वर्तनात टिकून राहण्यास साहाय्य मिळाले!

१३. हनोखजवळ कशाप्रकारचा विश्‍वास होता?

१३ पौलाने हनोख व इतर साक्षीदारांच्या विश्‍वासाचे वर्णन करताना असे म्हटले: “विश्‍वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्‍या गोष्टीबद्दलची खातरी आहे.” (इब्री लोकांस ११:१) होय, विश्‍वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टी अवश्‍य पूर्ण होतील अशी आश्‍वासनांवर आधारित असलेली खात्रीलायक अपेक्षा. ही अपेक्षा इतकी पक्की असते की त्यामुळे जीवनाचा आपला दृष्टिकोनच बदलतो. अशाचप्रकारच्या विश्‍वासाने हनोखला, त्याच्याकाळचे जग अभक्‍त होते तरीसुद्धा, देवासोबत चालण्यास मदत केली.

१४. हनोखचा विश्‍वास कोणत्या अचूक ज्ञानावर आधारित असावा?

१४ खरा विश्‍वास अचूक ज्ञानावर आधारित असतो. हनोखला कोणते ज्ञान होते? (रोमकर १०:१४, १७; १ तीमथ्य २:४) एदेन बागेत जे घडले होते त्याच्याविषयी त्याला अर्थातच माहीत होते. एदेन बागेतील जीवन कसे होते याविषयीही कदाचित त्याने ऐकले असावे. हनोखच्या काळात एदेन बाग कदाचित अस्तित्वात असावी पण त्यात प्रवेश करण्यास मानवांना परवानगी नव्हती. (उत्पत्ति ३:२३, २४) आणि आदामाच्या संततीने सर्व पृथ्वीला व्यापून या सबंध ग्रहाला एदेन वाटिकेसारखे बनवावे असा देवाचा उद्देश होता हे देखील त्याला माहीत होते. (उत्पत्ति १:२८) शिवाय, एक संतती उत्पन्‍न होईल व ती सैतानाचे डोके फोडील आणि त्याच्या फसवणुकीमुळे घडून आलेले सर्व दुष्परिणाम काढून टाकील अशी जी प्रतिज्ञा यहोवाने केली होती तिच्याबद्दल नक्कीच हनोखने कृतज्ञ मनोवृत्ती बाळगली असेल. (उत्पत्ति ३:१५) किंबहुना, यहुदाच्या पुस्तकात लिहून ठेवण्यात आलेली हनोखची स्वतःची भविष्यवाणी सैतानाच्या संततीच्या नाशाशीच संबंधित आहे. हनोखला विश्‍वास होता आणि त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की “यहोवाचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे” या आत्मविश्‍वासाने हनोखने यहोवाची उपासना केली. (इब्री लोकांस ११:६) तेव्हा, आपल्याला असलेले सर्व ज्ञान हनोखला नव्हते तरीसुद्धा ज्यावर दृढ विश्‍वास उभारता येईल इतके ज्ञान त्याच्याजवळ अवश्‍य होते. अशा विश्‍वासामुळेच त्याने वादळी काळातही आपली सात्त्विकता टिकवून ठेवली.

हनोखच्या विश्‍वासाचे अनुकरण करा

१५, १६. आपण हनोखचे अनुकरण कसे करू शकतो?

१५ आजच्या या कठीण काळात आपल्यालाही हनोखप्रमाणेच यहोवाला संतुष्ट करण्याची इच्छा असल्यामुळे आपण हनोखच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे. यहोवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल ज्ञान आत्मसात करून ते आपण नेहमी मनात बाळगले पाहिजे. पण इतकेच करणे पुरेसे नाही. जीवनात कोणतेही पाऊल उचलताना आपण या अचूक ज्ञानास आपले मार्गदर्शन करू दिले पाहिजे. (स्तोत्र ११९:१०१; २ पेत्र १:१९) देवाची विचारसरणी आपली मार्गदर्शक बनली पाहिजे आणि आपल्या प्रत्येक विचाराने व कृतीने आपण त्याला संतोषविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

१६ हनोखच्या काळात आणखी कोण यहोवाची सेवा करत होते याविषयी कोणताही अहवाल उपलब्ध नाही. स्पष्टतः एकतर तो एकटाच असावा किंवा त्याच्यासोबत फार कमी लोक यहोवाची सेवा करत असावेत. आज जगात आपणही फार कमी लोक आहोत पण यामुळे आपण निरुत्साहित होत नाही. कोणीही आपल्याविरुद्ध असले तरी यहोवा आपले साहाय्य करेल. (रोमकर ८:३१) हनोखने अभक्‍त जनांच्या नाशाविषयी धैर्याने इशारा दिला. आपणही थट्टा, विरोध व छळाला तोंड द्यावे लागले तरीही ‘राज्याच्या सुवार्तेचा’ धैर्याने प्रचार करतो. (मत्तय २४:१४) हनोख त्याच्या काळातल्या इतर लोकांइतका जगला नाही. पण तरीही त्याची आशा त्या जगाची नव्हती. त्याची नजर त्यापेक्षा शानदार अशा जगावर केंद्रित होती. (इब्री लोकांस ११:१०, ३५) आपलीही नजर यहोवाच्या उद्देशांच्या पूर्णतेवर खिळलेली आहे. त्यामुळे आपण या जगाचा पुरेपूर वापर करत नाही. (१ करिंथकर ७:३१) त्याऐवजी आपण आपली ताकद व साधने विशेषतः यहोवाच्याच सेवेकरता वापरतो.

१७. आपल्याजवळ कोणते ज्ञान आहे जे हनोखजवळ नव्हते आणि म्हणून आपण काय केले पाहिजे?

१७ हनोखला विश्‍वास होता की यहोवाने अभिवचन दिलेली संतती त्याच्या नियुक्‍त वेळी उत्पन्‍न होईल. ती संतती—येशू ख्रिस्त प्रकट होऊन आता २,००० वर्षे होत आली आहेत. येशूने आपल्याकरता खंडणी दिली व आपल्याकरता तसेच हनोखसारख्या पुरातन विश्‍वासू साक्षीदारांकरता सार्वकालिक जीवन मिळवण्याचा मार्ग खुला केला. आज ती संतती अर्थात येशू ख्रिस्त देवाच्या राज्याचा राजा या नात्याने सिंहासनावर विराजमान असून त्याने सैतानाला स्वर्गातून खाली या पृथ्वीवर फेकून दिले आहे आणि याच्या परिणामस्वरूप आज आपण सर्वत्र क्लेशदायक परिस्थिती पाहात आहोत. (प्रकटीकरण १२:१२) होय, हनोखजवळ होते त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने ज्ञान आज आपल्याजवळ आहे. तर मग आपणही त्याच्यासारखाच दृढ विश्‍वास बाळगू या. देवाच्या अभिवचनांच्या पूर्णतेवर आपल्याला असलेल्या विश्‍वासाचा आपल्या प्रत्येक कृतीवर प्रभाव पडला पाहिजे. आपणही हनोखप्रमाणे, संकटमय काळात जगत असतानाही देवाबरोबर चालावे. (w०५ ९/१)

[तळटीपा]

^ परि. 5 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) यातील १ ल्या खंडात, पृष्ठ २२० वर ६ वा परिच्छेद कृपया पाहा.

^ परि. 10 अनोशच्या काळाआधीच यहोवा आदामाशी बोलत असे. हाबेलने यहोवाला अर्पण केलेले बलिदान त्याने मान्य केले. तसेच काईनाने मत्सराने पेटून आपल्या भावाचा खून करण्याआधी देव काईनाशीही बोलला. त्याअर्थी, “परमेश्‍वराच्या नावाने प्रार्थना” करण्याची सुरुवात ही खऱ्‍या उपासनेच्या संबंधाने नव्हे तर एका नव्या पद्धतीने सुरू झाली असल्याची शक्यता आहे.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• देवासोबत चालण्याचा काय अर्थ होतो?

• देवाबरोबर चालणे हा जगण्याचा सर्वात उत्तम मार्ग का आहे?

• संकटमय काळातही हनोख कशामुळे देवाबरोबर चालू शकला?

• आपण हनोखचे अनुकरण कसे करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चित्र]

विश्‍वासाने “हनोख देवाबरोबर चालला”

[२५ पानांवरील चित्र]

यहोवाने केलेल्या प्रतीज्ञा अवश्‍य पूर्ण होतील यावर आपल्याला विश्‍वास आहे