व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हृदयपटलावर लिहिलेले प्रीतीचे नियमशास्त्र

हृदयपटलावर लिहिलेले प्रीतीचे नियमशास्त्र

हृदयपटलावर लिहिलेले प्रीतीचे नियमशास्त्र

“मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन.”—यिर्मया ३१:३३.

१, २. (क) आता आपण काय पाहणार आहोत? (ख) यहोवाने सिनाय पर्वतावर कशाप्रकारे स्वतःस प्रकट केले?

याआधीच्या दोन लेखांत आपण पाहिले की मोशे सिनाय पर्वतावरून खाली उतरला तेव्हा त्याच्या चेहऱ्‍यातून यहोवाचे वैभव प्रतिबिंबित करणारी किरणे निघत होती. तसेच, मोशे कसा आपल्या चेहऱ्‍यावर आच्छादन घालत असे हे देखील आपण पाहिले. आता आपण याच्याशीच संबंधित असलेल्या व आजच्या काळात राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांकरता समर्पक असलेल्या एका विषयावर चर्चा करू.

पर्वतावर असताना मोशेला यहोवाकडून काही सूचना मिळाल्या. सिनाय पर्वताच्या पायथ्याशी एकत्रित झालेल्या इस्राएल लोकांना खुद्द देवाचे अद्‌भुत प्रकटीकरण पाहण्यास मिळाले. “गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग जमले व शिंगाचा फार मोठ्याने नाद होऊ लागला, तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले. . . . सर्व सीनाय पर्वतावर धूर पसरला कारण परमेश्‍वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला.”—निर्गम १९:१६-१८.

३. यहोवाने इस्राएलांना कोणाच्या माध्यमाने दहा आज्ञा दिल्या आणि या राष्ट्राला काय समजून आले?

यहोवा एका देवदूताद्वारे लोकांशी बोलला आणि आज ज्यांना दहा आज्ञा म्हणून ओळखले जाते त्या आज्ञा त्याने त्यांना दिल्या. (निर्गम २०:१-१७) त्याअर्थी, या आज्ञा सर्वसमर्थ देवाकडूनच होत्या यात कसलीही शंका नव्हती. यहोवाने या आज्ञा दगडी पाट्यांवर लिहिल्या. पण इस्राएलांना सोन्याच्या वासराची पूजा करताना मोशेने पाहिले तेव्हा त्याने या दगडी पाट्या जमिनीवर फेकून फोडून टाकल्या. यहोवाने मग पुन्हा या आज्ञा दगडावर लिहिल्या. यावेळी जेव्हा मोशे त्या पाट्या घेऊन खाली उतरला तेव्हा त्याच्या चेहऱ्‍यातून तेजस्वी किरणे निघत होती. एव्हाना सर्वांना हे समजायला हवे होते की या आज्ञा अतिशय महत्त्वाच्या होत्या.—निर्गम ३२:१५-१९; ३४:१, ४, २९, ३०.

४. दहा आज्ञा अतिशय महत्वाच्या का होत्या?

दहा आज्ञा लिहिलेल्या दोन दगडी पाट्या आधी निवासमंडपाच्या व नंतर मंदिरातल्या परमपवित्र स्थानात कराराच्या कोशात ठेवण्यात आल्या. त्यांवर लिहिलेल्या नियमांत मोशेच्या नियमशास्त्राच्या कराराची मुख्य तत्त्वे होती व ती एका ईश्‍वरशासित राष्ट्राच्या सरकारी प्रशासनाची आधारभूत तत्त्वे बनली. हे नियम या गोष्टीचा पुरावा होते की यहोवा एका विशिष्ट राष्ट्राशी, त्याच्या निवडलेल्या लोकांशी व्यवहार करत होता.

५. देवाने इस्राएलांना दिलेल्या नियमांवरून त्याला त्यांच्याबद्दल असलेली प्रीती कशी दिसून आली?

त्या आज्ञांनी यहोवाबद्दल बरेच काही प्रकट केले. विशेषतः त्याच्या लोकांवर त्याला असलेले प्रेम त्यांतून प्रकट झाले. ज्यांनी या आज्ञांचे पालन केले त्यांच्याकरता त्या किती अनमोल असे वरदान ठरल्या! एका विद्वानाने लिहिले: ‘देवाची ही दहा वचने इतकी श्रेष्ठ आहेत की त्यांआधी किंवा त्यांनंतर मानवांनी निर्माण केलेली कोणतीही आचारसंहिता त्यांपेक्षा श्रेष्ठ ठरणे तर सोडाच पण त्यांच्याशी बरोबरीही करू शकलेली नाही.’ मोशेच्या सबंध नियमशास्त्राच्या संदर्भात यहोवाने म्हटले: “तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधि व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे; पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. हेच शब्द तू इस्राएल लोकांना सांग.”—निर्गम १९:५, ६.

हृदयावर लिहिलेले नियम

६. दगडी पाट्यांवर लिहिलेल्या आज्ञांपेक्षा कोणते नियमशास्त्र अधिक मोलवान ठरले आहे?

होय, देवाने दिलेल्या त्या आज्ञा खरोखरच बहुमोल होत्या. पण अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांजवळ त्या दगडी पाट्यांवर लिहिलेल्या आज्ञांपेक्षाही कितीतरी पटीने जास्त मोलवान असे काहीतरी आहे हे तुम्हाला माहीत होते का? यहोवाने एका नव्या कराराविषयी भाकीत केले होते. हा नवा करार इस्राएल राष्ट्रासोबत करण्यात आलेल्या नियमशास्त्राच्या करारापेक्षा वेगळा असणार होता. “मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन.” (यिर्मया ३१:३१-३४) नव्या कराराचा मध्यस्थ येशू याने स्वतः आपल्या अनुयायांना नियमांची यादी लिहून दिली नाही. तर त्याने आपल्या शब्दांद्वारे व कृतींद्वारे यहोवाचे नियम त्याच्या शिष्यांच्या मनांत व अंतःकरणांत बिंबवले.

७. “ख्रिस्ताचा नियम” सर्वप्रथम कोणाला देण्यात आला आणि नंतर त्याचा कोणी स्वीकार केला?

या नियमाला “ख्रिस्ताचा नियम” म्हणण्यात आले आहे. तो सर्वप्रथम स्वाभाविक इस्राएलांच्या राष्ट्राला अर्थात याकोबाच्या वंशजांना नव्हे तर एका आत्मिक राष्ट्राला, अर्थात ‘देवाच्या इस्राएलाला’ देण्यात आला. (गलतीकर ६:२, १६; रोमकर २:२८, २९) देवाचे इस्राएल अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपासून बनले आहे. कालांतराने सर्व राष्ट्रांतून, यहोवाची उपासना करू इच्छिणाऱ्‍या लोकांचा एक “मोठा लोकसमुदाय” त्यांच्यात सामील झाला. (प्रकटीकरण ७:९, १०; जखऱ्‍या ८:२३) हे दोन्ही गट, ‘एका मेंढपाळाच्या’ देखरेखीखाली “एक कळप” असल्यामुळे या दोन्ही गटाचे सदस्य ‘ख्रिस्ताच्या नियमाचा’ स्वीकार करून आपल्या सर्व कार्यांवर त्याचा प्रभाव पडू देतात.—योहान १०:१६.

८. मोशेचे नियमशास्त्र व ख्रिस्ताचा नियम यात कोणता एक फरक होता?

स्वाभाविक इस्राएल राष्ट्रातील लोक या विशिष्ट राष्ट्रात जन्म झाल्यामुळे मोशेच्या नियमशास्त्राच्या बंधनात होते; पण ख्रिस्ती मात्र त्यांचा वंश अथवा जन्माचे ठिकाण यांसारख्या गोष्टींच्या आधारावर नव्हे, तर स्वेच्छेने ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन राहतात. ते यहोवाबद्दल व त्याच्या मार्गांबद्दल शिकून घेतात आणि यामुळे त्यांच्या मनात त्याच्या इच्छेनुसार जगण्याची उत्कंठा निर्माण होते. देवाचे नियम जणू “त्यांच्या अंतर्यामी,” किंवा “त्यांच्या हृदयपटलावर” लिहिलेले असल्यामुळे अभिषिक्‍त ख्रिस्ती केवळ शिक्षेच्या भीतीने देवाच्या आज्ञांचे पालन करत नाहीत; शिवाय ते केवळ कर्तव्याच्या भावनेनेही त्याच्या आज्ञा पाळत नाहीत. तर त्यांच्या आज्ञापालनाचे कारण यापेक्षा ठोस आणि यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रभावशाली आहे. त्यांच्याप्रमाणे दुसरी मेंढरे देखील देवाचा नियम त्यांच्या हृदयात असल्यामुळे त्याच्या आज्ञांचे पालन करतात.

प्रीतीवर आधारित असलेले नियम

९. यहोवाच्या सर्व नियमांचे सार प्रीती आहे हे येशूने कशाप्रकारे सूचित केले?

यहोवाच्या सर्व कायद्यांचे व नियमांचे सार एका शब्दात सांगायचे झाले तर ते आहे: प्रीती. प्रीती किंवा प्रेम पूर्वीपासूनच शुद्ध उपासनेचा अविभाज्य अंग होते आणि सर्वदा राहील. येशूला जेव्हा नियमशास्त्रातील सर्वात प्रमुख आज्ञा कोणती असे विचारण्यात आले तेव्हा त्याने उत्तर दिले: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.” दुसरी आज्ञा म्हणजे: “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” मग तो म्हणाला: “ह्‍या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.” (मत्तय २२:३५-४०) असे म्हणून येशू हेच सुचवत होता, की दहा आज्ञा असलेला केवळ नियमशास्त्रच नाही तर सबंध इब्री शास्त्रवचने प्रीतीवर आधारित होती.

१०. प्रेम हाच ख्रिस्ताच्या नियमाचा आधार आहे हे आपल्याला कशावरून समजते?

१० ख्रिश्‍चनांच्या हृदयातील नियमही देवाबद्दलच्या व शेजाऱ्‍याबद्दलच्या प्रेमावर आधारित आहे का? निश्‍चितच! ख्रिस्ताचा नियम देवावर मनापासून प्रेम करण्यास सांगतो आणि त्यात एका नव्या आज्ञेचाही समावेश आहे—ख्रिश्‍चनांना एकमेकांबद्दल आत्मत्यागी प्रेम बाळगायचे आहे. जसे येशूने त्यांच्यावर प्रेम केले तसे त्यांना एकमेकांवर प्रेम करायचे आहे. त्याने आपल्या मित्रांकरता आपला जीव दिला. येशूने आपल्या शिष्यांना देवावर प्रेम करण्यास शिकवले व जसे त्याने त्यांच्यावर प्रेम केले तसेच त्यांना एकमेकांवर प्रेम करण्यास शिकवले. खरे ख्रिस्ती एकमेकांवर जे उल्लेखनीय प्रेम दाखवतात तेच त्यांची ओळख करून देणारे मुख्य चिन्ह आहे. (योहान १३:३४, ३५; १५:१२, १३) येशूने तर त्यांना आपल्या शत्रूंवरही प्रेम करण्याची आज्ञा दिली.—मत्तय ५:४४.

११. येशूने देवाबद्दल व लोकांबद्दलही प्रेम कसे व्यक्‍त केले?

११ प्रेम दाखवण्याच्या बाबतीत येशूचे परिपूर्ण उदाहरण आहे. स्वर्गात एक शक्‍तिशाली आत्मिक व्यक्‍ती असतानाही, त्याने पृथ्वीवर आपल्या पित्याच्या कार्यांना बढावा देण्याच्या संधीचे स्वागत केले. इतरांना सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून आपले मानवी जीवन अर्पण करण्यासोबतच त्याने लोकांना, त्यांनी कसे जगावे हे दाखवले. तो नम्र, दयाळू व विचारशील होता; जे गांजलेले व पीडित होते त्यांना त्याने मदत केली. तसेच त्याने लोकांना “सार्वकालिक जीवनाची वचने” सांगितली व लोकांना यहोवाची ओळख घडावी म्हणून अथक परिश्रम घेतले.—योहान ६:६८.

१२. देवाबद्दलचे व शेजाऱ्‍याबद्दलचे प्रेम एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकत नाही असे का म्हणता येते?

१२ देवाबद्दलचे व शेजाऱ्‍याबद्दलचे प्रेम यांना एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकत नाही. प्रेषित योहानाने म्हटले: “प्रीति देवापासून आहे; . . . मी देवावर प्रीति करितो, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीति करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीति करिता येणे शक्य नाही.” (१ योहान ४:७, २०) यहोवा हा प्रीतीचा उगम आणि प्रीतीचे साक्षात रूप आहे. तो जे काही करतो ते प्रेमाने प्रेरित होऊनच करतो. आपल्याला त्याच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले असल्यामुळे आपल्यातही प्रेम करण्याची क्षमता आहे. (उत्पत्ति १:२७) आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम करण्याद्वारे आपण देवाबद्दलचे आपले प्रेम व्यक्‍त करत असतो.

प्रीती म्हणजेच आज्ञापालन

१३. देवावर प्रेम करण्याकरता सर्वप्रथम आपण काय केले पाहिजे?

१३ आपण देवाला पाहू शकत नाही. मग आपण त्याच्यावर प्रीती कशी करू शकतो? याकरता उचलावयाचे पहिले महत्त्वाचे पाऊल म्हणजे त्याला जाणून घेणे. अनोळखी व्यक्‍तीवर कोणीही खऱ्‍या अर्थाने प्रेम करू शकत नाही किंवा भरवसा ठेवू शकत नाही. म्हणूनच देवाचे वचन आपल्याला बायबलचे वाचन व प्रार्थना करण्याद्वारे, तसेच देवाला ओळखणाऱ्‍या व त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या लोकांशी संगती करण्याद्वारे त्याला जाणून घेण्याचे प्रोत्साहन देते. (स्तोत्र १:१, २; फिलिप्पैकर ४:६; इब्री लोकांस १०:२५) चार शुभवर्तमान विशेषतः मोलाचे आहेत कारण ते येशू ख्रिस्ताच्या जीवनातून व सेवेतून प्रतिबिंबित झालेले यहोवाचे व्यक्‍तिमत्त्व प्रकट करतात. जसजसे आपण देवाला अधिकाधिक जाणून घेतो आणि त्याने आपल्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दलची आपली कृतज्ञता जसजशी वाढते तसतशी त्याच्या आज्ञा पाळण्याची व त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचे अनुकरण करण्याची आपली इच्छा वाढत जाते. होय, देवावर प्रेम करणे म्हणजेच त्याच्या आज्ञा पाळणे.

१४. देवाचे नियम कठीण नाहीत असे का म्हणता येते?

१४ आपण एखाद्या व्यक्‍तीवर प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्‍तीच्या आवडीनिवडी आपल्याला चांगल्याप्रकारे माहीत असतात आणि त्यानुसारच आपण तिच्याशी वागतो. जिच्यावर आपण प्रेम करतो त्या व्यक्‍तीला नाराज करण्याची आपली इच्छा नसते. प्रेषित योहानाने लिहिले: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहान ५:३) त्याच्या आज्ञा कठीणही नाहीत आणि खूप जास्तही नाहीत. प्रेमच आपल्याला या आज्ञांचे पालन करण्यास प्रेरित करते. आपली प्रत्येक कृती कशी असावी यासाठी आपल्याला असंख्य नियमांची यादी पाठ करावी लागत नाही; देवाबद्दलचे प्रेमच आपल्याला प्रेरित करते. जर आपले देवावर प्रेम असेल, तर त्याच्या इच्छेनुसार करण्यास आपल्याला आनंदच वाटेल. असे केल्यामुळे आपल्याला देवाची संमती मिळेल आणि आपला फायदाच होईल कारण त्याचे मार्गदर्शन नेहमी आपल्या हिताकरताच असते.—यशया ४८:१७.

१५. यहोवाचे अनुकरण करण्यास आपल्याला कशामुळे प्रेरणा मिळेल? स्पष्ट करा.

१५ देवाचे प्रेम आपल्याला त्याच्या गुणांचे अनुकरण करण्यास प्रेरित करते. आपण एखाद्या व्यक्‍तीवर प्रेम करतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्‍तीच्या गुणांचे कौतुक वाटते आणि आपण तिच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो. यहोवा व येशू यांच्यातल्या नात्याचा विचार करा. ते स्वर्गात कदाचित अब्जावधी वर्षे एकमेकांच्या सहवासात होते. त्यांच्यात गहिऱ्‍या व निर्मळ प्रेमाचे नाते होते. येशूने आपल्या स्वर्गीय पित्याचे इतके हुबेहूब अनुकरण केले की तो आपल्या शिष्यांना असे म्हणू शकला: “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहान १४:९) आपण जसजसे यहोवा व त्याच्या पुत्राबद्दल आपले ज्ञान व आपली कृतज्ञता वाढवतो तसतसे आपण त्यांच्यासारखे होण्यास प्रेरित होत जातो. यहोवावर असलेल्या आपल्या प्रेमामुळे व त्याच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्यामुळे आपल्याला, ‘जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकून, नवा मनुष्य धारण करणे’ शक्य होईल.—कलस्सैकर ३:९, १०; गलतीकर ५:२२, २३.

क्रियाशील प्रीती

१६. आपल्या प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यातून देवाबद्दल व शेजाऱ्‍याबद्दल प्रीती कशी व्यक्‍त होते?

१६ ख्रिस्ती या नात्याने, आपण देवाबद्दल व शेजाऱ्‍याबद्दलच्या आपल्या प्रेमाने प्रेरित होऊन राज्य प्रचाराचे व शिष्य बनवण्याचे कार्य केले पाहिजे. असे केल्याने आपण यहोवा देवाचे मन आनंदित करतो कारण “त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.” (१ तीमथ्य २:३, ४) असे करण्याद्वारे आपल्याला, इतरांनाही ख्रिस्ताचा नियम त्यांच्या हृदयावर लिहून घेण्यास मदत करण्याचा आनंद मिळेल. त्यांच्या व्यक्‍तिमत्त्वात बदल होईल व ते यहोवाचे अद्‌भुत गुण प्रतिबिंबित करू लागतील तेव्हा हे पाहून आपल्याला आनंद वाटेल. (२ करिंथकर ३:१८) खरोखर इतरांना देवाला जाणून घेण्यास मदत करणे, यापेक्षा मोलवान अशी कोणतीही भेट आपण त्यांना देऊ शकत नाही. जे यहोवाची मैत्री स्वीकारतात त्यांना ती सर्वकाळासाठी मिळते.

१७. भौतिक गोष्टींच्या मागे लागण्याऐवजी देवाबद्दल व लोकांबद्दल प्रेम उत्पन्‍न करणेच अधिक अर्थपूर्ण का आहे?

१७ आपण अशा एका जगात राहतो, जेथे भौतिक गोष्टींना खूप महत्त्व दिले जाते, लोकांना या वस्तू प्रिय वाटतात. पण भौतिक वस्तू अविनाशी नाहीत. त्या चोरीला जाऊ शकतात किंवा खराब होऊ शकतात. (मत्तय ६:१९) बायबल आपल्याला बजावून सांगते: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१६, १७) होय यहोवा सर्वकाळ राहील आणि, त्याच्यावर प्रेम करणारे व त्याची सेवा करणारेही सर्वकाळ राहतील. तेव्हा जगातील तात्पुरत्या गोष्टींच्या मागे लागण्याऐवजी देवाबद्दल व लोकांबद्दल प्रेम उत्पन्‍न करणेच अधिक अर्थपूर्ण नाही का?

१८. एका मिशनरी बहिणीने आत्मत्यागी प्रेम कशाप्रकारे दाखवले?

१८ जे प्रीतीच्या मार्गाने चालतात ते यहोवाला गौरव आणतात. सेनेगल येथे मिशनरी सेवा करणाऱ्‍या सोनियाचे उदाहरण घ्या. तिने हायडी नावाच्या एका स्त्रीसोबत बायबलचा अभ्यास केला होता. हायडीला तिच्या विश्‍वासात नसलेल्या पतीकडून एचआयव्हीची बाधा झाली. तिच्या पतीचा मृत्यू झाल्यावर हायडीचा बाप्तिस्मा झाला. पण लवकरच तिची प्रकृती खालावली आणि तिला एड्‌स झाल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले. सोनिया सांगते: “इस्पितळाचे कर्मचारी त्यांच्यापरीने होईल तितके करत होते, पण हे कर्मचारी फार थोडे होते. त्यामुळे मंडळीतून स्वयंसेवकांना इस्पितळात हायडीची काळजी घेण्यास विनंती करण्यात आली. दुसऱ्‍या रात्री मी हायडीच्या पलंगाशेजारी एक चटई घालून झोपले आणि तिचा मृत्यू होईपर्यंत मी तिची काळजी घेतली. तिथले डॉक्टर मला म्हणाले: ‘सहसा एड्‌स रुग्णांचे नातलग व कुटुंबीयही त्यांना टाकून देतात, हीच आमच्यासमोर एक सर्वात मोठी समस्या आहे. तुमचा या रुग्णाशी काही संबंध नसताना, तुम्ही एकाच देशाचे किंवा एकाच वर्णाचे नसताना आपला जीव धोक्यात घालण्यास का तयार झाला?’ मी त्यांना समजावून सांगितले की हायडी माझी बहीणच होती. आम्ही एकाच आईवडिलांचे असल्याइतकी ती मला जवळची वाटते. त्यामुळे तिची काळजी घेण्यास मला आनंदच वाटला.” हायडीची प्रेमळपणे काळजी घेतल्यामुळे सोनियावर कोणताही दुष्परिणाम झाला नाही.

१९. देवाचे नियम आपल्या हृदयावर लिहिलेले असल्यामुळे आपण कशाचा फायदा घेतला पाहिजे?

१९ यहोवाच्या साक्षीदारांमध्ये आत्मत्यागी प्रेमाची कितीतरी उदाहरणे सापडतील. खास देवाच्या लोकांकरता आज कोणतीही लिखित नियमावली नाही. त्याउलट आपण इब्री लोकांस ८:१० यात लिहिलेल्या शब्दांची पूर्णता अनुभवत आहोत: “परमेश्‍वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा: मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन, आणि मी त्यांना देव असा होईन, आणि ते मला माझे लोक असे होतील.” यहोवाने आपल्या हृदयावर लिहिलेल्या प्रेमाच्या नियमाची आपण नेहमी कदर करूया व हे प्रेम व्यक्‍त करण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेऊया.

२०. ख्रिस्ताचा नियम एक अमूल्य देणगी का आहे?

२० अशाप्रकारचे प्रेम व्यक्‍त करणाऱ्‍या एका जागतिक बंधूसमाजासोबत देवाची सेवा करणे खरोखरच किती आनंददायक आहे. ज्यांच्या हृदयावर ख्रिस्ताचा नियम लिहिलेला आहे त्यांना या प्रीतीविरहीत जगात एक अमूल्य खजिना मिळाला आहे. त्यांना केवळ यहोवाचे प्रेमच अनुभवायला मिळत नाही, तर या बंधूसमाजात प्रीतीचे अतूट बंधन अनुभवायला मिळते. “पाहा, बंधूनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!” यहोवाचे साक्षीदार अनेक राष्ट्रांत राहतात, अनेक भाषा बोलतात, अनेक संस्कृतींतून येतात पण तरीसुद्धा त्यांच्यात जी धार्मिक एकता आहे ती आणखी कोठेही पाहायला मिळत नाही. या एकतेमुळे त्यांना यहोवाची संमती मिळते. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “तेथे [प्रीतीने एकजूट अशा लोकांमध्ये] परमेश्‍वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.”—स्तोत्र १३३:१-३. (w०५ ८/१५)

तुम्हाला उत्तर देता येईल का?

• दहा आज्ञा कितपत महत्त्वाच्या होत्या?

• हृदयावर लिहिलेले नियम म्हणजे काय?

• “ख्रिस्ताच्या नियमात” प्रीतीची काय भूमिका आहे?

• आपण देवाबद्दल व शेजाऱ्‍यांबद्दल आपली प्रीती कशा दाखवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१९ पानांवरील चित्र]

इस्राएलांना दगडी पाट्यांवर नियम लिहून देण्यात आले होते