“जागृत राहा”—न्यायनिवाडा करावयाची घटिका आली आहे!
“जागृत राहा”—न्यायनिवाडा करावयाची घटिका आली आहे!
या अभ्यास लेखातील माहिती २००४/०५ दरम्यान सबंध जगात भरवण्यात आलेल्या प्रांतीय अधिवेशनांत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जागृत राहा! या माहितीपत्रकावर आधारित आहे.
“जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही.”—मत्तय २४:४२.
१, २. येशूने अगदी उचितपणे आपल्या आगमनाची तुलना कशाशी केली?
तुम्ही राहता त्या परिसरात एक चोर घरफोड्या करीत आहे आणि त्याने बरीच घरे लुटली आहेत असे तुम्हाला कळले तर तुम्ही काय कराल? आपल्या कुटुंबियांच्या व घरातल्या मोलवान वस्तूंच्या संरक्षणाकरता, साहजिकच तुम्ही सावध राहाल. कारण, चोर कधी सांगून येत नाही. तो अगदी हळूच, अनपेक्षित क्षणी येतो.
२ येशूने अनेकदा, चोर कशाप्रकारे कार्य करतो त्याचे उदाहरण दिले. (लूक १०:३०; योहान १०:१०) अंतकाळी व आपण न्यायनिवाडा करण्यासाठी येऊ त्याआधी ज्या घटना घडतील त्यांविषयी ताकीद देताना येशूने असे म्हटले: “जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही. आणखी हे समजा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता, आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते.” (मत्तय २४:४२, ४३) तर येशूने आपल्या आगमनाची तुलना, चोर कशाप्रकारे अगदी अनपेक्षित येतो त्याच्याशी केली.
३, ४. (क) येशूने आपल्या येण्याविषयी जो इशारा दिला, त्याकडे लक्ष देण्याचा काय अर्थ होतो? (ख) कोणते प्रश्न उपस्थित होतात?
३ ही तुलना उचित होती कारण येशूच्या येण्याची नेमकी तारीख त्याच्या अनुयायांना कळणार नव्हती. याआधी, याच भविष्यवाणीत येशूने म्हटले: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाहि नाही.” (मत्तय २४:३६) म्हणूनच येशूने म्हटले: “तुम्हीहि सिद्ध असा.” (मत्तय २४:४४) यहोवाचा न्यायदंड बजावणाऱ्याच्या रूपात येशू केव्हाही येवो, पण ज्यांनी त्याच्या इशाऱ्याकडे लक्ष दिले ते आपली चालचलणूक चांगली ठेवण्याद्वारे त्याच्या येण्याकरता तयार असणार होते.
४ काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात: येशूने दिलेला इशारा केवळ जगातील लोकांकरता होता का, की खऱ्या
ख्रिश्चनांनीही ‘जागृत राहिले’ पाहिजे? ‘जागृत राहणे’ इतके निकडीचे का आहे आणि आपण हे कसे करू शकतो?इशारा कोणाकरता?
५. “जागृत राहा” हा इशारा खऱ्या ख्रिश्चनांकरता आहे हे आपल्याला कशावरून कळते?
५ जगातले लोक, जे येणाऱ्या संकटाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्याकरता प्रभूचे येणे चोर येण्यासारखेच असेल हे तर अगदी खरे आहे. (२ पेत्र ३:३-७) पण खऱ्या ख्रिश्चनांच्या बाबतीत काय? प्रेषित पौलाने सहविश्वासू बांधवांना उद्देशून लिहिले: “तुम्हाला स्वतःला पक्के माहीत आहे की, जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.” (१ थेस्सलनीकाकर ५:२) ‘प्रभूचा दिवस येणार आहे’ याबद्दल आपल्या मनात कोणतीही शंका नाही. पण म्हणून आपण जागृत राहण्याची गरज नाही असा याचा अर्थ होतो का? “तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल,” हे शब्द येशूने आपल्या शिष्यांना उद्देशून म्हटले होते याकडे लक्ष द्या. (मत्तय २४:४४) याआधी आपल्या शिष्यांना सदोदीत राज्याचा शोध घेण्याचे प्रोत्साहन देताना येशूने त्यांना अशी ताकीद दिली होती की “सिद्ध असा, कारण तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (लूक १२:३१, ४०) तेव्हा, येशूने आपल्या अनुयायांनाच मनात ठेवून, “जागृत राहा” असा इशारा दिला होता हे स्पष्ट होत नाही का?
६. आपण ‘जागृत राहणे’ गरजेचे का आहे?
६ आपण ‘जागृत राहावे’ व ‘सिद्ध असावे’ हे का गरजेचे आहे? येशूने याचा खुलासा केला: “त्या वेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळीत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल.” (मत्तय २४:४०, ४१) अधार्मिक जगाचा नाश होईल तेव्हा, जे सिद्ध असतील त्यांना ‘घेतले जाईल’ म्हणजेच वाचवले जाईल. इतरांना नाशाकरता ‘ठेवले जाईल’ कारण त्यांनी स्वतःच्याच स्वार्थांचा पाठलाग करण्यात आयुष्य घालवले. यात अशाही व्यक्तींचा समावेश असू शकतो, की ज्यांना पूर्वी सत्याचे ज्ञान होते पण जे जागृत राहिले नाहीत.
७. अंत केव्हा येईल हे माहीत नसल्यामुळे आपल्याला काय करण्याची संधी मिळते?
७ या जुन्या व्यवस्थेच्या अंताची नेमकी तारीख माहीत नसल्यामुळे, आपण देवाची निःस्वार्थ हेतूने सेवा करत आहोत हे दाखवण्याची आपल्याला संधी मिळते. ती कशी? कदाचित अंत येण्यास फार उशीर लागत आहे असे काहींना वाटू शकते. दुःखाची गोष्ट म्हणजे, असा विचार करणाऱ्या ख्रिश्चनांनी यहोवाच्या सेवेत आपला आवेश मंदावू दिला आहे. पण आपण यहोवाला समर्पण केले तेव्हा कोणत्याही अटीविना यहोवाची सेवा करण्यास स्वतःला वाहिले होते. जे यहोवाला चांगल्याप्रकारे ओळखतात त्यांना माहीत आहे की शेवटल्या क्षणी दाखवलेल्या आवेशाने यहोवा प्रभावित होणार नाही. कारण, तो अंतःकरणाचे परीक्षण करतो.—१ शमुवेल १६:७.
८. यहोवाबद्दल वाटणारे प्रेम आपल्याला जागृत राहण्यास कशाप्रकारे प्रेरित करते?
८ आपण यहोवावर मनापासून प्रेम करत असल्यामुळे त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास आपल्याला आनंद वाटतो. (स्तोत्र ४०:८; मत्तय २६:३९) आणि आपण सर्वकाळ यहोवाची सेवा करू इच्छितो. या सुसंधीला आपण अतिशय मौल्यवान लेखतो व आपल्या अपेक्षेपेक्षा थोडा जास्त काळ थांबावे लागल्यामुळे तिचे मोल कमी होत नाही. आणि आपण जागृत राहण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे यहोवाचा दिवस हा त्याच्या उद्देशाच्या पूर्ततेतील एक महत्त्वाचा टप्पा असेल ज्याची आपण आतूरतेने वाट पाहत आहोत. देवाला संतुष्ट करण्याची प्रामाणिक इच्छा असल्यामुळे त्याच्या वचनातील सल्ल्याचे पालन करण्याची व त्याच्या राज्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्याची आपल्याला प्रेरणा मिळते. (मत्तय ६:३३; १ योहान ५:३) जागृत राहिल्यामुळे आपण जीवनात जे निर्णय घेतो आणि दररोज आपण कशाप्रकारे आपले जीवन जगतो त्यावर कसा प्रभाव पडला पाहिजे याबद्दल थोडा विचार करू या.
तुम्ही कोणत्या दिशेने वाटचाल करत आहात?
९. लोकांनी लवकरात लवकर जागे होऊन आपल्या काळात घडणाऱ्या गोष्टींचा खरा अर्थ ओळखणे अगत्याचे का आहे?
९ आजच्या जगात गंभीर समस्या व धक्केदायक घटना रोजच्याच झाल्या आहेत याची अनेक जणांना जाणीव आहे; शिवाय जीवनात ते स्वतः ज्या दिशेने वाटचाल करत आहेत त्याबद्दल कदाचित त्यांना समाधान वाटत नसेल. पण जगाच्या परिस्थितीचा खरा अर्थ त्यांना माहीत आहे का? आपण ‘युगाच्या समाप्तीच्या’ काळात जगत आहोत याची त्यांना जाणीव आहे का? (मत्तय २४:३) सध्याच्या जगातील लोकांमध्ये दिसणारी स्वार्थी, क्रूर व अधार्मिक वृत्ती आपण “शेवटल्या काळी” जगत आहोत याचा संकेत आहे याची त्यांना कल्पना आहे का? (२ तीमथ्य ३:१-५) त्यांनी लवकरात लवकर जागे होऊन, या सर्व गोष्टींचा खरा अर्थ ओळखला पाहिजे व आपण कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत याबद्दल विचार केला पाहिजे.
१०. आपण जागृत राहात आहोत याची खात्री करण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
१० आपल्याविषयी काय? आपल्याला दररोजच्या जीवनात नोकरी, आरोग्य, कुटुंब व आपली उपासना या गोष्टींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. बायबल काय सांगते हे आपल्याला माहीत आहे आणि त्यानुसार वागण्याचा आपण प्रयत्न करतो. तेव्हा, आपण स्वतःला हे प्रश्न विचारले पाहिजेत: ‘जीवनाच्या चिंतांमुळे मी स्वतःला आध्यात्मिक ध्येयांपासून भरकटू दिले आहे का? जगिक तत्त्वज्ञान, विचारसरणी यांचा मी माझ्या निर्णयांवर परिणाम होऊ देत आहे का?’ (लूक २१:३४-३६; कलस्सैकर २:८) यहोवावर आपला पूर्ण भरवसा आहे आणि आपण स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहात नाही हे सदोदीत आपल्या कृतींतून दाखवण्याची गरज आहे. (नीतिसूत्रे ३:५) असे केल्यास, आपण “खरे जीवन,” अर्थात, देवाच्या नव्या जगातील सार्वकालिक जीवन ‘बळकट धरून ठेवू.’—१ तीमथ्य ६:१२, १९.
११-१३. (क) नोहाच्या काळात व (ख) लोटच्या काळात जे घडले त्यावरून आपण काय शिकू शकतो?
११ बायबलमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांतून धडा घेऊन आपल्याला जागृत राहण्यास मदत मिळू शकते. नोहाच्या काळात काय घडले हे लक्षात घ्या. बऱ्याच काळाआधी यहोवाने येणाऱ्या नाशाची सूचना दिली होती. पण एक नोहा व त्याचे कुटुंब सोडले, तर इतर कोणीही या सूचनेकडे लक्ष दिले नाही. (२ पेत्र २:५) यासंदर्भात येशूने म्हटले: “नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यास समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेहि येणे होईल.” (मत्तय २४:३७-३९) यावरून आपण काय शिकू शकतो? देव आपल्याला आध्यात्मिक कार्यांना जीवनात प्राधान्य देण्याचा आग्रह करतो. पण प्रापंचिक गोष्टींत—मग ती दैनंदिन जीवनाची सर्वसाधारण कामे असली तरीही, त्यांत व्यग्र होऊन जर आपण आध्यात्मिक कार्यांकडे दुर्लक्ष करत असू तर आपल्या परिस्थितीविषयी गंभीरपणे विचार करण्याची ही वेळ आहे.—रोमकर १४:१७.
१२ लोटच्या काळाचाही विचार करा. लोट व त्याचे कुटुंब जेथे राहात होते, ते सदोम शहर भौतिक दृष्ट्या तर समृद्ध शहर होते पण नैतिकतेच्या बाबतीत त्या शहराची अगदी दयनीय परिस्थिती होती. यहोवाने आपल्या देवदूतांना या शहराचा नाश करण्याकरता पाठवले. देवदूतांनी लोट व त्याच्या कुटुंबाला सदोम शहरातून पळ काढा व मागे वळून पाहू नका असे सांगितले. देवदूतांच्या आग्रहामुळे त्यांनी सदोम शहर सोडले खरे. पण लोटाच्या बायकोचे मन मात्र सदोममध्ये असलेल्या आपल्या घरातच अडकले होते. देवदूतांची आज्ञा मोडून तिने मागे वळून पाहिले आणि यामुळे तिला आपले जीवन गमवावे लागले. (उत्पत्ति १९:१५-२६) भविष्यातल्या घटनांविषयी इशारा देण्याकरता येशूने म्हटले: “लोटाच्या बायकोची आठवण करा.” आपण या इशाऱ्यानुसार वागत आहोत का?—लूक १७:३२.
१३ ज्यांनी देवाच्या सूचनांकडे लक्ष दिले त्यांचा बचाव झाला. नोहा व त्याचे कुटुंब, तसेच लोट व त्याच्या मुलींच्या बाबतीत हे घडले. (२ पेत्र २:९) या उदाहरणांत आपल्याकरता असलेला इशारा लक्षात घेण्यासोबतच, धार्मिकतेची आवड धरणाऱ्यांकरता यात जो बचावाचा संदेश आहे तो लक्षात घेतल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते. तसेच, “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी” आणण्याचे देवाचे अभिवचन अवश्य पूर्ण होईल अशी आपल्याला मनापासून खात्री वाटते.—२ पेत्र ३:१३.
“न्यायनिवाडा करावयाची घटिका आली आहे!”
१४, १५. (क) न्यायनिवाड्याची “घटिका” यात काय सामील आहे? (ख) ‘देवाची भीति बाळगून त्याचे गौरव करण्यात’ कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे?
१४ जागृत राहात असताना, आपण कशाची अपेक्षा करू शकतो? प्रकटीकरणाचे पुस्तक देवाच्या उद्देशाच्या पूर्ततेतील प्रगतीशील घटनाक्रम आपल्यापुढे मांडते. येणाऱ्या नाशाकरता सिद्ध असण्याकरता त्यात सांगितल्यानुसार वागणे अत्यावश्यक आहे. प्रकटीकरणातील भविष्यवाणी, १९१४ साली ख्रिस्त स्वर्गात सिंहासनारूढ झाला तेव्हा सुरू झालेल्या ‘प्रभूच्या दिवसात’ घडणाऱ्या घटनांचे सचित्र वर्णन करते. (प्रकटीकरण १:१०) प्रकटीकरण आपल्याला एका देवदूताविषयी सांगते, की ज्याला “सार्वकालिक सुवार्ता” घोषित करण्यास सांगण्यात आले आहे. तो मोठ्या आवाजात अशी घोषणा करतो: “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे.” (प्रकटीकरण १४:६, ७) ही न्यायाची “घटिका” म्हणजे एक थोडका अवधी आहे. या अवधीत सदर भविष्यवाणीत वर्णन केलेल्या न्यायदंडांची घोषणा व त्यांची अंमलबजावणी देखील सामील आहे. आज आपण त्या अवधीत राहात आहोत.
१५ आता, म्हणजे न्यायनिवाड्याची घटिका संपुष्टात येण्याआधी आपल्याला असा आग्रह करण्यात आला आहे की “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा.” यात कशाचा समावेश आहे? देवाचे उचित भय बाळगल्यामुळे आपण वाईट गोष्टींकडे पाठ फिरवण्यास प्रवृत्त झाले पाहिजे. (नीतिसूत्रे ८:१३) जर आपण देवाचा सन्मान करत असू, तर मनःपूर्वक आदराने आपण त्याचे ऐकू. इतर गोष्टींत व्यग्र राहून आपण त्याचे वचन, बायबल वाचण्याकडे दुर्लक्ष करणार नाही. ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याचा सल्ला आपण कमी महत्त्वाचा लेखणार नाही. (इब्री लोकांस १०:२४, २५) देवाच्या मशीही राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याच्या बहुमानाची आपण मनापासून कदर करू आणि हे कार्य आवेशाने करू. आपण सर्व प्रसंगी यहोवावर पूर्ण मनाने भरवसा ठेवू. (स्तोत्र ६२:८) यहोवा सबंध विश्वाचा सार्वभौम आहे हे ओळखून आपण आपल्या जीवनातही तोच सार्वभौम आहे हे स्वीकारू व आनंदाने त्याच्या आज्ञांचे पालन करू. या सर्व मार्गांनी तुम्ही खरोखर देवाचे भय बाळगून त्याचे गौरव करत आहात का?
१६. प्रकटीकरण १४:८ यात सांगितल्यानुसार मोठ्या बाबेलविरुद्ध न्यायदंड आधीच बजावण्यात आला आहे असे आपण का म्हणू शकतो?
१६ प्रकटीकरण अध्याय १४ यात न्यायनिवाड्याच्या घटिकेत घडणार असलेल्या पुढील घटनांचे वर्णन केले आहे. सर्वप्रथम मोठी बाबेल, अर्थात खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा उल्लेख करण्यात आला आहे: “त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला: ‘पडली, मोठी बाबेल पडली!’” (प्रकटीकरण १४:८) होय, देवाच्या दृष्टिकोनातून मोठी बाबेल केव्हाच पडली आहे. १९१९ साली यहोवाच्या अभिषिक्त सेवकांना हजारो वर्षांपासून लोकांवर व राष्ट्रांवर प्रभुत्व करणाऱ्या बाबेलोनी सिद्धान्तांपासून व प्रथांपासून मुक्त करण्यात आले. (प्रकटीकरण १७:१, १५) त्यानंतर ते खऱ्या उपासनेच्या उन्नतीकरता स्वतःला वाहून घेऊ शकले. तेव्हापासूनच देवाच्या राज्याच्या सुवार्तेची जगभरात घोषणा करण्याचे कार्य करण्यात आले आहे.—मत्तय २४:१४.
१७. मोठ्या बाबेलमधून निघण्यात काय अंतर्भूत आहे?
१७ पण मोठ्या बाबेलविरुद्ध देवाचा न्यायदंड एवढ्यावरच संपत नाही. तिचा अंतिम नाश लवकरच होणार आहे. (प्रकटीकरण १८:२१) म्हणूनच, बायबल सर्व लोकांना असा आग्रह करते, की “तिच्या [मोठी बाबेल] पापांचे वाटेकरी होऊ नये . . . म्हणून तिच्यामधून निघा.” (प्रकटीकरण १८:४, ५) मोठ्या बाबेलमधून आपण कसे निघू शकतो? याकरता खोट्या धर्माशी सर्व संबंध तोडून टाकणे पुरेसे नाही. आज जगात प्रचलित असलेल्या अनेक सणांत व चालीरितींत, सेक्सविषयी असलेल्या जगाच्या निष्काळजी वृत्तीत, भूतविद्येशी संबंधित असलेल्या करमणुकीत व इतर अनेक गोष्टींत बाबेलोनचा प्रभाव दिसून येतो. तेव्हा जागृत राहण्याकरता आपण आपल्या कृती व मनातल्या अभिलाषांवरूनही हे दाखवले पाहिजे की आपण सर्वप्रकारे मोठ्या बाबेलपासून अलिप्त आहोत.
१८. प्रकटीकरण १४:९, १० यातील वर्णनानुसार सावध राहणारे ख्रिस्ती काय न करण्याची काळजी घेतात?
१८ प्रकटीकरण १४:९, १० यात ‘न्यायनिवाड्याच्या घटिकेच्या’ आणखी एका पैलूचे वर्णन करण्यात आले आहे. दुसरा एक देवदूत म्हणतो: ‘जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करितो, आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतो, तोहि देवाचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल.’ का? ‘श्वापद व त्याची मूर्ती’ ही यहोवाचे सार्वभौमत्त्व न स्वीकारणाऱ्या मानवी शासनाची प्रतिके आहेत. सावध राहणारे ख्रिस्ती, आपल्या वृत्तीतून किंवा कृतींतून, खरा देव यहोवा याचे सर्वश्रेष्ठ सार्वभौमत्व कबूल करण्यास नकार देणाऱ्यांच्या अधीन होण्याद्वारे त्यांचा प्रभाव किंवा खूण स्वतःवर करून घेत नाहीत. त्यांना हे माहीत आहे की देवाचे राज्य स्वर्गात स्थापन झाले आहे आणि ते सर्व मानवी राज्यांचा नाश करून सर्वकाळ टिकून राहील.—दानीएल २:४४.
काळाचे भान ठेवा
१९, २०. (क) शेवटल्या काळात आपण जसजसे आणखी पुढे जाऊ तसतसे सैतान निश्चितच काय करण्याचा प्रयत्न करेल? (ख) आपण कोणता संकल्प करावा?
१९ शेवटल्या काळात आपण जसजसे पुढे जाऊ तसतसे आपल्यावरील दबाव व परीक्षा वाढतील हे अपेक्षितच आहे. जोपर्यंत आपण या जुन्या व्यवस्थीकरणात राहात आहोत व स्वतःच्या अपरिपूर्णतेने पीडित आहोत तोपर्यंत आजारपण, म्हातारपण, प्रिय व्यक्तींचा मृत्यू, आपसांतील बेबनाव, देवाच्या वचनाचा प्रचार करत असताना लोकांची बेपर्वा वृत्ती व अशा इतर अनेक गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडेलच. आपल्यावर येणाऱ्या दबावाचा वापर करून आपल्याला निराश होऊन हिंमत हारायला लावावे—प्रचार कार्य थांबवायला लावावे किंवा देवाच्या आदर्शांनुसार जगण्याचे थांबवायला लावावे हीच सैतानाची इच्छा आहे, हे कधीही विसरू नका. (इफिसकर ६:११-१३) पण आपण ज्या काळात राहात आहोत त्या काळाचे भान विसरण्याची ही मुळीच वेळ नाही!
२० आपल्यावर बराच दबाव येईल हे येशूला माहीत होते म्हणूनच त्याने आपल्याला हा सल्ला दिला: “जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही.” (मत्तय २४:४२) तर मग काळाच्या ओघात आपण कोठे आहोत याविषयी आपण सतत सावध राहू या. आपला आवेश मंदावण्याकरता किंवा आपल्याला देवाची सेवा सोडून द्यायला लावण्याकरता सैतान जे डावपेच वापरतो त्यांविषयी आपण सतर्क राहू या. देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा आणखीनच आवेशाने व पूर्ण निर्धाराने प्रचार करण्याचा आपण संकल्प करू या. खरोखर, काळाचे भान ठेवून, येशूने सांगितल्यानुसार ‘जागृत राहणे’ आज अतिशय महत्त्वाचे आहे. असे केल्यामुळे आपण यहोवाचे गौरव करू शकू व ज्यांना त्याचे सार्वकालिक आशीर्वाद मिळतील त्यांच्यात आपणही सामील असू. (w०५ १०/१)
तुम्ही कसे उत्तर द्याल?
• येशूने दिलेला ‘जागृत राहण्याविषयीचा’ इशारा खऱ्या ख्रिश्चनांकरताही आहे हे आपल्याला कशावरून कळते?
• बायबलमधील कोणती इशारेवजा उदाहरणे आपल्याला ‘जागृत राहण्यास’ मदत करू शकतात?
• न्यायनिवाड्याची घटिका काय आहे आणि ही घटिका संपुष्टात येण्याआधी आपल्याला काय करण्याचा आग्रह करण्यात आला आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]
[२४ पानांवरील चित्र]
मोठ्या बाबेलचा नाश जवळ आला आहे
[२५ पानांवरील चित्र]
आपण अधिकच आवेशाने व निर्धाराने प्रचार करण्याचा संकल्प करू या