व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्‍वासाने चाला

डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्‍वासाने चाला

डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्‍वासाने चाला

“आम्ही विश्‍वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही.”—२ करिंथकर ५:७.

१. प्रेषित पौल डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्‍वासाने चालत होता हे कशावरून दिसते?

सा.यु. ५५ चे वर्ष आहे. ख्रिश्‍चनांचा छळ करणाऱ्‍या शौलाने ख्रिस्ती विश्‍वासाचा स्वीकार केला, त्याला आता २० वर्षे होत आली आहेत. पण काळाच्या ओघात त्याने देवावरील आपला विश्‍वास मंदावू दिलेला नाही. स्वर्गातल्या गोष्टी त्याने प्रत्यक्ष पाहिल्या नसल्या तरीही त्याचा विश्‍वास खंबीर आहे. म्हणूनच, स्वर्गीय जीवनाची आशा बाळगणाऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लिहिताना प्रेषित पौलाने म्हटले: “आम्ही विश्‍वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही.”—२ करिंथकर ५:७.

२, ३. (क) आपण विश्‍वासाने चालतो, हे आपण कसे दाखवू शकतो? (ख) डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालण्याचा काय अर्थ होतो?

विश्‍वासाने चालण्याकरता आपल्याला हा पूर्ण भरवसा असला पाहिजे, की देव आपल्याला जीवनात मार्गदर्शन देऊ शकतो. आपल्याकरता सर्वात हिताचा मार्ग कोणता आहे हे देवालाच चांगले कळते याची पूर्ण खात्री आपल्याला असली पाहिजे. (स्तोत्र ११९:६६) जीवनात लहानमोठे निर्णय घेऊन त्यांनुसार वागताना आपण ‘न दिसणाऱ्‍या गोष्टी’ लक्षात घेतो. (इब्री लोकांस ११:१) उदाहरणार्थ, देवाने वचन दिलेले “नवे आकाश व नवी पृथ्वी.” (२ पेत्र ३:१३) दुसरीकडे पाहता, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालणे म्हणजे, आपल्या शारीरिक इंद्रियांनी आपल्याला जे काही कळते त्याच्या आधारावर जीवन जगणे. हे धोकेदायक आहे कारण त्यामुळे आपल्याकडून देवाच्या इच्छेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.—स्तोत्र ८१:१२; उपदेशक ११:९.

आपण स्वर्गीय आशा असलेल्या ‘लहान कळपापैकी’ असोत अथवा पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्या ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ असोत; आपल्यापैकी प्रत्येकाने, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्‍वासाने चालण्याविषयीच्या या सल्ल्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. (लूक १२:३२; योहान १०:१६) या ईश्‍वरप्रेरित सल्ल्याचे पालन केल्याने पापाचे ‘क्षणिक सुख भोगण्याच्या’ मोहाला, भौतिकवादाच्या पाशाला व या जगाच्या अंताकडे दुर्लक्ष करण्याच्या धोक्याला बळी पडण्यापासून आपले संरक्षण कसे होऊ शकते हे आता आपण विचारात घेऊ या. तसेच डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालणे किती धोकेदायक आहे याचेही आपण परीक्षण करू या.—इब्री लोकांस ११:२५.

“पापाचे क्षणिक सुख” नाकारणे

४. मोशेने कोणता मार्ग निवडला व का?

आम्रामाच्या पुत्रांपैकी एक असलेल्या मोशेला कशाप्रकारचे जीवन उपभोगण्याची संधी होती याचा विचार करा. प्राचीन ईजिप्तच्या शाही घराण्यात लहानाचा मोठा झालेल्या मोशेला सत्ता, संपत्ती, थोरवी सगळे काही मिळू शकत होते. मोशे असा विचार करू शकला असता: ‘ईजिप्तच्या विख्यात पंडितांकडून मला ज्ञान मिळाले आहे, तसेच माझ्या हातात सत्ता आहे, माझ्या शब्दालाही मान आहे. जर मी शाही घराण्यातच राहिलो तर आज न उद्या मला अत्याचार सहन करत असलेल्या माझ्या इब्री बांधवांच्या हिताकरता या सत्तेचा उपयोग करता येईल!’ (प्रेषितांची कृत्ये ७:२२) पण असा विचार करण्याऐवजी मोशेने “देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे” पसंत केले. का? ईजिप्तमध्ये जे काही त्याला मिळू शकत होते, त्याकडे पाठ फिरवण्यास कोणत्या गोष्टीने त्याला प्रवृत्त केले? बायबल याचे उत्तर देते: “[मोशेने] राजाच्या क्रोधाला न भिता विश्‍वासाने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” (इब्री लोकांस ११:२४-२७) यहोवा निश्‍चितच आपल्या धार्मिकतेचे प्रतिफळ देईल यावर मोशेला विश्‍वास होता आणि त्यामुळेच त्याला पापी मार्गाचा व पापाच्या क्षणिक सुखाचा धिक्कार करण्याचे बळ मिळाले.

५. मोशेचे उदाहरण आपल्याला कोणते उत्तेजन देते?

आपल्यालाही कित्येकदा कठीण निर्णय घ्यावे लागतात, उदाहरणार्थ: ‘बायबलच्या तत्त्वांशी पूर्णपणे सुसंगत नसलेल्या विशिष्ट प्रथा किंवा सवयी मी सोडून द्याव्यात का? आर्थिक दृष्टीने हिताची, पण माझ्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा आणणारी नोकरी मी स्वीकारावी का?’ मोशेचे उदाहरण आपल्याला कोणतेही निर्णय घेताना या जगाचा अदूरदर्शीपणा टाळण्याचे उत्तेजन देते; त्याऐवजी आपण “जो अदृश्‍य आहे” त्या यहोवा देवाच्या दूरदर्शी बुद्धीवर विश्‍वास असल्याचे दाखवावे. मोशेसारखेच आपण या जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा यहोवाच्या मैत्रीलाच जास्त मोलवान समजावे.

६, ७. (क) एसावने कशाप्रकारे दाखवले की तो डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणेच चालू इच्छित होता? (ख) एसावच्या उदाहरणावरून आपल्याला कोणता इशारा मिळतो?

मोशेच्या उदाहरणाची, कुलपिता इसहाकाचा पुत्र एसाव याच्या उदाहरणाशी तुलना करा. एसाव उतावीळ होता. (उत्पत्ति २५:३०-३४) ‘ऐहिक बुद्धीच्या’ एसावने, “एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले.” (इब्री लोकांस १२:१५, १६) ज्येष्ठपण विकण्याच्या निर्णयामुळे यहोवासोबतच्या आपल्या नात्यावर कसा प्रभाव पडेल किंवा आपल्या संततीवर याचा काय परिणाम होईल याचा एसावने विचार केला नाही. त्याच्याजवळ आध्यात्मिक दृष्टिकोनाने विचार करण्याची क्षमता नव्हती. देवाच्या अनमोल अभिवचनांकडे एसावने दुर्लक्ष केले, ती काही उपयोगाची नाहीत असा त्याने विचार केला. तो विश्‍वासाने नव्हे, तर डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालला.

एसावने आज आपल्याकरता एक इशारेवजा उदाहरण पुरवले. (१ करिंथकर १०:११) सैतानाचे जग आपल्याला असाच विचार करायला प्रवृत्त करते की तुम्हाला जे हवे आहे ते आत्ताच्या आत्ता मिळवा; पण जीवनात कोणतेही निर्णय घेताना, मग ते लहान असोत अथवा मोठे, आपण सैतानाच्या जगाच्या या प्रवृत्तीला बळी पडू नये. आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘मी घेतलेल्या निर्णयांवरून माझीही एसावसारखीच प्रवृत्ती आहे असे दिसून येते का? आज मला जे हवे आहे ते मिळवण्याकरता मला आध्यात्मिक कार्यांना दुय्यम स्थान द्यावे लागणार आहे का? मी जे मार्ग निवडतो त्यांमुळे देवासोबतची माझी मैत्री आणि भविष्यात मिळणार असलेले प्रतिफळ मी धोक्यात घालतो का? इतरांकरता मी कशाप्रकारचे उदाहरण पुरवत आहे?’ आध्यात्मिक गोष्टींबद्दल आपल्याला कदर वाटते हे जर आपल्या निर्णयांवरून दिसून येत असेल तर यहोवा आपल्याला निश्‍चितच आशीर्वाद देईल.—नीतिसूत्रे १०:२२.

भौतिकवादाचा पाश टाळा

८. लावदिकियाच्या ख्रिश्‍चनांना कोणता इशारा देण्यात आला आणि त्याकडे लक्ष देणे आपल्याही हिताचे का आहे?

पहिल्या शतकाच्या शेवटास, प्रेषित योहानाला दिलेल्या प्रकटीकरणात स्वर्गीय गौरव मिळालेल्या येशू ख्रिस्ताने आशिया मायनर येथील लावदिकिया मंडळीकरता एक संदेश दिला. या संदेशात त्याने भौतिकवादी प्रवृत्तीबद्दल त्यांना बजावले. लावदिकिया येथे राहणारे ख्रिस्ती आर्थिक दृष्टीने धनाढ्य होते पण आध्यात्मिक दृष्टीने मात्र ते निर्धन होते. विश्‍वासाने चालत राहण्याऐवजी ते भौतिक संपत्ती मिळवण्यात इतके व्यग्र झाले की त्यांची आध्यात्मिक दृष्टी अंधूक झाली. (प्रकटीकरण ३:१४-१८) आजही भौतिकवादी प्रवृत्तीचा असाच परिणाम होतो. यामुळे आपला विश्‍वास कमकुवत होऊ शकतो आणि परिणामस्वरूप ‘आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावण्याचे’ आपण सोडून देण्याची शक्यता आहे. (इब्री लोकांस १२:१) जर आपण दक्षता बाळगली नाही तर “आयुष्यातली सुखे” आपल्या आध्यात्मिक कार्यांवर अतिक्रमण करून त्यांना ‘गुदमरून’ टाकू शकतात.—लूक ८:१४.

९. आध्यात्मिक अन्‍नाबद्दल समाधान व कृतज्ञता व्यक्‍त केल्यामुळे आपले कशाप्रकारे संरक्षण होऊ शकते?

आध्यात्मिक दृष्टीने सुरक्षित राहण्याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या जगाचा पुरेपूर उपभोग घेऊन भरपूर धनसंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, समाधानी वृत्ती बाळगणे. (१ करिंथकर ७:३१; १ तीमथ्य ६:६-८) आपण डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्‍वासाने चालतो तेव्हा सध्याच्या आत्मिक परादिसात आपल्याला आनंद वाटतो. पौष्टिक आध्यात्मिक अन्‍न ग्रहण करताना, आपल्याला “हर्षित चित्ताने जयजयकार” करावासा वाटत नाही का? (यशया ६५:१३, १४) शिवाय देवाच्या आत्म्याच्या फळातील निरनिराळे गुण प्रदर्शित करणाऱ्‍या आपल्या बांधवांच्या सहवासामुळेही आपण आनंदित होतो. (गलतीकर ५:२२, २३) आध्यात्मिक दृष्टीने यहोवा आपल्याकरता जे काही पुरवत आहे त्याबद्दल समाधान व आनंद मानणे खरोखर किती महत्त्वाचे आहे!

१०. आपण कोणते प्रश्‍न स्वतःला विचारले पाहिजेत?

१० आपण स्वतःला काही प्रश्‍न विचारू शकतो: ‘भौतिक वस्तूंना मी जीवनात कितपत महत्त्व देतो? माझ्याजवळ असलेल्या भौतिक वस्तूंचा मी कशासाठी उपयोग करतो, ऐषोआरामात जगण्यासाठी की खऱ्‍या उपासनेच्या वृद्धीसाठी? मला सर्वात जास्त समाधान कशात मिळते? बायबल अभ्यासात, ख्रिस्ती सभांमध्ये बांधवांच्या सहवासात, की ख्रिस्ती जबाबदाऱ्‍यांतून मोकळे होऊन शनिवार-रविवारी इतरत्र सुटी घालवण्यात? शनिवार-रविवारची रजा मी बहुतेकदा कशासाठी राखून ठेवतो, करमणुकीसाठी की क्षेत्र सेवा व शुद्ध उपासनेशी संबंधित असलेल्या इतर कार्यांसाठी?’ विश्‍वासाने चालण्याचा अर्थ असा होतो की आपण यहोवाच्या अभिवचनांवर पूर्ण भरवसा ठेवून, राज्याच्या कार्यात व्यग्र राहतो.—१ करिंथकर १५:५८.

अंत येणार याचा कधीही विसर पडू न देणे

११. विश्‍वासाने चालल्यामुळे आपल्याला जगाचा अंत होणार याचा कधीही विसर पडू न देण्यास कशी मदत मिळते?

११ विश्‍वासाने चालल्यामुळे, ‘अंत यायला अजून बराच अवकाश आहे किंवा अंत कधी येणारच नाही’ याप्रकारचे दैहिक विचार आपल्याला जाणीवपूर्वक टाळता येतील. संशयवादी लोक बायबलमधील भविष्यवाण्यांची थट्टा करतात पण जगातल्या घडामोडींकडे पाहून, देवाच्या वचनात आपल्या काळाकरता ज्या भविष्यवाण्या करण्यात आल्या होत्या त्या पूर्ण होत आहेत हे आपण ओळखू शकतो. (२ पेत्र ३:३, ४) उदाहरणार्थ, बहुतेक लोकांच्या वृत्तीवरून व वागणुकीवरून आपण ‘शेवटल्या काळात’ राहात आहोत हे सिद्ध होत नाही का? (२ तीमथ्य ३:१-५) विश्‍वासाच्या नेत्रांनी आपण हे पाहू शकतो, की सध्याच्या जागतिक घडामोडी म्हणजे केवळ इतिहासाची पुनरावृत्ती नाही. तर या घडामोडी ‘ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या व ह्‍या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीच्या चिन्हात’ समाविष्ट आहेत.—मत्तय २४:१-१४.

१२. लूक २१:२०, २१ यातील येशूचे शब्द पहिल्या शतकात कशाप्रकारे पूर्ण झाले?

१२ सामान्य युगाच्या पहिल्या शतकातील एका घटनेचे आपल्या काळाशी असलेले साम्य लक्षात घ्या. पृथ्वीवर असताना येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना असा इशारा दिला होता: “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्या वेळेस जे यहूदीयांत असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे.” (लूक २१:२०, २१) सा.यु. ६६ साली सेस्टियस गॅलस याच्या नेतृत्त्वाखाली रोमी सैन्यांनी जेरूसलेमला वेढा दिला तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण झाली. पण मग रोमी सैन्याने अचानक माघार घेतली. अशारितीने तेथील ख्रिश्‍चनांना ‘डोंगरात पळून जाण्याकरता’ जणू एक चिन्ह व संधी मिळाली. सा.यु. ७० साली रोमी सैन्य परत आले व त्यांनी जेरूसलेम शहरावर हल्ला करून त्यातील मंदिर नष्ट केले. जोसीफसच्या अहवालानुसार या लढाईत दहा लाखांपेक्षा जास्त यहुद्यांना आपल्या प्राणास मुकावे लागले व ९७,००० लोकांना बंदिवान करून नेण्यात आले. त्या काळातल्या यहुदी व्यवस्थेवर देवाने अशाप्रकारे आपला न्यायदंड बजावला. जे विश्‍वासाने चालत होते व ज्यांनी येशूच्या इशाऱ्‍याकडे लक्ष दिले ते या संकटातून सुखरूप बचावले.

१३, १४. (क) भविष्यात कोणत्या घटना घडतील? (ख) बायबलमधील भविष्यवाण्यांच्या पूर्णतेसंबंधी आपण जागरूक का राहावे?

१३ आज आपल्या काळातही लवकरच असेच काहीतरी घडणार आहे. देवाचा न्यायदंड आणण्यात संयुक्‍त राष्ट्रसंघातील घटक सामील असतील. ज्याप्रकारे पहिल्या शतकातील रोमी सैन्याचे उद्दिष्ट, पॅक्स रोमाना (रोमी शांती) कायम राखणे हे होते, त्याचप्रकारे आज संयुक्‍त राष्ट्रसंघाचे उद्दिष्टही शांती कायम राखणे हेच आहे. रोमी सैन्याने त्या काळच्या जगात निदान काही प्रमाणात शांती व सुरक्षितता आणण्याचा प्रयत्न केला, पण जेरूसलेमचा नाश त्यांच्याच हातून घडला. त्याचप्रकारे आज बायबलची भविष्यवाणी असे सूचित करते की संयुक्‍त राष्ट्रसंघातील लष्करी शक्‍ती धर्माला एक नाशकारक घटक समजू लागतील व आधुनिक काळातील जेरूसलेम—म्हणजेच ख्रिस्ती धर्मजगत व त्यासोबत मोठ्या बाबेलच्या उरलेल्या सर्व घटकांचा नाश करण्याकरता ते पावले उचलतील. (प्रकटीकरण १७:१२-१७) होय, खोट्या धर्माचे सबंध जागतिक साम्राज्य नाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे.

१४ खोट्या धर्माचा नाश हा मोठ्या संकटाच्या सुरवातीची नांदी असेल. मोठ्या संकटाच्या शेवटल्या भागात, या दुष्ट जागतिक व्यवस्थेचे उरलेले सर्व घटक नष्ट केले जातील. (मत्तय २४:२९, ३०; प्रकटीकरण १६:१४, १६) विश्‍वासाने चालल्यामुळे आपण बायबलमधील भविष्यवाण्यांच्या पूर्णतेविषयी जागरूक राहू शकतो. देव या पृथ्वीवर शांती व सुरक्षितता आणण्याकरता, संयुक्‍त राष्ट्रसंघासारख्या कोणत्याही मानवी संस्थेचा उपयोग करील या खोट्या विचाराला आपण बळी पडत नाही. तर मग, “परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे” याबद्दल आपल्याला खात्री आहे, हे आपल्या जीवनशैलीवरून दिसून येऊ नये का?—सफन्या १:१४.

डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालणे—किती धोकेदायक?

१५. देवाचा आशीर्वाद अनुभवल्यावरही इस्राएल राष्ट्र कोणत्या पाशात पडले?

१५ डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालून आपला विश्‍वास कमकुवत होऊ देणे किती धोक्याचे आहे हे प्राचीन इस्राएलच्या अनुभवांवरून दिसून येते. ईजिप्तच्या खोट्या दैवतांचा पाणउतारा करणाऱ्‍या दहा पीडा आपल्या डोळ्यांनी पाहूनही व त्यानंतर तांबड्या समुद्रातून देवाने केलेले चमत्कारिक तारण अनुभवल्यावरही इस्राएली लोकांनी एक सोनेरी वासरू तयार केले व ते त्याची उपासना करू लागले. मोशेला “पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे” पाहिल्यावर ते उतावीळ झाले व मोशेची वाट पाहण्यास कंटाळले. (निर्गम ३२:१-४) उतावीळपणाने त्यांना, प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसणाऱ्‍या मूर्तीची उपासना करण्यास प्रवृत्त केले. इस्राएल लोकांनी डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालण्याचे निवडल्यामुळे यहोवाचा अपमान झाला व त्यामुळे ‘अजमासे तीन हजार लोकांचा’ वध झाला. (निर्गम ३२:२५-२९) आजच्या काळातही, यहोवाचा एखादा उपासक जेव्हा आपल्या निर्णयांवरून यहोवावर भरवसा नसल्याचे व यहोवाजवळ आपली अभिवचने पूर्ण करण्याचे सामर्थ्य आहे याबद्दल आत्मविश्‍वास नसल्याचे दाखवतो तेव्हा ती किती दुःखाची गोष्ट ठरते!

१६. बाह्‍य दिखाव्यांचा इस्राएलांवर कसा परिणाम झाला?

१६ इतर मार्गांनीही इस्राएलांवर बाह्‍य दिखाव्यांचा वाईट प्रभाव पडला. डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालल्यामुळे ते आपल्या शत्रूंच्या भीतीने थरथर कापले. (गणना १३:२८, ३२; अनुवाद १:२८) यामुळे त्यांनी मोशेला देवाने दिलेल्या अधिकाराला आव्हान केले आणि स्वतःच्या जीवनाबद्दल कुरकूर करू लागले. अशाप्रकारे त्यांच्यात विश्‍वासाची उणीव निर्माण झाल्यामुळे प्रतिज्ञात देशापेक्षा त्यांनी दुरात्म्यांच्या प्रभावाखाली असलेले इजिप्त जास्त पसंत केले. (गणना १४:१-४; स्तोत्र १०६:२४) इस्राएल लोकांनी त्यांच्या अदृश्‍य राजाबद्दल किती अनादर दाखवला हे पाहिल्यावर यहोवाला किती दुःख झाले असेल याची कल्पना करा!

१७. शमुवेलच्या काळात इस्राएलांनी कशामुळे यहोवाचे मार्गदर्शन नाकारले?

१७ संदेष्टा शमुवेलाच्या काळात देवाचे निवडलेले राष्ट्र इस्राएल पुन्हा एकदा डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालण्याच्या पाशात पडले. त्यांना असा एक राजा हवा होता की ज्याला ते प्रत्यक्ष पाहू शकतील. यहोवाच त्यांचा राजा आहे हे यहोवाने त्यांना दाखवले होते पण विश्‍वासाने चालण्यासाठी हे त्यांच्याकरता पुरेसे नव्हते. (१ शमुवेल ८:४-९) यहोवाचे परिपूर्ण मार्गदर्शन नाकारून, आपल्या सभोवती असलेल्या इतर देशांप्रमाणे असण्याचे पसंत केल्यामुळे त्यांनी स्वतःचे नुकसान करून घेतले.—१ शमुवेल ८:१९, २०.

१८. डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालण्याच्या धोक्यांबद्दल आपण काय शिकू शकतो?

१८ यहोवाचे आधुनिक काळातील सेवक या नात्याने आपण देवासोबत असलेल्या आपल्या चांगल्या नातेसंबंधाची मनापासून कदर करतो. गतकाळातील घटनांतून मोलवान धडे शिकून त्यांनुसार जीवन जगण्यास आपण उत्सुक आहोत. (रोमकर १५:४) इस्राएल लोक डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालल्यामुळे मोशेद्वारे देव स्वतः त्यांचे मार्गदर्शन करत आहे हे ते विसरले. जर आपण काळजी घेतली नाही तर आपल्यालाही या गोष्टीचा विसर पडू शकतो की यहोवा देव व थोर मोशे, येशू ख्रिस्त आज ख्रिस्ती मंडळीचे मार्गदर्शन करत आहेत. (प्रकटीकरण १:१२-१६) यहोवाच्या संस्थेच्या पृथ्वीवरील कारभाराकडे मानवी दृष्टिकोनाने न पाहण्याची आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. कारण यामुळे आपली कुरकूर करण्याची व यहोवाच्या प्रतिनिधींबद्दल व ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या आध्यात्मिक अन्‍नाबद्दल कदर न बाळगण्याची आपली वृत्ती बनू शकते.—मत्तय २४:४५.

विश्‍वासाने चालण्याचा निर्धार करा

१९, २०. तुम्ही कोणता निर्धार केला आहे आणि का?

१९ बायबल सांगते त्यानुसार, “आपले झगडणे रक्‍तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्‍याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” (इफिसकर ६:१२) आपला प्रमुख शत्रू दियाबल सैतान हा आहे. यहोवावरील आपला विश्‍वास नष्ट करणे हेच त्याचे उद्दिष्ट आहे. देवाची सेवा करण्याच्या आपल्या निर्णयापासून आपल्याला परावृत्त करण्यासाठी तो कोणत्याही मार्गाचा उपयोग करू शकतो. (१ पेत्र ५:८) मग सैतानाच्या या जगातील बाह्‍य देखाव्यांमुळे फसवणूक होण्यापासून कोणती गोष्ट आपल्याला सुरक्षित ठेवेल? डोळ्यांनी नव्हे तर विश्‍वासाने चालल्यामुळे आपण सुरक्षित राहू शकतो! यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा व खात्री बाळगल्यामुळे, आपले ‘विश्‍वासरूपी तारू फुटण्यापासून’ आपले संरक्षण होईल. (१ तीमथ्य १:१९) तर मग, आपण सदोदीत विश्‍वासाने चालण्याचा निर्धार करू या व हा आत्मविश्‍वास बाळगू या, की यहोवा आपल्याला निश्‍चितच आशीर्वाद देईल. आणि जवळच्याच भविष्यात घडणार असलेल्या सर्व गोष्टींपासून आपला बचाव व्हावा म्हणून आपण प्रार्थना करत राहू या.—लूक २१:३६.

२० डोळ्यांनी नव्हे, तर विश्‍वासाने चालत असताना आपल्यासमोर एक उत्तम आदर्श आहे. बायबल सांगते, “ख्रिस्तानेहि तुम्हांसाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१) आपण ख्रिस्ताप्रमाणे कसे चालत राहू शकतो याविषयी पुढच्या लेखात चर्चा केली आहे. (w०५ ९/१५)

तुम्हाला आठवते का?

• मोशे व एसाव यांच्याकडून, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे नव्हे तर विश्‍वासाने चालण्याच्या संदर्भात तुम्ही काय शिकला?

• भौतिकवाद टाळण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता?

• विश्‍वासाने चालल्यामुळे, अंत यायला अजून बराच अवकाश आहे हा दृष्टिकोन टाळण्यास आपल्याला कशाप्रकारे मदत मिळते?

• डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालणे धोक्याचे का आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

मोशे विश्‍वासाने चालला

[१४ पानांवरील चित्र]

करमणुकीत गुंतल्यामुळे सहसा तुमचे ईश्‍वरशासित कार्यांकडे दुर्लक्ष होते का?