व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरी नम्रता आत्मसात करा

खरी नम्रता आत्मसात करा

खरी नम्रता आत्मसात करा

“दीन जनांस तू तारितोस.”—२ शमुवेल २२:२८.

१, २. बऱ्‍याच जगिक शासकांमध्ये कोणती गोष्ट सारखी होती?

ईजिप्तची सुप्रसिद्ध पिरॅमिड्‌स, त्या राष्ट्रावर एकेकाळी राज्य करणाऱ्‍या शासकांची मूक ग्वाही देतात. अश्‍शूरचा राजा सन्हेरीब, ग्रीसचा थोर सिकंदर, आणि रोमचा ज्युलियस सीझर हे देखील इतिहासावर आपली अमिट निशाणी सोडून गेले आहेत. या सर्व शासकांमध्ये एक गोष्ट सारखी आढळते. त्यांच्यापैकी कोणालाही खऱ्‍या अर्थाने नम्र म्हणून स्मरले जात नाही.—मत्तय २०:२५, २६.

वर उल्लेख केलेले हे शासक वेळोवेळी, आपल्या राज्यातल्या गोरगरिबांचा व दुःखितांचा जातीने शोध घेत असतील अशी कल्पना तुम्ही करू शकता का? निश्‍चितच नाही! किंवा या दुःखितांना सांत्वन देण्याकरता ते त्यांच्या गरीब वस्त्यांमध्ये जात असतील अशीही कल्पना आपण करू शकत नाही. गोरगरिबांप्रती त्यांची वृत्ती सबंध विश्‍वाचा सर्वश्रेष्ठ शासक यहोवा देवाच्या तुलनेत किती वेगळी आहे!

नम्रतेचे सर्वश्रेष्ठ उदाहरण

३. विश्‍वाचा सर्वश्रेष्ठ शासक आपल्या मानवी प्रजेशी कशाप्रकारे व्यवहार करतो?

यहोवाचे वैभव व थोरवी अगम्य आहे. तरीसुद्धा, त्याचे “नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो.” (२ इतिहास १६:९) आपल्या उपासकांपैकी जे लोक गरीब आहेत, निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःखी, कष्टी आहेत त्यांना पाहून यहोवा काय करतो? आपल्या पवित्र आत्म्याच्या माध्यमाने, एका अर्थाने तो अशा दुःखी जनांसोबत “वास करतो.” तो ‘नम्र जनांच्या आत्म्याचे संजीवन करितो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करितो.’ (यशया ५७:१५) यहोवाकडून उत्तेजन मिळाल्यावर त्याचे हे उपासक पुन्हा एकदा आनंदाने त्याची सेवा करू लागतात. देवाची नम्रता खरोखर किती महान आहे!

४, ५. (क) देव ज्याप्रकारे शासन करतो त्याविषयी स्तोत्रकर्त्याने आपल्या भावना कशाप्रकारे व्यक्‍त केल्या? (ख) “कंगालांस” साहाय्य करण्यासाठी देव कोणत्या अर्थाने “लवतो?”

पापी मानवांना साहाय्य करण्यासाठी सार्वभौम प्रभू यहोवाने स्वतःला जितके नम्र केले आहे तितके या सबंध विश्‍वात कोणीही केलेले नाही. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “परमेश्‍वर सर्व राष्ट्रांहून उन्‍नत आहे; त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे; परमेश्‍वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे, जो आकाश व पृथ्वी ह्‍यांचे अवलोकन करण्यास लवतो, त्याच्यासारखा कोण आहे? तो कंगालांस धुळींतून उठवितो, दरिद्र्‌यास उकिरड्यावरून उचलितो.”—स्तोत्र ११३:४-७.

यहोवा शुद्ध व पवित्र आहे आणि त्यामुळे त्याच्याठायी “अहंकार” नाही. (मार्क ७:२२, २३) ‘लवणे’ या शब्दाचा अर्थ, आपल्यापेक्षा समाजात निम्न दर्जावर असलेल्या व्यक्‍तीच्या पातळीला येणे किंवा आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या व्यक्‍तीशी व्यवहार करताना आपल्या उच्च पदावरून अथवा प्रतिष्ठित पदवीवरून खाली उतरणे. म्हणूनच, काही बायबल भाषांतरांत स्तोत्र ११३:६ यात असे म्हटले आहे की देव स्वतःला नमवतो. आपला नम्र देव, जो त्याच्या अपरिपूर्ण मानवी उपासकांच्या गरजांकडे प्रेमळपणे लक्ष देतो त्याचे किती सुरेख वर्णन आपल्याला या शब्दांतून मिळते!—२ शमुवेल २२:३६.

येशू नम्रपणे का वागला?

६. यहोवाच्या नम्रतेचा सर्वात मोठा पुरावा कोणता होता?

देवाच्या नम्रतेचा व प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा हाच आहे की त्याने आपल्या एकुलत्या एका परमप्रिय पुत्राला मानवजातीच्या तारणाकरता पृथ्वीवर मानवाच्या रूपात जन्म घेण्यासाठी पाठवले. (योहान ३:१६) येशूने त्याच्या स्वर्गीय पित्याबद्दलचे सत्य आपल्यासमोर प्रकट केले आणि “जगाचे पाप” हरण करण्यासाठी त्याने आपले परिपूर्ण मानवी जीवन अर्पण केले. (योहान १:२९; १८:३७) नम्रतेसहित आपल्या पित्याच्या इतर सर्व गुणांचे येशूने हुबेहूब अनुकरण केले. देवाने त्याला जे सांगितले होते, त्याप्रमाणे करण्यास येशू तयार होता. देवाने निर्माण केलेल्या सर्व जीवित प्राण्यांपैकी हे नम्रतेचे व प्रेमाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण होते. येशूच्या नम्रतेची सर्वांनी कदर केली नाही; त्याच्या शत्रूंनी तर त्याला “हलक्या प्रतीच्या मनुष्यांपैकी” लेखले. (दानीएल ४:१७) पण प्रेषित पौलाने मात्र हे ओळखले की त्याच्या सह विश्‍वासू बांधवांनी येशूचे अनुकरण केले पाहिजे व त्याअर्थी एकमेकांशी नम्रतेने वागले पाहिजे. (१ करिंथकर ११:१; फिलिप्पैकर २:३, ४) पौलाने येशूच्या उल्लेखनीय उदाहरणाकडे लक्ष वेधले:

७, ८. (क) येशू नम्र होण्यास कसे काय शिकला? (ख) आपले शिष्य होऊ इच्छिणाऱ्‍यांना येशू कोणते आवाहन करतो?

“जी चित्तवृत्ति ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीहि असो; तो देवाच्या स्वरूपाचा असूनहि देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्‍त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले; आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेहि वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.”—फिलिप्पैकर २:५-८.

काहीजण असा विचार करतील, ‘येशू नम्र होण्यास कसे शिकला?’ हा त्याच्या स्वर्गीय पित्यासोबत अमर्याद काळापर्यंत केलेल्या सहवासाचा एक अद्‌भुत परिणाम होता. त्या काळात त्याने सर्व गोष्टींच्या निर्मितीत देवाचा “कारागीर” म्हणून कार्य केले. (नीतिसूत्रे ८:३०) एदेन बागेतील विद्रोहानंतर देवाच्या ज्येष्ठ पुत्राला आपल्या पित्याने पापी मानवांशी कशाप्रकारे नम्रपणे व्यवहार केला हे पाहायला मिळाले. त्यामुळे, पृथ्वीवर असताना येशूने आपल्या पित्याच्या नम्रतेचे अनुकरण केले आणि हे आवाहन केले: “मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.”—मत्तय ११:२९; योहान १४:९.

९. (क) येशूला मुलांमध्ये कोणती गोष्ट इतकी आवडत होती? (ख) एका लहान मुलाचे उदाहरण देऊन येशूने कोणता धडा शिकवला?

येशू खऱ्‍या अर्थाने नम्र असल्यामुळे लहान मुलांना कधी त्याची भीती वाटली नाही. उलट, त्यांना तो हवाहवासा वाटे. येशूलाही मुले प्रिय होती व तो त्यांच्याकडे विशेष लक्ष देई. (मार्क १०:१३-१६) मुलांमध्ये येशूला कोणती गोष्ट इतकी आवडत होती? मुलांमध्ये असे काही उत्तम गुण होते जे त्याच्या प्रौढ शिष्यांच्या वागण्यातून नेहमीच दिसून आले नाहीत. लहान मुले मोठ्यांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजतात हे तर सर्वज्ञात आहे. म्हणूनच तर मुले मोठ्यांना सतत प्रश्‍न विचारत असतात. होय, बऱ्‍याच प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये शिकून घेण्याची वृत्ती अधिक असते आणि प्रौढांप्रमाणे ती सहसा गर्विष्ठ नसतात. एकदा येशूने एका लहान मुलाचे उदाहरण देऊन आपल्या अनुयायांस म्हटले: “मी तुम्हास सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ह्‍यास्तव जो कोणी स्वतःला ह्‍या बाळकासारखे नम्र करितो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय.” (मत्तय १८:३, ४) येशूने एक नियम सांगितला: “जो कोणी आपणाला उंच करितो तो नमविला जाईल; व जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल.”—लूक १४:११; १८:१४; मत्तय २३:१२.

१०. आपण कोणते प्रश्‍न विचारात घेणार आहोत?

१० हे सत्य लक्षात घेतल्यास, अनेक महत्त्वाचे प्रश्‍न उपस्थित होतात. सार्वकालिक जीवन मिळवण्याची आपली आशा काही अंशी खरी नम्रता आत्मसात करण्यावर अवलंबून आहे, पण कधीकधी ख्रिश्‍चनांना नम्रपणे वागणे इतके कठीण का जाते? आपला अहंकार गिळणे, व आपल्यापुढे येणाऱ्‍या परीक्षांना नम्रतेने तोंड देणे सहसा इतके कठीण का जाते? आणि खरी नम्रता आत्मसात करण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?—याकोब ४:६, १०.

नम्र होणे कठीण का आहे?

११. नम्र होण्याकरता आपल्याला संघर्ष करावा लागतो यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण का नाही?

११ तुम्हाला जर नम्रपणे वागणे कठीण जात असेल तर तुम्ही एकटे नाही. १९२० साली याच मासिकातल्या एका लेखात, नम्रता आत्मसात करणे किती गरजेचे आहे या विषयावर बायबलचा सल्ला सादर करण्यात आला होता. त्यात असे म्हटले होते: “आपला प्रभू नम्रतेला किती महत्त्व देतो हे पाहिल्यावर, सर्व खऱ्‍या शिष्यांना हा गुण आत्मसात करण्याचा दररोज प्रयत्न करण्याचे प्रोत्साहन मिळते.” पुढे त्या लेखात हा प्रांजळ कबुलीजबाब देण्यात आला: “शास्त्रवचनांतून हा सर्व सल्ला मिळाल्यावरही अपरिपूर्ण मानवी स्वभावामुळे जे प्रभूचे लोक या नात्याने या मार्गाने चालू इच्छितात त्यांना इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा या क्षेत्रात सर्वात जास्त संघर्ष करावा लागतो.” या विधानावरून, नम्र होण्याकरता खऱ्‍या ख्रिश्‍चनांना इतका संघर्ष का करावा लागतो याचे एक कारण दिसून येते. ते म्हणजे आपला पापी मानवी स्वभाव मोठेपणा मिळवण्याची अयोग्य इच्छा बाळगतो. कारण आपण स्वार्थी इच्छांना बळी पडलेल्या एका पापी जोडप्याचे, आदाम व हव्वा यांचे वंशज आहोत.—रोमकर ५:१२.

१२, १३. (क) हे जग ख्रिस्ती नम्रता आत्मसात करण्याच्या मार्गात कशाप्रकारे अडथळा आणते? (ख) नम्रता उत्पन्‍न करण्याचा आपला संघर्ष कोणामुळे अधिकच कठीण होतो?

१२ नम्रपणे वागणे आपल्याला कठीण वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपण अशा एका जगात राहतो, ज्यात लोकांना इतरांपेक्षा वरचढ होण्याचे सतत प्रोत्साहन दिले जाते. या जगातले एक सर्वसामान्य ध्येय म्हणजे, “देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी,” मारण्याची इच्छा पूर्ण करणे. (१ योहान २:१६) अशा जगिक इच्छांना आपल्यावर नियंत्रण मिळवू देण्याऐवजी येशूच्या शिष्यांनी आपली दृष्टी निर्दोष व देवाची इच्छा पूर्ण करण्यावर केंद्रित केली पाहिजे.—मत्तय ६:२२-२४, ३१-३३; १ योहान २:१७.

१३ नम्रता आत्मसात करून ती व्यवहारात आणणे कठीण असण्याचे तिसरे कारण म्हणजे अहंकाराचा मूळ स्रोत असणारा दियाबल सैतान सध्या या जगावर वर्चस्व गाजवत आहे. (२ करिंथकर ४:४; १ तीमथ्य ३:६) सैतान आपल्या दुष्ट प्रवृत्तींचा पुरस्कार करतो. उदाहरणार्थ, त्याने येशूला आपली उपासना करण्याच्या मोबदल्यात “जगातील सर्व राज्ये व त्यांचे वैभव” देऊ केले. सदैव नम्रतेने वागणाऱ्‍या येशूने दियाबलाचा प्रस्ताव धुडकावून लावला. (मत्तय ४:८, १०) त्याचप्रकारे सैतान ख्रिश्‍चनांनाही वैभव मिळवण्यास फुसलावण्याचा प्रयत्न करतो. पण नम्र ख्रिस्ती येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि स्तुती व सन्मान नेहमी देवालाच देतात.—मार्क १०:१७, १८.

खरी नम्रता आत्मसात करून व्यवहारात आणणे

१४. “वरवरची नम्रता” म्हणजे काय?

१४ कलस्सैकरांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलाने, निव्वळ मानवांना प्रभावित करण्यासाठी नम्रतेचा दिखावा करण्याविरुद्ध इशारा दिला. पौलाने याला “वरवरची नम्रता” म्हटले. जे नम्रतेचा केवळ आव आणतात ते आध्यात्मिक प्रवृत्तीचे लोक नसतात. उलट त्यांचे वागणे हेच दाखवते की ते मुळात गर्वाने ‘फुगलेले’ आहेत. (कलस्सैकर २:१८, २३, पं.र.भा.) येशूने अशा बनावट नम्रतेच्या उदाहरणांकडे लक्ष वेधले होते. त्याने दिखाऊपणे प्रार्थना करण्याबद्दल व लोकांना दिसावे म्हणून म्लानमुख होऊन उपास करण्याबद्दल परूशांना दोषी ठरवले होते. तेव्हा, आपल्या वैयक्‍तिक प्रार्थना देवाने ऐकाव्यात असे जर आपल्याला वाटते, तर आपण नम्रपणे प्रार्थना केली पाहिजे.—मत्तय ६:५, ६, १६.

१५. (क) नेहमी लीनतेने वागण्याकरता आपण काय करावे? (ख) नम्रतेची काही चांगली उदाहरणे कोणती आहेत?

१५ यहोवा देव व येशू ख्रिस्त नम्रतेची सर्वोत्तम उदाहरणे आहेत आणि ते कशाप्रकारे नम्रतेने वागले याविषयी मनन केल्याने ख्रिश्‍चनांना नेहमी खरी लीनता बाळगण्यास मदत मिळू शकते. याकरता बायबलचा व ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या बायबल आधारित प्रकाशनांचा नियमित अभ्यास करणे आवश्‍यक आहे. (मत्तय २४:४५) ख्रिस्ती वडिलांनी विशेषतः अशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे जेणेकरून “[त्यांचे] हृदय आपल्या भाऊबंदांच्याबाबतीत उन्मत्त होणार नाही.” (अनुवाद १७:१९, २०; १ पेत्र ५:१-३) नम्रतेने वागल्यामुळे ज्यांना आशीर्वाद मिळाले अशा अनेक उदाहरणांवर मनन करा, जसे की रूथ, हन्‍ना, अलीशीबा व इतर अनेकांची उदाहरणे. (रूथ १:१६, १७; १ शमुवेल १:११, २०; लूक १:४१-४३) तसेच, प्रतिष्ठित पदावर असूनही यहोवाच्या सेवेत नम्र राहिलेल्यांच्या उदाहरणांचाही विचार करा, जसे दावीद, योशिया, बाप्तिस्मा देणारा योहान व प्रेषित पौल. (२ इतिहास ३४:१, २, १९, २६-२८; स्तोत्र १३१:१; योहान १:२६, २७; ३:२६-३०; प्रेषितांची कृत्ये २१:२०-२६; १ करिंथकर १५:९) शिवाय, ख्रिस्ती मंडळीत नम्रतेने वागणाऱ्‍यांची आधुनिक काळातलीही अनेक उदाहरणे आहेत. या उदाहरणांवर मनन केल्याने खऱ्‍या ख्रिश्‍चनांना एकमेकांशी नम्रतेने वागण्यास मदत मिळेल.—१ पेत्र ५:५.

१६. ख्रिस्ती सेवाकार्य आपल्याला नम्र राहण्यास कशाप्रकारे मदत करते?

१६ ख्रिस्ती सेवाकार्यात नियमितरित्या सहभाग घेतल्यानेही आपल्याला नम्र राहण्यास मदत मिळू शकते. घरोघर जाऊन व इतर ठिकाणी भेटणाऱ्‍या अनोळखी लोकांशी लीनतेने वागल्यामुळे आपण त्यांच्याशी परिणामकारक संभाषण करू शकतो. विशेषतः घरमालकाने सुरुवातीला राज्याच्या संदेशात आस्था दाखवली नाही किंवा तो आपल्याशी उर्मटपणे बोलल्यास आपण नम्रतेने वागले पाहिजे. कित्येकदा आपल्या विश्‍वासांबद्दल आक्षेप घेतला जातो, पण नम्रता एका ख्रिस्ती व्यक्‍तीला, “सौम्यतेने व भीडस्तपणाने” उत्तर देण्यास मदत करू शकते. (१ पेत्र ३:१५) देवाचे कित्येक नम्र सेवक नवीन क्षेत्रात स्थायिक होऊन वेगळ्या संस्कृतींच्या व वेगळे राहणीमान असलेल्या लोकांना मदत करत आहेत. या नव्या क्षेत्रातल्या लोकांना अधिक परिणामकारकरित्या सुवार्ता सांगता यावी म्हणून हे सेवक नवीन भाषा शिकून घेण्याचे कठीण आव्हान नम्रपणे स्वीकारतात. हे खरोखर किती कौतुकास्पद आहे!—मत्तय २८:१९, २०.

१७. कोणत्या ख्रिस्ती जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्याकरता नम्र होण्याची गरज आहे?

१७ अनेकांनी नम्रतेने इतरांच्या भल्याकरता आपल्या स्वार्थांचा त्याग करून ख्रिस्ती जबाबदाऱ्‍याही पूर्ण केल्या आहेत. उदाहरणार्थ, आपल्या मुलांसोबत परिणामकारकरित्या बायबल अभ्यास घेता यावा म्हणून आपली कामे बाजूला ठेवून त्याकरता तयारी करण्यासाठी नम्रतेची गरज आहे. तसेच नम्रता मुलांना आपल्या आईवडिलांना ते अपरिपूर्ण असले तरीसुद्धा सन्मान देण्यास व त्यांच्या आज्ञेत राहण्यास मदत करते. (इफिसकर ६:१-४) ज्या स्त्रियांचे पती सत्यात नाहीत त्या आपल्या ‘भीडस्तपणाच्या निर्मल वर्तनाने’ आपआपल्या पतींला जिंकून घेण्याचा प्रयत्न करतात. पण असे करताना, त्यांना अनेक प्रसंगी नम्रतेने वागावे लागते. (१ पेत्र ३:१, २) आजारी, वृद्ध पालकांची प्रेमळपणे काळजी घेत असतानाही नम्रता व आत्मत्यागी प्रेम हे गुण अतिशय मोलाचे ठरू शकतात.—१ तीमथ्य ५:४.

नम्रतेमुळे समस्या सुटतात

१८. नम्रता आपल्याला समस्या सोडवण्याकरता कशाप्रकारे मदत करू शकते?

१८ देवाचे सर्व मानवी सेवक अपरिपूर्ण आहेत. (याकोब ३:२) कधीकधी दोन ख्रिस्ती व्यक्‍तींमध्ये मतभेद किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. एकाला दुसऱ्‍याविरुद्ध एखाद्या उचित कारणामुळे तक्रार असू शकते. सहसा पुढील सल्ल्याचे पालन केल्यास अशा समस्या मिटवता येतात: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरूद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.” (कलस्सैकर ३:१३) अर्थात, या सल्ल्याचे पालन करणे सोपे नाही पण नम्रता एका व्यक्‍तीला यानुसार वागण्यास मदत करू शकते.

१९. आपल्या भावना दुखावणाऱ्‍या व्यक्‍तीशी बोलताना आपण काय आठवणीत ठेवले पाहिजे?

१९ कधीकधी एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीला असे वाटू शकते की त्याची तक्रार खरोखरच गंभीर असल्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. अशावेळीही नम्रता त्या व्यक्‍तीला, ज्याने आपले मन दुखावले आहे असे त्याला वाटते त्याच्याकडे समेट करण्याच्या उद्देशाने जाऊन समस्येविषयी चर्चा करण्यास मदत करेल. (मत्तय १८:१५) ख्रिस्ती बांधवांमध्ये समस्या बराच काळपर्यंत राहण्याचे एक कारण म्हणजे एका किंवा दोन्ही पक्षाच्या व्यक्‍ती अहंकारामुळे आपली चूक कबूल करण्यास तयार नसतात. आणि जी व्यक्‍ती पुढाकार घेते ती देखील फाजील धार्मिक मनोवृत्तीने, टीकात्मक प्रवृत्तीने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे पाहता, खरी नम्र मनोवृत्ती अनेक मतभेद सोडवण्यास मदत करू शकते.

२०, २१. नम्र होण्याकरता सर्वात मोठी मदत कोणती आहे?

२० नम्रता आत्मसात करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे देवाच्या मदतीकरता व आत्म्याकरता विनंती करणे. पण आठवणीत असू द्या, “देव . . . लीनांवर कृपा करितो.” (याकोब ४:६) जर एखाद्या सहविश्‍वासू बांधवासोबत तुमचा काही मतभेद झाला असेल, तर यहोवाला प्रार्थना करा की त्याने तुम्हाला नम्रतेने वागण्यास मदत करावी, ज्यामुळे तुमच्याकडून लहान किंवा मोठी चूक झाली असल्यास ती कबूल करण्यास तुम्हाला मदत मिळेल. जर तुमच्या भावना दुखावल्या असतील, आणि भावना दुखावणाऱ्‍या बांधवाने प्रामाणिकपणे, “माझी चूक झाली” असे म्हटले, तर नम्रपणे त्याला क्षमा करा. जर त्याला क्षमा करणे तुम्हाला जड जात असेल, तर यहोवाकडे प्रार्थना करा व तुमच्या हृदयात अजूनही गर्वाच्या भावना असल्यास त्या काढून टाकण्याकरता मदतीची विनंती करा.

२१ नम्रतेने वागल्यामुळे किती चांगले परिणाम घडून येतात हे समजून घेतल्यामुळे आपल्याला हा दुर्मिळ गुण आत्मसात करून, तो सदोदीत व्यवहारात आणण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. असे करण्याकरता, यहोवा देव व येशू ख्रिस्त यांची किती उत्तम उदाहरणे आपल्याजवळ आहेत! देवाने दिलेले हे आश्‍वासन कधीही विसरू नका: “नम्रता व परमेश्‍वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय.”—नीतिसूत्रे २२:४. (w०५ १०/१५)

मनन करण्याकरता मुद्दे

• नम्रतेची सर्वोत्तम उदाहरणे कोणाची आहेत?

• नम्रता आत्मसात करणे कठीण का आहे?

• नम्र होण्यास कोणत्या गोष्टी मदत करू शकतात?

• नम्र असणे इतके महत्त्वाचे का आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

येशू खरोखर नम्र होता

[२० पानांवरील चित्र]

नम्रपणे व प्रेमाने एखाद्या गोष्टीवर पांघरूण घातल्याने बरेच मतभेद मिटवता येतात

[२१ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती अनेक मार्गांनी नम्रतेने वागू शकतात