येशूच्या उपस्थितीचे चिन्ह तुम्हाला ओळखता येते का?
येशूच्या उपस्थितीचे चिन्ह तुम्हाला ओळखता येते का?
कोणीही आजारी पडू इच्छित नाही किंवा संकटात सापडू इच्छित नाही. हे टाळण्यासाठी एक सुज्ञ व्यक्ती धोक्याची सूचना देणाऱ्या चिन्हांकडे लक्ष देते आणि त्यानुसार कार्य करते. येशू ख्रिस्ताने एका विशिष्ट चिन्हाचे वर्णन केले जे आपण ओळखले पाहिजे. तो ज्या विशिष्ट चिन्हाविषयी बोलत होता त्याचा संपूर्ण विश्वावर आणि मानवजातीवर प्रभाव पडणार होता. यात तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा देखील समावेश होतो.
येशू देवाच्या राज्याविषयी बोलत होता. हे राज्य दुष्टाईचा उच्छेद करून पृथ्वीला परादीस बनवणार आहे. हे ऐकून शिष्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. हे राज्य केव्हा येईल हे त्यांना जाणून घ्यायचे होते. त्यांनी त्याला विचारले: “आपल्या येण्याचे [“उपस्थितीचे,” NW] व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?”—मत्तय २४:३.
येशूला माहीत होते, की त्याच्या मृत्यूच्या व पुनरुत्थानाच्या अनेक शतकांनंतर त्याला मानवजातीवर मशीही राजा म्हणून सिंहासनाधिष्ठित केले जाईल. त्याचे सिंहासनाधिष्ठित होणे मानवांना दिसणार नसल्यामुळे त्याने त्याच्या अनुयायांना एक चिन्ह दिले जेणेकरून त्यांना त्याचे ‘येणे’ अर्थात त्याची उपस्थिती तसेच ‘युगाची समाप्ती’ ओळखता येईल. या चिन्हाचे अनेक पैलू आहेत व हे सर्व पैलू येशूच्या उपस्थितीच्या काळाकडे अंगुली दर्शवतात.
मत्तय, मार्क, लूक या सर्व शुभवर्तमान लेखकांनी येशूचे उत्तर अगदी बारकाईने लिहून ठेवले. (मत्तय, अध्याय २४ आणि २५; मार्क, अध्याय १३; लूक, अध्याय २१) इतर बायबल लेखकांनी चिन्हाची आणखी तपशीलवार माहिती दिली. (२ तीमथ्य ३:१-५; २ पेत्र ३:३, ४; प्रकटीकरण ६:१-८; ११:१८) सर्वच तपशीलांचे बारकाईने परीक्षण या लेखात करता येणार नाही; पण आपण येशूने उल्लेखलेल्या चिन्हातील पाच महत्त्वपूर्ण पैलूंवर विचार करू या. हे विचारमंथन तुमच्या स्वतःसाठी किती अर्थपूर्ण व महत्त्वपूर्ण आहे, हे तुम्हाला दिसून येईल.—पृष्ठ ६ वरील चौकोन पाहा.
“नव्या युगाची सुरुवात करणारा एक महत्त्वपूर्ण बदल”
“राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल.” (मत्तय २४:७) डर श्पीगल या जर्मन बातमीपत्रकानुसार, १९१४ च्या आधी लोकांचा, “अधिक स्वातंत्र्य, प्रगती आणि भरभराटीच्या सुवर्ण भवितव्यावर” विश्वास होता. पण मग सर्वच बदलले. जिओ हे मासिक म्हणते: “१९१४ सालच्या ऑगस्टमध्ये सुरू होऊन १९१८ सालच्या नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात आलेले युद्ध एक नाट्यमय घटना होती. त्याने मानवजातीच्या इतिहासात अचानक एक बदल घडवून आणला. या बदलाने, नव्या युगाला जुन्या युगापासून वेगळे केले.” पाच पेक्षा अधिक खंडांतील सहा कोटीपेक्षा अधिक सैनिकांनी या अतिक्रूर युद्धात भाग घेतला. सरासरी, सुमारे ६,००० सैनिक दररोज ठार मारले जात होते. तेव्हापासून, प्रत्येक पिढीचे व सर्व राजकीय मतांचे इतिहासकार “१९१४ ते १९१८ या वर्षांना, नव्या युगाची सुरुवात करणारा एक महत्त्वपूर्ण बदल” मानतात.
पहिल्या महायुद्धाने मानव समाजात कायमचे बदल घडवून आणले आणि मानवजातीला या व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या दिवसांच्या खाईत ढकलले. उरलेल्या शतकाची वैशिष्ट्ये, आणखी युद्धे, सशस्त्र झगडे, दहशतवाद ही होती. चालू शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांत या परिस्थितीत काही सुधारणा झालेली नाही. युद्धाव्यतिरिक्त चिन्हाचे इतर पैलू स्पष्ट दिसताहेत.
अन्नटंचाई, रोगराई, भूकंप
“दुष्काळ . . . होतील.” (मत्तय २४:७) पहिल्या महायुद्धाच्या वेळी युरोपमध्ये दुष्काळ पडला आणि तेव्हापासून अन्नटंचाईने मानवजातीला पछाडले आहे. इतिवृत्तकार ॲलन बुलक यांनी असे लिहिले, की १९३३ साली रशिया व युक्रेनमध्ये “भूकेने व्याकूळ झालेल्या लोकांचे समूहच्या समूह गावाच्या बाहेर अन्नाच्या शोधात भटकत फिरायचे . . . रस्त्याच्या बाजूला लोकांच्या शवांचा ढीग लागलेला दिसायचा.” १९४३ साली पत्रकार टी. एच. व्हाईट यांनी हेननच्या चीन प्रांतात पडलेला दुष्काळ स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. त्यांनी त्याविषयी असे लिहिले: “दुष्काळ पडतो तेव्हा, कोणतीही गोष्ट खाण्याजोगी बनते, दळली जाते, खाल्ली जाते आणि मानव शरीरात तिचे उर्जेत रुपांतर होते. एखाद्या व्यक्तीला मृत्यू जेव्हा समोर दिसू लागतो तेव्हा ती, आतापर्यंत जे खाण्याजोगे नव्हते तेही खायला तयार होते.” दुःखाची गोष्ट म्हणजे, आफ्रिकेतील दुष्काळ अलिकडच्या काळात तर अगदी सर्वसामान्य बनला आहे. भूमी सर्वांना पुरेल इतक्या अन्नाचा उपज देत असली तरी, संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटना असा अंदाज लावते, की संपूर्ण जगभरात ८४ कोटी लोक उपाशी आहेत.
“जागोजाग मऱ्या.” (लूक २१:११) “१९१८ साली स्पॅनिश फ्लूमुळे दोन ते पाच कोटी लोक मरण पावले असावेत असा अंदाज आहे. काळा मृत्यू किंवा पहिल्या महायुद्धातही इतक्या लोकांचा बळी गेला नसावा,” असे सुटडॉईट्श त्सायटुंगने वृत्त दिले. तेव्हापासून, असंख्य लोक मलेरिया, देवी, क्षयरोग, पोलियो, कॉलेरा या आजारांना बळी पडले आहेत. आणि, एड्स कसा झपाट्याने वाढत चालला आहे हे पाहून जगातील लोक आ वासून पाहत आहेत. आपल्यासमोर अशी एक गोंधळात टाकणारी परिस्थिती निर्माण झाली आहे, की वैद्यकीय क्षेत्रात कमालीची प्रगती होऊनही आजार पुन्हापुन्हा उद्भवत आहेत. हा विरोधाभास जो मानवजातीला आतापर्यंत माहीत नव्हता तो आपल्याला, आपण खरोखरच एका असाधारण काळात जगत आहोत हे स्पष्टपणे दाखवतो.
“भूमीकंप.” (मत्तय २४:७) गेल्या १०० वर्षांदरम्यान भूकंपांनी लक्षावधी लोकांना गिळंकृत केले आहे. एका स्रोतानुसार, १९१४ पासून दरवर्षी इमारतींना तडे पाडण्याची व जमीन दुभंगण्याची शक्ती असलेले सरासरी १८ भूकंप झाले आहेत. याहूनही घातक भूकंप जे इमारतींना जमीनदोस्त करू शकतात वर्षातून एकदा तरी झाले आहेत. तंत्रज्ञानात प्रगती झालेली असली तरीसुद्धा मरणाऱ्यांच्या संख्येत घट झालेली नाही कारण झपाट्याने वाढणारी अनेक शहरे, भूकंप होणाऱ्या पट्ट्यातच उभारली जात आहेत.
आनंदाची बातमी!
शेवटल्या दिवसांच्या चिन्हाचे बहुतेक पैलू दुःखदायक आहेत. पण येशूने आनंदाची बातमी देखील सांगितली.
“सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल.” (मत्तय २४:१४) स्वतः येशूने सुरु केलेले कार्य अर्थात देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचे कार्य शेवटल्या दिवसांत कळसास पोहंचेल. हे खरोखरच आज होत आहे. यहोवाचे साक्षीदार बायबलच्या संदेशाचा प्रचार करीत आहेत आणि लोकांना ते जे काही शिकतात त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करण्यास मदत करत आहेत. सध्याला, ६० पेक्षा अधिक लाख साक्षीदार २३५ देशांत आणि ४०० पेक्षा अधिक भाषांत प्रचार करीत आहेत.
अस्वस्थ करणाऱ्या जागतिक घटनांमुळे जीवन अगदी शिथिल होईल, असे येशूने म्हटले नाही याची नोंद घ्या. त्याने असेही म्हटले नाही, की संपूर्ण जगात चिन्हातील केवळ एकच पैलू दिसून येईल. पण त्याने अनेक घटनांविषयी भाकीत केले ज्यांचे मिळून एक संयुक्त चिन्ह होईल व ते पृथ्वीच्या पाठीवर कोठूनही चटकन ओळखता येईल.
एकेका किंवा विशिष्ट घटनांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुम्हाला, विश्वव्यापी महत्त्व असलेल्या संयुक्त चिन्हाचा एक नमुना दिसतो का? पृथ्वीवर जे काही घडत आहे त्याचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभाव पडत आहे. असे आहे तर मग का इतके कमी लोक याकडे लक्ष देत आहेत? असा प्रश्न तुमच्या मनात येईल.
आपल्या हिताला प्रथम स्थान
“येथे पोहू नये!,” “उच्च दाब!,” “वेग कमी करा.” अशा काही चिन्हांच्या किंवा इशाऱ्यांच्या पाट्या आपण पाहतो. पण सहसा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. का? कारण आपण फक्त आपल्याच हिताचा विचार करत असतो. उदाहरणार्थ, नियमानुसार गाडी हळू चालवली पाहिजे पण आपल्याला ती वेगाने चालवाविशी वाटेल, किंवा मनाई केलेल्या पाण्यात पोहण्याची तीव्र इच्छा आपल्यात उत्पन्न होईल. परंतु चिन्हांकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणा आहे.
जसे की, ऑस्ट्रिया, फ्रान्स, इटली, स्वीत्झर्लंड येथील ॲल्पाईन पर्वतांतील हिमलोटात कधीकधी पर्यटकांचे जीव जातात कारण या पर्यटकांनी, सुरक्षित मार्गांत स्की किंवा स्नोबोर्ड करण्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केलेले असते. सुटडॉईट्श त्सायटुंगनुसार, अशा इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अनेक पर्यटकांची अशी वृत्ती असते: “ज्यात धोका नाही त्यात मजा कसली.” आणि दुःखाची गोष्ट म्हणजे, इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना दुःखदायक परिणाम भोगावे लागतात.
कोणत्या कारणांसाठी लोक येशूने वर्णन केलेल्या चिन्हाकडे दुर्लक्ष करत आहेत? त्यांच्या डोळ्यांवर धनलोभाची पट्टी असल्यामुळे ते कदाचित आंधळे झाले असावेत, उदासीनतेमुळे ते बधीर झाले असावेत, त्यांची बुद्धी क्षीण झाल्यामुळे त्यांना व्यवस्थीत निर्णय घेता येत नसावेत, दररोजच्या जीवनाच्या दबावांखाली ते दबून गेले असावेत किंवा प्रतिष्ठा गमावण्याच्या भीतीने त्यांना ग्रासले असावे. यांपैकी कोणत्याही कारणामुळे तुम्हीही येशूच्या उपस्थितीच्या चिन्हाकडे दुर्लक्ष करीत आहात का? चिन्ह ओळखून त्यानुसार कार्य करणे सुज्ञपणा नाही का?
पृथ्वीवरील परादीसमध्ये जीवन
अनेक लोक येशूच्या उपस्थितीच्या चिन्हाकडे लक्ष देत आहेत. क्रिस्टीन या जर्मनीतील एका तरुण विवाहित पुरुषाने असे लिहिले: “आपण जगत असलेला काळ खिन्न करणारा काळ आहे. आपण खरोखरच ‘शेवटल्या दिवसांत’ जगत आहोत.” क्रिस्टीन आणि त्याची पत्नी, मशीही राज्याची सुवार्ता इतरांना सांगण्यात बहुतेक वेळ खर्च करतात. फ्रँकही याच देशात राहतो. तो आणि त्याची पत्नी इतरांना बायबलमधून सुवार्ता दाखवून उत्तेजन देतात. फ्रँक सांगतो: “जगात चाललेल्या परिस्थितीमुळे आज पुष्कळ लोकांना त्यांच्या भवितव्याची चिंता वाटत आहे. आम्ही त्यांना पृथ्वीवर परादीस येणार आहे, ही बायबलमधील भविष्यवाणी दाखवून प्रोत्साहन देतो.” अशाप्रकारे, क्रिस्टीन आणि फ्रँक येशूच्या चिन्हाचा एक पैलू पूर्ण होण्यात हातभार लावत आहेत. हा पैलू म्हणजे राज्याच्या सुवार्तेचा प्रचार.—मत्तय २४:१४.
हे शेवटले दिवस कळसास पोहंचल्यावर येशू या जुन्या व्यवस्थीकरणाचा आणि या व्यवस्थीकरणाचे समर्थन करणाऱ्यांचा नाश करेल. मग मशिही राज्य पृथ्वीवर कारभार सुरू करून, भाकीत केल्याप्रमाणे पृथ्वीवर परादीससारखी परिस्थिती आणेल. तेव्हा मानवजात आजारपण व मृत्यू यांपासून मुक्त केली जाईल आणि मृत व्यक्तींना पृथ्वीवर पुन्हा जिवंत केले जाईल. काळाची चिन्हे ओळखणाऱ्यांपुढे हे उज्ज्वल भवितव्य आहे. तेव्हा, चिन्हाविषयी आणखी शिकून घेण्यात व या व्यवस्थीकरणाच्या नाशातून आपला जीव वाचवण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे जाणून घेण्यात सुज्ञपणा नाही का? होय आपण सर्वांनी हे तातडीने केले पाहिजे.—योहान १७:३. (w०५ १०/१)
[४ पानांवरील संक्षिप्त आशय]
अनेक घटनांचे मिळून बनणाऱ्या एका संयुक्त चिन्हाविषयी येशूने भाकीत केले जे पृथ्वीच्या पाठीवर कोठूनही ओळखता येईल
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
विश्वव्यापी महत्त्व असलेल्या संयुक्त चिन्हाचा एक नमुना तुम्हाला दिसतो का?
[६ पानांवरील चौकट/चित्रे]
शेवटल्या दिवसांची ओळखचिन्हे
अभूतपूर्व युद्धे.—मत्तय २४:७; प्रकटीकरण ६:४
अन्नटंचाई.—मत्तय २४:७; प्रकटीकरण ६:५, ६, ८
रोगराई.—लूक २१:११; प्रकटीकरण ६:८
अनीतीत वाढ.—मत्तय २४:१२
भूमीकंप.—मत्तय २४:७
कठीण दिवस.—२ तीमथ्य ३:१
पैशाबद्दल बेसुमार प्रेम.—२ तीमथ्य ३:२
पालकांस न मानणे.—२ तीमथ्य ३:२
ममताहीन.—२ तीमथ्य ३:३
देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड.—२ तीमथ्य ३:४
असंयमी.—२ तीमथ्य ३:३
चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणे.—२ तीमथ्य ३:३
येणाऱ्या धोक्याची दखल न घेणे.—मत्तय २४:३९
शेवटल्या दिवसांचा पुरावा नाकारणारे थट्टेखोर.—२ पेत्र ३:३, ४
देवाच्या राज्याचा विश्वभरात प्रचार.—मत्तय २४:१४
[५ पानांवरील चित्राचे श्रेय]
डब्ल्यूडब्ल्यूआय जवान: संदर्भ The World War—A Pictorial History, १९१९; गरीब कुटुंब: AP Photo/Aijaz Rahi; पोलियो झालेला मुलगा: फोटो: © WHO/Thierry Falise