व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पालकांनो—तुमच्या मुलांकरता तुम्हाला कशाप्रकारचे भविष्य हवे आहे?

पालकांनो—तुमच्या मुलांकरता तुम्हाला कशाप्रकारचे भविष्य हवे आहे?

पालकांनो—तुमच्या मुलांकरता तुम्हाला कशाप्रकारचे भविष्य हवे आहे?

“कुमार व कुमारी, . . . परमेश्‍वराच्या नावाचे स्तवन करोत.”स्तोत्र १४८:१२, १३.

१. आईवडिलांना आपल्या मुलांच्या संबंधाने कोणती काळजी वाटते?

आपल्या मुलांच्या भविष्याची ज्यांना काळजी नाही असे कोणते आईवडील असतील? बाळाचा जन्म होतो त्या क्षणापासूनच, किंबहुना त्याच्याही आधीपासूनच आईवडील त्याच्याविषयी काळजी करू लागतात. बाळ सुदृढ असेल ना? त्याची सर्वसामान्य वाढ होईल ना? जसजसे मूल वाढत जाते तसतशा त्याच्याविषयीच्या चिंताही वाढतात. आपल्या मुलांना जीवनात सर्वात उत्तम तेच मिळावे असे सगळ्याच आईवडिलांना वाटते.—१ शमुवेल १:११, २७, २८; स्तोत्र १२७:३-५.

२. आपल्या मुलांना मोठे झाल्यावर आरामदायी जीवन जगता यावे म्हणून धडपड करण्यास आईवडील उत्सुक का असतात?

पण मुलांना सर्वात उत्तम ते पुरवणे आज तितके सोपे नाही. बऱ्‍याच आईवडिलांनी आजच्या जगात कठीण परिस्थितीला तोंड दिले आहे—युद्धे, राजकीय उलथापालथ, आर्थिक अडचणी, शारीरिक व मानसिक आघातजन्य अनुभव आणि अशा इतर अनेक समस्या. साहजिकच आपल्या मुलांनाही अशा खडतर परिस्थितीतून जावे लागू नये असेच सर्व आईवडिलांना मनापासून वाटते. श्रीमंत देशांत, आईवडील कदाचित आपल्या मित्रांच्या व इतर नातेवाईकांच्या मुलांना शिकून-सवरून व्यवसायात यशस्वी झालेले व आरामशीर जीवन जगताना पाहतात. तेव्हा उद्या आपल्या मुलांनाही चारचौघांसारखेच आरामदायी व सुरक्षित जीवन—यशस्वी जीवन जगता यावे म्हणून वाटेल ती धडपड करायला ते तयार असतात; असे करणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांना वाटते.—उपदेशक ३:१३.

यशस्वी जीवन कोणते?

३. ख्रिश्‍चनांनी कोणते जीवन निवडले आहे?

येशू ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने ख्रिश्‍चनांनी आपले जीवन यहोवाला समर्पित करण्याचे निवडले आहे. त्यांनी येशूच्या या शब्दांचा गांभीर्याने विचार करून हा निर्णय घेतला आहे: “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.” (लूक ९:२३; १४:२७) होय ख्रिस्ती व्यक्‍तीचे जीवन आत्मत्यागाचे आहे. पण याचा अर्थ ते गरिबीत व दुःखात जगतात असे नाही. उलट ते आनंदी व समाधानी जीवन जगतात कारण घेण्यापेक्षा देण्यावर त्यांचे जीवन केंद्रित असते आणि येशूने म्हटल्याप्रमाणे: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

४. येशूने आपल्या अनुयायांना काय करण्याचे प्रोत्साहन दिले?

येशूच्या काळात लोक अतिशय कठीण परिस्थितीत राहात होते. उदरनिर्वाह चालवण्यासोबतच त्यांना रोमनांच्या जुलमी शासनाखाली व त्या काळातल्या दांभिक धर्मपुढाऱ्‍यांच्या त्रासदायक वर्चस्वाखाली जगावे लागत होते. (मत्तय २३:२-४) तरीपण, ज्यांनी येशूविषयी ऐकले त्यांनी आनंदाने आपल्या स्वार्थांचा—व्यवसायांचासुद्धा त्याग केला व ते येशूचे अनुयायी बनले. (मत्तय ४:१८-२२; ९:९; कलस्सैकर ४:१४) असे करण्याद्वारे हे शिष्य जोखीम पत्करत होते का किंवा आपले भविष्य धोक्यात घालत होते का? येशूच्या या शब्दांकडे लक्ष द्या: “आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडिली आहेत त्याला अनेकपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल.” (मत्तय १९:२९) येशूने आपल्या अनुयायांना आश्‍वासन दिले की स्वर्गीय पित्याला त्यांच्या गरजा माहीत आहेत. म्हणूनच त्याने त्यांना असे प्रोत्साहन दिले, की “पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्तय ६:३१-३३.

५. देव आपल्या सेवकांची काळजी घेईल असे जे आश्‍वासन येशूने दिले त्याबद्दल काही आईवडील कसा विचार करतात?

आजही परिस्थिती फार वेगळी नाही. यहोवाला आपल्या गरजा माहीत आहेत आणि जे आपल्या जीवनात राज्याच्या कार्यांना प्राधान्य देतात, खासकरून जे पूर्ण वेळेची सेवा हाती घेतात त्यांची तो काळजी घेईल याविषयी ते आश्‍वस्त राहू शकतात. (मलाखी ३:६, १६; १ पेत्र ५:७) पण या बाबतीत काही आईवडिलांना तितकी खात्री नाही असे दिसते. एकीकडे त्यांना आपल्या मुलांनी यहोवाच्या सेवेत पुढे यावे, कालांतराने पूर्ण वेळेची सेवाही हाती घ्यावी असे वाटते. पण दुसरीकडे पाहता आजच्या जगातील आर्थिक परिस्थिती आणि नोकऱ्‍या मिळणे किती कठीण झाले आहे हे पाहिल्यावर त्यांना वाटते की मुलांनी आधी चांगले शिक्षण घ्यावे जेणेकरून त्यांच्याजवळ चांगली नोकरी मिळण्याची पात्रता येईल, आणि कोणत्याही परिस्थितीत ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. असा विचार करणाऱ्‍या आईवडिलांच्या दृष्टीने चांगले शिक्षण म्हणजे सहसा उच्च शिक्षण असते.

भविष्याची तयारी करणे

६. या लेखात “उच्च शिक्षण” ही संज्ञा कोणत्या अर्थाने वापरण्यात आली आहे?

प्रत्येक देशातील शिक्षण पद्धती वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ, भारतात शाळांमध्ये १० ते १२ वर्षांचे मूलभूत शिक्षण दिले जाते. यानंतर विद्यार्थी महाविद्यालयांत किंवा विद्यापीठात प्रवेश करून तीन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांपर्यंत शिकून पदवी मिळवू शकतात व त्यानंतर वैद्यकीय, विधी, अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रांत पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात. तर या लेखात विद्यापीठ शिक्षणाच्या संदर्भात “उच्च शिक्षण” ही संज्ञा वापरण्यात आली आहे. दुसरीकडे पाहता, काही शिक्षणसंस्था तांत्रिक किंवा व्यावसायिक प्रशिक्षण देतात; यांत काही कमी अवधीचे अभ्यासक्रम असतात जे पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याला एखाद्या व्यवसायाचे किंवा विशेष प्रकारच्या कामाचे सर्टिफिकीट किंवा डिप्लोमा मिळतो.

७. विद्यार्थ्यांवर कोणता दबाव आणला जातो?

आजकाल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरता तयार करण्याचा बऱ्‍याच शाळांचा प्रघात आहे. याकरता बऱ्‍याच शिक्षण संस्था, मुलांना नोकऱ्‍यांकरता तयार करता येईल अशा कोर्सेसवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रवेश परिक्षेत उत्तम गुण मिळवणे शक्य होईल अशा विषयांवर लक्ष केंद्रित करतात. चांगल्या व लठ्ठ पगाराच्या नोकऱ्‍या मिळवून देणाऱ्‍या पदव्या प्राप्त करण्याकरता सर्वात चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थ्यांवर शिक्षकांकडून, सल्लागारांकडून, व वर्गसोबत्यांकडून बराच दबाव येतो.

८. ख्रिस्ती पालकांसमोर कोणते काही पर्याय असतात?

तर मग ख्रिस्ती पालकांनी काय करावे? अर्थातच, आपल्या मुलांनी शाळेत चांगली कामगिरी करावी आणि भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरता आवश्‍यक कौशल्ये आत्मसात करावी अशी आईवडिलांची इच्छा असते. (नीतिसूत्रे २२: २९) पण म्हणून, त्यांनी आपल्या मुलांना आजच्या जगातील इतर लोकांप्रमाणेच, आर्थिक प्रगती व यश मिळवण्याकरता जी चढाओढ चालली आहेत त्यात गुरफटू द्यावे का? मुलांशी बोलताना व स्वतःच्या उदाहरणानेही ते आपल्या मुलांसमोर कोणती ध्येये ठेवत आहेत? काही आईवडील आपल्या मुलांना उच्च शिक्षण मिळवण्याकरता चांगल्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात पाठवता यावे म्हणून बऱ्‍याच आधीपासूनच खूप मेहनत घेतात व पैशांची बचत करतात. इतरजण याकरता कर्जही घ्यायला तयार असतात. पण अशा निर्णयाची किंमतही फक्‍त रुपया पैशांत मोजता येण्यासारखी नाही. आजच्या जगात उच्च शिक्षण मिळवण्याची काय किंमत आहे?—लूक १४:२८-३३.

उच्च शिक्षण मिळवण्याची किंमत

९. उच्च शिक्षणाच्या आर्थिक खर्चाबद्दल काय म्हणता येईल?

किंमत म्हणताच आपण खर्चाच्या दृष्टीने विचार करू लागतो. काही देशांत उच्च शिक्षण देण्याची जबाबदारी सरकार उचलते आणि पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना फी किंवा शिकवणीचे वेतन भरावे लागत नाही. पण बऱ्‍याच ठिकाणी मात्र, उच्च शिक्षण बरेच खर्चिक आहे आणि दिवसेंदिवस ते अधिकच खर्चिक होऊ लागले आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या एका लेखात असे म्हणण्यात आले: “उच्च शिक्षण हे एकेकाळी सुसंधीचे द्वार समजले जायचे. पण आज ते श्रीमंत व मध्यमवर्गीयांमधील मोठ्या दरीचे प्रतीक बनले आहे.” दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, दर्जेदार उच्च शिक्षणावर अलीकडे श्रीमंत व प्रतिष्ठित लोकांची मक्‍तेदारी आहे; कालांतराने त्यांची ही मुलेही श्रीमंत व प्रतिष्ठित बनतात. ख्रिस्ती आईवडिलांनी आपल्या मुलांसमोर अशाप्रकारचे ध्येय ठेवावे का?—फिलिप्पैकर ३:७, ८; याकोब ४:४.

१०. उच्च शिक्षणाचा, सध्याच्या व्यवस्थीकरणाच्या उन्‍नतीला हातभार लावण्याशी जवळचा संबंध का आहे?

१० उच्च शिक्षण मोफत असले तरीही त्याकरता कोणतीच किंमत मोजावी लागणार नाही असे नाही. उदाहरणार्थ, द वॉल स्ट्रीट जर्नल यातील वृत्तानुसार एका आग्नेय आशियाई देशात सरकारने ‘शिक्षण यंत्रणेची रचना अशाप्रकारे केली आहे, की जेणेकरून उत्तम विद्यार्थ्यांना मुद्दामहूनच सर्वात उत्तम संस्थांमध्ये प्रवेश दिला जाईल.’ या ‘उत्तम संस्था’ म्हणजे जागतिक ख्यातीची विद्यापिठे. उदाहरणार्थ, इंग्लंडमधील ऑक्सफर्ड व केंब्रिज, संयुक्‍त संस्थानांतील आयव्ही लीग महाविद्यालये व अशा इतर प्रख्यात संस्था. सरकार अशाप्रकारे दीर्घकालीन तरतूद का करते? सदर वृत्तानुसार, “देशाच्या अर्थव्यवस्थेला भक्कम करण्यासाठी.” हे शिक्षण तर विद्यार्थ्याला मोफत मिळते, पण यासाठी त्याला जी किंमत मोजावी लागते ती म्हणजे सध्याच्या या व्यवस्थीकरणाच्या उन्‍नतीकरता पूर्णपणे वाहून घेतलेले जीवन. जगात अशाप्रकारचे जीवन अनेकांना हवेहवेसे वाटेल; पण ख्रिस्ती आईवडिलांना आपल्या मुलांसाठी असे जीवन हवे आहे का?—योहान १५:१९; १ योहान २:१५-१७.

११. विद्यापिठांत शिकणाऱ्‍या विद्यार्थ्यांमध्ये दारूचे व्यसन व लैंगिक अनैतिकता यासंबंधी निरनिराळ्या वृत्तांवरून काय दिसून येते?

११ विद्यापीठांतल्या वातावरणाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. विद्यापीठांत व महाविद्यालयांतील वाईट वातावरण—तेथे होणारे ड्रग्स व दारूबाजीशी संबंधित गैरप्रकार, अनैतिकता, कॉपी, रॅगिंग व यांसारख्या असंख्य वाईट गोष्टी. दारूच्या व्यसनाचे उदाहरण घ्या. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले बिंज ड्रिंकिंग, म्हणजे मुद्दामहून नशा चढण्याकरता पिणे, याविषयी न्यू सायंटिस्ट नियतकालिक असे म्हणते: “[संयुक्‍त संस्थानांतील विद्यापीठांत शिकणाऱ्‍या विद्यार्थ्यांपैकी] जवळजवळ ४४ टक्के विद्यार्थी पंधरवड्यातून एकदातरी हमखास ‘बिंज’ करतात.” ही समस्या ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, रशिया व इतर देशांतही सर्वसामान्य आहे. अनैतिकतेच्या बाबतीत पाहिल्यास, आजकाल विद्यार्थ्यांमध्ये अगदी सर्वसामान्य झालेला विषय म्हणजे “हुकिंग अप.” न्यूझवीक नियतकालिकातील एका वृत्तानुसार हुकिंग अप म्हणजे “नुकत्याच भेटलेल्या आणि पुढे कधीही एकमेकांशी भेटण्याबोलण्याचा इरादा नसलेल्या दोन व्यक्‍तींमधील लैंगिक संबंध, ज्यात चुंबन घेण्यापासून संभोगापर्यंत कशाचाही समावेश असू शकतो.” अभ्यासांवरून असे दिसून येते की ६०-८० टक्के विद्यार्थी अशा प्रकारच्या वर्तनात सामील होतात. एका संशोधकाने म्हटल्यानुसार, “जर तुम्ही एक नॉर्मल कॉलेज विद्यार्थी असाल तर तुम्हीही ते कराल.”—१ करिंथकर ५:११; ६:९, १०.

१२. महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना कोणत्या दबावांना तोंड द्यावे लागते?

१२ वाईट वातावरणासोबतच, भरपूर अभ्यास आणि परीक्षांमुळे येणारा दबावही असतोच. साहजिकच परीक्षेत उत्तीर्ण होण्याकरता विद्यार्थ्यांना अभ्यास व दिलेले गृहकार्य करावेच लागते. काहींना कॉलेजसोबतच निदान अर्धवेळेची नोकरीही करावी लागते. या सर्वामुळे बराच वेळ व शक्‍ती खर्च होते. मग आध्यात्मिक कार्यांसाठी काय उरेल? दबाव वाढल्यावर, प्रथम कोणत्या जबाबदाऱ्‍यांचा त्याग केला जाईल? राज्याच्या कार्यांना तेव्हासुद्धा प्राधान्य देणे शक्य होईल का, की या कार्यांना बाजूला सारले जाईल? (मत्तय ६:३३) बायबल ख्रिश्‍चनांना निक्षून सांगते: “अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.” (इफिसकर ५:१५, १६) वेळ व शक्‍ती खर्च करण्याच्या दबावाला बळी पडून किंवा महाविद्यालयांत बायबलच्या विरोधात असलेल्या वर्तनात गुंतून काहीजण विश्‍वासातून पडले आहेत ही किती दुःखाची गोष्ट आहे!

१३. ख्रिस्ती पालकांनी कोणत्या प्रश्‍नांचा विचार केला पाहिजे?

१३ अर्थात, अनैतिकता, वाईट वर्तन, आणि दबाव हे फक्‍त महाविद्यालयांत किंवा विद्यापीठाच्या परिसरापुरतेच मर्यादित आहेत असे मुळीच म्हणता येणार नाही. पण, बऱ्‍याच जगिक तरुणांच्या मते हे सर्व महाविद्यालयीन शिक्षणाचा भाग आहे आणि यात विशेष असे काही नाही. पण ख्रिस्ती आईवडिलांनी जाणूनबुजून आपल्या मुलांना चार किंवा त्यांपेक्षा अधिक वर्षांच्या अवधीकरता अशा वातावरणात पाठवावे का? (नीतिसूत्रे २२:३; २ तीमथ्य २:२२) मुलांचा जो काही फायदा होणार असेल, त्याकरता ही जोखीम पत्करणे शहाणपणाचे ठरेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे यासंबंधी या विद्यापीठांत मुलांना काय शिकवले जाते? * (फिलिप्पैकर १:१०; १ थेस्सलनीकाकर ५:२१) आईवडिलांनी या प्रश्‍नांवर तसेच, आपल्या मुलांना शिक्षणाकरता दुसऱ्‍या शहरात किंवा परदेशात पाठवण्यासंबंधी गांभीर्याने व प्रार्थनापूर्वक विचार केला पाहिजे.

कोणते पर्याय आहेत?

१४, १५. (क) सर्वसामान्यपणे लोकांचा वेगळा विचार असला तरीही, बायबलमध्ये दिलेला कोणता सल्ला आजच्या काळाला समर्पक आहे? (ख) तरुण मुलेमुली स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकतात?

१४ आजकाल सर्वसामान्यपणे असाच विचार केला जातो की यशस्वी होण्याकरता तरुणांनी विद्यापीठ शिक्षण मिळवलेच पाहिजे. पण लोकांच्या मतांनुसार वागण्याऐवजी, ख्रिस्ती बायबलच्या या सल्ल्याचे पालन करतात: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरुप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” (रोमकर १२:२) या शेवटल्या काळाच्या अंतिम टप्प्यात देवाची त्याच्या लोकांकरता, मग ते तरुण असोत वा वृद्ध, त्यांच्याकरता त्याची काय इच्छा आहे? पौलाने तीमथ्याला सांगितले: “सर्व गोष्टींविषयी सावध ऐस, दुःखे सोस, सुवर्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर.” हे शब्द निश्‍चितच आज आपल्या सर्वांकरता समर्पक आहेत.—२ तीमथ्य ४:५.

१५ जगाच्या भौतिकवादी प्रवृत्तीत गुरफटण्याऐवजी आपण सर्वांनीच “सावध” असणे—आध्यात्मिक अर्थाने तल्लख असणे गरजेचे आहे. जर तुम्ही एक तरुण व्यक्‍ती असाल, तर स्वतःला विचारा: ‘मला “सोपवलेली सेवा” पूर्ण करण्यासाठी, देवाच्या वचनाचा सेवक या नात्याने माझी पात्रता वाढवण्यासाठी, माझ्याने होईल तितका प्रयत्न मी करत आहे का? आपली सेवा “पूर्ण” करण्याकरता मी कोणत्या योजना आखल्या आहेत? पूर्ण वेळेच्या सेवेला आपले करियर बनवण्याचा मी विचार करून पाहिला आहे का?’ हे अवघड प्रश्‍न आहेत, विशेषतः इतर तरुणांना जेव्हा तुम्ही आपल्या स्वार्थी ध्येयांचा पाठलाग करताना, त्यांच्या मते ज्यांमुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल अशा ‘मोठाल्या गोष्टीच्या’ मागे लागताना पाहता तेव्हा तुम्हाला हे प्रश्‍न अवघडच वाटतील. (यिर्मया ४५:५) म्हणूनच ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांना बालपणापासूनच योग्य प्रकारचे आध्यात्मिक वातावरण व प्रशिक्षण पुरवले पाहिजे.—नीतिसूत्रे २२:६; उपदेशक १२:१; २ तीमथ्य ३:१४, १५.

१६. ख्रिस्ती पालक सूज्ञपणे आपल्या मुलांकरता योग्य प्रकारचे आध्यात्मिक वातावरण कसे पुरवू शकतात?

१६ एका कुटुंबात तीन मुले आहेत, व त्यांची आई अनेक वर्षांपासून पूर्ण वेळेची सेवा करत आहे. थोरल्या मुलाने असे सांगितले: “आम्ही कोणासोबत मैत्री करतो यावर आईने नेहमी लक्ष ठेवले. आम्ही शाळेतल्या मुलांसोबत नव्हे, तर केवळ मंडळीत ज्यांना चांगल्या आध्यात्मिक सवयी आहेत अशाच मुलांसोबत मैत्री करायचो. तसेच ती पूर्ण वेळेच्या सेवेत असलेल्यांना उदाहरणार्थ, मिशनरी, प्रवासी पर्यवेक्षक, बेथेलमध्ये राहणारे बंधूभगिनी आणि पायनियरांना नेहमी आमच्या घरी निमंत्रित करायची. त्यांचे अनुभव ऐकून व त्यांचा आनंद पाहून आमच्या मनातही पूर्ण वेळेची सेवा हाती घेण्याची इच्छा निर्माण झाली.” आनंदाची गोष्ट म्हणजे, आज ही तिन्ही मुले पूर्ण वेळेच्या सेवेत आहेत—एक बेथेलमध्ये आहे, एकाने सेवा प्रशिक्षण प्रशाला पूर्ण केली आहे आणि एक पायनियर सेवा करत आहे!

१७. आईवडील आपल्या मुलांना विषय व कोर्सेस निवडताना कोणते मार्गदर्शन देऊ शकतात? (पृष्ठ २९ वरील चौकोन पाहा.)

१७ उत्तम आध्यात्मिक वातावरण पुरवण्यासोबतच आईवडिलांनी शक्य तितक्या लवकर, आपल्या मुलांना शाळेत कोणते विषय निवडावेत, कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाचे ध्येय ठेवावेत यासंबंधी मार्गदर्शनही दिले पाहिजे. सध्या बेथेलमध्ये सेवा करत असलेल्या आणखी एका तरुणाने म्हटले: “माझी आई व वडील दोघेही लग्नाच्या आधी व नंतरही पायनियर सेवा करत होते आणि त्यांनी आमच्या पूर्ण कुटुंबात पायनियर सेवेबद्दल आवड निर्माण केली. शाळेत कोणतेही विषय निवडताना, किंवा आमच्या भविष्यावर ज्यांचा प्रभाव पडू शकेल असे निर्णय घेताना त्यांनी आम्हाला नेहमी असाच निर्णय घेण्याचे प्रोत्साहन दिले की ज्याच्यामुळे आम्हाला पार्टटाईम नोकरी करून पायनियर सेवा करता येईल.” विद्यापीठातील उच्च शिक्षणाकरता तयार केलेले विषय निवडण्याऐवजी आईवडिलांनी व मुलांनी अशा कोर्सेसचा पर्याय विचारात घेतला पाहिजे की जे ईश्‍वरशासित करियरसाठी उपयोगी पडतील. *

१८. तरुण व्यक्‍ती कोणत्या प्रकारच्या नोकऱ्‍यांच्या पर्यायाविषयी विचार करू शकतात?

१८ संशोधनावरून असे दिसून येते की बऱ्‍याच देशांत खरे तर पदवीधारकांची नव्हे तर निरनिराळ्या उद्योगांचे व व्यवसायांचे ज्ञान व अनुभव असलेल्या लोकांची गरज आहे. युएसए टुडे यातील एका वृत्तानुसार “येत्या दशकांत ७०% कामगारांना चार वर्षांच्या कॉलेज पदवीची नव्हे तर एखाद्या प्रशिक्षण महाविद्यालयातील पदवीची किंवा औद्योगिक प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राची गरज पडेल.” अशा अनेक संस्था कार्यालयीन कामे, मोटारींची दुरुस्ती, कंप्युटर्सची दुरुस्ती, नळकाम, हेअरड्रेसिंग व इतर अनेक उद्योगांचे कमी अवधींचे कोर्सेस पुरवतात. ही चांगली कामे आहेत का? निश्‍चितच! कदाचित काहींच्या अपेक्षेइतकी ती आकर्षक नसतील पण ज्यांचे मुख्य ध्येय यहोवाची सेवा करणे हे आहे त्यांना अशाप्रकारच्या कामांमुळे आर्थिक स्वावलंबन मिळवता येते तसेच त्यांच्यावर वेळेचे बंधन नसते.—२ थेस्सलनीकाकर ३:८.

१९. आनंद व समाधानाने परिपूर्ण असे जीवन जगण्याचा सर्वात खात्रीचा मार्ग कोणता?

१९ बायबल आग्रह करते, “कुमार व कुमारी, . . . परमेश्‍वराच्या नावाचे स्तवन करोत; कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे; त्याचे ऐश्‍वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर आहे.” (स्तोत्र १४८:१२, १३) जगात तुम्हाला ज्या पदव्या व प्रतिष्ठा मिळू शकतात त्यांच्या तुलनेत यहोवाच्या पूर्ण वेळेच्या सेवेत घालवलेले जीवन नक्कीच आनंद व समाधानाने परिपूर्ण असेल यात शंका नाही. बायबलमध्ये दिलेले हे आश्‍वासन आठवणीत असू द्या: “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.”—नीतिसूत्रे १०:२२. (w०५ १०/१)

[तळटीपा]

^ परि. 13 ज्यांनी विद्यापीठ शिक्षणापेक्षा ईश्‍वरशासित शिक्षणाला महत्त्व दिले अशा व्यक्‍तींचे अनुभव टेहळणी बुरूज मे १, १९८२ (इंग्रजी), पृष्ठे ३-६; एप्रिल १५, १९७९ (इंग्रजी), पृष्ठे ५-१०; सावध राहा! (इंग्रजी) जून ८, १९७८ (इंग्रजी), पृष्ठ १५; व ऑगस्ट ८, १९७४ (इंग्रजी), पृष्ठे ३-७ वर तुम्हाला वाचायला मिळतील.

^ परि. 17 सावध राहा! ऑक्टोबर ८, १९९८ (इंग्रजी) अंकातील “सुरक्षित जीवनाच्या शोधात” पृष्ठे ४-६ व मे ८, १९८९ (इंग्रजी) अंकातील “मी कोणते करियर निवडावे?” पृष्ठे १२-१४ हे लेख पाहावेत.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• सुरक्षित भविष्याकरता ख्रिस्ती कशावर भरवसा ठेवतात?

• आपल्या मुलांच्या भविष्याच्या संदर्भात ख्रिस्ती आईवडिलांसमोर कोणती आव्हाने आहेत?

• उच्च शिक्षणाच्या ध्येयाची किंमत मोजताना कशाचा विचार करणे आवश्‍यक आहे?

• आईवडील आपल्या मुलांना यहोवाच्या सेवेला वाहिलेले जीवन निवडण्याकरता कशी मदत करू शकतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२९ पानांवरील चौकट]

उच्च शिक्षण कितपत महत्त्वाचे?

विद्यापिठात प्रवेश मिळवणारे बहुतेक विद्यार्थी, पदवी मिळाल्यावर मनाजोगी, कायमची नोकरी मिळेल अशी अपेक्षा करतात. पण सरकारी वृत्तांवरून असे दिसून येते की या विद्यार्थ्यांपैकी फक्‍त एक चतुर्थांश विद्यांर्थ्यांना सहा वर्षांत पदवी मिळवण्यात यश येते. म्हणजे फारशी आशादायक परिस्थिती नाही. आणि पदवी मिळाल्यावरही चांगली नोकरी मिळेलच असे म्हणता येते का? अलीकडच्या संशोधनांवरून काय दिसून आले आहे ते पाहा.

“हार्वर्ड किंवा ड्यूक [विद्यापिठांत] गेल्याने आपोआप चांगली नोकरी व लठ्ठ पगार मिळेल अशी अपेक्षा करता येत नाही. . . . कंपन्यांना नोकरीसाठी अर्ज करणाऱ्‍या या तरुण उमेदवारांविषयी फारशी माहिती नसते. चांगल्या विद्यापिठातून (आयव्ही लीग पदवी) मिळवलेली पदवी पाहून ते प्रभावित होतील. पण त्यानंतर या उमेदवारांजवळ कोणती कौशल्ये आहेत व नाहीत हाच सर्वात मोठा प्रश्‍न असतो.”—न्यूझवीक, नोव्हेंबर १, १९९९.

‘आजच्या काळात चांगल्या नोकरीसाठी गतकाळाच्या तुलनेत जास्त कौशल्यांची मागणी केली जाते. पण ही कौशल्ये महाविद्यालयीन पातळीची नव्हे तर हायस्कूलमध्ये शिकलेली कौशल्ये उदाहरणार्थ गणित, वाचन, व लेखन, जी नववीतल्या विद्यार्थ्यालाही अवगत असतात. चांगली नोकरी मिळवण्याकरता विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाणे आवश्‍यक नाही पण हायस्कूलच्या पातळीची कौशल्ये मात्र त्यांना अवगत असली पाहिजेत.’—अमेरिकन एजुकेटर, स्प्रिंग २००४.

‘महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर बाहेरच्या जगात रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी बहुतेक महाविद्यालये फारसे काही करत नाहीत. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्‍या विद्यालयांत अचानक गर्दी होऊ लागली आहे. १९९६ ते २००० या काळात या विद्यालयांत प्रवेश घेणाऱ्‍यांच्या संख्येत ४८% वाढ झाली आहे. . . . दरम्यान महागड्या, वेळखाऊ कॉलेज डिप्लोमांचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.’—टाईम, जानेवारी २४, २००५.

“यु.एस. डिपार्टमेंट ऑफ लेबरने २००५ सालाकरता जे अंदाज केले आहेत त्यांवरून ही भयावह वस्तूस्थिती समोर येते, की चार वर्षे महाविद्यालयात शिकून पदवीधर झालेल्यांपैकी एकतृतीयांश विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवीशी जुळणारी नोकरी मिळणार नाही.”—द फ्यूचरिस्ट, जुलै/ऑगस्ट २०००.

हे सर्व विचारात घेतल्यावर अधिकाधिक शिक्षणतज्ज्ञ आज उच्च शिक्षणाच्या महत्त्वाविषयी गांभीर्याने पुनर्विचार करत आहेत. फ्यूचरिस्ट यातील वृत्तात खेदाने म्हटले आहे की “आपण लोकांना अयोग्य ध्येयांकरता शिक्षण देत आहोत.” याच्या तुलनेत बायबलमध्ये देवाबद्दल काय म्हटले आहे ते पाहा: “तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटासारखी झाली असती.”—यशया ४८:१७, १८.

[२६ पानांवरील चित्र]

आपल्या स्वार्थांचा त्याग करून ते येशूच्या मागे गेले

[३१ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती पालक सूज्ञपणे आपल्या मुलांकरता बालपणापासूनच उत्तम आध्यात्मिक वातावरण पुरवतात