येशू जसा चालला तसे चालत राहा
येशू जसा चालला तसे चालत राहा
“मी [देवाच्या] ठायी राहतो, असे म्हणणाऱ्याने तो [येशू] जसा चालला तसे स्वतःहि चालले पाहिजे.”—१ योहान २:६.
१, २. येशूकडे लक्ष देण्याचा काय अर्थ होतो?
प्रेषित पौलाने लिहिले: “जी शर्यत आपल्यासमोर आहे ती शर्यत आपण चिकाटीने पूर्ण करू. जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करू या.” (इब्री लोकांस १२:१, २, इझी टू रीड व्हर्शन) विश्वासाने चालण्याकरता येशू ख्रिस्तावर आपले लक्ष केंद्रित करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
२ “लक्ष केंद्रित” करणे याकरता असलेल्या मूळ भाषेतील शब्दाचा अर्थ, “लक्ष विचलित न होऊ देता पाहात राहणे,” “एखाद्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी दुसऱ्या गोष्टीवरून आपले लक्ष हटवणे,” “एखाद्या गोष्टीवर नजर खिळवणे” असा होतो. एका संदर्भ ग्रंथानुसार, “क्रिडांगणावर धावणाऱ्या ग्रीक धावपटूने आपल्या धावपट्टीवरून व ज्या बक्षीसाकरता तो धावत आहे त्यावरून आपले लक्ष हटवून, पाहणाऱ्या लोकांकडे लक्ष देताच त्याचा वेग कमी होत असे. ख्रिस्ती व्यक्तीच्या बाबतीतही हेच खरे आहे.” लक्ष विचलित झाल्यास आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा वेग मंदावू शकतो. आपण येशू ख्रिस्ताकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि आपले
नेतृत्व करणाऱ्या येशूमध्ये आपण कोणत्या गोष्टीवर लक्ष देतो? ‘जो आपले नेतृत्त्व करतो’ याकरता वापरलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, “एखाद्या गोष्टीत पुढाकार घेऊन आदर्श पुरवणारा” असा होतो. तेव्हा येशूकडे लक्ष देण्याचा अर्थ त्याच्या आदर्शानुसार वागणे असा होतो.३, ४. (क) येशू ख्रिस्त जसा चालला तसे चालण्याकरता कशाची आवश्यकता आहे? (ख) आपण कशावर लक्ष केंद्रित केले पाहिजे?
३ बायबल म्हणते: “मी [देवाच्या] ठायी राहतो, असे म्हणणाऱ्याने तो [येशू] जसा चालला तसे स्वतःहि चालले पाहिजे.” (१ योहान २:६) देवाच्या ठायी राहण्याकरता आपण येशूने ज्याप्रकारे आपल्या पित्याच्या आज्ञांचे पालन केले त्याप्रकारे आपणही येशूच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे.—योहान १५:१०.
४ तेव्हा, जसा येशू चालला तसे चालण्याकरता आपल्या या नेत्याचे आपण निरीक्षण केले पाहिजे व त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालले पाहिजे. या बाबतीत काही महत्त्वाचे प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो: आज ख्रिस्त आपले नेतृत्त्व कसे करत आहे? तो ज्याप्रकारे चालतो त्याचे अनुकरण केल्यामुळे आपल्यावर कसा परिणाम होण्यास हवा? येशू ख्रिस्ताने पुरवलेल्या आदर्शाला जडून राहिल्यामुळे कोणते फायदे आपल्याला मिळतील?
येशू आपल्या अनुयायांचे नेतृत्व कसे करतो?
५. स्वर्गात जाण्याआधी येशूने आपल्या अनुयायांना कोणते अभिवचन दिले?
५ स्वर्गात जाण्याआधी पुनरुत्थान झालेला येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसमोर प्रकट झाला व त्याने त्यांच्यावर एक महत्त्वाचे काम सोपवले. त्याने म्हटले: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.” त्या प्रसंगी या प्रमुख नेत्याने आपल्या अनुयायांना आश्वासन देखील दिले की हे कार्य पार पाडताना मी स्वतः तुमच्यासोबत असेन. तो म्हणाला: “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” (मत्तय २८:१९, २०) कोणत्या अर्थाने येशू ख्रिस्त या युगाच्या समाप्तीच्या काळात त्याच्या अनुयायांबरोबर आहे?
६, ७. येशू कशाप्रकारे पवित्र आत्म्याद्वारे आपले नेतृत्त्व करतो?
६ येशूने म्हटले होते, “ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल.” (योहान १४:२६) येशूच्या नावाने पाठवण्यात आलेला पवित्र आत्मा आज आपले मार्गदर्शन करतो व आपल्याला बळ देतो. हा आत्मा आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाचा प्रकाश देतो व “देवाच्या गहन गोष्टींचाहि” अर्थ समजून घेण्यास आपली मदत करतो. (१ करिंथकर २:१०) शिवाय “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन” यांसारखे ईश्वरी गुण “आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ” आहेत. (गलतीकर ५:२२, २३) पवित्र आत्म्याच्या मदतीने आपण हे गुण आपल्या व्यक्तिमत्त्वात आणू शकतो.
७ आपण जसजसा शास्त्रवचनांचा अभ्यास करतो व जे शिकलो त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करतो तसतसा यहोवाचा आत्मा आपल्याला बुद्धी, सुज्ञान, विवेक, सुज्ञता, ज्ञान, विद्या व समंजसपणा यांत विकास करण्यास मदत करतो. (नीतिसूत्रे २:१-११) पवित्र आत्मा आपल्याला मोह व परीक्षांनाही तोंड देण्यास मदत करतो. (१ करिंथकर १०:१३; २ करिंथकर ४:७; फिलिप्पैकर ४:१३) ख्रिश्चनांना ‘सर्व अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करून देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणण्याचा’ आग्रह करण्यात आला आहे. (२ करिंथकर ७:१) पण पवित्र आत्म्याच्या मदतीशिवाय आपण पवित्रतेच्या व शुद्धतेच्या देवाने घालून दिलेल्या दर्जांपर्यंत खरच पोचू शकतो का? निश्चितच नाही. आज आपले मार्गदर्शन करण्यासाठी येशू पवित्र आत्म्याचा उपयोग करतो. यहोवा देवाने आपल्या पुत्राला याचा उपयोग करण्याचा अधिकार दिला आहे.—मत्तय २८:१८.
८, ९. नेतृत्त्व करण्यासाठी ख्रिस्त ‘विश्वासू व बुद्धिमान दासाचा’ कशाप्रकारे उपयोग करतो?
८ आज येशू ज्याद्वारे मंडळीचे नेतृत्त्व करतो असा आणखी एक मार्ग लक्षात घ्या. आपल्या उपस्थितीविषयी व युगाच्या समाप्तीविषयी बोलताना येशूने म्हटले: “ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमिले आहे असा कोण? धनी मत्तय २४:३, ४५-४७.
येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील.”—९ “धनी” येशू ख्रिस्त आहे. “दास” म्हणजे पृथ्वीवरील अभिषिक्त ख्रिश्चनांचा समूह. या दास वर्गाला येशूच्या पृथ्वीवरील कारभारांकडे लक्ष देण्याचे व समयोचित आध्यात्मिक अन्न पुरवण्याचे कार्य सोपवण्यात आले आहे. ‘विश्वासू व बुद्धिमान दासाच्या’ समूहापैकी सुयोग्य पर्यवेक्षकांचा एक लहानसा गट नियमन मंडळाच्या रूपात कार्य करतो. हा लहानसा गट दास वर्गाचे प्रतिनिधीत्व करतो. ते सबंध जगातील राज्य प्रचाराच्या कार्याचे मार्गदर्शन करतात व यथाकाळी आध्यात्मिक आहार पुरवण्याचे काम देखील पाहतात. अशा रितीने ख्रिस्त, आत्म्याने अभिषिक्त असलेल्या ‘विश्वासू व बुद्धिमान दासाच्या’ व त्याच्या नियमन मंडळाच्या माध्यमाने मंडळीचे नेतृत्त्व करत आहे.
१०. वडिलांप्रती आपली वृत्ती कशी असावी व का?
१० ख्रिस्ताच्या नेतृत्त्वाचा आणखी एक पुरावा म्हणजे “मानवरूपी देणग्या,” अर्थात ख्रिस्ती वडील किंवा पर्यवेक्षक. “त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे,” म्हणून या देणग्या देण्यात आल्या आहेत. (इफिसकर ४:८ NW, ११, १२) त्यांच्याविषयी इब्री लोकांस १३:७ म्हणते: “जे तुमचे अधिकारी होते ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.” वडील मंडळीत पुढाकार घेतात. ते ख्रिस्त येशूचे अनुकरण करत असल्यामुळे आपणही त्यांच्या विश्वासाचे अनुकरण केले पाहिजे. (१ करिंथकर ११:१) वडिलांची व्यवस्था केल्याबद्दल आपण आपली कृतज्ञता, या ‘मानवरूपी देणग्यांच्या’ आज्ञेत व अधीन राहण्याद्वारे दाखवू शकतो.—इब्री लोकांस १३:१७.
११. ख्रिस्त आज कोणकोणत्या माध्यमांनी आपल्या अनुयायांचे नेतृत्त्व करत आहे व तो ज्याप्रमाणे चालला त्याप्रमाणे चालण्यात कशाचा समावेश आहे?
११ होय, आज येशू ख्रिस्त आपल्या अनुयायांचे नेतृत्त्व पवित्र आत्म्याच्या, ‘विश्वासू व बुद्धिमान दासाच्या’ व मंडळीतील वडिलांच्या माध्यमाने करत आहे. ख्रिस्त चालला त्याप्रमाणे चालण्याकरता तो कशाप्रकारे आपले नेतृत्त्व करत आहे हे समजून घेऊन त्याला अधीन होणे अगत्याचे आहे. तसेच तो ज्याप्रकारे चालला त्याचेही अनुकरण करणे अगत्याचे आहे. प्रेषित पेत्राने लिहिले: “ह्याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेहि तुम्हांसाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हांकरिता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१) येशूच्या परिपूर्ण आदर्शाचे अनुकरण केल्यामुळे आपल्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे?
अधिकाराचा वापर करताना समजूतदारपणा दाखवा
१२. ख्रिस्ताच्या आदर्शाच्या कोणत्या पैलूकडे मंडळीतल्या वडिलांनी खासकरून लक्ष द्यावे?
१२ येशूला आपल्या पित्याकडून अतुलनीय अधिकार प्राप्त झाला होता तरीपण या अधिकाराचा त्याने समजूतदारपणे वापर केला. मंडळीत सर्वांनी, विशेषतः पर्यवेक्षकांनी ‘आपला समजूतदारपणा सर्वांस कळून येऊ द्यावा.’ (फिलिप्पैकर ४:५, NW; १ तीमथ्य ३:२, ३) वडिलांना मंडळीत काही प्रमाणात अधिकार असल्यामुळे त्यांनी या अधिकाराचा वापर करताना ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे.
१३, १४. इतरांना देवाची सेवा करण्यास प्रोत्साहन देताना आज वडील ख्रिस्ताचे अनुकरण कसे करू शकतात?
१३ येशूने आपल्या शिष्यांच्या मर्यादा लक्षात घेतल्या. ते जे देऊ शकत होते त्यापेक्षा जास्त देण्याची येशूने मागणी केली नाही. (योहान १६:१२) त्यांच्यावर दबाव न आणता, येशूने त्यांना देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याकरता “नेटाने यत्न करा” असे प्रोत्साहन दिले. (लूक १३:२४) असे करण्यात स्वतः पुढाकार घेण्याद्वारे व त्यांच्या हृदयातून त्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करण्याद्वारे त्याने त्यांना प्रोत्साहन दिले. त्याचप्रकारे आज ख्रिस्ती वडील देखील इतरांना लाजिरवाणे वाटायला लावून किंवा त्यांच्या मनात दोषीपणाची भावना निर्माण करून त्यांना देवाची सेवा करायला लावण्याचा प्रयत्न करत नाहीत. उलट ते यहोवाबद्दल, येशूबद्दल व इतर मानवांबद्दल असलेल्या प्रेमापोटी देवाची सेवा करण्याचे त्यांना प्रोत्साहन देतात.—मत्तय २२:३७-३९.
१४ आपल्याला देण्यात आलेल्या अधिकाराचा येशूने लोकांच्या जीवनावर नियंत्रण मिळवण्याकरता गैरवापर केला नाही. गाठता येणार नाहीत असे आदर्श त्याने मांडले नाहीत किंवा असंख्य नियम बनवले नाहीत. मोशेने दिलेले नियम ज्या तत्त्वांवर आधारित होते, ती तत्त्वे मनापासून स्वीकारण्यास इतरांना मदत करून, त्यांना प्रेरित करण्याचा येशूने नेहमी प्रयत्न केला. (मत्तय ५:२७, २८) येशू ख्रिस्ताचे अनुकरण करणारे वडील आपल्या मनाप्रमाणे नियम बनवण्यापासून व आपल्या वैयक्तिक मतांबद्दल अट्टाहास करण्यापासून स्वतःला आवरतात. पेहराव, केशभूषा किंवा करमणूक, मनोरंजन यांबाबतीत बांधवांना ईश्वरी तत्त्वे मनापासून स्वीकारण्यास मदत करण्याचा वडील प्रयत्न करतात. या संदर्भातील काही तत्त्वे मीखा ६:८; १ करिंथकर १०:३१-३३ व १ तीमथ्य २:९, १० यांत आढळतात.
सहानुभूती दाखवा व क्षमा करा
१५. शिष्यांच्या हातून चुका झाल्या तेव्हा येशूची काय प्रतिक्रिया होती?
१५ आपल्या शिष्यांच्या चुका सुधारण्याच्या बाबतीतही ख्रिस्ताने आपल्याकरता कित्ता घालून दिला आहे. पृथ्वीवर मानवाच्या रूपात येशूच्या शेवटल्या रात्री घडलेल्या दोन घटनांकडे लक्ष द्या. गेथशेमाने बागेत आल्यावर येशूने “पेत्र, याकोब व योहान ह्यास बरोबर घेतले” आणि त्याने त्यांना “जागृत असा” असे सांगितले. मग “तो काहीसा पुढे जाऊन भूमीवर पडला” व “प्रार्थना” करू लागला. परत येऊन पाहिल्यावर त्याला दिसले की शिष्य “झोपी गेले आहेत.” यावर येशूची काय प्रतिक्रिया होती? तो म्हणाला: “आत्मा उत्सुक आहे खरा, तरी देह अशक्त आहे.” (मार्क १४:३२-३८) पेत्र, याकोब व योहान यांना खडसावण्याऐवजी त्याने सहानुभूती दाखवली! त्याच रात्री पेत्राने येशूला तीन वेळा नाकारले. (मार्क १४:६६-७२) या घटनेनंतर येशू पेत्राशी कशाप्रकारे वागला? ‘प्रभु उठला व शिमोनाच्या [पेत्राच्या] दृष्टीस पडला.’ (लूक २४:३४) बायबल सांगते की “तो केफाला, मग बारा जणांना दिसला.” (१ करिंथकर १५:५) पेत्राविषयी मनात अढी बाळगण्यापेक्षा येशूने त्या पश्चात्तापी प्रेषिताला क्षमा केली व त्याचे मनोबल वाढवले. नंतर येशूने पेत्रावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या.—प्रेषितांची कृत्ये २:१४; ८:१४-१७; १०:४४, ४५.
१६. आपले सहविश्वासू बांधव एखादी चूक करतात किंवा आपल्याला निराश करतात तेव्हा आपण येशूप्रमाणे कसे चालू शकतो?
१६ मानवी अपरिपूर्णतेमुळे जेव्हा आपले सहविश्वासू बांधव आपल्याला निराश करतात किंवा आपल्याशी वाईट वागतात तेव्हा आपणही येशूसारखेच सहानुभूतीशील व क्षमाशील असू नये का? पेत्राने आपल्या सहविश्वासू बांधवांना असा आग्रह केला: “तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा; वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका; तर उलट आशीर्वाद द्या.” (१ पेत्र ३:८, ९) येशू आपल्याशी वागला असता, त्याप्रमाणे सहानुभूतीशील व क्षमाशील रितीने एखादी व्यक्ती आपल्याशी वागली नाही तर आपण काय करावे? तरीसुद्धा आपले कर्तव्य आहे की आपण येशूचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा व त्याने जशी प्रतिक्रिया दाखवली असती तशीच आपणही दाखवावी.—१ योहान ३:१६.
राज्याच्या कार्यांना प्राधान्य द्या
१७. देवाच्या इच्छेप्रमाणे करणे हे येशूकरता सर्वात महत्त्वाचे होते हे कशावरून दिसून येते?
१७ आणखी एका मार्गाने आपण येशू ख्रिस्ताप्रमाणे चालले पाहिजे. देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार येशूच्या जीवनात सर्वात महत्त्वाचे कार्य होते. शोमरोनातील सूखार नगराजवळ एका शोमरोनी स्त्रीला प्रचार केल्यानंतर येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे.” (योहान ४:३४) आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे केल्यामुळे येशूला शक्ती मिळाली; त्याच्याकरता ते पौष्टिक, तृप्त करणाऱ्या व ताजेतवाने करणाऱ्या अन्नाप्रमाणे होते. देवाच्या इच्छेनुसार करण्यावर आपले लक्ष केंद्रित करण्याद्वारे येशूचे अनुकरण केल्यामुळे निश्चितच आपले जीवन खऱ्या अर्थाने उद्देशपूर्ण व समाधानदायी होणार नाही का?
१८. मुलांना पूर्णवेळेची सेवा हाती घेण्याचे प्रोत्साहन दिल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळतात?
१८ आईवडील आपल्या मुलांना पूर्णवेळेची सेवा हाती घेण्याचे प्रोत्साहन देतात तेव्हा त्यांना व त्यांच्या मुलांनाही अनेक आशीर्वाद मिळतात. दोन जुळ्या मुलांच्या पित्याने लहानपणापासूनच या मुलांना पायनियर सेवेचे ध्येय डोळ्यापुढे ठेवण्याचे प्रोत्साहन दिले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ही जुळी मुले खरोखरच पायनियर बनली. यामुळे जे आशीर्वाद अनुभवायला मिळाले त्यांबद्दल त्यांचे पिता असे लिहितात: “आमच्या मुलांनी आम्हाला निराश केले नाही. आम्ही कृतज्ञपणे म्हणू शकतो: “संतति ही परमेश्वराने दिलेले धन आहे.” (स्तोत्र १२७:३) आणि पूर्ण वेळेची सेवा केल्याने मुलांना कोणता फायदा होतो? पाच मुलांची आई म्हणते: “पायनियर सेवा केल्यामुळे माझ्या सर्व मुलांना यहोवासोबत अतिशय जवळचा नातेसंबंध जोडण्यास मदत झाली आहे. त्यांच्या वैयक्तिक अभ्यासाच्या सवयी सुधारल्या आहेत, वेळेचा सदुपयोग कसा करावा हे त्यांना शिकायला मिळाले आहे आणि यामुळे त्यांना जीवनात आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देण्याचे महत्त्व कळले आहे. त्या सर्वांना अनेक तडजोडी कराव्या लागल्या, पण आपण निवडलेल्या या मार्गाविषयी त्यांच्यापैकी एकालाही पस्तावा होत नाही.”
१९. तरुणांनी भविष्याकरता कोणत्या योजना आखणे सुज्ञपणाचे ठरेल?
१९ मुलांनो, भविष्याकरता तुमच्या काय योजना आहेत? एखाद्या व्यवसायात प्राविण्य मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का? की पूर्ण वेळेच्या सेवेत करियर बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहात? पौलाने ताकीद दिली, “अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.” पुढे त्याने म्हटले: “मुर्खासारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या.”—इफिसकर ५:१५-१७.
एकनिष्ठ असा
२०, २१. येशू कशाप्रकारे एकनिष्ठ होता आणि आपण त्याच्या एकनिष्ठतेचे अनुकरण कसे करू शकतो?
२० येशू जसा चालला तसे चालण्याकरता त्याच्या एकनिष्ठतेचे अनुकरण करणे अगत्याचे आहे. येशूच्या एकनिष्ठतेबद्दल बायबल म्हणते: “तो देवाच्या स्वरूपाचा असूनहि देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले; आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.” येशूने यहोवाची त्याच्याकरता जी इच्छा होती तिला अधीन होण्याद्वारे एकनिष्ठतेने देवाच्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन केले. तो वधस्तंभावर मरण सोसण्याइतपत आज्ञाधारक झाला. आपणही “जी चित्तवृत्ति ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती” बाळगून देवाच्या इच्छेनुसार करण्याकरता एकनिष्ठतेने त्याच्या अधीन झाले पाहिजे.—फिलिप्पैकर २:५-८.
२१ येशू आपल्या विश्वासू प्रेषितांशीही एकनिष्ठ राहिला. त्यांच्यात अपरिपूर्णता व मर्यादा असूनही येशूने “शेवटपर्यंत” त्यांच्यावर प्रेम केले. (योहान १३:१) त्याचप्रकारे आपण आपल्या बांधवांच्या अपरिपूर्णतेमुळे त्यांच्याविषयी टीका करण्याची वृत्ती निर्माण करू नये.
येशूने पुरवलेल्या आदर्शाला जडून राहा
२२, २३. येशूने पुरवलेल्या आदर्शानुसार चालण्याचे कोणते फायदे आहेत?
२२ अर्थात, अपरिपूर्ण मानव असल्यामुळे साहजिकच आपण आपल्या परिपूर्ण आदर्शाचे अगदी अचूकपणे अनुकरण करू शकत नाही. पण आपल्याकडून जमेल तितक्या चांगल्याप्रकारे आपण त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करू शकतो. असे करण्याकरता ख्रिस्त कशाप्रकारे आपले नेतृत्त्व करत
आहे हे समजून घेणे आणि त्याच्या आदर्शाला जडून राहणे अगत्याचे आहे.२३ ख्रिस्ताचे अनुकरण केल्याने अनेक आशीर्वाद मिळतात. आपले जीवन अधिक उद्देशपूर्ण व समाधानदायी बनते कारण आपण स्वतःच्या नव्हे तर त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यावर आपले लक्ष केंद्रित करतो. (योहान ५:३०; ६:३८) आपण शुद्ध विवेक बाळगू शकतो. आपली वागणूकही इतरांकरता आदर्श ठरते. येशूने सर्व कष्टी व भाराक्रांत जनांना आपल्याजवळ येऊन विसावा प्राप्त करण्याचे आवाहन केले. (मत्तय ११:२८-३०) आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करतो तेव्हा आपणही इतरांना आपल्या सहवासातून विसावा देऊ शकतो. तर मग, आपण सदोदीत येशू जसा चालला तसे चालत राहू या. (w०५ ९/१५)
तुम्हाला आठवते का?
• आज ख्रिस्त आपल्या अनुयायांचे नेतृत्त्व कसे करत आहे?
• मंडळीतील वडील देवाने दिलेल्या आपल्या अधिकाराचा वापर करताना ख्रिस्ताच्या नेतृत्त्वाचे अनुकरण कसे करू शकतात?
• इतरांच्या हातून चुका होतात तेव्हा आपण येशूच्या आदर्शाचे अनुकरण कसे करू शकतो?
• राज्याच्या कार्यांना तरुण कशाप्रकारे प्राधान्य देऊ शकतात?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१८ पानांवरील चित्र]
तरुणांनो, समाधानी ख्रिस्ती जीवनाकरता तुम्ही कोणत्या योजना करत आहात?