व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगाचा कायापालट करण्याचे सामर्थ्य खरोखरच कोणाजवळ आहे का?

जगाचा कायापालट करण्याचे सामर्थ्य खरोखरच कोणाजवळ आहे का?

जगाचा कायापालट करण्याचे सामर्थ्य खरोखरच कोणाजवळ आहे का?

“गरीब लोक आम्हाला सांगतात, की सर्वात आधी त्यांना शांती व सुरक्षितता हवी आहे—आणि मग त्यांना आपले जीवन सुधारायच्या संधी हव्या आहेत. त्यांना न्यायी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यवस्था हव्या आहेत जेणेकरून, श्रीमंत राष्ट्रे व श्रीमंत कारखाने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांचे प्रयत्न उधळून टाकणार नाहीत.”

या शब्दांत एका आंतरराष्ट्रीय मदत एजेंन्सीच्या व्यवस्थापकांनी गरीब लोकांच्या इच्छा-आकांक्षांचे वर्णन केले. वास्तविक पाहता, त्यांचे हे शब्द अगदी उचितरीत्या जगाच्या संकटांना व अन्यायांना बळी पडलेल्यांच्या मनातील इच्छेचे वर्णन करतात. सर्वांना, खरी शांती व सुरक्षितता असलेल्या एका जगाची आस लागली आहे. पण असे जग कधी वास्तवात उतरेल का? असा कोण आहे का, की ज्याच्याजवळ मुळातच अन्यायी दुनियेचा कायापालट करण्याची शक्‍ती आणि क्षमता आहे?

कायापालट करण्याचे प्रयत्न

पुष्कळ लोकांनी या जगाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, फ्लोरन्स नाईटिंगेल नावाच्या १९ व्या शतकातील एका इंग्रज स्त्रीने, रूग्णांना स्वच्छ, प्रेमळ शुश्रूषा मिळावी म्हणून स्वतःला वाहून घेतले. तिच्या दिवसांत म्हणजे ॲन्टीसेप्टीक्स व ॲन्टीबायोटिक्सच्याही आधी, आज जी रुग्णसेवा आपण पाहतो तशी नव्हती. एका अहवालात असे म्हटले आहे: “परिचारिका, अशिक्षित, अस्वच्छ होत्या; त्या मद्यपान व अनैतिक वर्तनासाठी कुविख्यात होत्या.” परिचारिकांच्या दुनियेत बदल घडवून आणण्यासाठी फ्लोरन्स नाईटिंगलने घेतलेल्या अविरत परिश्रमाचे काही चीज झाले का? होय, तिला तिच्या प्रयत्नांचे फळ मिळाले. तसेच, करुणामय व निस्वार्थी असलेल्या असंख्य लोकांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रात, जसे की काही उदाहरणे द्यायची झाली तर, साक्षरता, शिक्षण, औषध, घरे, अन्‍नवाटप यांसारखे उपक्रम राबवून विलक्षण यश मिळवले आहे. यामुळे, कोट्यवधी मागासलेल्या लोकांच्या जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी विलक्षण सुधारणा करण्यात आल्या आहेत.

तरीसुद्धा या कठोर वास्तविकतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही: अजूनही लक्षावधी लोक, युद्ध, गुन्हेगारी, रोगराई, दुष्काळ आणि इतर दुःखद गोष्टींनी पीडित आहेत. आयरिश साहाय्य एजेंन्सी संस्था म्हणते: “दारिद्र्‌यामुळे दररोज ३०,००० लोकांचा मृत्यू होतो.” गेल्या अनेक शतकांपासून समाजसुधारकांचा चिंतेचा विषय असलेला गुलामांचा व्यापार आजही चालू आहे. “अमेरिकेत गुलामांचा व्यापार होत असलेल्या काळात आफ्रिकाहून जितक्या लोकांना पळवून आणले होते त्यापेक्षा आज कित्येक पटीने गुलाम जिवंत आहेत,” असे टाकाऊ लोक—विश्‍वव्यापी अर्थव्यवस्थेतील नवीन गुलामगिरी (इंग्रजी) नावाच्या पुस्तकात म्हटले आहे.

पूर्ण व कायमचा बदल घडवून आणण्याकरता लोक करत असलेले प्रयत्न कोणत्या कारणामुळे उधळून लावले जात आहेत? श्रीमंत व शक्‍तिशाली लोकांकडे असलेल्या सामर्थ्यामुळे की आणखी कशामुळे तरी?

अडखळणे

देवाच्या वचनानुसार, न्यायी जग आणण्याकरता मानव करत असलेल्या प्रयत्नांना सर्वात मोठी आडकाठी आणणारा दियाबल सैतान आहे. प्रेषित योहान आपल्याला सांगतो, की “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) खरे पाहता, आता सैतान ‘सर्व जगाला ठकवित आहे.’ (प्रकटीकरण १२:९) जोपर्यंत त्याचा दुष्ट प्रभाव काढून टाकला जात नाही तोपर्यंत लोक, दुष्टाईला व अन्यायाला बळी पडत राहतील. पण ही दुःखदायक परिस्थिती आली कशी?

आपले प्रथम पालक, आदाम व हव्वा यांना या पृथ्वीवर संपूर्ण मानव परिवाराला साजेसे एक परादीस गृह राहायला दिले होते. तेव्हा हे जग “फार चांगले” होते. (उत्पत्ति १:३१) मग हे चांगले जग कोणी बदलले? सैतानाने. स्त्रीपुरुषाने ज्या नियमांनुसार जगले पाहिजे ते नियम बनवण्याच्या देवाच्या हक्काला त्याने ललकारले. त्याने असे सुचवले, की राज्य करण्याची देवाची पद्धत रास्त नाही. त्याने, आदाम व हव्वेला स्वतंत्रतेचा मार्ग निवडण्यास भाग पाडले ज्यामुळे ते बरोबर व चूक काय हे स्वतःहूनच ठरवू शकतील. (उत्पत्ति ३:१-६) यामुळे, न्यायी जग आणण्याकरता मानव करत असलेल्या प्रयत्नांना दुसरी आडकाठी तयार झाली—पाप आणि अपरिपूर्णता.—रोमकर ५:१२.

देवाने याला परवानगी का दिली?

“पण देवाने पाप आणि अपरिपूर्णतेला वाढूच का दिले? त्याने आपल्या अमर्याद शक्‍तीचा उपयोग करून त्या बंडखोरांचा नाश करून पुन्हा नव्याने सुरुवात का केली नाही?” असा प्रश्‍न काही जण करतील. हा अगदी सोपा उपाय वाटतो. परंतु, शक्‍तीचा उपयोग केल्यास काही गंभीर प्रश्‍न उभे राहतात. जगातील गरीब व जुलूम सहन करणाऱ्‍या लोकांच्या मुख्य तक्रारींपैकी एक आहे, शक्‍तीचा गैरवापर; नाही का? एक हुकूमशाह जेव्हा त्याच्या धोरणांच्या विरोधात जाणाऱ्‍या व्यक्‍तीला त्याच्या मार्गातून काढून टाकण्यासाठी शक्‍तीचा उपयोग करतो तेव्हा प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांच्या मनात प्रश्‍न उभे राहत नाहीत का?

मी जोरजबरदस्ती करणारा किंवा शक्‍तीचा गैरवापर करणारा देव नाही याची प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना खात्री देण्याकरता त्याने सैतानाला आणि मानव बंडखोरांना त्याच्या नियमांविना व तत्त्वांविना स्वतंत्रपणे जीवन जगू देण्याची परवानगी दिली. पण केवळ एका मर्यादित कालावधीसाठी. देवाची शासन करण्याची पद्धतच उचित पद्धत आहे, हे काळच सिद्ध करून दाखवणार होता. त्यावरून हेही दिसून येणार आहे, की देव आपल्याला घालत असलेले निर्बंध आपल्याच फायद्यास्तव आहेत. आणि खरे तर, देवाच्या शासनाविरुद्ध केलेल्या बंडाळीच्या दुःखद परिणामांवरून हे साफ दिसून आले आहे. यावरून हेही सिद्ध झाले आहे, की देवाकडे, सर्व दुष्टाईचा समूळ नाश करण्याकरता आपल्या शक्‍तीचा उपयोग करण्याचे ठरवण्याकरता रास्त कारण आहे. असे फार लवकर होणार आहे.—उत्पत्ति १८:२३-३२; अनुवाद ३२:४; स्तोत्र ३७:९, १०, ३८.

पण देवाचा तो नियुक्‍त समय येईपर्यंत तरी आपल्याला ‘कण्हत व वेदना भोगीत’ या अन्यायी जगात राहावे लागणार आहे. (रोमकर ८:२२) आपण बदल आणण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, आपण सैतानाला मिटवू शकत नाही किंवा आपण अनुभवत असलेल्या दुःखाच्या मूळापाशी असलेल्या अपरिपूर्णतेला पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. आदामाकडून वारशाने मिळालेल्या पापाचे परिणाम काढून टाकण्याचे सामर्थ्य आपल्याजवळ नाही.—स्तोत्र ४९:७-९.

येशू ख्रिस्त कायमचा कायापालट करेल

याचा अर्थ, आपल्याला काहीच आशा नाही का? नाही. मर्त्य मनुष्यापेक्षा अतिशक्‍तीशाली असा एकजण आहे ज्याच्यावर कायमचा कायापालट करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तो कोण आहे? तो आहे येशू ख्रिस्त. बायबलमध्ये त्याचे वर्णन, मानव परिवाराचे तारण करणारा प्रमुख अधिपती असे करण्यात आले आहे.—प्रेषितांची कृत्ये ५:३१.

तो कार्य करण्याकरता देवाच्या ‘नियुक्‍त वेळेसाठी’ थांबून आहे. (प्रकटीकरण ११:१८) तो नेमके काय करील? तो “सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहंचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले त्या” पूर्ण करेल. (प्रेषितांची कृत्ये ३:२१) उदाहरणार्थ, “धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्‍यांना तो सोडवील. . . . जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील.” (स्तोत्र ७२:१२-१६) येशू ख्रिस्तामार्फत देव “दिगंतापर्यंत लढाया बंद” करण्याचे अभिवचन देतो. (स्तोत्र ४६:९) “मी रोगी आहे असे [त्याने स्वच्छ केलेल्या पृथ्वीवरील] एकहि रहिवासी म्हणणार नाही,” असे वचन तो देतो. आजारपण, रोगराई यांमुळे जे आंधळे, बहिरे व लंगडे झाले आहेत ते पुन्हा एकदा पूर्णपणे निरोगी होतील. (यशया ३३:२४; यशया ३५:५, ६; प्रकटीकरण २१:३, ४) गतकाळांत मरण पावलेल्यांना देखील फायदा होईल. अन्याय व जुलूम यांची शिकार झालेल्यांना तो पुन्हा जिवंत करण्याचे वचन देतो.—योहान ५:२८, २९.

येशू ख्रिस्त अर्धवट, तात्पुरता बदल आणणार नाही. तो, वास्तविक न्यायी जगाच्या आड येणाऱ्‍या सर्व आडकाठ्यांचे पूर्णपणे उच्चाटन करणार आहे. तो पाप आणि अपरिपूर्णता काढून टाकील आणि दियाबल सैतान व त्याच्या बंडखोर जीवनशैलीचे अनुसरण करणाऱ्‍या सर्वांचा नाश करील. (प्रकटीकरण १९:१९, २०; २०:१-३, १०) देवाने तात्पुरत्या काळासाठी राहू दिलेल्या मनःस्तापाचे व दुःखाचे “दुसऱ्‍याने येणे” होणार नाही. (नहूम १:९) येशूने जेव्हा आपल्याला देवाचे राज्य येवो आणि “जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही” त्याच्या इच्छेप्रमाणे होवो, अशी प्रार्थना करायला शिकवले तेव्हा त्याच्या मनात हेच होते.—मत्तय ६:१०.

‘पण, गरीब लोक नेहमी आपल्याबरोबर असतील, असे स्वतः येशूच म्हणाला नव्हता का? म्हणजे, अन्याय व दारिद्र्‌य केव्हाही आपली पाठ सोडणार नाही, असेच नाही का?’ असा प्रश्‍न आपल्या मनात येईल. (मत्तय २६:११) होय, गरीब लोक नेहमी असतील, असे येशूने म्हटले होते हे खरे आहे. परंतु त्याने ज्या संदर्भात असे म्हटले शिवाय देवाच्या वचनातील जी अभिवचने त्याने दिली त्यावरून त्याला असे म्हणायचे होते, की हे व्यवस्थीकरण आहे तोपर्यंत गरीब लोक हे असतीलच. कोणताही मानवी शासक जगातून दारिद्र्‌य आणि अन्याय काढून टाकू शकत नाही हे त्याला माहीत होते. त्याला हेही माहीत होते, की तो या जगाचा कायापालट करणार आहे. तो लवकरच एक पूर्णपणे नवीन व्यवस्था अर्थात “नवे आकाश व नवी पृथ्वी” आणणार आहे ज्यात कष्ट, आजारपण, दारिद्र्‌य आणि मृत्यू नाहीसे केले जाईल.—२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:१.

‘चांगले करण्यास विसरू नका’

याचा अर्थ, इतर लोकांना मदत करण्यासाठी आपण आपल्यापरीने कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा काही उपयोग होणार नाही, असा होतो का? मुळीच नाही. इतर जेव्हा परीक्षांचा व दुःखदायक परिस्थितीचा सामना करत असतात तेव्हा त्यांना मदत करण्याचे उत्तेजन बायबल आपल्याला देते. प्राचीन राजा शलमोनाने असे लिहिले: “एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नको.” (नीतिसूत्रे ३:२७) प्रेषित पौल असे आर्जवतो: “चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका.”—इब्री लोकांस १३:१६.

स्वतः येशू ख्रिस्ताने आपल्याला, आपल्यापरीने होईल तितके इतरांना मदत करण्याचे उत्तेजन दिले. त्याने एका शोमरोनी माणसाचे उदाहरण दिले. या माणसाने, एका मनुष्याला पाहिले ज्याला लुटारूंनी लुटले होते व जबर मारहाण केली होती. येशूने म्हटले, की या जखमी मनुष्याला पाहिल्यावर त्या शोमरोन्याला “त्याचा कळवळा आला.” त्याच्या जखमांवर मलमपट्टी करण्याकरता व बरे व्हायला त्याने आपल्या खिश्‍यातून पैसा खर्च केला. (लूक १०:२९-३७) त्या दयाळू शोमरोन्याने जगाचा कायापालट केला नाही पण, त्या जखमी व्यक्‍तीच्या जीवनात मात्र खूप मोठा बदल आणला. आपणही असेच करू शकतो.

पण येशू ख्रिस्त लोकांना मदत करण्यापलिकडे आणखी पुष्कळ काही करू शकतो. तो खरोखरच या जगाचा कायापालट करू शकतो आणि तो असे लवकरच करणार आहे. तो असे करेल तेव्हा आजच्या अन्यायी जगात ज्यांनी अन्याय सोसला आहे त्यांना आपले जीवन सुधारायची व खरी शांती व सुरक्षितता उपभोगण्याची संधी मिळेल.—स्तोत्र ४:८; ३७:१०, ११.

असे घडण्याकरता आपण थांबून असताना, या अन्यायी जगात अन्याय सोसलेल्यांचे आध्यात्मिकरीत्या व आर्थिकरीत्या ‘बरे करण्याचा’ आपल्यापरीने प्रयत्न करत राहू या.—गलतीकर ६:१०. (w०५ ११/१)

[५ पानांवरील चित्रे]

फ्लोरन्स नाईटिंगलने परिचारिकेच्या दुनियेत महत्त्वपूर्ण व कायमस्वरुपी बदल केले

[चित्राचे श्रेय]

Courtesy National Library of Medicine

[७ पानांवरील चित्रे]

ख्रिस्ताचे अनुयायी इतरांचे बरे करतात

[४ पानांवरील चित्राचे श्रेय]

The Star, Johannesburg, S.A.